आमचा मित्र श्री.गिरीश वडनेरकर १९९६ पासुन दरवर्षी अमरनाथ यात्रेला जातो बरोबर काही लोकानाही नेतो{ना नफा ना तोटा या तत्वावर} हे माहित होते,गेल्यावर्षी शेजारचे रावेरकर जाऊन आल्यावर त्यानी केलेले सुंदर काश्मीरचे वर्णन ऐकून आम्हाला कधी आपणही जाऊ असे झाले होते आणि यावर्षी भोलेबाबानी आम्हाला बोलावले.
मंगळवार ३जुलै २००१ संध्याकाळी ७-१५च्या सेवाग्राम एक्सप्रेसने प्रस्थान ठेवले.मनमाडस्टेशनवर सर्वसहयात्रीशी ओळखदेख झाली.रात्री ११-३०च्या झेलमएक्सप्रेसने जम्मूसाठी प्रयाण केले. प्रवास साध्या स्लिपरक्लासने चालला होता.उन्हाळा प्रचंड, आम्हा नाशिककराना एवढ्या उन्हाळ्याची सवय नाही नुसते पाणी पाणी होत होते.बापरे!कधी प्रवास संपतो असे झाले होते.चार तारखेला रात्री दिल्ली आली आणि गेली. पाच तारखेला दुपारी बारा वाजता जम्मूला पोहोचलो.आमची ट्रीप अरेंज करुन देणारे नजीरभाई स्टेशनवर आम्हाला घेण्यसाठी आले होते.सगळीकडे मिलिट्रीचा कडक पहारा होता,सामान स्कॅन करुनच बाहेर नेतात. सामान घेऊन स्टेशन बाहेर टेम्पोस्टॅण्डवर येईपर्यंत चांगलीच दमछाक झाली.इकडे मॅटोडोरअसतात,आत गोलाकार बसण्यासाठी सीट आणि मध्ये मोकळी जागा असते,टपावर बॅगा ठेवून हाशहुश करत बसलो एकदाचे. गोलघुम्मट जवळ हॉटेल डायमंडमध्ये चेक इन केले.
दोन दिवसाच्या प्रवासात घामट झालो होतो आधी थंडगार पाण्याने स्नान करावे म्हटले पण नळाचे पाणी गरमच.केले तसेच स्नान दोनच मिनिटात पुन्हा घामानेचिंब.जवळच्या वैष्णोढाब्यावर भोजन करुन रघुनाथ मंदिर बघायला गेलो.कडक बंदोबस्त होता पेनसुद्धा नेण्याची परवानगी नव्हती.मंदिर सुंदर आहे तिथे खुप मोठी स्पटिकाची शिवपिंडी आहे.तिच्या मागे लावलेल्या समईचे प्रतिबिंब पिंडीत दिसते. आवारात खुप बकुळीचे व्रुक्ष आहेत.रघुनाथ जानकी लक्ष्मण यांच्या मुर्ति सुंदर आहेत.एका ठिकाणी कोटीलिंगे बनवलेली आहेत.काश्मीरच्या महाराजांचे फोटो आहेत.सध्याचे महाराज आहेत महाराजा कर्णसिंग.थोडा बाजार पाहिला आणि परत हॉटेलवर आलो. उद्या सकाळी सहा वाजता श्रीनगरला प्रयाण.
बरोबर सहा वाजता बसमध्ये बसलो,प्रत्येक नाक्यावर तपासणीला तोंड देत जम्मूतुन बाहेर पडायला दोन तास लागले.आणि मग डोळ्याना किती पाहू आणि कुठेकुठे पाहू असे होऊन गेले.सौंदर्याची नुसती उधळण आहे.डाळिंबांचे जंगल असु शकते हे प्रत्यक्ष पाहिल्यावरच समजले.एका ठिकाणी नास्त्यासाठी गाडी उभी राहिली.त्या हॉटेलच्या टेरेस वरुन खोलदरीत चिनाब नदी दिसत होती,पलिकडच्या डोंगरावर एक गाव दिसत होते एवढ्या उंचावर घरे पाहुन असे वाटले कसे येजा करत असतील?आधी लागले नंदिनी मंकी अभयारण्य.माकडे मुक्त संचार करत होती.एक बोगदा पार झाला आणि उजव्या हाताला वैष्णोदेवीला जाणारा फाटा आला,आम्ही परतीच्या प्रवासात वैष्णोदेवीचे दर्शन घेणारअआहोत.मग आले उधमपुर भारतीय सेनेचे महत्वपुर्ण ठिकाण.जागोजागी रणगाडे मांडलेले होते.सैनिकांचा जागता पहारा होता.उधमपुर मागे टाकुन पुढे आता घाट सुरु झाला.आमच्या बसचे ड्रायव्हर एक प्रचंड देहयष्टीचे सरदार होते;त्याना त्यांची सीट पुरत नव्हती.पण ड्रायव्हिंग सुपर.जुनी हिंदी,पंजाबी गाणी मस्त म्हणत होते.कुद हे गाव आल,इथे एक नैसर्गिक चष्मा म्हणजे झरा आहे,याचे पाणी औषध आहे,तिथे एक मंदिरही आहे इथे बालमिठाई मिळते.माव्याच्यापेढ्यावर साबुदाण्यासारखे साखरेचे दाणे तिच्यावर लावलेले असतात.कुद नंतर येते प्रसिद्ध पटणीटॉप.डोंगर उतारावर दाट भरगच्च देवदाराचे जंगल आहे.तीन दिवसापासुन उकाड्यात शिजुन निघत असलेल्या आम्हाला सुखद गारव्याने फार फार आनंद झाला.पण तो घाट उतरला आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या.पिढा येथे ढाब्यावर जेवणासाठी थांबलो इथली खासियत आहे राजमा-चावल,अनारदाण्याची चटणी.कांदा आणि चावलच्यावर मोठ्या डावाने सढळ हाताने वाढलेले असली घी.असली काश्मिरी बासमती तांदुळाचा मऊमोकळाभात,जंगली डाळिंबाच्या दाण्याची चविष्ट चटणी आणि साजुक तूप, अंतरात्मा सुखावला.रामबनला पोहोचलो.तिथे गाड्या आडवल्या.पुढे बनिहाल जवळ गोळीबार झाला होता.रस्त्यावर गस्त घालणार्या आपल्या जवानाना भारतीय मिलिट्रीयुनिफॉर्म मधील आतिरेक्यानी दरीत ट्रक पडला आहे असे सांगुन तो पहायला बोलावले,जवानाना ते आपलेच सहकारी आहेत असे वाटले आणि ते पुढे होताच अतिरेक्यानी त्यांच्यावर गोळ्याझाडल्या,आपल्या जवानानी मरता मरता त्या तिन्ही अतिरेक्याना कंठस्नान घातले.जय जवान!तीन तासानी गाड्या पुढे सोडल्या. प्रसंगाच्या ठिकाणी रक्ताचा सडा पाहुन जीव गलबलला.
बनिहाल नंतर आला जवाहर टनेल{बोगदा},त्यानंतर आला टायटॅनिक पॉइंट इथे एक व्ह्यू पॉइंट बनवलेला आहे बोटीच्या डेकच्या टोकाप्रमाणे रेलिंग बनवलेले आहे.इथुन काश्मीरव्हॅलीचे सुंदर दर्शन होते.रस्त्यावर दर दहा/पंधरा फुटावर सैनिक डोळ्यात तेल घालुन पहारा करत उभे होते.झाडीत लपुन त्यांचे काम चाललेले होते.गस्त घालणारी हत्यारानी लैस वाहने सारखी पेट्रोलिंग करत होती. तरिही अतिरेकी कारवाया चालुच होत्या.आम्ही हात हलवून सैनिकाना अभिवादन करत होतो,ते ही हात हलवून त्याचा स्वीकार करुन जणू म्हणत होते,बिंदधास्त यात्रा करा आम्ही आहोत.भुधर वकील म्हणाले भारतीयानो तुम्ही बिंधास्त रहा मजा करा,सैनिक मरताहेत तुमच्यासाठी.
काझीगुं,खन्नाबल,अवंतीपुरा गेले मग आले पाम्पोर केशराच्या मळ्यांचे गाव.८/३० वाजता श्रीनगर आले बदामीबाग येथे चेकिंग झाले आणि मग आलो दलगेटला,इथेचअआमच्या मुक्कामाच्या हाऊसबोटी होत्या.आम्हाला उशीर झाल्यान बशीरभाई चिंतेत होते.रिचर्ड,रॉयल,ब्लुसाइट ह्या तीन हाऊसबोटींमध्ये आमचा मुक्काम होता. सुंदर बोट आधी चहा आणि स्नाना नंतर काश्मिरी पुलाव.रस्त्यावर शुकशुकाट होता संध्याकाळ होताच व्यवहार बंदच होतात,दहशदवाद जोरावर होता.
उद्या अमरनाथ.क्रमशः
प्रतिक्रिया
19 Sep 2014 - 7:51 pm | कंजूस
छान आहे. पण कैलासच्या एक दोन फोटोच्या लिंक पाठवणार/देणार आहात ना?
20 Sep 2014 - 11:32 am | सस्नेह
अमरनाथचा वृत्तांत वाचण्यास उत्सुक आहे.
पुभाप्र.