ये जरा भेटायला, घे ओंजळीतले फुल माझे
गंध सेवण्या तयाचा, काय सांग जाते तुझे ll १ ll
कळ्या पाकळ्या लाजतील, येता तुझ्या हातावरी
मृदू पाकळ्या केसरांस, जरा जडू दे गंध तुझे ll २ ll
या किनारी वाळूवरी, पुसती जरी साऱ्या खुणा
तू अशी साथ असता, पौर्णिमेचा रंग सजे ll ३ ll
सखे ग सहवास तुझा, रंगतो निळया लाटांपरी
पुन्हा होईल भेट तोवरी, लाट वाहील काय ओझे ll ४ ll
प्रतिक्रिया
26 Dec 2014 - 10:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'सेवण्या' शब्द जरा दाताखाली आलेल्या खड्यासारखा वाटतो.
बाकी, छान कविता. आवडली.
शेवटची ओळ केवळ क्लास. लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
26 Dec 2014 - 4:31 pm | एस
काहीशी साठोत्तरी कवितांच्या आधीच्या शैलीतील एक सरळ साधी कविता. विलक्षण गेयता आणि माधुर्य. प्रीतीची उत्कटता. स्वप्नाळूपणा आणि प्रेयसीची मृदू आळवणी. अशा कविता हल्ली फारच कमी दिसतात. त्यामुळे मुद्दाम लॉगइन करून प्रतिसाद लिहीत आहे.
किंचितसे बदल मला करावेसे वाटले तसे खाली दिले आहेत. पहा आवडताहेत का!
ये जरा भेटायाला, घे ओंजळीतले फूल माझे
गंध सेवना तयाचा, काय सांग जाते तुझे || १ ||
कळ्या-पाकळ्या लाजतील, येता तुझ्या हातावरी
मृदू पाकळ्या केसरांस, जरा जडू दे गंध तुझे || २ ||
या किनारी वाळूवरी, पुसती जरी साऱ्या खुणा
तू अशी संगे असता, पौर्णिमेचा रंग सजे || ३ ||
सखे गं सहवास तुझा हा, रंगतो निळया लाटांपरी
पुन्हा होईल भेट तोवरी, लाट वाहील काय ओझे || ४ ||
29 Dec 2014 - 1:58 pm | सार्थबोध
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे