काश्मिर - काल, आज आणि उद्या

सुनील's picture
सुनील in काथ्याकूट
22 Aug 2008 - 1:55 pm
गाभा: 

"आम्ही पाकिस्तानी आहोत, कारण आम्ही मुस्लिम आहोत", जहाल हुरीयत नेते सय्य्द अली शाह गिलानी गरजले. परंतु त्यांचे शब्द वार्‍यावर विरून जाण्यापूर्वीच त्यांनी काश्मिरी जनतेची बिनशर्त माफी मागितली.

भारतीय जनता ह्या घटनेचा अन्वयार्थ कसा लावणार आहे? असे काय होते त्यांच्या वक्त्यव्यात ते काश्मिरी जनतेला रुचले नाही, पटले नाही?

कश्मिरीयत ही काय चीज आहे?

निमित्त झाले ते विसूनाना यांनी लिहिलेल्या काश्मिरविषयीच्या लेखाचे. सर्वप्रथम त्या लेखाला प्रतिसाद देण्याचा विचार केला. नंतर असे लक्षात आले की, आपले म्हणणे जर विस्तारपूर्वक मांडायचे असेल तर, स्वतंत्र लेख लिहिणे अधिक सोयीस्कर पडेल. म्हणून हे प्रयोजन...

सर्वसामान्य भारतीय माणूस हा काश्मिरबाबत फार हळवा असतो. काश्मिर हे भारताचे अविभाज्य अंग असून पाकिस्तान त्याचा लचका तोडण्यासाठी टपून बसला आहे अशी त्याची खात्री असते. शाळेत पाहिलेल्या भारताच्या नकाशातील काश्मिर हे प्रत्यक्षात संपूर्णपणे आपल्या ताब्यात नाही हे कळल्यावर त्याचा संताप होतो. साहजीकच आहे कारण, जसा महाराष्ट्र, गुजरात वा कर्नाटक तसाच काश्मिर. संघराज्यातील अनेक राज्यांपैकी एक, अशीच त्याची समजूत असते.

परंतु, वस्तुस्थिती काय आहे? काश्मिर "आपलाच" असे म्हणण्याचा कितपत अधिकार भारताला / भारतीय जनतेला आहे? कधिकाळी शंकराचार्यांनी तेथे साधना केली, अनेक ऋषी-मुनींनी वास्तव्य केले, एकेकाळी तेथील जनता हिंदूधर्माचे पालन करीत होती म्हणून? तसे असेल तर आजच्या अफगाणिस्थान, पाकिस्तान आणि बांगलादेशात परिस्थिती काय वेगळी होती? इतकेच काय पण नेपाळ हे बहुसंख्य हिंदू असूनदेखिल एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपण मान्य केलेलेच आहे ना?

काल
साधारणतः ८व्या शतकात काश्मिर खोर्‍यात इस्लाम धर्माने प्रवेश केला. १४व्या शतकापर्यंत तेथे इस्लाम हळूहळू वाढत होता. १४व्या शतकातील स्थानिक बौद्ध धर्मिय राजा रिंपन याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यानंतर तेथे इस्लाम धर्म खर्‍या अर्थाने फोफावला. ब्राह्मण सोडून अन्य जातींनी धर्मांतर केलेच पण ब्राह्मणांतही अनेकांनी धर्मांतर केले. उरले अत्यल्प असे ब्राह्मण ज्यांना आज आपण काश्मिरी पंडीत म्हणतो.

१६व्या शतकापर्यंत तेथे स्थानिक मुस्लीम राज्यकर्त्यांचेच राज्य होते. १६व्या शतकात मुघल सम्राट अकबर याने काश्मिर खोरे जिंकले आणि आपला पुत्र जहंगीर याला तेथे प्रशासक म्हणून नेमले. "ह्या पृथ्वीतलावर जर कोठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे" ह्या त्याच्या पंक्ती याच काळातील. पुढे १८व्या शतकाच्या मध्यावर जेव्हा मुघल साम्राज्य खिळखिळे झाले होते तेव्हा, अफगाण सरदार अहमदशाह अब्दाली याने काश्मिर काबीज केले. हाच तो अब्दाली ज्याने पुढे पानिपतावर मराठ्यांना हरवून मराठेशाही खिळखिळी केली. अब्दालीची राजवट ही काश्मिरच्या इतिहातातील सर्वात क्रूर राजवट म्हणून आजदेखिल मानली जाते. (आज तेथे अफगाण तालीबानी आहेत! काय हा योगायोग!!).

१९व्या शतकाच्या सुरूवातीला लाहोरचे महाराज रणजीत सिंह यांनी अफगाणांचा पराभव करून काश्मिर खोरे आपल्या राज्याला जोडले. जम्मूत त्यावेळी गुलाब सिंग हा डोगरा राजा राज्य करीत होता. गुलाब सिंगाने नंतर चढाई करून लडाख आणि बाल्टीस्तान (आता पाकव्याप्त काश्मिरचा एक भाग) जिंकले. काश्मिर खोरे मात्र रणजीत सिंह यांच्याच ताब्यात होते.

१८४५-४६ च्या शिख-ब्रिटिश युद्धात गुलाब सिंगाने ब्रिटिशांना मदत केली. शिख हे युद्ध हरले. केलेल्या मदतीचा मोबदला गुलाब सिंग यांना मिळणार होताच. ब्रिटिशांनी जिंकलेले काश्मिर खोरे त्यांनी गुलाब सिंगाला ७५ लाखाला विकले!

यावरून हे लक्षात यावे की, जम्मूचे हे डोगरा राज्यकर्ते हे काही काश्मिर खोर्‍याचे पूर्वापार राज्यकर्ते नव्हेत. ते स्थनिक तर नव्हतेच शिवाय त्यांनी काश्मिर खोरे जिंकून घेतले होते असेही नाही.

गुलाब सिंग यांच्या नंतर हरी सिंग राज्यावर आले. त्यांचा कारभार हा मुखत्वे दडपशाहीचाच होता. त्यांच्या जुलमी कारभाराविरुद्ध काश्मिर खोर्‍यात १९३१ साली मोठा उठाव झाला त्यात २१ काश्मिरी बळी गेले. काश्मिरी आजदेखिल हा दिवस (१३ जुलै) "हुतात्मा दिवस" म्हणून पाळतात (आपल्या १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्या प्रमाणेच).

हे मुद्दामून सांगण्याचे कारण - काश्मिरींचा "स्वातंत्र्यलढा" हा पूर्वीपासूनचा (१९३१) आहे. पाकिस्तान, तालीबानी किंवा हुरियत यांनी तो सुरू केलेला नाही, हे स्पष्ट व्हावे.

१९४७ च्या फाळणीनंतर महाराज हरी सिंग यांनी स्वतःचे जम्मू-काश्मिर राज्य स्वतंत्र राखण्याचे खूप प्रयत्न केले. वास्तविक, धार्मिक बहुसंख्या आणि भौगोलिक सलगता ह्या मुद्यावर जम्मू-काश्मिर राज्य पाकिस्तानात जाणे हे नैसर्गिक वाटावे इतके सहज होते. पाकिस्तानची "केस" भलतीच भक्कम होती (जशी भारताची हैदरबादबद्दल होती). परंतु, नेहेरूंची नाळ काश्मिर खोर्‍याशी जुळलेली होती. त्यांना कोणत्याही परिस्थितीत काश्मिर खोरे गमवायचे नव्ह्ते.

त्यासाठी त्यांनी माऊन्टबॅटन आणि रॅडक्लीफ (ज्याने प्रत्यक्ष पाळणीच्या रेषा आखल्या) यांच्या मदतीने अनेक खटपटी केल्या (उदा. जम्मूला उर्वरीत भारताशी जोडणारा पंजाबचा गुरुदासपूर जिल्हा मुस्लिमबहुल असूनदेखिल भारताला बहाल करणे, फाळणी झालेले विभाग फाळणीनंतर २-३ दिवसांनी जाहीर करणे इ.).

पाकिस्तानला हे मानवणे शक्यच नव्हते. परंतु हे प्रकरण मुत्सद्देगिरीने हाताळण्याऐवजी त्यांनी काश्मिरमध्ये पठाण टोळीवाले घुसवले. हे टोळीवाले जसे श्रीनगरच्या वेशीवर धडका देऊ लागले तसे महाराज हरी सिंग यांनी भारताकडे मदतीची याचना केली. सामीलनाम्यावर सही करण्याच्या अटीवर भारताने मदत केली. हा सामीलनामा (ज्याची मूळप्रतही गूढरीत्या गायब झालेली आहे!!) हेच भारताच्या काश्मिरवरील दाव्याचे एकमेव हत्यार आहे. राज्यकर्त्याच्या मर्जीपेक्षा जनतेची इच्छा अधिक महत्वाची हे तत्व जर जुनागड आणि हैदरबादबाबत लागू होते, तर काश्मिरबाबत दुजाभाव का, ह्या आक्षेपाला भारताकडे बिनतोड उत्तर नाही.

युद्धविराम करण्यासाठी भारताने युनोकडे धाव घेतली तीदेखिल चॅप्टर ६ अंतर्गत (ज्याचे ठराव संबंधित देशांवर बंधनकारक नसतात). म्हणूनच पाकिस्तान जरी वारंवार युनोचा दाखला देत असला तरी त्याला जगात फारशी किंमत दिली जात नाही. अर्थात ह्या ठरावाद्वारे पाकिस्तानला आपले सैन्य आजच्या पाकव्याप्त काश्मिरमधून हटवणे हेही कलम होते, जे पाकने कधीच पाळले नाही. पुढे तर सिमला करारांतर्गत दोन्ही देशांतील वाद हे आपापसातच सोडवायचे, जागतीक पातळीवर न्यायचे नाहीत असेही आपण पाकिस्तानकडून वदवून घेतले!

थोडक्यात, सामीलनामा, सिमला करार, युनो तील चॅप्टर ६ ची निरर्थकता हे भारताच्या बाजूचे महत्वाचे मुद्दे तर १९४८ आणि १९६५ ची चढाई, १९९९ ची कारगील आगळीक हे पाकिस्तानची बाजू कमकुवत करणारे मुद्दे ठरले. यात भर पडली ती पाक पुरस्कृत दहशतवादाची. ह्या दहशतवादामुळे पाकची प्रतिमा तर डागाळलीच पण त्यांची "केस" जी १९४७ साली भलतीच भक्कम होती, ती कायमचीच कमकुवत झाली. (आता खुद्द पाकमध्येच ह्या दहशतवादाने धुमाकूळ घातला आहे, हेदेखिल त्या साहसवादाचेच दुष्परिणाम.)

आज
आज काश्मिरमध्ये काय परिस्थिती आहे? एक कोटींच्या ह्या राज्यात आज ७ लाख जवान तैनात आहेत. श्रीनगरमध्ये तर दर १० पावलांवर एक लष्करी जवान दिसतो. आणि हे असे गेली २० वर्षे सुरू आहे. सर्वसामान्य काश्मिरीच्या मनात भारताबद्दल कडवटपणाचीच भावना आहे. भारतीय लोकशाहीदेखिल त्यांच्यासाठी थट्टाच ठरली आहे. कारण, २००२च्या वाजपेयी सरकारने घेतलेल्या निवडणूका वगळता त्यापूर्वीच्या सर्व निवडणूका ह्या "फार्सिकलच" होत्या.

आज आपली "काश्मिरीयत" जपण्यासाठी त्यांना स्वतंत्र व्हायचे आहे. फार थोडे आहेत की जे पाकिस्तानात जाण्याच्या बाजूचे आहेत. "कश्मिरीयत" चे हे वेगळेपण केवळ मुस्लिम धर्मामुळे आलेले नाही. मुद्दामून लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे, भारतातील कोणत्याही हिंदू-मुस्लिम दंग्याची काश्मिरमध्ये कधीच प्रतिक्रिया उमटलेली नाही.

आज आमरनाथ देवस्थानाला दिलेल्या जमिनीवरून वाद निर्माण झालेला असला तरी, ही यात्रा गेली शेकडो वर्षे सुरळीत सुरू होती आणि स्थानिक मुस्लीमच हिंदू यात्रेकरूंची सोय पाहत होते, हा इतिहास आहे.

उद्या

सर्वप्रथम हे लक्षात ठेवावे लागेल की, काश्मिर हा राजकीय प्रश्न आहे त्यामुळे त्याचे राजकीय उत्तरच शोधावे लागेल. लष्करी उपायांनी फारतर काश्मिरच्या भूभागावर ताबा ठेवता येईल पण तेथील जनतेला भारताच्या बाजूने वळवता येणार नाही. शेवटी प्रदेश म्हणंजे त्या प्रदेशातील माणसे, केवळ जमीन नव्हे.

१) अधिक स्वायत्तता देणे - घटनेच्या ३७० व्या कलमाचे "विथ लेट्टर एन्ड स्पिरीट" पालन करणे. अर्थात, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण वगळता अन्य सर्व बाबी त्यांच्या त्यांना हाताळू देणे. भारताने हे कलम अनेकदा पायदळी तुडवले आहे (बनावट निवडणूका हे याचे उत्तम उदाहरण). ह्या कलमाचा यथायोग्य वापर होतो आहे हे दिसले तर त्यांच्या स्वातंत्र्याच्या मागणीतील बरीचशी हवा निघून जाईल.

२) लष्करी जांच कमी करणे - श्रीनगरमध्ये आज दर दहा पावलांवर एक जवान दिसतो. दहशतवाद रोखण्यासाठी काही प्रमाणात ते असणे आवश्यक असले तरी अधिक संख्येने, अधिक अधिकार असलेले सैन्य जुलूम-जबरदस्ती करतेच. खुद्द शिवाजी महारा़जांनीदेखिल आपल्या सैन्याला रयतेशी कसे वागावे याच्या सुचन्या दिल्या होत्या, याची येथे आठवण होते.

३) घट्ट आर्थिक संबंध निर्माण करणे - भारताची ३५ कोटी मध्यमवर्गाची बाजारपेठ ही कोणालाही भूरळ घालणारीच आहे. काश्मिरींसाठी आजदेखिल ही बाजारपेठ खुली आहेच पण त्यात अधिक सुविधा करता येतील. सध्या जम्मू ते श्रीनगर हा एकमेव रस्ता प्रवासी आणि मालवाहतूकीसाठी उपलब्ध आहे (ह्या १२ तासांच्या "दिव्य" प्रवासाचा अनुभव मी घेतला आहे!). रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूकीने काश्मिर हे भारताला अधिक चांगल्या प्रकारे जोडावे लागेल.

४) देशाचे स्थान उंचावणे - अमेरीकेतील कॅलिफोर्निया आणि टेक्सास ह्या रा़ज्यात काही फूटीर प्रवृत्ती आहेत. पण त्यांना फारसा जनाधार नाही. कारण, अमेरिकेचा भाग असणे आणि नसणे यातील फायदा/तोटा तेथील जनतेला समजतो. त्याचप्रमाणे काश्मिरींनाही स्वतंत्र राहण्यापेक्षा भारताचे नागरीक म्हणून राहण्यात अधिक सुख आणि सुरक्षित वाटले तर स्वातंत्र्याच्या मागणीतील जोर पुष्कळसा कमी होईल (पण पूर्ण जाणार नाही).

प्रतिक्रिया

भास्कर केन्डे's picture

22 Aug 2008 - 8:04 pm | भास्कर केन्डे

श्री. सुनील,

व्यवस्थित मांडणी करून आपण थोडक्यात पण जवळजवळ सर्व महत्वाचे मुद्दे सोप्या भाषेत मांडलेत. अभिनंदन व आभार!

पण आजून एका मुद्यावर आपण जरा प्रकाश टाकाल का? १९४७ च्या दरम्यान पाक-अफगाण टोळीवाल्यांना काश्मिरी लोकांनी आपले मानले नव्हते. उलट त्यांची भारताबद्दलची मानसिकता आपलेपणाचीच होती (कदाचित गांधींच्या धोरणाचा मोठा परिणाम म्हणता येईल). पण नंतर ती हळूहळू बदलत गेली. विषेशतः ऐंशीच्या दशकात दहशतवाद सुरु झाल्यावर. याबद्दल आपले मत जाणून घ्यायला उत्सुक.

आपला,
(प्रभावित) भास्कर
आम्ही येथे वसतो.

अवलिया's picture

22 Aug 2008 - 8:11 pm | अवलिया

एक वाचणीय लेख
अतिशय सुंदर पद्धतीने आपण जो गोषवारा मांडलात त्याचे कौतुक वाटते
असेच सुंदर लेखन आपल्याकडुन वाचायला मिळावे

नाना

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Aug 2008 - 11:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अजून चांगल्या आणि सुंदर लेखांची वाट बघणारी, यमी

प्राजु's picture

22 Aug 2008 - 8:35 pm | प्राजु

अतिशय उत्तम पद्धतीने लेखाची मांडणी केली आहे. मुद्देसूदपणा आणि सोपी भाषा.
उद्या मध्ये आपण जे काही मुद्दे सांगितले आहेत.. उपाय म्हणून फार तर.. ते सगळेच पटले..
जय हिंद..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

22 Aug 2008 - 9:08 pm | प्रभाकर पेठकर

लेख चांगला लिहीला आहे. त्यामागे विशिष्ट अभ्यास दिसून येतो. तरीपण.....

श्रीनगरमध्ये तर दर १० पावलांवर एक लष्करी जवान दिसतो. आणि हे असे गेली २० वर्षे सुरू आहे. सर्वसामान्य काश्मिरीच्या मनात भारताबद्दल कडवटपणाचीच भावना आहे.
वरील विधानाशी मी सहमत नाही. श्रीनगर मध्ये मी तरी दर १० पावलांवर लष्करी जवान पाहिला नाही. आणि मला भेटलेल्या काश्मिरींना (शिकारा चालवणारे, दुकानदार तसेच श्रीमंत हॉटेल मालक) विचारले असता सर्वांना भारताबरोबरच राहायचे होते. त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय, सुरक्षितता आणि विश्वासार्हता ह्यांचा विचार करून त्यांना भारताबरोबर राहणेच पसंत होते. दहशतवाद्यांनी 'काश्मिरची वाट लावली' असाच त्यांचा सूर होता.
ह्याचा अर्थ श्री. सुनिल ह्यांचे निरिक्षण, अभ्यास चुकीचा आहे असे मी म्हणत नाही. माझ्या तथाकथित सर्व्हेचा आवाका बराच बारीक (अगदी सूक्ष्मच म्हणाना) होता. पण मला तो प्रातिनिधिक वाटतो.

स्थानिक मुस्लीमच हिंदू यात्रेकरूंची सोय पाहत होते, हा इतिहास आहे.
ह्याला कारण काश्मिरातील गरीबी. सहलीला येणारे भारतीय, भारतीय यात्रेकरू आणि परदेशी नागरीक हे चार महिने येतात. बाकी आठ महिने कमाईचे साधन नाही. त्यामुळे अशा भारतियांना सर्व सेवा उपलब्ध करून वर्षाची कमाई, बेगमी त्यांना करून ठेवावी लागते. दहशतवादाने टूरिस्टांचे प्रमाण भयंकर घसरले आणि स्थानिकांची उपासमार होऊ लागली. त्यामुळे दहशतवाद्यांचा जनाधार कमी झाला.

अधिक संख्येने, अधिक अधिकार असलेले सैन्य जुलूम-जबरदस्ती करतेच.
होय हे मीही ऐकले आहे. त्यात तथ्य असावे असे वाटते. ७१च्या लढाईत लाहोरपर्यंत मुसंडी मारलेल्या भारतीय जवानांनी तिथे (पाकिस्तानात)बरेच जुलूम केले. तेंव्हा 'जवानांच्या लहानसहान (?) गुन्ह्यांकडे दुर्लक्ष्य करा' असा आदेश वरीष्ठांकडून होता, असे आर्मीतल्या एका वरीष्ठानेच सांगितले होते.

वरील लेख प्रामाणिकपणे लिहीला असला तरी सर्वकष लिहीलेला वाटला नाही. याचा अर्थ तो काही राष्ट्रद्रोही लेख आहे असे माझे म्हणणे नाही. :-) तरी देखील "करीसी भलता शोक वरी ज्ञान ही सांगिसी..." हे शब्द आठवल्यावीना रहात नाहीत.

साधारणतः ८व्या शतकात काश्मिर खोर्‍यात इस्लाम धर्माने प्रवेश केला. १४व्या शतकापर्यंत तेथे इस्लाम हळूहळू वाढत होता. १४व्या शतकातील स्थानिक बौद्ध धर्मिय राजा रिंपन याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यानंतर तेथे इस्लाम धर्म खर्‍या अर्थाने फोफावला.

या मुद्यावर आपण नंतर भर दिलेला नाहीत पण तरी वाचताना असे वाटले की लोकांनी प्रेमाने इस्लाम धर्म स्विकारला. वास्तवीक भारतात काही अंशी केरळ सोडल्यास उत्तरेकडून इस्लाम धर्माचा जो प्रचार झाला तो एका हातात कुराण आणि दुसर्‍या हातात तलवार घेऊनच झाला. तेंव्हा मूळ लोकांना तेथपासून मध्यपूर्वेतील अत्याचाराला सामोरे जावे लागले ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आधीच्या इतिहासाला (तेथे असलेले शंकराचार्य, हिंदू वगैरेंना) विसरून जायचे असे जे म्हणणे आहे ते योग्य वाटले नाही.

हे मुद्दामून सांगण्याचे कारण - काश्मिरींचा "स्वातंत्र्यलढा" हा पूर्वीपासूनचा (१९३१) आहे. पाकिस्तान, तालीबानी किंवा हुरियत यांनी तो सुरू केलेला नाही, हे स्पष्ट व्हावे.

हे विधान दिशाभूल करणारे आहे. पुर्वीचा स्वातंत्र्यलढा हा कदाचीत राजा हरीसिंगाच्या विरोधातील असू शकेल. पण त्याचा संबंध भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी ज्यात तेंव्हा अखंड भारत होता लावणे आणि आता नवीन काहीच नाही म्हणणे योग्य वाटत नाही.

आज आमरनाथ देवस्थानाला दिलेल्या जमिनीवरून वाद निर्माण झालेला असला तरी, ही यात्रा गेली शेकडो वर्षे सुरळीत सुरू होती आणि स्थानिक मुस्लीमच हिंदू यात्रेकरूंची सोय पाहत होते, हा इतिहास आहे.

हे बरे आहे, मुसलमान मदत करतात म्हणल्यावर इतिहास बघायचा, पण शंकराचार्य, हिंदू मंदीरे, राजे त्याच इतिहासात होते म्हणताक्षणी भूगोलाकडे बोट दाखवायचे...

...भौगोलिक सलगता ह्या मुद्यावर जम्मू-काश्मिर राज्य पाकिस्तानात जाणे हे नैसर्गिक वाटावे इतके सहज होत......राज्यकर्त्याच्या मर्जीपेक्षा जनतेची इच्छा अधिक महत्वाची हे तत्व जर जुनागड आणि हैदरबादबाबत लागू होते, तर काश्मिरबाबत दुजाभाव का, ह्या आक्षेपाला भारताकडे बिनतोड उत्तर नाही.
या संदर्भात मी उपक्रमावरील माझे उत्तर येथे चिकटवतो:

सर्वप्रथम संस्थानांच्या विलीनीकरणासंदर्भात असे ठरवले गेले होते की जी राज्ये नवीन सीमेवर आहेत त्यांना कुणाबरोबर जायचे कुणाबरोबर नाही अथवा दोन्हींबरोबर तटस्थ राहायचे या संदर्भात निर्णय घेण्याची शक्ती राहील. काश्मिरच्या राजाने दोन्ही देशांबरोबर तटस्थ रहाण्याचा निर्णय घेतला. तसा करार त्यांनी दोन्ही देशांशी करायचा प्रयत्न केला. पाकीस्तानने तो मान्य केला आणि भारतसरकारने त्यासाठी वेळ मागीतला. त्या वेळातच पाकीस्तानने दगाबाजी करून तो करार मोडला आणि पाकीस्तानी सैन्य "ट्रायबल्सच्या" नावाखाली घुसवले. मग महाराजा भारतसरकारकडे आला आणी विलीनीकरण मान्य केले.
जुनागडच्या बाबतीत एक ही सीमा पाकीस्तानला लागलेली नव्हती हा एक भाग झाला. त्याने आजूबाजूच्या (हिंदू राज्यकर्ते असलेल्या) संस्थांनाच्याशी कुरापती चालू केल्या. त्या नंतर भारत सरकारने हल्ला केला आणि नवाब त्याच्या कुटूंबाबरोबर पळून गेला. त्यातही २० फेब्रुवारी १९४८ ला तेथे प्लेबिसाईट घेण्यात आले आणि नव्वद टक्क्यांहून (लाखो मते) ही भारताच्या बाजूने पडली.

काश्मिर मधील सार्वमत का झाले नाही? : त्यासाठी आधी तेथे सर्व काश्मिरी जायला हवेत. त्यातआत्याचार झालेले काश्मिरी पंडीतपण येतात. पाकव्याप्त काश्मिरमध्ये फक्त काश्मिरी रहायला हवेत (तेथे गव्हर्नर पण काश्मिरी नसतो ही वस्तुस्थिती आहे!). सार्वमताची मागणी मान्य कधी केली होती? तर जेंव्हा संपूर्ण काश्मिर भारताच्या ताब्यात होते तेंव्हा. त्यात पाकव्याप्त काश्मिर आणि चीनच्या ताब्यात पाकीस्तानने दिलेले काश्मिरपण येते. नेहरूंच्या वेळेस हा तिसरा तुकडा नव्हता. पण पाकव्याप्त काश्मिर भारताच्या स्वाधीन करा आणि मग सार्वमत घ्या असा मूळ मान्य केलेला मुद्दा पाकीस्तान पाळायला तयार नवह्ते. त्यामुळे केलेला करार रदबातल ठरला.

आज आपली "काश्मिरीयत" जपण्यासाठी त्यांना स्वतंत्र व्हायचे आहे. फार थोडे आहेत की जे पाकिस्तानात जाण्याच्या बाजूचे आहेत. "कश्मिरीयत" चे हे वेगळेपण केवळ मुस्लिम धर्मामुळे आलेले नाही.

काश्मिरीयत जपणे म्हणजे कोणितरी पुणेरी पणा जपणे, वैदर्भिय संस्क्रूती जपणे इतकेच आधी होते. पण विशेष करून १९८९ सालापासूनची (रुबिया सयीद मुळे जेंव्हा अतिरेकी सोडले तेंव्हापासूनची) अवस्था काय आहे? - लाखो काश्मिरी पंडीत जे पण त्या काश्मिरीयतचा भाग होते त्यांना आज बेघर व्हावे लागले, बायकांवर अत्याचार झाले, मुलींना पळवण्यात आले, पुरूषांना मारण्यात आले, अनेक मंदीरे फोडण्यात आली - हे काय सर्व काश्मिरीयत जपण्याचा भाग आहे? त्यांचे मानवी हक्क वगैरे कही आहेत का नाही?

तसे असेल तर उद्या बिहारींना आणि उत्तरभारतीयांना मुंबईतून हाकला कारण आम्हाला मराठीपण जपायचे आहे असे म्हणले तर काय तुमचा त्याला पाठींबा असणार आहे? कारण त्यात कुठे हिंदू धर्मावरून नाही फक्त महाराष्ट्र/मराठीपण जपवणे इतकीच काय ती इच्छा! काय राव स्वत:चे सुखासुखी चालते म्हणून असे या निर्वासितांच्या घरांवर तुळशीपत्र ठेवता?

किमान त्या रविंद्र म्हात्रेला लंडन मध्ये मारलेले तरी लक्षात ठेवता आले तर पहा (पुण्यातून जेंव्हा जेंव्हा म्हात्रेपूलावरून जातो तेंव्हा तो बिचारा मला आठवतो...). केवळ दहशतवादी अतिरेक करत आहेत म्हणून मान्य करणे आणि त्याला बुद्धीवादाचा मुलामा चढवणे पटत नाही.

अजून आठवेल तसे / सुचेल तसे लिहीत जाईन...

आजानुकर्ण's picture

23 Aug 2008 - 12:05 am | आजानुकर्ण

या मुद्यावर आपण नंतर भर दिलेला नाहीत पण तरी वाचताना असे वाटले की लोकांनी प्रेमाने इस्लाम धर्म स्विकारला. वास्तवीक भारतात काही अंशी केरळ सोडल्यास उत्तरेकडून इस्लाम धर्माचा जो प्रचार झाला तो एका हातात कुराण आणि दुसर्‍या हातात तलवार घेऊनच झाला. तेंव्हा मूळ लोकांना तेथपासून मध्यपूर्वेतील अत्याचाराला सामोरे जावे लागले ही वस्तुस्थिती आहे.

कालपरवाच प्रकाशित झालेला एक सरकारी (की शासकीय!) रिपोर्ट वेगळेच सांगत आहे.

किंबहुना, ज्ञानेश्वर आणि मुकुंदराज यांच्यासारख्या भोंदू संतांमुळे मोहम्मदाच्या पवित्र प्रवेशापासून महाराष्ट्र वंचित राहिला अशा अर्थाचे महात्मा फुल्यांचे वचनही प्रसिद्ध आहे. ;)

आपला,
(क्वचित) आजानुकर्ण

तळटीपः

अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणाच्या वेळी समाजजागृती करून हिंदू धर्माची पताका व पर्यायाने जातीव्यवस्था टिकवून ठेवण्याचे काम करून ज्ञानेश्वरांनी दलितांचे नुकसान केले व मुक्तीचा मार्ग त्यांना बंद केला असा फुले यांचा सूर होता.

मी त्यांच्या मताशी संपूर्ण असहमत आहे. मात्र जातीव्यवस्थेचे चटके किती भयानक होते हे त्यातून अधोरेखित व्हावे.

विकास's picture

23 Aug 2008 - 1:08 am | विकास

कालपरवाच प्रकाशित झालेला एक सरकारी (की शासकीय!) रिपोर्ट वेगळेच सांगत आहे.

या माहीतीबद्दल धन्यवाद!

सर्वप्रथम अशा पद्धतीचा अहवाल प्रथमच आला आहे - त्यात अनेक राजकारणे असू शकतात त्यामुळे अजून काळाच्या ओघात तावून सुलाखून निघाला नसल्याने मला तो लागलीच तसाच्यातसा मान्य करणे अवघड जात आहे - केवळ मी आधी जे म्हणले त्याच्या विरुद्ध त्या अहवालात आहे म्हणून नाही!

तरी देखील असे समजू की तो अहवाल खराच असेल आणि त्यात एकही जाणूनबुजून अथवा प्रामाणिकपणे तॄटी नाही.. म्हणून काश्मिर मधे जे काही मुसलमान झाले ते केवळ मागासवर्गीय झाले असे म्हणायला जागा नाही कारण अनेक काश्मिरी मुसलमानांचे मूळ हे काश्मिरी पंडीतांमधे आहे. एखादा मुसलमान राज्यकर्ता सोडल्यास इतर (मुस्लीम) राजे हे इतर धर्मांशी (म्हणजे मुख्यत्वे हिंदू आणि बुद्ध) सहीष्णू वृत्तीने वागत नव्हते असे म्हणणारे अनेक लेखन आहे. बरे आपला म्हणजे महाराष्ट्रातील इतिहास पण त्याबाबत काही वेगळे सांगत नाही - नेताजी पालकर घ्या किंवा शिवाजीचा मेव्हणा बजाजी नाईक निंबाळकर घ्या ते काही स्वखुशीने मुसलमान झाले का त्यांचे सामाजीक शोषण होत होते?

त्याही पुढे जाऊन - ८५% टक्के मुसलमान जरी स्वेच्छेने झाले असतील असे मानले, तरी देखील ते मुळचे भारतवर्षातीलच आहेत. त्यात जसे अधुनीक भारतातील इतरत्र असलेले मुसलमान आहेत तसेच काश्मिरमधे पण आहेत. त्यांना वेगळे नियम काश्मिरीयत म्हणून लावायचे आणि त्यांनी चालवलेला दहशतवाद खपवून घेणे कुठल्याच तत्वात बसत नाही.

अवांतर

अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणाच्या वेळी समाजजागृती करून हिंदू धर्माची पताका व पर्यायाने जातीव्यवस्था टिकवून ठेवण्याचे काम करून ज्ञानेश्वरांनी दलितांचे नुकसान केले व मुक्तीचा मार्ग त्यांना बंद केला असा फुले यांचा सूर होता.

काय गंमत आहे! "अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणाच्या वेळेस हिंदू धर्माची पताका घेणार्‍या ज्ञानेश्वराने आपले महात्म्य वापरत, खिल्जी स्वारी करतोय असे जाऊन रामदेवरायला सांगायचे साधे पोस्टमनचे काम देखील केले नाही"या अर्थी सावरकरांचे वाक्य आहे...

मात्र जातीव्यवस्थेचे चटके किती भयानक होते हे त्यातून अधोरेखित व्हावे.

अगदी मान्य. ते एका पिढीत जातील अशी कोणी अपेक्षा करणे पण चूक. पण म्हणून द्वेष करणे ज्यामुळे स्वत:चेपण नुकसान होऊ शकते अशा परकीयांना जवळ करणे पण चूकच. ते पाकीस्तानने करून दाखवले. भारताचा द्वेष म्हणून काश्मिरवर कुरापती आणि घातला काही भाग चीनच्या घशात.. आज तो चीन आपल्या आणि पाकीस्तानच्या डोक्यावर अजूनच जवळ येऊन बसला. ज्यांनी केले ते गेले काळाच्या पडद्याआड पण आपण दोन्ही राष्ट्रे भोगत बसणार.... हेच का अजून नव्याने अपेक्षित आहे?

जशी व्यवहारातील (त्यात सर्व आले - रोटी, बेटी, शिक्षण, कामकाज, सत्तासंपादन आदी) जातीभेद निघून जाईल तस तसे ते चटके काही पिढ्यांमध्ये विसरणे हे पण पुढच्या पिढीचे कर्तव्य आहे.

आज अमेरीकेत ओबामा राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार होतो. त्याला बहुतांशी काळ्यांचा तो काळा म्हणून पाठींबा पण मिळत आहे. तरी देखील त्यात गोर्‍यांचा द्वेष कमी आहे आणि आपला माणूस येत आहे येतला पाहीजे अशी नैसर्गिक इर्षा आहे. मायावती पण जिकू शकल कारण "हाथी नही गणेश है, ब्रम्हा, विष्णू महेश है" असे म्हणत तीला सर्वांना जवळ करावे लागले. तरी देखील आपल्याकडे ओबामा स्टाईल होण्यासाठी "दिल्ली दूर है!". जेंव्हा ही गोष्ट निव्वळ राजकारण म्हणून न रहाता नैसर्गिक होईल तेंव्हा कदाचीत त्यातील द्वेष निघून जाईल. पण ते सातत्याने सर्वांनीच करणे गरजेचे आहे.

विकेड बनी's picture

23 Aug 2008 - 1:19 am | विकेड बनी

म्हणून काश्मिर मधे जे काही मुसलमान झाले ते केवळ मागासवर्गीय झाले असे म्हणायला जागा नाही कारण अनेक काश्मिरी मुसलमानांचे मूळ हे काश्मिरी पंडीतांमधे आहे

यांना पुन्हा आपल्या हिंदू धर्मात यायला जागाच ठेवली नसेल आणि त्या कुतरओढीतूनही त्यांनी शेवटी मिळालेला धर्म मनाने कबूल केला असेल. असे झाले असल्यास, हिंदू धर्माविषयी रागही निर्माण झाला असेलही.

विसोबा खेचर's picture

23 Aug 2008 - 12:36 am | विसोबा खेचर

काश्मिर हे भारताचं आहे आणि भारताचंच राहील!

धन्यवाद..

तात्या.

स्वप्निल..'s picture

23 Aug 2008 - 1:38 am | स्वप्निल..

>>आज आमरनाथ देवस्थानाला दिलेल्या जमिनीवरून वाद निर्माण झालेला असला तरी, ही यात्रा गेली शेकडो वर्षे सुरळीत सुरू होती आणि स्थानिक मुस्लीमच हिंदू यात्रेकरूंची सोय पाहत होते, हा इतिहास आहे.

मला तरी यात काही विशेष वाटत नाही. हे कुठल्याही स्थानिक लोकांची पोटाची व्यवस्था आहे जीथे देवस्थान वगैरे आहे.जर कश्मिरी पंडीत तीथे त्यंच्या प्रमाणात असते तर त्यांनी देखील हेच केले असते असे वाटते.

सुनीलजी, तुमचा लेख उत्तम आहेच. पण काश्मीर बद्दल मी तात्यांशी सहमत आहे.

स्वप्निल..

बेसनलाडू's picture

23 Aug 2008 - 1:58 am | बेसनलाडू

या अभ्यासपूर्ण लेखनानंतर तसेच विकास व आजानुकर्णाच्या प्रतिसादानंतर संबंधित प्रकरणाशी निगडीत इतर कागदपत्रे,माहिती वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
(अभ्यासू)बेसनलाडू

भडकमकर मास्तर's picture

23 Aug 2008 - 2:54 am | भडकमकर मास्तर

अवांतर :
हे सारं वाचून एक गोष्ट आठवली...कोणताही वाद असला की कॉलेजमध्ये एक मित्र मला म्हणायचा, " तू एवढा विचार कशाला करतोस ? तू माझा मित्र म्हटल्यावर कोणत्याही वादात माझीच बाजू घ्यायला हवीस ... नाहीतर तू कसला मित्र ?? "

त्यामुळे फार खोलात न शिरता काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे हे म्हणणे जास्त सोपे आहे आणि पोलिटिकली करेक्ट, काय ?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

कोलबेर's picture

23 Aug 2008 - 3:05 am | कोलबेर

सुनिल रावांच्या प्रतिक्रिया/ अभिप्राय नेहेमी वाचण्या सारखे असतातच त्यामूळे हा लेख ते उत्कॄष्ठ लिहिणार ह्यात शंका नव्हती.
अवांतरः प्रिटी वुमनचा पुढचा भाग कधी?

सुनील's picture

23 Aug 2008 - 12:06 pm | सुनील

कोलबेरराव,

काय पण जुनी-पुराणी आठवण काढलीत? चांगले ८ महिने होऊन गेले की !! प्रिटी वुमन डोक्यात आहेच (जाणार कुठे म्हणा). "लिन्क" लागतेय. बहुधा ह्या वीकांतालाच पुढचा भाग टाकतो. बघूया....

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शितल's picture

23 Aug 2008 - 3:20 am | शितल

लेख, त्यावरील प्रतिसाद दोन्ही चांगले आहेत. :)

आपण मुद्दयांची मांडणी फार चांगल्या प्रकारे केली आहे. पण, काही मुद्दे मात्र पटले नाहीत. मला न पटलेल्या बर्‍याचाश्या मुद्दयांचा प्रतिवाद विकास यांनी केला आहे म्हणून पुनरूक्ती करत नाही. एक मुद्दा मात्र जरूर मांडावासा वाटतो. मानवाधिकारांविषयी भारतीय लष्कर १९९३पासूनच कार्यरत आहे. तसेच अशा गुन्ह्यांची द़खल घेवून त्याबद्दल कारवाई देखिल करण्यात आली आहे. त्याबद्दल इथे वाचा: http://www.indianarmy.gov.in/dv/human_rights.html

मानवाधिकरांविषयी बोलताना भारतीय लष्कर काश्मिरमध्ये कोणत्या परिस्थितीत काम करते हे ही पहायला हवे. अतिरेकी काही सामान्य नागरिकांपेक्षा वेगळे दिसत नाहीत.
आपल्या दिवाणखाण्यात बसून लष्करावर टिका करणार्‍या मानवाधिकारवाल्याना, बळी जाणार्‍या काश्मिरी पंडित, भारताच्या बाजूने असणारे काश्मिरी मुसलमान यांनाही मानवाधिकार आहेत, असे म्हणताना कधिच ऐकलेले/वाचलेले नाही. किंवा कदाचित त्यांना केवळ दहशदवाद्यांनाच मानवाधिकार आहेत, असे वाटत असावे. त्यामुळेच, नेहमीचं
भारतीय लष्कराने(च) मानवाधिकरांची पायमल्ली केली हेचं ऐकू येत असावं.

अर्थात, मानवाधिकरांची पायमल्ली आपल्या लष्कराकडून केली जाऊ नये, हे मलाही पटतं.

अनिल हटेला's picture

23 Aug 2008 - 7:39 am | अनिल हटेला

छान लेख आणी प्रतिक्रीया!!

अजुन काही माहिती कुणी देणार असेल तर वाचायला आवडेल !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

वेताळ's picture

23 Aug 2008 - 10:14 am | वेताळ

पण मला इतकेच सांगा कोणत्या मुस्लिम राष्ट्रात मानवाधिकार संघटनेला मानाचे स्थान आहे? मुस्लिम हा एक समानतेवर अधारलेला धर्म आहे? काश्मीरि मुस्लिम खरे काश्मिरचे मालक आहेत?
राहता राहिले फुलेचे विधान ते अजुनतरी माझ्या वाचनात आले नाही. पंरतु महात्मा फुलेना मुस्लिमाचा स्त्रिंयाच्या विषयीचा बघण्याचा द्रुष्टिकोन माहित नव्हता हे म्हणणे धाडसाचे ठरेल.त्यामुळे ते असे काही बोलतील वाटत नाही.
वेताळ

सुनील's picture

23 Aug 2008 - 11:43 am | सुनील

सर्वप्रथम सगळ्या प्रतिसादकांचे तसेच प्रतिसाद न देणार्‍यांचेदेखिल मनःपूर्वक आभार!

प्रतिसादात आलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो.

१९४७ साली काश्मिरी टोळीवाल्यांच्या विरोधात होते हे खरे आहे. आलेल्या टोळीवाल्यांनी भरपूर लूटालूट केली होती. खूप अत्याचारदेखिल केला होता. एवढेच काय पण १९६५ च्या पाक घूसखोरीबद्दलची माहितीही स्थनिक (मुस्लिम) गुराख्यांनीच भारतीय अधिकार्‍यांना दिली होती. (पाक सैन्याचा असा अंदाज होता की आपले रेड कार्पेट स्वागत होईल!).

थोडक्यात पाक-अफगाण-पठाण हे मुस्लिम म्हणून "आपले", ही भावना काश्मिरींची कधिच नव्हती. उर्वरीत भारतातील मुस्लिमांवर होणार्‍या खर्‍या-खोट्या अत्याचाराबाबतही त्यांनी कधीही तीव्र प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत.

भल्या-बुर्‍या मार्गाने खाश्मिर खोरे ताब्यात घेतल्यानंतर भारत तेथिल लोकांना आपलेसे करण्यात अनेक कारणांमुळे अपयशी ठरला. पाकिस्तानने त्याचा (गैर)फायदा घेत दहशतवाद्यांचे जाळे उभारले. पुढचा इतिहास सर्वांना ज्ञात आहेच.

श्रीनगरमध्ये दर १० पावलांवर जवान दिसतो यातील अतिशयोक्तीचा भाग वगळा. कदाचित मी श्रीनगरमध्ये पाय ठेवला (ऑक्टोबर २००४) त्याच्या आदल्याच दिवशी एका भारतीय मेजरने एका १० वर्षाच्या मुलीवर आणि तिच्या आईवर बलात्कार केल्याची बातमी आली होती. वातावरण प्रक्षुब्ध होते, त्यामुळे जवान जास्त असतील. काही असले तरी, लष्कराचे अस्तित्व जाणवण्याइतपत आहे, हे खरेच.

केवळ केरळातच नव्हे तर कोकणपट्टीतही इस्लाम तलवारीच्या जोरावर आला नाही. काश्मिरमध्ये इस्लामचा प्रसार हा प्रामुख्याने सुफी संतांमुळे झाला. अर्थात जुलुम-जबरदस्ती झालीच नसेल असे नाही पण प्रभाव प्रामुख्याने सुफी संतांचाच होता.

१९३१चा काश्मिरींचा स्वातंत्र्यलढा हरी सिंगाविरुद्ध होता. आणि तो संपू्र्णपणे त्यांचा स्वतःचा होता (कुठल्याही बाह्य शक्तींनी तो सुरू केलेला नव्हता). आता हरी सिंगाची जागा भारत सरकारने घेतली आहे, असे मला म्हणायचे आहे.

काश्मिरींचा हिंदू इतिहास विसरून जा असे नाही. तसे काश्मिरीदेखिल तो कुठे विसरले आहेत? ९७% मुस्लिम असलेल्या काश्मिर कोर्‍यातील गावांची नावे अद्याप श्रीनगर, अनंतनाग, पहलगाम अशीच आहेत. बारामुल्लादेखिल वराहमूलचेच अपभ्रंशीत रूप. त्याचा "मुल्ला"शी काही संबंध नाही. "हरी पर्वत" तेथे अद्यापही "हरी पर्वत"च आहे.

काश्मिरी पंडीताच्या झालेल्या ससेहोलपटीचे मी कधिही समर्थन केलेले नाही. त्यांचे काश्मिर खोर्‍यातच यथायोग्य पुनर्वसन व्हावे आणि त्यांना संपूर्ण सुरक्षा दिली जावी, असेच माझे मत आहे.

तूर्तास इतके पुरे...

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

23 Aug 2008 - 12:10 pm | सहज

लेख आवडला.

तुर्तास इतकेच म्हणतो की "कालानुरुप" सर्व बाजुंना पटेल असा तोडगा [विन-विन] निघणार हेच खरे. कधी ..... कल्पना नाही.

जितक्या लवकर भारताची आर्थीक स्थिती अजुन मजबुत होईल, राजकीय व सामाजीक इच्छाशक्ती व कायदा सुव्यवस्था अजुन जितकी शक्य तितकी परिणामकारक होईल व भारताबरोबर तडजोड करण्यात आपला "फायदा" आहे हे लक्षात येईल तितक्या लवकर तोडगा निघू शकेल.

क्लिंटन's picture

23 Aug 2008 - 12:46 pm | क्लिंटन

सुनील, आपल्या अभ्यासपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद्.तुमच्या लेखातील काही मुद्दे मला पटत नाहीत आणि त्यामागची कारणे इथे विषद करत आहे.

>>काश्मिर "आपलाच" असे म्हणण्याचा कितपत अधिकार भारताला / भारतीय जनतेला आहे? कधिकाळी शंकराचार्यांनी तेथे >>साधना केली, अनेक ऋषी-मुनींनी वास्तव्य केले, एकेकाळी तेथील जनता हिंदूधर्माचे पालन करीत होती म्हणून? तसे असेल >>तर आजच्या अफगाणिस्थान, पाकिस्तान आणि बांगलादेशात परिस्थिती काय वेगळी होती?

कोणी मला कट्टर म्हणो किंवा आणखी काही, माझ्या दृष्टीने पाकिस्तान आणि बांगलादेश हे भारताचे बळकावलेले भाग आहेत.मी आता नमूद करणार आहे ती माझी पूर्णपणे वैयक्तिक मते असून कोणी त्याबरोबर सहमत होईल तर कोणी होणार नाही.

क्षणभर कल्पना करा की आपले मोठे संयुक्त कुटुंब आहे आणि सर्व कुटुंबिय एका मोठ्या घरात राहत आहेत.बाहेरून आलेल्या कोणी बळजबरीने काही खोल्यांमधील आपल्याच कुटुंबियांना बाटवले .असे बाटविलेले लोक आपले पिढीजात वैरी असल्याप्रमाणे मूळ आक्रमकांमध्ये मिसळून गेले.पुढे त्यांनी आपल्याच घराचा भाग स्वतःचे वेगळे घर म्हणून घोषित केला आणि त्या भागात राहिलेल्या आपल्या लोकांना हाकलवून लावले.म्हणून आम्ही आमच्या घरावरचा हक्क का सोडावा?तुम्ही (तुमच्यातील ९०% पेक्षा जास्त) मुळचे हिंदू होतात आणि तुम्हाला (तुमच्या पूर्वजांना) बळजबरीने बाटविले गेले आहे हे लक्षात घेऊन गुण्यागोविंदाने राहा.सध्याच्या काळात तुम्हाला हिंदू व्हा असे कोणीही सांगत नाही पण घरात वेगळा वाटा मागायचे काही कारण नाही. आणि जर तसे राहायला तुम्ही तयार नसाल तर घर सोडून चालते व्हा असे म्हटले तर काय चुकले?

ज्याप्रमाणे इस्त्राएलला 'पॅलेस्टिनी लोकांची जमिन बळकावून स्थापलेले राष्ट्र' असे म्हणतात त्याच न्यायाने मी पाकिस्तान आणि बांगलादेशाला हिंदूंची जमिन बेकायदा बळकावून स्थापलेली राष्ट्रे असेच मानतो.आणि आपण कधीही त्यावरील दावा सोडू नये असे मला वाटते.योग्य आणि अनुकुल परिस्थिती येताच आपण आपली जमिन परत मिळवावी (भले त्याला २००० वर्षे लागली तरी चालतील) असे मला वाटते.

तेव्हा काश्मीरच काय तर पाकिस्तान आणि बांगलादेश सुध्दा आमचेच आहेत. अफगाणिस्तानविषयी मतप्रदर्शन परत कधीतरी.

>>काश्मिरींचा "स्वातंत्र्यलढा" हा पूर्वीपासूनचा (१९३१) आहे. पाकिस्तान, तालीबानी किंवा हुरियत यांनी तो सुरू केलेला >>नाही, हे स्पष्ट व्हावे.

यात डोग्रा राजघराण्याविरूध्दचा स्वातंत्र्यलढा आणि भारत सरकारविरोधी सद्यकालीन लढा यांच्यात सरमिसळ केली आहे असे वाटते. श्री.भास्कर केन्डे यांनी म्हटल्याप्रमाणे १९४७-४८ साली स्थानिक काश्मिरी जनतेची भूमिका भारताला सहकार्य करणारी होती. १९६५ च्या लढाईत 'ऑपरेशन जिब्राल्टर' करून काश्मीरभोवती फास गुंडाळायला घुसखोर पाठवायचा डाव स्थानिक जनतेच्या सहकार्यामुळेच तर उधळला गेला. मग मधल्या काळात काश्मीरी लोक आपला स्वातंत्र्यलढा विसरले होते का?

>>धार्मिक बहुसंख्या आणि भौगोलिक सलगता ह्या मुद्यावर जम्मू-काश्मिर राज्य पाकिस्तानात जाणे हे नैसर्गिक वाटावे इतके >>सहज होते.

धार्मिक बहुसंख्या तत्वाला माझा आक्षेप आहे.सुदैवाने भारतात हिंदूंचे बहुमत आहे आणि धर्माच्या आधारे भेदभाव करायची भारताची परंपरा नाही.त्यामुळे कोणताही प्रदेश धार्मिक संरचना कशीही असली तरी भारतात सामिल होऊ शकतो.

>>राज्यकर्त्याच्या मर्जीपेक्षा जनतेची इच्छा अधिक महत्वाची हे तत्व जर जुनागड आणि हैदरबादबाबत लागू होते, तर >>काश्मिरबाबत दुजाभाव का, ह्या आक्षेपाला भारताकडे बिनतोड उत्तर नाही.

भारत सरकारने काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रांकडे नेला. अनेकांच्या मते ती एक चूक होती.पण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने मंजुर केलेल्या ठरावानुसार पाकिस्तानने आपले सैन्य पाकव्याप्त (तथाकथित आझाद) काश्मीरमधून मागे घेतले नाही.तर सार्वमत केवळ भारताच्या अधिपत्याखालील काश्मीरमध्येच घ्यावे असा आग्रह धरला.सार्वमत खर्‍या अर्थाने निष्पक्ष व्हायचे असेल तर केवळ मुळच्या काश्मीरींनाच मतदानाचा अधिकार हवा म्हणून इतर राज्यातील भारतीयांना काश्मीरमध्ये वसण्याचा, मालमत्ता खरेदी करायचा अधिकार ३७०व्या कलमामुळे नाही. तशीच परिस्थिती पाकिस्तानात आहे का?तसेच पाकिस्तानने चीनला परस्पर काही जमिन देऊन टाकली. चीनचा या वादात काय संबंध होता?मग त्याला जमिन द्यायचे कारण काय्?पाकिस्तानच्या या सर्व कृतींमुळे त्याला सार्वमत घेण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करायची नव्हती असे म्हटले तर काय चुकले?आणि गेल्या ६० वर्षांमध्ये पाकिस्तानने दाखविलेल्या दुराग्रहामुळे सार्वमत घेण्याची कल्पनाच कालबाह्य झाली आहे.

>>आज आमरनाथ देवस्थानाला दिलेल्या जमिनीवरून वाद निर्माण झालेला असला तरी, ही यात्रा गेली शेकडो वर्षे सुरळीत सुरू >>होती आणि स्थानिक मुस्लीमच हिंदू यात्रेकरूंची सोय पाहत होते, हा इतिहास आहे.

१००% मान्य्.मग आता अमरनाथ देवस्थान जमिन प्रकरणावरून आगडोंब उसळायचे कारण काय्?जर हिंदूबहुल राज्यांमध्ये हज कमिटी, वक्फ बोर्ड आदींची कार्यालये सुखेनैव नांदतात तर मग काश्मीरमध्ये २-३ महिने ४० एकर जमिनीवर अमरनाथ यात्रेकरू राहिले तर त्यात काय बिघडले?

भविष्यकालीन उपाययोजनांविषयी आपण योग्य तेच लिहिले आहे.

सांगायचा मुद्दा म्हणजे काश्मीर आमचे आहे. ज्यांना तेथे गुण्यागोविंदाने राहायचे असेल त्यांनी खुशाल राहावे. असे लोक कोणत्याही धर्माचे असले तरी त्याबद्दल आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. पण जर कोणाला राहायचे नसेल तर त्यांनी पाहिजे तिकडे चालते व्हावे पण काहीही झाले तरी काश्मीर देऊ नये असे मला वाटते.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

राघव's picture

25 Jul 2022 - 1:57 am | राघव

विवेचन आवडले.
अर्थात् यातील बर्‍याच मुद्द्यांना आताच्या बदललेल्या परिस्थितीत वेगळे मुद्दे येऊन भिडलेत असं वाटतं. :-)

जे उपाय वर सुनील मांडतात, ते सद्यपरिस्थितीनुसार निकामी ठरतात. अर्थात् अजूनही आतंकवाद त्रास देतोच, जरी त्याचा जोर कमी झाला असला तरिही. कदाचित काही वर्षांनी हा प्रकारही जाईल आणि आपण पाकव्याप्त काश्मिरबद्दल बोलत असू!

diggi12's picture

22 Jul 2022 - 2:35 pm | diggi12

वरती आणला