हे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. त्यासोबतच पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज राजवटी आपापल्या परीने जमिनीवर आणि समुद्रात आपला प्रभाव वाढवायचा प्रयत्न करू पाहत होत्या. ह्या सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची कर्मकठीण जबाबदारी कोवळ्या वयात शंभूराजांवर येऊन ठेपली होती. स्वराज्याची चहूबाजूंनी होणारी कोंडी फोडणे, स्वराज्य अबाधित राखणे, स्वराज्याचा विस्तार करणे आणि हे कार्य कोणत्याही तडजोडीशिवाय तडीस नेणे हा संभाजी महाराजांचा ध्यास होता आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तो ध्यास त्यांनी सोडला नाही. अनेक इतिहासकार (?) शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची तुलना करतात. शिवाजी महाराज निर्विवाद श्रेष्ठ राज्यकर्ते होते, त्यांच्यासारखा दुसरा होणे शक्य नाही; पण अशी तुलना करून संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करणे निश्चितच अन्यायकारक आहे.
महाराजांची एकूणच कारकिर्द संघर्षपूर्ण होती. बघायला गेले, तर शंभूराजांची कारकिर्द जेमतेम नऊ वर्षाची. तीसुद्धा सदैव युद्धभूमीत किंवा युद्धाच्या विविध योजना आखण्यात गेली. त्यांना राजकारणाचा अनुभव इतका नव्हता, पण थोरल्या छत्रपतींची विचारसरणी, स्वराज्यासाठी केलेली राजनीती आणि युद्धनीती त्यांनी अगदी जवळून बघितलेली. त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणारच, पण फारच कोवळ्या वयात त्यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी आल्याने राजकीय अनुभव पदरी नव्हताच. त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीची फार कमी कागदपत्रे उपलब्ध असल्याने अनेक गोष्टी कायमच्या काळाच्या पडद्याआड गेल्या. जी कागदपत्रे-नोंदी उपलब्ध आहेत, त्यात शत्रूंच्या गोटातील पत्रव्यवहार, नोंदी किंवा आपल्याकडील काही बखरी ज्यात शंभूराजांविरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतल्याची दिसते. संभाजीराजे व्यसनी होते, बाईलवेडे होते, त्यांच्यात योग्य निर्णयक्षमता नाही असे विविध आरोप त्यांच्यावर केले गेले. गेल्या पन्नास वर्षात मोठ्या प्रमाणावर महान व्यक्तींचे चरित्रलेखन झाले, ज्यात चरित्रकाराने चांगल्या आणि वाईट दोन्ही घटनांचा समावेश करून ते चरित्र पूर्णत्वास नेलेले आहे. परंतु संभाजी महाराज त्यास अपवाद असावेत. पूर्णपणे एकांगी वाटणार्या ह्या नोंदी आणि त्यावरून लिहिल्या गेलेल्या बखरी किती शास्त्रोक्त असाव्यात, हा संभ्रम निर्माण होतोच. अर्थात ह्यालाही निवडक अपवाद आहेतच.
महाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवर १४ मे १६५७ रोजी झाला. त्यांच्या लहानपणीच आईचे कृपाछत्र हरपले. त्यांच्या सावत्र आईंंना - म्हणजेच सोयराबाईंना, स्वतःच्या मुलाला स्वराज्याचा वारस म्हणून पुढे करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती आणि त्यात शंभूराजे मोठा अडथळा होते. सोयराबाईंच्या अशा ह्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे, संभाजी महाराजांचे नकारात्मक चित्र थोरल्या महाराजांसमोर उभे केले, ह्यासोबतच पुढे अष्टप्रधान मंडळ वैचारिक विरोधक म्हणून सहभागी होत गेले. ह्या सततच्या अंतर्गत तक्रारी, कुरबुरी शंभूराजांच्या जिव्हारी लागल्या नसत्या तर नवलच. तरी हे सर्व होत असताना शिवाजी महाराजांनी एक पिता म्हणून, आपल्या भावी उत्तराधिकारी असलेल्या शंभूराजांची जडणघडण करण्यात बारकाईने लक्ष घातले. त्यांना लहानपणापासूनच संस्कृत भाषा पारंगत केले गेले. त्याच संस्कृतमध्ये संभाजीराजांनी पुढे अनेक रचना केल्या, ग्रंथलेखन केले.
वयाच्या आठव्या वर्षी शंभूराजांवर एक प्रसंग ओढवला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने स्वराज्यावर मोठ्या संख्येने आक्रमण केले आणि भविष्याचा विचार करता महाराजांनी युद्धातून माघार घेत मुघलांशी तह केला, तो तह म्हणजे 'पुरंदरचा तह'!! ह्या तहान्वये इतर अटींसोबत शिवाजी महाराजांनी मुघलांची मनसब स्वीकारावी, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली. महाराजांनी पुढील विचार करता ती मनसब स्वतः न स्वीकारता, आपल्या आठ वर्षाच्या मुलाच्या - म्हणजेच संभाजीराजांच्या नावे स्वीकारण्याचे मान्य केले. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेळा मुघलांची मनसबदारी स्वीकारली. पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी होईपर्यंत, संभाजीराजांना मुघल सैन्यात ओलीस ठेवण्याची अटदेखील महाराजांनी मान्य केली. पुढे एका वर्षांने थोरल्या छत्रपतींना मुघलांकडून आग्रा भेटीचे निमंत्रण दिले गेले. सोबत संभाजीराजे होतेच आणि तिथेच महाराजांनी नजरकैदेतून सुटण्यासाठी पेटार्यातून पलायन केले, हे आपल्याला माहीत आहेच. आग्र्यात असलेल्या राजस्थानी कवींनी संभाजीराजांचे वर्णन काहीसे असे केलेले होते - “शिवाजीका एक नौ बरस का छोरा थो, वो रंगीला गोरागोरा स्वयंसुरत बहलीबहली थो”. आग्रा-महाराष्ट्र प्रवासात मुघलांना संशय येऊ नये म्हणून, संभाजीराजांना काही काळ मथुरेत ठेवण्यात आले. पुढे काही दिवस मुघलांनी संभाजी महाराजांचा शोध घेऊ नये म्हणून, शिवाजी महाराजांनी आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूची अफवा उडवून त्यांचे जिवंतपणी उत्तरकार्यही करून टाकले. ह्या घटनांचा दूरगामी परिणाम झाला नसेल तर विरळाच आणि इथूनच त्यांच्या बंडखोरी स्वभावाला एक पार्श्वभूमी मिळाली.
स्वतःच्या अस्तित्वासाठी बळसामर्थ्य वापरणे हा त्यांनी निवडलेला पर्याय होता. महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे कारभारी अष्टप्रधान मंडळ राजारामांना छत्रपतींच्या गादीवर बसवून स्वराज्याचा कारभार नियंत्रित करण्याचा विचार करू लागले. शेवटच्या काही महिन्यात झालेल्या पारिवारिक आणि राजकीय मतभेदांमुळे संभाजी महाराजांचे नेतृत्व पूर्णपणे अकार्यक्षम आहे, असे एकमत झाले. ही बातमी कळताच संभाजी महाराज पेटून उठले. आपल्या हक्कावर गदा येऊ द्यायची नाही, असे ठरवून रायगडावर पोहोचून सर्व कारभार आपल्या नियंत्रणाखाली आणला. त्यांना त्यातून बडतर्फ करण्याचा कट केला गेला, पण तो त्यांनी अकबराच्या साहाय्याने उधळून लावला. दोषी प्रधान मंडळींना - म्हणजेच अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद ह्यांना सुधागडाच्या पायथ्याशी हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.
स्वराज्याची धुरा हाती आल्यावर आपल्या वडिलांचे धोरण पुढे नेत दक्षिणी पातशाह्या एकत्रच राहिल्या पाहिजेत हा विचार त्यांनी दृढ केला. चहूबाजूंनी होणार्या मुघली आक्रमणावर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी आघाड्या उघडल्या. ह्या आघाड्यांमध्ये औरंगजेबाला महाराष्ट्रात अक्षरशः खिळवून ठेवले आणि त्याच वेळी मुघलांची मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणांवर - म्हणजेच खानदेश, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, पेडगाव, वर्हाड येथे मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली. इथे दक्षिणेत लढत असताना उत्तरेत औरंगजेबाच्या राजधानीवर परस्पर हल्ला करण्याचीसुद्धा योजना शंभूराजांनी बनवली होती आणि ती त्यांनी रामसिंग कछवा ह्यांना संस्कृत पत्राद्वारे कळवली होती. ती योजना काही कारणास्तव पूर्णत्वास गेली नाही, पण संस्कृत भाषेतील पत्रामुळे ती गोपनीय राहिली. बंडखोर शहजादा अकबरला त्याच वेळी संभाजीराजांनी आश्रय दिल्याने औरंगजेबाचा अजून भडका उडाला आणि त्याला आपली पगडी उतरवून संभाजीराजांना पकडण्याची किंवा ठार मारण्याची प्रतिज्ञा करावी लागली.
हसन अलीसारखा मातब्बर सरदार कोकणातून पळवून लावणे, रामसेज किल्ला तब्बल ५ वर्ष लढवणे, मुघलांचे आक्रमण अंगावर घेऊन सिद्दी आणि इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून उत्तर फिरंगणावर हल्ला करणे, पोर्तुगीजांनी गोव्यातील फोंड्यावर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न साफ हाणून पाडणे, सिद्दीच्या जंजिर्यावर धडक देऊन, सरतेशेवटी किल्ला पाडण्यासाठी समुद्रात सेतू बांधणे, कुतुबशाही आणि आदिलशाही पडल्यावरही, विजापूरकरांच्या मदतीसाठी स्वराज्याचे सैन्य पाठवणे, कासिमखान, बहादूरखान यासारख्या मातब्बर सेनापतींना युद्धातून सपशेल माघार घ्यायला लावणे, कल्याण-भिवंडीकडे आलेला हसनअली खान, रणमस्तखान, बहादूरखान यांना दिलेला लढा... अशा अनेक प्रसंगांतून आपल्याला शंभूराजांच्या धैर्याची, जिद्दीची आणि गौरवशाली परंपरेची चुणूक दिसून येते. महाराष्ट्रभर पसरलेल्या मुघल सैन्याशी सतत नऊ वर्षे टक्कर देणार्या सैन्याला कायम कार्यप्रवृत्त ठेवणे हा अव्वल राजनीतीचा भाग होता.
स्वराज्याच्या संरक्षणासाठी भक्कम आरमार असण्याच्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नालासुद्धा संभाजी महाराजांनी योग्य आकार दिला. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना १६ मे १६८२ला पाठवलेल्या पत्रानुसार स्वराज्याच्या आरमारात त्या वेळी ६६ युद्धनौका, ३०-१५० टनांची ८५ गलबते, ३ शिडांची गुराबे ह्यांचा समावेश होता.
संभाजी महाराजांच्या ह्या धडक मोहिमेचा धसका घेतलेल्या औरंगजेबाने सरतेशेवटी फितुरीचे अस्त्र वापरले. महाराजांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीत कवी कलशांचे सतत वाढते महत्त्व लक्षात घेता, काही लोकांना भडकावण्यात आले आणि फितुरी झाली. अशाच एका मोहिमेवरून परतताना संगमेश्वर येथील सरदेसाईंंच्या वाड्यात संभाजीराजे आणि त्यांचे सहकारी पकडले गेले. ह्या अटकेनंतर आपले काय होणार हे महाराजांनी ओळखले होते. त्यांचा आणि कवी कलशांचा अमानुष छळ आणि त्यानंतर त्यांची केलेली हत्या याच्या विस्तृत वर्णने आपण अनेक कादंबर्यांतून वाचली आहेतच. मरणाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे सामान्य माणसाच्या हातून घडणे शक्य नाही. मरणाला मिठीत घेऊन ते मोक्षाला गेले. स्वराज्याचे रक्षण करता करता आपल्या प्राणांची आहुती देण्याचे महाभाग्य संभाजीराजांना लाभले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच खर्या अर्थाने दिल्लीशी महाराष्ट्राची झुंज सुरू झाली आणि मुघल सत्ता विलयाला गेली.
तुळापूर - संभाजी महाराजांचे स्मारक
केशव पंडितांनी लिहिलेल्या 'राजारामचरितम्' ग्रंथात संभाजीराजांचे एका शब्दात सार्थ वर्णन केले, ते असे -
महाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम् |
श्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा ||५||
संभाजीकेन च भ्राता ‘ज्वलज्ज्वलनतेजसा’ |
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच ||६||
अर्थ : सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती व ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी विरहित असलेला राजाराम..
-----------------------------------------
लेखाचे संदर्भ:
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – लेखक सदाशिव शिवदे (उपलब्ध प्रत्येक बारीकसारीक पुराव्यांसह एक परिपूर्ण शंभूचरित्र)
जनसेवा समिती विले-पारले अभ्यासवर्ग : ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे (५ ऑक्टोबर, २०१४)
अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते : निनादराव बेडेकर, पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे
प्रचि १ आणि ३ साभार विकिपीडिया आणि प्रचि २ साभार कौस्तुभ कस्तुरे (http://www.kaustubhkasture.in/)
-----------------------------------------
मला कल्पना आहे, हा लेख प्रमाणाबाहेर मोठा झालेला आहे, पण हात आखडता घेणे जमले नाही. मला प्रत्यक्षात इतिहासाची गोडी लावणारे निनादराव यांचा आमच्यासाठी घेतलेला हा शेवटचा अभ्यासवर्ग. शिव इतिहासाला वाहून घेतलेल्या त्या इतिहासकाराच्या जाण्याने एक भलीमोठी पोकळी आज निर्माण झाली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांवर बोलत राहावे आणि आम्ही सर्वांंनी तासनतास ते ऐकत बसावे, अशी मैफल आता होणे नाही. त्या इतिहासकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/|\_
त्यांची एक आठवण :
~ सुझे !!
प्रतिक्रिया
13 Nov 2015 - 12:49 am | काळा पहाड
समाप्तिमुद्रा हा काय प्रकार असतो?
13 Nov 2015 - 9:48 am | अद्द्या
पत्राच्या शेवटी येणारी मुद्रा ?
सही सारखी !!
13 Nov 2015 - 10:00 am | तुषार काळभोर
माझे लेखन इथे संपले आहे. (याच्या पुढे काही लिहिले असेल तर ते माझे लिखाण नाही असे समजा).
(चेक मध्ये अक्षरी रक्कम लिहिताना आपण 'फक्त' लिहून संपवतो, तसं)
-इति लेखनसीमा
13 Nov 2015 - 2:02 pm | तुडतुडी
संदीप डांगे . तुम्ही जो इतिहास वाचलाय त्याचे पुरावे द्या आधी . अन मग माझ्याबद्दलची भडास काढा .
13 Nov 2015 - 3:10 pm | संदीप डांगे
वरिल विधान तुमचे आहे. त्याच्या समर्थनार्थ तुम्हीच पुरावे देणे आवश्यक आहे. अथवा हे तुमचे वैयक्तिक मत आहे हे मान्य करा.
स्वतः मनमानी दावे करायचे, त्याबद्दल कुणी पुरावे मागितले कि उलटं प्रश्नकर्त्यालाच पुरावे मागायचे व त्याचा अपमान करायचा ही तुमची जुनी पद्धत आहे.
13 Nov 2015 - 2:57 pm | बॅटमॅन
एक नंबर मस्त लेख ओ झेलेअण्णा. लेखाबद्दल अनेक धन्यवाद! संभाजीराजांबद्दल कधी नीट डीटेलवारी वाचनात आले नाही. बाकी चित्राबद्दल मालोजीलाही अनेक धन्यवाद!!!
आता संभाजीविषयक वाङ्मय वाचण्याची उत्सुकता या लेखामुळे अजून वाढलीय.
13 Nov 2015 - 11:53 pm | मित्रहो
संभाजी महाराजांच्या कारकिर्दिचा मस्त आढावा घेतला. कादंबरीतले वाचन्यापेक्षा एतिहासिक पुराव्याने लिहिलेले संभाजी महाराजांचे चरित्र वाचायला आवडेल.
14 Nov 2015 - 7:11 am | श्रीनिवास टिळक
औरंगजेबाने संभाजीराजांची गाढवावर बसवून धिंड काढली तेव्हा गर्दीत एक मुसलमान चित्रकार होता. त्याने राजांचे चित्र काढले. सध्या ते नगरच्या संग्रहालयात आहे असं कुठेतरी वाचलेलं आहे.
14 Nov 2015 - 10:37 am | अजया
अप्रतिम लेख झालाय हा.मालोजीरावांमुळे चित्रही बघायला मिळाली.
14 Nov 2015 - 12:38 pm | यशोधरा
अतिशय सुरेख लेख! इतर माहितीपूर्ण प्रतिसादांसाठीही अनेक धन्यवाद!!
14 Nov 2015 - 12:58 pm | नाखु
ओथंबलेला अभ्यासू लेख .
दंडवत दोघांनाही ! शिवाजीशी तुलना अपरिहार्य आहे तरी शंभूचे मोठेपण आणि पराक्रम थोडाही उणा ठरत नाही.
नाखु
14 Nov 2015 - 1:06 pm | रातराणी
_/\_
अन्या दातारचा सिंहासनवरचा लेख वाचून दुपारी पुन्हा पाहिला आणि आता हा लेख वाचल्यावर एकच प्रश्न पडलाय कुणासाठी केलं या राजांनी मावळ्यांनी हे सगळं? ज्या वयात आम्हाला आयत मिळणार शिक्षण घ्यायचा कंटाळा येतो तेव्हा हे लोकं वैयक्तिक आयुष्य राख करून या समाजासाठी लढले. कशाला? :(
14 Nov 2015 - 4:56 pm | दुर्गविहारी
मोगासाहेब उर्फ दादा, प्रत्येकवेळी ईतीहास विषयक धाग्यावर येऊन मोन्गलान्चा अभिमान दाखवणार्या प्रति़क्रिया देत असता, ऊदा
comment-768819
मोन्गलाचे महान पण पट्विणारा लेख लिहून आपण आमच्या माहितीत भर घालावी अन्यथा गप्प बसावे हे उत्तम
14 Nov 2015 - 7:21 pm | मोगा
मोगलानी १३ व्या शतकात बांधलेल्या व अजून ठणठणीत असलेल्या लाल किल्ल्यावर आजही स्वतंत्र भारताचा झेंडा फडकवला जातो.
तुम्ही दुर्गविहारी म्हणजे दुर्ग बघत फिरता की काय ? १६ व्या शतकात बांधलेल्या दुर्गांची तब्येत कशी आहे ?
14 Nov 2015 - 7:28 pm | कैलासवासी सोन्याबापु
ओ बादशाह सलामत,
मुग़ल लोकांनी बांधला होता की परमार राजांनी बांधलाय अन मुग़ल आयतोबांनी बळकावला? कारण लाल किल्ल्यात कारंज्यांची किंवा स्नानगृहातल्या तोट्यांची मुखे वराह मुखी आहेत म्हणे? म्हणजे नेमके काय ते समजा कारण वराह म्हणजे मुग़ल बादशाहतीस निषिद्ध होते म्हणे? का सत्ता डोक्यात जावुन निषिद्ध कामे करीत मुग़ल.
14 Nov 2015 - 7:57 pm | मोगा
...
4 Dec 2015 - 12:29 pm | llपुण्याचे पेशवेll
लाल किल्ला कुठल्या मटेरियल ने बांधला आहे माहीत आहे का हो? वर दिसणारा लाल दगड फक्त सजावटीकरता लावलेला आहे. आतमधे विटांनी बांधकाम केलेला किल्ला आहे. मोगलांनी वर लाल टाईल बसवायचे काम मात्र छान केले म्हणायचे.
14 Nov 2015 - 8:13 pm | मालोजीराव
हा हा... १३ व्या शतकात मोगल ????
14 Nov 2015 - 8:23 pm | विशाल कुलकर्णी
डोक्यावर पडलायत काय मोगा ? ;)
14 Nov 2015 - 10:36 pm | मोगा
सुमारे १६५० ते १८५७ .... मोघल.
मग इंग्रज.
मग आम्ही जनता याचे मालक आहोत.
14 Nov 2015 - 10:55 pm | विशाल कुलकर्णी
हां, आता ठीक आहे, बाक़ी तुमचं चालु द्या...
15 Nov 2015 - 12:27 am | काळा पहाड
"तुमचं" म्हणू नका हो त्याला. जिहादी विचाराचंय ते.
14 Nov 2015 - 8:42 pm | भंकस बाबा
मोगाजि , इतिहासात जर डोकाउन पाहिलत तर फ़क्त तीन जमातिनि स्वातंत्र समर धगधगत ठेवले. त्यात मराठी, पंजाबी , व् बंगाली होते. बाकी होते पण तोंडी लावण्यापुरते . मराठ्यांनी बांधलेले किल्ले हे मराठ्यांचा सुवर्णकाळाचे साक्ष होते. इंग्रजांना परत परत बंड नको होती. त्यामुळे त्यांनी या किल्लाकड़े दुर्लक्ष केले. स्वतंत्रतेनंतर नेहरुसारख्या लोकांनी महाराजांना दुय्यम श्रेणीच्या महापुरुषात टाकले. त्यांच्या भारत एक खोज मधे तसा उल्लेख केला आहे नंतर जनक्षोभामुळे हां आक्षेपार्ह भाग नेहरुनी वगळला. पण त्यामुळे मानसिकता थोड़ीच बदलणार. एकूण ६० वर्षे राज्य केलेल्या या महाराष्ट्र द्वेषिना ना महाराष्ट्राच्या देदिप्यमान इतिहासाची काय कदर असणार? वर परत लांगुलचालन करायला अशी दुर्लक्षिता पथ्यावर पडणार होती. शिवाजी महाराजाचा उदो उदो केला तर आपले अल्पसख्यांक भौ नाराज होतील ना, ही एक विचारसरणी त्यामागे होती. आणि जावळीच्या मोरेचे वशंज अजूनही जिवंत आहेत. त्यातील एक मिपावर लेखही दळतात. ही सर्व कारणे आहेत. वर आमचे मराठी म्हणवणाऱ्या नेत्यांनी साखर कारखाने काढून आपल्या पुढच्या पिढीची सोय करुन ठेवली पण किल्ल्याकडे दुर्लक्ष केले.
14 Nov 2015 - 8:45 pm | सुबोध खरे
आणि जावळीच्या मोरेचे वशंज अजूनही जिवंत आहेत
आणी जिथे तिथे घाण करून ठेवत आहेत
क्या बात कही !
बाबा साहेब
14 Nov 2015 - 10:16 pm | मालोजीराव
नेहरूंच्या 'डिस्कवरी ऑफ इंडीया' मधे शिवाजी महाराजांचा उल्लेख 'misguided patriot ' आणि ' Raider' असा होता आणि तो देखील सुरतेवरील स्वारीच्या अनुषंगाने आलेला होता. हा संपुर्ण मजकूर नेहरूंनी वॉरन हेस्टींग्ज च्या 1784 साली प्रकाशित पुस्तकातील असल्याचे लिहीले होते. तरीही त्यांनी माफी मागून हा मजकूर वगळला . दुरूस्तीनंतर Discovery of India च्या पान क्र. 294 आढळणारा मजकूर असा आहे -
" Shivaji was the symbol of a resurgent Hindu Nationalism, drawing inspiration from old cleassics, courageous and possessing high qualities of leadership. He built up the marathas as a strong unified fighting group, gave them nationalist background and made them formidable power which broke up the mughal empire "
उत्तर भारतीय समाजात व इतिहासकारांत देखील मराठा साम्राज्याबद्दल प्रतिकूल मत असणा-या समाजाच्या संस्कारामुळे आणि कारागृहात असताना केवळ ब्रिटीश इतिहासकारांचीच पुस्तके वाचण्यास मिळाली त्यामुळे कांही चुकीची मते उधृत झाली. नेहरू लिहीतात की, आम्ही काय वाचावे हे जेलर ठरवत असत.भारताच्या इतिहासाबद्दल केवळ वॉरेन हेस्टीग्जचे पुस्तक वाचण्यास त्यांना दिलेले होते. जे पुस्तक 1784 साली प्रकाशीत झाले होते. त्यांना सावरकरांचे पुस्तक वाचायचे होते पण भारतीय लेखकांच्या पुस्तकावर बंदी होती. त्यामुळे शिवाजी महाराजाबद्दल चुकीचा संदर्भ दिला गेला म्हणून नेहरूंनी क्षमा मागीतली आणि पुस्तकातील मजकूर वगळला आणि पढे 1958 साली ते म्हणाले "Shivaji did not belong to maharashtra alone, he belong to the whole indian nation. He was patriot inspired by vision and political ideas derived from techniques of anicient philosopher "
15 Nov 2015 - 1:18 am | भंकस बाबा
नेहरुनी नंतर जो बदल केला होता तो जनक्षोभानंतर होता. शिवाजी महाराज ही अशी व्यक्ति नव्हती की जी पुस्तकाच्या चौकट्या बाहेर पडणार नाही. ज्या औरंगजेबाने पूर्ण हिन्दुस्तान इस्लाममय करण्याचा विडा उचलला होता त्याला खीळ महाराजांनी घातली होती . नेहरू अकबरावर स्तुतिसुमने वहातात मग ज्या महाराणा प्रताप ने आयुष्यभर त्याच्याशी लढ़ा दिला तो कोण? आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो १८५७ हे स्वातंत्रसमर होते हे प्रथम सावरकरानी लिहिले. अगदी मला असलेल्या इतिहासाच्या पुस्तकात १८५७ चे बंड हा शब्द स्पष्ट लिहिला आहे. ओरंगजेबाबद्दल discovery of india मधे काय लिहिले आहे ते माहीत नाही पण हल्लीच जेव्हा दिल्लीतील एका रोडचे नाव ओरंगजेब रोड बदलून अबदुल कलाम केले गेले तेव्हा मायावतीना आलेला मायेचा पुळका सर्वानी बघितला. तातपर्य् काय तर मराठी अस्मितेचे कौतुक आम्हाला असेल पण दिल्लीकराना त्याचे काही देणेघेणे नसते .खुशवंतसिंग हे एक दूसरे उदाहरण आहे. आता तो काय अभ्यासक नव्हता?
15 Nov 2015 - 1:49 am | मालोजीराव
अकबरा पेक्षा जास्त स्तुतिसुमने नेहरूंनी महाराणा प्रतापांवर उधळली आहेत (सिलेक्टेड वर्क्स ऑफ नेहरू वाचा)
16 Nov 2015 - 8:51 am | सुनील
आम्ही काही वाचत-बिसत नसतो. ऐकीव माहितीवर पूर्वग्रह बाळगणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे!
14 Nov 2015 - 10:47 pm | मोगा
कारण हे किल्ले जनतेच्या सान्निध्यात नाहीत. मोघल व इंग्रज वास्तू या जनतेच्या सान्निध्यात असल्याने त्या वापरात राहिल्या व आज त्या आमच्या आम जनतेच्या उपयोगितेच्या वास्त्तू आहेत.
किल्ले हे मुळातच जनतेपासून दूर होते/ आहेत. शिवाय त्या काळातही सूर्यास्तानंतर दार बंद वगैरे असल्याने त्यांचा उपयोग प्रामुख्याने राजा व त्याच्या संपत्तीची सुरक्षितता हाच होता , असे ( मला तरी ) वाटते.
त्यामुळे तो उपयोग मागे पडल्यानंतर ते आपोआप विस्मरणात गेले.
सरकारला दोष का द्यायचा ?
14 Nov 2015 - 11:14 pm | धनावडे
मोगा साहेब किल्ले हे मुख्यतः लष्कराच्या वापरासाठी असायचे अस वाटतय आणि लष्करी छावणीत इतक्या सहजासहजी सामान्य लोकाना मिळत नाही
तुमचे दयाळू मुगल देत असतील बॅा
15 Nov 2015 - 1:26 am | भंकस बाबा
मोगाजी तुम्ही एकतर इकडे या अथवा तिकडे जा . दोन नावात पाय ठेवले तर प्रवास सुखकर होणार नाही. महाराजांनी किल्ले जाणूनबुजून आडजागी बांधले की तिथे येताना शत्रुची दमछाक होईल. आपले राष्ट्रिय स्मारक म्हणून हे किल्ले जपायला काय हरकत आहे?
15 Nov 2015 - 9:50 am | मोगा
हे किल्ले आडवळणी व दुर्गम आहेत. शिवरायांच्या काळात ते जस्टिफाइड असेलही.
पण मोघल व इंग्रजी वास्तू या जनतेच्या सन्निध्यात असल्याने त्यांची न्यायालये , शाळा , सरकारी कार्यालये , सार्वजनिक ऐतिहासिक वास्तू वगैरे होऊन आजही ती उपयोगात आहेत. म्हणून त्यांची अवस्था गडकिल्ल्यांपेक्षा आजही चांगली आहे.
किल्ले केवळ ऐतिहासिक वास्तू म्हणुनच जपायचे असतील तर सरकार व समाज यानी एकत्र यावे लागेल.
4 Dec 2015 - 12:30 pm | llपुण्याचे पेशवेll
किल्ल्यांकडे दुर्लक्ष केले इतकेच नव्हे तर तोफा लावून फोडले किल्ले. कारण त्याचा वापर परत इंग्रजांविरुद्ध होऊ नये म्हणून. त्यांनी शत्रूचा सांस्कृतिक वारसा वगैरे 'सहिष्णु' विचार नाहि केला.
4 Dec 2015 - 1:18 pm | संदीप डांगे
सहमत. त्यासोबत इंग्रजी शिक्षणपद्धतीच्या तोफांनी भारतीयांच्या देशप्रेमाचे, इतिहासप्रेमाचे, अस्मितेचे किल्लेही फोडले. म्हणून आपण आज विचित्र अशा आयडेन्टीटी क्रायसिसमधे आहोत.
14 Nov 2015 - 7:44 pm | तुमचा अभिषेक
मस्त लेख..
प्रतिसादही तितकेच महितीपुर्ण ..
शंभूराजेंना नेहमीच __/\__
15 Nov 2015 - 2:44 am | शब्दबम्बाळ
अभ्यासपूर्ण लेख आणि प्रतिसादही!
जरा अवांतर लिहितो...
सध्या आपल्याकडे शालेय अभ्यासक्रमात इतिहासाला कितपत महत्व देतात माहिती नाही पण मी शाळेत असताना तरी इतिहासाचा उरका पाडला जायचा असे वाटायचे.
इतिहासाच्या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी फारशी माहिती नव्हती. शिवाजी महाराजांनंतर, राजाराम महाराजांना जिंजी ला नेल्याची आणि नंतर शाहू महाराज नर्मदेवरुन परत येण्याची माहिती एक दोन परिच्छेदात होती. त्याच प्रकारे मुघल सत्तेचा उदय आणि अस्तही एक दोन प्रकरणातच झाला होता! सुदैवाने वडिलांनी इतिहासात M A केलेलं असल्याने पुस्तकाबाहेरही इतिहास असतो हे कळू लागल.
पण पाचवी ते दहावी या ३ वर्षात भारतीय स्वातंत्र्य संग्राम ३ वेळा का यावा? भारताला इतिहासाची एवढी मोठी परंपरा असताना या लोकांना ५ वर्षाची अभ्यासक्रम पुस्तके योग्य प्रकारे बनवता येत नाहीत का?
सहावीमध्ये हडप्पा संकृती, समुद्रगुप्त, चोल-चालुक्य राजे यांसारखी नावे ऐकून खूप छान वाटायचं. या लोकांनी त्या वेळी आरमार उभारून जावा सुमात्रा या ठिकाणी देखील कशा चढाया केल्या असतील याच्या चर्चा रंगायच्या पण या गोष्टींची माहिती शालेय पुस्तकात कधीच उपलब्ध व्हायची नाही आणि तोपर्यंत पुढच्या वर्षी भारतातला मध्ययुगीन कालखंड सुरु व्हायचा आणि त्यानंतर लगेच पुन्हा स्वातंत्र्य संग्राम!
स्वातंत्र्य संग्राम महत्वाचा आहे हे मान्य आहे पण मुलांना निदान भारतीय इतिहासाची योग्य ओळख करून देणे हि अभ्यासक्रम मंडळाची जबाबदारी असायला हवी ना?
आता तर बर्याच ठिकाणी सेन्ट्रल बोर्ड असतो तिथे प्रादेशिक इतिहासाला कितपत महत्व असते माहित नाही. पण भारताचा भौगोलिक विस्तार पाहता सगळ्याच मुलांना खोलात जाऊन प्रादेशिक इतिहास शिकवणे शक्य होणे अवघड आहे. मग प्रादेशिक इतिहासामध्ये मुलांना गोडी निर्माण कशी होऊ शकेल?
जास्तच अवांतर झाले पण असो! :)
15 Nov 2015 - 10:13 am | भंकस बाबा
मोगाजि तुम्हीच लिहिले आहे की नेहरुनी इंग्रजांनी दिलेली पुस्तके वाचून discovery of india लिहिले. नेहरुसारखा विद्वान् माणूस इंग्रजांच्या चालीला भुलला असे वाटत नाही. नेहरूंची व् गांधीजींची नीति नेहमीच अल्पसंख्यांक तुष्टिकरणाची राहिली होती. आताही कॉंग्रेस काही वेगळ करत नाही आहे. गडकोटाकड़े दुर्लक्ष करणे हे देखील त्याच नितीचा भाग आहे. नाहीतर भगतसिंगासाठी एक माप व् सुरावर्दी साठी एक माप ऐसा व्यवहार गाँधीजीनि कधीच केला नसता. सयुंक्त महाराष्ट्र चळवळीत देखील नेहरू व् कोंग्रेस ने घाऊक महाराष्ट्र द्वेष दाखवून दिला होता. सावरकरांचे पुस्तक मागण्याचा हेतु हा त्या पुस्तकावर ताशेरे ओढण्याचा असावा. हीच लोक सावरकरना इंग्रजाचे एजेंट म्हणून हीणवत होती . जर सावरकर इंग्रजाचे एजेंट होते तर इंग्रजांनी पहिल्या प्रथम ही पुस्तक नेहरुना उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती. पण वस्तुस्थिति अशी होती की १८५७चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक इंग्रजांनी बंदी घातलेले पुस्तक होते. इंग्रजांना भीति होती की हे पुस्तक वाचून भारतीयांच्या भावना भड़कतील.
15 Nov 2015 - 10:23 am | मोगा
मोगाजि तुम्हीच लिहिले आहे की नेहरुनी इंग्रजांनी दिलेली पुस्तके वाचून discovery of india लिहिले.
....
मी असे कुठेही लिहिलेले नाही.
15 Nov 2015 - 10:33 am | भंकस बाबा
मोगा साहेब चुकून यात तुमचे नाव आले . घाईगड़बड़ित हे झाले आहे . ती पोस्ट मालोजीरावाची आहे. पुढे मी योग्य ती खबरदारी घेइन.
15 Nov 2015 - 11:06 am | मोगा
पुरातन राजांच्या ज्या वास्तू सुस्थितीत आहेत , त्या त्यांच्या वारसांनी आज रॉयल हेरिटेज हॉटेलात रुपांतरीत केलेल्या आहेत व त्याच्या जिवावर ते बक्कळ पैसा मिळवत आहेत.
ज्या वास्तूंचा आर्थिक उपयोग काडीमात्र नाही त्या मात्र सरकारच्या ताब्यात आहेत व सरकार आमच्या इतिहासाकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून सरकारच्याच नावाने बोंबही सुरु असते!
दुभत्या गाई राजपुत्राना व भाकड गायी लोकशाहीला , असा साधा हिशोब आहे.
किती गंमत !
या किल्ल्यांना आमच्या खापरपणजोबाने ट्याक्स दिलेला होता.
आता मी अज्जिब्बात्त देणार न्हाई म्हणजे न्हाई !
मले पाकडा , बाटगा म्हणलेत तरी बेहत्तर !
18 Nov 2015 - 9:28 pm | जयंत कुलकर्णी
अच्छा आपण कम्युनिस्ट दिसता. कम्युनिस्ट असण्याला माझी अजिबात हरकत नाही. तुम्हाला अजून एक मुद्दा सांगतो. संस्थाने खालसा केली पण संस्थानिकांच्या जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या नाहीत. लाखो एकर जमिनी आजही त्यांच्या ताब्यात येनकेनप्रकारेण आहेत. त्यांचा भत्ता बंद केला म्हणजे परत तेच. दुभत्या गाई त्यांना सोडल्या व इकडे काही लाख रुपयांचा भत्ता बंद करुन जनतेच्या डोळ्यात धुळ फेकली.... आज त्या जमिनी सरकारच्या ताब्यात असत्या तर जमिनीसाठी मारामारी करायची वेळ आली नसती...
:-)
हे असे नसेल तर माफी असावी.
19 Nov 2015 - 11:30 am | मोगा
इंग्रज व मोघलांपेक्षाही या देशाला या सस्थानिक व राजानीच लुटलेले आहे.
राजे , संस्थानिक त्यांचे सरदार या घराण्याना ही संपत्ती मिळालेली असल्याने ते पुस्तके / नेट / पेपर / इतर माध्यमे यातुन ठराविक राजांचा जयजयकार करून सामान्य माणसांवर या प्रतिमा वर्षानुवर्षे लादत आहेत.
१९४७ ला लोकशाही आल्याने आता आम्हीही राजेच आहोत. मग इनाकारण यांचा जयकार का करायचा ?.
.... शहेनशाह आलमगीर मोगालुद्दीन
19 Nov 2015 - 8:37 pm | टवाळ कार्टा
आज से नाना-मै नंतर मय तुम्चा फ्याण :)
20 Nov 2015 - 12:59 pm | बॅटमॅन
अहो मोगाशेठ, शिवाजीराजांचा जयजयकार केला म्हणून तो आपसूक त्यांच्या वंशजांचा जयजयकार होतो काय?
16 Nov 2015 - 7:16 am | श्रीरंग_जोशी
छत्रपती संभाजीराजांबद्दल एका लेखात सर्व महत्वाच्या गोष्टी / घडामोडी एका लेखात मांडणे हेच मोठे आव्हान आहे. ते या लेखात यशस्वीपणे पेलले गेले आहे. एका अत्यंत अभ्यासपूर्ण लेखासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
एस यांच्या सुलेखनाने शीर्षक एकदम रुबाबदार झाले आहे.
16 Nov 2015 - 9:58 am | नाव आडनाव
भारी. चांगलं लिहिता तुम्ही, पण एक तक्रार आहे - एकदम कमी लिहिता आणि कमी वेळा लिहिता.
सगळा लेख वाचून नाही झाला अजून. नंतर वाचणार आहे. वाचनखूण साठवण्याची सोय नाही. असती तर बरं झालं असतं. तुमचाच, जेव्हढं मला आठवतंय मागच्या दिवाळी अंकातला, लेख पण आवडला होता पण त्याचीही वाचनखूण साठवता येत नव्हती.
16 Nov 2015 - 2:01 pm | सुहास झेले
हा घ्या दुवा गेल्या अंकाच्या लेखाचा :) :)
महाराजांचा दक्षिण दिग्विजय
16 Nov 2015 - 10:58 pm | बोका-ए-आझम
फारच सुंदर लेख. संभाजीमहाराजांची शिवाजीमहाराजांशी तुलना करणं चुकीचंच आहे कारण दोघांसमोरची आव्हानं आणि संकटं वेगळी होती. शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य संभाजीमहाराजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अबाधित ठेवलं ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या हातून चुका झाल्या असतील-नसतील, पण तेही माणूसच होते आणि त्यामुळे स्खलनशील होते. आपल्याकडच्या नाटककारांनी संभाजीमहाराजांचं चित्र एकतर एकदम उदात्त रंगवलंय उदाहरणार्थ गडक-यांचं ' राजसंन्यास ' किंवा मग एकदम काळ्या रंगात उदाहरणार्थ विष्णुपंत औंधकरांचं ' बेबंदशाही '. बहुसंख्यांचं संभाजीमहाराजांविषयीचं मत हे इतिहासाऐवजी अशाच ऐतिहासिक सत्याचा विपर्यास करणाऱ्या कलाकृतींमुळे प्रभावित झालेलं असतं पण ऐतिहासिक सत्य काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न खूप थोडे जण करतात.
17 Nov 2015 - 10:11 am | प्रभाकर पेठकर
संभाजी महाराजांबद्दल माझे वैयक्तिक मत हे बाबासाहेब पुरंदरे, ना स इनामदार ह्यांच्या कादंबर्या वाचून बनलेले आहे.
त्या नुसार शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ह्यांच्या बालपणातील सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थिती एकमेकांपासून भिन्न होती. शिवाजी महाराजांना बालपणी आपल्या आईकडून जे मार्गदर्शन, माया आणि महत्वाकांक्षेचे बीज मिळाले ते संभाजी महाराजांना मिळाले नाही. तान्हा असतानाच आईचे छत्र हरपले आणि वडील राष्ट्र घडविण्याच्या जबाबदारीने घराबाहेर स्वार्यांमध्ये गुंतलेले. गडावर असले तरी सतत राजकारणाची खलबतं आणि त्यांच्या सल्लागारांमध्ये आणि सहकार्यांमध्ये व्यस्त असायचे. संभाजीमहाराजांचे बालपण असे जरा दुर्लक्षित झाले.
संभाजी महाराजांचा पिंडही (कदाचित त्यांच्या आईकडून आला असेल) शिवाजी महाराजांपेक्षा वेगळा होता. ते खुप संवेदनशील आणि हळवे होते. ते मनाने कवी होते. कवी माणूस वास्तवापेक्षा स्वप्नात जास्त रमतो. सोयराबाईंची स्वार्थी राजकारणं आणि संभाजी महाराजांना जाणीवपूर्वक महाराजांपासून तोडणे ह्याने कवीमनाच्या संभाजीराजांना आई गेल्यामुळे आईचे आणि वडील राजकारणात गुंतलेले त्यामुळे वडिलांचे प्रेम लाभले नाही उलट त्यांच्या वाट्याला सावत्र आईचा दुस्वासच आला. त्या कौटुंबिक राजकारणात सोयराबाईंच्या माहेरच्यांनीही भर घालून संभाजी राजांना बदनाम करण्यास हातभार लावला. कुठलाही अंकुंश मनावर उरला नाही आणि घरच्या, मायेच्या माणसांच्या प्रेमापासून वंचित संभाजी राजे स्वैर झाले. त्यातुन, अनाजी पंतांच्या सुनेचे प्रकरण त्यांचे हातून घडले आणि त्यांनी विरोधकांच्या हाती कोलीतच दिले. पिता-पुत्रात दुरावा वाढला आणि सोबत्यांच्या सल्ल्याने त्यांनी आपला वेगळा सुभाच मांडला.
महाराजांच्या समवेत राहून, त्यांचे राजकारण पाहून आपले कोण आणि वैरी कोण ह्याची पूर्ण जाणिव असूनही ते मोघलांना का जाऊन मिळाले ह्याचे आकलन होत नाही पण त्या घटनेने आगीत तेलच ओतले गेले आणि शिवाजी महाराजांचे सर्व सरदार, सल्लागार आणि संभाजी महाराजांचे हितचिंतक त्यांच्या विरोधात जाऊन सोयराबाईंच्या पक्षास मिळाले. राजकारण सुडावर चालत नाही हे लक्षात न घेऊन गादीवर येताच सर्व जुन्या आणि म्हातार्या राजकारणी सहकार्यांना त्यांनी दूर हटविले. भावनिक दृष्ट्या कोंडीत सापडलेल्या संभाजी महाराजांच्या हातूनही अशा बर्याच चुका घडल्याचे जाणवते.
17 Nov 2015 - 11:50 am | तुडतुडी
@संदीप डांगे - ते वाक्य माझं नसून अभ्यासांती निघालेलं आहे . तो इमेल वरचा लेख नसून इतिहास विषयक अभ्यासाला वाहून घेतलेल्या एका मासिकात वाचला होता . आता मला वाचनालयात जावून ते पुस्तक शोधाव लागेल . पण मी शोधून काढीनच . दम धरा जरा.
संभाजी बाईलवेडा, व्यभिचारी होता . महाराजांच्या काळातच तो मुघलांना जावून मिळाला होता . दारूच्या व्यसनात बुडाला होता . कवी कलशाच्या नादाला लागून तंत्र , मंत्राच्या नादाला लागला होता हे सगळं मी म्हणत नाहीये . इतिहासाचे पुरावे आहेत . आता तुम्ही जर म्हणत असाल तो शिवाजी महाराजांसारखा स्वछ , रयतेचा विचार करणारा वगेरे होता तर त्याचे पुरावे तुम्हीच द्यायला हवेत ना . ९ वर्ष राज्य राखलं म्हणून कोण कौतुक . महाराजांनी आयुष्यभर जीवाचा आटापिटा करून निर्माण केलेलं केवळ ९ वर्षांत गमावलं.त्याच्यापेक्षा पराक्रमी तर ती स्त्री ताराबाई होती . संभाजी , राजाराम गेल्यानंतर सगळं संपलं होतं तेव्हा तिने ते परत मिळवलं. १० वर्षात पुन्हा सगळं स्थिरस्थावर केलं. 'सिवाजी कि बहु सिवाजीसे बहुत' हे उद्गार खुद्द औरंग्यान काढलेले आहेत .
मराठी गुप्तहेर खातं एवढं लेचंपेचं होतं का कि मुबर्रक खान एवढ्या जवळ आल्यावरही त्याची खबर कुणाला लागू नये . आणि पकडल्यावर सुधा इतर मराठ्यांना त्याची खबर लागू नये . वर कोणीतरी म्हणलंय खानाने संभाजीला , त्वरित नेलं म्हणून . उडत्या घोड्यावरून नेलं कि विमानातून नेलं ?