महायुध्दाला सुरवात होऊन सोळा दिवस उलटले होते.
" राजमाता, आपल्या दर्शनासाठी एक देवी आल्या आहेत. " दूताने वर्दी दिली.
" आता ? या वेळी ?" राजमातेने आश्चर्याने विचारलं. रात्रीच्या दुसरा प्रहर सुरू झाला होता.
" हो !"
" कोण आहे ?"
" नाव सांगितलं नाही राजमाता, परंतु आपल्याच दर्शनाची त्यांची आग्रही विनंती आहे !"
राजमातेने मानेनेच होकार दिला. राजमातेच्या शेजारीच बसलेली द्रौपदीही विचारात पडली होती.
काही क्षणांतच मुख आच्छादलेली एक स्त्री राजमातेसमोर आली. राजमातेसमोर येताच तिने त्रिवार वाकून राजमातेला वंदन केलं.
" आयुष्मान भव !" राजमातेने आशीर्वाद दिला, " अखंड..."
" थांबा राजमाता !" अचानक ती स्त्री उद्गारली, " मला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देऊ नका !"
राजमाता आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहीली. मुखावरचं आच्छादन तिने दूर सारलं होतं. आपण तिला पूर्वी कुठे पाहीलं आहे का हे राजमातेला स्मरत नव्हतं. द्रौपदीही थक्क होऊन तिच्याकडे पाहत होती.
" कोण आहात आपण ? आणि आशीर्वादास नकार का देत आहात ?" न राहवून द्रौपदीने विचारणा केली.
" याज्ञसेनी, राजमातेचा आशीर्वाद मला ईश्वराच्या प्रसादासमान आहे, परंतु या क्षणी मी तो स्वीकारु शकत नाही कारण...."
" कारण ?"
" या महासंग्रामात उद्या माझ्या पतीचीही आहुती पडणार आहे आणि ती देखील राजमातेच्या पुत्राच्या - तुझ्या पतीच्या हातून !"
" तुम्ही... "
" मी अंगराज कर्णपत्नी वृषाली !"
कर्ण ! राजमातेच्या चेह-यावर नकळतच एक वेदनेची लकेर उमटून गेली.
" तू कर्णाची पत्नी आहेस ?" राजमाता कुंतीने थरथरत्या आवाजात विचारलं.
" होय राजमाता ! कुमारी अवस्थेत देवाहुती मंत्राच्या प्रभावाने जन्माला आलेल्या सूर्यपुत्राचा त्यांच्या जन्मदात्या मातेने त्याग केला, ते अंगराज कर्ण माझे पती !"
कुंतीची नजर वृषालीच्या चेह-यावर खिळली होती. कर्णाच्या जन्माचं रहस्यं तिला कळलं होतं हे कुंतीच्या ध्यानात आलं.
" आज इथे येण्याचं प्रयोजन काय वृषाली ?" द्रौपदीने अचानकपणे एकेरीवर येत विचारलं, " राजमातेकडून अंगराजांसाठी अभयदान मागण्यासाठी ?"
वृषालीच्या चेह-यावर हसू उमटलं.
" याज्ञसेनी, आपल्या पुत्रांसाठी अभयदान मागण्यासाठी अंगराजांकडे आलेल्या राजमातेकडून मी त्यांच्यासाठी अभयदान कशासाठी मागू ?"
" राजमातेने कर्णाकडे अभयदान मागीतलं ?" द्रौपदीने आश्चर्याने राजमातेकडे पाहीलं, " पांडवांसाठी अभयदान ? एका सूतपुत्राकडे ?"
" सूतपुत्र !" वृषाली विषादाने उद्गारली, " याज्ञसेनी, जन्मभर माझ्या पतीची सूतपुत्र म्हणून जगाने हेटाळणी केली, स्वयंवराच्या वेळी तू देखील त्यांना सूतपुत्र म्हणून नाकारलंस, ते सूतपुत्र नसून क्षत्रीय आहेत. चांद्रवंशातील एका थोर कुळात त्यांचा जन्म झाला आहे हे तुला ज्ञात आहे ?"
" अंगराज कर्ण ? क्षत्रियं ? कसं शक्य आहे ?"
" राजमाता, अंगराज कोण आहेत हे आपल्याइतकं कोणीच जाणत नाही ! आपणच याचं उत्तर द्यावं !" वृषाली कमालीच्या शांत सुरात म्हणाली.
कुंती काहीच बोलली नाही. तिची नजर वृषालीवर स्थिरावली होती. आपल्या प्रथमपुत्राच्या पत्नीच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे तिला उमगत नव्हतं. कुमारी अवस्थेत जन्माला आलेल्या कर्णाचा त्याग केल्यानंतर आजतागायत तिने त्याचा कोणापाशी उल्लेखही केला नव्हता. युध्दाच्या सुरवातीला केवळ कृष्णाच्या सल्ल्यावरुन ती कर्णाच्या भेटीला गेली होती, परंतु दुर्योधनाचा पक्ष सोडून पांडवांना मिळण्याची तिची विनंती त्याने धुड़कावून लावली होती.
... आणि अचानक समोर उभ्या ठाकलेल्या वृषालीने तिला विलक्षण पेचात टाकलं होतं.
" वृषाली, अंगराज कर्ण एक महारथी आहे !" कुंती शांत स्वरात उद्गारली, " एक दिग्वीजयी योध्दा आहे. पितामह भीष्म आणि आचार्य द्रोण यांच्या तोडीचा, किंबहुना काकणभर सरसच योध्दा आहे !"
वृषालीच्या चेह-यावर स्मित उमटलं. राजमातेने विषय बदलण्याचा प्रयत्नं केल्याचं तिच्या ध्यानात आलं होतं. काही क्षण शांततेत गेले.
" राजमाता, मी निघते !" अचानक वृषाली म्हणाली, " उद्याच्या युध्दात अंगराज आणि आणि धनुर्धर पार्थ एकमेकांशी भिडतील ! या द्वंद्वाचा निकाला काहीही लागला तरीही विजय आपल्या पुत्राचाच होईल हे आपण जाणता ! मी आपल्या दर्शनास आले होते ते एकाच हेतूने. आजवर सूतपुत्र म्हणून ज्यांची कायम हेटाळणी झाली त्या माझ्या पतीला, अंतिम समयी त्याच्या मातेने स्वीकारावं आणि ते सूतपुत्र नसून चांद्रवंशीय क्षत्रिय आहे हे जगाला सांगावं इतकीच माझी अपेक्षा होती. परंतु ते शक्यं नाही हे माझ्या ध्यानात आलं आहे ! येते मी !"
" कर्णपत्नी वृषाली !" द्रौपदी संतापाने थरथरत म्हणाली, " अंगराज सूतपुत्र असो वा क्षत्रिय, परंतु पांडवांशी त्यांची वर्तणूक आजवर शत्रुत्वाचीच राहीली आहे ! एका कुलस्त्रीची भर सभेत वेश्या म्हणून संभावना करणं हे सूत किंवा क्षत्रिय कोणाला शोभतं ?"
" याज्ञसेनी, एक स्त्री म्हणून द्द्यूताच्या प्रसंगी त्या वक्त्यव्याबद्दल मी अंगराजांना कधीही क्षमा करु शकत नाही !" वृषाली शांतपणे म्हणाली, " परंतु सर्वकाही समजून-उमजून एका मातेने आपल्या पुत्राची जन्मभर झालेली अवहेलना उघड्या डोळ्यानी पाहत राहवी हे कितपत योग्य आहे ?"
" वृषाली..."
" राजमाता, आपल्याला पेचात टाकावं अशी माझी इच्छा नव्हती. उद्याच्या महासंग्रामात अर्जुनाचा विजय निश्चीत आहे ! यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ! तत्र श्रीर्विजयो भूतिर्धृवा नीतिर्मतिर्मम ! हे प्रत्यक्ष श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत सांगीतलं आहे. याज्ञसेनीच्या स्वयंवरात पुत्रवियोगाचं जे दु:खं मी भोगलं ते आपल्यालाही दुर्दैवाने भोगावं लागणार आहे. परंतु आपल्याला आपल्या पुत्रासाठी उघडपणे शोकही व्यक्त करता येणार नाही !"
" वृषाली !" कुंती निर्धारी स्वरात उद्गारली, " अंगराज कर्ण सूतपुत्र नाही ! कर्ण चांद्रवंशीय क्षत्रिय आहे ! राधेय नाही, कौंतेय आहे ! माझा पुत्र आहे !"
वृषाली कुंतीकडे पाहत राहीली. कुंतीच्या चेहरा विलक्षण तेजाने झळाळून उठला होता. पुढे होऊन तिने कुंतीच्या चरणांवर मस्तक ठेवलं. कुंतीने हळुवारपणे तिला वर उचललं आणि आलिंगनात घेतलं. वृषालीच्या नेत्रातून अश्रूंच्या सरींवर सरी वाहत होत्या. कुंती हलकेच तिला थोपटत होती.
" राजमाता.. हे..." द्रौपदीला काय बोलावं सुचेना.
" हे सत्य आहे द्रौपदी ! कर्ण माझा पुत्र आहे !" कुंती धारदार स्वरात उद्गारली, " आजतागायत हे सत्यं उघडपणे स्वीकारण्याची माझ्यात हिंमत नव्हती, परंतु यापुढे मात्रं मी सर्वांना अभिमानाने सांगू शकेन, कर्ण कौंतेय आहे ! ज्येष्ठ पांडव..."
" नाही राजमाता !" कुंतीचं बोलणं अर्ध्यावर तोडत वृषाली म्हणाली, " अंगराज कर्ण कौंतेय आहेत, परंतु पांडवांत त्यांचा समावेश आपण करु नये. हे युध्द संपेपर्यंत हे सत्यं आपण कोणासही सांगू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे !"
कुंती काही बोलण्यापूर्वीच वृषाली बाहेर पडली. कुंती आणि द्रौपदी ती गेलेल्या दिशेला पाहत राहील्या.
महायुध्दाच्या सतराव्या दिवशी कर्णार्जुनांच्या अंतिम युध्दात अर्जुनाच्या बाणाने कर्ण कोसळला. आपल्या अंतिम समयीही दातांतील सुवर्ण दान करून आपलं दानवीर हे नाव त्याने सार्थ केलं होतं.
" सात्यकी, कर्णाचा देह त्याच्या अश्वावर ठेवण्यास मला मदत कर !" श्रीकृष्णाने सात्यकीला सूचना केली.
दोघांनी मिळून कर्णाचा देह त्याच्या वायुजित अश्वाच्या पाठीवर ठेवला.
" कर्णाची अंतिम ईच्छा होती की मी त्याला अग्नी द्यावा !" कृष्ण शांत स्वरात सात्यकीला म्हणाला, " या टेकडीच्या माथ्यावर मी त्याचा अंतिम संस्कार करणार आहे ! तू इथेच थांब !"
हातात पेटलेला पलिता आणि वायुजिताचे वेग घेऊन कृष्णाने टेकडी चढण्यास सुरवात केली. टेकडीच्या माथ्यावर चंदनाची चिता रचण्याची त्याने अगोदरच व्यवस्था केली होती. कर्णाचा देह त्याने चितेवर ठेवला. मात्रं कर्णाला अग्नीच्या स्वाधीन करण्यपूर्वी तो कोणाची तरी वाट पाहत होता.
काही वेळातच तो ज्या व्यक्तीची वाट पाहत होता ती तिथे येऊन पोहोचली. तिने संपूर्ण श्वेतवस्त्रं धारण केलेली होती.
" ये वृषाली ! मी तुझीच वाट पाहत होतो !"
" प्रणाम वासुदेव !" वृषालीने कृष्णाला वाकून वंदन केलं.
" वृषाली, कुंतीमातेला भेटून आलीस ?"
" जनार्दना, तुझ्यापासून कधी काही लपून राहीलं आहे का ? राजमातेने अंगराजांना पुत्र म्हणून स्वीकारलं. ते राधेय नसून कौंतेय आहेत हे त्यांनी मजपाशी मान्यं केलं. आता इतकाच आशीर्वाद दे की जगाने अंगराज कर्णांना राधेय म्हणून न ओळखता कौंतेय म्हणून ओळखावं ! सूतपुत्र म्हणून अवहेलना न करता क्षत्रिय म्हणून विरोचीत सन्मान करावा ! वृषालीचं नावही कोणाला ऐकू आलं नाही तरी कर्णाचं नाव मात्रं अजरामर व्हावं !"
कृष्णाने आपले नेत्रं मिटून घेतले. त्याचा उजवा हात आशीर्वादासाठी वर गेला,
" वृषाली, कर्ण हा कुंतीमातेचा पुत्रं म्हणून, कौंतेय म्हणूनच ओळखला जाईल. एक अजोड योध्दा म्हणून तो अजरामर होईल ! जोपर्यंत पृथ्वीतलावर पांडवांचं नाव राहील तोपर्यंत कर्णाचंही राहील !"
कृष्णाने पलित्याची ज्योत चितेला भिडवली, वृषालीने धगधगलेल्या चितेत प्रवेश केला !
***********************************************************************************************
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे, महाभारतात कुठेही कुंती-द्रौपदी-वृषाली समोरासमोर आल्याचा उल्लेख नाही. कुंतीच्या समोर अखेरच्या प्रसंगी दोन्ही सुना समोरासमोर आल्या तर अशी एक कल्पना डोक्यात आली आणि त्यातून ही कथा साकारली.)
प्रतिक्रिया
9 Jun 2014 - 3:06 pm | मुक्त विहारि
आवडला...
9 Jun 2014 - 9:05 pm | अजया
आवडली कथा पण तुमच्या मोहिमांची सर नाही आली! नविन मोहिम काढा आता,धृव ,विषुववृत्त कुठली पण !!!
9 Jun 2014 - 9:33 pm | तुमचा अभिषेक
छान लिहिलीय, आवडली कथा..
पण समथिंग इज मिसिंग म्हणतात तसे मला आणखी काहीतरी एखादा ट्विस्ट अपेक्षित होता, वा आणखी थोडेफार शाब्दिक द्वंद्व.
बाकी महाभारतात असे शक्याशक्यतांचा विचार करून वेगळे ट्रॅक शोधायला गेले तर अजूनही बरेच मिळतील. अश्या बरेच लघुकथांचे पोटेंशिअल आहे मूळ महाभारत कथेत, एवढा मोठा पसारा आहे.
9 Jun 2014 - 9:48 pm | यशोधरा
हे साधारण असंच मृत्यूंजय वा कोणत्या दुसर्या कादंबरीतही आहे का? खूप वाचल्यासारखं वाटत आहे.
10 Jun 2014 - 8:21 am | प्रचेतस
बहुतेक हो.
असे फक्त कादंबर्यांतच असते. :)
10 Jun 2014 - 11:52 am | बॅटमॅन
थांबा, जऽरा थांबा. येत्या १-२ वर्षांत 'इंद्रप्रस्थ का सच' कळून जाईल. आलरेडी तिथे मौर्यकाळापर्यंतचे अवशेष मिळालेलेच आहेत. अजून खाली खणलेले नाही. ते खणायला या किंवा पुढच्या वर्षी हिवाळ्यात सुरुवात करतील. चारेक महिन्यांत मौर्यकाळापर्यंत गेले, अजून ४ महिने गेले तर १००० इसपू पर्यंत खोदकाम होईलच.
तेव्हा कळेल मग कोण कसे पुरायचे ते ;)
12 Jun 2014 - 1:07 pm | केदार-मिसळपाव
मला आता खुप उत्सुकता आहे ह्या संशोधना बद्दल
12 Jun 2014 - 6:08 pm | बॅटमॅन
येस्सार..ही बघा न्यूज़.
www.thehindu.com/news/cities/Delhi/ring-well-discovered-in-purana-qila-e...
12 Jun 2014 - 8:43 pm | केदार-मिसळपाव
आपले एखादे तरी संशोधन महाभारत काळापर्यंत जावे असे वाटते.
"As we go lower, excavations shafts reveal remains of the Gupta and post Gupta period (300 to 600 AD), the Kushan period (0 to 200 AD), the Sungas (200BC to 1BC) and finally the Mauryas in continuous sequence."
जितके खोल खणाल तितके मागच्या शतकात जाऊ हेच काम फार जिकरी चे आहे.
माहिती बद्दल धन्यवाद.
10 Jun 2014 - 11:46 am | मृत्युन्जय
मला वाटत राधेय मध्ये आहे.
10 Jun 2014 - 11:52 am | यशोधरा
हां असेल. य वर्षे झाली वाचून.
10 Jun 2014 - 11:01 am | समीरसूर
वाचायला आवडले. लिखाण छान होते आणि कल्पनादेखील.
एक शंका - अशाच विविध लेखकांच्या कल्पनाविस्तारातून रामायण, महाभारत, आपला इतिहास वगैरे आपण जे आज वाचतो त्या टप्प्यापर्यंत आले असावे काय?
10 Jun 2014 - 12:34 pm | म्हैस
काल्पनिक कथा म्हणून ठीक अहे. पण त्यासाठी महाभारतासारख्या सत्यकथेचा आधार घ्यायची काय गरज होती? आपण आपली काल्पनिक शक्ती वेगळा बेस घेवून वापरू शकला असता .
मलाही असंच वाटतंय
10 Jun 2014 - 12:41 pm | आतिवास
... आणि अचानक समोर उभ्या ठाकलेल्या वृषालीने तिला विलक्षण पेचात टाकलं होतं.
ऐन युद्धात गुप्तहेर खातं (तेव्हाही) झोपा काढत असायचं का? ;-)
10 Jun 2014 - 1:42 pm | प्यारे१
बरं!
आमचं पेन, आमचं कागद, आमचं इचार. चालू द्या. (हलकं घ्या हो! ;) )
ष्टुरी बरी आहे!
12 Jun 2014 - 11:52 am | स न वि वि
फार सुंदर कथा. मृतुन्जाय ह्या शिवाजी सावंत ह्यांच्या पुस्तकात हे सारे असेच वर्णले आहे.
12 Jun 2014 - 5:50 pm | विटेकर
महाभारताची कथा किती प्रतिभावंताना साद घालणार आहे ते एक व्यासच जाणे !
सलाम व्यासांच्या प्रतिभेला आणि तुमच्या कल्पनाविस्ताराला.
अशाच विविध लेखकांच्या कल्पनाविस्तारातून रामायण, महाभारत, आपला इतिहास वगैरे आपण जे आज वाचतो त्या टप्प्यापर्यंत आले असावे काय?
असहमत.
रामायण -महाभारत ही केवळ कल्पनिक काव्ये नसून भरतभूचा इतिहास आहे. बाकी चालू द्या !
12 Jun 2014 - 6:14 pm | टवाळ कार्टा
फक्त त्यातले चमत्कार सोडुन
18 Jun 2014 - 12:27 pm | म्हैस
सहमत . पण आत्तापर्यंत हजारो लोकांनी स्वताच्या कल्पना घुस्माडून , स्वताच्या कुवतीप्रमाणे , स्वताच्या मताप्रमाणे त्यात हजारो बदल केलेत . त्यामुळे मुळ गोष्टी बर्याच प्रमाणात नष्ट झाल्या