ती येताना कधीच रिकामी येत नाही
अगदीच काही नाही तर...........
आठवणीचं गाठोडं सोबत घेउन येते
काही आठवणी असतात नाजुक
अगदी शेवरीच्या कापसासारख्या..
तर काही अगदी नकोश्या
कुमारिकेच्या गर्भारपणासारख्या...
अश्याच आठवणींच्या कोंडाळ्यात
माझ्या अस्तित्वापासून मलाच हिरावणारी...........................कातरवेळ
एक ना एक दिवस तो आपला होईल
या आशेवर तिने त्याचा पार क्षितिजापलिकडे पाठ्पुरावा केलाय
कधी लपुन तर कधी जाणिवपूर्वक मागावर असलेल्या
तिच्या चाहत्याला मात्र हुलकावणी देत पुरता हिरमोड केलाय
ना तो झाला कधी तिचा...........
ना कधी ती कुणाची झाली.........
आयुष्याच्या एकाकीपणांत अडकलेली
हुबेहुब माझ्या प्रतिबिंबासारखी........................................कातरवेळ
आजवर मनाच्या प्रत्येक रंगात
समरसून रंगत आली......
अशी ती..
कधी अधीर प्रेयसी.......
कधी विरागी जोगीण....
कधी शृंगारीक शहारा.......
कधी अनामिक हुरहुर.......
कधी स्वप्नांची रांगोळी.......
कधी चुकांची उजळणी.........
कधी दमलेली पायवाट........
तर कधी.......................
दूर हरवलेल्या आपल्या पाखरांना
परतीची साद घालत, घरट्यात बोलवणारी..........................कातरवेळ
प्रतिक्रिया
8 Mar 2015 - 9:30 pm | अवतार
लिहित राहा.
9 Mar 2015 - 12:45 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
परत एक सुंदर रचना...
आवडली.
9 Mar 2015 - 7:55 pm | एक एकटा एकटाच
प्रोत्साहनासाठी अवतार आणि मि. का. तुमचे मनपुर्वक आभार
17 Feb 2016 - 12:07 am | एकप्रवासी
उस्फुर्तपणा कवितेतला आवडला…