मित्रहो,
आजच सुरू करण्यात आलेला 'तिसरी मुंबई' हा धागा पाहून मनात विचार आला की वर लिहिलेल्या (रबर लागवड) विषयावर मिपाकरांची मते घ्यावीत. ("गुंतवणूक" आणि "जमीन खरेदी" यापलिकडे या दोन विषयात काहीही समानता नाही हे आधीच नमूद करतो).
पार्श्वभूमी अशी:
नुकत्याच एका केरळीय मित्राकडून विचारणा झाली, "तुमच्या महाराष्ट्रात, कोकणात कुठेतरी रबर लागवड होत आहे असे ऐकले. खरे काय?"
मी कोकणातला असूनही मला याबद्दल केवळ ऐकीव माहिती होती. त्याचा या विषयातील रस पाहून उत्सुकता मात्र वाढली. मग असे ठरले की दोघानी यासंदर्भात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करायची. स्वत: या व्यवसायात शिरण्याचा विचार मात्र मी केला नव्हता.
नियोजित दिनी आम्ही दोघानी (शिवाय एक स्थानिक निकटवर्तीय स्नेही सोबत होते) सावंतवाडीला मध्यवर्ती ठेवून चहूदिशांना साधारण ६० किमीच्या परीघात शोध चालू केला. उत्तरेस आकेरी आणि दक्षिणेस दोडामार्ग अशी तीन दिवस निरंतर भटकंती केल्यावर या भागात केरळीय बांधवांनी किती मोठ्या प्रमाणात हा नवा व्यवसाय उभा केलेला आहे याचा अंधुक अंदाज आला.
*****
पुढे जाण्याअगोदर रबर या विषयाची काही पायाभूत माहिती देणे आवश्यक आहे. ही सर्व माहिती मला भटकंतीदरम्यान केरळीय मित्रांसोबत मारलेल्या गप्पांमधून मिळालेली आहे, त्यामुळे यात चुका असू शकतात. जाणकारांनी दुरुस्ती केल्यास स्वागतच आहे.
वर उल्लेखिलेल्या कोकणी भूभागात हजारो नसेल, पण नक्कीच काही शे एकर रबर लागवड केरळीय लोकांनी केलेली आहे. कोकणातील बराच (सगळा नव्हे) भाग या पिकास अनुकूल आहे असे मानले जाते. सावंतवाडीशिवाय कणकवली, राजापूर, दापोली या भागातही रबर लागवड करण्यात आलेली आहे. पण जसजसे उत्तरेकडे सरकावे, तसतसा जमिनीचा स्तर खालावतो असे मानले जाते.
रबर लावण्यासाठी जमीन ही अतिशय स्पेसिफिक प्रकारची असावी लागते. असेही म्हणता येईल की, माझ्या जमिनीत रबर उत्तम होत असेल, तरी बाजूला चार घरे टाकून रबर तेवढेच चांगले होईलच असे नाही.
- मध्यम उतार (तीव्र नाही, सपाटही नाही)
- लाल माती उत्तम
- जमिनीत सदोदित आर्द्रता असणे आवश्यक. म्हणजे शक्यतो - उन्हाळा वगळता - पाणी देण्याची गरज भासू नये अशी.
- पाण्याचा स्रोत असल्यास उत्तम (पाणथळ जमीन मात्र नको).
- किमान पाच एकर क्षेत्र असेल, तरच आर्थिकदॄष्ट्या किफायती.
- जमिनीची किंमत काय पडली हेही महत्वाचे. (पिढीजात जमीन असल्यास अर्थातच हा मुद्दा लागू नाही)
- लागवड करण्यापूर्वी यांत्रिक पद्धतीने जमिनीचे स्तरीकरण करावे लागते.
- रस्त्यालगत असणे आवश्यक नाही. (साटेली, दाणोली यासारख्या गावांमधून मल्याळी लोकांनी दुर्गम डोंगरमाथे साफ करून रबर लावलेले आहे. तिथे तासभर पायवाटा तुडवल्याशिवाय पोचणे अशक्य).
रबर या पिकाचे काही बरे-वाईट गुणधर्म:
- कीड-रोग यांचा त्रास कमी
- एकदा लागवड केल्यावर पुनर्वर्ती खर्च फार कमी.
- सात वर्षांनी उत्पादन सुरू होते.
- रबराची रोपे वाढत असेपर्यंत, पहिली तीन वर्षे आंतरपीक घेता येते. मसाले लावल्यास अधिक उत्पन्न मिळते, पण मनुष्यबळ जास्त लागते. शिवाय ते नाजुक पीक आहे. एकंदरीत आमच्या मर्यादांचा विचार करता, अननस हा पर्याय आम्हाला योग्य वाटला.
आर्थिक बाजू:
- पूर्वतयारी आणि लागवड या दोहोंकरिता बँका कर्ज देतात, ज्याची परतफेड सात वर्षांनंतर सुरू होते.
- रबर बोर्डाकडून सबसिडी मिळते. (सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठे क्षेत्र रबर लागवडीखाली येऊ लागल्यामुळे रबर बोर्डाने आपले ऑफिस गोव्याहून सावंतवाडीला हलवले आहे).
******
खरेदीसाठी उपलब्ध असलेले अनेक जमीनतुकडे पाहिले. त्यापैकी काही लघुसूचित केले. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, रबर शेतीतील अनुभवी असा एक केरळीय व्यावसायिक तिकडून बोलावून घेतला आणि त्याचेही मत घेतले.
हे ज्ञानार्जन (आणि वाहनसारथ्य!) करत असताना हळूहळू मनातील "स्वतःची जमीन असावी" ही वर्षानुवर्षे सुप्त राहिलेली इच्छा उफाळून आली. शेतीव्यवसायाशी वैयक्तिकरीत्या कधीही संबंध आलेला नव्हता. रबर सोडाच, पण एकूण 'शेती' या विषयाचे आर्थिक गणित काय असते याची सुतराम कल्पना नव्हती. पण या, आणि अशा असंख्य कठीन प्रश्नांना मनातल्या मनात "होऊन जाऊ दे" हे एकच उत्तर दिले आणि जमीन घेण्याचा निर्णय घेतला. विसारा देऊन करारही केला. एकूण आम्ही तीन भागीदारांमध्ये ३० एकर जमीन घेणार आहोत. सध्या वकिलांकरवी जमिनीचा वारसतपास, फेरफार निरीक्षण इ. करवून घेत आहोत.
यापुढील विचार असा आहे:
- मार्च २०१५ मध्ये खरेदीखत करून जमीन ताब्यात घेणे, सोबत कर्ज मिळवण्यासाठी आवेदन करणे.
- मे महिन्यापर्यंत यंत्रसामग्री वापरून स्तरीकरण करून घेणे
- पहिला पाऊस होताच (१० जूनच्या आसपास) रबर लागवड करणे
- आंतरपिकाची (अननस) लागवडही सोबतच करणे.
- सबसिडीसाठी अर्ज करणे.
- लागवड होऊन रोपे जोम धरेपर्यंत तात्पुरता केरळीय नोकर ठेवणे. नंतर स्थानिक राखणदार नेमणे.
****
माहीतगारांकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे. आगाऊ धन्यवाद.
प्रतिक्रिया
25 Nov 2014 - 4:55 pm | कपिलमुनी
या क्षेत्राची माहिती नसल्याने तुम्हाला फक्त शुभेच्छा !
तुमचा प्लांट सुरू झाला की बघायला यायला नक्की आवडेल .
या निमित्ताने एक वेगळा आणि माहितीपूर्ण विषय चर्चेला आला आहे त्याचे स्वागत
25 Nov 2014 - 5:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या उपक्रमाला हार्दीक शुभेच्छा !
25 Nov 2014 - 5:58 pm | एस
शुभेच्छा! फक्त असलेलं जंगल उजाड करून लागवड करणे शक्य होईल तितपत टाळावे अशी एक सूचना नक्कीच करावीशी वाटते.
27 Nov 2014 - 7:49 am | चलत मुसाफिर
अंडे फोडल्याशिवाय ऑम्लेट करता येत नाही असे म्हणतात. विनोद अलाहिदा, इथे मूळ जमिनीवर फक्त दुय्यम जंगल आहे. "वॄक्ष" म्हणावे असे फार कमी. शिवाय रबराची झाडे येणार आहेतच.
25 Nov 2014 - 6:30 pm | कंजूस
बेधडक नवीन क्षेत्रांत गेल्याबद्दल अभिनंदन.
आता तुम्ही जमीनही खरेदी केली आहे आणि तीन भागीदारही आहेत त्यामुळे आणखी नकारात्मक मत मांडण्याची इच्छा नाही. सत्तरच्या दशकात दिवेकर नामक व्यक्तीने स्वबळावर पाली जवळच्या पडघवली येथे प्रथम रबर लागवड केली होती. अर्थात हा भाग उत्तर कोकण आहे आणि तुमच्या माहितीप्रमाणे तेवढासा लागवडीला अनुकूल नाही.
अमृता टिव्ही चानेल(मलयाळम)वर पूर्वी हरितभारतम हा बागायतीचा कार्यक्रम असायचा यात फार माहिती असायची त्यांच्याकडे विचारून सीडी मागवा .
या झाडांत मधमाशा पालन चांगले होते असा काहींचा अनुभव आहे.यासही अनुदान मिळेल.
27 Nov 2014 - 7:55 am | चलत मुसाफिर
अहो, निंदकाचे घर... असे म्हटलेच आहे. तुम्ही निंदक नक्कीच नाहीत. मिपाकरांची स्पष्ट मते घेण्यासाठीच हा विषय इथे आणला आहे. तुम्हाला यात काही धोका दिसत असेल जरूर सांगा.
25 Nov 2014 - 6:32 pm | प्रसाद गोडबोले
आपण ह्या विषयात सीरीयस असल्यास
मायबोली वरील आमचे मित्र भुंगा उर्फ मिलिंद पाध्ये http://www.maayboli.com/user/28799 ह्यांच्या कडे चौकशी करावी असे सुचवत आहे !
25 Nov 2014 - 6:41 pm | मिलिंद
फक्त रबर आहे मिपासारखे जास्त ताणू नका म्हणजे झालं....
(ह. घ्या.)
25 Nov 2014 - 6:50 pm | सौंदाळा
शुभेच्छा
तुम्ही अभ्यास तर केला आहेच तरीपण
हे वाचुन माकडांपासुन अननसाला जपा असे सांगेन. अननस तयार झाला की त्याचा वास दरळतो आणि सावंतवाडी, दोडामार्ग वगैरे परिसरात माकडांचा भयंकर उपद्रव होतो. योग्य ती काळजी घ्या
तुमचे पुढील अनुभव इकडे नक्की लिहा.
27 Nov 2014 - 7:56 am | चलत मुसाफिर
हा मुद्दा लक्षात आला नव्हता. धन्यवाद.
25 Nov 2014 - 7:03 pm | खेडूत
चांगली माहिती वाटली . असे खरेच असेल तर ठीकच.
तुम्हाला नाउमेद करण्याचा हेतू नाही पान फसवणूक होणार नाही हे मात्र बघाच . कांही शंका आणि प्रश्न लगेचच आले:
१. कोकणातले शेतकरी जमीन का विकत आहेत? खरंच फायदा असेल तर केरळी लोकांनी कंत्राटी शेती करावी- करवून घ्यावी. विकत का घ्यावी? अन्यथा तिथे गुंठामंत्री तयार होतील!
२. ही शेती काय दराने मिळत आहे?
३. सात वर्षे काही थोडा काळ नव्हे . चांगली गुंतवणूक पाच वर्षात दुप्पट परतावा देते . इथे ब्यांकेचा व्याजदर दिलेला नाही . पण फार फायदेशीर दिसत नाही. शिवाय रबर विकत कोण घेणार आहे?
''रबर बोर्ड'' कापूस एकाधिकार सारखे खरेदी विक्री पण करते का?
४. सात वर्षांपूर्वी अशी लागवड कुणी केलीय का? का रोप विकणार्यांचा धंदा चालू आहे?
समजा पाच वर्षांपूर्वी कुणी तिथे लागवड केलीय, तर दोन वर्षे थांबून बघायला हरकत नाही . तोपर्यंत दोन वर्षे तुमची सध्याची ठरवलेली गुंतवणूक म्युचुअल फंडात वाढतच राहील . :)
दिवस अखेर काय देऊन काय मिळवले हे महत्वाचे !
बाकी
>> पूर्वतयारी आणि लागवड या दोहोंकरिता बँका कर्ज देतात, ज्याची परतफेड सात वर्षांनंतर सुरू होते.
-- बहुधा शंभर टक्के देत नाही . इतरांनी असे घेतले असल्यास त्या ब्यांकेत त्याचा प्रकल्प अहवाल पहायला मिळाल्यास जरूर अभ्यासावा. इतर काही नव्या गोष्टी कळतील .
>> "स्वतःची जमीन असावी" ही वर्षानुवर्षे सुप्त राहिलेली इच्छा उफाळून आली
-- यातील कायदेशीर बाबी पाहून घ्यालच.
आणि हो, प्रकल्पासाठी शुभेच्छा !
27 Nov 2014 - 8:17 am | चलत मुसाफिर
१. शेतकरी जमीन का विकतात या मुद्द्यावर मोठी चर्चा होऊ शकेल. शहरात राहणार्या सुखवस्तू मध्यमवर्गीयांची भावनिक गरज, हे कारण शेतकर्यांना जमीन विकण्यापासून परावॄत्त करील असे वाटत नाही.
२. जमिनीचा दर हा मुद्दा व्यवहार पक्का करताना विचारात घेतलेला आहे.
३. रबर धंदा केरळमधे आणि जगातही मोठ्य प्रमाणात केला जातो.
४. गुंतवणुकीवरील परताव्यासंदर्भातला मुद्दा समजला. पण ही खरेदी या उद्देशाने केलेली नाही. जमिनीची किंमत वाढत जाते हा भाग वेगळा. कायदेशीर बाबींची चौकशी करवून घेत आहोतच.
25 Nov 2014 - 9:28 pm | अर्धवटराव
अनेकानेक शुभेच्छा.
25 Nov 2014 - 10:13 pm | रेवती
वाचतिये. रबराच्या लागवडीबद्दल नवीनच कळते आहे. सौधिंडियन भारतातच नव्हे तर जगात सगळीकडे पसरले आहेत. ;)
26 Nov 2014 - 1:06 am | खटपट्या
काही प्रश्न
स्थानीक लोकांनी केलेली लागवड आढळली का? (नसल्यास कारणे कळली का?)
जागा घेतली आहे. तेथे पाण्याची व्यवस्था काय आहे?
रबर लागवडीचे प्रशिक्षण कुठे दीले जाते का? (दापोली क्रुषी विद्यापिठात प्रशिक्षण आणि भेट योजना होती. त्या अंतर्गत आंब्याची कलमे मोफत मिळत असत. तश्या प्रकारचे काही आहे का?)
वर खेडूत यांनी म्हटल्याप्रमाणे कोकणातील शेतकरी जर जमीनी विकत असतील तर ती बाब चिंताजनक आहे.
तुमच्या प्रकल्पासाठी शुभेच्छा.
27 Nov 2014 - 8:22 am | चलत मुसाफिर
१. केरळीय लोक इथे दहाएक वर्षांपासून आहेत. स्थानिक लोक आत्ता आत्ता रबराकडे वळू लागले आहेत. तेही अगदी थोड्या प्रमाणात.
२. पाण्याची व्यवस्था आहे.
३. रबराची रोपे केरळातून आणावी लागतात.
27 Nov 2014 - 8:44 am | खटपट्या
धन्यवाद, माहीती यासाठी घेत आहे की गावी वडीलोपार्जीत शेती पडून आहे. त्याठिकाणी असे काही करता येइल का या विचारात आहे.
27 Nov 2014 - 9:06 am | कंजूस
नकारात्मक लिहिण्यापासून (अगदी व्यनि करणे)थांबलो कारण तुमचा भागिदारी करार {असं होऊ नये -अगदी वेगळे होण्याची वेळ आल्यास काय करायचे ही कलमे -मुद्देही स्पष्ट केलेली असतील} झालेला आहे. कोणी कशाची जबाबदारी घ्यायची, कोणी हिस्सेदार नफ्याचे वाटेकरी होण्याव्यतिरिक्त पगारी कामही करायचे हे लिहिले असेल. ऐंशी टक्के प्रश्न(धोके) इथेच असतात. तुम्ही एकटेच मालक असता तर गोष्ट वेगळी असते .फार लिहिण्याचे टाळतो.
27 Nov 2014 - 9:30 am | गवि
वेगळ्या उपक्रमासाठी शुभेच्छा. अगदी थोडक्यात एकच नोंदवतो की तुम्ही पूर्णवेळ खुद्द तिथेच राहून (365 दिवस * कायम) हे रोजच्यारोज लक्ष घालून करणार असाल तरच यात पडा. स्टार्टप करुन देऊन मग शहरात राहून साईड बिझनेसप्रमाणे दुरुन नियंत्रण ठेवण्याचा बेत असेल तर it can be a devastating flop idea.
28 Nov 2014 - 2:54 pm | विनायक प्रभू
गवि शी वि सहमत.
३४५/३६५ नसेल तर आधीच "लोनावळा" क्लब ची में ब र शीप घेउन टाका.
27 Nov 2014 - 11:38 am | कंजूस
+गवि+
28 Nov 2014 - 12:46 am | मंदार कात्रे
http://www.youtube.com/watch?v=m-hrT7YsJX8
28 Nov 2014 - 12:51 am | मंदार कात्रे
रबर रोपे नर्सरी-
९८१९१७८४३०
९८९२३२३५१३
28 Nov 2014 - 9:26 am | प्रसाद१९७१
@चलत मुसाफिर, तुमचा रबराची शेती कीती फायदा देइल ते माहीती नाही, पण जमिनीतली गुंतवणुक नक्कीच फायदा मिळवुन देइल.
29 Nov 2014 - 4:57 am | आनन्दिता
दापोली ला कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्फत कोकणातील रबर लागवडीसाठी मार्गदर्शन केले जाते. तिथल्या हॉर्टीकल्चर आणि एक्सटेंशन डिपार्ट्मेंटशी संपर्क करुन सल्ला मिळवता येईल. सगळ्यात उत्कृष्ट मार्गदर्शन तुम्हाला तिथेच मिळेल असे मला वाटते.
दापोलीच्या हॉर्टीकल्चर डिपार्ट्मेंट चा रबर लागवडी संदर्भात " लाखी बाग" नावाचा एक प्रकल्प पण आहे. एकरी एक लाख उत्पन्न देणार्या रबर लागवडीवर हा प्रोजेक्ट आहे
या प्रकल्पाला भेट देण्यासाठी सर्वांना मुभा आहे, सोबत योग्य ती माहीतीही देण्यात येते.
29 Nov 2014 - 11:56 am | सुबोध खरे
http://www.newindianexpress.com/states/kerala/2014/11/29/States-Economy-...
http://www.business-standard.com/article/markets/fall-in-crude-price-fav...
30 Nov 2014 - 6:26 pm | राजेंद्र मेहेंदळे
तुमचे अभिनंदन.
सध्या एक पुस्तक वाचतोय "निसर्गपूर्ण" त्यात पर्यावरण क्षेत्रात काम करणा र्या लोकांचे अनुभव आहेत. आणि हेच कार्यक्षेत्र निवडलेल्यांपैकी केतकी घाटे आणि मानसी करंदीकर यांचा एक लेख वाचुन त्यांचा संपर्क देतोय. प्लॉटवर कुठ ली झाडे लावावीत यासारख्या विषयातील तज्ञ आहेत.
आयकॉस,पुणे,
२१०,सिद्धार्थ टॉवर, कोथरुड ४११०२९
oikas@oikas.in
2 Dec 2014 - 4:18 pm | तर्री
शेती मध्ये काम करणारे मजूर ही मोठी समस्या आहे. त्याचा विचार करावा ही विनंती.
आमची शेती काही वर्षपासून ओसाड आहे ! उगवलेले जंगल साफ करायला येणारा खर्चही परवडणार नाही.
शेती-उद्विग्न -
3 Dec 2014 - 7:00 am | खटपट्या
"शेतीमध्ये काम करणारे मजूर आणि त्यांच्या नाना तर्हा" या विषयावर एक पुस्तक होउ शकते.
10 Mar 2015 - 9:07 pm | शिव कन्या
घरात असलेली शेती निरनिराळ्या कारणांनी विकून शहराकडे वळणाऱ्यांच्या गर्दीत तुम्ही नवी शेती विकत घेण्याचे योजत आहात, हे चित्र आशादायक आहे.
संपूर्ण शेतात एकदम रबराचीच लागवड करण्याऐवजी, काही थोड्या एकरांवर आणखी एखाद्या पिकाचा [कमी तापदायक] विचार करता येईल का? जोडपिके कधीही उत्तम. पर्याय बरा पडतो. निर्णय शेवटी तुमचा.आम्ही आपले बांधावरचे मिपाकर !
11 Mar 2015 - 9:21 am | कंजूस
कृषी विद्यापिठातली दाखवली जाणारी बाग आणि उपक्रम यांच्या बाबत किती रू घातले आणि त्यातून किती मिळाले याबद्दल जरा शंका आहे.हीच गोष्ट आपण करू गेल्यास आतबटट्याची ठरेल असं वाटतं तिकडे पगारी नोकर ,मोठ फंड आणि फुकटची जमीनीतले प्रयोग यातून चकचकीत रम्य चित्र उभे करत असतील ते विश्वासार्ह नसतील.