जर्मनीत आल्यापासून जवळपास सगळे मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि अजून कुणी ओळखीचे यांच्याकडून एक ठरलेला प्रश्न असायचा, "स्वित्झर्लंडला जाउन आलात का?" "नाही गेलो अजून" असे म्हटल्यावर पुढचा प्रश्न, "का नाही गेलात अजून" किंवा "कधी जाणार मग" किंवा "किती वेळ लागतो तुमच्या इथून" इत्यादी इत्यादी. "झुरीच ट्रेनने तीन साडेतीन तास, सगळं तसं पाच सहा तासांच्या आत" हे उत्तर ऐकल्यावर तर समोरच्याचे हावभाव जणू काही आम्ही 'स्विसला गेलो नाही म्हणजे घोर पाप केले' असे असायचे. मग इकडे जा, तिकडे जा असे कधी प्रेमळ सल्ले तर कधी खवचट उपदेश मिळायचे आणि आम्ही माना डोलवायचो. स्वित्झर्लंड सुंदर आहे यात वाद नाहीच. जायचे नव्हते असेही नाही. पण इथे राहतोय म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' च्या रेल्वे स्टेशन ला भेट दिलीच पाहिजे असेही नाही ना? शिवाय इतरही अनेक कारणं होती की ज्यामुळे आम्ही हे सो कॉल्ड घोर पाप करत होतो. दोन वर्षात जी जी भटकंती झाली. त्या प्रत्येक वेळी एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे युरोपातली काही प्रसिद्ध पण अतिरंजित ठिकाणं ही अगदीच आवडली नाहीत, तर याउलट बऱ्याच अनभिज्ञ जागा ज्या तेवढ्या प्रसिद्ध नाहीत, त्या मात्र केवळ आवडल्याच असे नाही, तर परत जायला हवे अशा यादीत आल्या. इतर वेळी जसे सहज शनिवार-रविवारी किंवा चार दिवस सुट्टी आहे म्हणून फिरायला जायचो त्यापेक्षा जास्त दिवसांची ही सहल करावी असे डोक्यात होते. म्हणजे या सहलीला योग्य नियोजन हवे. शिवाय तिथली सार्वजनिक वाहतूक अगदी उत्तम असली तरीही गाडीने गेलो तर अजून मनाप्रमाणे भटकता येईल म्हणून पहिले काही दिवस त्यात गेले. त्यात मग ऐन गर्दीत तर अजिबात जायचे नाही, कारण नुसता चिवचिवाट असतो, त्यातही चीनी-जपानी वगैरे वगैरे तर इतके, की आपण कुठे आहोत असा प्रश्न पडावा. (हे लोक आणि यांच्या अदा हा एका वेगळ्या लेखाचा विषय होईल) शिवाय हवामान योग्य पाहिजे. ऐन थंडीत नको कारण आल्प्स मधीलच एक हिवाळी सहल आधीच झाली होती. सुट्टी पण मिळायला हवी. एक ना अनेक. एका सहलीसाठी कित्ती कित्ती त्या अटी असे वाटत असेल तर थांबा. अजून संपल्या नाहीत. स्विस म्हणजे अजून एक अति महत्वाचा मुद्दा, महागाई. स्वित्झर्लंडचे चलन आहे स्विस फ्रँक (CHF). त्याचे पुन्हा इतके युरो वगैरे हा हिशोब अशक्य, करायचाच नाही. पण पूर्वीच्या एका छोट्याशा सहलीत नुसती सीमा पार केली तर लागली दुपटीने किमती बदललेल्या पाहिल्या होत्या. आम्ही स्विसला जायचा विचार करत आहोत असे सांगितले की ऑफिस मधल्या प्रत्येकाची पहिली प्रतिक्रिया यायची, खूप महाग आहे. दुसरं कुणी काही बोलायचेच नाही. आणि हा एक मुद्दा बाकीच्या सगळ्या मुद्द्यांशी निगडीत. जेव्हा जास्त पर्यटक तेव्हा महागाई अजूनच वाढणार. आणि या सगळ्या अटींच्या वरताण अशी नियोजन करणारी दोन डोकी, जी कधी युती करतील आणि कधी विरोधी पक्षात जातील हे राजकीय घडामोडींप्रमाणेच अनिश्चित. :D सहलीला जायचे या मुख्य मुद्द्यावर अर्थात एकमत होते. तिथून पुढे मग उर्वरित घडामोडी सुरु झाल्या.
मग वरच्या काही अटी बघता सप्टेंबर चा शेवट ही वेळ नक्की झाली. ३ ऑक्टोबरला पूर्व पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरणाची सुट्टी आणि त्याआधीच्या जोडून इतर सुट्ट्या निश्चित झाल्या आणि कामं सुरु झाली. आता नवऱ्याच्या डोक्यात याच सहलीसाठी अजून काही गोष्टी बसल्या होत्या. इटली मधील प्रसिद्ध असा स्टेलव्हिओ पास (Stelvio Pass) जिथे त्याला जायचेच होते. आणि असेच काही इतर स्विस-इटालियन आल्प्स मधील घाट. स्विसमध्येच बघण्यासारखे इतके काही आहे की आठ दिवस पुरेनात आणि तरीही स्टेलव्हिओ मार्गे जायचे यावर तो ठाम होता. मग याची जरा अजून माहिती काढली आणि "तू नीट गाडी चालवशील ना या अशा भयानक घाटातून" हे अनेकदा वदवून घेतले आणि होकार दिला. हुश्श. आता पुढे कुठे आणि काय काय बघायचे यासाठी आंतरजालावर शोध सुरु झाला. स्विस टुरिझमची अनेक संस्थळे, अनेक ब्लॉग्स वाचून काढले. काही पुस्तके वाचून झाली. आणि गोंधळ अजूनच वाढत गेला. कारण आठ ते नऊ दिवस हातात होते आणि सगळ्याच ठिकाणी जावेसे वाटत होते. चर्चा, वाद विवाद करत करत हेही हवे आणि तेही हवे असे सगळेच कसे होईल हे कळून चुकले. मग शेवटी एक आठवडा एकाच कुठल्यातरी मध्यवर्ती ठिकाणी राहून (डोंबोली नाही इथे :P ) त्या भागात फिरायचे असे ठरले. इंटरलाकेनला तूर्तास मध्यवर्ती धरून तिथल्या हॉटेल्सची शोधमोहीम सुरु झाली. शाकाहारींसाठी खाण्याचे पर्याय बघता आणि बाहेर सततच्या खाण्याचा खर्च बघता छोटे स्वयंपाकघर असेल अशी अपार्ट्मेंट बघायचे ठरले, इतर ब्लॉग्सवरील माहितीनुसार देखील हाच पर्याय सोयीस्कर वाटला. या भागातल्या अनेक गावात गाडी नेता येत नाही, पर्यावरणासाठी हानिकारक म्हणून. त्यामुळे ती गावं बाद झाली. शोधाशोधीत एक मनाजोगते ठिकाण सापडले, विल्डर्सविल (Wilderswil) या टुमदार खेड्यात. मेल लिहून विचारपूस केली आणि दुसऱ्याच दिवशी उत्तर मिळाले की या कालावधीत रुम उपलब्ध आहे. झाले एकदाचे एक महत्वाचे काम. आता अजून या स्टेलव्हिओ पाससाठी दोन रात्रीची हॉटेल्स बुक झाली आणि पुढची तयारी सुरु झाली.
स्वित्झर्लंड म्हणजे अत्यंत स्वच्छ, शिस्तप्रिय लोकांचा देश. जगप्रसिद्ध स्विस घड्याळे आणि त्या घड्याळांच्या अचूकतेप्रमाणेच चालणारे लोक. जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रीया आणि इटली हे शेजारी देश. सगळ्यांचीच काही सांस्कृतिक साधर्म्य तर काही भिन्नता. अधिक पुढच्या लेखांमध्ये येईलच. सगळ्यात महत्वाचे म्हणजे उत्तम पर्यटन विकास. प्रत्येक स्थळाची योग्य माहिती इंग्रजीतून देखील उपलब्ध आहे. त्या ठिकाणाहून जवळ काय बघता येईल, कसे जाता येईल, गाडी नेता येते की नाही इ. त्यामुळे या सात दिवसात कुठे जायचे अशा ठिकाणांची यादी तयार झाली, सगळी माहिती एकत्रित केली आणि म्हणता म्हणता एक आठवडा उरला. सप्टेंबर तसा उन्हाळ्याचा शेवट आणि शरद ऋतूची, पर्यायाने हिवाळ्याची सुरुवात. पण जर्मनीत आधीच थंडीने रंग दाखवायला सुरुवात केली आणि हवामान नेहमीप्रमाणे दगा देणार की काय ही शंका आली. या गोष्टीवर आपला इलाज नाही, हवामान भगवान भरोसे म्हणून तो विचार सोडून दिला. गाडीला हिवाळी टायर्स लावणे अत्यावश्यक होते. ते झाले. स्विस मध्ये जर्मनीतील गाड्यांना वेगळा कर भरावा लागतो. त्यासाठी लागणाऱ्या vignette ची खरेदी अनायासे पूर्वीच झाली होती. तिथे जाऊन निदान रात्रीचे खायला करता यावे म्हणून रेडी टू इट, मॅगी आणि इतर सामानाची खरेदी झाली. सामान भरताना वाटले की आपण खायला जातो आहोत की फिरायला. पण पोटोबाची सोय महत्वाची. :) थंडीचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे हेही बूट, तेही बूट, हे जॅकेट, ते स्वेटर असे एकेक सामान वाढत गेले. दोन लोक आणि बॅगा किती. गाडीत सगळे भरले गेले आम्हीच थक्क झालो. मुख्य ठिकाणचे अंतर बरेच लांबचे असल्याने केवळ काही पल्ला पार करण्यासाठी एक दिवस आधी निघायचे ठरले होते. संध्याकाळ झाली होतीच. गणपती बाप्पा मोरया अशी आरोळी ठोकली, जीपीएसला पत्ता दिला आणि प्रवास सुरु झाला.
पण सगळं सुरळीत झालं तर कसं होईल. निघण्यापूर्वी हवा तपासायला गेलो आणि पहिला धक्का बसला. एका चाकातून किंचित हवा लीक होतेय असे लक्षात आले. आता जर पंक्चर असेल तर काय. नुकतेच हिवाळी टायर्स लावले होते त्यामुळे तेव्हाचा कदाचित काहीतरी प्रॉब्लेम असावा असे वाटले. दुकान बंद व्हायला अजून केवळ २० मिनिटे होती. पटापट गाडी वळवून परत गॅरे़ज मध्ये नेली. एक व्हॉल्व्ह खराब झाला होता तो त्याने लागली बदलून दिला आणि शेवटी एकदाचे निघालो. नशीब पंक्चर नव्हते. ठरलेल्या हॉटेलला पोहोचलो. सुरुवात थोडीशी चिंताजनक झाली तरी उर्वरीत सहल सगळे पूर्वनियोजन सार्थकी लावणारी झाली. प्रत्येक दिवस आणि अनुभव वेगळा ठरला. हवामानाने साथ दिली. नुकताच शरद ऋतू सुरु झाल्याने झाडांचे रंग बदलत होते. स्थापत्य कौशल्याचे काही खास नमुने म्हणून ओळखले जाणारे आल्प्स मधील घाट, लांबच लांब बोगदे, हिमनग, उंचचउंच पर्वतरांगा, बाजूने जाणारी रेल्वे, कधी शेती, त्यात चरणाऱ्या गायी, सतत सोबतीला असणाऱ्या नद्या, तलाव, धबधबे आणि झरे, स्विस-इटालियन खेडी, फुलांनी लगडलेल्या घरांच्या खिडक्या आणि अजून बरेच काही. फोटोतून किंवा शब्दात वर्णन न करता येण्यासारखे काही, तरीही जसे जमेल तसे म्हणून हा प्रयत्न…निघुयात आल्प्सच्या वळणांवर…
क्रमशः
प्रतिक्रिया
8 Oct 2014 - 1:34 am | आनन्दिता
मी पयली!...
लवकर टाक पुढचे भाग!!
8 Oct 2014 - 1:48 am | बहुगुणी
पुढील वर्णनाविषयी उत्कंठा आहे. फोटो भरपूर असतीलच. (जियो मिपावर झेंडे लावलेयत, या भ्रमंतीचा आणि तुमचा असे दोन्ही :-) )
8 Oct 2014 - 2:03 am | श्रीरंग_जोशी
उत्तम सुरुवात झालेली आहे. लेखनशैली छानच.
पण एकही फटु नसल्याने जरा हिरमोड झाला. किमान नकाशाचा तरी हवा होता.
9 Oct 2014 - 10:14 am | सुहास झेले
यप्प...फोटो हवे होते किमान एकदोन तरी... असो एक मस्त लेखमाला सुरु झाल्याचा आनंद वाटतोय :)
8 Oct 2014 - 2:58 am | प्यारे१
+१
लेखन शैली छान. फोटोंच्या अपेक्षेत आहोत.
बाकी तुमच्यासोबत नको, थोडं अंतर ठेवून प्रवासाची मजा घेतो.
( नवनिर्वाचित संपादक इस्पिकच्या एक्क्याशेजारी बसून कुर्सी की पेटी बांधायची सवय लागलीये म्हणून हो. :) )
8 Oct 2014 - 3:51 am | निनाद मुक्काम प...
वाचतोय
8 Oct 2014 - 8:02 am | ज्ञानव
त्या प्रत्येक वेळी एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे युरोपातली काही प्रसिद्ध पण अतिरंजित ठिकाणं ही अगदीच आवडली नाहीत, तर याउलट बऱ्याच अनभिज्ञ जागा ज्या तेवढ्या प्रसिद्ध नाहीत, त्या मात्र केवळ आवडल्याच असे नाही, तर परत जायला हवे अशा यादीत आल्या.
आधी ह्याबद्दल लिहा हि (अधीर) विनंती.
8 Oct 2014 - 8:13 am | अजया
पुभाप्र.
8 Oct 2014 - 8:46 am | यशोधरा
वाचते आहे.. :)
8 Oct 2014 - 9:01 am | प्रचेतस
मस्त.
पुभाप्र.
8 Oct 2014 - 11:19 am | रायनची आई
मस्त सहल घड्णार अस दिसतय :-)
8 Oct 2014 - 11:24 am | एस
पुभाप्र...
8 Oct 2014 - 12:27 pm | पिलीयन रायडर
मस्त सुरवात... पुभाप्र...!!
8 Oct 2014 - 1:38 pm | दिपक.कुवेत
खुप उत्सुकता लागुन राहिली आहे. पटापट पुढिल भाग टाक नेत्रसुखद फोटोंसहित.
8 Oct 2014 - 2:56 pm | काउबॉय
really kewl.
8 Oct 2014 - 3:26 pm | रेवती
तयारी व सुरुवात आवडली.
8 Oct 2014 - 7:18 pm | Mrunalini
वा. सुरवात तर अगदी छान झालीये. पुभाप्र. :)
8 Oct 2014 - 8:02 pm | यसवायजी
वाचतोय.. पुभाप्र.
8 Oct 2014 - 8:11 pm | मधुरा देशपांडे
आनन्दिता, बहुगुणी, श्रीरंग जोशी, प्यारे१, निनाद, ज्ञानव, अजया, यशो, वल्ली, रायनची आई, स्वॅप्स, पिरा, दिपक, काउबॉय, रेवाक्का, मृणालिनी अनेक धन्यवाद. पुढचा भाग टाकते आज किंवा उद्यात.
@बहुगुणी - विशेष आभार. जसजसे लेख येतील, तसे इतर ठिकाणांचे झेंडे लावीन.
@श्रीरंग जोशी आणि प्यारे१ - नकाशाचा फोटो द्यायचा विचार होता ज्याला माझा आळस नडला. :( पुढच्या भागापासुन मात्र भरपुर फोटो असणार आहेत.
@ज्ञानव - ड्रेस्डेन - प्राग बद्दल इथे लिहिले होते. त्यावेळचा अनुभव असा होता की प्राग म्हणजे अतिशय सुंदर असे ऐकुन होतो पण आम्हाला तेवढे आवडले नाही. याउलट ड्रेस्डेन तेवढे प्रसिद्ध नसुनही खूप आवडले. असेच काहीसे व्हेनिस बाबत झाले. व्हेनिस आवडले पण जवळपास असणारी काही ठिकाणे जसे की व्हेरोना किंवा लेक गर्दा हे केवळ पर्यटकांमध्ये प्रसिद्धी न मिळाल्याने मागे राहिले असे वाटले. मागे एकदा जर्मनीतील सगळ्यात उंच धबधबा म्हणुन गेलो होतो आणि तिथे जाऊन हसावे की रडावे कळेना. शिवाय यात प्रत्येकाच्या आवडी निवडीचा पण प्रश्न आहे. इतिहास किंवा संग्रहालय असे काही असले की काहींना नाही आवडत. काहींना केवळ फोटोग्राफीसाठी जायचे असते. प्रत्येकाचा प्राधान्यक्रम वेगळा असु शकतो, वेळेचे, पैशांचे गणित पण वेगळे. ही लेखमाला पुर्ण झाली की जमल्यास अगदी थोडक्यात काही ठिकाणांची माहिती आणि माझा अनुभव एका वेगळ्या लेखात देण्याचा प्रयत्न करेन.
9 Oct 2014 - 8:45 am | ज्ञानव
मधुराजी. प्रवासात नेहमीच्या प्रसिद्ध जागांविषयी माझा हि अनुभव आपल्यासारखाच आहे सिक्कीमला गेलो असताना नथुला पास बंद होता आणि तिथल्याच स्थानिक माणसाने गुरुडोंग मार्गला जा सुचवले १८२०० फुट उंचीवर ओक्सिजन अभावी जो अनुभव आलाय त्यातच पैसे वसूल झाले माझे.
8 Oct 2014 - 8:35 pm | कंजूस
तयारी वाचूनच कळतंय पुढच्या सहलीबद्दल.सावकाश लिहा काही घाई नाही.
8 Oct 2014 - 8:37 pm | चौकटराजा
अत्यंत भन्नाट शैलीत सुरवात झालीय ! व्हेनिस च्या तुलनेत व्हेरोनाचा उल्लेखावरून एक असे दिसते की काही ठिकाणांची उगीचच ( अर्थात व्हेनिसची केस अशी नाही ! ) पबलिकशिटी टूर ऑपरेटर्स करीत असतात. अशा जागाना टूरिस्ट ट्रॅपस म्हणतात. .कित्येक पर्यटकांचे म्हणणे असे आहे की पॅरिस मधील अत्यंत सामान्य वास्तू कोणती असेल तर आयफेल टावर पण त्यानेच तर पॅरिस ओळखले जाते. टूरिस्ट ऑपरेटरना भरमसाट प्रवेश फी परवडत नाहीत. सबब सुंदर पण बाजूला असलेली फोन्टेनब्लो, व्हर्साय सारखी स्थळे दाखविली जात नाहीत. अशा स्थळांचा मागोवा काढत जायची आपली कल्पना एकदम आवडली.
8 Oct 2014 - 9:18 pm | मधुरा देशपांडे
अगदी हेच होतं. टूर ऑपरेटर्सना त्यांचे बजेट सांभाळायचे असते. शिवाय या अशा ठिकाणी बरेचदा भाषेची, खाण्यापिण्याची अडचण येते जी बाकी ठिकाणी तेवढी येत नाही. व्हर्साय आणि व्हेरोना ही दोन्ही ठिकाणे आवडली पण माहिती नसल्याने तेवढा वेळ ठेवला नव्हता. अगदीच घाईत पाहिली. त्यानंतर शहाणपण आलं.
8 Oct 2014 - 9:21 pm | खेडूत
पुभाप्र !
एंजलबर्ग पण केवळ अप्रतिम आहे !
8 Oct 2014 - 10:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
वा वा ! स्विट्झरलंड म्हटलं की जरासं भरतंच येतं... येऊंद्या भरपूर फोटोंसह !
9 Oct 2014 - 2:39 am | जुइ
9 Oct 2014 - 3:30 pm | कुसुमावती
पुभाप्र.
9 Oct 2014 - 4:30 pm | सविता००१
पुभाप्र
9 Oct 2014 - 5:14 pm | सस्नेह
तब्बेतीत सुरू झालीय सहल !
सुरेख वर्णन
9 Oct 2014 - 6:57 pm | सखी
छानच सुरवात मधुरा, पुभाप्र आणि फोटुच्याही :)
10 Oct 2014 - 1:28 am | मधुरा देशपांडे
सुहास झेले, कंजूसकाका, चौराकाका, स्नेहाताई, कुसुमावती, जुई, एक्का काका, सखी, खेडूत, सविता, यसवायजी अनेक आभार.
पुढचा भाग टाकला आहे. :)
10 Oct 2014 - 1:36 am | मुक्त विहारि
आता पुढचा भाग वाचायला घेतो.....
10 Oct 2014 - 8:49 am | मदनबाण
पुढच्या भागाची वाट पाहतो... आणि फोटोंची सुद्धा. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India, Japan to sign advance-pricing agreement to untie tax hassles
10 Oct 2014 - 4:36 pm | पैसा
आता पुढचा भाग वाचते!
10 Oct 2014 - 9:28 pm | मधुरा देशपांडे
मुविकाका, मदनबाण, पैसाताई धन्यवाद.
13 Oct 2014 - 11:37 pm | Maharani
मस्त सुरवात.आता पुढचे भाग वाचते..
30 Apr 2015 - 1:59 pm | गणेशा
मागे जॉर्डनची भटकंती... काल पेरु चा एकल प्रवास वाचनात आले, असेच शोधले असता , ही राहुन गेलेली छानशी भटकंती पुन्हा वाचणास घेतली.. सुरुवात खुपच सुंडर आहे. सर्व भाग वाचुन रिप्लाय देतो ..
पण हा पॅरा खुप जबरदस्त आहे, चित्र नसताना सर्व स्पष्ट समोर दिसले असे लिहिले आहे