हमदर्द, आरजू, उल्फत, इकरार
आणि
आगोश
आणि ….
कित्येक असतील,
गाण्यांत सहजपणे येणारे उर्दू/ उर्दूईश शब्द लगेच उलगडून सांगायला पूर्वी गुगल नव्हतं खेरीज मोठ्यांना विचारायची सोय नव्हती, त्या वयापासून मी अशा बर्याच हिंदी गाण्यांचा भक्त आहे. आताही त्यातली बरीचशी गाणी मी अर्थाच्या मागे न लागताच ऐकतो. पण कधी कधी अर्थ समजणं अगदीच कम्पलसिव होऊन जातं, अगदी काहीतरी मोठ्ठं मिस होतंय कि काय असं वाटेपर्यंत,
कैसी तेरी खुदगर्जी
ना धूप चुने ना छाव
कैसी तेरी खुदगर्जी
किसी ठोर टिके ना पांव ।
हम्म, खुदगर्ज म्हणजे ? बर्याचदा ऐकलाय …
पण कळतंय कळतंय, हा हिरो कनफ्यूझ्ड असेल …. धड इकडे ना तिकडे ….
मस्त मौला मस्त कलंदर
तू हवा का एक बवंडर
बुझके फिर अपने हि अंदर
क्यों रह गया ……
… दोस्ता तुझं सगळं आपलं आपल्यातच,
तसंच ठरवलं होतंस ना ?
मग
हि आतली वादळं आतंच मिटवतांना का बरं इतका
दमलायंस ?
रे कबीरा मान जा ….
रे फकीरा मान जा ….
आजा
तुझको पुकारें
तेरी परछाईंया ।
ऐक रे …
झालं गेलं ठीकाय
ये तू परत आमच्यात
तू जिथे सोडून गेला होतास ना ?
आम्ही अजूनही तिथेच आसपास आहोत
ये रे
सगळे थांबलेयत ….
आता सांगा ….
अडलं का काही ?
खुदगर्ज चा अर्थ कळल्याशिवाय?
नाही ना ?
नाही ना ?
हो हि …. आणि नाही हि …
खुदगर्ज - स्वार्थी, सेल्फीश
अगदी फक्त प्यूअरली स्वतःच्या स्वार्थासाठी निघून गेलेल्यासाठीसुद्धा जीवाची माणसं कित्ती जीव टाकतात,
म्हंटलं तर या एका शब्दावर गाणं फिरतंय, म्हंटलं तर नाही,
वाचा वाटलं तर परत ….
आणि मग आठवून पाहा आहे का
असं कोणी ?
कौतुक करणारं,
पण लांब आलात
आणि
आता खूपच लांब वाटणारी माणसं
दर वेळी कारणांची लिस्ट मांडता बिचार्यांपुढे
आमचे फ़र्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स … सुट्टी नाही …. किंवा विजा !
ती फसवणूकही कौतुकानं ऐकणारी लोकं (आणि पुढच्या वेळी नक्की भेटूवाली)
अगदी लांब कुठे राहणारी जाड पण मऊ चपात्या करणारी आत्या?
सुरकुतल्या हातांचे आजोबा ?
तुमचं धूम अप्रूप असणाऱ्या शाळेतल्या बाई
आणि जिच्या मदतीनं इंजिनीअरिंग पास झालात अशी थोडी मागे पडलेली,
कधीकाळची घट्ट मैत्रीण
किंवा मग
आई बाबा … भाऊ बहिण … वगैरे गृहीत धरलेलं पब्लिक ?
कधी नकळतपणातून आणि कधी कधी नाईलाजातून
किंवा अगदी दुर्लक्षातून असं होत असेलही पण,
खुदगर्ज आहोत खरं, थोडं बदलायला हवं
अगदीच बेटावर अडकायचो नाहीतर… काय ?
एनीवे
असो
जड झालं, ट्रॅक बदला
एक आहे
किचकट गणितं, शब्दांचे नेमके अर्थ माहित असणं, झालंच तर शंभर लोकांसमोर उभं राहून बोलता येणं आणि कवितेचं रसग्रहण करता येणं या अगदी शालेय गोष्टींशिवाय काय अडलंय ?
परत तेच
म्हंटलं तर अडतं, म्हंटलं तर नाही :)
परवा निघालो होतो,
गाडी काढली कि बर्याचदा बायकोच "मार्ग"दर्शक (GPS होल्डर) आणि डीजे असते, माझी आणि हिची गाण्यांची चॉईस जनरली नाही जुळत, माझ्या गाण्यांनी ती अगदीच बोरावते, आणि माझ्यामते तिची गाणी फारच उथळ असतात,
तरं नेहेमीप्रमाणे थोडं तीचं थोडं माझं असं गाणं मिळाल्यावर त्यावर स्थिरावली,
जिसको दुवाओं में मांगा
तू हैं वही रेहनुमा …।
बा : रेहनुमा म्हणजे माहितेय का तुम्हाला ?
मी : नाही
बा : रेहनुमा - गाईड - मार्गदर्शक
मी: बरं :)
-निखिल
प्रतिक्रिया
7 Nov 2015 - 10:44 am | रातराणी
आवडलं मुक्तक! सुंदर आहे गाणं!
7 Nov 2015 - 8:38 pm | निखिलचं शाईपेन
थँक्स !
-निखिल
7 Nov 2015 - 10:47 am | सतिश गावडे
सुंदर लिहीलंय !!!
7 Nov 2015 - 11:30 am | दमामि
वा!!!!
7 Nov 2015 - 11:35 am | संदीप डांगे
छान... आवडलं.
7 Nov 2015 - 11:44 am | शरद
चला, निखीलने सुरवात तर केलीच आहे, तेव्हा आपणही या सुंदर काव्याचा आस्वाद घेऊं. प्रथम काही शब्दांचे अर्थ पाहू.
खुदगर्ज ...स्वार्थी, खुदगर्जी.... स्वार्थीपणा. ठौर (ठोर नव्हे) ;स्थान मौला ..स्वामी, मालक, कलंदर ...फकीर बवंडर ... चक्री वादळ. परछाई ...सावली. धूप...ऊन. छाव ..सावली हे माहीत असतच.
हा तर संवादाचा पहिला भाग दिसतो. पहिला दुसर्याला चांगला, जवळून ओळखत असला पाहिजे. फार वर्षांपासूनचा जिवलग मित्रच. अशाचीच तुमची गाढ ओळख असू शकते व अशा मित्राच्या बाबतीतही तुम्हाला काही सलगीने विचारणे शक्य असते. काय विचारावयाचे आहे ? अगदी जवळच्या माणसाच्या बाबतीतच आपणाला वाटत रहाते कीं " अरे, आपण इतके जवळचे, पण याच्या काही गोष्टी आपल्याला कळलेल्याच नाहीत. याच्या स्वभावाचे काही कंगोरे दाट धुक्यात असल्या सारखे अस्पष्टच आहेत. या वेळी तो असा कां वागला वा त्या वेळी तसा ? समर्थ असूनही त्याने तेव्हा माघार कां घेतली ? " मग एकदा विचारून टाकावेच म्हणून तुम्ही धाडस करून त्याला विचारता
..
अरे, ना वादळांत उडी घेतलीस, ना सुखासमाधानात चार दिवस घालवलेस. आम्हाला विश्वासात घेतले नाहीस, हा एक प्रकारचा स्वार्थी पणाच नाही कां ?
हे बघ, तू एक संसाराची फिकीर नसलेला बैरागी. स्वत:च स्वताचा मालक. स्वयंभू. घोघावणारे चक्री वादळच म्हणा ना. मग आज हे कुठे गेले ? सारे कसे शांत, शांत कां ? हे असे आतल्या आत मिटावयाचे कारण तरी काय ?
मित्रा, तू जगाची पर्वा करत नव्हतास म्हणून आम्ही तुला फकीर म्हणावयाचो. जणु दुसरा कबीरच, सगळ्यां मूल्यांना ठोकरून लावणारा, पण आज हे काय झाले आहे ? अरे सखा म्हणजे कुडी बाहेरची जीवच त्याला तरी सांग !.
पण असेच म्हणावयास पाहिजे कां ? आरती प्रभूंचे एक काव्य आहे
तो कुणी माझ्यातला तो घन तमी ठेचाळतो !
तरीही मी कां चालतो, तो बोलतो ना थांबतो !!
श्क्य आहे की मीच माझ्या अंतर्मनातील "त्या" दुसर्याशीच बोलत आहे. मित्र हो, हा दुसरा "तो" तुम्हाला रोज नाही तरी केव्हा न केव्हा भेट देत असतोच. आता वरील काव्य या दोघांतील संवाद आहे असे कल्पून सगळ्या कडव्यांचा अर्थ लावून पहा. कविता "आपलीशी" करावयाचा एक मार्ग.
शरद
7 Nov 2015 - 12:11 pm | बोका-ए-आझम
शरदकाका ब-याच दिवसांनी आले! छान लेख आणि सुंदर विश्लेषण!
7 Nov 2015 - 8:44 pm | निखिलचं शाईपेन
शरदराव,
चार चांद लगाना म्हणजे काय ? तर तुमचा प्रतिसाद
गाणे कित्ती अॅंगलने भेटू शकते एखाद्याला
थँक्स खरंच
-निखिल
7 Nov 2015 - 11:58 am | चांदणे संदीप
आवडत्या गाण्यावर छान लेख!
7 Nov 2015 - 12:05 pm | जातवेद
छान!
7 Nov 2015 - 12:35 pm | बहुगुणी
निखिल, शरदराव: आते रहिये, सुनाते रहिये!
7 Nov 2015 - 2:02 pm | शिव कन्या
सुंदर. शब्द लक्षात राहतात.
अर्थ नंतर लागत जातात.
7 Nov 2015 - 4:34 pm | उगा काहितरीच
प्रत्येक प्रवासात मस्ट हॅव असणारे काही गाणे त्यापैकीच हे एक . त्यावर मुक्तकही छान जमले . एकदम पॉलीश्ड नाही पण सुंदर .
8 Nov 2015 - 12:10 am | पद्मावति
सुंदर लिहिलंय. लेख आवडला.
8 Nov 2015 - 6:58 am | मितान
नव्या गाण्यांत अगदी आवडून गेलेले हे गाणे ! तुम्ही सुरेख रसग्रहण केलंय !
पण ना, तू जिथे सोडून गेला होतास तिथेच आसपास आम्ही अजून आहोत हे तेवढं पटलं नाही. उलट क्वचित कधी तो जेव्हा भेटतो त्याला तसं वाटत असतं. खरं तर सगळीकडे सगळं बदललेलं असतं. ती कळ वेगळीच ! असो.
लिहीत रहा. :)
शरद, तुम्हाला भेटलेलं गाणं अधिक जवळचं वाटलं.
8 Nov 2015 - 12:40 pm | पैसा
छान लिहिलंय! शरद यांच्याकडून अजून एक सुरेख रसग्रहण! छानच धागा झालाय!