तू कुणावर प्रेम करणे शक्य नाही
जन्मभर वणव्यात जळणे शक्य नाही
तू सुखाच्या सोबतीने चाल राणी
मी दगा दुःखास देणे शक्य नाही
हे तुझे आंगण तुला लखलाभ आता
ते पुन्हा केव्हा बहरणे शक्य नाही
जीवना, हा छान बंदीवास आहे
जो उभ्या जन्मात सरणे शक्य नाही
मी सुगंधासारखा अस्थिर होतो
मी तुझ्या हातात ठरणे शक्य नाही
तू हवे तर आण उसनी चार दुःखे
ती अशी आतून झरणे शक्य नाही ..
तू कितीही बांध भिंती अस्मितेच्या
तू मला वगळून उरणे शक्य नाही
डॉ.सुनील अहिरराव
प्रतिक्रिया
29 May 2014 - 10:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी सुगंधासारखा अस्थिर होतो
मी तुझ्या हातात ठरणे शक्य नाही
तू हवे तर आण उसनी चार दुःखे
ती अशी आतून झरणे शक्य नाही
वरच्या चार ओळी आवडल्या. खासच.
-दिलीप बिरुटे
31 May 2014 - 1:19 pm | drsunilahirrao
धन्यवाद सर.
31 May 2014 - 1:42 pm | अत्रुप्त आत्मा
@तू हवे तर आण उसनी चार दुःखे
ती अशी आतून झरणे शक्य नाही ..>>>>>>>> आ हाहाहाहाहाहाहाहाहाहा!!!!!!!!!!
काय वार बसालाय राव! सपाssssssssssssssssssssssक!