माझी ही कविता......
ज्यांचे नवरे कुणालाही न कळवता वर्षानुवर्ष परागंदा झालेले आहे.......
आणि केवळ त्यांच्या मरणाची खबर नाही या एका आशेवर त्यांची वाट पहाणार्या त्यांच्या बायकांना समर्पित.....
गेला दिस वेशीपार
ना चांदण्याला जाग आहे
सख्या ये बिगीने घरा
आज अवसेची रात आहे..................
भोवतालच्या सावल्या
गेल्या परतुनी घरा
मागे उरली एकटी
मीच माझ्या संगतीला
भिवलेल्या माझ्या मना
तुझ्या आठवांची साथ आहे
सख्या ये बिगीने घरा
आज अवसेची रात आहे..................
वारा सुटला मोकाट
नावे साद मला घाली
तुला पाहता ना घरे
वैरी अंगचटीस लागी
घडु नये काही भलते
अघोरी त्याचा चाळा आहे
सख्या ये बिगीने घरा
आज अवसेची रात आहे..................
उलटल्या कैक राता
उरी बाळ्गुनी ठेच
देह ठेवला कधीचा
तरी सुटेना हा जाच
मोकळा होउ पाहे परी
या जीवा तुझी आस आहे
सख्या ये बिगीने घरा
आज अवसेची रात आहे..................
प्रतिक्रिया
16 Mar 2015 - 11:21 pm | पैसा
अजून लिहा!
16 Mar 2015 - 11:40 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११
17 Mar 2015 - 8:00 pm | एक एकटा एकटाच
पैसा आणि अत्रुप्त
आपले मनपुर्वक आभार
17 Mar 2015 - 8:31 pm | सूड
भावार्थ आवडला, 'काजल रातीनं ओढून नेला' आठवलं पटकन!!
18 Mar 2015 - 10:20 am | चुकलामाकला
+११
छान झाली आहे!
18 Mar 2015 - 10:34 pm | एक एकटा एकटाच
सगळ्या प्रतिसाददात्यांचे मनपुर्वक आभार
18 Mar 2015 - 10:38 pm | एक एकटा एकटाच
गेल्या आठवड्यात 'अतिवास' ह्यांची पत्र ही शतशब्द कथा वाचली.त्यात एक वाक्य होतं
तेव्हा मला माझी ही कविता आठवली.