२००२ सालचा साधारण मार्चचा महिना. आता नक्की आठवत नाही, पण तेव्हा नासिकवरुन रतनगडला निघालो होतो. घोटीनंतर एक घाट चढून कळसूबाईच्या पायथ्याचं गाव बारी गाठलं. तिथून शेंडी. शेंडी हे भंडारदरा धरणालगतचं गाव. तिथून रतनवाडी साधारण २० किमी. २००२ साली हा भाग फारच दुर्गम होता. वाहतुकीची साधनं अत्यल्प होती, रस्ताही खूप खराब आणि बराचसा कच्चा होता. शेंडीवरुन तेव्हा जवळपास पाऊण तास लागला होता रतनवाडीला पोहोचायला. वाडीच्या सुरुवातीलाच अमृतेश्वर मंदिर. तेव्हा आजूबाजूचा परिसर अगदी साधाचाच होता. आजमितीस मात्र खूपच बदल झाला आहे. तर मंदिराच्या शेजारीच एक पुष्करणी आहे, त्याच्याजवळच एक भलामोठा वृक्ष. त्याच्या बुंध्यापाशी काही भल्यामोठ्या शिळा रचून ठेवलेल्या. जवळपास पुरुषभर उंचीच्या शिळा आणि त्यावर काही युद्धांचे प्रसंग कोरलेले. कुठल्याही प्रकारच्या वीरगळांशी तो माझा प्रथम परिचय. त्याआधीही कित्येकदा वीरगळ पाहिले असतील, नाही असं नाही पण ते आता आठवत नाही किंवा त्यांना काहीतरी कोरलेली अशी शिळा ह्या दृष्टीनेही पाहिलं गेलं असावं किंवा त्यांचं महत्व तेव्हा माझ्या गावीही नसावं. पण रतनगडाची ती भ्रमंती काही नवं असं देणारी ठरली.
रतनवाडीतले वीरगळ
ह्यानंतरही जवळपास ७/८ वर्षे गेली. भटकंत्या चालूच होत्या. पण केवळ त्या एका ठराविक दिशेने जात नव्हत्या. मौजमजेसाठी निरुद्देश भटकंती असेच काहीसे स्वरूप येत होते. पण त्याच वेळी मूर्तींविषयी, वीरगळांविषयी, स्मारकशिळांविषयी सुप्तावस्थेतील आकर्षण हळूहळू वाढत होते. नंतरच्या बर्याच फिरस्त्यांमध्ये असंख्य वीरगळांशी परिचय होत गेला. त्यापैकी एक आठवतोय तो राजमाचीवरचा.
राजमाची किल्ला बहुतेकांना माहितच असेल. लोणावळ्याहून रात्री ११ ला निघालो ते उढेवाडीला पहाटे ४ च्या आसपास पोहोचलो. वाडी खूपच छान, भोवताली सगळं गच्चं रान, मोरांची केकावली तर सततच. बिबट्याच्याही डरकाळ्या काही वेळा ऐकू येतात. वाडीपासून श्रीवर्धनच्या जायच्या पायवाटेने एक हलकसं टेपाड चढून आपण श्रीवर्धन-मनरंजनच्या खिंडीत येतो. तिथेच मध्यभागी भैरवनाथाचं शिवकालीन राऊळ. भोवताली घनगर्द राई. तर राउळाला लागूनच एक वीरगळ आहे. त्याची एकंदर रचना पाहता तो अलीकडचा म्हणाजे शिवकालीन असावा हे तसं लक्षात येतं. शिल्पपट्टीका नाहीत. फक्त लढणारा आणि नंतर मृत झालेला वीर. इतकंच.
राजमाचीचा वीरगळ
आपल्या पुण्याजवळच्या बाणेर गावात एक टेकडी आहे. त्या टेकडीत प्राचीन लेणं आहे हे माहित होतं पण जायचा योग आला नव्हता. एकदा मात्र निघालोच. बाणेर गावातल्या हनुमान मंदिरापासूनच लहान बोळांतूनच लेणी मंदिरापर्यंत वर जायला पायर्या आहेत. एकाच अखंड कातळात खोदून काढलेलं हे शैव लेणं हे बहुधा ९/१० व्या शतकातलं असावं. त्या लेण्यात आणि लेण्यांबाहेर काही वीरगळ पडलेले आहेत. बहुधा इथे पूर्वी लहानशी लढाई झालेली असावी. ह्या लेणीच्या बाहेरच एक बलीवेदी पण मिळाली. बलीवेदी म्हणजे बळी ज्या शिळेवर देतात तो दगड. ही एक लहानशी चौकोनी सपाट शिळा असून चारही कोपर्यांवर बकर्याची मुंडकी कोरलेली आहेत.
बाणेर वीरगळ
-
बलीशिळा
एकदा अंजनेरीला गेलो होतो. अंजनेरी नाशिकपासून साधारण १०/१२ मैलांवर. भल्यामोठ्या कातळकड्यावर निर्मिलेला अजस्त्र किल्ला आणि पायथ्याला गावात १६ प्राचीन मंदिरांचं संकुल. ह्या मंदिरांत असंख्य भग्नावशेष आहेत. आमलक, स्तंभांचे भाग, मूर्ती, वीरगळ इत्यादी. तिथेच आहे एक आगळावेगळा वीरगळ. आगळावेगळा असं म्हणण्याचं कारण वीरगळाच्या खालच्या पट्टीत एक वीर दुसर्या वीराचे केश धरुन त्याचं मस्तक धडावेगळं करताना दाखवलाय. पूर्वीच्या काळी युद्धांत मस्तकाचे केश धरुन सैनिक शत्रूंची मस्तके धडावेगळी करायचे हे टाळण्यासाठी म्हणून बहुतेकवेळा प्रतिस्पर्धी सैनिक मुंडण करुन युद्धात उतरायचे.
अंजनेरी वीरगळ
माळशिरस हे लहानसं गाव यवतच्या भुलेश्वरापासून चारेक किमी अंतरावर, अगदी दुर्लक्षित पण पुरातन संपन्न गावची लक्षणे जागोजागी आढळतात, गावची वेस विस्तीर्ण वाड्यांचे भग्नावशेष, १२/१३ व्या शतकातले एक प्राचीन शिवमंदिर जे आता हनुमान मंदिरात परावर्तीत केलं गेलं आहे पण मूळची मंदिरातली आतली शिवपिंड भग्नावस्थेत मंदिराच्या बाहेर झाडोर्यांत पडलेली आहे. त्या मंदिराच्या आवारात काही वीरगळ आहेत तर काही थेट गावच्या वेशीवरच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीत चिणलेले आहेत. तीन तीन शत्रूंशी एकहाती युद्ध करुन धारातीर्थी पडलेल्या वीराला चार चार अप्सरांनी स्वर्गास पोहोचवतात.
माळशिरस वीरगळ
माळशिरस वीरगळ
-
ह्या माळशिरसपासून जवळच नायगांव हे अगदीच लहानसं गाव. इथेही एक हल्लीच जीर्णोद्धार केलेलं प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर पुष्करिणी. प्रथमदर्शनी मंदिर तसं अनाकर्षकच वाटतं. मंदिराच्या पुढ्यातच नंदीमंडप. ह्या मंदिराच्या आवारात एक वीरगळ अर्धाअधिक जमिनीत पुरलेला आढळेला. सर्वात वरचं 'यावच्चंद्रदिवाकरौ' हे नीटपणे दृश्यमान आहे. ह्याच मंदिराच्या आवारात दोन तीन सतीशिळाही आहेत. ह्यातली एक सतीशिळा तर थेट मंदिराच्या अंतर्भागातल्या भिंतीत चिणलेली आहे. सतीशिळा म्हणजे पतीनिधनानंतर सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरणाअर्थ तिचे स्मारक म्हणून सतीचा आशीर्वादपर हात कोरलेली शिळा बनवणे. ह्या प्राचीन निष्ठुर परंपरांचा भाग असणार्या शिळा मला कायमच अवस्थ करतात.
नायगावच्या सिद्धेश्वर मंदिरातील अर्धाअधिक पुरलेला वीरगळ आणि तिथलीच सतीशिळा
नायगाव सतीशिळा
सतीशिळेवरनं आठवलं. सासवडच्या नाझरे गावानजीक कोथळे नावाचं एक लहानसं गाव आहे. तिथे एकदा फिरत गेलो होतो. गावाशेजारी एक अगदी लहानशी टेकडी आणि टेकडीवर लहानसं प्राचीन शिवमंदिर. ह्या मंदिराच्या आवारातही एक सतीशिळा आहे.
ह्या कोथळ्यातही बरेच वीरगळ आहेत. हया शिवाय वीरगळांसाठी सपाट केलेल्या कित्येक शिल्पविहिन शिळादेखील तिथे पडलेल्या आहेत. तिथे आहेत गोवर्धन वीरगळ. गोवर्धन वीरगळ म्हणजे गाईगुरे पळवण्यास आलेल्या चोरट्यांविरुद्ध्/शत्रूंविरुद्ध युद्ध करुन आपले बलिदान केलेल्या वीरांचे स्मारक. ह्या वीरगळआंमध्ये सर्वात खालच्या पट्टीकेवर मृत वीराच्या बाजूने गाईगुरे कोरलेली आढळतात. गोवर्धन वीरगळही बर्याच ठिकाणी आहेत. मी किमान ३० ते ४० तरी आतापर्यंत पाहिलेले आहेत.
कोथळ्याचा गोवर्धन वीरगळ
एकदा पूरच्या नारायणेश्वरास गेलो होतो. हे पूर म्हणाजे आताचे सासवडनजीकचे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याचे नारायणपूर. ह्या गावचा रामचंद्रदेव यादवाचा पूर शिलालेख प्रसिद्ध आहे. ह्या शिलालेखात रामदेवरायच्या दंडनायक बाईदेव व अजून कुण्या एका प्रधान सेनापतीचा उल्लेख आला असून हेमाद्री पंडिताला 'लोककर्माधिकारी' अर्थात लोकोपयोगी कामे करणारा म्हणून नियुक्त केले गेल्याचा उल्लेख आहे. प्रस्तुत लेख सध्या भारत इतिहास संशोधक मंडळात आहे. तर ह्या पुरात नारायणेश्वराचे यादवकालीन मंदिर असून त्याच्या पुढ्यातल्या रस्त्याच्या पलीकडे एका खोपटात व तिथेच एका शेतात अशा दोन सतीशिळा आहेत. ह्यातील एक सतीशिळा फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक.दोन नव्हे तर सतीचे तब्बल चार हात एकाच शिळेवर कोरलेले आहेत ह्यांखेरीज लढाईचे दृश्यही आहेच. कदाचित एकाच वेळी सती गेलेल्या अनेक स्त्रियांचे स्मारक म्हणून ही शिळा कोरलेली असावी.
पूरची सतीशिळा
तिथलीच एक दुर्लक्षित सतीशिळा
आताच डिसेंबर महिन्यात रत्नांग्रीस मित्रांबरोबर होतो. तिथे पावसला जाण्याचा योग आला. मग तिथेच गणेशगुळे आणि पावसच्या आसपास भटकत राहिलो. पावसजवळ गुरववाडी म्हणून एक लहानशी वाडी आहे. तिथल्या मंदिरात काही शिळा पडलेल्या दिसल्या. त्या सर्वच सतीशिळा. जवळपास १०/१२ सतीशिळा तेथे इतरत्र विखुरलेल्या आहेत.
गुरववाडी, पावस सतीशिळा
भर उन्हाळ्याचे दिवस. साधारण एप्रिल महिन्याची अखेर. उन्ह अगदी रणरणतं. अशा तापत्या दुपारी पेडगावला गेलो होतो पेडगावची ती पहिली भेट. नंतर तीनचार वेळा पुन्हा पुन्हा पेडगावला जाऊन आलो. पेडगावला विस्तीर्ण भुईकोट आहे. सध्या पुर्ण भग्न झालेला. औंरंगजेबाचा सरदार बहादुरखानाने बांधलाय. किल्ल्याचा कोट शिल्लक आहे. आतमध्ये मात्र बांधकामे हुडकावी लागतात. किल्ल्यात फिरणे तसे धोक्याचे कारण सगळीकडे वेड्या बाभळीचे जंगल माजलंय. ह्याच पेडगावच्या बहादूरगडात संभाजी महाराजांना हात लाकडांना बांधून आणि विदुषकाची टोपी घालून औरंगजेबाने मिरवत आणलं होतं, नंतर येतेच राजांचे डोळे काढले होते. तर ह्या पेडगावातच पाच यादवकालीन मंदिरे आहेत. ती पण एकापेक्षा एक सरस आणि अतिशय शिल्पसमृद्ध अशी. ह्या मंदिरांवरुन येथे पूर्वी यादवांचं मोठं ठाणं असावं असं वाटतं. तसंही इथल्या आजूबाजूच्या परिसरात भीमेकाठी असंख्य मंदिरे आहेत. तर पेडगावला अशी सरस पाच मंदिरे असूनही वीरगळ मात्र मला एकच दिसला, येथेच एक सतीशिळाही आहे.
पेडगाव वीरगळ
पेडगाव सतीशिळा
एकदा मोरगावजीकच्या लोणी भापकरला गेलो होतो. लोणी भापकर तिथल्या एका प्राचीन मंदिरामुळे आणि तिथे असलेल्या यज्ञवराहाच्या देखण्या मूर्तीमुळे मूर्तीअभ्यासकांत प्रसिद्ध आहे. हा भाग कायमचाच दुष्काळी. ऐन पावसाळ्यातही येथे पावसाचे दुर्भिक्ष्य असते. मात्र येथेही तीन चार मंदिरे आहेत आणि असंख्य सुस्पष्ट वीरगळ. जवळपास २५ ते ३० वीरगळ ह्या गावात आहेत. खास येथील मंदिरे आणि हे वीरगळ बघण्यासाठी गावात यावं. गावात एक पूर्ण बेवसाऊ झालेला गढीवजा किल्लाही आहे.
लोणी भापकर वीरगळ
लोणीभापकरच्या जवळच पांडेश्वर हे गाव. तिथून सुमारे १०/ १२ किमी अंतरावर. येथेही एक प्राचीन मंदिर शिवाय असंख्य वीरगळ आहे. मात्र येथे वेगळाअच वीरगळ आहे तशा प्रकारचा मी इतरत्र कुठेही पाहिलेला नाही. तो आहे वाघाशी लढून मृत झालेल्या वीराचा. ह्या वीरगळाच्या मधल्या पट्टीत वीर वाघाशी झुंज घेताना दाखवलाय.
पांडेश्वरचा आगळा वेगळा वीरगळ
आता मध्ये मागच्या पावसाळ्यात किकलीला गेलो होतो. किकली मंदिराबदल आणि तिथल्या वीरगळांबद्दल मी लिहिलेलंच आहे. किकली हे जणू वीरांचंच गाव- वीरगळांचंच गाव. सुमारे दोनशेच्या आसपास वीरगळ किकलीत आहेत ते अगदी कुठेही सापडतात. घराच्या भिंतीत चिणलेले, मंदिरांपाशी, विहिरीपाशी, पारावर, अगदी गटारावर देखील.
किकलीचे वीरगळ
तर ह्या किकलीपासून शेरी लिंबच्या बारा मोटेची विहिर पाहण्यास निघालो. ही विहिर म्हणजे मराठेकालीन शैलीत बांधलेलं मोठं अद्भूत प्रकरण. शेरी लिंबला जाताना वाटेत गोवे नावाचं एक लहानसं गाव लागतं. ते गाव ओलांडून जाताच वाटेत एक भग्न वीरगळ दुर्लक्षित अवस्थेत दिसला.
गोवे वीरगळ
शेरी लिंबवरुन पाचवडमार्गे वाई गाठलं तिथून मेणवलीचा नाना फडवणीसांचा वाडा पाहून धोम गाठलं. धोम गाव बहुत सुंदर. झाडांनी वेढलेलं आणि पेशवेकालीन स्थापत्याची अप्रतिम मंदिरे असलेलं. ह्या धोमच्या अलीकडेच भोगाव आहे. भोगाव प्रसिद्ध आहे ते वामनपंडिताच्या समाधीसाठी. अर्थात मूळ समाधी सातारा जिल्ह्यातच कोरेगाव येथे आहे आणि भोगाव येथील समाधी वामनपंडितांच्याच कुण्या एका शिष्याने गुरुस्मरणार्थ बांधली आहे. ह्या भोगावमधेच अर्धनिम्म यादवकाळातलं मंदिर शिल्लक आहे. छताचा भाग पेशवेकाळात जीर्णोद्धारीत केला गेलेला आहे. ह्या मंदिराच्या पुढ्यातच प्रचंड गचपण आहे. तिथल्या त्या झाडीतच जमिनित पुरला गेलेला एक भग्न वीरगळ दिसला. काट्याकुट्यांतून मार काढत तिथवर पोहोचलो. लढाई आणि धारातीर्थी पडलेला वीर हे भाग गाडलेले गेलेले आहेत तर वरचा अप्सरा वीराला नेतात हा भाग फक्त दृश्यमान आहे.
भोगाव वीरगळ.
आता मध्ये परत एकदा अमृतेश्वराला गेलो होतो. अगदी दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट. रतनवाडीला किमान ४/५ वेळा जाऊनही एक गोष्ट ध्यानात आली नव्हती ती तेव्हा आली. मंदिराच्या पाठीमागच्या प्रवेशद्वारातून आत जाताच वर छताकडे पाहिले असता तिथे छताची भिंतउलटे वीरगळ रचलेले आहेत. मंडिराच्या बाहेरील वीरगळांची येथल्या धुव्वाधार पावसामुळे खूपच हानी झालेली दिसते पण येथले आतले वीरगळ अगदी उत्तम स्थितीत आहेत. अर्थत हे पाहण्याकरीता उताणे झोपून वर पाहावे लागतात शिवाय विजेरीचा झोतही मारावा लागतो नाहीतर अंधारामुळे ते दिसत नाहीत.
रतनवाडी अमृतेश्वर मंदिरातील छतांत असलेले वीरगळ
ह्याच अमूतेश्चर मंदिराच्या आवारात एक गधेगाळसुद्धा आहे. गधेगाळावरील शिलालेख पूर्णपणे झिजल्याने वाचता येत नाही, शिवाय ह्याचे वाचन पूर्वीही कधी झाले नाही मात्र हा लेख अमृतेश्वर मंदिराला दिलेल्या दानाबद्दलचा असावा व ह्या दानाचा लोप करणार्यांविषयी शापवाणी कोरलेली असावी हे निश्चित.
रतनवाडी गधेगाळ
गधेगाळावरनं आठवलं. मध्यंतरी एकदा नागावला गेलो होतो. नागावच्या अलीकडेच अक्षी हे गाव. अतिशय सुंदर. गावाच्या सुरुवातीलाच काष्ठमंडप असलेलं सोमेश्वराचं एक सुरेखसं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूलाच रस्त्याच्या पलीकडे गटारावर एक गधेगाळ आहे. हा शके १२१३ मधला लेख असून रामदेवरायाची राजवट चालू असता त्याचा पादपद्योपजीवि श्री जाईदेव पुत्र इश्वरदेव क्षत्रिय ह्याने अक्षी गावातील कालिकादेवीच्या ब्राह्मणास एक गद्याण दिल्याचा उल्लेख आहे आणि त्याखाली 'तेहाची माएसी गाढौ घोडु..' अशी शापवाणी कोरलेली आहे..
ह्याच गावात मंदिराच्या दुसर्या बाजूस सरकारी कचेरीनजीकच अजून एक गधेगाळ आहे. डॉ. तुळपुळे ह्यांच्या मते तो मराट्गीतील आद्य शिलालेख. अर्थात हे मत काही संशोधकांना मान्य नाही कारण काल्लोलेख अस्पष्ट आहे. हा शिलाहार केशीदेवाचा लेख असून त्यात पश्चिमसमुद्राधिपती, कोंकणचक्रवर्ती श्री केशिदेवराय राज्य करत असता त्याचा प्रधान भइर्जु सेणुई ह्याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य मोजून दिले. त्याखाली शापवाणी कोरलेली आहे. हे दोन प्राचीन लेख आज पूर्ण दुर्लक्षित अवस्थेत आहेत.
यादव रामदेवरायाचा अक्षी गधेगाळ
शिलाहार केशिदेवाचा अक्षी गधेगाळ
मध्ये खिद्रापूरला गेलो होतो. तिथले महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि शिल्पकलेने समृद्ध असलेले कोपेश्वर मंदिर तीन चार वेळा पाहिलेले आहे. तिथल्या सुदर मूर्तींसारखेच सुंदर तिथले वीरगळही. मी आतापर्यंत पाहिलेला लेख असलेला एकमात्र वीरगळ हा तिथल्या मंदिराच्या ओसरीत भिंतीत बसवलेला आहे. लेख असलेले इतरही वीरगळ आहेत पण ते मात्र कर्णाटकात. महाराष्ट्रातला हा पाहिलेला मी एकमेव. ह्या लेखही महत्वाचा. भोजराजा दुसरा ह्याचा सेनपाती बम्मेश ह्याचा हा वीरगळ. हा बम्मेश महापराक्रमी यादवसम्राट सिंघण दुसरा ह्याचेबरोबर झालेल्या युद्धात वीरगतीस प्राप्त झाला. अतिशय देखणा असा हा वीरगळ. ह्याच मंदिराच्या आवारात अजून दोन तीन वीरगळ आहेत.
कोपेश्वराच्या ओसरीतील भिंतीत असलेला एक वीरगळ
भोज सेनापती बम्मेशाचा अत्यंत देखणा असलेला वीरगळ
कालचीच गोष्ट, म्हणजे कालपरवाचीच असं नाही, अगदी कालचीच.
काल हिंजवडी परिसरातले वीरगळ पाहायला गेलो होतो. हिंजवडीतला वीरगळ माझ्या रोजच्या पाहण्यातला. अगदी जायच्या यायच्याच वाटेवर पण कधी थांबून नीट पाहता आला असं झालं नाही. काल मात्र अगदी ठरवून बाहेर पडलो. हा वीरगळ आहे हिंजवडीतल्या स्मशानाच्या समोरच्या दहाव्याच्या घाटावर. चारी बाजूंनी शिल्पे कोरलेली आहेत. बरेच दिवस तो इथल्याच लहानश्या मंदिराला टेकवून ठेवलेला होता. ४/५ दिवसांपूर्वीच तो नव्या जागेवर उभा केलेला आहे.
हिंजवडी वीरगळ
हिंजवडीवरुन निघालो ते नेरे गावात जायला. नेरे गावात बरेच वीरगळ आहेत अशी माहिती मिळाली होती. नेरे गाव मारुंजीच्या पुढे. मारुंजी कासारसाई च्या मध्येच एक उजवीकडे जाणारा फाटा लागतो. तिथून अर्धाकच्च्या रस्त्याने नेरे गाव. गाव असं दिसत नाहीच अधून मधून घरं आणि बाजूला शेतं. तिथेच रस्त्यावर एक शिवकालीम शिवमंदिर आहे. जवळपास पन्नासेक वीरगळ तिथे हारीने मांडून ठेवलेले आहेत. तिथेही गोवर्धन वीरगळ आहेत. ढालाईताशी युद्ध, तीरयुद्ध, अश्वयुद्ध असे बरेच प्रस्ग तिथल्या वीरगळांवर कोरलेले आहेत. तिथेच काही वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ देखील आहेत. वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे तिथल्या त्या वीरगळांवर नेहमीसारख्या पट्टीका नसून शिळेचा निम्माधिक भाग तलवार हाती घेतलेल्या एकाच वीराने व्यापलेला आहे. असे कित्येक पुरुषभर उंचीचे वीरगळ तिथे आहेत.
नेरे वीरगळ
नेरे वीरगळ
नेरे गोवर्धन वीरगळ
नेरे एकाकी योद्धा
नेरे वीरगळ
आतापर्यंतच्या एकंदरीतच वीरगळ भेटींचा हा सारांश, ह्य लेखांत मुद्दामूनच पुनरुक्ती न व्हावी, म्हणून माझ्या आधीच्या लेखांमध्ये शक्यतो न आलेले वीरगळ घेतलेले आहेत. काही मोजके आधीच्या लेखांमध्ये आलेले असतीलच. वीरगळावर लिहित असताना सतीशिळा आणि गधेगाळांविषयी लिहिणं हे अपरिहार्य होतंच. तसं ते लिहिण्याच्या ओघात लिहूनही झालं
ह्या अनाम वीरांचं माझ्यावर काही ऋण असणार. ते फेडण्याचा अल्पसा प्रयत्न मी येथे केला आहे.
_/\_
प्रतिक्रिया
28 Feb 2016 - 4:22 pm | गवि
साष्टांग प्रणाम.
28 Feb 2016 - 4:26 pm | अजया
तुमच्या अभ्यासाला सलाम.
28 Feb 2016 - 4:29 pm | जेपी
___/\___
28 Feb 2016 - 4:51 pm | स्वामी संकेतानंद
_/\_
28 Feb 2016 - 5:02 pm | एस
भटकंतीत वीरगळांकडे फारसे बारकाईने कधी पाहत नव्हतो. तुमच्या लेखांमुळे आता आवर्जून फोटो काढून ठेवत असतो. ह्या वीरगळांचं ऐतिहासिक व सांस्कृतिक कालखंडांना जोडणारे महत्त्वाचे दुवे म्हणून असलेलं महत्त्व वादातीत आहे. मला फक्त एक गोष्ट दुर्दैवाची वाटते की वीरगळ कोरू शकणार्या लोकांनी त्यावर संबंधित वीरांची, युद्धांची व परिसराची माहिती का कोरून ठेवली नाही. काही ठराविक महत्त्वाच्या राजवटी वगळता तत्कालीन समाजजीवनाबद्दल आपल्याला आजही फारशी माहिती उपलब्ध नाही याचे कारण लिखित स्वरूपात ती जतन करून ठेवली गेली नाही.
यामुळे होणारा तोटा असा की मध्ययुग व त्याआधीचा कालखंड यातली सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक स्थित्यंतरे आपल्याला अज्ञातच राहतात.
28 Feb 2016 - 10:47 pm | प्रचेतस
सहमत आहे.
कर्नाटकातल्या थोड्याबहुत वीरगळांवर मात्र बऱ्यापैकी लेख आहेत. मुख्यत: चालुक्य, होयसळांपैकी खाशा सेनानींचे ते वीरगळ आहेत. इथले वीरगळ बहुतांशी सामान्य जनतेने उभारलेले असावेत. लिहिता न येणे हेही एक कारण असावे.
28 Feb 2016 - 5:10 pm | बॅटमॅन
साष्टांग प्रणाम. _/\_
वल्ली सरांनी अता फक्त मिपावर न लिहिता संशोधनपर जर्नलमध्ये लिहावे अशी आग्रहाची विनंती आहे. हे असे लेख वाचून कुणी आयतोबा संशोधक तिकडे गेला की लगेचच आपल्या नावावर पेपर छापून मोकळा होईल. (नव्हे, होतातच) ते टाळायचे असेल, स्वतःच्या मेहनतीचे चीज व्हायचे असेल तर पेपर हा लिहिलाच पाहिजे.
28 Feb 2016 - 10:49 pm | प्रचेतस
धन्स रे. त्याबद्दल अजून ठरवलेले नाही पण अजून बराच अभ्यास करावा लागणार आहे.
28 Feb 2016 - 11:15 pm | बॅटमॅन
अभ्यास अर्थातच लागेल. पण तुमची तयारी बघता हे आजिबात अवघड वाटणार नाही.
29 Feb 2016 - 12:59 am | डॉ सुहास म्हात्रे
+१००
वल्ली मनावर घ्याच हे काम.
नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण लेख हेवेसांन.
भोज सेनापती बम्मेशाच्या वीरगळाचे कुशल कोरीवकाम खास आवडले !
29 Feb 2016 - 10:11 am | सुहास झेले
सहमत !!
4 Mar 2016 - 10:49 pm | आनंदयात्री
सहमत आहे. कमीत कमी - एका ठिकाणच्या विरगळांबद्दल एक पान, त्यावर त्याची आजवर असलेली माहिती आणि तू काढलेले फ़ोटो एवढे हवेच. त्यांची सूची असेल तर अजूनच छान.
28 Feb 2016 - 5:20 pm | अनुप ढेरे
अप्रतिम!
28 Feb 2016 - 5:20 pm | यशोधरा
वाखु साठवली आहे, सावकाशीने वाचणार.
28 Feb 2016 - 5:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग्रेट वल्लीचा आणखी एक माहितीपूर्ण लेख. सतीशिळा बद्दल माहितीच नव्हतं. आता सतीशिळा ओळखता येतील. प्रतिसादात उल्लेख आला आहे, त्या प्रमाणे संशोधन मासिकात लिहिलंच पाहिजे आणि माझी जुनी मागणी पुस्तक करा. बाकी, वल्ली लेख आवडला. लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
28 Feb 2016 - 5:58 pm | स्वाती दिनेश
अभ्यासपूर्ण आणि रोचक लेख!
स्वाती
28 Feb 2016 - 8:31 pm | लॉरी टांगटूंगकर
भन्नाट लेख! धन्यवाद.
28 Feb 2016 - 9:06 pm | राही
खुद्द मुंबईतही तीन वीरगळ सापडले आहेत. त्यातला एक पुरुषभर उंचीचा आहे आणि तो कुठल्यातरी समाजाची कुलदेवता म्हणून पुजला जातोय! बाकीचे दोन खाजगी संग्रहांत आहेत.
बरेचसे वीरगळ डॉक्युमेंटेड आहेत आणि बरेचसे नाहीतही. वीरगळ हे तसे दुर्मीळ नसल्याकारणाने संशोधनासाठी त्याचे महत्त्व जाणवले नसावे.
bdw, सतीशिलेतला हात हा बहुतेक वेळां चुडेमंडित असतो. अगदी ठळक कांकणे असतात आणि ती त्या बाईचे अखंड सौभाग्य दाखवतात. आणि अर्थातच (हे तुम्ही लिहिलेच आहे,)दोन हात म्हणजे दोन बायका, अधिक हात म्हणजे अधिक बायका सती झाल्या.
आणि लेख व फोटो छानच आहेत हे वेगळे सांगायला नकोच.
28 Feb 2016 - 10:54 pm | प्रचेतस
खुद्द मुंबईत म्हणजे नेमके कुठे सापडले?
बोरीवलीनजीकच्या एकसर गावात पुरुषभर उंचीचे दोन वीरगळ आहेत. त्यावर आरमारी युद्धाचे प्रसंग कोरलेले आहेत. उपरोक्त प्रसंग देवगिरीचा महादेव यादव आणि उत्तर कोकणचा शेवटचा शिलाहार राजा ह्यांच्यातील आरमारी युद्धाचे असावेत. महादेवाने सोमेश्वराचा सम्पूर्ण पराभव करून उत्तर कोकण शिलाहार राजवट खऱ्या अर्थाने समुद्रात बुडवली.
28 Feb 2016 - 11:32 pm | राही
एकसर गावात मला वाटते एकच आहे. मी क्लब अॅक्वेरियाच्या जागेत (आता टॉवर आहे) एकच पाहिल्याचे आठवतेय. आणखी एक वांद्र्याला सापडलेला खाजगी संग्रहात आहे. मी पाहिलेला आहे. तिसरासुद्धा बोरीवलीतच आहे असे 'अधिकृत सूत्रांकडून'(!) ऐकले आहे, मी पाहिलेले नाही. क्लब अॅक्वेरियाला सरळपणे जाऊ देत नसत. त्यावरून वादही झाले. ए.एस.आय.ने ते स्मारक संरक्षित केले तर तिथे बांधकामाला अड्थळा येईल या हेतूने तिथे जाणार्यांची अडवणूक होई. त्यांनी त्या जागेचे प्रस्थ वाढवू नये म्हणून. तिथेच दोन आहेत का?
29 Feb 2016 - 9:52 am | प्रचेतस
एकसर गावात दोन वीरगळ आहेत. ते एका मंदिराच्या आवारात आहेत. ते मंदिर नेमके कुठलं हे आता आठवत नाही.
29 Feb 2016 - 11:11 am | बोका-ए-आझम
कदाचित?
28 Feb 2016 - 9:06 pm | अभ्या..
वल्लीसर. प्रचंड अभ्यास आणि व्यासंगाने नटलेला आपला लेख अन प्रकाश चित्रे केवळ अप्रतिम. आपण ह्या विषयावर स्पेशलायझेशनचे (स्पेशालिस्ट ऑलरेडी आहातच, थोडा घोरमेंट शिक्का वगैरे पण म्याटर्स हो) मनावर घ्यावेच ही नम्र विनंती.
.
बाकी ते आम्हाला आपल्या चाह्त्यांच्या यादीत स्थाण वगैरे पाहा की जरा.
28 Feb 2016 - 9:10 pm | राही
मला वाटते बैलाने शिंग खुपसल्यामुळे मेलेल्याच्या अशा एका वीरगळावर बैलाची आकृती आहे.
28 Feb 2016 - 9:28 pm | अभ्या..
सतीशिलेवर आणि गधेगाळांवर सूर्यचंद्र असत (इथेही फोटोत दिसताहेत) ते याव्चंद्रदिवाकरौ टायीप राहावे म्हणून का काही दुसरा अर्थ असे? की ते सूर्यचंद्रच नव्हेत?
28 Feb 2016 - 10:28 pm | राही
सतीच्या बाबतीत तिचे सौभाग्य आणि कीर्ती यावच्चंद्रदिवाकरौ अखंडित राहावी, आणि गधेगळांमध्ये लिहिलेले आदेश यावच्चंद्रदिवाकरौ पाळले जावेत (दानपत्र किंवा अन्य हक्कप्रदान असेल तर ते यावच्चंद्रदिवाकरौ कायम राहातील) अशा अर्थी.
28 Feb 2016 - 10:57 pm | प्रचेतस
अगदी हेच.
28 Feb 2016 - 9:28 pm | जयंत कुलकर्णी
कर्नाटक...
![Simple, Free Image and File Hosting at MediaFire](https://www.mediafire.com/convkey/dcfd/cc26b8d1e4x3ntb4g.jpg)
28 Feb 2016 - 9:31 pm | जयंत कुलकर्णी
खिद्रापूर
![Simple, Free Image and File Hosting at MediaFire](https://www.mediafire.com/convkey/6729/wqan5gg2gcl64pq4g.jpg)
28 Feb 2016 - 9:34 pm | जयंत कुलकर्णी
पळसदेव
![Simple, Free Image and File Hosting at MediaFire](https://www.mediafire.com/convkey/5e84/nj5w9728f3k4hhu4g.jpg)
28 Feb 2016 - 9:50 pm | जयंत कुलकर्णी
जिल्हा : सातारा
![Simple, Free Image and File Hosting at MediaFire](https://www.mediafire.com/convkey/af3c/71u7jc8fq81mjpq4g.jpg)
28 Feb 2016 - 10:57 pm | प्रचेतस
धन्यवाद काका ह्या छायाचित्रांबद्दल. पुण्यात कुंभारवाड्यानजीकच्या मांगिरबाबा मंदिराच्या पायऱ्यांवरही दोन भलेमोठे वीरगळ आहेत.
28 Feb 2016 - 10:44 pm | मन
वाचनखूण साठवली आहे.
निवांत अजून एकदा वाचणार आहे सावकाश.
28 Feb 2016 - 10:58 pm | सतिश गावडे
हा लेख वाचून आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
दगड-धोंडयात रमणारा हा माणूस त्याच्या या आवडीच्या विषयावर बोलू लागला की अतिशय रटाळवाणे वाटते हा माझा आजवरचा अनुभव. कदाचित हा माझा प्रांत नसल्यामुळे असेल. माहिती त्याच्या लेखात नेहमीच असते. मात्र आज पहिल्यांदा त्याच्या माहितीने ललित लेखनाचा साज चढवला आहे. आणि हा साज अतिशय शोभून दिसत आहे.
वीरगळ, सतीशिळा किंवा गधेगाळ हे कधी काळी या मातीत नांदलेल्या संस्कृतीचे, जीवनशैलीचे प्रतिक आहेत. राजा राममोहन रॉय सारख्या थोर समाजसुधारकाच्या पुढारकाराने ही अमानुष प्रथा बंद झाली असली तरी कधी काळी ही प्रथा समाजमान्य होती. राजपूत स्त्रीयांचा जोहार हा ही सती जाण्याचाच प्रकार. सतीशिळा त्या अनामिक दुर्दैवी स्त्रीयांचा समाजातील अनिष्ट रुढींनी घेतलेल्या बळीची साक्ष देत गावोगावी मंदीरांच्या, स्मशानांच्या आडोशाला उभ्या आडव्या पडल्या आहेत.
वीरगळ तर थेट भगवदगीतेतील दुसर्या अध्यायातील सदतिसाव्या श्लोकासी नाते सांगणारा.
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥२-३७॥
लढता लढता मेलास तर स्वर्गाला जाशील; जिंकलास तर पृथ्वीचे राज्य उपभोगशील.
वीरगळावर कोरलेल्या पट्टयांपैकी सर्वात वरच्या पट्टयावर कोरलेले धारातिर्थी पडलेल्या वीराला स्वर्गात नेणार्या अप्सरांचे चित्र या श्लोकाची आठवण करून देते.
गधेगाळ संस्कृती आजही जिवंत आहे त्यामुळे त्याबद्दल काही न लिहीणेच इष्ट.
29 Feb 2016 - 9:53 am | प्रचेतस
_/\_
29 Feb 2016 - 12:11 am | धनावडे
छान लेख
माझ्यागावी आणि आसपासच्या गावामध्ये जो बळीशाळेचा
फोटो दिलाय तसे बरेच दगड आहेत पण त्यावर अशी
चार मेंढ्याची आकृती नाही मध्यभागी फक्त एक थोडासा
उंचवटा असतो आणि आकार चैकोनी तळाकडे थोडा
निमूळता आणि उंची २.५-४ फुटापर्यत असते
फोटो मला इथे देता येत नाही. तर तशी शिळा असते
तिला काय म्हणतात.
लोकाना विचारल तर देवाचा दगड आहे हेच उत्तर येत
आणि धन्यवाद तुमच्यामुळे वीरगळ काय ते कळल
आता गावी शिल्लक आहेत तेवढे जपायला पाहिजेत
29 Feb 2016 - 10:02 am | प्रचेतस
उम्म. त्या प्रकारांना थडी म्हणतात. मुसलमान काळात वीरगळांवर शिल्पे कोरायची प्रथा बंद झाली. त्याऐवजी चौकोनी उभट शिळेवर वरच्या बाजूस मध्यभागी एखादा उंचवटा किंवा वरच्या चारही कोपर्यांवर उभट उंचवटे कोरण्यात येऊ लागले. आणि उरलेल्या शिळेवर काहीच कोरण्यात येत नसे.
शिवकाळात व त्यानंतर बरीच थडी कोरली गेली आहेत. सह्याद्रीतल्या बहुतेक किल्ल्यांवर एखादं तरी थडं दिसतंच दिसतं.
29 Feb 2016 - 1:02 am | पद्मावति
अप्रतिम लेख.
29 Feb 2016 - 7:43 am | कंजूस
नेहमीप्रमाणे उत्तम. आता असले "दगड" दिसले की फोटो काढून ठेवणार.
# हल्ली रूट ट्रॅकिंग अॅप्समध्ये "way points" टोचता येतात.त्याचा उपयोग करून नकाशा देण्याचा विचार आहे .ती फाइल [ .xml ] आहे ती दुसरीकडे ओपन कशी करायची?
29 Feb 2016 - 9:15 am | नाखु
उशीरा लेख वाचल्याने माझ्या प्रतीक्रिया आधीच चोरल्या गेल्या आहेत असे दिसून आले. (बरी शिक्षा घडली).
अता पहिली गोष्ट : वाखू साठवली आहे आणि जमल्यास काय नक्कीच प्रिंट घेऊन ठेवणार किमान आपण पाहतोय ते काय आहे कळाले तरी पुरे.
अति अवांतर बर्याच खंडोबा मंदीराचे बाहेर (चिंचव्डातील गांधी पेठेतही आहे) असे वीरगळ सद्रुश्य दगड आहेत काहींना शेंदूर फासला गेला आहे.
मूळ अवांतर आज दोन लेखन उपास सुट्लेले पाहून बरे वाटले..
29 Feb 2016 - 10:03 am | प्रचेतस
आज जाऊ आपण ते बघायला. मी पूर्वी पाहिलेले आहेतच पण ते वीरगळ नव्हेत.
29 Feb 2016 - 10:09 am | नीलमोहर
किती तो सखोल अभ्यास,
तपशीलवार माहिती आणि फोटोंसाठी धन्यवाद.
29 Feb 2016 - 10:20 am | पियुशा
वल्लिचे लेख म्हनजे मेजवानीच असते मिपाकराकरिता :)
29 Feb 2016 - 10:24 am | सुनील
मस्त लेख!
अलिबागजवळील अक्षीचा गधेगाळ नक्की कुठे आहे?
आजवर असंख्य वेळा त्या रस्त्यावरून गेलोय पण पाहण्यात आला नाही. एकदा पहायचा आहे.
29 Feb 2016 - 10:59 am | प्रचेतस
अलीबाग नागाव रस्त्यावर असलेल्या अक्षीच्या स्तंभावरुन सरळ खाली किनार्याच्या दिशेने गावात निघायचे. त्या रस्त्यावरच सुमारे अर्धा किमी अंतरावर सोमेश्वर मंदिर आहे. रामदेवरायचा गधेगाळ रस्त्याच्या डाव्या बाजूस गटारावर तर केशिदेवाचा गधेगाळ रस्त्याच्या उजव्या बाजूस (मंदिराच्या उजवीकडे) सरकारी कचेरीच्या पुढ्यात आहे.
29 Feb 2016 - 11:11 am | सुनील
धन्यवाद.
पुढील वेळेस नक्की पाहीन.
29 Feb 2016 - 11:09 am | बोका-ए-आझम
_/\_. आधी म्हटलेलंच परत म्हणतो - आधीचा आयडी सार्थ होता हो!
29 Feb 2016 - 11:21 am | स्पा
सहमत पुरे झाले बजाज चेतक
वल्लीच करा पाहू
29 Feb 2016 - 7:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वल्लीच झकास आयडी आहे.
29 Feb 2016 - 8:30 pm | चांदणे संदीप
मपलेही अनुमोदन +१
29 Feb 2016 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा
आमचे तर कायम स्वरूपी अनुमोदन आहेच्च!
पण आगोबा ऐकत(च) नै! दू दू ...
29 Feb 2016 - 11:56 pm | सतिश गावडे
मी तर कायम हेच्च म्हणतो.
पण आगोबा ऐकत(च) नै! ह्ही ह्ही!
1 Mar 2016 - 7:55 am | स्पा
नीलकांत हि हेच म्हणत असतो
तू ये तुला (जुना आयडी ) फुकट देईन
29 Feb 2016 - 11:16 am | शान्तिप्रिय
सुंदर माहिती प्रचेतस.
पुण्यात कर्वे रस्त्यावर कर्वे पुतळ्याजवळ एका शिवालयातही एक वीरगळ आहे हे आपणास माहित असेलच
29 Feb 2016 - 11:36 am | प्रचेतस
हो. मला वाटतं मी खूप पूर्वी बघितलेला होता.
तिथे एक पुणेरी पाटीसुद्धा आहे तिचा साधारण आशय असा " हा शनि-मारुती नसून वीरगळ आहे. कृपया ह्याला तेल , फुले वाहू नयेत."
29 Feb 2016 - 11:46 am | अभ्या..
माढा येथे रावरंभा निंबाळ्कराचा भुइकोट किल्ला आहे. माढा गाव त्या किल्ल्याभोवतीच वसलेले आहे. गावात अनेक वीरगळ अन नागयुग्मे इतस्ततः विखुरुन पडलेले मी पाहिले आहेत. गावातल्या लोकांनी किल्ल्याचे दगड माती सुध्दा नेल्याने सध्याचे माहीत नाही. माढेश्वरी देवस्थानापाशी पण काही समाधींपांशी असे वीरगळ बघितल्याचे स्मरते.
29 Feb 2016 - 11:29 am | सस्नेह
कसले सुप्पर कलेक्शन आणि केवढा तो बारीक अभ्यास !!
बाकी वीरगळ या दुर्लक्षित शिल्पकलेला योग्य न्याय दिला आहे असे वाटले.
29 Feb 2016 - 1:17 pm | स्वच्छंदी_मनोज
वल्ली साहेब अफाट लिहीलेत. जबरा अभ्यास आणी सुक्ष्म निरीक्षण शक्तीला सलाम घ्यावा.
ट्रेक करताना अनेक किल्ल्यांवर, मंदीरात आणी गावात असे वीरगळ दिसलेत. खास आठवतात ते मानगड किल्ल्याच्या पायथ्याचे. १५-२० सुस्पष्ट असे वीरगळ मांडून ठेवलेत. माझ्याकडे त्याचा फोटो आहे, नंतर टाकतो.
बहुदा मानगड पायथ्याला मोठे युद्ध झाले असावे. हे शक्य आहे कारण मानगड कुंभ्या घाटाच्या पायथ्याला येतो आणी शिवकालीन नागोठणे ते रायगड (व्हाया जोर-चनाट खोरे) वाटेवर येतो (अश्या काही युद्धाबद्दल माहीती आहे काय?).
असेच ५ वीरगळ नाशीकच्या सप्तसृंगी रांगेतील अचला किल्लच्या पायथ्याच्या गावात आहेत. यांचे वैशीष्ठ्य म्हणजे हे ८ फुट उंच आहेत. याचा ही फोटो आहे माझ्याकडे टाकीन तो पण इथे.
मंदिराच्या पाठीमागच्या प्रवेशद्वारातून आत जाताच वर छताकडे पाहिले असता तिथे छताची भिंतउलटे वीरगळ रचलेले आहेत.>>>> असेच छतावरील काम खिरेश्वरच्या मंदीराचे आहे. तेही पाहीले आहेस काय?
29 Feb 2016 - 3:03 pm | प्रचेतस
मस्त माहिती. तुझ्याकडची छायाचित्रे अवश्य दे.
खिरेश्वरला अजून गेलो नाहिये रे. मात्र पिंपरी दुमाला येथील मंदिरातही भिंतीत दगड म्हणून बसवलेले कित्येक वीरगळ आहेत.
24 Apr 2016 - 2:07 am | हकु
प्रचेतस साहेब,
तुमच्या अभ्यासाला आणि व्यासंगाला प्रणाम! _/\_
![1](https://lh3.googleusercontent.com/-9-jg1zWZpNw/VxvV_7SWE8I/AAAAAAAAumE/pWmpash5CdwgMwx3xI-ND5ci0hil16YTQCCo/s640/DSC_9281.JPG)
![2](https://lh3.googleusercontent.com/-WKSJsYqJ3eI/VxvW0y4xVEI/AAAAAAAAumQ/WM62RUY7u_wIDiU3mdy0z58tWi5eFGu-ACCo/s512/DSC_9283.JPG)
![3](https://lh3.googleusercontent.com/-KBi3TRuKLCw/VxvXhkKd7EI/AAAAAAAAumU/1xqN-PaqxOM_RszckpA9OxcgIiiyU0SIQCCo/s640/DSC_9284.JPG)
![4](https://lh3.googleusercontent.com/-Zb0XiNSLtKI/VxvYW7K7KTI/AAAAAAAAumg/QLHdQ9Ocv0grEK7ZXvwgKsyFccJkhrOqACCo/s640/DSC_9285.JPG)
![5](https://lh3.googleusercontent.com/-isPUVEZJaWw/VxvY9hwL1jI/AAAAAAAAums/MotJ5ecblQM-1yS-yhZahDKfHYOS9qXJwCCo/s640/DSC_9286.JPG)
![6](https://lh3.googleusercontent.com/-BRJqJnwXRJU/VxvZoOnVw3I/AAAAAAAAum0/_o1xruvgV7gRPSwe1fJEtHRH7g3d2-LFgCCo/s640/DSC_9287.JPG)
![7](https://lh3.googleusercontent.com/-pYAyOaS1Z18/VxvbFDlOjYI/AAAAAAAAunA/m0fJDC61a1sdTnApkoQvXZAKZLzyOAqcwCCo/s640/DSC_9290.JPG)
मागे एकदा तुमचा हा लेख 'पाहिला' होता. नंतर वाचायचे ठरवून.
परवा मानगडला गेलो होतो आणि तिथे भरपूर वीरगळी दिसल्या आणि तुमच्या या लेखाची आठवण झाली. लगेच आल्या आल्या वाचून काढला. तुमच्या या लेखात मानगडच्या वीरगळींचा उल्लेख कुठे आलाय का हे बघत होतो आणि स्वच्छंदी_मनोज साहेबांची ही प्रतिक्रिया दिसली.
मी इथे त्या वीरगळींचे फोटो टाकतो. त्यांचाही अर्थ आपण कृपया मला सांगावा ही विनंती.
साधारण वीस वीरगळी तरी असाव्यात.
24 Apr 2016 - 7:13 am | प्रचेतस
धन्यवाद.
ह्यातले बरेचसे वीरगळ तर काही सतीशिळा आहेत. सतीचा आशीर्वादपर हात ज्या शिळांवर कोरलेला दिसतोय त्या सतीशिळा. ह्याच सतीशिळांवर वीरमरण आलेल्या पतीचे युद्धप्रसंग कोरलेले दिसताहेत.
24 Apr 2016 - 9:13 am | हकु
अच्छा. सतीशिळांचा अर्थ येतोय थोडा थोडा लक्षात.
आता उदाहरणादाखल दुसऱ्या छायाचित्रातले मधले विरगळ घेऊ. त्यात पहिल्या चित्रात शंकराची पूजा करताना दोन व्यक्ती दिसत अहेत. म्हणजे तो वीर शिवभक्त आहे हे लक्षात येतंय. पण दुसऱ्या चित्राचा अर्थ काय? तिसऱ्या चित्रचाही अर्थ लक्षात येतोय. तो ज्या शस्त्राने मेला ते शस्त्र व युद्धाचा प्रसंग दिसतोय.
पण हा असाच प्रकार सर्व ठिकाणी असतो? तिसऱ्या छायाचित्रातल्या डावीकडून दुसऱ्या वीरगळीत क्र. दोन च्या चित्रात युद्धाचा प्रसंग आहे.
24 Apr 2016 - 9:35 am | प्रचेतस
काही वेळा पट बदलत असतात पण सर्वसाधारणपणे खालच्या दोन पट्ट्यांमध्ये अनुक्रमे युद्धाचा प्रसंग व मृत वीर कोरलेला असतो. पहिल्या पटामध्ये वीर स्वर्गवासी होऊन शिवलिंगाची पूजा करताना दाखवलेला असतो तर त्याखाली त्याला अप्सरा स्वर्गात घेऊन जायला आलेल्या असतात असे दर्शवले जाते.
कमी अधिक प्रमाणात हेच चार शिल्पपट सर्वसाधारणपणे आढळून येतात.
24 Apr 2016 - 3:16 pm | हकु
माहितीसाठी खूप खूप धन्यवाद!!
29 Feb 2016 - 1:42 pm | पिलीयन रायडर
नेहमीप्रमाणेच मस्त लेख! तुम्ही बॅट्या जे म्हणतोय ते खरंच मनावर घ्या. खुप दांडगा अभ्यास आहे तुमचा.
भोज सेनापती बम्मेशाचा अत्यंत देखणा सलेला वीरगळ खरंच फार देखणा आहे!
बंदिपुर मध्ये हे काही शिल्प दिसले होते. हे ही वीरगळच आहेत का?
29 Feb 2016 - 3:08 pm | प्रचेतस
धन्यवाद. पहिल्या छायाचित्रांतील खंजरधारी बहुधा क्षेत्रपाळ असावा.
दुसऱ्या छायाचित्रांत मात्र वीरगळ आहे. तिसऱ्या आणि चौथ्या छायाचित्रांत काही स्थानिक देवता आणि घोडेस्वार आहेत. ती त्रिमुखी देवी बहुधा भैरवी किंवा योगिनींपैकी कुणी असावी.
29 Feb 2016 - 3:03 pm | sagarpdy
__/\__
वल्ली साब, आप ग्रेट हो !
29 Feb 2016 - 3:06 pm | नाव आडनाव
__/\__
29 Feb 2016 - 3:08 pm | सूड
सुंदर आणि नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण!!
29 Feb 2016 - 3:32 pm | सुधांशुनूलकर
प्रचेतस आले की निर्जीव दगडांनाही वाचा फुटते. स्वानुभव.
_/\_
वल्लीसरांनी अता फक्त मिपावर न लिहिता संशोधनपर जर्नलमध्ये लिहावे या बॅट्याभाऊंच्या आग्रहाच्या विनंतीला कचकून हाणुमोदण!!!
आजची घोषणा - अजिंठ्यासह वेरूळ कट्टा झालाच पाहिजे!
29 Feb 2016 - 3:41 pm | नाखु
प्रतीसादास (घोषणेसह ) बाकडा वाजवून सहमती.
मिपा बिल्ला क्र १०१५
29 Feb 2016 - 6:30 pm | अत्रुप्त आत्मा
@वल्लीसरांनी अता फक्त मिपावर न लिहिता संशोधनपर जर्नलमध्ये लिहावे या बॅट्याभाऊंच्या आग्रहाच्या विनंतीला कचकून हाणुमोदण!!! >>> आंम्ही कंटाळलो सांगून सांगून! पण आगोबा ऐकतच नै! ल्लुल्लुल्लुल्लु :-/ दू दू दू दू दू
@प्रतीसादास (घोषणेसह ) बाकडा वाजवून सहमती. >> कचकूण +++++++११११११११
@
>> (सगा प्रचिती..) - ललीत लेखनाचा गंध देत झालेला समारोप आवडला. ह्यामुळे लेखाला एक चांगला पूर्णविराम मिळालेला आहे.
=========================
कोथळ्याचा विरगळ पर्वाच पाहून आलो. तिकडे गेलेलो असताना.
29 Feb 2016 - 6:35 pm | प्रचेतस
तिकडे कशाला गेला होतात म्हणे? :)
29 Feb 2016 - 6:56 pm | अत्रुप्त आत्मा
सासवड माझी सासुर वाडी आहे.. धण्यवाद.
29 Feb 2016 - 7:58 pm | अभ्या..
बुवा सासवड नावाची उत्पत्ती तशीच असावी का? बंधुराजाला वहिनीरूपी वड, इकडे सासरूपी वड.
29 Feb 2016 - 3:47 pm | सुमीत भातखंडे
अतिशय अभ्यासपूर्ण लेख.
29 Feb 2016 - 4:09 pm | मित्रहो
वीरगळ, सतीगळ, गधेगाळ याविषयी बरीच माहीती मिळाली.
29 Feb 2016 - 4:32 pm | माहितगार
छान लेख, माझ्या स्वभावा प्रमाणे एक बारीक शंका बरेच वीरगळ, सतीगळ, गधेगाळ हे संतसाहित्याच्या लेखनाच्या पुर्वीचे असावेत संत साहित्यात यांचा कुठे उल्लेख वगैरे आढळतो का ?
29 Feb 2016 - 6:30 pm | प्रचेतस
नक्कीच हे पूर्वीचे आहेत. ज्ञानेश्वरांच्या काळी मात्र ह्या तिघांचीही निर्मिती व्हायची. मुसलमानी अमदानीत गधेगाळ बंदच झाले,वीरगळांची जागा थड्यांनी घेतली. सतीशिळा मात्र पेशवेकाळातही घडवल्या जात होत्या.
मला वाटतं सतीबाबतचे काही उल्लेख ज्ञानेश्वरीतील ओव्यांत आणि तुकोबांच्या अभंगात आहेत पण नक्की कुठे ते माहीत नाही. संतसाहित्याच्या अभ्यासाबाबतीत मी शून्य आहे.
29 Feb 2016 - 4:40 pm | शान्तिप्रिय
प्रचेतस म्हणजेच वल्ली का?
29 Feb 2016 - 6:32 pm | प्रचेतस
हो. :)
29 Feb 2016 - 4:53 pm | राजेंद्र मेहेंदळे
वीरगळांविषयी आणि सतीशिळा, गधेगाळाविषयी मस्त माहीती मिळाली. लेख परत एकदा वाचतो आता.
अवांतर---मागच्या आठवड्यात गिरनारला गेलो होतो तिकडे पायर्या चढताना २-३ शिलालेख आढळले. त्याचे फोटो काढले आहेत. डि कोड करायला तुम्हाला देतो. :)
2 Mar 2016 - 12:22 pm | राजेंद्र मेहेंदळे
2 Mar 2016 - 12:45 pm | राजेंद्र मेहेंदळे
जाउदे...व्य.नि. करतो
29 Feb 2016 - 6:28 pm | जगप्रवासी
तुमच्या लेखांमुळे प्रत्येक दगड बारकाईने बघायची सवय झाली आहे. आमच्या सारख्या माणसांना ते दगडच वाटतात पण तुमच्या लेखांमुळे त्यांच्याकडे बघायची दृष्टी बदलली आहे. फिरताना असे वीरगळ दिसले की सोबत असणाऱ्या सर्वांना वीरगळ समजावून देतो, तुमच्या लेखांची कृपा.
खूप छान लेख… खरंच तुम्ही पुस्तक लिहा, तुम्ही लिहायला लागल्यावर ते दगड पण बोलू लागतात.
अवांतर : कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावातील एक वीरगळ
कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावातील कलाकृती…. हा विरगळ आहे का????
29 Feb 2016 - 6:35 pm | प्रचेतस
एकप्रकारे वीरगळच. पण हे उत्तर कालीन आहे. ह्या शिळांना थडी म्हणतात. ( एकवचनी - थडं)
स्थानिक लोकांनी कोरलेलं.
29 Feb 2016 - 6:56 pm | मदनबाण
सुरेख... माहिती बरोबरच सर्व फोटो देखील नेहमी अगदी सुस्पष्ट असतात. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पास वो आने लगे जरा जरा... :- Main Khiladi Tu Anari
29 Feb 2016 - 7:56 pm | के.पी.
निव्वळ अप्रतिम संग्रह आणि माहिती!
___/\___ ___/\___ ___/\___
29 Feb 2016 - 8:36 pm | स्पा
औंध मधल्या सिद्धेश्वराच्या देवळातल्या भल्या मोठ्या वीरगळी
29 Feb 2016 - 8:48 pm | प्रचेतस
बाबौ...जबराट आहेत रे हे वीरगळ.