गेल्या काही क्रिकेट खेळाडुंच्या निवृत्तीनंतर असे लेख आणि प्रतिक्रिया वाचण्यात आल्या की झाले .. आता क्रिकेट जग बुडले. क्रिकेट बघण्यात काही राम राहिलेला नाही. अरेरे, माझा प्रियतम खेळाडू <त्याचे नाव इथे टाका> कसोटी / एक दिवसिय /व-वीस (टी-ट्वेंटीचे मराठी रुपांतर) सोडून आता निवृत्त्त जीवन जगणार. आपले इतके दिवस कमावलेले पैसे मनसोक्त भोगणार, आपल्या कुटुंबासमवेत, मुलांबरोबर, मित्रांसमवेत मजा करणार. माझे काय व्हायचे आता ? कोणाला दूरचित्रवाणीवर मी रात्र रात्र जागून, (दिवसा सामना असेल तर) हातातले काम बाजूला टाकून क्रिकेट खेळतांना पाहणार ?
छे छे, मी या सगळ्या लेखकांना, प्रेक्षकांना, चाहत्यांना वाईट म्हणत नाही हो. मी ही त्यातलाच. क्रिकेट म्हटले की तहान भूक विसरून तासन्तास मैदानावर किंवा दूरचित्रसंचासमोर बसणारा. तुम्ही म्हणता त्या प्रत्येक खेळाडूचा चाहता.
पण एक माझ्या लक्षात आले आहे - आणि तुमच्याही आले असेलंच - कोणी निवृत्त झालं, संघातून काढलं गेलं, दुखापत झाल्यामुळे बाजूला पडलं, तरी क्रिकेट थांबत नाही. एक सुर्य मावळला तर दुसरा ऊगवतोच. एक सचिन निवृत्त झाला तर विराट पुढे येणारंच. धोनी जातो म्हणतो तर वृद्धिमान त्याची जागा घ्यायला तयार आहेच.
आणि आपण चाहते तरी कसे निर्लज्ज असतो - सचिन पुर्वी मारायचा हो चांगले, पण हा विराट त्यापेक्षाही चांगले मारतो की हो - असे म्हणायला तय्यार.
पण काही चाहते - भक्त म्हणा हवं तर - कट्ट्र असतात हां. विराट सचिनपेक्षा छान खेळतो म्हटले तर .. अरे तुम्ही गावसकरला पाहिले नाहीत - काय तन्त्र होते राव त्याचे, असे लगेच. त्या युगातुन बाहेर पडायला तयार नाहीतच. मला त्यांचेपण कौतुक वाटते. कारण सरळ आहे - इतिहास आठवायला डोक्याला जास्त कष्ट होतात, वर्तमानात जगण्यापेक्षा.
तर .. धोनी. तो म्हणाला की पुरे झाले आता. शरीर, मन आणि मेन्दू साथ देत नाही आता. दर सामन्याच्या शेवटी तेच - त्याच प्रश्नांना तीच ऊत्तरे. हो हो - पुढच्या सामन्यात खेळू चांगले. पुढचा सामना जिंकू आम्ही. आमचे चाहत्यांचे आशिर्वाद, शुभेच्छा आहेत आमच्या पाठीमागे.
हे असे किती वेळ चालणार हो ? त्यापेक्षा गेलेलेच बरे.
काही वर्षांपुर्वी - जेव्हा सचिन, राहूल, सौरव आणि लक्ष्मण नुकतेच संघात आले होते - त्या सुमारास आपण सगळे चाहते सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर संघातून गेल्याचं दु:ख वाटून घेत होतो. आता पुन्हा हीच वेळ आली आहे. नवी फळी तयार होते आहे. नवे तारे क्षितीजावर ऊगवत आहेत. विराट, विजय, धवन, पुजारा, यादव, आरोन, राहूल शर्मा, राहणे - हे सगळे ऊत्साहाने, जोषाने पुढे सरसावले आहेत.
नवी फळी ऊभी राहते आहे.
प्रतिक्रिया
3 Jan 2015 - 5:56 pm | उगा काहितरीच
बरं मग ?
4 Jan 2015 - 4:40 am | शेखर काळे
त्याला चांगली जिर्याची फोडणी मारायची आणि खावून टाकायचं झालं. आहे काय नि नाही काय ?
3 Jan 2015 - 7:39 pm | पैसा
तुमचे विचार आवडले आणि पटले. पण भारतात खरं तर क्रिकेट आता अति झालंय. त्यापेक्षा ऑलिंपिक्समधे ज्यात काही नाव मिळवता येईल अशा इतर खेळांकडे लोकांनी लक्ष दिले पाहिजे.
4 Jan 2015 - 4:39 am | शेखर काळे
अगदी पटलं.
पण असं पहा की क्रिकेट मधे रणजीपर्यंत जरी खेळाडू पोचला तरी बर्यापैकी पैसा मिळतो म्हणजे इतर काही न करता वर्षभर क्रिकेट खेळला तरी.
राष्ट्रीय प्रतीच्या खेळाडूला आपले धनार्जन स्वतःच करावे लागते - त्याला/तिला केवळ खेळून पुरेसा पैसा मिळू शकत नाही.
शिवाय, क्रिकेट अती झाले आहे यावर सर्वांचेच(बर्याच लोकांचे) एकमत आहे. पण त्याला पर्यायी खेळ काय ?
आपण किती वेळ बॅडमिन्टन, कबड्डी, मैदानी स्पर्धा, नेमबाजी, तिरंदाजी, सायकल स्पर्धा, इत्यादि, इत्यादि दूरथित्रवाणिवर कितपत पाहतो ?
4 Jan 2015 - 8:58 am | पैसा
अगदी हॉकी आणि बुद्धिबळ असेल तर आवर्जून बघतो.
4 Jan 2015 - 11:19 pm | नगरीनिरंजन
=)) =)) काहीतरी पाहिलंच पाहिजे का? टीव्ही बंद करणे हा एक पर्याय आहे. कोणत्याही खेळाचे उत्थापन करण्याची जबाबदारी आपल्यावर नाहीय! टीव्ही बंद करुन स्वतः खेळल्यास (अगदी क्रिकेटही) उत्तम.
बाकी नवी फळी वगैरे युद्धछाप भाषा संझगिरी वगैरेंनी अतिरेकी वापर केल्याने आता विनोदी वाटते.
6 Jan 2015 - 11:12 am | विशाल कुलकर्णी
<<कोणत्याही खेळाचे उत्थापन करण्याची जबाबदारी आपल्यावर नाहीय! टीव्ही बंद करुन स्वतः खेळल्यास (अगदी क्रिकेटही) उत्तम.>>>
प्रचंड सहमत.
4 Jan 2015 - 1:17 am | सोत्रि
कोण धोनी?
- (क्रिकेट्द्वेषी) सोकाजी
4 Jan 2015 - 4:42 am | शेखर काळे
कोपर्यावरचा धोबी - दर रविवारी सकळी येतो ना कपडे गोळा करायला. इस्त्रीपण मारून देतो ..
4 Jan 2015 - 5:38 pm | अत्रुप्त आत्मा
=))
5 Jan 2015 - 5:44 am | स्पार्टाकस
विराट, विजय, धवन, पुजारा, यादव, आरोन, राहूल शर्मा, राहणे
>>>>
राहूल शर्मा?
की
रोहीत शर्मा?
6 Jan 2015 - 11:03 am | शेखर काळे
रोहित शर्मा
5 Jan 2015 - 11:28 am | नाखु
जे खेळती चांगले ते ते आपुले फक्त ||
बाकीचे सोडीले इतरांसी स्वस्त ||
======================
क्रिकेट एक "सर्कस्-तमाशा फ्युजन" या "अ आ च्या"नव्या पुस्तकातून साभार