गिलोटिन

पालीचा खंडोबा १'s picture
पालीचा खंडोबा १ in जे न देखे रवी...
25 Nov 2015 - 12:24 pm

अल्लड भासांना तू
काजळमोही फुंकर घातलीस
अन भासांचे
फुललेले वासनानिखारे झाले,
जाळायला लागले
सर्वांग
अन् दाह
सर्वदूर पसरले
अज्ञातात,
मग शरीर मशाल होवून
जळायला लागले.

पतंगाने दिव्याभोवती
घिरट्या घालून
जोहार करावे
तसे शरीर
संभोगजोगवा मागत
रानोमाळ मुक्तीसाठी
भटकत असताना
शांती मनो-याच्या घंटा
आकाशव्यापी टाहो फोडत
परतीच्या हाका
घुमवू लागल्या
दुर्दैव इतकेच
संमोहनपटलाच्या गर्तेतले
शरीर बधीर झालेले
प्रतिसादास प्रतिकूल.

विखारी भोगाचे काटे
तुडवत शरीर
चाळणी चाळणी होवून
अंधा-या रात्रीत ज्वराने
रसरसलेले वाळवंट
मार्गु लागले
तरीही घंटा ध्वनी
माग काढतच राहिले
अन्
दोलायमान शरीर
भिरभिरत
भोगजखमांचे रक्त
जमिनीवर सांडत
अंतजवळकीच्या स्वागताची
रांगोळी सजवत
रस्ते चितारू लागले.

वधवेदींच्या खडकाळ
प्रदेशात
निवडूंगांचे फड खड्ग
बनून शरीराची खांडोळी
करू लागले असताना
तो विनवू लागला
" विश्व शांतीच्या रस्त्यावर
माझा वध झाला
तू काय करतोयस
माघारी फिर,
बघ ह्या घंटांचे प्रतिध्वनी
ह्या निबीडातूनही
मार्गरेखा पुन्हा आखतील,
शरण ये ! शरण ये !

भासशरण शरीर
वधवेदीवर जावून
विसावले
निवडुंगाच्या फडाचे गिलोटिन
होवून मस्तक धडावेगळे
झाले......
अन्
रसरसलेल्या शरीराची
स्निग्ध ज्योत
शांतीघंटांचे प्रतिध्वनी माग
काढत
मनो-याकडे गेली
वाळवंटाचे
पर्जन्यवन झाले अन्
खडकांचे संगमरवरी थडगे
ताजमहालाचे स्मरण देवू
लागले
" प्रेम चिरंतन आहे ,
आत्मा सर्वचिरंतन
हेच सांगण्यासाठी त्या दयाळू
महात्म्याने हातापायी खिळे
ठोकून घेतले
अन मस्तकी
काटेरी मुकुट "

आता वासनेला अर्थ तो काय राहिला ?

विजयकुमार.........

२८.११.२००९, मुंबई

कविता

प्रतिक्रिया

उपमांचा आणि रूपकांचा मारा जरा जास्त झालाय. त्यामुळे कवितेत म्हणायचे काय आहे हे माझ्यासारख्या सामान्य वाचकापर्यंत पुरेशा ताकदीने पोहोचत नाहीये. असो.

विशाल कुलकर्णी's picture

27 Nov 2015 - 10:00 pm | विशाल कुलकर्णी

एस यांच्याशी सहमत आहे. विषय छान निवडताय, पण उपमा आणि रूपकांच्या अतिरेकामुळे शब्दबंबाळ वाटतेय. पुलेशु _/\_

पालीचा खंडोबा १'s picture

25 Nov 2015 - 1:03 pm | पालीचा खंडोबा १

मित्रनो कविता कवीच्या भावनेने जन्मास येते आपल्यास कळले नाही ह्यात माझा काय दोष ? आणि हे कवितेचे व्यासपीठ आहे का? इथे कवितेच व्यासंग होतो का कि टिकाच होते ?

शब्दबम्बाळ's picture

27 Nov 2015 - 9:40 pm | शब्दबम्बाळ

आपण चांगले लिहित आहात पण काही वाचकांना जर ते कळाले नाही आणि त्यांनी प्रामाणिकपणे सांगितले तर त्यात त्यांचा तरी काय दोष?
दुर्बोध असल्याचा शिक्का बर्याचदा ग्रेस यांच्या कवितांवरही बसतो
हे वाचा! चांगली चर्चा आहे...

मारवा's picture

27 Nov 2015 - 11:45 pm | मारवा

युनिक आहे तुमची शैली
आवडली
एक विनंती आहे छोटीशी
ते प्रतिसादा प्रतिक्रीया च्या खेळात उतरु नका कृपया
नाहक भरकटाल तुम्ही
तुम्ही फक्त लिहीत राहा
छान लिहीता तुम्ही आणि कवी स्वतः कविता एक्स्प्लेन करु लागला की तो प्रकार फारच केविलवाणा होतो.
बघा पटलं तर घ्या नाही तर सोडुन द्या
तुमच्या कवितांना एक दर्जा आहे निश्चीतच.
सांभाळा प्लीज

एकजटा अघोरी's picture

28 Nov 2015 - 7:21 am | एकजटा अघोरी

सहमत. उत्तम लिहिताय. फार विचार करु नका. एवढेच म्हणेन.

पालीचा खंडोबा १'s picture

28 Nov 2015 - 2:45 pm | पालीचा खंडोबा १

मारवा जी आभार. हे कायमचे लक्षात ठेवीन. मी तसे करतही नाही परंतु इथे ह्या खेळात चुकून सापडलो . सल्ल्याबद्दल धन्यवाद अघोरी तुमचेही आभार. ह्यापुढे असे होणे नाही .

पालीचा खंडोबा १'s picture

28 Nov 2015 - 2:48 pm | पालीचा खंडोबा १

लिखाणात दुर्बोध असे काही नसते हो. माफ करा जास्त बोलत असलो तर. पण मला असेच लिहायला आवडते. सगळी कलाकुसर एकाच पण त्यातही डावे उजवे करायचे झाल्यास दगडात कोरलेले शिल्प नि वस्त्रावरील कलाबूत. थोडे लहान मोठे