खच्चून भरलेल्या लोकलमागे रिकाम्या लोकलची वाट न बघणार्या लोकांसाठी ही गोष्ट नाहीये.
बागेत जाउन उगाच तास दीडतास बसणं ज्यांना शि़क्षा वाटते त्या लोकांसाठीपण ही गोष्ट नाहीये.
तासन्तास चहाच्या कपाच्या कडेवर एकच माशी घोंघावताना बघण्याची कल्पनाच ज्यांना भयानक वाटते अशा लोकांसाठीसुद्धा ही गोष्ट नाहिये.
====
तर १९९० सालची गोष्ट. खरं तर असलं काही सांगायची गरज नाही, पण एक गोष्टीचा फील येतो.
तर डिसेंबर महिन्याची सकाळ होती. नाही, दुपार. बहुतेक ३ वाजले होते. म्हणजे संध्याकाळच म्हणा ना.
अस्सल चहाबाजांची ३रा चहा घ्यायची वेळ. दुकानावर गरदी नव्हती. सायकलचं पंक्चर काढून देणार्या दुकानात असून असून किती गरदी असणार, काय?
तेव्हा असाच निवांत वेळ चालला होता म्हणा ना. पक्षी येत जात होते, रेल्वे स्टेशनवरसुद्धा गरदी नव्हती. आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? पण असं होतं खरं. टीव्हीवर कसली तरी सिरियल लागली असेल, किंवा मग क्रिकेटचा सामना असेल.
भारतात काय, क्रिकेट म्हटलं, की लोक हातचंच काय कमरेचं सोडून पळतील. तो कोण तो तुमचा क्रिकेटर? नाही, कर ने नाव संपतं तो नाही, दुसरा थोडा बायकी दिसतो तो. बंगालचा होता -हा हा तोच तो. गांगुली. काय त्याची उभं राहायची पद्धत? बघवत नाही. त्यात पुन्हा नट्यांशी भानगडी. हे असलं तुमचं क्रिकेट.
तर काय सांगत होतो, दुपारची अशी वेळ. आणि अचानक मला आठवण झाली, की आज काही सिगरेट मिळणार नाही. "एक दमदार झुरका मारून तो पुढे बघू लागला" हे पुस्तकी वाक्य आठवून तर मला सिगरेटची कमी अजूनच जाणवली. दिवसाला एक तर लागतेच. कधी कधी २-३. ते तसं मूडवर आहे. कोणी पक्षी असला तर जरा जास्त होते. नाहीतर एकटा किती सिगरेटी फुंकणार आता ह्या वयात? नाही, आधीची गोष्ट वेगळी- तेव्हा एक क्याप्स्ट्न फुकून जाळायचं एका दिवसात.
आता नाही, दातांनापण कापरं भरतं.
तर कुठे होतो? हा, दुपारी असा दुकानावर निवांत बसलेला. हवा तशी नेहेमीचीच, पण आज पावसाची लक्षणं दिसत होती. ह्या भागात एक तर जेमतेम पाऊस, आणि पडतो तेव्हासुद्धा अगदी कुत्रं मुतल्यासारखा. पण पावसाचं सायकलीशी जवळचं नातं, हो. तेव्हा पाऊस आला की धंदा डबल. पाऊस म्हटला की खड्डे आले, रस्त्याची वाट, मग टायरी पंचर होणार आणि लोक इथे पोचणार. असं चक्र, त्यात फरक नाही. काय ते तुमचं गूगल का फूगल ते पण याला काईएक करू शकणार नाही.
तर काय सांगत होतो? दुपारी असा दुकानावर निवांत बसलेलो, आणि पाऊस यायला झालेला. समोरच्या दुकानात मला हालचाल दिसली. समोर आपल्या गण्याची टपरी. चहा आणि भजी स्पेशल, मग काय? नाय नाय, तो वेगळा. हा म्हणजे मंदिरामागच्या चाळीतला. त्याला काय बहीणभाऊ नायेत. गावी कोण म्हातारी असेल तेवढीच. पण चहा काय बनवतो! फस्स्क्लास एकदम. भजी तितकी बरी नाही आजकाल, पण चवीपुरती घ्याच. तिथलं टपरीवरचं सगळं दिसतं इथून थेट.
तर कुठे होतो? दुपारी असा निवांत पाऊस पडायची वेळ ....
प्रतिक्रिया
10 Jul 2014 - 2:31 am | खटपट्या
नमनाला घडाभर तेल !!!
क्रमश: पण नाही….
----------------------------------
आणि हो मी पयला
15 Jul 2014 - 10:00 am | संजय क्षीरसागर
दोन पावलं पुढे, की परत दोन पावलं मागे. अनिर्णायक अवस्थेला निवांतपणा म्हणायचं, कसं?
15 Jul 2014 - 8:11 am | Maharani
*unknw*
15 Jul 2014 - 9:45 am | आतिवास
अर्धा वाटला लेख. सुरुवात तर चांगली झाली .. पण मध्येच संपला!
16 Jul 2014 - 1:22 am | भृशुंडी
बरेचदा आपल्या आजूबाजूला अनेक लोक निवांत असतात (मुंबईच्या जीवघेण्या गरदीसाठी रिकामटेकडे)
तर अशाच एखाद्या रिकामटेकड्याने एखाद्या आळसावलेल्या दुपारी, कट्टासदृश सेटिंगमध्ये एखादी भलतीच कहाणी सांगायला सुरूवात केली तर (ऐकणार्याचं) काय होईल? बहुतेक सगळ्यांना असलं काही- बहुतांशी निरर्थक- ऐकलेलं विचित्रच वाटेल.
अस्लं काहीसं सांगायचं होतं, मुद्द्लात contentwise लेखात काहीच नाहीये.
16 Jul 2014 - 9:48 am | संजय क्षीरसागर
ते कळलंच होतं!
16 Jul 2014 - 10:30 pm | भृशुंडी
तुम्हीच खरे रसिक आहात!
16 Jul 2014 - 9:52 am | स्पा
आवडलं
16 Jul 2014 - 10:08 am | अत्रुप्त आत्मा
अस्स...........!!!!!!!!
16 Jul 2014 - 11:14 pm | कवितानागेश
आर्ट फिल्म! ;)
17 Jul 2014 - 7:26 pm | आदिजोशी
निवांतपणाचा फील छान पकडलाय. निवांत वेळ असाच जात असतो. लगे रहो :)