थोडं ताडोबाविषयी . ताडोबाचे (भारतातल्या सगळ्याच टायगर रिसर्व ) २ भाग पडतात . बफर आणि कोअर झोन. नावाप्रमाणेच कोअर झोन हा वाघांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा इथे कोणत्याही प्रकारच्या मानवी अतिक्रमणाला बंदी . वाघाचे वास्तव्य , शिकार , विश्रांती आणि प्रजनन साधारण ह्या भागात असते . बफर झोन हा कोअर च्या बाहेरचा अंदाजे १० किमी पर्यंत , पण संरक्षित . इथे काही भागात मानवी वस्ती , रस्ते असतात . ताडोबाचा कोअर हा जवळपास ६२६ sq . km आणि बफर ११०१ sq km ( जंगल ७०० sq km आणि जंगल नसलेला ४०१ sq km ). बफर झोनच्या सफारीसाठी आरक्षण करता येत नाही , तिथे (गेट) वर त्या त्या वेळेस जाऊन करावे लागते . कोअर सफारी साठी आधीच आरक्षण करावे लागते . दोन्ही ठिकाणी सकाळी ६.३० (उन्हाळ्यामध्ये ६.००) आणि दुपारी ३.०० वाजता मर्यादित गाड्या आंत सोडतात. गाडीत फक्त ६ पर्यटक + १ गाईड + ड्रायव्हर एवढेच प्रवासी. गाडीतून खाली उतरायला बंदी .
ताडोबाला खालील प्रमाणे गेट्स आहेत .
मोहोरली - सगळ्यात जुने आणि लोकप्रिय . बाहेर भरपूर Resorts , हॉटेल्स. MTDC चे गेस्ट हाऊस अक्षरश: गेटच्या बाहेर ५०० मि. वर . सकाळ आणि संध्याकाळ प्रत्येकी २५-२७ गाड्या सोडतात .
कोलारा - सकाळ आणि संध्याकाळ प्रत्येकी ९ गाड्या सोडतात .
नवेगांव - सकाळ आणि संध्याकाळ प्रत्येकी १२ गाड्या सोडतात .
झरी - सकाळ आणि संध्याकाळ प्रत्येकी ६ गाड्या सोडतात .
ही गेट्स एकमेकांपासुन साधारण ३०-४० किमी अंतरावर आहेत . त्यामुळे आपली सफारी कोठून आहे हे बघूनच राहण्याची व्यवस्था बघावी . ज्याचा आम्हाला अनुभव आला . असो .
शेवटी ज्या दिवसाची आम्ही अगदी आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस उगवला . आम्ही सगळे ५.४५ लाच तय्यार होऊन resort च्या बाहेर उभे होतो . आज आम्ही मोहोरली गेटमधून बफर झोनला जाणार होतो . साफारीवाले आले आणि म्हणाले , (वर सांगितल्याप्रमाणे) गेट वर जाऊन नंबर लावलाय , काळजी करु नका . त्यांना परत यायला साधारण ६.२० झाले , त्यामुळे गेटवर आमची गाडी बरीच मागे होती . गेट मधून जितक्या पुढे असू तितके चांगले कारण गाड्यांच्या आवाजाने नंतर प्राणी सावध होतात आणि जास्त आंत जातात . त्यामुळे जरा नाराजच झालो . तसेही बफर झोन मधेच जाणार होतो त्यामुळे वाघ दिसायची शक्यता नव्हती . मुलांनाही सांगून ठेवले होते , आपल्याला वाघ दिसेलच असं नाही , आपण जंगल बघायला आलो आहोत . एक एक गाड्या पुढे जायला लागल्या . आमचा नंबर आला "Good Morning . मी अजय तुमचं स्वागत करतो ." गाईड च्या ह्या वाक्यांनी आम्ही अगदी चकितच झालो . कितीही झालं तरी एका सरकारी कर्मचार्याकडून अश्या संभाषणाची अपेक्षा नव्हती . आम्ही सुखावलो. चला , निदान जंगलाची माहिती तरी चांगली मिळेल. आत बरेच routes आहेत , आपण कोणत्या रस्त्याने जायचे हे पूर्णपणे गाईड वर अवलंबून असतं . आता तुम्हाला वाटत असेल कि आतमध्ये रस्ते कसे असतील , तर हा फोटो पहा.
अश्या वाटांवरूनच गाड्या जायला परवानगी , थोडं सुद्धा आजुबाजूस जाऊ शकत नाही . तसेच बरेचसे सगळे रस्ते oneway . जरी आम्ही बफर झोन मध्ये होतो तरीही जंगल अतिशय घनदाट . जंगलाच्या ह्या पहिल्या दर्शनानेच आम्ही खुश झालो . गाईड म्हणाला काल संध्याकाळी बफर मध्ये वाघीण दिसली होती . आमच्या सुद्धा आशा पल्लवीत झाल्या . तो म्हणाला बफर मध्ये ४ वाघीण आहेत आणि दिसण्याची शक्यता आहे . झालं . मुलं अगदी खुश झाली . पुन्हा त्यांना समजावलं . "दिसेलच असं नाही " सकाळची वेळ आहे , त्यामुळे पाणवठा / तलावाजवळ जाऊ . एका ठिकाणी अचानक ३-४ गाड्या थांबलेल्या दिसल्या. गाईडने त्या दिशेला गाडी न्यायला सांगितलं . जवळ जाताच समजलं आत्ताच माधुरी पलीकडे गेलीये . माधुरी हि १३-१४ वर्षांची वाघीण . सोनम , माया अश्या काही प्रसिद्ध वाघिणी हिच्याच मुली . नुकतीच व्यायलेली ३ पिल्लांना जन्म दिलेला . हे ऐकून आम्ही super Excited !!! पण आम्ही सगळ्यांत मागे , कशी काय दिसणार आम्हाला ती . नशिबाला दोष दिला . मी माझ्या कॅमेरा ची लेन्स बदलली ७०-३०० काढून १५०-६०० लावली , म्हटले जास्त झूम उपयोगी पडेल . आम्ही वाट बघत बसलो , अगदी चिडीचूप , अगदी छोटी छोटी हालचाल , पानाची सळसळ ऐकत . अधूमधून चितळ call देत होते , म्हणजे ती नक्कीच इथेच होती . एवढी शांतता होती कि अक्षरश: काटक्या मोडल्याचा सुद्धा आवाज येत होता . सगळे अगदी डोळ्यांत प्राण आणून उजवीकडच्या झाडीत बघत होते , आम्ही सगळ्यांच्या मागे , समोरच्या झाडीत अगदी बारीक बारीक फटी . काही हालचाल दिसतीये का ते बघतोय . अचानक गाईड पुटपुटला "पाय दिसतायत बघा !!!" नाही … आम्हाला नाहीच दिसले . पुन्हा एकदा चुकचुकलो . का आपण एवढे मागे आहोत ? पुढे असतो तर निदान पुसट का होईना दर्शन तरी झाले असते . अचानक आमच्या मागे उजवीकडून काटक्या मोडल्याचा आवाज आम्ही लगेच तिकडे बघितले आणि ती बाहेर आली , अक्षरश: आमच्या पासून १५ फुटांवर , इतकी जवळ कि माझ्या लेन्स मध्ये फोकस सुद्धा होत नव्हती . खरंच सांगतो माझे हात अक्षरश: थरथरत होते . जे बघतोय ते खरंय ह्यावर विश्वास बसत नव्हता.
तिची एन्ट्री ....
उजवीकडून बाहेर पडून ती डाव्या बाजुच्या झाडींकडे निघाली . एक मिनिट सुद्धा झाला नव्हता , मनात म्हणाले "बाई , लगेच नको जाऊ तिकडे." जणू काही तिने ते ऐकलेच … तिने एकदा तिकडे बघितले आणि पुढे चालू लागली .
थोडा वेळ सरळ डावीकडून चालत असतांना अचानक ती परत उजवीकडे वळाली .
तिथे तिने 'Boundary Marking ' केलं . ईतर प्राणी आणि वाघांसाठी , 'यें मेरा ईलाखा है।'
पुसटसा चेहरा दिसला , पुन्हा मान वळवली तिने . मनात म्हटलं " पलट , पलट … सिर्फ एक बार… " अक्षरश: तिने सुध्दा DDLJ च्या काजोल सारखी मान वळवली …
एक दोन क्षणच … तिने आपल्याला पाहायला आलेला प्रेक्षवृंद एकदा बघितला आणि परत मान वळवली.
ती उठून पुन्हा चालायला चालली …
पुन्हा ती डावीकडे वळली आणि झाडीमध्ये दिसेनासी झाली …
हा सगळा खेळ फारतर ५-७ मिनिटांचा . पण तिने एवढी नजर खिळवली होती की मी एवढ्या वेळांत पहिल्यांदाच माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या मुलीकडे बघितलं , मागे माझ्या मुलाकडे आणि बायको कडे बघितलं . त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद मी आज पर्यंत कधीच बघितला नव्हता . थोडं बाजूला बघितलं तर आई बाबांची गाडी . त्यांचेही चेहरे हेच सांगत होते . काही बोलायची , विचारायची गरजच नव्हती. पाच मिनिटांपूर्वी स्वतःच्या नशिबाला दोष देणारा मी आता सगळ्यांत नशीबवान ठरलो होतो , जणूकाही आम्हाला केवळ आम्हाला दर्शन देण्यासाठी ती आमच्या मागून आली होती . कोणताही अडथळा , कोणी कोणी सुद्धा नव्हते तिथे आमच्या आणि तिच्या मध्ये . थोडा वेळ तिथेच वाट पहिली , वाटलं ती पुन्हा बाहेर येईल. नाही आली . पण मन तृप्त झालं होतं . साधारण २.५-३ तास जंगलात फिरुन आम्ही बाहेर आलो. ड्रायवर आणि गाईड दोघांचेही आभार मानले , त्यांना बक्षिस दिले . तेही खुश झाले .
आमच्या सफारीचा थोडा गोंधळ झाला होता . आमच्या अजून ३ सफारी (सगळ्या कोअर झोनच्या) बाकी होत्या , पण आज संध्याकाळी आणि उद्या सकाळची 'कोअर झोन' सफरीची एन्ट्री 'झरी गेट' वरुन होती , जवळजवळ ४० किमी दूर . साफारीवाल्यानी सांगितलं कि तुम्ही जर इकडच्या forest officer ला विनंती केली तर ते बदलून देतील . पण एकदम दोन्ही सफारी बदलायला सांगितलं तर होणार नाही , म्हणून आज दुपारी परत बफर आणि उद्या सकाळची बदलून इकडची (मोहोरली गेट ) कोअर करु असे ठरले. बाकी सगळ्यांना Resort वर सोडून आम्ही (मी , भाऊ ,आणि माझ्या बाईसाहेब) साहेबांना भेटायला गेलो . अश्या कामांसाठी बायकांनी केलेली विनंती सहसा अव्हेरली जात नाही असा अनुभव असल्यामुळे आम्ही दोघे काहीच बोललो नाही . साहेब म्हणाले " आधीच बघायचं ना … आता कसं बदलता येईल ? " बायको , " अहो साहेब , आम्हाला तरी काय माहित ? आम्हाला वाटलं जवळच असेल . मुलं , सिनियर सिटीझन आहे हो बरोबर . please , करून द्या ना change … " बायकोच्या आवाजातले एव्हढे मार्दव मी प्रथमच ऐकत होतो . मी मला चिमटा काढून पहिला , हा खरंच तिचाच आवाज आहे का ? साहेब " बंर … या उद्या सकाळी बघु…. सोडू " पुन्हा एकदा विजयी मुद्रेने माझ्याकडे बघून तिने आणि आम्ही साहेबांचे आभार मानले आणि resort वर परतलो . आंघोळ , थोडा आराम आणि जेवण करुन दुपारच्या सफारी साठी आम्ही तयार झालो . साधारण ३.०० वाजता पुन्हा एकदा बफर गेट मधून आत शिरलो . विशेष काही दिसले नाही पण अगदी सूर्यास्त झाल्यावर आम्ही बाहेर आलो , तेव्हा जंगलात मिट्ट काळोख आणि रातकिड्यांचा आवाज सुरु झाला होता . तो सुद्धा फार छान अनुभव.
Giant Spider
एक अनामिक पक्षी , जाणकारांनी नाव सांगावे
झाडीतून आम्हाला पाहणारा रानगवा
आजचा दिवस संपला . वाघ दिसणार नाही असं मनात ठेऊन गेलो होतो कारण बफर मध्ये सहसा दिसत नाहीत . पण मनांत जे असते तसं नसतं . सगळा नशिबाचा खेळ . उद्या तर कोअर आहे , म्हणजे अगदी वाघांच्या घरातच जाणार . Can't wait !!!!
क्रमश :
जाताजाता :
•जंगलात फिरताना शक्यतो भडक रंगांचे शर्ट उदा . लाल , डार्क ब्ल्यु घालू नये . हिरवा , मातकट रंग अगदी योग्य . तोंडावर रुमाल आवश्यक , पुढे जाणार्या गाड्यांची खूप धूळ / माती उडते .
•जर तुम्हाला wild photography करायची असेल तर , माझ्या अनुभाववरुन , शक्य असेल तर २ कॅमरे जवळ बाळगणे जास्त फायद्याचे . एकाला साधारण २५०-३०० mm ची लेन्स जी प्राण्यांच्या फोटो साठी पुरते आणि दुसऱ्यावर ६०० mm जी पक्ष्यांच्या फोटो साठी उपयोगी . ऐनवेळेस लेन्स बदलणे जवळजवळ अशक्यच . मला वाघाचे सगळे फोटो मोठ्या लेन्स ने काढावे लागले कारण मला वेळच नाही मिळाला लेन्स बदलालायला . जर माझ्याकडे ३०० ची लेन्स लावलेला दुसरा कॅमेरा असता तर फोटो काढणे खूप सोपे गेले असते . Camera Rental चा option आहे .
प्रतिक्रिया
1 Jan 2016 - 8:58 am | राघवेंद्र
नशीबवान आहात. उद्याच्या भागाची वाट पहातो
1 Jan 2016 - 8:59 am | बाबा योगिराज
वा पहिल्याच दिवशी वाघोबाई दिसली. मज्जाए.
रानागव्याचा फोटो आवडला.
1 Jan 2016 - 9:07 am | बोका-ए-आझम
मला रणथंबोरच्या कोअर एरियातही वाघ दिसला नव्हता. तुम्हाला वाघिणीने असा cameo दिला म्हणजे _/\_. बाकीचे फोटोही मस्त. पुभाप्र!
1 Jan 2016 - 10:29 am | अमृत
मधे माधूरीला पाहिलयं. कालच डिस्कवरीवर मपोगा सिंहावरती आधारीत एक उत्कृष्ट लघुपट बघितला बँड ऑफ ब्रदर्स आणि आज ताडोबा... मस्तं मजा आली!! लगे रहो!
1 Jan 2016 - 1:08 pm | एस
माहिती आणि वर्णन हे दोन्ही आवडलं. वाखुसाआ.
1 Jan 2016 - 2:14 pm | बिपिन कार्यकर्ते
बाई जोरदार आहेत. _/\_
1 Jan 2016 - 3:27 pm | पद्मावति
वाह, मस्तं वर्णन आणि फोटो.
1 Jan 2016 - 11:40 pm | नांदेडीअन
छान वर्णन !
तो छोटा पाणकावळा आहे.(little cormorant)
2 Jan 2016 - 1:27 pm | Rahul Sable
अप्रतिम
लेखन आणि फोटोग्राफी लयभारी
पुढच्या भागाची वाट पाहतोय.
4 Jan 2016 - 8:00 am | विवेक ठाकूर
दिल खुष! लिहीत राहा.
5 Jan 2016 - 9:28 am | प्रमोद देर्देकर
मस्तच. आवडाली तुमची सहल.