पाऊलवाटा भरून टाकणारा पाऊस
घामाला पुरून टाकणारा पाऊस
अंगणात थूई थूई नाचणारा पाऊस
पत्र्याचे पन्हाळे भरून वाहणारा पाऊस
मातीला गंध देणारा पाऊस
सडकेला नवं करणारा पाऊस
खडकाला ओलं करणारा पाऊस
बेडकाला बोलतं करणारा पाऊस
डबक्यांना,खड्ड्यांना भरणारा पाऊस
जनावरांच्या अंगावरून ओघळणारा पाऊस
गुराख्याला चिंब भिजवणारा पाऊस
खुरपं जागीच टाकाय लावणारा पाऊस
उबेला बसायला लावणारा पाऊस
झाडांना न्हाऊ घालणारा पाऊस
ताली कट्ट्यांनी तुंबणारा पाऊस
वावरात नागवं नाचणारा पाऊस