दोन कंडक्टर्स

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
11 Mar 2015 - 10:02 am

मुंबईच्या आयुष्यात लोकल्स, बेस्टच्या बसेस, रिक्षा हा अविभाज्य घटक आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट इतका चांगला असल्यामुळेच मुंबईला दिवस रात्र काम करता येतं. कधी न झोपणारे शहर अशी बिरुदावली मिरवता येते. या सोयींच्या भरोशावरच मुंबई, ठाणे, रायगड अशा तीन जिल्ह्यांना व्यापणाऱ्या पट्ट्यात लोक घर आणि व्यवसाय निवडतात, रोज ये जा करतात.

या सगळ्या सेवा पुरवणार्यांमध्ये सर्वात कठीण परिस्थिती असते ती बेस्टच्या कर्मचाऱ्यांची. कारण ट्राफिक जामचा सामना त्यांनाच रोज करावा लागतो. रिक्षावाल्यांना जसं हवं तेव्हा, हवं तेवढंच काम करण्याचं स्वातंत्र्य असतं, तसं त्यांना मिळत नाही. रोजच्या ठरलेल्या फेऱ्या, ठरलेल्या शिफ्ट्समध्ये मध्ये कराव्याच लागतात. आणि कंडक्टरसाठी एसटीसारखं आरक्षित सीटसुद्धा मिळत नाही. खचाखच भरलेल्या बसमध्ये जवळपास पूर्ण दिवसभर उभे राहून तिकिटे वाटावी लागतात. त्यात लोकांची धक्काबुक्की, त्यावरून भांडणे, पाकीटमाऱ्या, सुट्ट्या पैशांवरून वाद हे दिवसभर चालूच. त्यामुळे बहुतेक कंडक्टर्स स्वाभाविकपणे बऱ्याचदा घुस्शात असतात.

मी मुंबईला असतांना रोज ऑफिसपर्यंत प्रवास बेस्टने करायचो, जाताना नियमित आणि येताना अनियमितपणे. त्यामुळे कंडक्टर्सचे अनेक नमुने पाहिलेत. सकाळी रोज ज्या बसेसने जातो, त्यांच्या कंडक्टर्सशी चांगली ओळख झाली होती. तिकिटे वाटून झाल्यावर वेळ उरला तर त्यांच्याशी थोड्या गप्पा सुद्धा होत. इतक्या सगळ्या कंडक्टर्सपैकी २ जण अगदी खास नमुने..

conductors

पहिला जो आहे, तो एकदम खडूस. कायम चिडलेला. त्याला हसताना पाहिल्याचं त्याच्या रोजच्या हजारो प्रवाश्यांपैकी एकालाही आठवत नसेल. मला तर मुळीच आठवत नाही. त्याच्या बस मध्ये बसलं तर एक ते सव्वा तासाच्या प्रवासात हमखास एक तरी भांडण पाहायला मिळतं म्हणजे मिळतंच.

सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ असल्यामुळे बरेच लोक असे आहेत जे अगदी नियमित त्याच बसने प्रवास करतात. इतक्या दिवसात हा कंडक्टर त्यातल्या कोणाशीही हसून, ओळख दाखवून बोलल्या वागल्याचे मला आठवत नाही. सलगीपेक्षा भांडणातच त्याचं मन जास्त रमत असावं. याचं नाव काय तेही रोजच्या प्रवाशांना माहित नाही.

सामान्य माणसाच्या हातात बऱ्याच बाबतीत काहीच नसतं... त्याचा राग आणि त्यातून आलेली बंडखोरी, मस्ती ज्या गोष्टीत त्याला अधिकार असतो त्यात दिसते. हा माणूस त्याचं उत्तम उदाहरण आहे.

मुळातच घुस्शात असल्यामुळे भांडणासाठी, भांडण्यासाठी त्याला अगदी क्षुल्लक कारण पुरतं. सुट्टे असूनदेखील तो प्रत्येक माणसाशी सुट्ट्यांसाठी कुरकुर करतो. "सगळ्यांनी नोटा काढल्या तर आम्हाला सुट्टे कोण देणार? आम्ही काही चिल्लरची खदान घेऊन फिरत नाही." हि त्याची नेहमीची तक्रार. काही प्रवासी खरोखर सुट्टे करून घेण्यासाठी मुद्दाम शंभर पाचशेच्या नोटा काढतात. आठ दहा रुपयाच्या तिकिटासाठी शंभरचे सुट्टे देणं अवघड आहे खरंच, पण हा माणूस, १७ रुपयाच्या तिकिटाला २० रुपये दिले तरी चिडतो.

लोक चुकीच्या बस मध्ये चढले तर हा माणूस त्यांच्यावर प्राणपणाने खेकसतो, भर रस्त्यात बस उभी करून त्यांना उतरवतो. आणि ते नाही जमलं तर एकदम तोऱ्यात त्यांच्याकडून पुढच्या थांब्यापर्यंतचे तिकीट वसूल करतो. आणि ते उतरेपर्यंत त्यांना काही न काही सुनावत राहतो.

बरेच लोक, बसची नेमकी माहित नसेल तर खिडकीतून प्रवाशांशी बोलून, कंडक्टरला हाका मारून खात्री करून घ्यायचा प्रयत्न करतात. अशा वेळेस तो त्यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. आणि ते लोक चुकून चढले तर त्यांना बिनदिक्कतपणे सुनावतो, "चढण्या आधी विचारायला काय जातं तुमचं? फुक्कटचा डोक्याला ताप!"

एकदा बसच्या मार्गातल्या दुसऱ्या-तिसऱ्या थांब्यावर मोजकेच लोक होते. त्यातला एक माणूस मोबाईलवर बोलता बोलता हात करून बसला थांबायचा इशारा करत होता. पण ड्रायवरने बस थांबवली नाही, आणि कंडक्टरनेदेखील बेल मारली नाही. तो माणूस बसच्या मागे पळत पळत कसाबसा बसला लटकला.
आणि चढताक्षणी कंडक्टरशी भांडायला लागला. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून, कंडक्टरला जाब विचारायला लागला कि बस का नाही थांबवली.

कंडक्टर चूक मानायला तयारच नव्हता. तो उलट त्यालाच बोलायला लागला, कि बस येतेय का जातेय लक्ष नको का तुमचंच, मोबाईलवर बोलत निवांत उभे होतात, आम्हाला काय कळणार, थांबवलं तरी बसमध्ये चढणार कि नाही ते.., चढताना पडला असतात म्हणजे?" त्याच्या ह्या उलट बोलण्याने तो आणखी अडकला.

प्रवासी आणखी चिडला, आणखी शिव्या देत त्याला म्हणाला, "तुम्हाला माझं मोबाईल वर बोलणं दिसत होतं, तर मी हात करून थांबवतोय ते दिसत नाही? बस थांबवली असती तर माझं मी पाहिलं असतं ना, कसं चढायचं ते.." ते दोघे असे भांडतच राहिले. बाकीच्या प्रवाशांना असह्य झालं तेव्हा त्यांनी मध्ये पडून ते थांबवलं.

त्याच्या बसमधून जर भांडण न पाहता प्रवास झाला तर आम्हाला आश्चर्याचा धक्का बसतो. बसमधून उतरल्यावर आम्ही गमतीत म्हणतो "मूड अच्छा होगा मास्तरका! आज शांतीसे सफर खतम हो गया"

दुसरा कंडक्टर याच्या अगदी उलट आहे. एकदम बोलका.. हसरा. प्रसन्न आणि कामसू. सुट्ट्यांचे प्रॉब्लेम यालासुद्धा येतातच. पण हा चिडत नाही, सुट्टे द्यायला अगदी चांगल्या सुरात सांगतो, त्याच्याकडे आणि प्रवाशांकडेही सुट्टे नसतील तर मग बाकीच्यांना मागून पाहतो, किंवा मग होईपर्यंत थांबतो, थांबायला सांगतो. आणि हे करताना तोल बिलकुल ढळू देत नाही.

जे लोक सुरुवातीच्या बस थांब्यापासून बसत असतात, त्यांचा पुष्कळ वेळ प्रवास होत असल्यामुळे बऱ्याचजणांशी त्याची मैत्री आहे. सगळे त्याला नावाने ओळखतात. जाधवसाहेब म्हणून हाक मारतात. त्यांच्याशी बस भरेपर्यंत आणि पुढे तिकिटे वाटून संपल्यावर गप्पा मारतो.

पण गप्पा मारल्यामुळे कामाकडे दुर्लक्ष बिलकुल होऊ देत नाही. उलट काम झाल्याशिवाय गप्पा मारत नाही. हिशोबात एकदम पक्का असल्यामुळे पटपट काम संपवतो. शेवटचा थांबा जवळ आला कि, कोणी विनंती केली तर ५०० रु, १०० रु अशा नोटांचे सुट्टेहि देतो त्याच्याकडे पुरेसे असतील तर.

ओळखीच्या लोकांकडे महत्वाच्या बाबींची चर्चा करतो. त्यांचे सल्ले घेतो. कोणी बँकेत कामाला असतं, त्यांच्या कडून परीक्षांची, कर्जाची माहिती करून घेतो, त्याच्या ओळखीच्या लोकांसाठी त्याला हि माहिती हवी असते. कोणी विमा कंपनीमध्ये असतं, त्यांच्याकडे पॉलीसीबद्दल चौकशी करतो. गावातल्या गप्पा सांगतो, गावी जाऊन आला तर काय काय केलं ते सांगतो. मुलीला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता, तेव्हा सगळ्यांशी चर्चा केली, चांगल्यात चांगलं कॉलेज कुठलं याची खात्री करायला.

हि ठाणे ते अंधेरी अशी लांब पल्ल्याची गाडी आहे. अर्ध्या पाऊण तासाने अशी त्याची फ्रिक्वेन्सी आहे. एक गाडी चुकली कि अनेकांच्या ऑफिसच्या वेळा चुकतात. सकाळच्या मुख्य ४-५ गाड्यांमध्ये बाकीच्या गाड्या आल्या न आल्या जाधव साहेब त्यांची गाडी बरोबर वेळेत आणतील आणि नेतील असा त्यांचा लौकिक आहे.
एवढंच नाही तर काही लोकांकडे त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा असतो. आणि त्यांच्या स्वतःच्या गाडीचं, पुढच्या आणि मागच्या गाडीचं स्टेटस सुद्धा ते लोकांना सांगतात.

याचा त्या माणसाला काहीच फायदा नाही. कंडक्टरचं अप्रेजल होत असेल असं मला वाटत नाही, आणि असेल तरी तो प्रवाशांशी कसा वागतो ह्यावर तर काहीच अवलंबून नसतं. कारण बसमध्ये प्रवासी आणि कंडक्टर यामध्ये किंवा त्यावर कोणीही उपस्थित नसतं. त्यामुळे ते पूर्णपणे त्यांच्याच हातात आहे.

यातल्या कोणाचंहि वर्तन जाणूनबुजून तसं आहे कि मूळ स्वभावाच तसा आहे हे मला ठाऊक नाही. पण त्यांच्या परिस्थितीमध्ये तर साम्य आहे. कंडक्टर बनण्याचं लहानपणी कोणाचं गमतीशीर स्वप्नं असू शकतं. पण जाणतेपणी कोणी कंडक्टर बनण्याचं ध्येय ठेवत नाही. किंबहुना तसे अनेक व्यवसाय आहेत. पण नाईलाजाने, परिस्थितीला सामोरे जात बरीच माणसे अशा व्यवसायात पडतात. काही पहिल्यासारखी नाखूष राहतात, जगावर चिडचिड करतात. आणि काहीजण कळत नकळत त्यातला फोलपणा जाणवून समाधानी प्रसन्न राहायचा प्रयत्न करतात.

एकाच व्यवसायात अगदी सारख्या कामात मी पाहिलेली हि दोन टोकाची माणसे.

रेखाटनलेख

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

11 Mar 2015 - 10:28 am | नगरीनिरंजन

लेख आवडला! विशेषतः शेवटचे विवेचन. अशा प्रवृत्ती फक्त नाईलाजाने करायला लागणार्‍या नोकर्‍यांमध्येच नाहीत तर अगदी मोठमोठ्या पदांवरही दिसतात.

आकाश खोत's picture

11 Mar 2015 - 12:29 pm | आकाश खोत

धन्यवाद :)
हो… खरंय. सगळीकडे असे लोक असतात. मी निरीक्षणातून हे दाखवायचा प्रयत्न केला कि अगदी सारखं काम अंगावर असताना दोन माणसं कशी वेगळ्या पद्धतीने ते हाताळू शकतात. कितीही तणाव असला तरी माणुस त्यात शांत आणि प्रसन्न राहून दाखवु शकतो.

आतिवास's picture

11 Mar 2015 - 7:21 pm | आतिवास

सहमत आहे.
उत्तम लेख, आवडला.

एक एकटा एकटाच's picture

11 Mar 2015 - 10:31 am | एक एकटा एकटाच

चांगल observations आहे

असंका's picture

11 Mar 2015 - 10:47 am | असंका

+१

अगदी हेच म्हणणार होतो.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Mar 2015 - 11:28 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

पियुशा's picture

9 Apr 2015 - 8:19 pm | पियुशा

लेख आवडेस

आकाश खोत's picture

11 Mar 2015 - 12:30 pm | आकाश खोत

तुम्हाला आणि ++ करणाऱ्या सर्वांना
धन्यवाद :)

सुनील's picture

11 Mar 2015 - 10:55 am | सुनील

रोचक निरीक्षण.

फार्फार वर्षांपूर्वी घडलेला किस्सा.

बस आली ती भरूनच. तसाच चढलो. थोड्या वेळाने कंडक्टर आला. नोट पुढे करून माझे गंतव्य स्थान सांगितले.
"कुठे बसलात?" (बरेच कंडक्टर्स असेच विचारतात)
" अहो, बसतोय कसला. उभाच आहे सीप्झपासून"
आजूबाजूची ४ मंडळी हसली. नशिबाने कंडक्टरदेखिल उमदे निघाले! हसण्यात सामील होत तिकिट दिले!

वास्तविक दिवसभरात शेकडो मंडळींशी थेट संपर्क येणार्‍या ह्या व्य्वसायातील कर्मचार्‍यांना वेगळे प्रशिक्षण देणे जरूरी आहे. तसे ते दिले जात असेल असे वाटत नाही.

आकाश खोत's picture

11 Mar 2015 - 12:32 pm | आकाश खोत

धन्यवाद :)

सिरुसेरि's picture

11 Mar 2015 - 11:25 am | सिरुसेरि

रजनीकांतसुद्धा सिनेमांत जाण्याआधी बेंगलोरला बस कंडक्टरच होता (शिवाजी गायकवाड). त्याच्या तिकीट देण्याच्या स्टाइलवर खुश होउन लोकं मुद्दामहुन वाट पाहुन त्याच्याच बसने प्रवास करत .

आकाश खोत's picture

11 Mar 2015 - 12:32 pm | आकाश खोत

धन्यवाद :)
म्हणजे स्टाईल मारणं आधीपासूनच चालू आहे तर. तीच त्यांनी चित्रपटात आणली आणि हिट केली. :D

सुधीर's picture

11 Mar 2015 - 11:55 am | सुधीर

आकाश, छान लिहिले आहेस.

आकाश खोत's picture

11 Mar 2015 - 12:32 pm | आकाश खोत

धन्यवाद :)

आदूबाळ's picture

11 Mar 2015 - 12:35 pm | आदूबाळ

Good conductor and bad conductor...

लेख आवडला!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Mar 2015 - 2:08 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

आवडला रे लेख आकाश्या.
दोघेही कंड्क्टर असले तरी एकेकाचा 'कंड्क्ट' वेगळा.

विजुभाऊ's picture

11 Mar 2015 - 2:09 pm | विजुभाऊ

कंडक्टरचं अप्रेजल होत असेल असं मला वाटत नाही, आणि असेल तरी तो प्रवाशांशी कसा वागतो ह्यावर तर काहीच अवलंबून नसतं.

साहेब या कंडकटर बद्दल जसे इथे लिहिलेत तसेच एखाद्या वर्तमानपत्रात लिहा. शक्य असेल तर बेस्ट च्या एच आर ला लिहा. त्या फीडब्याकचा जाधव कंडक्टरसाहेबाना नक्कीच फायदा होईल.
कधी एखाद्या दिवशी शक्य झाले तर तुमचा फीडबॅक त्यांच्या हातात लेखी द्या . ( शक्य असेल तर त्यांच्या कुटुंबीयाम्च्या हातात पडेल असे बघा) कुटुंबीयांमधे त्यांच्या बद्दल आदर निर्मान होईल. हे सुद्धा अप्रेजलच आहे

पिवळा डांबिस's picture

12 Mar 2015 - 8:50 am | पिवळा डांबिस

विजुभाऊंशी सहमत आहे.
त्यांनी सांगितलेलं तर कराच, पण शक्य असेल तर,
त्या जाधव कंडक्टरना एखादी छोटीशी भेट द्या....
साधीशी, अगदी हात रुमालांचं छोटंसं पॅक असलं तरीही चालेल...
पण ती गिफ्ट त्यांच्या हातात द्या आणि त्यावेळेस तुम्हाला त्यांचं काय वर्तन आवडलं हे त्यांना आवर्जून सांगा..
बघा, त्यांना तर आनंद होईलच, पण तुम्हालाही कितीतरी आनंद होईल!!!

दाते प्रसाद's picture

11 Mar 2015 - 3:38 pm | दाते प्रसाद

.

२००८-२००९ च्या सुमारास ८३ लिमिटेड्ने नियमीत प्रवास व्हायचा.

बसचे एक कंडक्टर होते . ते एखादा बसथांबा आला की नाव , त्या थांब्याच्या जवळची महत्वाची ठिकाणे (पासपोर्ट ऑफिस , नेहरू तारांगण) असे सांगायचे.

त्यांना एकदा विचारलं की बेस्टने तुम्हाला असं ट्रेनींग दिलयं का ?, तर म्हणाले "नाही पण मीच अशी माहिती सांगतो म्हणजे लोकांची सोय होते आणि त्यांचा वेळ वाचतो" फार भारी वाटलं तेव्हा ती कमीट्मेंट बघून !!!

आकाश खोत's picture

11 Mar 2015 - 5:45 pm | आकाश खोत

असे चांगले लोक भेटले कि छान वाटतं.
आता तुम्ही सांगितलत त्याच्या उलट एक किस्सा सांगतो.
मी घाटकोपरला चाललो होतो. मर्यादित थांब्यांची एक बस होती वाटतं. मी पहिल्यांदाच चाललो होतो त्या बसने.
मला आर मॉलच्या जवळ जायचं होतं.
पुढे मुलुंडजवळ एक कॉलेजच्या मुलांचा घोळका होता. त्यांनी कंडक्टरला विचारलं आर मॉलला जाणार का.
कंडक्टरने "नरो व कुंजरो वा" च्या थाटात सांगून टाकलं, आर मॉलला थांबणार नाही. ते मुलं काही चढले नाहीत.

पुढे जाऊन जेव्हा गाडी आर मॉलच्या एक थांबा अलीकडे थांबली तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला.
त्या थांब्यावरून आर मॉल सरळ दिसत होता. पायी जाऊन चार पाच मिनिटे लागली असती फार तर.
ती मुले सहज या थांब्यावर उतरून गेली असती. पण कंडक्टरने अर्धवट माहिती सांगून त्यांना चढूच दिले नाही.

कानडाऊ योगेशु's picture

14 Mar 2015 - 4:09 pm | कानडाऊ योगेशु

सोलापूरात अनेक वर्षांपूर्वी बसच्या होणार्या फेर्यांच्या संख्येनुसार वाहक व चालक ह्या दोघांना इन्सेन्टीव मिळत असे त्यामुळे थांब्यावर मोकळी बस सुध्दा न थांबवता ती सुसाट पळवण्याचे फार प्रकार घडत. व्यवस्थापनला नंतर चूक लक्षात आल्यावर फेर्यांची संख्या मर्यादीत ठेवुन होणार्या तिकिट विक्रीनुसार इन्सेन्टीव देण्याची पध्दत आली. बहुदा असाच प्रकार इतर शहरातनी झाला होता असे ऐकल्याचे आठवते आहे.

आदिजोशी's picture

11 Mar 2015 - 3:40 pm | आदिजोशी

कंडक्टरांवरचा एक छान लेख वाचायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद :)

रेवती's picture

11 Mar 2015 - 5:20 pm | रेवती

लेखन आवडले.

मृत्युन्जय's picture

11 Mar 2015 - 5:36 pm | मृत्युन्जय

लेख आवडला.

मुंबई बद्दल बेस्ट ही एकच गोष्ट आवडते. बेस्टचे कंडक्टर्स तर खरोखरच बेस्ट आहेत. तुम्ही म्हणता तसा नमुना एखादाच. बाकी सुट्ट्या पैशांसाठी फारसे खळखळ करत नाहित आणि मदतही करतात.

कपिलमुनी's picture

11 Mar 2015 - 6:00 pm | कपिलमुनी

कंडक्टर्स दोन प्रकारचे असतात
१. गुड कंडक्टर्स
२. बॅड कंडक्टर्स
:)

अमेरिकन त्रिशंकू's picture

11 Mar 2015 - 6:48 pm | अमेरिकन त्रिशंकू

३. सुपर कंडक्टर्स

कपिलमुनी's picture

12 Mar 2015 - 3:07 pm | कपिलमुनी

rajani

बॅटमॅन's picture

9 Apr 2015 - 7:13 pm | बॅटमॅन

द्येवा नमस्कार करतो.
_/\_

-थंबी बॅटमॅन.

बाप्पू's picture

11 Mar 2015 - 8:57 pm | बाप्पू

४) सेमी कंडक्टर्स
अवांतर : पुण्यातल्या कंडक्टर्स बद्दल आपले मत काय ????

रुपी's picture

11 Mar 2015 - 11:57 pm | रुपी

लेख आवडला.

गुळाचा गणपती's picture

12 Mar 2015 - 12:54 am | गुळाचा गणपती

पुण्यात २ ज़बरदस्त अनुभव आलेत। एकदा एक महिला बस मधे चढताना गाडी पलवण्यात आली। त्या गाडीत पडून जखमी झाल्या। आत येऊन थोड़े पाणी घेऊन त्यानी नम्रते ने विचारले की ऎसे का केले। तर वाहक वदले की बघुन चढता येत नाही का? मग ताईनी frontfoot ला येऊन six मारला। आमच्या तिकीटाच्या पैश्यावर जगणाऱ्या कुत्र्या, बोलायची अक्कल आहे का। वाहक तर्राट पळाले। पुढे थोड़ी बाचाबाची झाली अजुन। पण एंट्री च तो संवाद अजुन मनात ताजा आहे। जय pmpml।

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Mar 2015 - 7:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पीएमपीएमएल मधली भांडणं ह्याच्यावर एक किमान त्रिशतकी जिलबी टाकता येईल. =))
कोणी टाकतयं का?

हे लिहित असताना सुद्धा मला खात्री आहे की काही पीएमपीएमएल च्या कर्मचार्‍यांच्या जवळच्या नातलगांना उचक्या लागल्या असणार.

श्रीरंग_जोशी's picture

12 Mar 2015 - 7:58 am | श्रीरंग_जोशी

वर्णनशैली सुरेख आहे. अशी उदाहरणे रोजच्या आयुष्यात बरेचदा आढळतात.

मी देखील पहिल्या नोकरीच्या वेळी पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात १ वर्ष पुमपच्या सेवेचा लाभ घेतला आहे. वाहकांकडून कधी फारसा नकारात्मक अनुभव आला नाही पण काही सहप्रवासी उगाचच इतरांचा कसलाही उपद्रव नसताना कुजकट बोलून अपमान का करू पाहतात हे कळणे माझ्या आकलनापलिकडे होते.

बाप्पू's picture

12 Mar 2015 - 3:17 pm | बाप्पू

अपमान करणार नाहीत ते पुणेकर कसले.??? :
अपमान करणे हा पुण्यातल्या लोकांचा जन्मसिद्ध हक्क आहे. :)

लेख आवडला.व्यक्ती तितक्या प्रकृती!

बोका-ए-आझम's picture

12 Mar 2015 - 9:54 am | बोका-ए-आझम

मिपाकर भडकमकर मास्तरांची ' एका छिद्रान्वेषी वैतागसम्राटाची डायरी ' आठवली!

विजुभाऊ's picture

12 Mar 2015 - 11:46 am | विजुभाऊ

पुण्याचे कंडक्टर हे डायैलेक्ट्रीक आहेत

बाप्पू's picture

12 Mar 2015 - 4:02 pm | बाप्पू

माझ्या मित्राने सांगितलेला अनुभव.
पुण्यात एकदा PMT ने हडपसर ला जात असताना एका कंडक्टर ने बसमधील जवळपास आर्ध्या लोकांना आधीच पंच केलेली तिकिटे देवून पैसे घेतेले होते. खूप गर्दी असल्यामुळे कोणी काही बोलत नव्हते. तसेच तो आधुन मधून काही लोकांना नवीन तिकिटे पंच करून द्यायचा. त्यामुळे लोकांना त्याचा संशय आला नाही. हडपसर च्या जवळ बस आल्यावर एका थांब्यावर तिकीट चेकिंग चालू होते. त्या बस चे देखील चेकिंग सुरु झाले. बस मधील कंडक्टर ने ते पहिले आणि त्याला अचानक दरदरून घाम आला. आणि तो फीट येउन खाली पडला. तिकीट चेक करणार्यांनी हातातले काम सोडून कंडक्टर कडे धाव घेतली आणि त्याला रिक्षात घालून जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले. नंतर बस मध्ये कुजबुज सुरु झाली कि कंडक्टर ने बर्याच लोकांना आधीच पंच केलेली तिकिटे दिली आहेत आणि आपली चोरी पकडू जाऊ नये म्हणून त्याने हि " आयडिया " केली असावी.

खरे खोटे मला माहित नाही. पण कंडक्टर ने मात्र योग्य प्रसंगावधान दाखवून आपली नोकरी वाचवली हे मात्र निश्चित.

अनुप ढेरे's picture

14 Mar 2015 - 2:52 pm | अनुप ढेरे

आवडला लेख!

कानडाऊ योगेशु's picture

14 Mar 2015 - 4:11 pm | कानडाऊ योगेशु

खोत साहेब लेखात जो फोटो टाकला आहे तो पहील्य कंडक्टरचा आहे कि दुसर्या.? कारण जर पहिला कंडक्टर असेल तर फोटो काढु देण्याइतपत तरी त्याने सौजन्य दाखवले असे म्हणता येईल.

४९६ तिन हात नाका अन्धेरी बस का?

नूतन सावंत's picture

8 Nov 2015 - 9:49 am | नूतन सावंत

मुंबईच्या बेस्ट मध्ये चालकाच्या निष्काळजीपणे वाहन चालण्यामुळे कोणी पडून जखमी झाले आणि तरीही बस न थांबवता पुढे नेली.तर तक्रार करावी.तक्रार केल्यवर त्या चालकावर त्या मार्गावर नजर ठेऊन त्याच्या वाहन चालवण्याची खातरी करून घेऊन त्यांना शिक्षा होते.त्यातून कंडक्टरही सुटत नाही जर त्याने अपघाताच्या वेळी बेल मारून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला नसेल तर.
लेका छान आहे.विजुभौंच्या सूचनेप्रमाणे मी नेहमी करते. आगार व्यवस्थापकाला पत्र देऊन त्याची प्रत स्म्बधित व्यक्तीला द्यावी.

आकाश खोत's picture

25 Nov 2015 - 4:02 pm | आकाश खोत

चांगला प्रयत्न :-)

नमकिन's picture

13 Nov 2015 - 5:49 pm | नमकिन

माझे स्व. काका (मावशीचा नवरा) एस टी त कंडक्टर होते तेव्हा त्यांना आदर्श वाहक पुरस्कार मिळालेला.
मुक्कामी गाड्या एखाद्या गांवात गेल्यास पाहुण्यांसारखा पाहुणचार होत असे.
तसेच जुन्या काळी निरोप देणे, पैसे/तातडीची पत्रे, वस्तू/औषध अशी कामे आपुलकीने करताना पाहिले आहे. टपावर सामान चढ/उतार देखील त्यांच्या कामात अंतर्भूत असते म्हणे.
सांगण्या सारखे अजुन एक उदाहरण -माझे वडील त्यांच्या लहानपणी गांव ते मुख्य सड़केपाशी (४-५किमी) पायी येऊन ठराविक वेळी तालुक्याच्या बस चालकाकडे जेवणाचा डबा सुपूर्द करीत असत व माझे मोठे काका शिक्षण घेत होते ते तालुका गांवी तो डबा घेत. अशा उपकारी लोकांमुळे पुढे ते इंजीनियर होऊ शकले.

आकाश खोत's picture

25 Nov 2015 - 4:03 pm | आकाश खोत

छान वाटलं अशा चांगल्या माणसांबद्दल ऐकून.
अशी अनेक चांगली माणसे आहेत म्हणून जग आणि माणुसकी टिकून आहे.

प्रणवजोशी's picture

3 Dec 2015 - 8:32 am | प्रणवजोशी

काही वर्षे पुर्वी बेस्टच्या ३९९ बसला एक शिंदे नावाचा वाहक होता.बस म्हणजे विमान समजुन चालवायचा.एक ठराविक बस असायची त्याची ५४०१/देवनार आगारची.ती दिसली की शिंदे आलेत म्हणुन समजायच. पण बस एकदम वेळेवर आणायचा आणी सोडायचा.बस सुटायच्या आधी दोन मिनिटे सिटवर हजर असायचा.