कधीतरी जाऊया आपल्या गावी,
आठवणींनी भिजलेल्या वाटा धुंडाळत
लपंडाव, विटी दांडू, सागरगोटीचे खेळ खेळत,
आंबा फणसाच्या, चिंच आवळ्याच्या झाडात
आपलं बालपण शोधत, कधीतरी जाऊया आपल्या गावी…………
हिरवळीत जीर्ण झाडात लपलेली आपली शाळा शोधत,
खेळाचे मैदान, शाळेची घंटा, फळ्यावरचे सुविचार वाचत,
आपला वर्ग, आपली जागा, रंग उडालेला फळा
अंधुक झालेल्या आठवणीत
आपले सवंगडी शोधत, कधीतरी जाऊया आपल्या गावी…………