शाळेत असताना, सहावी किंवा सातवीत, हिंदीच्या पुस्तकात आम्हाला एक धडा होता, 'जादुके सिक्के’. त्यात एका रघु नावाच्या १० वर्षाच्या मुलाची कथा होती.
एक रघु नावाचा मुलगा असतो, तो फार परोपकारी आणि स्वभावाने चांगला असतो. तो दुसर्यांना मदत करायला नेहेमी तत्पर असायचा. ह्या रघुच्या शेजारी एक आजीबाई एकट्या राहत असतात. वयाप्रमाणे त्या थकल्या-भागल्या असतात त्यामुळे त्यांना दैनंदिन कामे करणे देखील कष्टाचे झाले होते, त्यात त्यांचे डोळेही अधू होत चालले होते. रघु ह्या आजींच्या घरी नेहेमी येत जात असे, आजींची झेपतील ती कामे तो करत असे, निघताना आजी रघुला काहीतरी खाऊ देत असत. असा क्रम कित्येक दिवस चालला होता. एके दिवशी आजी आजारी पडतात, नेहेमी प्रमाणे रघु त्यांच्याकडे गेला असता, त्या रघुला, “पिण्याचे पाणी भरून ठेवशील का ?” असे विचारतात. रघु हो म्हणतो आणि आनंदाने ते काम करतो. ह्या वेळी आजी त्याला जवळ बोलावतात आणि एका पेटीतून १० पैसे काढून देतात. रघु “नाही, नाही” म्हणत असताना देखील त्या, त्याला पैसे घ्यायला लावतात. त्या रघुला म्हणतात की जर तू हे पैसे नाही घेतलेस तर मला फार वाईट वाटेल. रघु आजीना वाईट वाटायला नको म्हणून ते पैसे ठेवून घेतो. पुन्हा दुसर्या दिवशी तसेच घडते, रघु पाणी भरून ठेवतो आणि आजी त्यांच्या पेटीतून १० पैसे काढून रघुला देतात. हा क्रम असाच काही दिवस चालू राहतो. एके दिवशी रघुने पाणी भरल्यावर, आजी त्याला देण्यासाठी त्यांच्या पेटीत पैसे चाचपडायला लागतात. पण पेटीतले पैसे संपले असतात त्यामुळे त्यांच्या हाताला काहीही लागत नाही. त्यावर आजीबाईंचे डोळे भरून येतात, त्या रघुला म्हणतात, “बघ, मी किती कमनशिबी आहे, तुला देण्यासाठी माझ्याकडे साधे १० पैसे देखील नाहीत.” असे म्हणून त्या डोळे टिपू लागतात. रघु एक क्षण विचार करतो आणि आजीबाईंनी दिलेली, स्वताच्या खिशातील काही नाणी काढून गुपचूप त्या पेटीत टाकतो आणि आजींना म्हणतो, “ अहो आजी, जरा निट बघा, कदाचित असतील काही नाणी अजून.” आजीबाई पुन्हा पेटी चाचपडायला लागतात आणि त्याना खरेच अजून काही नाणी सापडतात. खुश होऊन त्या रघुला १० पैसे देतात आणि मग हा सिलसिला चालूच राहतो, आजीच्या पेटीतील ती जादूची नाणी कधीच संपत नाहीत.
शाळेतील त्या भोळ्या-भाबड्या वयात हा रघु मनाला फारच भावला होता. त्याचे गोबरे-गोबरे गाल, गोल-गोल भोकरासारखे टप्पोरे डोळे, कुरळे केस, त्याचा दुसर्यांना मदत करण्यासाठी तत्पर असणारा स्वभाव, हे सगळे फार जवळचे वाटू लागले होते. त्याच्या डोळ्यातला निरागस, भाबडा भाव मनाला स्पर्शून राहीला होता. त्याच्या सारखी आपणही इतरांना मदत करावी असे वाटू लागले होते. मग शेजार्यांना दुध सेंटरवरून दुध आणून दे, रेशनच्या दुकानावरून रेशन आणून दे, पिठाच्या गिरणीवरून धान्य दळून आणून दे, असली कामे मी करीत असे. त्या वयातले आणखी एक काम करायला मला आवडत असे ते म्हणजे पोस्टमन रस्त्याच्या टोकाला दिसला की धावत जाऊन त्याच्याकडंनं आमच्या बिल्डींगमधल्या लोकांची पत्रे घेऊन प्रत्येकाच्या घरी वाटत सुटणे. त्यावेळी पोस्टाच्या पेट्या, ह्या हल्लीसारख्या तळमजल्यावर नसायच्या, पोस्टमनला पत्रं घरोघरी जाऊन वाटावी लागायची, हा पोस्टमन वयस्कर होता, त्यामुळे त्याला मदत करताना मनापासून आनंद व्हायचा. असंच एकदा सहावी-सातवीत असताना आमचा एक मित्र आजारी पडला होता आणि त्यामुळे तो शाळेत येऊ शकत नव्हता. त्याच्या आजारी असण्याचे कळल्यावर मी आणखी काही मित्रांना घेऊन त्याची विचारपूस करण्यासाठी त्याच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्याची आई फार खुश झाली होती आणि आम्हाला शाबासकी दिली होती. ह्या व अश्या प्रसंगाने मी आनंदित होऊन माझ्यात मला रघु दिसत असे.
हळूहळू वय वाढत गेले तसतसा स्वभाव बदलत गेला, चतुराई आणि लबाडी ह्यातल्या सीमारेषा धूसर होत जाऊ लागल्या. साधेपणाला/भोळेपणाला, बावळटपणाचे लेबल लागले. इतर मुलांच्या हुशारीचे, स्ट्रीट स्मार्टनेसची उदाहरणे दिली जाऊ लागली. प्रामाणिकपणा हा मूर्खपणा ठरू लागला. परोपकार हा शब्द डिक्शनरीपुरता मर्यादित राहिला. इसापनीतीतील, विहिरीत पडलेल्या कोल्ह्याने वरून जाणार्या बोकडाला, चविष्ट पाण्याची लालूच दाखवून विहिरीत उडी मारायला भाग पाडली आणि शेवटी त्याच्या डोक्यावर पाय देऊन स्व:ताची विहिरीतून सुटका करून घेतली, ही गोष्ट जीवनाचे तत्वज्ञान ठरली. हे सर्व घडले, काहीवेळा इतरांचे फारसे सुखद अनुभव न आल्यामुळे, कधी मोठ्यांच्या शिकवणुकीमुळे आणि कित्येकवेळा जीवनातल्या झगड्यामुळे.
डोळ्याने अधू असलेल्या व्यक्तींची इतर ज्ञानेंद्रिये इतरांपेक्षा जास्त सक्षम असतात हे जाणवल्यावर तर रघूच्या गोष्टीतील जादूच हरवून गेली. त्या आजीबाईना चाचपडूनही जेव्हा नाणी सापडली नाही तेव्हाच त्यांना कळले असणार की आपल्याकडचे पैसे संपले आहेत, त्यामुळे रघूच स्व:ता जवळचे पैसे गुपचूप पेटीत टाकतो आहे, हे त्यांना कळल्याशिवाय राहणारच नाही, हे जाणवले. गोष्टीच्या लेखकाने, वास्तवापासून फारकत घेऊन ही गोष्ट रचली, बालपणीच्या कोवळ्या वयात ती मनाला स्पर्शूनही गेली पण जसजशी अक्कल येत गेली, नवीन माहिती मिळत गेली, ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या, गोष्टीतील मजा संपत गेली.
आणि हे सर्व घडत असताना, तो गोबर्या गालांचा, भोकरासारख्या टप्पोर्या, भाबड्या डोळ्यांचा रघु तर पार हरवूनच गेला.
प्रतिक्रिया
12 Mar 2015 - 5:13 am | श्रीरंग_जोशी
प्रकटन खूप भावले.
मी शाळेत असताना वाचलेली ना धो ताम्हणकरांची गोट्या ही कादंबरी वाचली होती. त्यावेळी आपणही गोट्यासारखे बनावे असे खूप वाटायचे.
या लेखावरून सहजच आठवले की मी लहान असताना शेजारी बरीच कामे सांगायचे जसे वाण्याकडून हे आणुन दे, भाजीवाल्याकडून ते आणून दे इत्यादी. स्वतःच्या घरची अशी कामे करतच असल्याने कधी त्यात वेगळे वाटले नाही.
पण मी मोठा झाल्यापासून शेजारच्या लहान मुलाला असे कधी कुठलेही काम सांगितल्याचे आठवत नाही. किंवा आजकाल असे फारसे घडतानाही दिसत नाही.
12 Mar 2015 - 6:59 am | पॉइंट ब्लँक
छान मांडणी. सगळ्यांचा प्रवास जवळपास असाच असतो.
12 Mar 2015 - 7:17 am | नगरीनिरंजन
मुक्तक आवडले. निरागसता जपणे खूप अवघड आहे.
12 Mar 2015 - 7:19 am | आनन्दा
मांडणी आवडली, पण याच्याशी असहमत -
रूपककथांमध्ये टेक्निकल फोल्ट्स काढायचे नसतात, ते काढले तर कोणतीच रूपक कथा व्यावहारिकतेच्या कसोटीवर टिकू शकत नाही.
बाकी जाता जाता - बर्याच रूपक कथा आधुनिक व्यवस्थापनातील सल्ले देखील देतात बर का.
12 Mar 2015 - 10:09 am | पदम
छान लिखाण
12 Mar 2015 - 4:10 pm | भम्पक
मी स्वतः हीच मानसिकता असलेला..लहानपणापासून आतापर्यंत म्हणजे ४० वर्षे वय ...!
असे असणे / वागणे म्हणजे वर वर जरी बावळट पणाचे दिसत असले तरी त्याचे आत्मिक समाधान ज्याला घेता येते तोच घेतो.आणि त्या केलेल्या कामाचे मात्र महत्व पुढच्याला कळलेच पाहिजे नाहीतर झालोच बावळट...! प्रामाणिकपणा कधीही मूर्खपणा ठरत नाही..बोकड आणि कोळ्याच्या गोष्टीत बोकड हा प्रामाणिक नाही तो बावलटच आहे कारण सारासार विचार करायची बुद्धीच त्याच्याकडे नाही .आणि जीवनात आपल्या मर्जीने जगायचे असेल (प्रामाणिकपणे आणि सगळ्यांना मदत करून ) तर पावलोपावली असे कोल्हे भेटणारच आहेत . गरज आहे फक्त विचारपूर्वक जगण्याची.
उलट अश्या जगण्याचा जो कैफ आहे उसमे तो बहुत मझा ही भाई....!!!
12 Mar 2015 - 4:25 pm | चिनार
छान लिखाण !!!!
12 Mar 2015 - 4:27 pm | एस
आवडले.
12 Mar 2015 - 4:27 pm | पिंपातला उंदीर
अप्रतिम
13 Mar 2015 - 1:04 am | रुपी
छान..
13 Mar 2015 - 4:27 pm | नाखु
तरी वर्ख खरवडल्यावर जर मूळ रंग दिसत असेल तर स्वभावाला फक्त मुलामा लागलाय, गाभा अजून शाबूत आहे असे मुक्तक लिहायला आणि त्रयस्थ विचार करायला !! (मला काय त्याचे या मानाने हे स्वचिंतन फार चांगले, न जाणो कुणी बालकाने रघुगिरी केली तर कद्रूपणा न करता किमान चांगले तरी म्हणाल याची खात्री आहे)
14 Mar 2015 - 6:22 am | मुक्त विहारि
रघूपण उरले कुटुंबाकरता..