औंध कास भटकंती-भाग २

अजया's picture
अजया in भटकंती
4 Oct 2015 - 9:02 pm

भाग १

सोमवारी सकाळी उठून रूमबाहेर पाहिलं तर थेट समोर खोल दरी.आणि खालचं सातारा शहर सुर्योदयाबरोबर जागं होत होतं.
.
निवांत मधला छानसा नाश्ता आटोपून आम्ही कासला जायला सज्ज झालो.हॉटेलवाल्यांनी आवर्जून कुमुदिनी तलाव बघाच असं सुचवलं होतं.तो म्हणे फुलांनी भरून गेलाय.त्यामुळे अगदी उत्सूक होऊन कॅमेरे परजून निघालो.अगदी अर्ध्या तासाच्या आतच पठारापाशी पोचलो.तिथे आमच्याकडून कॅमेरा, पार्किंग आणि कर मिळून १३० रु घेतले.राजमार्गावरून सरळ जा,गाडी जाते असे हॉटेलमधून कळले होते.तिथे गेल्यावर मात्र तिथल्या रखवालदाराने फक्त पवनचक्कीवाल्यांच्याच गाड्या जातात आणि दूरवर दिसणार्‍या पवनचक्कीजवळच कुमुदिनी तलाव आहे अशी गूड न्यूज दिली!एक मात्र बरं होतं.फारसं कोणीही आलेलं नव्हतं आणि हवेत गारवा होता.मग निघालो ११ नंबरची बस पकडून रमतगमत! सुरुवातीला ते अंतर बघून चालण्याची धडकी भरली तरी लवकरच त्याचे अनेक फायदे आजूबाजूला दिसायला लागले.झाडांवर चिवचिवणारे अनोखे पक्षी,अगदी जवळून उडणारी सुंदर फुलपाख्रं बघत बघत अंतर आपोआप विसरायलं झालं.एका झुडपापाशी दोन काळी मोठी पतंग फुलपाखरं इतका दंगा करत होती की बस! त्यांना कॅमेरात पकडायचा एकही प्रयत्न त्यांनी यशस्वी होऊ दिला नाही!तेवढ्यात बाजूच्या जाळीवर बाहेर आलेल्या फुलांवर हे महाशय अक्षरशः तहानलेले असल्यासारखे तुटून पडले!
.
बाजूबाजूने छोटी पिवळी फुलं आम्हालाही बघा ना म्हणत असल्यासारखी जाळीतून बाहेर डोकावत होती!
.
जाळीमागे गुलाबी फुलांचे गालिचे सर्वदूर पसरले होते.पण ते येताना पहायचे ठरवून आम्ही चाली चाली करत निघालो.आमच्या मागून काही गाड्यांना मात्र प्रवेश मिळाला होता.बहुधा दक्षिणा देऊन.पण आम्हाला दिसणार्‍या मनोहारी दृश्याने चालण्याचे काहीच न वाटता ,हे लोक मधली मजा मुकणार असं वाटायला लागलं एव्हाना.तेवढ्यात समोरून परतणार्‍या काही लोकांनी आता जवळच आला तलाव ,अगदी बघण्यासरखा आहे सांगून आमचा हुरूप वाढवला!
लवकरच लां... ब वाटणारी पवनचक्की जवळ आल्यासारखी वाटायला लागली.आजूबाजूच्या कभिन्न कातळाच्या बाजूला ओलाव्याने उगवलेली फुलं परत दिसू लागली आणि समोर ते तळं आलं.कुमुदिनीच्या फुलांनी पूर्ण भरलेलं.हिरव्या गोल पानांच्यामध्ये छोटुसं पांढरं पण देखणं फूल.दुपारनंतर ही फुलं मिटून जातात.पाण्याच्या आत पण अनेक पाणवनस्पती फुलल्या आहेत.दूरवर फुलांनी भरलेलं ते तळं पाहून चाल अगदी सार्थक झाली.
.
.
.
.
.
आमच्या सुदैवाने तिथे एक जाणकार छायचित्रकार जोडपं आम्हाला भेटलं.ते मॅक्रो फोटोग्राफी करायला आले होते.त्यांना नक्की कोणती फुलं कुठे आहेत हे सांगणारा फॉरेस्ट गार्ड भेटला होता.त्या काकांना आम्हीही देतो तुम्हाला पैसे पण सर्व दुर्मिळ फुलं मात्र दाखवा असं पटवलं.आणि तळं सोडून काय बघायचं इथे वाटणार्‍या आम्हाला त्या गार्डनी अक्षरशः पाच पावलात दगडांमध्ये दडलेली सुंदर फुलं दाखवायला सुरुवात केली.
तळ्यासमोरच्या दगडाच्या कडेलाच कासचे प्रसिद्ध फूल कंदील पुष्प उगवले होते.आदल्या दिवशी बरीच होती म्हणे.पण रविवारच्या धुडगुसात कोणीतरी तोडली :(त्यामुळे हा वेल या गार्ड लोकांनी दुसर्‍या झुडपात ताणून लपवला होता.
.
.
(कंदील पुष्प)
.
.
(रानहळद)
.
.
(जरतारी. या फुलांचा स्पर्श जरीच्या साडीसारखा म्हणून जरतारी!)
.
.
(मंजिर्‍या,मंजुळा)
.
.
.
(ही निळी कारवी.दर सात वर्षांनी फुलते.)
.
एव्हाना ऊन चढायला लागलं होतं आणि गाड्या आणि माणसांची वर्दळ वाढायला लागली आणि गार्डच्या म्हणण्याचा प्रत्यय आलाच.एक बाई त्या फुलांना तोडून गुच्छ बनवायला लागल्या.गार्ड ओरडला तसं मायंदाळ हैत ना,का वरडतो करून त्याच्यावरच डाफरल्या.तर एक कुटुंबच पुढे मूळासकट गुलाबी फुलांचं झाड जीव खाऊन ओढत होतं.मी आणि मैत्रीण नका तोडू ही फूलं ,हेच बघायला येतो ना आपण म्हणून सांगायला गेलो तर ते बागेत झाड लावणार आहेत या फुलाचं असं कळलं. त्यांना हे गवतफूल आहे,असे उपटून दुसरीकडे लागणार नाही वगैरे सांगायचा निष्फळ प्रयत्न करून आम्ही निघालोच तिथून.
इथून पुढे थोडावेळ मात्र अगदी कभिन्न कातळ लागतो.निसर्गाची सगळे किमया या कातळावर साठ्णार्‍या थोड्याशा मातीच्या थरावर होते आणि अशी सुंदर फुलं मग पावसाळ्यात बीज रुजून आलेल्या झाडांना येतात.पुढे मात्र आता गुलाबी पिवळ्या पांढर्‍या फुलांचे गालिचे सुरू झाले.आजूबाजूला फुलच फुलं आणि मध्ये मी एकटी! माझा एक आवडता चित्रकार आहे,देवदत्त पाडेकर. त्याचे असे एक फुलात हरवलेल्या मुलीचे अप्रतिम चित्र आहे.त्या चित्रात गेल्यासारखं वाटायला लागलं एकदम!
इंदिरा संतांची
" रंगरंगुल्या,सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,
सांग तुझा रे तुझा लळा"
म्हणून एक सुरेख कविता आहे.ती कविताच या पठारावर भरून राहिली आहे!
.
.
.
.
.
.
(या फुलाचे स्थानिक नाव -कावळा!)
एव्हाना ऊन मी म्हणायला लागलेलं.आणि गर्दीही.आता वाट धरली बामणोलीची.हे कोयना जलाशयाची मागची बाजू.कासवरूनच हा रस्ता पुढे पार महाबळेश्वरपर्यंत जातो.अर्ध्या तासात खालचे जलाशयचे सुंदर दृश्य दिसायला सुरुवात झाली.वळणावळणाच्या रस्त्याने खाली येत येत थेट जलाशयासमोरच आलो.
.
,
इथे एक बोट क्लब आहे.बोट घेऊन तीन चार ठिकाणी जाण्याचे पर्याय मिळतात.इथल्या तीन नद्यांचा संगम असणारे जवळचे ठिकाण, तापोळा तलाव,वासोटा किल्ला आणि वाघळीच्या मठाचा असे.त्यातला मठ आणि संगमाची सफर असा दीड तासाचा कार्यक्रम आम्ही घेतला.पाणी अगदी स्वच्छ नीळे नीळे आहे.थोड्याच वेळात कोयना,सोळशी,कांडती नद्यांचा संगम लागला.तीन नद्या तीन दिशांनी येऊन भेट घेत होत्या.नद्यांचा अनाहिता कट्टा इथे होतो तर!
.
आता समोरचे मंदिर दृष्टिपथात येऊ लागले.एका बेटासारख्या जागी स्वामी नारायणबाबा म्हणून दत्त भक्तानी हा मठ बांधलाय.इथे एक दत्ताचे ,गणपतीचे देऊळ आहे.गणपतीच्या देवळाखाली एक कृत्रिम गुहा करून त्यात शंकराचे देवालय उभारले आहे.अगदी शांत सुंदर जागा.गावाचे नाव मात्र शेंबडी वाघळी! तुला मिपावर डु आयडी घ्यायला आदर्श नाव असे एक कुजके उद्गार कानाआड करावे लागलेच!!
.
.
परतताना इथून जाऊच नये असे वाटायला लागलेले असतानाच बोटवाल्याने हाक मारली.येताना बोटीत सर्वच शांत बसलेले.बामणोलीला परतून छानपैकी पिठलं भाकरीचं जेवण जेवलो.
आणि मग ते सुंदर दृष्य ,ती शांतता,निवांतपणाची पोतडी काखोटीला मारली आणि परतीच्या प्रवासाला निघलो..
.
(समाप्त)

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

4 Oct 2015 - 9:15 pm | प्रचेतस

अतिशय सुंदर.
फुलांचे गालिचे पाहून डोळे निवले.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Oct 2015 - 2:12 pm | अत्रुप्त आत्मा

+++111 टू आगोबा.

अप्रतिम , किती सुंदर आहे हे ठिकाण फोटोहि भरपूर १ च नंम्बर

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 9:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कसले अप्रतिम फोटो आलेत. जब्बरदस्तं.

शेंबडी वाघळी

=))

मांत्रिक's picture

4 Oct 2015 - 11:12 pm | मांत्रिक

ओ राजे! सातारा कट्ट्याचं आमंत्रण दिलंय तुम्हाला!!!
तुम्हीच येत नाय!!! आता बघा, आमचा सातारा केवढा सुंदर आहे ते!!! बाकी बोला मग!!!

स्वाती दिनेश's picture

4 Oct 2015 - 9:24 pm | स्वाती दिनेश

सहीच दिसतेय ग.. मस्त फोटो..डोळ्यांना मेजवानीच एकदम..
स्वाती

नूतन सावंत's picture

4 Oct 2015 - 9:27 pm | नूतन सावंत

मी पयली.सुरेख वर्णन,सुरेख फोटो.मेजवानीसाठी धन्यवाद.

चांदणे संदीप's picture

4 Oct 2015 - 9:39 pm | चांदणे संदीप

मला इथे तुम्ही पाचव्या दिसताय! ;)

बाकी, फोटो मस्त!

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 9:40 pm | टवाळ कार्टा

भारी आहे...जायला पैजे कधीतरी

रेवती's picture

4 Oct 2015 - 10:00 pm | रेवती

वाह! छान वर्णन व फोटू. कंदिलाचे फूल पहिल्यांदाच पाहिले. पाणवनस्पती, गणपतीची मूर्ती हे फोटू खूप आवडले.

बोका-ए-आझम's picture

4 Oct 2015 - 10:04 pm | बोका-ए-आझम

मस्त. अप्रतिम! व्हॅली आॅफ फ्लाॅवर्स काहीच नाही इतकं हे अप्रतिम सृष्टीसौंदर्य आहे! आम्हाला त्यात अंशतः सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद!

व्हॅली आॅफ फ्लाॅवर्स काहीच नाही इतकं हे अप्रतिम सृष्टीसौंदर्य आहे!

ही मत्र जरा अतिशयोक्ती झाली. :)

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 10:24 pm | टवाळ कार्टा

agree

यशोधरा's picture

4 Oct 2015 - 10:12 pm | यशोधरा

सुरेख फोटो आणि वर्णन.

रातराणी's picture

4 Oct 2015 - 10:34 pm | रातराणी

मस्त मस्त!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Oct 2015 - 11:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम आहे जागा आणि ती फोटोंत मस्त उतरलिय !

दमामि's picture

5 Oct 2015 - 7:29 am | दमामि

वा!

मित्रहो's picture

5 Oct 2015 - 10:18 am | मित्रहो

छान वर्णन आणि फोटो.
कंदील पुष्प, जरतारी याआधी कधीच बघितले नव्हते.

सस्नेह's picture

5 Oct 2015 - 10:39 am | सस्नेह

पुन्हा कासची आठवण आली !
अ
a
a
a
a

स्नेहातै, २ फोटो दिसले मस्त आलेत.

नाखु's picture

5 Oct 2015 - 10:41 am | नाखु

प्रचित्र आणि तितकेच प्रवाही वर्णन . प्रगो कधी मनावर घेतोय कुणास ठावे !!!!!

उसासी , वाट पाहणारा नाखु

प्रसाद गोडबोले's picture

5 Oct 2015 - 3:22 pm | प्रसाद गोडबोले

अप्रतिम फोटोग्राफ्स अजयाताई !
कासच्या पठाराव्र बहुतेक ५२ वेगवेगळ्या फुलांचे प्रकार आहेत , त्यातील ४ तर केवळ कास येथेच सापडतात म्हणे ! पठारावर घटपर्णी ही मांसाहारी वनस्पतीही आहे पण मला मात्र कधी दिसली नाही :(

मी वासोट्याच्या ट्रेक वरुन उतरत असताना शेंबडी गावात पोहचल्याचे आठवते . अशी अनेक छोटी छोटी मस्त गावे आहेत तिथे . घाटाई मंदीरही अप्रतिम लोकेशन आहे ! त्याच्या खालच्या बाजुला असलेले लावंघर गाव हे आमचे ॠटायरमेन्ट चे ड्रीम डेस्टीनेशन आहे :)

पेट्री चा इथल्या कासबंगल्यात्च्या जवळ स्माईल नावाचे अप्रतिम हॉटेल होते ! काय मस्त मटन भाकरी बनवायचा , नुकतेच ते हॉटेल बंद झाल्याचे कळाले पण कासच्या रोडवर सिध्दटेक नावाचे हॉटेल आहे , तोही तितक्याच तोडीची अप्रतिम मटन भाकरी बनवतो बहुतेक ( म्हणजे मी स्वतः जेवलोय तिथे पण तेव्हा आमचे विमान हवेत असल्याने मटन अप्रतिम होते कि विमान ही सांगणे अवघड आहे =)) )

प्रगो कधी मनावर घेतोय कुणास ठावे !!!!!

नाखुनकाका , अहो आमचे जवळपास जानेवारी पर्यंचे क्यॅलेंडर लय बिझी ( bizee ) झाले असल्याने सध्या कधी वेळ मिळेल सांगणे अवघड आहे ! पण करु नक्कीच बेत करु एकदा जोरदार !!

प्रगो ,कासला ६२४ स्पेसीजची रेड डेटा बूकमध्ये नोंदणी झालेली आहे.त्यातली ३४ तर फक्त कासलाच सापडतात.त्यातले एक फूल तर सातारा नावाने प्रसिद्ध आहे.त्या स्पिसिजचं नावच sataraiaceaअसे काहीसे आहे.तलावासमोरच याची छोटी झुडपं आहेत.रविवारी लोकांनी पायदळी तुडवली.आम्ही फक्त पानं बघू शकलो.
ड्राॅसेरा ही ती किटकभक्षी वनस्पती आहे.पाणथळ जागेजवळ उगवतात.गार्ड लोक दाखवतात.पण गर्दी असल्यास तोडली जाऊ नये म्हणून काहीही दाखवत नाहीत.कासला मधल्या दिवशी स्थानिक गाइड घेऊन जाणे उत्तम.सर्व वनस्पती बघायला मिळतात.
सिद्धटेक हाॅटेल दिसलेलं खरं! आम्ही संताजीकडे जेवलो!

प्रसाद गोडबोले's picture

6 Oct 2015 - 1:44 pm | प्रसाद गोडबोले

कासला ६२४ स्पेसीजची रेड डेटा बूकमध्ये नोंदणी झालेली आहे.त्यातली ३४ तर फक्त कासलाच सापडतात.

ओह्ह माय ग्वाड !!

आम्हाला आमची माहीती अद्ययावत करायला हवी आता !!

स्नेहा, यातले काही जालावरचे फोटो आहेत का?

पहिले तीन माझ्या मोबाईलने काढलेले आहेत आणि नंतरचे दोन मैत्रिणीच्या.

पद्मावति's picture

5 Oct 2015 - 11:15 am | पद्मावति

सुंदर भटकंती. फोटो तर काय सुंदर आहेत. मस्तं.

सौंदाळा's picture

5 Oct 2015 - 11:28 am | सौंदाळा

दोन्ही भाग वाचले. अप्रतिम फोटो आहेत.
मस्तच झालीय सहल.

पदम's picture

5 Oct 2015 - 11:36 am | पदम

फोटो नि वर्णन दोन्हिहि.

मस्त अप्रतिम फोटो!आता जायलाच हव.

कविता१९७८'s picture

5 Oct 2015 - 1:52 pm | कविता१९७८

वाह मस्तच,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2015 - 2:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान वर्णन आणि सुंदर छायाचित्र.

-दिलीप बिरुटे

मधुरा देशपांडे's picture

5 Oct 2015 - 2:21 pm | मधुरा देशपांडे

किती सुंदर फोटो आहेत. अप्रतिम.

सानिकास्वप्निल's picture

5 Oct 2015 - 2:25 pm | सानिकास्वप्निल

सुंदर फोटो आणि अप्रतिम जागेचे तितकेच अप्रतिम वर्णन.

किती सुंदर ते... काय अप्रतिम आहेत फुले. मस्तच. छान लिहले आहेस ताई.

वेल्लाभट's picture

5 Oct 2015 - 2:55 pm | वेल्लाभट

क्लासिकच.... कासला २ वेळा गेलो आहे. सोबत दर्दी लोकं नसतील तर मनाला त्रास होतो. परंतु जागा हेवनतुल्य आहे.
पुन्हा जाण्यास उत्सुक.

तुमचं वर्णन मस्त....

प्यारे१'s picture

5 Oct 2015 - 3:05 pm | प्यारे१

>>>> हेवनतुल्य

च्यायला!

स्मिता श्रीपाद's picture

5 Oct 2015 - 3:50 pm | स्मिता श्रीपाद

खुप सुरेख वर्णन आहे...
तुझ्यासोबत मस्त फिरुन आले ताई....

नीलमोहर's picture

5 Oct 2015 - 5:01 pm | नीलमोहर

कास, बामणोली, ठोसेघर धब्धबा, सज्जनगड ही सर्व ठिकाणं पाहिली आहेत.
सगळ्यात जास्त समाधान सज्जनगडावर गेल्यावर मिळालं होतं, खूप शांत आणि प्रसन्न परिसर आहे तिथला..

पलाश's picture

5 Oct 2015 - 5:32 pm | पलाश

सुंदर सहल, वर्णन आणि छायाचित्रे !!!

सुधांशुनूलकर's picture

5 Oct 2015 - 9:08 pm | सुधांशुनूलकर

कंदीलपुष्प - एक नव्हे, दोन जाती - दिसल्याबद्दल अभिनंदन. वृत्तान्त आणि फटू मस्तच. २०१०मध्ये कासला गेलो होतो, तेव्हाची आठवण झाली.

कंदीलपुष्पाबद्दल गमतीदार माहिती - देठाला लागलेला फुग्यासारखा भाग, त्याच्यावर एक नळी, मग उलट्या छत्रीच्या काड्यांसारखा वर दिसणारा आकर्षक भाग यांनी मिळून झालेल्या याच्या पाकळ्या म्हणजे कीटक 'ओलिस' ठेवण्यासाठी एक तात्पुरता सापळा असतो. काही ठरावीक जातीचे कीटक या पाकळ्यांकडे आकर्षित होतात. ते वरच्या भागातून नळीत आले की नळीतल्या चिकट आणि राठ केसांमुळे ते बाहेर येऊ शकत नाहीत आणि ते फुग्यात जातात. फुग्यामध्ये कीटकाद्वारे परागकणांची देवाणघेवाण होते. मग हे ओलिसनाट्य संपतं, देठाच्या पाकळ्या मऊ पडून फूल खाली झुकतं, नळीतले केस लुळे पडतात आणि कीटक बाहेर पडतो.

दुसर्‍या फोटोतलं फूलपाखरू - Colour Sergent Athyma nefte मादी.

प्रचेतस's picture

5 Oct 2015 - 10:01 pm | प्रचेतस

सुरेख माहिती.
तुमच्यासोबत एकदा जंगलभ्रमंती करायची आहे.

अजया's picture

5 Oct 2015 - 10:21 pm | अजया

अनेक धन्यवाद या प्रतिसादाबद्दल!कंदीलाकार किटकभक्षणासाठी असावा असा अंदाज होता पण कसे ते तुम्ही सांगितल्यावर कळले!तुमच्याबरोबर कासला परत जाणे आले!

दिपक.कुवेत's picture

7 Oct 2015 - 2:26 pm | दिपक.कुवेत

आणि फोटो. छोटेखानी सहल आवडली.

पैसा's picture

8 Oct 2015 - 11:26 am | पैसा

सुंदर लिखाण आणि फोटो!

मदनबाण's picture

9 Oct 2015 - 4:12 am | मदनबाण

ह्म्म... कधी तरी जायला मिळायला हवे इथे !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अधीर मन झाले,मधुर घन आले... :- निळकंठ मास्तर

इडली डोसा's picture

9 Oct 2015 - 8:38 am | इडली डोसा

फोटो आणि वर्णन दोन्ही खूप मस्त. मी अर्ध आयुष्य सातरमधे काढुनसुद्घा कधी ही फुलं बघायला जमलं नाही याची नेहमी खंत वाटते.

शब्दबम्बाळ's picture

12 Oct 2015 - 11:42 pm | शब्दबम्बाळ

दोन्ही भाग छान आहेत!
मी सुद्धा हल्लीच जाउन आलो कासला, खूपच मस्त वातावरण होत...
लिहायला कधी वेळ मिळेल माहित नाही, सध्या एक फोटो इथेच चिटकवतो! :)
ajinkyatara