पॅरिस मधली चीनी झुंड - एक अनुभव !

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
24 May 2015 - 3:48 am
गाभा: 

सध्या मुक्काम पॅरिस मध्ये एका ४ तारांकित हाटेलात ...जिथे राहतोय तिथे परवा एक मोठ्ठी बस भरून चीनी जोडपी एकूण ४०-५० लोक आले ... निर्विकार चेहेर्याने चीनी भाषेत कलकल करत सगळे चेकीन करून आपापल्या खोल्यात गेले ...
दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट ला गेलो तर ..हे संपलेले ते संपलेले ..वैतागून जे होते ते कसे बसे थोडेसे खाऊन ऑफिस ला जातांना तिथल्या व्यवस्थापिकेला कुरकुर केली कि बाकीचे ठीक आहे पण क्रोसेंत संपू कसे शकतात ...तर ती खजील होऊन माफी मागू लागली आणि म्हणाली कि आमचे इतके मोठे हॉटेल आहे कि आम्ही नेहेमी पुरेसा साठा ठेवतो पण ह्या चीनी झुंडीने (झुंडीने हा माझा शब्द ) इतके अपरिमित खाल्ले कि आम्ही पुरे पडू शकलो नाही ... उद्या आम्ही अजून काळजी घेऊ ... आजच्या ब्रेकफास्ट चे पैसे सुद्धा परत करू ..

ह्या अनुभवावर आज सकाळी गेलो तर ती चीनी झुंड खातांना बघायला मिळाली ... दुष्काळातून आल्या सारखे तुटून पडत होते ...अर्धा तास सगळा ब्रेकफास्ट हॉल काबीज केलेला ...आम्ही ३ जण वाट बघतोय रिकामे टेबल मिळण्याची आणि तुटपुंजे गोरे कस्टमर्स भेदरल्या सारखे वावरताहेत खातांना ...

आमचा नंबर आला...आम्ही बसलो व ब्रेकफास्ट सुरु करतोय तेवढ्यात २ टेबले पलीकडल्या चीनी कुटुंबातली एक बाई आली आणि आमच्या टेबल वरचा एक एक्स्ट्रा कप बशी व ग्लास सरळ उचलून चालायला लागली ...म्हटले ..असू देत नैतरी आम्ही ३ जणच होतो ... माझ्या समोरचा माझा कलीग काही घ्यायला उठला ..तितक्यात त्याच कुटुंबातला एक चीनी पुरुष उठून पुन्हा आमच्या टेबल पाशी आला आणि त्या कलीगचा पेपर टिश्यू घेऊन जायला लागला .. काय होतंय मला क्षणभर कळेच ना ...पण मग लक्षात आल्यावर मी जवळ जवळ ओरडलोच ...कि हे काय चाललंय ..ठेवा तो टिश्यू जागे वर ..त्यावर अत्यंत मक्ख पणे त्याने तो पुन्हा ठेवला ...माझे तिरकस टोमणे ..इंग्लिश काळात नाहीये असा आव आणत पुन्हा जागेवर जाऊन बसला ...

पण केवळ मोठी झुंड आणि बहुधा कमालीचा एकोपा असलेली अशी घेऊन जगभर दादागिरी दाखवणे हे आता चीनी सामान्य माणूसही करू लागलाय कि काय अशी शंका यावी असा हा अनुभव ..

आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारले गेलेले वागण्या बोलण्याचे प्रचलित संकेत बेदरकार पणे धुडकावून लाऊन पुन्हा आपण त्या गावचेच नव्हे हे असे दाखवणे ह्याने तो हॉटेल स्टाफ सुद्धा वैतागला होता ...

हे असे जर हे सामान्य लोक्स वागत असतील तर वरिष्ठ पातळीवरचे राजकारणी मुत्सद्दी किती कोडगे आणि स्वार्थी असतील असा विचार आला ... ह्यांना कसे हाताळले पाहिजे ??

प्रतिक्रिया

श्या! काय हे! चीनी असो नाहीतर आणि कोणी पण काही न बोलता सवरता दुसर्‍याच्या टेबलावरचे काय उचलून न्यायचे!

स्पंदना's picture

24 May 2015 - 5:22 am | स्पंदना

अहो जर रस्ता ८० चा असेल तर त्यात फास्ट्लेन अम्ध्ये ४०ने मख्ख चेहरा करुन जाणारा कोण असेल तर चिनीच. रेस्टराँ मध्ये एखादी सुरेख संध्याकाळ निवांत घालवावी म्हणुन गेलं तर कलकलाटाने पळुन जावस वाटायला लावणारे चिनीच. बस मध्ये रस्त्यावर मोठमोठ्याने ओरडत सगळी शांतता भंग करणारे चिनीच. कोणताही कायदा न पाळता वागणारे आणि पकडले गेल्यास लगेच मख्ख चेहरा करत न समजल्यासारखे दाखवणारे चिनीच. घाण माणस आहेत ती.

आणि हो, सिंगापुरचे चिनी वेगळे आणी चायनातुन बाहेर पडलेले चिनी वेगळे.

अरुण मनोहर's picture

24 May 2015 - 6:08 am | अरुण मनोहर

बरेचदा इथे स्थानिक चिनी बाहेरच्या चिनी विषयी तक्रार करतांना पाहिले आहेत.

श्रीरंग_जोशी's picture

24 May 2015 - 5:49 am | श्रीरंग_जोशी

एवढे त्रासदायक उदाहरण प्रथमच ऐकतोय. अमेरिकेत बरेच चीनी लोक अमेरिकनांबरोबर भारतीयांपेक्षा अधिक जुळवून घेतल्यासारखे वाटतात. कदाचित खाण्यापिण्याबाबत भारतीयांसारखे चोखंदळ नसल्याने असावे.

इतका नाही पण आपले दक्षिण भारतीय बांधव कधी कधी झुंडीमध्ये राहून अमेरिकनांना थोडा फार वात आणताना पाहिले आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

24 May 2015 - 6:23 am | अत्रुप्त आत्मा

चीनी कम है! चीनी कम है! चीनी कम है! चीनी कम है! कम!

चिमिचांगा's picture

24 May 2015 - 6:27 am | चिमिचांगा

जरा तिखटमिठाचं प्रमाण जास्तच झाल्यासारखं वाटतय. लेखकाला मुळातच चिन्यांबद्दल तिरस्कार असावा, आणि त्यांच्या सगळ्याच वागण्यात 'झुंड', 'दादागिरी' दिसली असावी. चार्टर टूरवर आलेले प्रवासी सगळीकडे ग्रुपमध्येच फिरत असतात. त्यत झुंडशाही असली? या लोकांचा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध आलेला नसतो. चिनीशिवाय दुसरी भाषा येत नसते. पोलादी पडद्यामागे आयुष्य गेल्यामुळे पाश्चात्य जगात वागायचे संकेत माहित नसतात. म्हणून लगेच दादागिरीचा आरोप अति वाटतो. फार तर गावठी म्हणता येईल.
आपल्याला नाही बुवा चिन्यांचा वाईट अनुभव आलेला. हावरटासारखं खाणारा चिनी तर उभ्या जन्मात पाहिला नाही. अमेरिकेतला टिपिकल चिनी माणूस टिपिकल भारतीय माणसापेक्षा जरा जास्त सिव्हिल वाटतो.

अत्रन्गि पाउस's picture

24 May 2015 - 10:00 am | अत्रन्गि पाउस

मुळात घाऊक तिरस्कार कशाला असेल ? प्रवाशांचे जथे बरेच बघितलेत ...अगदी लहान मुलांचे देखील ..पण इतके आत्मकेंद्रित वागणे नै बुवा ... किंबहुना हि गावठी दादागिरीच ...

चिमिचांगा's picture

24 May 2015 - 11:52 pm | चिमिचांगा

असेल बुवा...पण अशा वागण्यामागे काही कारणं असतात, एवढंच म्ह्णायचय. Money doesn't buy class, असं म्हटलं जातं. मुदलात चांगलं वागायचं म्हणजे कसं, तेच माहित नसल्यावर काय करणार. शिकतील हळूहळू :)

काळा पहाड's picture

24 May 2015 - 3:45 pm | काळा पहाड

लेखकाला मुळातच चिन्यांबद्दल तिरस्कार असावा

तुम्ही चिमिचांगा की चिनीचांगा? :)

हाहाहा..... हे भारीच जमलय.

उद्या परत भेटली चायनीज झुंड की त्यांना "वो आए नहीं"** असं म्हणा. म्हणजे तुम्हाला त्यांच्यात घेतील ब्रेकफास्टला. ;)

**"आय लव्ह यू" ला चिनी भाषेत जे काही म्हणतात त्याचा उच्चार साधारण असा आहे.

सुधीर काळे's picture

24 May 2015 - 7:30 am | सुधीर काळे

'क्रोसेंत'चा उच्चार फ्रेंचमध्ये 'क्रॉसाँ' असा करतात असे वाटते!

अत्रन्गि पाउस's picture

24 May 2015 - 9:56 am | अत्रन्गि पाउस

ते सुद्धा क चा उच्चार ख कडे नेत ..
इथे लिहितांना ती चंद्रकोर टंकता आली नव्हती .....

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 May 2015 - 11:25 am | डॉ सुहास म्हात्रे

"चंद्रकोर" : अ‍ॅ = E आणि ऑ = O

उदा. क्रॉसाँ = krOsOM; बँक = bEMk

अत्रन्गि पाउस's picture

24 May 2015 - 11:37 am | अत्रन्गि पाउस

ओक्के ... लक्षात ठेवीन
ठ्यांक्यू

हा चिनी झुंडीचा अनुभव मीही नुकताच इटलीत घेतला.हाॅटेल प्रेक्षणीय स्थळं सर्वत्र चिनी सांडलेले होते.सगळीकडच्या हाॅटेलात चिनी ग्रुप आलेले असायचे.त्यांची अजून डोक्यात जाणारी सवय म्हणजे कुठेही लोकांना त्रास होतोय का पर्वा न करता फोटो काढणे.लिफ्टमध्ये पण!अनेक लोक सामान वर न्यायला ताटकळलेले,यांचे फोटो सुरु.ब्रेकफास्टला तंतोतंत हाच अनुभव घेतला तुमच्यासारखा.शेवटी हाॅटेलचे खाणे संपले,मागाहुन आलेल्यांना काहीच उरले नाही.तेव्हा स्क्रॅम्बल्ड एग्ज आणली गेली.त्यांच्यातली वयस्कर माणसे तर काॅफी वगैरे पण दोन तीनदा घेत.तीही दर वेळी वेगळ्या कपात!त्यामुळे नंतर आलेल्यांना पटकन कप मिळायची पण मारामार झाली होती!फक्त वेज लोक या तडाख्यातुन सुटुन ब्रेड बटर जॅम खात असत!!बाकी सलामी,अंडी आल्या आल्या झुंबड पळवुन नेत असे.त्यांच्या धसक्याने रोममध्ये आम्ही सकाळी साडेसहाला नाश्ता करत असू!!ते खाणं बघवत नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 May 2015 - 1:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मद्राशी आणि आंध्री पण असेच वागतात.

गेले तीन दिवस मी पैसाताई व लीमाऊजेटला या तेलुगु लोकांवरून चिडचिड करून वात आणलाय. नका तो विषय पुन्हा काढू! ;) एकदा निघूच दे तेलुगुंचा धागा, मग बघा काय एकेक प्रतिसाद देते ते! पंजाब्यांबद्दल तर एक शब्दही बोलण्याची इच्छा नाही.

काळा पहाड's picture

24 May 2015 - 3:56 pm | काळा पहाड

याचं खरं कारण असं आहे की ब्रेकफास्ट हा इटालियन हॉटेल्स मध्ये काँप्लिमेंटरी असतो (बहुधा युरोपात सगळीकडेच ते तसं असावं). खाण्यासाठी इटली अतिशयच छान पण महाग जागा आहे. तेव्हा हा सरळ सरळ पैसे वाचवण्याचा प्रकार असतो. बहुतांश भारतीय आणि चिनी पर्यटक हे प्राईस कॉन्शस असल्यामुळे जितकं हादडता येईल तितकं हादडतात आणि मग निदान एका जेवणाचे तरी पैसे वाचवत असावेत.

नाव आडनाव's picture

24 May 2015 - 11:13 am | नाव आडनाव

माझा एक मित्र सिंगापुरात असतानाची गोष्ट आहे - एका रेस्तोरंत मध्ये माझा मित्र आणी त्याचे दोन रूम पार्टनर गेले होते. त्यातला एक मित्र काही वेळ बाहेर गेला आणी एका चीनी तरुणी त्याची खुर्ची उचलून घेऊन जायला लागली - न विचारता. मित्र दुसऱ्याला बोलला - चायनीज पब्लिक बोहोत बदत्मीज है. पुछे बिना खुर्सी ले जा राही है लडकी. त्याला हिंदीत उत्तर आलं - मै चायनीज नही है. मै इण्डिअन है और मुझे लगा वोह चेअर ओक्कूपाइड नाही है. ती नॉर्थ इस्ट ची होती आणी भारतीयच होती :)

नाव आडनाव's picture

24 May 2015 - 3:02 pm | नाव आडनाव

रेस्तोरंत होतं की त्याच्या ऑफिस चा कॅफेटेरिया मला नक्की आठवत नाही - ऑफिस चा कॅफेटेरिया होता बहुतेक. हा किस्सा ३-४ वर्षा आधीचा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 May 2015 - 11:36 am | डॉ सुहास म्हात्रे

मलेशियात अगदी असाच अनुभव आला ! टूर कंपनीकडे त्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केल्याबद्दल तक्रार केली होती.

चिनी स्वभाव ओळखूनच असावे बहुतेक, चिनच्या सफरीत चिनी आणि परदेशी प्रवाशांची कटाक्षाने वेगळ्या हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती आणि (बहुतेक भाषेमुळेही असावी) फिरायचीही व्यवस्था स्वतंत्र होती.

मात्र प्रत्यक्ष भेटीत अगदी खेड्यातली चिनी माणसेही सभ्य आणि मैत्रीपुर्ण व्यवहार करणारी होती. चिनमधून परदेशी जाणार्‍यांत "नवश्रीमंत ब्रॅट्स"चे प्रमाण जास्त असावे बहुतेक.

नगरीनिरंजन's picture

24 May 2015 - 12:41 pm | नगरीनिरंजन

वा वा! अमेरिकन टुरिस्टांपेक्षा जास्त त्रास देणारे लोक आले वाटतं युरोपात. तसे भारतीयही काही कमी नाहीत पण आपला तो बाब्या.

प्रदीप's picture

24 May 2015 - 6:17 pm | प्रदीप

सहमत!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 May 2015 - 2:34 pm | निनाद मुक्काम प...

पंचतारांकित शेत्रात मुशाफिरी केल्याने ह्याबाबत काही अधिकारवाणीने लिहितो ,
आपले निरीक्षण योग्य आहे
आपल्या कडून केसरी व राजाराणी ज्या धर्तीवर युरोप सहली आयोजित करतात त्याच धर्तीवर चीनी लोक सहलीवर युरोपात येतात ह्या सहलीचे वैशिष्ट्ये म्हणजे पर्यटकांना अव्वाच्या सव्वा
स्वप्ने दाखवणे म्हणजे दिवसाला एक ह्या प्रमाणे १० पेश्या जास्त देश दोन आठवड्यात उरकतात आणि प्रवासाचे वाहन असते बस
आता युरोपातील रस्ते कितीही चागले असले तरीही एवढे देश एवढ्या कमी दिवसात पाहायचे तेही रेल्वे विमान ह्यापेक्ष्य बस ने म्हणजे दिवसाला ८ ते १० तास प्रवास मग एखाद्या शहरात २ तास पर्यटन म्हणजे प्रेक्षणीय स्थळे दाखविण्याच्या नावाखाली थातूर मातुर स्थळे दाखवून त्यांची बोळवण केली जाते व शेवटी
रात्री भारतीय जेवण दिले जाते दुसर्या दिवशी पहाटे५ ला उठवून ब्रेक फास्ट ला पिटाळले जाते तो पर्यंत ७ ते ८ वाजले असतात.
मग मधल्या काळात प्रवास असल्याने लंच च्या नावाखाली काय त्यंना दिले जाते मध्यल्या काळात खाण्यास वेळ मिळतो का
आणि वेळ मिळाला तर युरोपियन जेवण एशियायि जिभांना रुचत नसावे. म्हणून ब्रेकफास्ट ला शेवटची न्याहारी करून मराठ्यांचे सैन्य जसे अब्दालीच्या सैन्याला पानिपतात भिडले त्या तयारीशिनी हे चीनी ब्रेकफास्ट वर तुटून पडतात आणि मग सफरीच्या लढाईला सामोरे जातात.
भारतीय पर्यटक थोड्याफार फरकाने हेच करतात निदान भारतीय व चीनी प्रवासी पहिले कि युरोपियन लोकांच्या कपाळावर सारख्या आठ्या पडतात
एकदा किंवा दोनवेळा थाळीतून मोजके व हवे ते नेमके पदार्थ बुफे वरून घेऊन खाण्याची युरोपियन प्रथा आहे मात्र आपले आशियायी बांधव ४ ते ५ वेळा थाळ्या घेऊन अन्नाची बेसुमार नासाडी करतात संपूर्ण मेजवर अन्न सांडतात
पु ल ह्यांनी त्यांचा एका लेखात इंग्रजी शिकलो पण इंग्रजी उपहारगृहात पदार्थ कसे मागवायचे व चहा काय प्यायचा हे कुणी न शिकवल्याचे वर्णन केले होते ,तसे चीनी व भारतीय पर्यटन हे युरोपात आल्यावर युरोपियन रीतीभाती शिष्टाचार ह्यांच्याशी ची अनोळखी असल्याने असे प्रकार होतात ,
नोकरीनिमित व्यवसायानिमित नियमितपणे व त्यामुळेच युरोपात सराईतपाने वावरणाऱ्या भारतीयांचे युरोपियन हॉटेलात स्वागतच होते गेल्या दहा वर्षात अमेरिकन व जपानच्या पाठोपाठ भारतीय हे कामानिमित युरोपियन हॉटेलात दिसून येतात मात्र कधीतरी अशी प्रवासी टोळ झाड येते.
त्याला इलाज नाही
संपूर्ण दोष त्यांचा नाही
गोरे आपल्या देशात येतात तेव्हा संपूर्ण आपले रीतीरिवाज प्रथा हॉटेलात थोडीच पाळतात किंबहुना आपणच त्यांच्यासाठी युरोपियन व वेस्टन होण्याच्या प्रयत्न करतो
कधी भात बिर्याणी हाताने चोपाणारे आपण हॉटेलात मात्र चमच्याने खातो

सुनील's picture

24 May 2015 - 5:18 pm | सुनील

नेमके!

केसरीच्या युरोप टूरचा प्रत्यक्ष अनुभव नसला तरी असा अनुभव घेतलेल्या विश्वसनीय व्यक्तीकडून ऐकले आहे.

ब्रेकफास्ट हा हॉटेलात 'ऑन द हाऊस' असतो. तेव्हा सकाळी तर हादडायचेच खेरीज, ब्रेडला लावण्यासाठी ठेवलेल्या बटर-जॅमच्या छोट्या डब्या, योगर्टचे छोटे डबे, फळे इत्यादी पर्स-खिशात भरून घ्यायचे. कारण, रात्रीचे (भारतीय) भोजन जरी कंपनी हॉटेलात देणार असली तरी दुपारचे जेवण सहसा सहल खर्चात समाविष्ट नसते. त्यासाठी मॅकडॉनल्ड सारख्या 'स्वस्त' ठिकाणी बस नेली जाते. परंतु, प्रत्येक नोटेचे रुपयात रुपांतर आणि जिभेचे भारतीय वळण, ह्यामुळे तिथे खाण्यापेक्षा, बसमध्येच हा सकाळी 'ढापलेला' माल खाल्ला जातो!

शिवाय, न समजणारी भाषा जर घाऊक रितीने कानावर आली तर तो कलकलाट वाटणारच. त्यात चिनी, भारतीय असा भेद करणे निरर्थक!

शिवाय, न समजणारी भाषा जर घाऊक रितीने कानावर आली तर तो कलकलाट वाटणारच. त्यात चिनी, भारतीय असा भेद करणे निरर्थक!

नाही हो. अतिशय मोठ्या आवाजात बोलतात चायनिज. कळत तर जगातल्या ९९% भाषा नाहीत आपल्याला. पण असा वैताग कधीच येत नाही. या नंतर मेक्सिकन स्पॅनिशचा नंबर लागेल जगात. किंवा त्या आधी अमेरिकेतले काळे कसे रिगार्डलेस ऑफ अदर्स स्पेस वागतात ते येतील.

मी गेले होते ती पर्यटन कंपनी व्यवस्थित लंच पण अॅरेंज करत होती.त्यामुळे त्यांना नावं ठेवायला जागा नाही!

मी नुकतीच केसरीने प्रवास करुन आलेय.यापुर्वीही केलाय.असा प्रकार अनुभवलेला नाही.जेवणाची अगदी व्यवस्थित सोय होती तीन वेळा.मधल्या वेळात खायला खाऊची पॅकेट्सही असायची.जेवणाची सोयही उत्तम हाॅटेलात असे.आणि सुदैवाने असे बटर जॅम पळवणारे पर्यटकही नव्हते सोबत!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 May 2015 - 7:20 pm | निनाद मुक्काम प...

पण एका गोष्टीत दुमत नाही कि चीनी माणसे जेवढ्या सराईतपणानं उपहारगृहाचा ताबा घेतात कि जणू ते तिबेट आहे:
आणि बुफे ला ते तैवान समजतात: त्या मानाने आपले भारतीय मवाळ असतात; मुळात ग्रुप ने पर्यटन करणे युरोपात युरोपियन लोकांना नवीन असल्याने त्यांना ते अजब वाटते मात्र गोरे भारतात जेव्हा पंचतारांकित हॉटेलात ग्रुप सह उतरतात ; तेव्हा येथील भारतीय बुफे व वेगळा साज पाहून बुजतात

अजयाजी
एकाच देशात एवढे दिवस असणारी टूर बहुदा वीणाज वल्ड ची असावी त्यांनी युरोपच्या चाळीस वेगवेगळ्या टूर चे पर्याय दिल्याचे ऐकून आहे:
मी अश्या लोकप्रिय टूर संबंधी सांगत होतो:
सगळ्यात मस्त नि स्वस्त उपाय म्हणजे पेठकर काकांचा
त्याचे वर्णन मी असे करेन:
त्यांनी स्वतःची युरोप टूर स्वतः आयोजित केली ; त्यानुसार त्यांनी हॉटेल व प्रवासाचे बुकिंग करून घेतले ::
मग काका व काकू एकटेच युरोप सहलीवर निघाले ;
आपणच आपल्या वेळेचे शिल्पकार व नियोजक असल्याने म्युनिक मध्ये अडीच दिवस होते ;
मनसोक्त भटकंती झाली :
ज्यू लोकांच्या केंप ला संध्याकाळी उशिरा पोहोचलो तर शेवटच्या दोन तासात तो पूर्ण पाहून झाला नाही तर काका दुसर्या दिवशी संपूर्ण दिवस जाऊन आले:
आपली टूर आपणच नियोजित केल्याचा फायदा झाला
काय आणि कितीवेळ पहायचे ते आपल्याला ठरवता येते:

मी गेले ती केसरीची फक्त इटलीची टूर होती.पुढच्या वर्षी अशी तुम्ही म्हणता तशी युकेची ट्रिप करायचा विचार आहे.

प्रभाकर पेठकर's picture

28 May 2015 - 2:24 am | प्रभाकर पेठकर

होय निनाद,
पहिल्यांदा एकट्यानेच मित्राबरोबर आणि नंतर काकूंबरोबर असा दोन वेळा लंडन, पॅरीस, स्वित्झरलंड, जर्मनी, इटली असा रस्त्याने तसेच रेल्वेने प्रवास करून दोन 'शो केस टूर्स' केल्या. आता एकावेळी एक किंवा दोन देश निवांत पाहायचे असा विचार आहे.
कॉन्संटेशन कँपच्या भेटीच्या आठवणी अविस्मरणीय आहेत.

माझा निरिक्षणांनुसार, भारतियांइतकेच (किंबहुना त्याहून जास्त), बटर, चीझ, क्रोसों, फ्रूट्स इ.इ.इ. वस्तुचीं ढापाढापी गोरे लोकं करतात. सकाळी हॉटेलात नाश्त्याच्या वेळी स्वत: तिथेच पोटभर खातात, जाताना वरील चीजवस्तू पर्समध्ये भरून घेतात आणि कांही प्रसंगी रुम मध्ये कोणी आजारी आहे असे सांगून प्लेट भरून रुमवरही घेऊन जातात. ह्याना सततची होणारी सर्दी आणि चार लोकात रुमालात नाक शिंकरणं ह्याचा अनुभव तर युरोपात अनेकदा घेतला आहे. स्विट्झरलंडला ग्लेसियर एक्स्प्रेस मधे माझ्या मोबाईल वरील गाण्यांच्या आवाजाच्या पातळीला आक्षेप घेऊन आवाज कमी करायला लावलेल्या एका कुटुंबाने त्यांच्या सोबतच्या कुटुंबाशी मोठ्या आवाजात हास्यविनोद चालू ठेवले होते की मला आणि काकूंना आपापसातील संवादही ऐकू येईनात. त्यांना तसे सांगावे असा विचार मनांत आला होता पण काकूंनी मला मना केल्यामुळे राग गिळून गप्प बसावे लागले.

प्रदीप's picture

24 May 2015 - 7:41 pm | प्रदीप

गेल्या नऊदह्हा वर्षांपासून बरीचशी चिनी जनता सहलीसाठी म्हणून परदेशांत जावयास लागली. सुरूवातीस अगदी अतिश्रीमंत माणसेच अशी परदेशांत सहलींसाठी जात. हळूहळू ते लोण पसरत, छोट्यामोठ्या शहरांतल्या मध्यमवर्गीयांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. अशा परदेशांत सहलींसाठी जाणार्‍या चिन्यांचे सर्वसाधारण दोन वर्ग पडतात--पहिला, जे स्वतः वैयक्तिकरीत्या स्वतःची सहल आयोजित करतात, त्या श्रीमंताचा. दुसरा, ह्या छोट्यामोठ्या शहरांतील अगदी कनिष्ट मध्यमवर्गीयांचा. हे दुसर्‍या वर्गांतील लोक टूर पॅकेजेसमधून झुंडीने फिरतात. अनेकदा ह्या टूर्स अगदी स्वस्तात आयोजित केलेल्या असतात. त्या अगदी कमी किंमतीत, ह्या टूर्समध्ये चार- पाच दिवसात अनेक शहरे, प्रेक्षणीय ठिकाणे, विवीध मनोरंजनाची स्थळे (उदा. अ‍ॅम्युझमेंट पार्कस) अशा अनेकानेक गोष्टींचा भरणा केलेला असतो. निनाद ह्यांनी लिहील्याप्रमाणे मग अशा खचाखच प्रवासाच्या दरम्यान जेवायखायसाठी व्यवस्थित तजवीज केली असतेच असे नाही. त्यातून युरोपिय-- किंबहुना चिनी धाटणीचे नसलेले-- खाणे हे चिनी जिभेच्या वळणात नसल्याने, मग ही माणसे सकाळच्या ब्रेकफास्टमधे जे काही मिळेल व त्यांना सहज खाता येईल, अशावर संपूर्ण दिवस काढतात. त्यांच्या बकाबक व भरपूर ब्रेकफास्टमागचे कारण हे आहे.

ह्या टोळधाडीसारखी, अधाशासारखी ब्रेकफास्टवर तुटून पडणार्‍या माणसांनी पॅकेजचे पैसे दिलेले असतात. त्यामुळे त्यांना रूमचे डेली रेट्स, 'त्यात ब्रेकफास्ट फ्री', वगैरे बाबी गैरलागू आहेत.

आता वास्तविक ह्या अशा चिनी टूर्स गेली दोनतीन वर्षेतरी निघत आहेत. तेव्हा युरोपातील संबंधित हॉटेलांना हा अनुभव नवा नक्कीच नसावा. त्याला सामोरे जायची त्यांनी काय तयारी केली होती, हा इथे प्रश्न उपस्थित व्हावा. युरोप व अमेरिकेतील अगदी, महागडी-- तथाकथित तीन- चार स्टार हॉटेलांच्या तत्परतेचा, कार्यक्षमतेचा माझा स्वतःचा अनुभव तरी चांगला नाही. काही वर्षांपूर्वी अ‍ॅम्स्टरडॅम येथील अशा एका हॉटेलांत लॉंड्री परत मिळण्यास तीन दिवस लागतील असे सांगण्यात आले. कारण म्हणे शहरांत असलेल्या कन्व्हेशन व एक्झिबिशन सेंटरात एक मोठे प्रदर्शन चालू होते. मी तिथे ह्याच प्रदर्शनाच्या निमीत्ताने गेलेलो होतो. आणी ते तर आमच्या उद्योगाचे, युरोपातील वार्षिक प्रदर्शन होते, जे दर वर्षी त्याच शहरात, त्याच महिन्यात गेली कित्येक वर्षे भरते. अमेरिकेतील जवळजवळ सगळ्याच सेवा अत्यंत उदासिन, टुकार वाटल्या. हॉटेलाच्या संदर्भातच सांगायचे झाले तर लास व्हेगास येथील एका तथाकथित तीन- चार स्टारवाल्या हॉटेलात, सकाळी ब्रेकफास्ट रूमवर मागवण्यासाठी केलेल्या फोनवर, फोन उचलल्या उचलल्या सांगण्यात आले, की ब्रेकफास्ट मागवल्यास तो पोहोचवण्यास ९० मिनीटे लागतील! पुन्हा परिस्थिती तीच- शहरातील भव्यदिव्य अशा एक्झिबिशन व कन्वेशन सेंटरात एक मोठे प्रदर्शन. हे आमच्याच इंडस्ट्रीचे, दरवर्षी अमेरिकेतील मार्केटासाठी, त्याच महिन्या भरणारे प्रदर्शन. म्हणजे अगदी रूटीन घटना!

तेव्ह लेखकाला आलेल्या त्य पंचतारांकीत युरोपीय हॉटेलांतील अनुभवांच्या संदर्भात, दोष त्या टोळधाडी चिन्यांचा आहे, की त्या युरोपीय हॉटेलांच्या मिसमॅनेजमेंट्सचा?

इतर काही, पुढे वेगळ्या प्रतिसादात.

अत्रन्गि पाउस's picture

24 May 2015 - 8:48 pm | अत्रन्गि पाउस

पण कुठल्याही टेबलवरचे काहीही उचलायचे कसेही वागायचे ह्याला काय म्हणावे ??

आजानुकर्ण's picture

25 May 2015 - 6:43 pm | आजानुकर्ण

तेव्ह लेखकाला आलेल्या त्य पंचतारांकीत युरोपीय हॉटेलांतील अनुभवांच्या संदर्भात, दोष त्या टोळधाडी चिन्यांचा आहे, की त्या युरोपीय हॉटेलांच्या मिसमॅनेजमेंट्सचा?

प्रथमदर्शनी हॉटेलच्या मॅनेजमेंटचाच दोष वाटतोय. अचानक ४०-५० मंडळी एकाचवेळी नाष्ट्याला आल्यामुळे हॉटेलचा गोंधळ उडालेला दिसतोय. चीनी झुंडीचा त्यात दोष नाही. चीनी प्रवाशांचे पैशे हवेत मात्र त्यांनी पोटभर खाल्ले तर हॉटेलवाल्यांच्या पोटात दुखते काय? पुत्रकलत्राच्या लेंढारासकट धाड घालणाऱ्या गुज्जु किंवा उत्तर भारतीय मंडळींपेक्षा चीनी प्रवाशांचा अनुभव चांगलाच आलाय. उदा. मोफत मद्यपान असणाऱ्या विमानप्रवासात एखादा उत्तरभारतीय शेजारी आल्यावर अत्यंत अविस्मरणीय अनुभव येतो. कदाचित यांनाच उद्देशून परिधानमंत्र्यांनी भारताची लाज वाटते वगैरे वक्तव्य केले असावे अशी पुसटशी शंका येते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 May 2015 - 7:18 pm | निनाद मुक्काम प...

प्रदीप ह्यांच्या पंच किंवा चारांकित हॉटेल च्या अकार्यक्षमतेवर शेरा मारलेला खटकला नाही ,
त्यात सत्यता आहे.
पुढच्यास ठेस मागचा शहाणा ह्या न्यायानुसार काही हॉटेल हे टूर वाल्यांना न्याहारी साठी सगळ्यात आधी सकाळी साडे सहा ला बोलावतात मग चीनी व इतर देशाच्या नागरिकांच्या कडून उपहार गृह बुफे वर हल्ला चढवला जातो मात्र किचन मध्ये पुरेसा शिधा आधीच करून ठेवल्याने वेळ निभावून नेली जाते पुढे साडे सात च्या सुमारास परत नव्याने उपहार गृह सजवून काही वेळा पूर्वी झालेल्या टोळ झाडीची पूर्वकल्पना नवीन पर्यटकास येत नाही.
आणि युरोप म्हणजे सारेच आलबेल व चोख व्यवस्था असेही नसते
पुष्कळदा स्पर्धा व इतर कारणाने टूर कंपन्यांना ६० युरो ची रूम २५ युरोला विकली जाते कारण एकाच रात्रीत रूमचे भाडे रिकामे जाण्या पेक्ष्या ३० ते ४० रूम विकल्या जातात म्हणून अश्या स्वस्तात त्या उपलब्ध करून दिल्या जातात अश्यावेळी
ग्राहकांच्या कडे कधी कधी हॉटेल चे दुर्लक्ष होऊ शकते कारण त्यांच्या लेखी टूर कंपनी महत्त्वाची
हॉटेल ने भले अप्रतिम सेवा दिली मात्र पुढच्या वेळी बाजूच्या हॉटेल ने थोड्या कमी पैश्यातच रूम देण्याची तयारी दाखवली तर
टूर कंपनी तेथे आपला रोख करते
रूम विकणे हे पंचतारांकित हॉटेल यशस्वी करायचे असे तर उत्तमरीत्या आले पाहिजे.
भारतात राजस्थान व अनेक राज्यात जेथे पर्यटन उद्योग जोरात आहेत पण छोट्या बजेट हॉटेल ची तेथे कमतरता आहे असे माझे निरीक्षण आहे , ईबीस सारख्या हॉटेलची चेन्स भारतात अनेक अनवट पर्यटन स्थळी आल्यात तर पर्यटनास खरी चालना मिळेल.

सभ्य माणुस's picture

24 May 2015 - 7:48 pm | सभ्य माणुस

काळजी करू नका. आपले मानणीय मोदी साहेब गेलेत तिकडे. atleast chines लोक्स आपल्याबरोबर तरी तसे परत वागायचे नाहीत.

बाकी काही नाही. नमो भक्त आम्ही.. नमो नमो...
कोणत्याही गोष्टीत आम्ही स्तुतीच करतो नमोजींची....!

रॉजरमूर's picture

24 May 2015 - 8:01 pm | रॉजरमूर

आपण ज्या चिनी टोळधाडी बद्दल बोलत आहात .

कदाचित तुम्ही ह्यांना तर नाही ना भेटले ?

चिनी टोळधाड

हेच असतील तर मग कमाल आहे .

मधुरा देशपांडे's picture

24 May 2015 - 8:13 pm | मधुरा देशपांडे

चिन्यांचा असा काही ना काही अनुभव प्रत्येक ठिकाणी येतोच. लिहिण्यासारखे खूप काही आहे तुर्तात पुर्वी लिहिलेल्या एका लेखातुन चोप्य पस्ते.
"केवळ इथेच नाही, तर आजवरच्या अनेक सहलींमध्ये यांची काही खास वैशिष्ट्ये दिसतातच. एक असे की यांच्याकडे निकॉन किंवा कॅननचा किमान डीएसएलआर कॅमेरा असतोच असतो. त्याच्या शिवाय मग कितीही अत्याधुनिक आयुधे असू शकतात. यांची झुंबड आली की आपण कुठलेही फोटो काढणे शक्य होत नाही. यांना कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर कधी एकदा मी फोटो काढतोय अशी सदैवे घाई असते. ही घाई रोपवेत चढताना, ट्रेनमध्ये चढताना, उतरताना सदासर्वकाळ. बरं मग जाउन तिथे काय आहे वगैरे बघणे हे फार महत्वाचे वाटत नाही बहुधा. मी इथे आलो होतो म्हणत आल्या आल्या दोन चार फोटोंचा क्लिकक्लिकाट, आधी कॅमेर्याने, मग नंतर आयपॅड किंवा टॅबने, मग मोबाईलने, आधी एकट्याचा, मग ग्रुपचा वगैरे वगैरे फोटो सत्र आल्यापासून सुरु होते. आजकाल गेल्या काही दिवसांपासून सेल्फी स्टिक हे उपकरण यात आले आहे. त्यामुळे काही सेल्फीज होतात. पण मग फोटो झाले की लगेच हे सगळे पुढच्या ठिकाणी जायला निघतात. त्यामुळे वेळ जो काय घेतात तो फोटोंचाच."

शिस्तीत सगळे जण रांगेत उभे असतील तर हे लोक हमखास ते न बघता पुढे येतात, रोपवेत जिथे प्रचंड गर्दी असते तिथेही यांना काचेपाशी उभे राहुन जर फोटोज काढायचे असतील तर ते एका टोकापासुन दुसर्‍या टोकापर्यंत लोकांना धक्के देत येतात.

बरेचसे भारतीय देखील भारताबाहेर ज्या प्रकारे वागतात तेही खटकतेच. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांना रेलुन उभे राहणे आणि तेही अशा पद्धतीने की यांची पर्स, कॅमेरे आपल्या मित्राची गाडी असल्याप्रमाणे त्यावर बिन्धास्त ठेवुन, मग त्या लोकांनी आरडाओरड केली की उलट बोलायचे. पादचार्‍यांना प्रायॉरिटी असते म्हणुन कुठल्याही रस्त्यावर बागेत फिरल्यासारखे फिरायचे. अजुन बरेच आहे.

प्रदीप's picture

24 May 2015 - 8:39 pm | प्रदीप

वर नमूद केल्याप्रमाणे दुय्यम- तिय्यम दर्जांच्या शहरांतील माणसे परदेशवारी करू लागतात, तेव्हा ती कशी वागतात? आपल्याकडील सातारा- सांगली- इस्लामपूर* येथील फटफट्या उडवणारी माणसे तशी करू लागली, तर ती तेथे कशी वागतील?

त्यांचेही जाऊंदेत. अगदी उच्च्मधमयवर्गीय भारतीय माणसे परदेशात सार्वजनिक ठिकाणी कशी वागतात? ह्याची अनेक लाजिरवाणी उदाहरणे देता येतील. तूर्तास वानगीदाखल तीन- चार देतो. त्यतील पहिली दोन मी प्रत्यक्ष पाहिलेली. दुसरी दोन एका मित्राने त्याच्य युरोपदौर्‍यात अनुभवलेली.

उदा. पहिले. स्थळ, आमच्या शहरातील केबल कारचे एका टोकाचे स्टेशन. तिकीट खिडक्या व केबल कारमधे चढण्याच्या प्लॅटफॉर्मच्या मध्ये तिकीटे स्वाईप करून पुढे जाण्यासाठी टर्न्स्स्टाईल्स. त्याच्या बाहेर मेटल फ्रेमचे, झिगझॅग लाईन करण्यासाठी केलेले बॅरीकेड. लाईन बरीच आहे, पण ती पुढेही वेगाने सरकते आहे. तिथे लाईनमधे उभे रहाण्याची साधारण वेळ, सुमारे सात मिनीटे असावी. ह्या लाईनव्यवस्थेच्या बाजूस एक रूंद मोकळी जागा सोडलेली. तिच्या दुसर्‍या, म्हणजे प्लॅटफॉर्मच्या टोकापाशी एक रूंद टर्नस्टाईल. ह्याच्या बाजूस, चारपाच माणसे बसू शकतील इतका मोठा बाक. ही विशेष व्यवस्था म्हातार्‍या व अपंगांसाठी.

ह्या बाकावर पेहरावावरून, आपापसातील (इंग्लिशमधून) बोलण्यावरून उच्च मध्यमवर्गीय वाटणारी चार पाच मुलेमुली. त्यांच्या समोर त्यांच्याशी गप्पा छाटत उभी असलेली अजून दोन चार मुलेमुली. म्हणजे एकंदरीत आठ- नऊ तरूणांचे ते टोळके. ह्यांचे एक दोन 'रिप्रेझेंटिव्हस' त्यांनी लाईनीत उभे केलेत.आणि त्यांच्या त्या वृद्ध व अपंगांसाठी असलेल्या टर्न्स्स्टाईलच्या पलिकडे उभ्या असलेल्या स्टाफला 'पटवण्याचा' कार्यक्रम सुरू आहे. 'आमची माणसे तिथे लाईनीत उभी आहेत, ती त्यांच्या टर्स्नस्टाईलकडे पोहोचली, की आमची तिकीटेही ती तिथे आमच्यातर्फे स्वाईप करतील, तेव्हा तुम्ही आम्हाला येथून आत सोडा, अशी विनवणी सुरू. आतील माणसांना भाषेच्या घोळामुळे हे नक्की काय आहे, हे समजत नाही, आणि ती नुसतीच माना डोलावतात. मग जेव्हा ह्यांच्या रिप्रेझेंटेटीव्ह्स्ची आत जाण्याची वेळ येते,तेव्हा त्यांना त्यांचे स्वतःचे प्रत्येकी एकच तिकीट स्वाईप करून आता प्रवेश करू दिले जाते. ह्या बाहेरील तरूणांच्या जथ्यास काही आतील माणसे तेथील रूंद टर्न्स्टाईल उघडून देत नाहीत. मग, आरडाओरडा करत, लाईनीतील शांत उभे असलेल्या इतर सर्व प्रवाश्यांना धक्के देत, त्या मेटल फ्रेम्समधून इकडून, तिकडे जात, हे जथेदार त्या मुख्य टर्स्नस्टाईलकडे पोहोचतात, व इतर स्वतःची तिकीटे स्वाईप करूनच पलिकडे, प्लॅटफॉर्मवर जातात. ही सर्व मंडळी तरूण होती इतकेच नव्हे, ती सर्वच भरदार शरीरययष्टीची अगदी धडधाकट दिसणारी होती.

उदा. दुसरे. स्थळ, आमच्या शहरातील त्याच केबल कारच्या दुसर्‍य टोकाचे स्टेशन. तशीच संरचना, तशीच परिस्थिती. इथे 'बाहेर' उभा एक मध्यमवयीन पोट पुढे आलेला सरदार गृहस्थ. त्याची पत्नि आत लाईनीत स्वतः व त्याच्यासाठी उभी आहे.ती कुठपर्यंत पोहोचली, हे पहाण्यासाठी सरदार अधूनमधून तेथील बाकावर उभा रहातो. इथे तोच वर वर्णन केलेला तमाशा, फक्त इथे अजून एक बाब म्हणजे, सरदारने स्वतःचे तिकीट काढले नसावे, अशी मला वाटलेली शक्यता. कारण नंतर त्याची पत्नी टर्स्नटाईल पार करून प्लॅटफॉर्मवर जाऊन त्याची वाट पहात उभी. आणि सरदारांची वरात उलट्या दिशेने तिकीट खिडकीपर्यंत गेलेली पाहिली!

प्रसंग तीन: स्वित्झर्लंडमधील एक बर्फाने वेष्ठिलेली गुहा-- आपल्या परिने एक प्रेक्षणीय ठिकाण. इथे म्हणे काही वर्षांपूर्वी एका हिंदी चित्रपटातील प्रसंगाचे/ गाण्याचे चित्रीकरण झालेले होते. त्यामुळे तिथे अनेक भारतीय पर्यटक. त्यातून त्या चित्रीकरणाच्या तेथील प्रसंगाचे फोटो तिथे पर्यटकांसाठी लावलेले.

गुहा मोठी. आवाज घुमतोय, त्याचा फायदा घेऊन एक उत्तर भारतीय पर्यटक मोठमोठ्याने 'पर्बतों से आज मै टकरा गया..' हे गीत गावयास लागतो. आजूबाजूस अनेक देशांचे टूरीस्ट्स आहेत, ते दचकतात. तेथील कार्यकर्ता त्या गृहस्थास संयत आवाजात शांत रहाण्याची विनवणी करतो, आपल्याप्रपाणे इतरांनाही आनंद उपभोगू द्या, असे सांगतो. उ. भा. प. काही क्षण ते मानतो. नंतर पुन्हा ते तितक्याच मोठ्याने म्हणण्यास सुरू करतो. कार्यकर्ता थोडा जास्त करारीपणाने त्यास गप्प रहाण्ञास सांगतो. उ. भा. प. काही वेळ शांत. नंतर पुन्हा त्याचे तेच सुरू. आता मात्र कार्यकर्त्याचा तोल सुटतो- 'गप्प बस रे, ब्लडी इंडियन. आता तुला बाहेर फेकावे लागेल' तो ओरडतो.

ह्याच स्वित्झर्लंडमधील एका तीन- स्टार होटेलच्या बाल्कनींतून भारतीय साड्या धुवून वाळत घातलेल्या ह्या मित्राने पाहिल्या.आपल्याकडे जशा गुजराती महिला साड्या उभ्या वाळत घालतात, ज्यामुळे त्या त्यांच्या खालील मजल्याच्या बाल्कनीसमोर लटकत असतात, तेच दृष्य इथेही होते.

(* इथे सातारा- सांगली- इस्लामपूर येथील माणसांचा उपमर्द करण्याचा हेतू नाही. अगदी अनो़ळखी परिस्थिती, कधीही न पाहिलेल्या गोष्टी -- एस्केलेटर्स इत्यादी---, अगदी विमानप्रवासही पहिलावहिलाच... ही अशा व्यक्तिंची वस्थुस्थिती असू शकते, इतकेच म्हणायचे आहे).

संकोचाने हा मुद्दा मी लिहिला नाही पण ह्या चीनी स्त्रियांनी त्यांची अंतर्वस्त्रे बाल्कन्यानवर वाळत घातली होती ... बर्यापैकी वारा असल्याने ...त्यातले एखादे काही उडून आपल्या बाल्कनीत आले तर काय अनवस्था प्रसंग ...ह्या विचाराने आमचे कलीग अस्वस्थ झाले होते ..

टवाळ कार्टा's picture

25 May 2015 - 11:56 am | टवाळ कार्टा

आले तर आले...कैची ने कापून द्यायचे ;)

बॅटमॅन's picture

25 May 2015 - 7:45 am | बॅटमॅन

(* इथे सातारा- सांगली- इस्लामपूर येथील माणसांचा उपमर्द करण्याचा हेतू नाही. अगदी अनो़ळखी परिस्थिती, कधीही न पाहिलेल्या गोष्टी -- एस्केलेटर्स इत्यादी---, अगदी विमानप्रवासही पहिलावहिलाच... ही अशा व्यक्तिंची वस्थुस्थिती असू शकते, इतकेच म्हणायचे आहे).

ठीक आहे, पण हे फटफट्या उडवणारे लोक आ़जमितीस तरी वरील शहरांपेक्षा पुण्यात खूप जास्त आहेत. तस्मात प्लेसहोल्डर म्हणूनही उल्लेख अंमळ खटकला. असो. चालायचंच.

कपिलमुनी's picture

25 May 2015 - 1:26 pm | कपिलमुनी

पुण्याच्या गुंठामंत्र्यांपेक्षा हज्जार पटीने चांगली आहेत तिथली फटफट्या उडवणारी माणसे !

एकदा कट्ट्याला या ! या गुंठामंत्र्यांच्या सिंगापूर - थायलंड ट्रीपचे किस्से सांगतो !

टवाळ कार्टा's picture

25 May 2015 - 1:44 pm | टवाळ कार्टा

मागच्या कट्ट्याला यातले काहिही बाहेर आले नाही...अगदी खाण्याच्या ठिकाणी योग्य ती वातावरण निर्मिती झालेली असतानाही (म्हणजे कोणीतरी लोकल सफेदी की चमकार वाले कपडे घातलेला व त्याच्या मागोमाग आलेली २०-२५ रिकामडोक्याची टाळकी)

कपिलमुनी's picture

25 May 2015 - 2:17 pm | कपिलमुनी

त्यांनी ऐकल असता तर तुला अँब्युलन्सने पाठवायची सोय झाली असती :)

काळा पहाड's picture

25 May 2015 - 1:59 pm | काळा पहाड

इथेच सांगा की.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 May 2015 - 7:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

येत्या कट्ट्याला नक्की.

प्रदीप's picture

24 May 2015 - 9:06 pm | प्रदीप

आता आपल्या देशाबाहेर पडू लागलेले श्रीमंत चिनी पर्यटक nou-veau riche -म्हणजे नवश्रीमंत आहेत. एकदम नव्याने दिसलेली संपती, व तीजबरोबर येणारा उर्मटपणा त्यांच्याकडे भरपूर आहे. तसेच अचानक पैसा हाती आला तरी त्यामुळे काही शिस्त, संस्कार, civilised behaviour त्यांजकडे नसल्याने परदेशातील त्यांचे वागणे अतिशय तर्‍हेवाईक व असंस्कृत असते. चांगल्या रेस्टॉरंटमधे असभ्यपणे वागणे, सार्वजनिक सुविधांचा गैरवापर करणे (उदा. टॉयलेट सीटच्यावर बुटाचे पाय घेऊन बसणे)असल्या अनेक गोष्टी त्यांच्याकडून होत असतात.

दुय्यम- तिय्यम दर्ज्याच्या लोकांकडून कुठेही घुसणे, रस्त्यात व इतरस्त्र पचकन थुंकणे, ठिकठिकाणी चित्रविचीत्र पोझेस घेत (फोटो ज्यांचा घ्यायचाय त्याच्या तसेच फोटो काढणार्‍याच्याही!) फोटो घेत रहाणे, वाहतूकीचे नियम न पाळणे, वगैरे अनेक गोष्टी ते करत असतात.

चिन्यांच्या ह्या गेल्या काही वर्षात मोठ्या संख्येने सुरू झालेल्या परदेशवारींमुळे त्यांच्या ह्या लीला आता जगाच्या डोळ्यात खुपू लागल्या आहेत. त्यामुळे आपल्यावर जाहीर टीका होते आहे, हे आता चिनी सरकार व शिकल्या सवरलेल्या आम जनतेसही उमजू लागले आहे. चिन्यांचा एक अत्यंत कौस्तुकास्पद स्वभावविषेष, स्वतःच्या समाजाविषयीचा, स्वतःच्या देशाविषयीचा अभिमान होय. ह्या जाहीर बदनामीमुळे तोच डिवचला जात असल्याने, तेथील सरकारने जनतेस परदेशात कसा वावर करावा, एटिकेट्स कसे पाळावेत ह्यांजविषयी माहिती देणारी मोहीमच हाती घेतली आहे. तिचा परिंणाम दिसू लागण्यास अवधी लागेल. त्याचप्रमाणे, देशाबाहेर अतिशय वाईट वर्तणूक करणार्‍या व्यक्तिंना परतल्यावर विषेश समज देण्यात येते, व काही काळासाठी त्यांना कुठल्याही प्रवास करण्यास बंदी केली जाते.

ह्याचबरोबर, सोशल मीडिया वापरणारी तेथील सुशिक्षीत जनता ह्याविषयी बरीच जागृतपणे स्वतःहूनच कार्यरत झालेली आहे, असे दिसून येते. दोनतीन वर्षांपूर्वी, एका शाळकरी मुलाने इजिप्तमधील एका जुन्या अवशेषांवर आपले नाव कोरले होते. त्याचा इतका गवगवा झाला, की शेवटी ह्या चिनी सोशल मीडिया वापरणार्‍या सुशिक्षीत जनतेने, त्या मुलाचा ठावठिकाणा स्वतःहूनच शोधून काढून तो तिथे प्रसिद्ध केला. त्यानंतर सदर मुलाने व त्याच्या पालकांनी समाजाची व देशाची जाहीर माफी मागितली. ह्यावरून तो मुलगा शिकला असेलच, पण इतरही धडा घेतील.

आपल्या सोशल मीडिया वापरणार्‍या जनतेत, आपल्याच पर्यटकांच्या परदेशातील गैरवर्तणूकीविषयी काय चर्चा होते, हे माहिती करून घेणे आवडेल.

नगरीनिरंजन's picture

25 May 2015 - 4:02 am | नगरीनिरंजन

रांगेत उभे राहणे हा उत्तर भारतीयांना अपमान वाटतो असे वाटते. इथेही आले की सतत रांग तोडून पुढे घुसायचा प्रयत्न असतो. किंबहुना रांग लागलेली आहे ते त्यांना दिसतच नाही.

खटपट्या's picture

25 May 2015 - 8:15 am | खटपट्या

अगदी मान्य. आणि रांगेत उभे राहील्यावर अंगाला खेटायची काहीही गरज नसताना लोकल ट्रेनमधे उभे राहील्यासारखे उभे राहतात. लय राग येतो अश्या लोकांचा. आणि आपण जर मधे थोडी जागा सोडून उभे राहीलो तर मधेच येउन उभे राहणारे महाभागही आहेत.

दुसर्याच्या त्तेबला वरील वस्तू उचलणे चुकीचेच आहे पण बाकीचे मुद्दे बघितले कि सरसाकटीकरण करून चीनी लोकांना झोडपले आहे असे वाटत आहे .
चीनी लोक दुश्मन आहेत भारतीयांचे पण उगाच झोडपणे बरे नव्हे ( हलकेच घ्या )
वरील कुठल्यातरी प्रतिसादामध्ये हॉटेल ची पण चूक असेल त्यांना अनुभव नसेल हा तो मुद्दा मांडला आहे तो जास्त बरोबर वाटतो

सर्वसामान्य's picture

25 May 2015 - 7:37 am | सर्वसामान्य

असाच अजुन एक त्रास आहे तो मत्स्यालयतल्या प्रत्येक माशाबरोबर आपला फोटो आलाच पहिजे अश्या लोकांचा. यात चिन्यांबरोबर भारतीय पण आले.

राही's picture

25 May 2015 - 12:58 pm | राही

बहुतेक सर्व आशियायी देशांचे नागरिक बाहेर शिस्तीत वागतात, अगदी पाकिस्तानीसुद्धा ; अपवाद फक्त भारत, चीन, बांगलादेश आणि थोडाफार कोरियन लोकांचा असे आमच्या मर्यादित परदेश प्रवासात जाणवले. भारतीय लोक तर विमानात चढतानाच्या क्षणापासूनच बेशिस्त वर्तन सुरू करतात. खरे तर आसनक्रमांक पुकारले जात असताना त्याप्रमाणे रांगेत पुढे सरकले तर सगळ्यांचा त्रास वाचतो. पण नाही. त्यात मोठमोठ्याने बोलणे. त्यामुळे कोणते क्रमांक पुकारले जात आहेत तेही ऐकू येत नाही. विमानात भारतीय अधिक प्रमाणात असले तर रेस्ट-रूमची अवस्था भयानक असते. जेवण झाल्यावर उरलेले अन्न आणि ट्रे कर्मचारी येण्याची वाट न बघता खुर्चीखाली दडपलेले मी पाहिले आहे. तसेच हॉटेल्समध्ये जेवण वाढून घेताना प्रचंड घाई, गडबड, सांडलवंड असते. कित्येक लोक जेवण ठेवलेल्या ठिकाणीच उभ्या उभ्या खायला सुरुवात करतात कारण टेबलावर बसले तर अन्न पुन्हा आणण्यासाठी काऊंटरपर्यंत चालावे लागते म्हणून. अन्नाच्या प्रत्येक प्रकाराशेजारी एका छोट्या प्लेटमध्ये तो पदार्थ वाढून घेण्यासाठी योग्य चमचा/चिमटा ठेवलेला असतो. पण कित्येक लोक एका पदार्थाचा चमचा दुसर्‍या पदार्थाला वापरतात. मग कधी कधी चमचे प्लेटमध्ये न राहाता एकाच भांड्यात दोन दोन होतात. एकदा तर प्लेटमध्ये चमचा न दिसल्याने त्या प्लेटनेच भाताचा एक प्रकार उपसून घेतलेला आणि प्लेट भांड्यात तशीच ठेवलेली पाहिली आहे. हॉटेलमध्ये दूधभुकटी-चहा-साखरेच्याया पुड्या, साबण, शाम्पू, क्लेन्सिंग मिल्क, टिश्यूज़, अगदी टॉय्लेट-रोल्स सुद्धा पळवतात. ह्या रोल्सचा आपणा भारतीयांना काय उपयोग, तर म्हणे पाणी वापरल्यानंतर हात कोरडे करायला उपयोगी पडतात! आणि यावर एका मारवाडी गृहस्थांचे लॉजिक असे की आपण इतके पैसे देतो तर त्याच्यात हे सर्व समाविष्टच असते. हॉटेल सोडताना खोलीची दैना झालेली असते. बाथरूममध्ये, वॉश-बेसिनवर पाणी पसरलेले, शॉवरच्या खोलीतून पाण्याचे लोट बाहेर येत असलेले, वगैरे. ओले बाथ टॉवल्स बेडवर पसरलेले तर नेहमीचेच. आणि कोणीही चादरी, ब्लँकेट्स वगैरे घडी करून ठेवीत नाही. खरे तर हे आपल्याच फायद्याचे, कारण फोन घड्याळ अशी एखादी वस्तू अंथरुणात राहिली तर तिथेच लक्षात येते. पण वृत्ती अशी की हे काम तर स्टाफचे. त्यांना त्यासाठी पगार मिळतो, ते आपण कशाला करायचे? कितीतरी किस्से आहेत. बोट-राइड असेल तर ती संपल्यावर धक्क्यापाशी सर्वांनी एकदम उठून होडीतून बाहेर पडण्याच्या पॉइंटपाशी गर्दी करायची. रस्त्यावर चालताना आपल्याच नादात इतरांची फिकीर न करता चालायचे, कुठल्याही रांगेमध्ये पुढच्याला अगदी खेटून उभे राहायचे, मध्येच एखादा भारतीय माणूस रांग सोडून दीडफूटभर बाहेर उभा राहातो आणि त्याच्या मागचे जर भारतीय असतील तर तेही त्याच्यामागे तशीच वाकडी रांग लावतात. न्यू यॉर्कच्या भुयारी रेल्वेत भारतीय लोक धक्काबुक्की करतात किंवा आडदांडपणे घुसतात-उतरतात. लिफ्टमध्ये शिरताना, बाहेर पडतानाही तसेच. सरकत्या जिन्यावर एका बाजूने काही लोक पायर्‍या चढून वर जाणारे असतात त्यांच्यासाठी ती जागा मोकळी असते. पण भारतीय माणसे तिथे उभी असतात. आपल्यामागे माणसे खोळंबली आहेत हे त्यांच्या गावीही नसते.असो. लिहिण्यासारखे खूप आहे.

अत्रन्गि पाउस's picture

26 May 2015 - 1:28 am | अत्रन्गि पाउस

कुठलीही गोष्ट कुठल्याहि मार्गाने का होईना पण 'वसूल' झालीच पाहिजे हि वृत्ती फार चमत्कारिक आहे ..

माझीही शॅम्पेन's picture

27 May 2015 - 1:47 pm | माझीही शॅम्पेन

रच्याकने ने पाच अमेरिकन जेवढे सफाईदार पणे खातात तेवढे दहा चायनीज लोक अ-सफाईदार पणे खाउ शकत नाहीत असो
पण माझा ही एक रिओ मधील विमान-तळावर असाच भयानक अनुभव आहे , त्याबद्दल नंतर कधीतरी

काळा पहाड's picture

27 May 2015 - 2:32 pm | काळा पहाड

सांगा हो

नगरीनिरंजन's picture

27 May 2015 - 5:41 pm | नगरीनिरंजन

सगळ्याच बाबतीत अमेरिकन लोकांची वखवख खूप जास्त आहे. किस्सा जरुर सांगावा ही विनंती.

इशा१२३'s picture

27 May 2015 - 2:54 pm | इशा१२३

अगदि अगदि खरय हे चिनी लोक भयंकर उच्छाद आणतात अनेक अनुभव घेतलेत.सगळ्यात त्रासदायक प्रकार त्यांचे फोटो प्रेम.वर मधुरा म्हणालीये तस वाट्टेल तसे अन वाट्टेल तेवढे बेशिस्तपणे फोटो काढणे.
तीन वर्षांपुर्वी आग्रा किल्ल्याला भेट दिली होती त्यावेळेस हा अनुभव फारच आला.प्रत्येक ठिकाणचे फोटो काढत होते हे लोक.हे एवढ्या मोठ्या लेन्स असलेले कॅमेरे आणि आजुबाजुला कोणी आहे तेहि फोटो काढताहेत याचे जराहि भान ठेवत न्हवते.आधी त्या ठिकाणाचा फोटो,मग स्वःता उभे राहुन,मग जोडिदाराचा,मोबाइलने,सेल्फि सगळे होईपर्यंत आपण वाट पाहायची अर्थात तिथेहि उत्तर भारतीय मधे घुसुन फोटो काढणारच.१०-१२ जण होते पण वैताग आणला होता.मुलहि कंटाळली.पण तरी थोडक्यात निभावले म्हणायचे कारण किल्ला बघुन बाहेर पडताना परत ५०-६० लोकांचा एक मोठ्ठा चिनी जथ्था पाहिला आणि आम्हि एकमेकांकडे बघुन सुटल्याचा भाव चेहर्यावर पाहिला.
तिच स्थिती परदेशातहि अनुभवलीये.खाण्यावर तुटुन पडणे.कोणाचीहि पर्वा न करता वागणे.वाईट्ट.
पण वाईट याचे वाटते कि बेशिस्त वागण्याचे,परदेशात(देशातहि)लाज वाटेल असे वागणे.टुर लिडरचे न ऐकणे,सार्वजनिक टॉयलेटमधे रांग मोडुन घुसणे हे प्रकार आपले देशबाधव,भगिनीहि करतात.कुणाला नाव ठेवायची?

रांग मोडण्याचे अनुभव तर जौ दे! किती सांगायचे! आम्ही काय मूर्ख म्हणून उभे आहोत का इथे? तर हो, तुम्ही मूर्ख आहात म्हणूनच रांगेत आहात, शहाणे असता तर कधीच स्पेश्शल नंबर मिळाला असता ना! रांग मोडण्यात सिनियर शिट्टीजन बरेच असतात.

प्रदीप's picture

28 May 2015 - 9:25 am | प्रदीप

आपण बहुधा अभारतीय दिसता, तरीही मराठी संस्कृति व भाषा प्रेमापोटी शिकून इथे मराठीतून लिहीत आहात. अथवा, आपण मूळच्या भारतीय व मराठी आहात (ethnic Indian) पण परदेशातच जन्मलेल्या व वाढलेल्या. म्हणजे, आपण भारतात कधीही आला नसाव्यात, तिथल्या वागणूकीचा आपण कधीही अनुभव घेतला नसावात असे दिसते.

पण एक भारतीय म्हणून, तिथल्या समाजात अनेक पावसाळे काढलेला, आता गेली काही दशके परदेशात असलेला तरीही नित्यनेमाने भारतात जाऊन तेथील अनुभव घेत असलेला म्हणून मी सांगू इच्छितो की आम्ही भारतीय रांगा मोडणे हे अगदी अंगवळणी पडलेले, किंबहुना रांग ही संकल्पना (म्हणजे concept) अजिबात माहित नसलेले आहोत.

अलिकडेच WeChat ह्या सुप्रसिद्ध चिनी साईटीवरील एका फोरममधे चिनी लोक, भारतीयांबद्दल, इथे आपण त्यांच्याबद्दल करताहात, तीच नेमकी तक्रार करत होते. तेव्हा मी त्यांना ठणकावून सांगितले की 'दुसर्‍याच्या डोळ्यातील कुसळ पहाण्याच्या अगोदर, स्वतःच्या डोळ्यातील मुसळ पहा, भाईयों!'