एक उनाड दिवस- कान्हूरपठारावर

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
12 Oct 2014 - 3:50 pm

कान्हूरपठार-नगर, पुणे जिल्ह्यांमधे पसरलेला एक ओसाड, रखरखीत, बोडका प्रदेश, फारशा खोल नसलेल्या पण तरीही भरपूर दर्‍याखोर्‍यांनी व्यापलेला पठारी भाग. इथल्या विशिष्ट भूरचनेमुळे त्याहीपेक्षा निसर्गाच्या किमयेने इथे भूरूपांच्या चित्रविचित्र संरचना तयार झाल्या आहेत जशी निघोजची रांजणकुंडे, गुळूंचवाडीचा नैसर्गिक शिलासेतू, वडगाव दर्याचे लवणस्तंभ. ह्या नैसर्गिक भूरूपांबरोबरच विविध देवस्थांनांनीसुद्धा हा प्रदेश समृद्ध आहे जसे निमगावचा खंडोबा, कन्हेरसरची देवी, कवठ्याची यमाई. पश्चिम महाराष्ट्रातील बर्‍याच जणांची कुलदैवते ही याच प्रदेशातील आहेत. ह्या मध्ययुगीन देवस्थांनांबरोबरच इथे प्राचीन म्हणजेच साधारण ६ व्या, ७ व्या शतकात राष्ट्रकूट कालखंडात खोदली गेलेली ब्राह्मणी शैलीची लेणीसुद्धा आहेत. कधीची ही लेणी पाहायची होती शेवटी परवा अगदी अचानक ही लेणी पाहायला जाण्याचे ठरले आणि रविवारी मी, आत्मूबुवा आणि धन्या असे तिघेजण आत्मूबुवांच्या खेचरावर बसून निघालो.

आमच्या भटकंतीचा गूगल नकाशा

मोशीला चहासाठी थांबून पुढचा पडाव घेतला ते नारायणगावला राजकमलच्या सुप्रसिद्ध मिसळीपाशी. मिसळ हाणून आळेफाट्याला उजवी मारून नगर रस्त्याला लागलो. आळे गावापासून थोडेसे आत साधारण ३ किमी वर ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले त्या रेड्याची समाधी आहे. गंमत म्हणून आम्ही आत वळलो. समाधीमंदिर बर्‍यापैकी मोठे आहे. स्वागतकमानी, भक्तमंडप अशी जोरदार बांधकामे चालू आहेत. समाधीमंदिरातील गाभार्‍यात विठ्ठल रखुमाई आणि माऊलींची मूर्ती आहे. आणि खालच्या पातळीत रेड्याचे दगडी मुख कोरलेले आहे. एका दंतकथेचेही लोकांनी आधी दैवतीकरण आणि त्याअनुशंगाने नंतर बाजार मांडलेला पाहून गंमत वाटली. मंदिर पाहून झाल्यावर पुन्हा माघारी येऊन नगर रस्त्याला लागलो.

वाटेत गुळूंचवाडी ओलांडल्यावर अणे घाट लागतो. डावीकडच्या दरीत एक नैसर्गिक आश्चर्य दडलेले आहे ते म्हणजे गुळूंचवाडीचा नैसर्गिक शिलासेतू. मळगंगा नदीच्या प्रवाहामुळे कातळाला मोठे भगदाड पडलेले असून पुलासारखीच रचना तिथे तयार झालेली आहे. पावसाळ्यात नदीचा प्रवाह तिथून अगदी फुफाटत वाहतो. बाजूलाच मळगंगा देवीचे छोटेखानी मंदिर आहे. मी तो नैसर्गिक पूल अगोदरच एकदा खाली उतरून पाहिला असल्याने आणि इतर दोघांना उन्हातान्हात दरीत उतरण्यास फारसा इंट्रेस्ट नसल्याने आम्ही घाटातूनच पुलाचे विहंगम दर्शन घेतले आणि पुढे निघालो. आळेफाट्यापासून आमचे लेण्यांचे ठिकाण, टाकळी ढोकेश्वर साधारण ३८ किमीवर. रस्ता अतिशय उत्तम त्यामुळे लवकरच टाकळी ढोकेश्वर गावात पोहोचलो. हे तसे बर्‍यापैकी मोठे गाव. गावातूनच ४/५ किमीवर ढोकेश्वराचा डोंगर. गावात कोठेही ढोकेश्वर मंदिर विचारले तर गावकरी रस्ता सांगतात. गावातून बाहेर पडून मंदिर रस्त्याला लागलो. मंदिर म्हणजे डोंगरावरची ढोकेश्वर लेणी. सरत्या पावसाळ्यातही हा डोंगर तसा भकासच वाटत होता. हिरवाई असूनही नसल्यासारखीच आणि जी काही थोडीफार आहे ती देखील पुढच्या महिन्याभरात लयास जाईल.

रस्ता थेट लेण्यांच्या पायथ्यापर्यंत जातो. काही बांधीव तर काही खोदीव अशा पायर्‍या लेणीपर्यंत जाण्यासाठी आहेत. साधारण दोनशेच्या आसपास पायर्‍या असाव्यात. लेण्यांभोवती तट बांधला आहे आणि त्यातूनच प्रवेशद्वार केले आहे. तटाचे हे बांधकाम पेशव्यांच्या कालखंडात केव्हातरी झाले आहे. तटाच्या दरवाजात तत्संबंधी एक शिलालेख आहे. दरवाजाच्या आधी उजवे बाजूस एका यादवकालीन मंदिराचा अवशिष्ट भाग असून गाभार्‍यात काही शिवपिंडी तसेच दगडी पादुका कोरलेल्या आहेत. तर डाव्या बाजूस शरभ शिल्पांकित दगड बेवसाऊ पडला आहे.

१. ढोकेश्वराचा डोंगर
a

२. लेण्यांभोवतीचा तट
a

३. प्रवेशद्वाराअलीकडील मंदिर
a

४. मंदिरद्वाराच्या उंबरठ्यावरील शिल्प
a

५. प्रवेशद्वाराच्या डावीकडील शरभाचे शिल्प
a

६. प्रवेशद्वारातील शिलालेख

a

प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अजून काही पायर्‍या चढून आपला प्रवेश थेट लेणीच्या पुढ्यातच होतो.

ही लेणी राष्ट्रकूटकालीन. साधारण ६ व्या/ ७ व्या शतकात खोदली गेलेली. एक मोठं प्रमुख लेणं, त्याच्या बाजूला जराशा उंचीवर खोदलेले एक अर्धवट लेणं आणि एक खोलवर गेलेलं पाण्याचं टाकं अशी याची रचना. लेण्याच्या पुढ्यातच एक पेशवेकालीन दिपमाळ आहे. ही लेणी पाहून वेरूळच्या रामेश्वर लेणीची आठवण येते. तिथे डावीकडे गंगा आणि उजवीकडे यमुना. इथे मात्र उलट. डावीकडे यमुना व उजवीकडे गंगा. अगदी सहजी ओळखू येतात त्या त्यांच्या वाहनांमुळे. यमुना कासवावर उभी आहे तर गंगा मकरावर. दोन्ही मूर्ती बर्‍याच भग्न झाल्यात. भग्न झाल्या असे म्हणण्यापेक्षा इथला कातळाचे ठिसूळ असल्याने बरेच विदारण झालेय. त्यामुळे इथल्या मूर्ती काहीशा कुरुप दिसतात पण तरीही त्यांचे मूळचे सौंदर्य काही लपत नाही. दोन्ही नद्यांची वस्त्रे पारदर्शक असून ती त्यांचे प्रवाहीपण सूचित करतात. आधारासाठी आपला एक हात त्यांनी एका बटूच्या खांद्यावर ठेवला आहे. जणू आपला वेगवान प्रवाह त्या काहीसा आवरून घेत आहेत. तर वरती गंधर्व ही नदीची रूपे निरखत आहेत.

७.लेण्याबाहेरची दिपमाळ

a

८. कूर्माधिष्ठित यमुना
a

९. मकरारूढ गंगा

a

१०.गंगेशेजारीच मकराजवळ एका सेविकेची उत्कृष्ट मूर्ती कोरलेली आहे.

a

११. लेण्याचा दर्शनी भाग
a

१२. दर्शनी भागातील नक्षीदार स्तंभ

a

इथे आमचा झोपाळू मित्र प्रवेशद्वारातील ओसरीवरच आडवा झाला आणि लेणी पाहायला मी आणि आत्मुबुवा आत शिरलो.

सभापंडप, डाव्या आणि उजव्या कोपर्‍यातील उपमंडप अथवा अर्धमंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी ह्या लेणीची रचना. गर्भगृहाभोवती फेरी मारण्यासाठी कातळकोरीव मार्ग आहे. तसेच गर्भगृहात प्रवेशण्यासाठी उजवीकडूनही एक द्वार आहे. वेरूळच्या लेणी क्र. १४ (रावण की खाई) किंवा पुण्याच्या पाताळेश्वराच्या लेणीसारखी अशी ही रचना.

प्रवेशद्वारातून आत जाताच डावीकडे एक भव्य सप्तमातृकापट आहे. वीरभद्र (नंदी), ब्राह्मणी (स्त्री), माहेश्वरी (नंदी), कौमारी (मोर), वैष्णवी (गरूड), वाराही (वराह), ऐन्द्राणी (हत्ती), चामुंडा (कुत्रा) आणि शेवटी मोदकपात्रासह गणेश असा हा शिल्पपट.
ब्राह्मणीचे वाहन नेहमी हंस असते इथे मात्र ते स्त्रीरूपात दाखवलेले आहे. प्रत्येक मातृकेच्या हाती अथवा माडीवर त्यांची बाळे आहेत. वाराही ही वराहमुखी दाखवली असून चामुंडा तिच्या नेहमीच्या भयप्रद रूपात आहे.

१३. संपूर्ण सप्तमातृकापट
a

१४. वीरभद्र
a

१५. सप्तमातृका अधिक जवळून अनुक्रमे ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, ऐन्द्राणी आणि चामुंडा
a

१६. वराहमुखी वाराही
a

सप्तमातृकांच्या बरोबर समोर म्हणजेच प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजवीकडे एक उपमंडप आहे. त्यात आहे नटराज शिव अथवा शिवतांडव. दोन स्तंभांमुळे हा उपमंडप सभामंडपातून काहीसा वेगळा झाला आहे. त्रिशूळ, नाग, डमरू आदी आयुधे हाती धरून शिव तांडवनृत्य करत असून पार्वती, शिवगण, देवगंधर्व हे नृत्य पाहात आहेत.

१७. शिवतांडव
a

१८. शिवतांडव जवळून
a

१९. शिवतांडव पटाच्या दोन्ही बाजूच्या भिंतीत नागप्रतिमा आहेत.
a-a

सप्तमातृका तसेच शिवतांडव अशा दोन्ही पटांच्या बाजूला कक्ष खोदलेले आहेत. मातृकांशेजारच्या कक्षात कुठल्याश्या जुन्या मंदिरातल्या मूर्तींचे बहुत अवशेष आहेत. बहुधा पायथ्याचे हे कुठलेतरी यादवकालीन मंदिर असावे. कक्ष जाळी लावून कुलूपबंद केला असल्याने हे नीट पाहताच आले नाही मात्र जमेल तशी काही छायाचित्रे घेतली.

२०. सप्तमातृकाशिल्पपटाशेजारील कक्षातील जुन्या मूर्तींचे अवशेष (विष्णू)
a

२१. सप्तमातृकाशिल्पपटाशेजारील कक्षातील जुन्या मूर्तींचे अवशेष
a

शिवतांडवपटासशेजारच्या क़क्षात काही वीरगळ आडवे करून ठेवलेले आहेत.

२२. वीरगळ
a

एव्हाना माझी आणि बुवांची चर्चा ऐकून ढोकेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या गावकर्‍यांचे कोंडाळे झाले होते. त्यांच्या शंकांना आम्ही जमेल तशी उत्तरे देत होतो. स्थानिकांच्या दंतकंथा, मूर्तीं त्यांनी दिलेली चुकीची नावे पाहून थोडी मौजही वाटत होती. इतक्यातच त्यांनी गर्भगृहाच्या दरवाजातील एका मूर्तीकडे निर्देश केला आणि म्हणाले ही शनीची मूर्ती. अर्थात ही मूर्ती शनीची नसून ती होती आयुधपुरुषाची- त्रिशुलपुरुषाची.

कलचुरी, राष्ट्रकूट कालखंडात आयुधपुरुष द्वारपालांच्या भरपूर मूर्ती खोदल्या गेल्या. त्या आपल्याला वेरूळ, घारापुरी, टाकळी ढोकेश्वर अशा ब्राह्मणी लेण्यांत तसेच वेरूळ येथेच बौद्ध लेण्यांतही दिसून येतात. सर्वसाधारणपणे द्वारपाल आणि त्यांच्या शेजारी खालच्या बाजूस एक ठेंगणी व्यक्ती अशी यांची रचना. ह्या ठेंगण्या मूर्ती म्हणजेच द्वारपालांच्या हातातील आयुधे, इति आयुधपुरुष. तर टाकळी ढोकेश्वरच्या गाभार्‍याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूंना अशा आयुधपुरुष मूर्ती आहेत. पैकी उजवीकडील द्वारपालानजीकची आयुधपुरुष मूर्ती पूर्णपणे भग्न झाली आहे मात्र डावीकडील पूर्णपणे दृग्गोचर आहे. ती आहे त्रिशुळपुरुषाची. आता ही मूर्ती ओळखायला अगदीच सोपी कारण ह्याने हाताची घडी घातली असून मस्तकी त्रिशुळ धारण केला आहे. साहजिकच हा त्रिशुळपुरुषाकडे निर्देश करतो. शिवाय हे शैव लेणे असल्याने द्वारपाल त्रिशुळधारी असणे हे ही अगदी सुसंगतच.

ह्या आयुधपुरुषाच्याच बाजूला एक बैठी मूर्ती आहे तसेच त्याच्या खालच्या बाजूला कुठलासा प्रसंग शिल्पांकित केलेला आहे. ह्या मूर्ती खडकाचे विदारण झाल्यामुळे नीटशा ओळखता येत नाही. उजव्या बाजूच्या द्वारपालाच्या वरचे बाजूस मात्र धनाची थैली घेऊन चाललेला कुबेर सहजी ओळखू येतो. इतर दिक्पालांचा मात्र येथे अभाव आहे. सभामंडप आणि अंतराळ ह्यांना विभाजीत करणार्‍या स्तंभचौकटीवर गजान्तलक्ष्मी आणि उमा महेश्वर आहेत.

२३. गर्भगृहाचा दर्शनी भाग
a

२४. आयुधपुरूष द्वारपाल
a

२५. त्रिशुळपुरुष

a

२६. प्रवेशद्वाराच्या उजवीकडील कुबेर
a

२७. गाभार्‍यातील शिवलिंग
a

गर्भगृहाला फेरी मारण्यासाठी कातळातच खोदून काढलेला मार्ग आहे. वाटेत दोन अतिशय देखणे वीरगळ ठेवलेले आहेत.

२८. वीरगळ
a

२९. वीरगळ
a

३०. कातळकोरीव प्रदक्षिणा मार्ग
a

गर्भगृहाच्या प्रदक्षिणामार्गाच्या उजवे बाजूच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरही एक भव्य नंदीची मूर्ती कोरलेली आहे. एक फेरी मारून आम्ही लेणीच्या बाहेर आलो. आमचे झोपाळू मित्र नुकतचे झोपेतून उठत होते. परत एकदा त्यांना बळेबळे आत बोलावून सप्तमातृकांचे आणि इतरही दर्शन घडवले आणि तिघे लेण्याच्या बाहेर आलो.

लेण्याच्या डावीकडे एक पाण्याचे टाके आहे जे आहही पिण्यायोग्य आहे आणि त्याच्या वरच्या बाजूलाच एक लहानसे लेणे आहे. तेथे जायला उभ्या कातळावर पावठ्या खोदलेल्या आहेत. हे लेणे म्हणाजे एक लहानसा कक्ष असून आत काहिही नाही. इकडे मात्र धन्या आणि बुवा जाऊन आले.

३१. वरील लहानशा लेण्यकडे जाणार्‍या पावठ्या

a

थोडा वेळ थांबून आम्ही लेणी उतरायला सुरुवात केली. दुपारचे दोन अडीच वाजत होते. आता कुठे जायचे ह्याचा विचार चालू झाला. ठिकाणही ठरले, जुन्नरची हिनयान तुळजा लेणी. टाकळी ढोकेश्वर पार करून निघालो. काही अंतर पुढे जातात एक फलक सामोरा आला- कोरठण खंडोबा ८ किमी, बोरी १३ किमी. बोरी हे आमचे मूळ गाव. आमचे आजोबा देखील त्या मूळ गावी कधी गेले नाहीत पण कुठेतरी आमची नाळ मात्र त्याच्याशी जोडलेली राहतेच. कोरठण खंडोबा आमचे कुलदैवत. आतापर्यंत फक्त एकदाच तिकडे जाणे झाले होते. आता इतके जवळ आलोच आहोत तर कुलदैवताला भेटून यावे असे ठरले आणि तुळजा लेणीची भेट रद्द केली.

फाट्यावरून आत शिरलो. कोरठणला जाण्यासाठी पिंप़ळगाव रोठा इकडे यावे लागते. तिथून डावीकडे कोरठण खंडोबा ३ किमी तर उजवीकडे ६ किमी वर वडगाव दर्या. आधी कोरठण खंडोबाला गेलो. देवस्थान भले प्रचंड झालेय. इथेही श्रद्धेचा बाजारच. मूळ मंदिर मात्र १५ व्या शतकातले असून शके १४९१ चा अर्थात इ.स. १४१३ रोजीचा एक शिलालेख गर्भगृहाचा प्रवेशद्वारावर आहे.
खंडोबाची मूर्ती ही तांदळा स्वरूपात म्हणजेच धोंड्याच्या स्वरूपात ( धोंड्यावर नाक डोळे रेखाटलेली अशी) आहे.

३२. कोरठण खंडोबा देवस्थान
a

३३. सभामंडपातील स्तंभ जे हा मंडप खूप जुना आहे हे सूचित करतात.

a

३४. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील शिलालेख
a

३५. खंडोबा

a

कोरठण खंडोबाचे दर्शन करुन परत पिंपळगाव रोठा येथे आलो. तिथून सरळ ६ किमीवर वडगाव दर्या. इथली दर्याबाई ही आत्मुबुवांची कुलदेवी. वडगाव दर्याला एक नैसर्गिक आश्चर्य आहे ते म्हणजे इथले अधोमुखी आणि उर्ध्वमुखी लवणस्तंभ.

वडगाव दर्या नावाले अगदी साजेसे. एका खोलवर दरीत हे वसले आहे. कातळातील नैसर्गिक गुहेत दर्याबाई आणि वेल्हाबाई ह्या दोन देवींची मंदिरे आहेत. काही पायर्‍या उतरून दरीत उतरावे लागते. भोवताली उंच कातळ, समोर कातळातलाच नैसर्गिक ओढा, हिरवागार, शांत परिसर, माकडेही भरपूर. वडगाव दर्याचे आश्चर्य ह्या दोन मंदिरांत आहे. ही दोन्ही मंदिरे आतूनच एकमेकांना जोडलेली आहेत. मंदिरे म्हणण्यापेक्षा गुहा सयुक्तिक ठरावे. गुहांमध्येच देवतांची स्थापना केलेली आहे. दोन्ही गुहांत वरच्या छतातून अखंड पाणी टपटपत असते. ह्या शेकडो हजारो वर्षांच्या नैसर्गिक क्रियेने तयार होतात ते लवणस्तंभ.

इथल्या ठिसूळ खडकात चुनखडीचे प्रमाण फार. त्यांच्या संपर्कात कातळात झिरपलेले पाणी येते. हे पाणी हवेतील कर्बद्विप्रणील वायु मिसळल्यामुळे आम्लधर्मी बनते. अशा पाण्यात चुनखडी पटकन विरघळते त्यामुळे खडकात पोकळी तयार होते व हळूहळू चुनखडीयुक्त पाणी अर्थात क्षार किंवा लवण छतांवरील छिद्रांतून बाहेर यायला लागते. पाण्याच्या थेंबात क्षारांचे प्रमाण खूप जास्त असल्यास तेथे क्षार धरून ठेवण्याची पाण्याची क्षमता संपते व हे कण हळूहळू छताला चिकटायला लागतात व लोंंबकळल्यासारखे दिसतात त्याला अधोमुखी लवणस्तंभ अथवा स्टॅलाक्‍टाईट म्हणतात. हेच थेंब खाली जमिनीवर पडून तिथेही क्षारांचे स्तंभ तयार व्हायला लागतात हे खालून वर असे जाणारे असल्यामुळे त्यांना उर्ध्वमुखी लवणस्तंभ अर्थात स्टॅलाग्माईट असे म्हणतात. हे दोन्ही प्रकारचे स्तंभ वडगाव दर्या येथे आहेत. ह्यापूर्वी मी अधोमुखी लवणस्तंभ पाटेश्वर येथील वर्‍हाडघर लेणीसमूहात पाहिले होते. येथे मात्र दोन्ही प्रकार पाहता आले.

३६. वडगाव दर्या गुहामंदिर
a

३७. वेल्हाबाई मंदिरातील उर्ध्वमुखी लवणस्तंभ
a

३८. दर्याबाई मंदिरातील दीड पुरुष उंचीचे अधोमुखी लवणस्तंभ
a

३९. गुहांतील अधोमुखी लवणस्तंभ

a

४०. लवणस्तंभ निर्मितीची आजही चालू असलेली प्रक्रिया
a

४१. लवणस्तंभ निर्मिती
a

मंदिर आणि लवणस्तंभ पाहून निघालो. धन्या मात्र एव्हाना वैतागला होता. मात्र आता आमच्या वायफळ गप्पा सुरु झाल्या. विविध विषयांवर भरपूर गप्पा झाल्या, कित्येकदा निरर्थक. वाटेत स्पाला फोन करून त्यांचा राजगड ट्रेक कुठवर आला ह्याची विचारणा केली. थोड्याच वेळात अन्या दातारचा फोन आला. मग त्याला रात्री निगडी प्राधिकरण येथे भेटलो व जेवण करून घरी.

एकंदरीत कान्हूरपठारावरचा हा छोटेखानी दौरा अगदी झक्कास आणि नेहमीपेक्षा वेगळाच असा झाला.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Oct 2014 - 4:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख. धन्स...!
शेवटी धन्याचे हालच केले म्हणायचे.

आज रविवारची भटकंती केली असती तर मी नक्की आलो असतो
नगर तर मला जवळच.

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

12 Oct 2014 - 4:10 pm | संजय क्षीरसागर

काय हा स्टडी आणि निरिक्षण!

अप्रतिम
वाचनखूण साठवतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Oct 2014 - 4:31 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त, आवडला वृत्तांत.
दिपमाळेलाच ट्युबलाईट चे फिटींग केलेले पाहुन मजा वाटली.

त्या लवणस्तंभांजवळ डबे कशासाठी ठेवले आहेत?

पैजारबुवा

गुहेत छतावरून सतत पाणी ठिपकत असते. ते गोळा करण्यासाठी स्थानिकांनी डबे ठेवले आहेत.

नेहेमीप्रमाणेच वाचनिय,माहितीपूर्ण!

किसन शिंदे's picture

12 Oct 2014 - 5:22 pm | किसन शिंदे

गेल्या रविवारी गेलेलाय ते टाकळी ढोकेश्वर हेच ना?

सतिश गावडे's picture

12 Oct 2014 - 6:25 pm | सतिश गावडे

होय. हेच ते टाकळी ढोकेश्वर. :)

मस्त. याभागात कुठेच गेलो नाही त्यामुळे लक्षपूर्वक वाचले. फारच उद्भोदक नेहमीप्रमाणेच.

आता लेण्याच्या कालखंडाविषयी :भरलेला कलश, सेविकेचा चेहरा, गंगा यमुनाच्या शरीराची ठेवण /बांधा इत्यादी लेण्या दुसऱ्या शतकापासून आहेत हे स्पष्ट होते. नंतर सप्तमातृका आणि विरगळ आठव्या अथवा दहाव्या शतकांत खोदले असावेत. खंडोबा आणि शिललिंग तीनशे वर्षाँपेक्षा जुनी वाटत नाहीत.कुलदैवताचा आदर राखून विचारतो वल्ली तुमचे मत काय?

आपले सगळे अंदाज चुकीचे आहेत.

लेण्यांचा कालखंड ५ व्या / ६ व्या शतकाचा. राष्ट्रकूट राजवटीचा. सप्तमातृकापटसुद्धा तत्कालीनच. दुसर्‍या शतकातल्या ब्राह्मणी लेण्या आढळतच नाहीत.
वीरगळ हे खोदले गेलेले नसून ते सुट्ट्या दगडांवर कोरले गेलेले आहेत. माझ्या अंदाजानुसार ते यादवकाळातले आहेत. साधारण ११ ते १३ वे शतक.
खंडोबार मात्र १५ व्या शतकातला आहे. शके १४९१ असा कालोल्लेख असलेला स्पष्ट शिलालेखच मंदिरांत आहे.

ठीक आहे. त्या कलशावरून आणि सेविकेच्या शिल्पावरून शंका आली होती. असो.

प्यारे१'s picture

12 Oct 2014 - 6:00 pm | प्यारे१

नेहमीप्रमाणेच.

बाकी स्थानिक लोकांचे चेहरे बघण्याची दाट इच्छा झाली. :)

विलासराव's picture

12 Oct 2014 - 7:40 pm | विलासराव

बाकी स्थानिक लोकांचे चेहरे बघण्याची दाट इच्छा झाली. Smile

आमचं थोबाड पहा ना थोबाडपुस्तकावर!!!!!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Oct 2014 - 6:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच रोचक माहितीने भरलेला आणि सुंदर चित्रांसह वल्ली स्टाईलमधला लेख !!! *OK*

स्वामी संकेतानंद's picture

12 Oct 2014 - 6:19 pm | स्वामी संकेतानंद

भटकंतीला नव्या जागा कळल्या.

यशोधरा's picture

12 Oct 2014 - 6:35 pm | यशोधरा

मस्त!

दिपक.कुवेत's picture

12 Oct 2014 - 7:07 pm | दिपक.कुवेत

मी आपलं फोटो पाहुन समाधान मानले.

चौकटराजा's picture

12 Oct 2014 - 7:07 pm | चौकटराजा

मस्त लेख आहे. यातील काही जागांचे दर्शन प्र के घाणेकर यांच्या बरोबर घेण्याचा यत्न केला होता. पण असा योग जुळून
आला नाही. हे लवण स्तंभ व निघोज बहुदा २०१५ मधे होणार !

दिपक.कुवेत's picture

12 Oct 2014 - 7:10 pm | दिपक.कुवेत

घारापुरी लेण्या समाजावुन सांगत होते तेव्हा सुद्धा धन्या एका जागी शांत बसुन होता असं अधुंकसं आठवतयं...

विलासराव's picture

12 Oct 2014 - 7:32 pm | विलासराव

गुळूंचवाडीचा नैसर्गिक शिलासेतू याबद्दल आजच ऐकले पहील्यांदा. पण बाकी ढोकोबाच्या यात्रेला शाळेत असताना एकदा गेलो होतो. निघोजचे कुंड, वडगाव दर्याबाई आणी कोरठणचे खंडोबा हे तर बर्याचदा पाहिलेले आहेत. माझे गाव बुगेवाडी आहे ते कान्हुरपठारपासुन पारनेरकडे ६ किमी आहे. तुम्ही आमच्या जन्मभुमीत मुशाफिरी करुन आलात. तसेच पारनेरवरुन शिरुरमार्गे आला असतात तर राळेगण सिद्धीही झाले असते जाता-जाता. आनी मला फोन केला असतात तर शिरुरला आईकडे नाष्टापाणीही झाले असते आपल्या घरी.

तुमचे गाव इकडेच आहे हे माहिती होतेच. आमचेही मूळ गाब बोरी. तिकडच्याच परिसरातले. अर्थात आमचे आजोबाही तिकडे कधी गेले नाहीत. ४/५ पिढ्यांपूर्वीच मूळ गाव सुटले.

कपिलमुनी's picture

12 Oct 2014 - 9:15 pm | कपिलमुनी

अजून फोटो हवे होते .

वडगाव दर्याला अजून माकडांचा त्रास आहे का ?

( वानरसेनेशी युद्ध झालेला जखमी योद्धा ;) )

प्यारे१'s picture

12 Oct 2014 - 9:59 pm | प्यारे१

तेव्हा नाव बदललं का? कपि-ल? ;)

प्रचेतस's picture

13 Oct 2014 - 9:00 am | प्रचेतस

माकडे अजूनही भरपूर आहेत. पण त्रासदायक अशी अजिबात वाटली नाहीत.

मुक्त विहारि's picture

12 Oct 2014 - 10:48 pm | मुक्त विहारि

मस्त....

आता पुढचा कट्टा वेरूळला करू या का?

प्रचेतस's picture

13 Oct 2014 - 9:00 am | प्रचेतस

वेरूळला कट्टा करायला कधीपण तयार.
अट एकच. कट्टा मुक्कामी हवा.

चौकटराजा's picture

13 Oct 2014 - 9:03 am | चौकटराजा

त्यापेक्षा कट्टा तंजाउर येथे व्हावा. अर्थात कट्टा मुक्कामी हवा !

अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार.

लवणस्तंभ निर्मिती होणाऱ्या जागेवर मंदिर तसेच लेण्यांभोवतीचा तट बांधून ते कसे पिढ्यान पिढ्या जपता येईल याचाच विचार दिसतो.

ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले ही दंतकथा आहे?
अमृतानुभव, भावार्थदीपिका किंवा चांगदेव पासष्टी यात या घटनेचा उल्लेख आला आहे काय?
जाणकार काय म्हणतात?

पैसा's picture

13 Oct 2014 - 10:36 am | पैसा

नेहमीचा प्रतिसाद दिला आहे असे समजावे. बाकी ते आत्मूबुवांचे खेचर?? बुवा, वाचताय ना? एक हत्ती खेचरावर घालून कसा नेलात?

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2014 - 11:06 am | टवाळ कार्टा

मांडी घालूनच का? =))

सतिश गावडे's picture

13 Oct 2014 - 11:39 am | सतिश गावडे

बुवांकडे दोन वाहने आहेत.
एक अखिल मिपा प्रसिद्ध उडनमांडी आक्टीवाहन आणि दुसरे दाबाखाली असलेला नैसर्गिक वारा खाऊन पळणारे चार पायांचे खेचर.

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2014 - 12:34 pm | टवाळ कार्टा

आणि विमान???

अत्रुप्त आत्मा's picture

13 Oct 2014 - 2:29 pm | अत्रुप्त आत्मा

@ एक हत्ती खेचरावर घालून कसा नेलात?>>> :D मी फार निराळ्या अर्थानी माज्या चतुष्पदीला खेचर म्हन्तो. :-/ आणि नुस्तं नै... CNG खेचर! पण आगोबानी ते विचित्र पद्धतीनी लिव्लं! :-/ वस्तुतः आगोबा जेंव्वा तेच्या पल्सरवर बसतो,तेंव्वा तेचच चित्र खेचरावर बसलेल्या हत्ती वानी दिस्तं! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

ह्ये बगा! http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hysterically-smiley-emoticon.gif

https://lh4.googleusercontent.com/-qEkB_S9HSKo/VDtnhtoyQ_I/AAAAAAAAGfo/XNCF85-qRSA/w326-h580-no/IMG_20141012_175623231%7E2.jpg
========================================
काय काल मोका गावलावता नै!? http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif
कॉलिंग सतिश गावडे(उर्फ प्राचीन धन्या!) ;)

पैसा's picture

13 Oct 2014 - 2:33 pm | पैसा

बुवांना बरेच दिवसांनी अशी संधी मिळाली! पण काय ओ, पुण्यातले रस्ते एवढे वैट्ट कशानी झाले?

अत्रुप्त आत्मा's picture

13 Oct 2014 - 2:52 pm | अत्रुप्त आत्मा

@ पुण्यातले रस्ते एवढे वैट्ट कशानी झाले?>>> अवो ओ... तो पुण्यातल्या मुळ रस्ता नाही.. आमच्या विठ्ठलवाडीच्या मागचा नियोजित नदीरस्त्याचा पब्लिकनी वापरायला सुरु केलेला भाग आहे.

स्पा's picture

13 Oct 2014 - 11:21 am | स्पा

खुसखुशीत , नवीन माहितीने आणि उत्तम फोतोंनी खचाखच भरलेला वृतांत

अवांतर : ते धन्या काहून वैतागले ?

सतिश गावडे's picture

13 Oct 2014 - 4:18 pm | सतिश गावडे

अवांतर : ते धन्या काहून वैतागले ?

प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. मला भटकंतीची आवड असली तरीही हा प्रत्यक्ष लेणीदर्शनाचा कार्यक्रम माझ्यासाठी रटाळवाणा असतो. तीच शिल्पं, त्याच सप्तमातृका, तेच यक्ष आणि तोच कुबेर. कधी सातवाहनकालिन, कधी राष्ट्रकुटकालिन तर कधी यादवकालिन.

अर्थात असं असलं तरी मला मिपाकरांबरोबरचा प्रवास आवडतो. मनसोक्त गप्पा मारता येतात. नविन गावे, तिथले लोक, त्यांचे राहणीमान, तिथला निसर्ग यांचे निरिक्षण करता येते. कधी बिरुटे सर तर कधी इस्पिक एक्का तर कधी पेठकर काका अशा मिपावरच्या दिग्गजांचा सहवास लाभतो.

एव्हढं सगळं मिळत असल्यामुळे तो रटाळवाणा लेणी पाहण्याचा कार्यक्रम मी चालवून घेतो. ;)

स्पंदना's picture

14 Oct 2014 - 8:50 am | स्पंदना

हे बघा! हेच्च मी वल्लीला समजावुन सांगायचा प्रयत्न करत होते परवा. की हे वल्ली, जेंव्हा तूझी नजर एखाद्या कोरलेल्या दगडावर पडते; तेंव्हा तू त्यात शिल्प, त्या शिल्पाचा काळ, प्रकार, मुद्रा, कोरीवता, वाहन, नाव देव देवता वा असूर हे सारे जाणतोस, पण आम्ही तेच शिल्प एका दगडावरच डीझ्झाइन म्हणुन पहातो. हा फरक आहे प्रत्येकाच्या दृष्टीतला, अन अभ्यासाचा. पण नाही. ते म्हणतात तस नसतच.

ते लवण खायला वापरतात का ?

आय मीन ते काळे मीठ जे असते ते हेच काय

प्रचेतस's picture

13 Oct 2014 - 4:22 pm | प्रचेतस

लवण म्हणजे क्षार.
हे कैल्शियमचे क्षार. हे मीठ नव्हे.
सोडियमचे क्षार म्हणजे मीठ.

बॅटमॅन's picture

13 Oct 2014 - 12:47 pm | बॅटमॅन

जबर्‍या. हिकडं जाणारच आता.

सतिश गावडे's picture

13 Oct 2014 - 4:10 pm | सतिश गावडे

कळायला लागल्यापासून पैठणच्या ब्रम्हवृंदासमोर ज्ञानदेवांच्या आज्ञेने वेद बोलणारा* रेडा मनात घर करुन राहीला होता. या भटकंतीच्या निमित्ताने त्या रेडयाची समाधी पाहता आली.

reda

* दंतकथेनुसार.

विलासराव's picture

13 Oct 2014 - 4:23 pm | विलासराव

मी गेलो होतो तेंव्हा मोठी शिंगे होती त्याला . आता गायबलीत काय?

वल्लीचा लेख म्हणजे माहिती आणि सुरेख फोटोंची लयलुट ! :)
वेळ मिळताच शांतपणे वाचीन म्हणतो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण

अत्रुप्त आत्मा's picture

14 Oct 2014 - 1:53 am | अत्रुप्त आत्मा

अगदी दिड वर्ष लांबलेली ही सफर पर्वा अचानक झाली.आणि अचानक जमलेल्या पोह्यांसारखीच मजा देऊन गेली. आणि दर्याबाई'ची जोड पोह्यांना पापड(पोह्याचेच बरं का! ;) ) लोणच्याची जोड मिळावी तशी त्यात-मिळून आली. मी ही सिझन संपून फ्रेश व्हायच्या मूडनीच निघालो होतो. ठरल्या प्रमाणे सतिशशेट गावडे उर्फ धनाजीपंत वाकडे यांना पहाटे ५ला फोन लाऊन जागवले* आणि शिवाय मागून ६:३० वाजता इमारतीखालून अजुन एक कॉल टाकून (त्यांची*) काकड आरती केली. काहिवेळातच महाराज सर्व आवरुन आले.आणि आंम्ही पिंपरीला जाऊन वल्लीना खेचर-भरती करवून निघालो. वाटेत झालेला पहिला मस्त चा आणि त्यावर (मी) लावलेल्या कडक बारनी गार हवेवर माझं cngखेचर सुसाट धडधडत सुटलं.. लवकरच गाडित वल्लीचा आगोबा झाला..आणि मग वायफळ आणि इतर* बडबडीला अगदी ऊत आला.( * च्या अर्थ आणि आशयप्राप्तीसाठी स्वतंत्र व्य.नि.धाडावा! :D ) ह्या सगळ्यात राजगुरुनगरला मिसळ स्पॉट्ला कधी आलो ते देखिल कळ्ळं नै! ही मिसळ..,ही बरी या क्याटॅग्रीत मोडणारी आहे! म्हणजे मिसळीच्या आद्य तत्वातला तिखटपणा तिच्यात बेतानी का होइ ना..? आहे! पण आमचा त्यो हवा त्यो करंट नै ओ...तिच्यात! :-/ पण असो..
करंट देणारी नसली तरी करंट काढुन घेणारीही नाहिये! ;) हेही नसे थोडके.
https://lh5.googleusercontent.com/-kf7iKxVyhxI/VDtsT6KKI7I/AAAAAAAAGgs/om38JrFNF6k/s640/IMG_20141005_095350090%257E2.jpg
मिसळ झाल्यावर छा..वगैरे होऊन मग आंम्ही सुंगाट निघालो..आणि पोहोचलो ते ढोकेश्वरला. लांबुनच तो डोंगर पाहून मी गाडीतच गुडघे मनातल्या मनात धरलेवते! आणि असंही मनात आलं की बहुतेक आगोबानी आपल्याला (आदल्या दिवशी - "कुठे ही उंच चढाई नैय्ये" असं सांगून) फशिवलं! :-/ पण जवळ जाऊन खेचर हवेला-सोडलं आणि वर पाहिलं तर अगदी तिन/पाच मजले..एव्हढीच चढाई होती. (पण तिनी सुद्धा उन्हात माझा घाम काढला! :-/ ) आणि अर्थातच वर गेल्यावर पहिलं पाण्याचं टाकं शोधुन मस्त फ्रेस्स्स्स्स्स्स्स्स झालो! हासहुस्स करत बसलो..तर लागलीच आगोबा त्या गंगा/यमुना क्यामेर्‍याच्या लेन्सनी डोळ्यात उभ्या आडव्या करायला गेलेला पण! मग लगेचच आंम्ही आत शिरलो. मी सवईप्रमाणे शंकराची पिंडी दिस्ताच गाभार्‍यात घुसलो. आणि पहिला अंदाज घेतला आवाजी परिणामाचा. पण एकंदर तिथली रचना आणि दगडाची जातकुळी पहाता फारसा काहि विंट्रेस वाटला नाही. मी फक्त टेस्ट राइड घ्यायची म्हणून शुद्धस्फटिक संकाशं त्रिनेत्रं पंचवक्त्रकं ही शंकरवर्णनस्तुती म्हणून पाहिली.
शंकरस्तुती

पण तेव्हढ्यानीही माहौल बदलला. बाहेर आलेली एक खेडवळ फ्यामिली आणी तिथला तो राखणदार माझ्याकडे मी ऑफड्युटी ड्रेसवर असतानाही,जन्मोजन्मीच्या परि-चीत नजरेनी पाहू लागले. आणि थोड्याच वेळात वल्ली, सप्तमातृकापट समजवायला लागल्यावर मी एक व्हिडिओ(जिल्बी) कडेनी तळायला जशी घेतली..तशी त्यांची खात्रीच पटली..की मी ..बामन/द्येवबाप्पा/भटजी इत्यादी-आहे म्हणून! कारण मी त्या शूटमधेही शेवटी सोय म्हणून मातृकांचा एक श्लोक-टाकलावता!
सप्तमातृकापट-वल्लीच्या माहितीसह (आत्मूज् tv मधून नुस्ताच'भार! ;) )

(याचं चित्रण करताना मी सगळं कव्हर व्हायला मोबल्या आडवा धराला...आणि व्हिडू उभा आला..! :( तेव्हढं सांभाळून घ्या प्लीज. )
तो श्लोक ऐकून, म्हातारी आणि तो बरोबरचा माणूस अजुनच भावविभोर कि कै तरी म्हणतात तसे झाले.
मग काय? एकदा मला आणि एकदा आगोबाला त्यांनी चेंडू टाकायला सुरवात केली. वल्ली (फक्त इथेच बिचारा बरं का! :D ) त्यांना अगदी शास्त्रशुद्ध माहिती देत होता. आणि मी तीच माहिती फक्त कथेत घालून त्यांना परत प्रसाद देऊन...वल्लीपासून - लांब करु पहात होतो. शेवटी मी वल्लीला एका बाजुच्या कडीकुलपात टाकलेल्या वीरगळ/मूर्त्यांच्या दिशेनी-सोडला..आणि त्या माणसाला त्या म्हातारीसह.." आहो आपल्या ह्या मातृका मंजे की नै..त्ये द्येवकात नै का पूजत..आणि चंडी होमाला पाण्याला नारळ सोडत सातीआसरेला..." असं करून अंगावर घेतलं =)) शेवट त्या म्हातारीचा भक्तिभाव इतका उचं-बळून आला की तिनी मला..मातृकांपाशी नेऊन "हां...सांग आता-ही कोन?" , ''सांग आता-ती कोन?" असं करत करत.. मी नाव सांगितलं की ओल्याकुंकवानी (मातृकेचा!) मळवट भरायला लागली.. हे चालू झालं. आणि मग मात्र मला वाइट वाटलं... :( मनात म्हटलं-"आज कुंकू लागलं,की इतकी वर्ष ओस पडलेल्या त्या मातृकांना उद्यापासून हळद-लागायला सुरवात होइल.आणि मग जेव्हढ्या टीकून आहेत,त्याही झिजून्/विटून खलास होतील!

पण हे होईस्तोवर वल्ली फटाफट फोटू मारून परत मैदानात आला. मग वरच्या पट्टिकेच्या देवतांचा तपशिल,छताचा गिलावा,त्या आतला दिलेला नैसर्गिक रंग ,आयुधपुरुष इत्यादी Live ऐकायला मिळालं. आणि आता, "चला बाहेर.." असं एकमेकांना म्हणत बाहेर येऊन पहातो..तर तिथे मला एक अगदी परिचीत शिल्प निद्रीस्त असलेलं दिसलं! आणि फार जुनं ही नव्हे .. अगदी आपल्याच-काळातलं...
कोण बरं...हे!?
कोण बरं...हे!?
कोण बरं...हे!?
म्हणतो...तर तो निघाला चक्क आमचा...आपला....
हा
https://lh4.googleusercontent.com/-27QQFTAo03Y/VDtmbKYAZnI/AAAAAAAAGfc/GUBJTu2f-F4/s512/IMG-20141013-WA0006%257E2.jpg
धन्या......
=)) .. =)) .. =))
आंम्ही (कुठेही) लेणी/मंदीर सफरीला गेलो..की पहिल्या १५/२० मिनिटानंतर निघे पर्यंत एकदा तरी हे शिल्प वेगवेगळ्या स्व'रुपात पाहायला मिळतच! :D
कारण आंम्ही जे काही पहातो.. ते "कशाला पाहायचं दरवेळी (सगळीकडे) तेच..तेच!? (दगडधोंडे??? )" ... असा या माणसाचा अत्यंत साधा आणि सरळ हिशेब असतो. त्यामुळे धन्या आंम्हाला नेहमीच भूत-काळात सोडून स्वतः वर्तमानावर असा बिनधास्त पहुडलेला असतो/दिसतो. :)

तर एकदाचे वल्लीने या मानवास जागे करून बळनी आतनं-काढून आणले.आणि मग बाहेर परत टाक्याचं पाणि काढून आंम्ही फ्रेस्स झालो. त्याच लेण्याच्या डोक्यावर एक जी गाभारासदृश खोली खोदलेली आहे..आणि तिच्यात एक भूयार आहे.. हे ऐकून ते बघायला मात्र धन्या पहिला वरती गेला..मागून मी ही माझी १ जिना उंचीची गिर्यारोहणाची हौस भागवून घेतली
https://lh6.googleusercontent.com/-9cJljyLG38Q/VDtqh92_yfI/AAAAAAAAGf0/SUUEJfiIkL8/s512/IMG-20141006-WA0003%257E2.jpg
पण वरती फारसं काहिच नसल्यानी पाचच मिनिटं टैमपास करून आंम्ही खाली यायला निघालो..तर कातळ उन्हानी असं तापलवतं .. की मला उतरताना खाली उडी मारू? की परत वर जाऊ? असं झालं.

मग तिथुन निघालो..ते मग मात्र थेट त्या खंडोबाला...आणि नंतर दर्याबाईला. मुद्दाम या दोनही देवस्थानांना भेटी देण्याइतके आम्ही तिघेही धार्मिक नाही. पण खंडोबा हे वल्ली म्हणतात,त्याप्रमाणे कुलदैवत वगैरे असलं..तरी त्यात - घरच्यांना फोटू दाखवून..."मी जाऊन आलो बरं का देवीला!" असं दाखवून मातोश्रींचा - दिपावलीपूर्व-गृह-श्रम-विभागात सणावाराची घरात कामं न करता,भटकायला गेलेल्याचा राग कमी करण्याचा वाटा होता. :D (शिवाय,आगोबानी जाताना वाटेत मंचरला खव्याच्या भट्टीवर खव्यासह एव्हढं पनीरंही पार्सल का घेतलं? ते अता कळलं! :D ) तर खंडोबा झाला..आणि आमची गाडी निघाली दर्याबाईला... हे दर्याबाई हे नाव मी आता घेतोय. पण मूळ गंम्मत वेगळीच आहे. वल्लीनी फक्त वडगाव दर्याचे लवण स्तंभ पाहू म्हणून सांगितलं..आणि मी वाटेत कान्हुरपठार अशी अक्षर पाहिली आणि एकदम २०/२२ वर्ष मागे गेलो.(मी माझ्या बाबांबरोबर या देवीला शेवटचा आलेलो ते सातवीत असताना!) माझे खापरपणजोबा हे रायगडातल्या श्रीवर्धन या गावाहून पेशव्यांनी घाटावर आणून वसविलेल्या लोकांपैकी एक... तेंव्हा ते या भागात आले,तिथ पासून ते अगदी माझ्या आजोबांपर्यंत आणि वडिलांच्या जन्मापर्यंत ह्याच भागात आमचे समस्त दिवेकर वसत गेलेले. त्यामुळे आमची मूळकुलदेवी जरी कोल्हापुरची अंबाबाई असली,तरी ही पण इतक्या वर्षांच्या सहवासानी झालेली मानसंकुलंदेवीच! मग जसे आंम्ही मंदिराच्या जवळ जवळ जायला लागलो,
https://lh5.googleusercontent.com/-VgbKnsSv_uw/VDtrLjv_2eI/AAAAAAAAGgM/y4o2AlF-W0Y/s640/IMG_20141005_151806364%257E2.jpg
तसे मला एकदम मी लहानपणीची सगळी फिल्म दिसायला लागली. तो निसर्गरम्य परिसर (पायर्‍या/बांधकाम नविन असलं तरी), ती माकडं..आणि त्यांच्या दिव्य लीला! :D
https://lh6.googleusercontent.com/-JE1oScRRjb4/VDtrBEhWxMI/AAAAAAAAGgE/2xiWs_Q90FU/s640/IMG_20141005_151856439%257E2.jpg
त्यांचा (चांगलाच असलेला ;) ) माणसाळलेपणा..अगदी आपल्या हातातून वस्तू घेऊन(किंवा दिल्या न दिल्यासारखं कुणी केलच तर...हिसकावूनही! =)) .. ) त्या अगदी आपल्यासारखच करून खाण्याचे प्रकार.
https://lh5.googleusercontent.com/-uDe3wVxUIO8/VDtq0SswA1I/AAAAAAAAGf8/cfLAdg4tMW8/s640/IMG_20141005_153213652_HDR%257E2.jpg
लहानपणीच्या माझ्या २ ट्रिपांच्या अठवणींप्रमाणे तेंव्हा कांदे आणि फुटाणे हे खास त्यांना तिथे द्यायचे नैवेद्य होते. पण त्यात एकदा एका काळ्या हुप्प्यानी मी दिलेले फुटाणे खाल्लेवते,आणि त्याला अवडत नसताना एक माणूस..सारखा कांदा द्यायला जात होता,त्याच्या खप्पकन कानाखाली मारलेली पण अठवली!!! अर्थात हे ही आपल्या मनुष्य व्यवहाराला जवळच असच होतं. पण या पलिकडे इथली माकडं तेंव्हाही आणि अगदी आजही हिंसक वगैरे कधीच वाटली नाहीत. उलट पक्षी ती अत्यंत खट्याळ आणि त्यांच्या सर्व लीला आपल्याला तिथे दाखवतात... कसं म्हणताय???
मग पहाच ह्या व्हिडिओत!

सदर चित्रिकरण करताना मला जाम मंजे जाम हसू येत होतं...शेवटी आगोबानी एक सूचक दगड मारून :-/ ह्या चित्रिकरणाला थंबिवले... :-/ आणि आंम्ही तिथून त्याच धम्माल मूडमधे... एका सुंदर ट्रीपची सांगता करत करत परतीच्या वाटेनी निघालो! :)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Oct 2014 - 1:56 am | अत्रुप्त आत्मा

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र......... देवीचा फोटू र्‍हायला.......!
जाना देव! हा घ्या आता.
https://lh4.googleusercontent.com/-38Y-rulhzSw/VDtraALI7VI/AAAAAAAAGgU/Z5T6suMN7T0/s640/IMG_20141005_152334062%257E2.jpg

खुमासदार उपवृतांत. लै मज्जा आली वाचून.

पैसा's picture

18 Oct 2014 - 10:45 am | पैसा

मस्त उपवृत्तांत! त्या दीड वर्षाचा हिशेब आत्ता लागला! :D

अत्रुप्त आत्मा's picture

18 Oct 2014 - 12:00 pm | अत्रुप्त आत्मा

:-\ दुssssssष्ट!!! :-\

स्पंदना's picture

14 Oct 2014 - 5:34 am | स्पंदना

वल्ली म्हणजे वल्ली!!
पण जसे चुंबकाचे विरोधी ध्रुव एकत्र यावेत तसे हे आत्मुस, अन वल्ली अन त्या चुंबकाचा मधला समतोल म्हणजे वाकडे साहेब.

एस's picture

14 Oct 2014 - 12:55 pm | एस

म्हणून त्यांचे फोटो असे सतत आडवे असतात का? ;-)

बाकी वल्लीशेठ, तुमच्यामुळे आम्हांला जराजरा लेणी आणि मूर्त्या कशा पहाव्यात हे समजू लागले आहे. धन्यवाद हो! आत्मोजीराव, भन्नाट उपवृत्तांत.

रोहिणी पानमंद's picture

14 Oct 2014 - 5:04 pm | रोहिणी पानमंद

कान्हूरपठार माझे गाव आहे

बोका-ए-आझम's picture

18 Oct 2014 - 12:32 am | बोका-ए-आझम

अप्रतिम! Stalactite आणि Stalagmite ह्या संज्ञांचा अर्थ एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगितला. ही नावं अशी पडण्यामागे काही शास्त्रीय कारण आहे का?

प्रचेतस's picture

18 Oct 2014 - 9:01 am | प्रचेतस

Stalactite आणि Stalagmite हे दोन्ही शब्द ग्रीक भाषेतून आले आहेत.
stalasso - "to drip - "that which drips
stalagmias - "dropping, trickling

जबराट भौ !! तुमच्याबरोबर एकदा यायला पाहीजे !!

सस्नेह's picture

18 Oct 2014 - 11:05 am | सस्नेह

छानच वृत्तांत .
एवढे सगळे तपशील कुठून बरं मिळतात तुम्हाला ?

यसवायजी's picture

18 Oct 2014 - 6:31 pm | यसवायजी

वृत्तांत भारीच..

बुवा, खेचरावर अजुन एक शिट अ‍ॅडजस्ट करत जा की राव.

सतिश गावडे's picture

18 Oct 2014 - 6:42 pm | सतिश गावडे

वल्ली, बुवा पुढच्या वेळेपासून याला कॉल करत जा. नाही जमणार म्हणाला की पोकल बांबूचे फटके :)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Oct 2014 - 11:09 pm | अत्रुप्त आत्मा

@नाही जमणार म्हणाला की पोकल बांबूचे फटके>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif नक्कीच!!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif
...................................http://www.sherv.net/cm/emo/laughing/facebook-laughing-smiley-emoticon.gif

यसवायजी's picture

19 Oct 2014 - 7:55 am | यसवायजी

:))

चौथा कोनाडा's picture

18 Oct 2014 - 11:03 pm | चौथा कोनाडा

अतिशय सुंदर वृतांत ! मजा आली वाचून ! वल्ली म्हणजे काय, या बाबतीत मास्टर माणूस !
अत्रुप्त आत्माचा उप-वृतांत ही धमाल आहे.
आत्ता पर्यंत फक्त निघोज रांजण खळगे व दावडीचा खंडोबा पाहिलाय.
आता इकडे पण सहल काढली पाहिजे.

गणेशा's picture

3 Nov 2014 - 1:29 pm | गणेशा

अप्रतिम ..

आणि फोटॉ हि दिसले .. कारण आता आमच्याकडे उशिरा का होईना इंटरनेट आले आहे :)

सतिश गावडे's picture

3 Nov 2014 - 5:47 pm | सतिश गावडे

आजि सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु...

चक्क गणेशाला मिपावर फोटो दिसले.

:)

गणेशाचा आज चक्क 'गणेशा' नाही झाला.

नाखु's picture

4 Nov 2014 - 4:11 pm | नाखु

"अच्च्छे दिन नही आए! ये लो ढळढळीत पुरावा!!!! हाकानाका

टर्मीनेटर's picture

31 Aug 2021 - 4:12 pm | टर्मीनेटर

ज्या अपेक्षेने हा लेख वाचायला आलो ती (अर्थातच) पुर्ण झाली.
आत्मुबुवांचा उपवृत्तांतही झकास!
वरती एस ह्यांनी म्हंटल्या प्रमाणे प्रचेतसजी “तुमच्यामुळे आम्हांला जराजरा लेणी आणि मूर्त्या कशा पहाव्यात हे समजू लागले आहे.”
धन्यवाद.

Bhakti's picture

31 Aug 2021 - 6:16 pm | Bhakti

मला प्रचेतस यांनी लेण्यांचा , प्राचीन वास्तूंचे अभ्यास/आवड कधी कशी सुरु केली हे वाचायला नक्कीच आवडेल.

प्रचेतस's picture

31 Aug 2021 - 8:22 pm | प्रचेतस

असं विशेष असं काही नाही त्यात, प्राचीन वाङमयाची, इतिहासाची आवड पहिल्यापासून होतीच, पुस्तकेही भरपूर वाचून झाली होती, फिरणंही होत होतंच त्यामुळे मूर्ती, शिल्पपट हळूहळू ओळखू यायला लागले आणि त्यामुळे आवड वाढत गेली. ही बीजं कशी रुजली ह्याबद्दल पुढील दोन लेखांमध्ये संक्षिप्तपणे लिहिलं होतं.

वीरगळांच्या शोधात

दक्षिण गोव्यात, वेताळांच्या राज्यात

_/\_ तुमची लेखनशैली अतिशय सरल आहे.त्यामुळे शिल्प सुद्धा तुमच्या द्वारे बोलतात असे वाटते.
अवांतर-माझ्या नवर्‍याला मी हा लेख दाखवला तर तोही वीरगळ बद्दल सांगू लागला, या निमित्ताने आमच्या ह्यांची अनोखळी बाजू समजली :):)

चौथा कोनाडा's picture

2 Sep 2021 - 6:00 pm | चौथा कोनाडा

म्हणजे Bhakti तुम्ही नवर्‍याला "गळा"ला लावलेत !
😉

हो की आता कुठे समजली ही व्कालिटी आता पुरेपूर भरपूर गळ लावते :)

गॉडजिला's picture

2 Sep 2021 - 10:47 pm | गॉडजिला

मग बघा कशा क्वालिटीज सामोऱ्या येतील ते ;)

राजेंद्र मेहेंदळे's picture

31 Aug 2021 - 8:14 pm | राजेंद्र मेहेंदळे

घरबसल्या भटकंती झाली( दिड वर्ष घरात बसायचं दु:ख काय सांगु?) लगेच प्र.के घाणेकरांचे "सहली एक दिवसाच्या परीसरात पुण्याच्या" काढुन वाचायला घेतले. तेव्ह्ढेच समाधान.