आवर्त

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
13 Sep 2015 - 6:46 pm

माझ्या चरचरीत पंज्याला सुखावणारा
तुझा चिमुकला मऊसूत तळवा
तुला भान देखील नाही बोचऱ्या स्पर्शाचे
गाढ झोपेत मंद हसरा तुझा चेहरा
इकडे प्रेम आणि तिकडे आधार
यांच्या आश्वासक सोबतीत
विसावलाय, दिवसभराचे उनाडणे विसरून

तुझ्या निर्व्याज निजेची गुंगी
मलाही चढू लागली आहे हळूहळू

खूप वर्षापूर्वी माझ्या शेजारी
अशीच होती शांत निजलेली
दोन छोटी पाउले.
मला टक्क जागे ठेवून

माझी शर्यत सुरू झाली होती
त्यांना जिंकविण्याची
ती कोमल पाउले,
हजारो मैलांचा प्रवास समोर होता त्यांच्या
त्यांना बळ देऊ शकणार कां मी?
दिशा कशी दाखविणार?
कुठे भरकटणार नाहीत नां ती?
बिन उत्तराचे प्रश्न पांघरून मी तळमळत,
चिमुकली दोन पाउले अशीच होती
शांत निजलेली बाजूला.
पण किती फरक, तेव्हा आणि आत्ता!
त्यावेळी त्यांना
बळ देण्याचा भार माझ्या पाउलांवर
त्यांना दिशा दाखविण्याचे दायित्व माझ्या शिरावर!
चिमुकली पाउले होती गाढ झोपेत,
मी तळमळत!
आता,
तुझी रेशमी पाउले
माझ्या खरखरीत तळपायाला गोंजारत
आणि मी शांत, निवांत, बिनधास्त
तुझा सगळा भार पेलणारी
मी चालणे शिकवलेली,
समर्थ पाउले,
आहेत तुझ्या बाजूला!

मी सुशेगाद!
हा क्षण मुठीत पकडून ठेवता येईल?

कविता माझीराहणी

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

13 Sep 2015 - 6:57 pm | पद्मावति

आई ग....किती सुरेख. फारच गोड लिहिलंय.
बाबा ते आजोबा हा प्रवास. दोन भूमिकांमधील फरक किती सुंदर उलगडलाय तुम्ही. फार आवडली ही कविता.

एस's picture

13 Sep 2015 - 7:03 pm | एस

असेच म्हणतो. फार छान कविता.

चाणक्य's picture

13 Sep 2015 - 8:37 pm | चाणक्य

मस्तच आहे कविता.

मांत्रिक's picture

13 Sep 2015 - 9:48 pm | मांत्रिक

पद्मावतीताई यांच्याच प्रतिसादाची री ओढत म्हणतो, सुंदर! एकदम सुंदर! मनाला स्पर्श करणारे!!!

सटक's picture

14 Sep 2015 - 6:10 pm | सटक

सुंदर!

अरुण मनोहर's picture

13 Sep 2015 - 7:08 pm | अरुण मनोहर

paaUle

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Sep 2015 - 7:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

बाबा ते आजोबा स्थित्यंतरावरची सुंदर कविता !

बहुगुणी's picture

13 Sep 2015 - 9:03 pm | बहुगुणी

आवडली

रातराणी's picture

13 Sep 2015 - 8:43 pm | रातराणी

मस्त!

एक एकटा एकटाच's picture

13 Sep 2015 - 9:14 pm | एक एकटा एकटाच

सुरेख

अगदी सुरेख

अरुण मनोहर's picture

14 Sep 2015 - 3:07 am | अरुण मनोहर

foto

नीलमोहर's picture

14 Sep 2015 - 12:41 pm | नीलमोहर

सुंदर कविता..

नाखु's picture

14 Sep 2015 - 1:07 pm | नाखु

भावना शब्दात पकडणं खरच अवघड असतं आणि ते तुम्ही नेमकं पकडलयं आणि हे अनुभुतीवीण अस्सल येणार नाही.

वाखु साठवली आहे (काव्य विभागात फारसी वाखु साठविण्याचा प्रसंग येत नाही)

बाबा-अनुभवी नाखु

अरुण मनोहर's picture

15 Sep 2015 - 3:08 am | अरुण मनोहर

खरय तुमच निरीक्षण !
एकदा नातू शेजारी झोपला असताना त्याचा शांत चेहरा बघून असे विचार मनात आले होते.

मांत्रिक's picture

14 Sep 2015 - 5:52 pm | मांत्रिक

अवांतर - तुम्ही मिपाचे बरेच जुने सदस्य दिसत आहात बाकी. ८९३ सदस्य क्रमांक दिसतोय. अगदी स्थापनेच्या काळात देखील तुम्ही सक्रिय असणार. मिपावरील स्थित्यंतराबाबत लिहिलं तर वाचायला आवडेल. :)
इतके जुने पण सक्रिय आयडी अजून कोण कोण असतील?

मांत्रिक's picture

14 Sep 2015 - 5:53 pm | मांत्रिक

हा प्रतिसाद अरूण मनोहर यांना आहे.

सूड's picture

14 Sep 2015 - 6:04 pm | सूड

मस्त लिहीलंय!!