आल्प्सच्या वळणांवर - भाग १ - नियोजन, पूर्वतयारी आणि प्रयाण
दुसरा दिवस उजाडला. तसा पहिलाच. कारण मुख्य प्रवासाला सुरुवात होत होती. संध्याकाळपर्यंत नियोजित हॉटेलला पोचायचं एवढंच या दिवसाचं ध्येय होतं. त्यामुळे निवांत आवरून निघालो. सूर्यदेवाने सकाळीच एकदा दर्शन दिलेले दिसले आणि एक ओझे उतरले. जर्मनीतून बाहेर पडण्यापुर्वी पेट्रोल भरणे आवश्यक होते म्हणून ते काम केले. जीपीएसला हॉटेलचा पत्ता दिला आणि त्याच्या इशाऱ्याप्रमाणे रस्ता धरला.
जातानाचा थोडा प्रवास ऑस्ट्रीया मधून होता. ऑस्ट्रीयातही गाडीसाठी टोल आहे. त्यासाठी परत Vignette घेतले आणि पुढचा प्रवास सुरु झाला. थोड्याच वेळात समोर पाटी दिसली "लिंडरहॉफ श्लॉस" म्हणजेच "लिंडरहॉफ पॅलेस". इथे जायचे काही डोक्यात नव्हते पण जर जवळच आहे तर थांबुयात का असा विचार मनात येताच पुढच्याच पार्किंगला गाडी थांबवली. जीपीएसला किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला. उत्तर आले अर्धा तास. घड्याळात बघता अजून बराच वेळ होता आणि जायचे ठरले. पुन्हा गाडी वळवली आणि लिंडरहॉफच्या दिशेने निघाली. आता घाट सुरु झाला आणि एका बाजूला छोटासा तलाव दिसला. मस्त दिसतोय तलाव म्हणून थांबायचा विचार केला.
आणि पुढे निघालो तसतसे लक्षात आले की हा जो तलाव मघाशी छोटासा वाटला तो मुळात बराच मोठा आहे आणि आता बराच वेळ आपला रस्ता शेजारून जाणार आहे. वाह. मग काय, जागा दिसेल तिथे थांबायचे, फोटो काढायचे आणि पुढे जायचे असे सुरु झाले. अगदी क्वचितच एखादी गाडी दिसायची. बाकी नीरव शांतता. नितळ आणि शांत पाणी आणि त्यात दिसणारे पर्वतांचे आणि झाडांचे प्रतिबिंब.
झाडांचे रंग बदलायला नुकतीच सुरुवात झाली होती.
हा होता प्लानझे (Plan See) म्हणजेच प्लान लेक. इथेच बसून राहावे असे वाटत होते. पण घड्याळ पुढे सरकत होते. त्यामुळे पुढे जाणे भाग होते.
लिंडरहॉफला पोहोचलो. बव्हेरिया या राज्याचा राजा लुडविग दुसरा याने बांधलेला हा राजवाडा.
खरं तर मुख्य इमारत ही राजवाडा म्हणावा एवढीही मोठी नाही, मोठ्या बंगल्या एवढा म्हणता येईल. पण बाहेरील बाग मात्र भव्य आहे आणि आजूबाजूचा परिसर पण सुंदर आहे.
थोडीफार खादाडी करून तिकीट काढून आत गेलो. बाहेरचे गार्डन बघत असतानाच इंग्रजी टूर सुरु होत आहे असे एक मुलगी आम्हाला सांगत होती. मग पळतच आत गेलो. खास बव्हेरियन वेशात असलेल्या मुलीने माहिती द्यायला सुरुवात केली. आत फोटोग्राफीला परवानगी नव्हती.
या राजाने एकूण तीन राजवाडे बांधले ज्यातला हा सगळ्यात लहान आणि एकमेव जो त्याच्यासमोर पूर्णत्वास गेला. पॅरिस मधील व्हर्साय पॅलेसवरून प्रेरणा घेऊन हा बांधला गेला. व्हर्साय पॅलेस बांधणारा लुइस राजा हा त्याचे प्रेरणास्थान होता. लुडविग त्याच्या वडिलांसोबत शिकारीसाठी पूर्वी इथे यायचा. सत्ता त्याच्या हातात आली त्यानंतर त्याने इथे हा राजवाडा बांधायचे ठरवले. त्याकाळी म्युनिकहून इथे येण्यासाठी ८ तास लागत आणि त्याला अशीच दूरवरची जागा हवी होती. आजूबाजूला संपूर्ण झाडी आहेत. आत असे काही असेल असे कुणाला बाहेरून वाटणार नाही एवढा आत हा बांधला आहे. राज्यकारभारात त्याला विशेष रस नव्हता. अत्यंत कलासक्त असा हा राजा होता. राजवाड्यातल्या प्रत्येक खोलीत याचा प्रत्यय येत होता. त्याचसोबत त्याची ख्याती दानशूर अशी होती आणि तो सगळ्यांना चांगला पगार द्यायचा. आतली कलाकुसर आणि शोभिवंत वस्तू बघून राजेशाही थाट म्हणजे काय याची प्रचिती येत होती. किती ती प्रत्येक वस्तूवर केलेली डिझाईन्स, सुंदर घड्याळे, वैविध्यपूर्ण मेणबत्ती स्टँड, भित्तीचित्रे, राजाच्या बसण्याची, झोपण्याची, खाण्याची सगळी व्यवस्था त्याच्या मनाप्रमाणे, आता तो राजा म्हणजे मर्जी त्याचीच. ड्रेस्डेन मधील प्रसिद्ध अशा माईस्टन पोर्सीलेन पासून बनविलेल्या अनेक कलात्मक वस्तू होत्या. मुख्य खोल्यांमधील भिंतीवर केलेल्या कामासाठी ५ किलो सोने वापरले आहे. एकएक दालन बघत जेव्हा शेवटच्या दालनात गेलो, तिथे होते आरसेच आरसे. लुडविग निशाचर होता. त्यामुळे जेव्हा रात्री तो जागा असायचा, तेव्हा मेणबत्त्यांच्या प्रकाशाने हे आरसे अधिकच उठून दिसायचे आणि शिवाय त्याला यातून व्हर्साय पॅलेसशी अधिक साधर्म्य वाटायचे. याच दालनात एक खास भारतातून आयात केलेल्या हस्तिदंताचे झुंबर आहे ज्याची ओळख संपूर्ण राजवाड्यातील मौल्यवान वस्तू अशी आहे. हे तयार करण्यासाठी ४ वर्ष लागली. भारतातील वस्तूंचे महत्व इथे बरेचदा फिरताना दिसते. इतरही अनेक वस्तू आणि बांधणीचे सामान परदेशातून आयात केले होते जे सगळे आजही मूळ स्वरुपात आहे. त्याच्या डायनिंग रूममध्ये त्याला एकट्यालाच जेवायला आवडायचे. त्यामुळे अशी यंत्रणा केली होती की त्याचा टेबल त्या यंत्रणेमार्फत खाली जाइल आणि अन्नपदार्थ वाढून वर पाठवले जाईल. राजवाड्यात सेन्ट्रल हीटिंग सिस्टीम होती जेणेकरून आतल्या लाकडी सामानाला आगीचा धोका होणार नाही. नॉयश्वानस्टाइन हा जगप्रसिद्ध कॅसल देखील यानेच बांधला, तिथेसुद्धा राजाच्या स्थापत्य, संगीत आणि सुशोभीकरण या विषयातील रस जाणवतो. पण तो पूर्ण होण्यापूर्वीच राजाचा दुर्दैवी आणि गूढ मृत्यू झाला. हे सगळे बघून असे वाटले की जर यापेक्षा प्रचंड मोठा असा नॉयश्वानस्टाइन त्याच्या हयातीत पूर्ण झाला असता तर अजूनच किती सजवला गेला असता. राजवाड्याच्या आतले फोटो आंजावरून साभार.
हस्तिदंताचा मेणबत्ती स्टँड
तंत्रज्ञान आणि कलात्मकता यांचा उत्तम संगम असलेला हा राजवाडा बघून पुन्हा बाहेर आलो.
जवळच ही न्यायदेवता दिसली.
या रस्त्याने चालत पुढे एक गुहा बांधली आहे. या राजाचा जवळचा मित्र आणि प्रसिद्ध ओपेरा संगीतकार रिचर्ड वागनर याच्या एका खास ओपेराची थीम म्हणून ही गुहा तयार केली गेली. यात आतमध्ये एक तलाव आहे. त्यात राजहंस असायचे आणि राजाला तिथे बसून ओपेरा ऐकायला आवडायचे. त्यातील पाण्याचे तापमान नियंत्रित राहावे म्हणून खास सोय केली आहे. त्यासोबतच तिथे अठराव्या शतकात त्याने रंग बदलणाऱ्या दिव्यांची सोय केली होती. फक्त संगीत ऐकण्यासाठी एक मानवनिर्मित गुहा. तीही अत्याधुनिक तंत्रांची जोड देऊन.
गुहेकडे जाणारा रस्ता
गुहेच्या आत
आम्ही बाहेर पडलो त्यानंतर थोड्याच वेळात एक बव्हेरियन संगीताचा कार्यक्रम सुरु होणार होता. त्याची चाललेली तयारी. या सगळ्यांचा पोशाख हा खास बव्हेरियन पोशाख आहे. म्युनिक मधील ऑक्टोबर फेस्ट साठी साधारण अशाच पद्धतीचा पेहराव केला जातो.
वेळेअभावी थांबणे शक्य नव्हते त्यामुळे इथून निघालो. पुढचा भाग हा ऑस्ट्रीया, इटली आणि स्वित्झर्लंड या तीनही देशांच्या सीमेवरचा होता. फ़ेर्न पास आणि रेशन पास (Fern pass & Reschen Pass) हे दोन्ही ओलांडून पुढे जायचे होते. पर्वतरांगा अजूनच जवळ दिसू लागल्या. मधूनच काही बर्फाच्छादित शिखरे दिसत होती.
रेशन पास संपत असतानाच पुन्हा एका बाजूला रेशन लेकने (Reschen Lake) लक्ष वेधून घेतले.
आल्प्सच्या कुशीत असलेला हा एक मानवनिर्मित तलाव आहे. साधारण ६.६ स्क्वेअर किलोमीटर असे क्षेत्रफळ असलेला हा लेक मुख्यत्वे इटली मध्ये आहे पण ऑस्ट्रीया आणि स्वित्झर्लंड यांच्या सीमारेशांशी देखील जोडला गेला आहे. नजर पार्किंग शोधू लागली आणि दिसल्याक्षणी गाडी थांबवण्यात आली.
इटालियन लेक्स बद्दल बरेच ऐकले आहे. कोमो लेक आणि मॅगीओरे लेक हे अनेक दिवसांपासून यादीत आहेत. निदान हा एक दिसला आणि थोडे समाधान मिळाले. शिवाय इथले लेक एवढे प्रसिद्ध का याची एक झलक दिसली. गर्दी अजिबातच नव्हती त्यामुळे निवांत फोटो काढता आले.
घड्याळाचे काटे सरकत होतेच. त्यामुळे निघण्याशिवाय इलाज नव्हता. या तीन देशांच्या सीमेजवळ असलेल्या काही छोट्या खेड्यांमधून, चिंचोळ्या गल्ल्यांमधून रस्ता जात होता. भिन्न संस्कृतींचे मिश्रण असल्याने घरांच्या पद्धती थोड्या बदलत होत्या.
आता मात्र कधी एकदा हॉटेल ला पोहोचतो असे झाले होते. अर्ध्या तासात पोहोचू असे जीपीएस म्हणत होते. आणि पुढचा घाट सुरु झाला. उम्ब्रेल पास. वरवर चढू लागलो. खिडकीतून शक्य तेवढे वर पाहिले तर फक्त एकच घर दिसत होतं. बाकी कुठलीच वस्ती नव्हती. बहुधा तेच आपले हॉटेल असा अंदाज होताच आणि तो खरा ठरला. पण ते दिसायला एवढंसं अंतर या अशा रस्त्यांवरून कितीतरी वेळखाऊ होतं.
हॉटेल म्हणजे तसे घरगुती स्वरुपाचेच होते.पण अगदी कलात्मकतेने सजवलेले.
सामान टाकलं. भूकही लागली होती आणि ८ नंतर किचन बंद होईल असे हॉटेल मालकिणीने सांगितले होते. त्यामुळे जेवायला गेलो. ऑक्टोबरची सुरुवात होत असल्याने लाल भोपळा सगळीकडे दिसू लागला होता. भोपळ्याचे गरमागरम सूप आणि हा एक चीजचा पदार्थ असे मागवले. याचे नाव विसरले पण खास आजीची खासियत म्हणून दिले होते. इथून पुढे जे चीज सुरु झाले ते शेवटपर्यंत. स्विस मध्ये आहोत याची वेळोवेळी जाणीव होत होती आणि सोबतच वाढणाऱ्या क्यालरीजची. ;)
पोटोबा शांत झाले आणि दिवसभराच्या प्रवासाने निद्रादेवीच्या अधीन झालो. दुसऱ्या दिवशी उठून पुढे जायचे होते, स्टेलव्हिओ पास आणि निसर्गाच्या साथीने विल्डर्सविलला…
क्रमशः
प्रतिक्रिया
10 Oct 2014 - 1:22 am | मुक्त विहारि
क्रमशः वाचून दिल खूष....
आता लेख वाचतो.....
10 Oct 2014 - 10:28 am | सस्नेह
असेच म्हणते
10 Oct 2014 - 5:24 pm | प्यारे१
असं लाईन कसं काय तोडताय म्हणतो मी?
या तिकडं खाली या! ;)
10 Oct 2014 - 1:27 am | पहाटवारा
सुरेख्ख्ख फोटो !
मस्त वॄत्तांत .. पुभाप्र.
-पहाटवारा
10 Oct 2014 - 1:32 am | प्यारे१
जळ जळ जळालो प्रत्येक फोटो बघून.... जायलाच हवं अशी ठिकाणं.
अफाट निसर्ग सौंदर्य.
खल्लास्स्स्स!
मानवनिर्मित कलाकृतींना (इमारती, बागा, बगीचे, गाड्या काहीही) जपणं खरंच युरोपियनांकडून शिकावं.
तुमची सहल छानच सुरु आहे.
10 Oct 2014 - 5:04 pm | वेल्लाभट
हे बाकी एक नंबर म्हणालात. निसर्गनिर्मित कलाकृतींचही तेच आहे मी म्हणतो. हो की नाही ! स्विसचंच उदाहरण पुरेसं आहे.
10 Oct 2014 - 1:40 am | श्रीरंग_जोशी
काय ते फोटोज काय ती निसर्गरम्य ठिकाणं. अन त्यांच्या जोडीला मानवनिर्मित स्थापत्य-सौंदर्य.
छायाचित्रणातली अन या लेखनामागची सौंदर्यदृष्टी खूप भावली.
10 Oct 2014 - 6:39 am | जुइ
10 Oct 2014 - 7:34 am | अजया
सुंदर ठिकाणांना सुंदर फोटोंनी अगदी न्याय दिलाय.रोड ट्रिपची मजा अशा अनवट ठिकाणांच्या दर्शनाचा अचानक होणारा लाभ घेण्यात असते खरं! पुभाप्र.
10 Oct 2014 - 9:02 am | यसवायजी
सुपर्ब. वाचतोय. जळजळ होतेय. पण तरी पुढचा भाग लवकर टाक.
10 Oct 2014 - 9:05 am | मदनबाण
वाह... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India, Japan to sign advance-pricing agreement to untie tax hassles
10 Oct 2014 - 9:32 am | स्पा
साला काय ते फोटो, काय तो निसर्ग , जळफळाट झालाय नुसता..
लवकर येऊदे पुढचा भाग
10 Oct 2014 - 9:37 am | काउबॉय
और आने दो.
10 Oct 2014 - 9:57 am | सुहास झेले
सुपर्ब.. मज्जा आली वृत्तांत वाचून. फोटो तर सुरेखच :)
10 Oct 2014 - 10:21 am | सविता००१
फोटो तर कहर आहेत मधुरा.
तुझं लिखाण तर नेहमीच सुरेख असतं.
पुभाप्र. :)
10 Oct 2014 - 10:27 am | विलासराव
फोटो, लेखन दोन्ही भावले.
10 Oct 2014 - 11:50 am | साती
फोटो आणि वर्णन दोन्ही खूप आवडले.
स्वित्झर्लंड तर पहायचेच आहे आयुष्यात एकदा.
10 Oct 2014 - 12:48 pm | इशा१२३
मस्त वर्णन.फोटो तर अप्रतिम आहेत.राजवाडा आणि बागेचा परिसर सुंदरच.
10 Oct 2014 - 12:57 pm | इरसाल
अमॉर आजे गोणेशॉ !
10 Oct 2014 - 2:43 pm | मधुरा देशपांडे
म्हंजे काय हो इरसाल भाउ?
10 Oct 2014 - 5:15 pm | इरसाल
आज माझा गणेशा झालेला आहे.
मिपावर, गणेशा होणे याचा अर्थ कोणतेही फोटो अजिबात न दिसणे. ;)
10 Oct 2014 - 5:28 pm | मधुरा देशपांडे
मिपावरचा गणेशा होणे चा अर्थ माहित आहे हो. ;) अंदाज होताच माझाही तो. पण नक्की कळेना. म्हणुन विचारले. :)
पण बाकी सगळ्यांना दिसताहेत फोटु. इथे दिसताहेत का बघा.
10 Oct 2014 - 2:46 pm | चौकटराजा
चित्रलेखनम मधुरम वर्णनम मधुरम
राजगृहं अंतरगृहं च अतीवं मधुरं !
10 Oct 2014 - 3:41 pm | कपिलमुनी
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत !
10 Oct 2014 - 4:46 pm | पैसा
सुरेख लिहिलंय आणि फोटो मस्तच! आपल्याकडे एकही असे ठिकाण आठवत नाही की जिथे गर्दी आणि कलकलाट नसतो.
कलात्मक वस्तू वगैरे छान वाटतात पण हस्तिदंताच्या वस्तू बघताना यासाठी किती हत्ती बळी गेले असतील हा त्रासदायक विचार मनात येतोच.
10 Oct 2014 - 11:17 pm | विलासराव
सुरेख लिहिलंय आणि फोटो मस्तच! आपल्याकडे एकही असे ठिकाण आठवत नाही की जिथे गर्दी आणि कलकलाट नसतो
विपश्यनेला जा मग.
11 Oct 2014 - 11:04 am | एस
फारच वेदनादायक आहे ते. असो.
मधुराताई, लेखमाला मस्त होणार यात शंकाच नाही. आधी माझाही गणेशा झाला होता, पण आता फोटो दिसताहेत. पुभाप्र.
10 Oct 2014 - 5:01 pm | वेल्लाभट
भग एक भाग दोन क्रमशः.... वाव!
स्वित्झर्लंड याची देही याची डोळा बघितलेला असल्याने तुमच्या प्रवासाबद्दल वाचायची फार उत्सुकता आहे. म्हणजे; माझं काही बघायचं राहिलं असल्यास पुन्हा त्या कमाल प्रदेशी जायला हवं; नाही का :) या वेळेस मात्र नक्की कार हायर करणार. पहिल्या वेळी उगाच कचरलो.
असो. तुम्ही मस्त लिहीत आहात... पुढचे भाग येउद्यात. फोटोही सुरेख!
10 Oct 2014 - 5:33 pm | रेवती
सुरेख आलेत फोटू. वर्णनही छानच!
10 Oct 2014 - 5:53 pm | मितान
वा मधुरा ! लेखन आणि फोटो दोन्ही उत्तम !!!!
अगदी चवीचवीनं वाचण्यासाठी आहेत हे लेख ! :)
11 Oct 2014 - 3:19 am | आनन्दिता
+१ अगदी अगदी!
10 Oct 2014 - 6:12 pm | अत्रुप्त आत्मा
पहिलं तळं आणि राजवाडा अफाट अवडले. बाकि माहितीपण मस्त.
10 Oct 2014 - 6:54 pm | केदार-मिसळपाव
मस्त लिहित आहात.
10 Oct 2014 - 7:09 pm | कुसुमावती
मस्त लेख.
पुभाप्र.
10 Oct 2014 - 9:30 pm | मधुरा देशपांडे
सर्व प्रतिसादकांचे मनापासुन आभार. :)
@पैसाताई, हस्तिदंताच्या बाबतीत तु म्हणतेस तो मुद्दाही आहे खरा. :(
11 Oct 2014 - 7:01 am | कौशी
प्रवासवर्णन मस्त लिहिलेस. वाचत आहे.
11 Oct 2014 - 2:01 pm | दिपक.कुवेत
सहिच्च आहेत. वर्णनहि साजेसं. लवकर पुढिल भाग टाक.
30 Apr 2015 - 2:15 pm | गणेशा
प्रत्येक फोटो तर सुंदर आहेच आहे.. परंतु प्रत्येक ओळ न ओळ वाचनीय आहे.. आपण स्वताच तेथे फिरतो आहोत असे वाटत होते, इतके समरस होउन जाते आहे मन ...
रिप्लाय शेवटी देणार होतो .. पण मनापासुन येतेह रिप्लाय द्यावा वाटला
अवांतर : उद्यापासुन सुट्टी आहे, परंतु तुमच्या या धाग्यांमुळे काम मात्र आज संपणार नाही असे वाटत आहे... त्यामुळे लेट काम झाल्यास तुमची ट्रीप जबाबदार