उज्जयिनीच्या लोहमार्ग स्थानकावरील विश्रामकक्षातच दुपारी थोडासा आराम करून, सुमारे तीन वाजता आम्ही स्थानकाधिकार्याहस विश्रामकक्ष सुपूर्त केला आणि इंदौरच्या दिशेने कूच केले. पहिले स्थलदर्शन, विमानतळ रस्त्यावरील “गोमतगिरी” हे जैन तीर्थक्षेत्र होते. हे स्थान स्वच्छ, सुबक आणि सुंदर होते. भव्य फरसबंद आवारात बाहुबलीची विशाल मूर्ती होती. इथे पर्यटक मात्र फारसे दिसले नाहीत.
बाहुबलीची विशाल प्रतिमा भव्य फरसबंद आवार
शेजारच्याच टेकडीवरचे सिद्धकाली मंदिर आणि मंदिरापाठची सिद्धकालीमातेची मूर्ती
आजचा मुक्काम आमचा नखराली ढाणीत होता. “नखराली ढाणी” हे इंदौरच्या दक्षिणेला महू रस्त्यावर १४ किलोमीटर अंतरावर, रंगवासा, राऊमध्ये १९९५ पासून वसलेले, एक संस्कृती-ग्राम-निकेतन आहे. इथे राजस्थानी आणि माळवी संस्कृतीची झलक आपण पाहू शकतो. एका अल्पोपहारगृहाच्या सजावटीचा भाग म्हणून सुरूवात होऊन एवढ्या वर्षांत, इंदौरी रुचीकर सांजजीवनाचे प्रतीक म्हणून ते विकसित झाले आहे. राजस्थानी आणि माळवी सांस्कृतीची झलक म्हणून ते आज सर्व मध्यप्रदेशात विख्यात आहे. २८ एकर भूमीवर वसलेले हे गाव, आपल्याला पारंपारिक उत्सवी वातावरणात घेऊन जाते. पारंपारिक मनुहारी पद्धतीने केळीच्या पानावर राजस्थानी आणि माळवी रुचकर खाद्यपदार्थांचा आपल्याला आस्वाद घेता येतो. त्यात दाल-बाफेली, बाजरा रोटी, दाल-खिचडा असे अनेकानेक पदार्थ समाविष्ट असतात. ह्या गावात प्रवेश करण्यासाठीचे शुल्क दरमाणशी ४७० रुपये इतके असते. ह्यातच ह्या जेवणाचाही समावेश होत असतो. ह्याव्यतिरिक्त कठपुतळी, जादूचे प्रयोग, संगीत-नृत्याचे कार्यक्रम, उंटावर सवारी इत्यादी कार्यक्रमांतूनही सहभागी होता येते. प्रत्येकी ४७० रुपये किंमतीचे निराळे तिकीट काढून आम्ही ह्या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. आम्हीही इंदौरमध्ये राहण्याकरताही ह्या जागेचीच निवड केली होती. मात्र सुमारे २० किलोमीटर शहराबाहेर असल्याने, रहिवासाच्या उद्दिष्टाकरता हे गैरसोयीचे ठरते असे लक्षात आले. रहिवास खर्चाच्या दृष्टीने मात्र शहरातील रहिवासापेक्षा हा रहिवास अर्ध्याच खर्चात प्राप्त होत असतो.
नखराली ढाणीतील भोजन आणि रहिवासाची व्यवस्था
दुसरे दिवशी सकाळी ९०० वाजताच्या सुमारास आम्ही तयार होऊन इंदौर शहराच्या स्थलदर्शनार्थ बाहेर पडलो. लालबाग महालाचे मुख्य प्रवेशद्वार १००० वाजता उघडत असल्याने, पहिल्यांदा बडे गणपती मंदिरात गेलो. हे मंदिर एका खासगी मालमत्तेचा भाग आहे. इंदौरातील असंख्य भाविक इथे दर्शनास येत असले, तरी पर्यटकाने हे मंदिर प्राधान्याने पाहावे असे नाही. मंदिरात व्यवस्थित बसता येईल अशी जागाही नाही.
अन्नपूर्णा मंदिर आणि त्यापाठीमागचे प्रशस्त वेदमंदिर सभागृह
नंतर आम्ही गेलो अन्नपूर्णा मंदिरात. हे मंदिर भव्य, सुंदर आणि स्वच्छ आहे. मंदिराच्या पाठीमागे एक वेदपाठशाळा आणि वेदांचे मंदिरही आहे. हे मंदिर म्हणजे वेदपठणाकरताचे प्रशस्त सभागृहच आहे. त्यात चारही वेदांच्या मूर्ती आहेत.
वेदमंदिराचे प्रवेशद्वार, वेदविद्यापीठाची इमारत, कासव आणि नंदी, विश्वरूपदर्शन देखावा
त्यातील वेदांच्या मूर्ती मी पहिल्यांदाच पाहत होतो. अथर्ववेद हनुमानासारखा तर सामवेद नंदीसारखा दिसत होता. यजुर्वेद आणि ऋग्वेद नंदीसारखे दिसत होते. याबाबत मला काहीच माहिती नव्हती. अन्नपूर्णा देवीची शोभा यात्रा त्रिंबकेश्वरला रवाना होत असल्याने तिथेही कुणी माहिती देण्याच्या परिस्थितीत नव्हते. वेदांच्या मूर्तींच्या डोक्यावरच्या भिंतीवर गीतेतील विश्वरूपदर्शनाचा देखावा चितारलेला होता.
वेदमूर्ती अशा का आहेत ते मला माहीत नाही.
त्रिंबकेश्वरला निघालेला अन्नपूर्णा शोभायात्रेचा रथ आणि त्याचाच पाठीमागचा देखावा
कुणाही पर्यटकाने अवश्य भेट द्यावी असेच हे अन्नपूर्णा मंदिर आहे. नंतर आम्ही जैनांचे काचमंदिर पाहिले. तळ, भिंती आणि छतही काचांचे भौमितिक तुकडे जडवून सुशोभित केलेले आहेत. ह्याव्यतिरिक्त विशेषत्वाने भेट द्यावी असे इथे काहीही नाही. ते पाहून झाल्यावर आम्ही जुना राजवाडा पाहण्यासाठी गेलो. हा होळकरांचा सात मजली राजवाडा हल्ली पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असून सुव्यवस्थित व स्वच्छ ठेवलेला आहे.
सात मजली राजवाडा, त्याचे आतल्या बाजूने दर्शन, १ल्या मजल्याचा जिना
१ल्या मजल्याचे प्रवेशद्वार, दिवाणखाना, जाळीदार दगडी खिडकी
राजदरबार, राजगद्दी
राजवाडा पाहून होता होताच आम्हाला राजवाड्यातील उजवीकडच्या भिंतीजवळील, जिन्याशेजारचे महाद्वार उघडतांना दिसले. एक दुचाकी आत आली. आम्ही चौकीदारासच विचारले की, “काय हो, इकडे मल्हारी मार्तंड मंदिर कुठे आहे?” त्याने ताबडतोब दार उघडून धरले आणि बाहेरून राजवाड्यापाठीमागे गेल्यास ते दिसेल असे सांगितले. आम्ही बाहेर पडताच दरवाजा बंद करून घेतला. म्हणजे आम्ही काय वेळ साधली होती! वा!! एरव्ही आम्हाला राजवाड्यातून बाहेर पडून पुन्हा त्याच्या उजवीकडून पाठीमागेपर्यंत मोठाच वळसा पडला असता. असो.
आम्ही मल्हारी मार्तंड मंदिर पाहिले आणि आम्हाला आमच्या प्रयासाचे सार्थक झाले असे वाटले. ते खरोखरीच पाहण्यासारखे आहे. स्वच्छ सांभाळले आहे. तिथे आम्हाला अतिशय प्रसन्न वाटले. होळकरांच्या राजघराण्याचे असंख्य तपशील असलेले फलक निवांत वाचता आले. मल्हारी मार्तंडाचे दर्शनही झाले.
डाव्या बाजूस शिवलिंग मध्यभागी गणेशमूर्ती नटराजमूर्ती उजव्या बाजूस शिवमूर्ती
डाव्या मार्गिकेतील नटराज, दुरून जवळून मधल्या चौकातील हिरवाई
मल्हारी मार्तंड मंदिर, मंदिराचा अंतर्भाग
होळकरांची राजमुद्रा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, पालखीचे साहित्य
ह्यानंतरचे स्थलदर्शन होते लालबाग महालाचे. हिरव्यागार वृक्षराजीने नटलेल्या विस्तीर्ण आवाराच्या अंतरंगात हा भव्य महाल विराजमान आहे. पुरातत्त्वखात्याच्या अखत्यारीत असल्याने १० रुपये प्रवेश तिकीट आहे. आजूबाजूची बाग निगुतीने फुलवलेली आहे. महालात कॅमेरा वर्ज्य असल्याने आतले फोटो नाहीत.
लालबाग महालाचा दर्शनी भाग, भव्य प्रवेशद्वार, महालाची उजवी कडा
जुना राजवाडा आणि लालबाग महालातील समृद्धीवरून होळकरांच्या मराठी सत्तेची, हुकुमतीची पुरेशी कल्पना येते. सर्व उत्तर भारतातील, महत्त्वाच्या सर्व नद्यांवर घाट बांधणे; धर्मक्षेत्री धर्मशाळा उभारणे; जागोजाग शिक्षणाची, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करवून देणे इत्यादी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या समाजोपयोगी पुण्यकर्मांचा वास्तविक आधार, हीच प्रजासंपत्ती होती. मात्र तिचा सदुपयोग भारतात, अहिल्यादेवींइतका कुठल्याही शासकाने केल्याचा इतिहास नाही. धन्य त्या माळव्यातील प्रजेची, जिने आपल्या अथक परिश्रमांतून एवढ्या भव्य संपत्तीची निर्मिती केली आणि धन्य पुण्यश्लोक अहिल्यादेवींचीही, ज्यांनी प्रजेची संपत्ती प्रजाकारणी व्ययास लावली.
महाजालावरून घेतलेले हे अंतर्भागातील प्रकाशचित्र आतल्या समृद्धीचे प्रतीक आहे.
गुरूकृपा रेस्टॉरेंटमध्ये महेश्वरला सहस्रधारा धबधब्याकडे
एवढे स्थलदर्शन होता होताच भूकही लागली होती. आम्ही स्टेशननजीकच्या गुरूकृपा रेस्टॉरेंटमध्ये रुचकर जेवण घेतले आणि महेश्वरची वाट घरली. वाटेत आम्ही पाताळपाणीचा धबधबा पाहणार होतो. मात्र महू (खरे तर, एम.एच.ओ.डब्ल्यू., म्हणजे मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर) पासून पुढे तासभर खडतर रस्त्याने प्रवास केल्यावर, रस्त्याच्या बांधकामाकरता अरुंद रस्त्यावर खडीचे ढिगारे रचून, मोठमोठी उठाठेव यंत्रे, खडी पसरवित होती. सुमारे एक किलोमीटर असल्या रस्त्यावरून गेल्यास, आमचे वाहन रूतून बसेल व बाहेर काढण्यात बराच वेळ जाऊ शकेल. ह्या चालकाच्या सूचनेवर आम्ही त्यालाच योग्य तो निर्णय घेण्यास सांगितला. त्याने पाताळपाणीचा नाद सोडून आम्हाला पुन्हा महूस आणले व मग महेश्वरचा राजमार्ग पत्करला.
संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही महेश्वरच्या “नर्मदा रिट्रिट” ह्या मध्यप्रदेश पर्यटन विकास मंडळाच्या (एम.पी.टी.डी.सी.च्या) रहिवासात जाऊन पोहोचलो. नितांत रम्य परिसरात, विस्तीर्ण आवारात वसलेला हा रहिवास, होळकरांच्या किल्ल्यापासून जवळच, नर्मदा तटाकी, उंचावर वसलेला आहे. आवारातून एक रस्ता सरळ किनार्यावरील नावांच्या धक्क्यावर लागतांना दिसला. आता झपाट्याने अंधार पडणार होता. म्हणून जलदीने चहापान करून, आम्ही लगेचच धक्क्यावर गेलो. आठ आसनांच्या स्वयंचलित नौकेतून आम्हाला तासाभरात सहस्रधारा धबधब्यापर्यंत फिरवून आणण्यासाठी नावाडी (नावाड्याला इकडे केवट म्हणतात) आठशे रुपये मागत होता. वेळ महत्त्वाची असल्याने आम्ही किंचितही वाद केला नाही. ती मुँहमांगी किंमतच मंजूर करून, सरळ नावेत जाऊन बसलो.
मावळत्या सूर्याकडे मजेचा प्रवास दक्षिण तीरीच्या वालुकाश्मी कातळावर नाव बांधून ठेवली
आकाश नावाचा आमचा अकरावीतला केवट, आम्हाला सहस्रधाराकडे घेऊन जाऊ लागला. नर्मदा नदी पश्चिमवाहिनी आहे. तिच्या उत्तर तीरावरून आम्ही बोटीत बसलो आणि प्रवाहाच्या दिशेने काही किलोमीटर अंतरावरील धबधब्याकडे जाऊ लागलो. दक्षिण तीरावरील धबधब्यानजीकच्या एका वालुकाश्मी कातळावर नाव बांधून ठेवली आणि पायीच सहस्रधारापर्यंत जाऊन आलो. धबधब्याचा आवाज, पार परतेपर्यंत कानात गुंजत होता. थंड हवेच्या झुळूकांतून केलेले ते नौकानयन खरोखरीच संस्मरणीय झाले होते.
परततांना दिवेलागणी झालेली होती. पर्यटन समाधानकारक होत होते. चालक विनय उदार (विनय हेच त्याचे नाव आणि उदार हेच त्याचे आडनाव होते) होता. तो विनयशील होता. तक्रारीस जागाच नव्हती.
मध्यप्रदेश सरकारने स्थानिक कोष्ट्यांच्या सहकारी संस्थेस चालवायला दिलेले दुकान रहिवासी आवारातच होते. आम्ही ताबडतोब संधीचा लाभ घेतला. दोन उत्तम साड्यांची खरेदी झाली. अडचण फक्त एकच होती. त्या संध्याकाळच्या उजेडात असंख्य पावसाळी कीडे त्या दुकानात स्वैर उडत होते. ग्राहक आम्हीच काय ते होतो. त्यामुळे निवांत पाहण्या, घेण्याचा कार्यक्रम पार पडला. फक्त सुती, रेशमी साड्या उलगडून पाहतांना आणि घड्या घालतांना त्यात कीडा राहून जायला नको म्हणून अतोनात काळजी घ्यावी लागत होती. कारण एखादा कीडाही जर राहून गेला, चिरडला गेला, तर साडीला कायमस्वरूपी रंगखूण देऊन जाणार होता.
आता आम्ही रहिवासात पोहोचलो होतो आणि वेळ होती माहेश्वरी, चंदेरी साडी खरेदीची.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा
दुसरे दिवशी सकाळी आमचा महेश्वर दर्शनाचा कार्यक्रम निश्चित केलेला होता. सकाळीच उठून तयार झालो आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या दर्शनार्थ होळकरांच्या राजवाड्यात दाखल झालो. अहिल्यादेवींच्या स्मृतीस सादर झालो. आपल्या तुलनेत अहिल्यादेवींची उंची, यथातथ्यपणे दाखवून देणार्या भव्य दिमाखदार पुतळ्यास, राजवाड्याच्या दर्शनी भागातच ठेवलेले आहे.
राजवाड्याच्या मागील बाजूस नर्मदेचे चाळीस घाट, दोन्ही तीरांवर व्यवस्थित प्रस्थापित केलेले दिसतात. राजवाड्यातून एका विशाल जिन्याने पूर्वेकडे उतरल्यावर अहिल्येश्वर मंदिर लागते. काळ्या कातळात उत्तम नक्षीकाम असलेली अनेक भित्तीशिल्पे हे ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. भव्य, प्रसन्न, स्वच्छ, सुंदर परिसरात सकाळच्या रामप्रहरी विहरतांना आम्हाला पर्यटनाचा अपार आनंद होत होता. मुंबईतून निघून योग्यच ठिकाणी पर्यटनास पोहोचल्याचे समाधान होत होते. अशा ठिकाणी जे लोक कायमस्वरूपी वास्तव्य करून होते, सुखेनैव राहू शकत होते त्यांच्याविषयी काहीशी असूयाच वाटू लागली होती.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील चोंडी गावच्या माणकोजी शिंद्यांची मुलगी अहिल्या [४], ही सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या एकुलत्या एक पुत्राची -खंडेरावाची- भार्या बनून कीर्तिशालिनी झाली. होळकरांची सून झाल्यानंतरच अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक वलये प्राप्त झाली. पती सहवासाचे सुख दुर्दैवाने त्यांच्या वाट्याला फारसे आले नाही. कर्तबगार, धार्मिक व उदार वृत्तीचा, मायेचा ओलावा लाभलेला सासरा आणि कणखर, करारी सासू गौतमाबाई यांच्या सहवासात अहिल्याबाईत आमूलाग्र बदल झाला. आयुष्यातील काटेरी वाट सुरुवातीला त्यांनी सासू-सासर्यांच्या धीरावरच चालण्याचा प्रयत्न केला. खंडेरावांच्या चितेवर सती जाण्याच्या तयारीत असलेल्या अहिल्येला तिच्या सासर्यांनीच, तिच्या राजकीय कर्तव्याची जाणीव करून देत, या विचारापासून परावृत्त केले. तत्कालीन काळखंडातील त्यांचे हे पुरोगामित्व, आज आपल्या डोळ्यांत अंजन घालणारे ठरते. सुनेला वाचायला, लिहायला शिकवले. घरची कामे, फौजेची व्यवस्था, वसुली, शत्रूच्या हालचालींवरची नजर या सार्यांची शिकवण तिला दिली, ती तिची पारख करूनच. सासर्यांच्या मृत्यूनंतर त्या एकाकी पडल्या खर्या, पण सासर्यांनी त्यांना खर्या अर्थाने कर्तबगार व आत्मनिर्भर घडविलेले असल्याने, येणार्या प्रत्येक प्रसंगाला त्यांनी मोठ्या हुशारीने, आत्मविश्वासाने तोंड दिले. त्यांचे शांत संयत रूप, परमेश्वरावरील निस्सिम श्रद्धा, या कामी महत्त्वाची ठरली. महेश्वरला भेट दिल्यानंतर आपल्याला याची साक्ष पटते. अहिल्याबाईंनी महेश्वरला राज्याच्या राजधानीचे ठिकाण हलविले होते. तेथूनच त्यांनी राजकारण केले. खरेतर अहिल्याबाई होळकरांचा अठ्ठावीस वर्षांचा कालखंड हा राजकारणापेक्षा समाजकारणाचाच अधिक होता, हे त्यांनी केलेल्या तत्कालीन कामावरूनच लक्षात येते.
राजवाड्याच्या परसातून दिसणारे नर्मदेचे घाट, सकाळच्या उन्हातील अहिल्येश्वर मंदिराचे दर्शन
मंदिरातील नक्काशीचे सुरेख नमुने. कातळातल्या त्या पत्थरी सौंदर्याची आपल्याला भुरळ पडत जाते.
मंदिरातून नर्मदा नदीत उतरणारा देखणा घाट व घाटावर विखुरलेल्या असंख्य शिवलिंगांपैकी एक.
मग आम्हाला एक माणूस भेटला. त्याचे नाव शेरू केवट. त्याने आम्हाला काल नदीच्या मध्यभागी एका बेटावर एकाकी उभ्या असलेल्या मंदिराचे नाव सांगितले. बाणेश्वर. त्याची एक स्वयंचलित आठ आसनी नावही होती. त्या नावेतून सुमारे अर्ध्या तासात बाणेश्वर दर्शन करून आणण्याचे तो तीनशे रुपये मागू लागला. पर्यटक असे आम्हीच काय ते होतो. आम्ही लगेचच होकार देऊन बाणेश्वराकडे कूच केले. सकाळच्या कोवळ्या उन्हातला तो नौकाप्रवास खरोखरच सुखकर होता. पावसाळ्यात एकेकदा नखशिखांत सगळेच जलमग्न होणारे, ते एकाकी बेटावरील मंदिर, सुंदर होते. पश्चिमाभिमुख होते. कोरीव कातीव पत्थरांतून चुनेगच्ची बांधकामाने घट्ट सांधलेले होते.
पूर्वेकडूनचे दर्शन, पश्चिमेकडूनचे दर्शन, पायर्या चढूनचे दर्शन व मंदिरालाच बांधलेली नाव
शिवलिंग पाठीमागची मूर्ती आणि मंदिराच्या पायर्यांवर आम्ही
अहिल्येश्वर मंदिरातील सुबक, सुंदर शिल्पाकृतींचे आणखी काही नमुने
अहिल्येश्वर मंदिरसमूहातून बाहेर पडल्यावर उजव्या हाताला कार्तवीर्याचे मंदिर आहे. म्हणजे सहस्रार्जुनाचे मंदिर. रामायण आणि महाभारतात उल्लेख असलेल्या महिष्मती नगरीचेच आधुनिक नाव महेश्वर आहे. महिष्मतीचा प्राचीन प्रशासक म्हणजे सहस्रार्जुन ह्याचेच ते मंदिर आहे. मात्र हे मंदिर महेश्वरात राजराजेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. “उपनिषद् की कथाए [५]” ह्या अनुदिनीवर कार्तवीर्याची पूर्ण गोष्ट सारांश रूपाने सांगितलेली आहे.
नवे राजराजेश्वर मंदिर, जुने राजराजेश्वर मंदिर आणि नर्मदा रिट्रिटमधून दिसणारे बाणेश्वर मंदिर
संदर्भः
४. अहिल्याबाई होळकरांची स्मृती जागवणारे: महेश्वर, सौ.पौर्णिमा केरकर, २७ ऑक्टोंबर २०१४
५. उपनिषद् की कथाए: काल का ग्रास
http://anuvad-ranjan.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
प्रतिक्रिया
4 Jan 2015 - 8:47 am | कंजूस
फारच छान आणि खर्चासह लिहिले आहे फोटोही छान.
4 Jan 2015 - 9:19 am | मुक्त विहारि
आवडले...
4 Jan 2015 - 9:40 am | प्रचेतस
वर्णन आणि फोटो खूप आवडले.
4 Jan 2015 - 10:52 am | मदनबाण
सुरेख माहिती ! यातील काही ठिकाणी मी अजुनही गेलेलो नाही. मार्तंड मंदिराचा अंतर्भागाचा फोटो काढण्यास मनाई आहे,तरी सुद्धा आपल्याला तो काढता आला हे विशेष वाटले ! :)
तुम्ही ज्या अन्नपूर्णा मंदिरात गेलात त्या मंदिराच्या प्रवेश्द्वाराच्या छतावर यंत्र कोरलेले आहे,का कोणास ठावुक पण माझ्या नजरेस ही यंत्रे पटकत येतात. या प्रवेश द्वाराचे फोटो खाली देत आहे :-
यंत्राचा स्पष्ट फोटो.
तसेच अनेक जणांना ठावूक नसलेले महत्वपूर्ण स्थान उजैन येथे आहे, ते म्हणजे श्री दत्त मंदिर हरसिद्धि क्षेत्र. या ठिकाणी अनिरुद्धानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या आज्ञेवरुन त्यांचे शिष्य नारायणानंद सरस्वती स्वामी महाराजांनी श्री वासुदेव महाराजांना दंडदान करुन त्यांचे प.पू.वासुदेवानंद सरस्वती महाराज असे नामाभिदान केले.
प.पू.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज {टेंबे स्वामी} यांनी येथे दंड धारण केल्यावर २३ वर्ष संपूर्ण हिंदूस्थान भ्रमण केले आणि शेवटी गरुडेश्वर {बडौदा,गुजरात} येथे समाधी घेतली. हे स्थान हरसिद्धि पाल, योगीपुरा उजैन येथे आहे.
{दंड ग्रहण स्थान}
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नाम तुझे बरवे गा शंकरा :- {श्री.अजित कडकडे}
4 Jan 2015 - 10:56 am | अजया
अावडले वर्णन.काही वर्षापूर्वी महेश्वरला जाण्याचा योग आला होता.त्या नितांतसुंदर परिसरात फक्त आम्हीच होतो.रमणीय ठिकाण तर आहेच पण पूण्यश्लोक अहिल्याबाईंची साधी राहाणी उच्च विचारसरणी दाखवणार्या त्यांच्या वस्तू,बैठक पाहुन भारावायला होतं अगदी.
महेश्वरी साड्या घ्यायलाच हव्या अशा!!आपण प्रत्यक्ष विणकराकडुन घेत असल्याने तिथे खात्रीच्या मिळतात.सर्व प्रकारच्या किंमतीत उपलब्ध असतात.
4 Jan 2015 - 11:03 am | मदनबाण
महेश्वरी साड्या घ्यायलाच हव्या अशा!!आपण प्रत्यक्ष विणकराकडुन घेत असल्याने तिथे खात्रीच्या मिळतात.सर्व प्रकारच्या किंमतीत उपलब्ध असतात.
इंदुरात "महालक्ष्मी" नावाचे साड्यांचे प्रसिद्ध दुकान आहे, तिथुन माझ्या बायडीला इंदुरी आणि महेश्वरी अशा साड्या घेतल्या आहेत. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नाम तुझे बरवे गा शंकरा :- {श्री.अजित कडकडे}
4 Jan 2015 - 1:44 pm | अजया
आहा!मस्तच!!दुकानाचे नाव लक्षात ठेवल्या गेले आहे,हे वे सां नलगे!!
4 Jan 2015 - 1:17 pm | कंजूस
आस्तिक आणि धार्मिक नसलो तरी आता आलोच आहे तर मूर्ती पाहून घेऊ {कल्पना श्रेय: सतीश गावडे}(आणि वल्लीशी चर्चा करायला एकदोन मुद्दे मिळतील)या हेतूने होळकरांचे राजवाड्यातले देवघर पाहिले होते. अहिल्याबाईने पुन्हा बांधून दिलेल्या ३६ देवळांची यादी पाहून थक्क झालो. सोमनाथ, आणि काशी विश्वेश्वरही आहे.
4 Jan 2015 - 7:37 pm | एस
हाही लेख मस्त.
अहिल्या हे मला वाटते चुकीचे आहे. खरा शब्द अहल्या असा आहे.
5 Jan 2015 - 1:54 am | कंजूस
अहल्या - अहिल्या, ग्वालिअर - ग्वाल्हेर, सिंदिया - शिँदे, इंदौर - इंदूर असा फरक आहे का? रामाच्या पदस्पर्शाने जिवंत झालेली कोण अ ह/हि ल्या?
7 Jan 2015 - 4:47 pm | नरेंद्र गोळे
कंजूस, मुक्त विहारि, वल्ली, मदनबाण, अजया आणि स्वॅप्स सगळ्यांना प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद.
मदनबाण,
माझ्या नजरेस ही यंत्रे पटकत येतात. >>> त्यांचे काय उपायोजन असावे बरे?
इंदुरात "महालक्ष्मी" नावाचे साड्यांचे प्रसिद्ध दुकान आहे >>>> हे आम्हालाही आधी माहिती नव्हते.
कंजूस,
अहिल्याबाईने पुन्हा बांधून दिलेल्या ३६ देवळांची यादी पाहून थक्क झालो.
सोमनाथ, आणि काशी विश्वेश्वरही आहे.>>>
इतर अनेक ऐतिहासिक व्यक्तिंच्या तुलनेत ह्यामुळेच अहिल्यादेवी सरस ठरते.
7 Jan 2015 - 5:06 pm | मदनबाण
माझ्या नजरेस ही यंत्रे पटकत येतात. >>> त्यांचे काय उपायोजन असावे बरे?
एक दुवा :- Yantra: Vedic Power Symbols
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)