पश्मीना

पालीचा खंडोबा १'s picture
पालीचा खंडोबा १ in जे न देखे रवी...
9 Jan 2016 - 4:50 pm

नदीवाकल्या पाउसचिंब झाडाला
वा-याने ढुशी द्यावी अन
सारे तुषार पाण्यावर झंकारून
तरंग उमटावे
तसं काहीसं आठवणींच असतं,
कुणीतरी समोरून जातं
मग सारी आठवणींची वर्तुळं
आयुष्य व्यापून टाकतात.

सतत स्वप्नात दिसणारं
कुणीतरी समोर दिसतं अवचित
तसं ते तिथच असतं
मग जाणवतं अरे हे तर तेच !
मग पानगळाल्या हिवाळ्यातल्या
झाडावर साठलेल्या दवांसारखं
उन्हात चमचमून
सारं प्रकाशोत्सवासारखं होतं.

अंग झोब-या गार वा-यात
कुणीतरी समोर येतं,
पश्मीना शालीसारखं
मग काश्मीर झाली भावना
विस्तवदुरडी होवून
सारं जगणं उबदार बनवते,
जेव्हा ते अकस्मात निघून जातं
तेव्हा पश्मीना शालीसाठी
मारली जाणारी हरणं आठवतात
तडफडणारी.

उन्हाळ्यात सुकवल्या तेंदूची
गोठल्या हिवाळ्यात बिडी
करावी,
तसा तो सहवास
सारा सुगंधीत तंबाखूचा धूर
छाती भरून घेते,
थरथरणारं शरीर
गच्चगोठलं धुरांड होवून
फक्त बघत राहतं.

कधीतरी महाबळेश्वरच्या
हिमपावसात भिजल्यावर
ग्रेपवाईन मध्ये घेतलेला
तो आश्वासक पेग
अन
मग सा-या थंडीचा
केलेला विस्तव,
समुद्रकाठावरच्या विषम
शहरातसुध्दा
चटके देत राहतो.

चटक्यानंतर टम्म फुगलेल्या
फोडातून
लालसर पाणी वाहतं
मग जाणवतं
संपलेला तो सहवास,
मस्तकात उरलेली ती
थंडीची नशा,
बारच्या वातानुकुलीतात फक्त
भास होतात थंडपणाचे !
उष्णता तिथेच राहिली
आहे
ह्याचे प्रत्यंतर सतत येत रहाते
कारण
आता तू फोनसुध्दा उचलत नाहीस !

विजयकुमार.........
०८ . ०२. २०१०, मुंबई

कविता

प्रतिक्रिया

नितिन नितिन's picture

10 Jan 2016 - 6:18 pm | नितिन नितिन

खूप दुरावा जानव्तो . विजय कुमार अप्र्तिम कविता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2016 - 6:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवटच्या ओळी खासच आहेत. जी लोक सालं लै जीव तोडुन प्रेम करतात त्यांच्या वाटेला असा त्रास नक्की.
काही लोकांची प्रेमाची ओढ आटली की ते प्रॅक्टीकल होतात आणि काही लोक पहिल्या क्षणाचीच भावना घेऊन तितकच
प्रेम करत शेवटपर्यंत भावनिक होऊन जगतात. प्रेम भावना कठीणच असते, आम्हाला बोलायला काय लागतं.

मिला था एक दिल जो दे दिया तुमको
हजारो भी होते, तो तेरे लिये होते...

-दिलीप बिरुटे

बहुगुणी's picture

10 Jan 2016 - 7:11 pm | बहुगुणी

तडफड खोलवर उतरली आहे!

(अवांतरः विस्तवदुरडी म्हणजे 'कांगडी' का? सुरेख शब्द आहे.)

साती's picture

10 Jan 2016 - 7:23 pm | साती

कविता आवडली.

विस्तवदुरडी, समुद्राकाठचं विषम शहर, गच्चगोठलं धुरांड हे सारे शब्द आणि त्यांची प्रयोजने अगदी युनिक आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jan 2016 - 5:48 am | अत्रुप्त आत्मा

+++१११ हेच म्हणतो! केवळ अप्रतिम.

पालीचा खंडोबा १'s picture

10 Jan 2016 - 7:41 pm | पालीचा खंडोबा १

बहु गुनि जि बरोबर कांगडीच

प्राची अश्विनी's picture

13 Jan 2016 - 7:50 pm | प्राची अश्विनी

अप्रतिम!

पैसा's picture

13 Jan 2016 - 9:43 pm | पैसा

कविता आवडली.

चांदणे संदीप's picture

13 Jan 2016 - 10:30 pm | चांदणे संदीप

____/\____

Sandy

किसन शिंदे's picture

14 Jan 2016 - 12:38 am | किसन शिंदे

एक नंबर कविता! पह्यलं आणि शेवटचं कडवं खूप आवडलं.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Jan 2016 - 11:03 am | मिसळलेला काव्यप्रेमी

फारच सुंदर..
लिहीत रहा...