आज निवडणुकींच्या निकालाच्या (अगदी अगदी) पूर्वसंध्येस एका बातमीत खालील वाक्ये वाचनात आली:
"....गांधी यांच्या महिलांबाबतच्या आणि जातीयवादाबाबतच्या विचारांचा इतिहास पाहिल्यास त्यांना महात्मा केलेच कोणी, असा प्रश्न निर्माण होतो...त्यांचा उल्लेख 'देशातील पहिले भांडवलदार पुरस्कृत समाजसेवक' असा केला... 'कधी संत तुकाराम यांच्यावरील नाटके तयार करून ४६ रुपये जमा करणे तर कधी अस्पृश्यता उच्चाटनाच्या नावखाली ब्रिटीश कंपन्यांकडून दोन लाख रुपये मागणे, अशाप्रकारचे कार्य करणारे गांधी हे महात्मा असूच शकत नाहीत. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत नेमके काय केले, याबाबतच इतिहास पुन्हा समोर आला पाहिजे', "
तर प्रश्न असा आहे की ही वरील वाक्ये कोणी म्हणली असावीत? खरं म्हणजे "आता मोदी सरकार(च) येणार" अशा (भाबड्या अथवा वास्तव ते १६ तारखेस कळेल पण) आशेवर आनंदाचे भरते आलेल्या "संघिष्टानेच" म्हणले असेल असे वाटू शकते की नाही? अर्थात हे संघिष्ट नक्की कोण आण कधी म्हणतात हे फक्त त्यांच्यावर डूख धरून असणार्या डाव्या / समाजवादी जे काही पण वास्तवात तथाकथीत निधर्मीच जाणोत. त्यांना विचारले की नक्की कोण तर म्हणणार की शाखेत जाणार्या शेजार्याकडून ऐकले किंवा तत्सम.. पण जर असल्या गल्लीतल्या संघिष्टाने म्हणले असते तर महाराष्ट्र टाईम्सने त्याला प्रसिद्धी दिली असती का? अर्थातच नाही.
मग म.टा.ने त्याला बातमीचे रूप देण्याचे कारण आहे, हे वक्तव्य अरुंधती रॉय यांचे आहे! काय गंमत आहे! भाषणाचे स्थळ काय होते? इंडीया पिस सेंटर. विषय काय होता? : 'निवडणुकीनंतर देशातील शांततेची स्थिती' म्हणजे या बाईंना मोदींना आणि संघाला झोडपण्याची मोठ्ठी संधी होती! पण ती गोष्ट आहे ना ज्यात माकडावर विश्वास ठेवून तलवार दिल्यास स्वतःचेच नाक कापले गेले... तसेच काहीसे या प्रसंगात घडले आहे. कदाचीत म्हणूनच ही बातमी, विश्वास ठेवा अथवा नका ठेवूत पण फक्त महाराष्ट्र टाईम्समधेच आली आहे! बाकी कुठेच नाही! याला म्हणतात सेक्यूलॅरीझमने सेक्यूलॅरीस्टचा सांभाळ करणे! ;)
हेच वाक्य जर भाजपा-विहिंप-संघ आदी मधील कुठल्याही दुसर्या-तिसर्या फळीतल्या कार्यकर्त्याने जाहीररीत्या केले असते तर बरखापासून सर्वांनी त्या व्यक्तीचा बुरखा फाडला असता. पण ह्या थोर विचारवंत महीलेच्या बाबतीत मात्र कोणी बोलायला तयार नाही!
या बाई केवळ तेव्हढेच बोलून थांबल्या नाहीत, तर पुढे, "'लोकसभा निवडणुकीनंतर देशात कुठलेही सरकार आले तरी त्यांचे लक्ष्य केवळ माओवाद व इस्लामिकवाद यांना लक्ष्य करणेच असेल." असे देखील म्हणाल्या! अच्छा म्हणजे इस्लामवाद म्हणले तर चालते पण कोणी राष्ट्राला प्रामाणिक रहा म्हणणारा हिंदूत्ववाद म्हणले तर मात्र फॅनॅटीक! पण त्या विचारवंत आहेत, त्यामुळे त्यांचेच खरे!
सर्वत्र विमानाने फिरणार्या, सेलफोन सकट सगळी अधुनिक तंत्रायुधे वापरणार्या अरुंधतीबाईचा भांडवलावादाला विरोध आहे. अर्थात त्याचे कारण आदीवासींनी आदीवासीच रहावे असे त्यांना वाटत असावे... आणि म्हणून गांधीजींंनी घेतलेल्या बिर्लांच्या मदतीस विरोध आहे. पण स्वतः मात्र Booker-McConnell Prize अथवा बुकर पारीतोषिक हे एका भांडवलवादी "largest food wholesale operator" कडून चालू झालेले बक्षिस घेताना मात्र गैर वाटत नाही...
ते जाउंदेत त्या भारतविरोधी आणि भोंदू आहेत याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि मोदी आल्यास त्यांची मैत्री असलेल्या हिंसाचारी माओवादी नक्षलवाद्यांचे काय होणार याची त्यांना काळजी वाटत असणार.
पण मुद्दा असा आहे, की इतर डाव्या आणि समाजवाद्यांना अरूंधतीबाईंच्या वक्तव्याबद्दल काय म्हणायचे आहे? म्हणजे बाईंचे "गांधीजींना महात्मा करण्याबाबतचा आक्षेप बरोबर वाटतो" का असेच जाहीरपणे म्हणणार्या छगन भुजबळांप्रमाणेच "बाई चूक आहेत" असे म्हणणे योग्य वाटते? का आळीमिळी गुपचिळी?
प्रतिक्रिया
14 May 2014 - 7:04 am | यशोधरा
येन केन प्रकारे स्वतःला प्रसिद्धीझोतात ठेवण्यासाठी अशी वक्तव्ये करत असाव्यात.
14 May 2014 - 7:48 am | जेपी
+111111
14 May 2014 - 9:03 am | अर्धवटराव
समाजवादी वा कम्युनिस्ट म्हणावं असे कोण आणि किती लोक आहेत भारतात? गांधींचं महात्म्य त्यातल्या किती जणांना रुचतं आणि पचतं ? मग तुमचा प्रश्न केवळ अरण्यरुदन ठरणार नाहि काय?
14 May 2014 - 9:25 am | यशोधरा
त्यांना मिपावरील म्हणायचे असावे. ;)
14 May 2014 - 4:35 pm | विकास
गांधींचं महात्म्य त्यातल्या किती जणांना रुचतं आणि पचतं ?
गांधींचे महात्म्य केवळ संघ आणि उजव्या विचाराला ठोकण्यासाठी वापरायचे शस्त्र आहे. अगदी मिपावर पण गांधींविरोधात लिहीले गेले तर आवाज उठवले गेले आहेत. आत्ता पण उठवले जातील जो पर्यंत आवाज उठवणार्या अरुंधती रॉय नसतील तो पर्यंत.
14 May 2014 - 7:21 pm | आजानुकर्ण
मिपावर गांधीविरोधात लिहिले गेले ते मुस्लिम अनुनय, ५५ कोटीचे तुणतुणे, आणि भगतसिंग या मुद्यांवर. मुस्लिम अनुनयाचा पाया टिळकांनी घातला तेच राजकीय धोरण गांधींनी सुरु ठेवले. उरलेल्या दोन्ही मुद्यांत तथ्य नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. मिपावर दलितांवरील अत्याचारासंदर्भात गांधींविरोधात आवाज उठवल्यास मी जरुर समर्थन देईन.
15 May 2014 - 5:46 am | विकास
मिपावर दलितांवरील अत्याचारासंदर्भात गांधींविरोधात आवाज उठवल्यास मी जरुर समर्थन देईन.
मिपा आपलेच आहे. :) आपणच का चर्चा सुरू करून मते मांडत नाही आहात?
मुस्लिम अनुनयाचा पाया टिळकांनी घातला तेच राजकीय धोरण गांधींनी सुरु ठेवले.
या वाक्यातला पहीला भाग बरोबर आहे का यावर वेगळी चर्चा करता येईल, पण तुर्तास तो तुम्ही म्हणता म्हणजे खराच असणार असे समजुयात. ;) मग प्रश्न असा उरतो तुम्हाला गांधीजी लिडर ऐवजी केवळ फॉलोअर होते असे म्हणायचे आहे का? का त्यांना काँग्रेसकडून दबाव होता, टिळकनितीच चालू ठेवा म्हणून? म्हणजे २ ऑगस्ट १९२०च्या सकाळपासून ते १५ ऑगस्ट १९४७ पर्यंतच्या काँग्रेसनामक चळवळीत केवळ टिळकांनी घालून दिलेल्या विचारसरणीनुसार काम चालले होते असे म्हणायचे आहे?
15 May 2014 - 6:20 pm | आजानुकर्ण
मुस्लिम अनुनयाचा आरोप फक्त गांधींवर होतो टिळकांवर नाही हे रोचक असले तरी कदाचित ज्या नीतीला मुस्लिम अनुनय म्हणून हिणवले जाते ती नीती भारतीय राजकारणासाठी योग्य आहे असे टिळक आणि गांधी दोघांचेही मत असावे. त्यामुळे टिळकांचीच नीती गांधींनी पुढे चालवली असावी. टिळकांनी घालून दिलेली जी विचारसरणी योग्य आहे ती गांधींनी चालू ठेवली असावी आणि अयोग्य विचारसरणीचा त्याग केला असावा असे वाटते.
14 May 2014 - 9:29 am | मिसळलेला काव्यप्रेमी
कोण समाजवादी?
धन्यवाद!
15 May 2014 - 2:45 pm | बालगंधर्व
हाद तिचायमायला, कोनाचा कोन अप्पा, गेला कि तिकद येशीचा तान्दुल बहरायला. अपलायला काय करायच? ती बाई कुनाबदल कै क बोलेना,सरव्यना म्हाएते के शलेच्या पुत्सकात गुन भेतायला गन्धीच्याअ स्तोर्या वचल्या जयच्या. त्यला कुनी म्हतमा म्हनाअ किनवा नको, तोर्तर गेला त्यचा पन्चा घेउन.
14 May 2014 - 9:29 am | मदनबाण
धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी या दोन शिव्या वाटायला लागल्या आहेत हल्ली !
देशात वायझेड लोकांचे जरा जास्तच पीक आले आहे हे मात्र खरे !
14 May 2014 - 9:46 am | माईसाहेब कुरसूंदीकर
ह्यांनी hee लिंक शोधून काढली. मटावाल्यांनी अतिउत्साहात जरा जास्तच मसाला ओतला आहे असे दिस्तय.
(लिंकमधील बातमी दुपारी वाचयचा निश्चय करणारी)माई
14 May 2014 - 3:19 pm | माहितगार
माझ्या अंदाजाने आपण दिलेल्या दुव्यावर केवळ पुस्तक (प्रस्तावनेचे) परिक्षण आहे. १२ मेच्या आसपास अरुंधती रॉय यांनी १ किंवा २ जाहीर कार्यक्रमात (माओवाद्यांना अटक आणि निवड्णूकांच्या अनुषंगाने) हजेरी लावली असावी त्यात त्यांनी महात्मा गांधींबदलच्या त्यांच्या पुस्तक प्रस्तावनेतील सो कॉल्ड नव्या शोधाची चर्चा केली असावी, ती काही प्रमाणात मराठी टिव्ही माध्यमानी दाखवली असेल त्यास अनुलक्षून मराठी वृत्तपत्रांनी संपूर्ण वकव्य आणि बातमी न देता केवळ प्रतिक्रीयेचाच भाग दिलेला दिसतो. अरुंधती रॉय यांनी पुस्तक प्रस्तावनेत कोणते संदर्भ वापरले आहेत हे ही समोर नाही जाहीर कार्यक्रमात त्या नेमके काय म्हणाल्या हेही समोर नाही. नेमका प्रतिसाद कसा देणार हा प्रश्न शिल्लक राहतो. तरी खाली वेगळ्या प्रतिसादाने प्रयत्न करतो.
14 May 2014 - 11:54 am | राही
लेख जरा जास्तच नाट्यनिर्माण करणारा झाला आहे. अरुंधती रॉय यांची कडवी डावी मते सुपरिचित आहेत. अशा कडव्या म्हणजे समन्वयवादी नसलेल्या लोकांनी गांधीजींवर प्रखर टीका करावी यात काहीच नवल नाही. कारण या लोकांची मते (उजव्या अथव्या डाव्या) टोकाची असतात. फक्त त्यांच्याच समाजगटाचे हित साधणारी धोरणे नेत्याची किंवा सरकारची असावीत असा त्यांचा हट्टाग्रह किंवा दुराग्रह असतो. विकासाचा लाभ सर्वांनाच थोडाथोडा व्हावा असे वाटणारा एक समूह आणि तो जास्तकरून फक्त गिरणीकामगारांना, फक्त शेतकर्यांना, फक्त दलितांना, फक्त हिंदूंना, फक्त मुस्लिमांना व्हावा या मताचे अनेक गट यांमध्ये नेहमीच संघर्ष होत आला आहे आणि यापैकी प्रत्येकाने गांधीजींवर टीका केली आहे. जयप्रकाश नारायण काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर गांधीजींविषयी समाजवादी अत्यंत कडवट्पणे बोलत. संघाचा गांधीद्वेष तर जगजाहीर आहे. पुढे यातील प्रत्येकाने काही काळापुरते गांधीजीना हाय्जॅक केले. त्यांच्या नावाचा वापर करून घेतला.
गांधीजी यापैकी कुठल्याच गटाचे नव्हते आणि यांपैकी सर्वांचेच होते. अशा एकांड्या शिलेदाराची जी शोकांतिका होते तीच गांधीजींची झाली. म्हटले तर सर्वच लोक पाठीशी आहेत आणि म्हटले तर त्यापैकी कोणीच खरे नाही, असे झाले आहे.
14 May 2014 - 12:48 pm | नितिन थत्ते
चालायचंच ....
गांधींना ठोकायला कम्युनिस्ट भगतसिंग चालतात आणि कम्युनिस्टांना ठोकायला गांधी चालतात.
14 May 2014 - 4:32 pm | विकास
गांधीजी यापैकी कुठल्याच गटाचे नव्हते आणि यांपैकी सर्वांचेच होते. अशा एकांड्या शिलेदाराची जी शोकांतिका होते तीच गांधीजींची झाली. म्हटले तर सर्वच लोक पाठीशी आहेत आणि म्हटले तर त्यापैकी कोणीच खरे नाही, असे झाले आहे.
प्रतिसादातील गाभ्याशी सहमत आहे. कुसुमाग्रजांनी गांधीजींच्या तोंडी वाक्य घातले होते, ते टिळक, आंबेडकर, फुल्यांना म्हणतात की तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्या मागे किमान तुमच्या जातीची माणसे तरी आहेत. माझ्या मागे नुसत्या सरकारी भिंती! गदीमांच्या "कुणिन ओळखी तरी ही याला दीन अनाथ अनाम" अशी अवस्था आहे, असेच म्हणावेसे वाटते...
पण खालील संदर्भात वेगळे वाटते...
अरुंधती रॉय यांची कडवी डावी मते सुपरिचित आहेत. अशा कडव्या म्हणजे समन्वयवादी नसलेल्या लोकांनी गांधीजींवर प्रखर टीका करावी यात काहीच नवल नाही.
त्यांची वाक्ये जर मूळ चर्चाप्रस्तावात म्हणल्या प्रमाणे इतर कोणी विशेष करून एखाद्या उजव्या विचारवंताने / नेत्याने म्हणली असती तर त्यावर किती गदारोळ झाला असता? थोडक्यात असा गदारोळ करणार्यांना गांधीजींचे काही पडलेले नाही तर त्यांच्या नावाचा केवळ स्वतःच्या वैचारीक विरोधकांना धोपटण्यासाठीचा अहिंसक मार्ग म्हणून वापर करायचा आहे, असे म्हणले तर काय चूक आहे?
संघाचा गांधीद्वेष तर जगजाहीर आहे.
या विधानाला काही पुरावा आहे का? असल्यास द्यावात, नसल्यास नाही म्हणून सांगावात. वाट बघत आहे.
14 May 2014 - 7:15 pm | आजानुकर्ण
गांधींना मारणाऱ्यांनीच गांधींवर टीका करणे आणि डाव्या/समाजवाद्यांनी गांधींवर टीका करणे यात गुणात्मक फरक आहे. गांधींची दलितविरोधी धोरणे सर्वांना माहीत आहेत. आंबेडकरांसकट अनेकांनी त्यावर टीका केली आहे.
मात्र मुस्लिमांचा अनुनय, फाळणीची जबाबदारी, भगतसिंगाची हत्या, ५५ कोटी वगैरे खोटेनाटे आरोप गांधींवर करणाऱ्यांना वेळोवेळी चोपले पाहिजे असे माझे मत आहे.
गांधींचे जेथे चुकले असेल तेथे त्यांच्यावर टीका जरुर करावी मात्र खोटे आरोप करु नयेत असे वाटते.
14 May 2014 - 11:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
गांधीवादी असुन अशी हिंसा करणार्यांना तर भर चौकात पार्श्वभागावर फटके दिले पाहिजेत चाबकानी नै का? खोटे आरोप काय त्यात? पुरावे आहेत म्हणुनचं लोकं बोलतं आहेत ना?
दलितविरोधी गांधींच्या मतांविषयीचीच्या आंबेडकरांची मतं तेवढी बरोबर आणि लो़कं गांधींच्या मुस्लिम अनुनय, भगतसिंगाचा राजकिय बळी, पाकिस्तान ला ५५ कोटी वैग्रे विषयी बोलतात ते चुकीचं नै का? त्यात फक्त दलितांबद्दलची मतं गुणात्मकरित्या श्रेष्ठ आणि बाकीची लोकांची मतं श्रेष्ठ नै का?
15 May 2014 - 1:16 am | आजानुकर्ण
अहो चोपले पाहिजे म्हणजे प्रतिसादांमध्ये चोपले पाहिजे. आम्ही काय लगेच चाबूक घेऊन शोधायला आलो आहोत का?
पुरावे असल्याचे फक्त लोक सांगतात पण कुठल्याच 'पुराव्या'त ५५ कोटीचे तुणतुणे किंवा भगतसिंग फाशी संदर्भात गांधी दोषी असल्याचे सिद्ध झालेले नाही.
(तुम्हाला समजेल असे उदाः अामच्यासारखे लोक मोदींविषयी बोलतात म्हणून ते कोर्टात दोषी आहेत हे सिद्ध झाले का? नाही ना? तिथे पुरावे लागतात साहेब.)
आंबेडकर आणि 'कॅप्टन जॅक स्पॅरो' यांच्या मतांना सारखीच विश्वसनीयता आहे का? आंबेडकर स्वतः शिक्षणाने वकील होते. त्यांना पुराव्याची आवश्यकता आणि वैधता दोन्हींची पुरेशी कल्पना होती. अांबेडकरांनी गांधींविषयी मतप्रदर्शन करताना पुरावे दिले होते. इथले 'उजवे' गांधींवर आरोप करताना फक्त 'गांधीहत्या आणि मी' आणि 'पंचावन्न कोटींचे बळी' याचे संदर्भ देत असतात. ते पुरेसे पुरावे नाहीत.
माझ्या वाक्यरचनेतून 'दलितांबद्दलची मतं श्रेष्ठ' असा अर्थ निघत नाही. पुन्हा एकदा प्रतिसाद वाचावा अशी विनंती करतो. 'गांधींना मारणाऱ्यांची मते आणि डाव्यांची मते यात गुणात्मक फरक आहे' एवढेच लिहिले आहे. श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असे लिहिले नाही.
15 May 2014 - 8:06 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पुरावे आहेत तर विश्वसनीयता सारखीचं असायला हवी. येवढे मोठे मोठे लोकं काय मुर्ख म्हणुन आरोप करतील काय गांधींवर?
१. भगतसिंग ह्यांना वैचारिक विरोध आणि खिलाफत चळवळीला पाठिंबा (अनुनय नै कै. मी नै त्यातला.)
२. भगतसिंग ह्यांच्या ब्रिटिशविरोधी कारवायांनी त्यांना भारतीय जनमानसात मानाचं स्थान मिळतय, आपलं राजकीय स्थान ह्यामुळे धोक्यात येऊ शकतं ह्याची पुर्ण कल्पना आल्यानी गांधींनी शक्य असुन फाशीमधे हस्तक्षेप केला नाही. (अजुन एक उपोषण करायचं की मग, आमच्या देशबंधु भगतसिंग ह्यांची फाशी माफ करा म्हणुन. पण तसं केलं असतं तर राजकिय प्रतिस्पर्धी कदाचित निर्माण झाला असता ना.)
एक काम करा कधीतरी चारुदास आफळे ह्यांची किर्तनं ऐका. आफळ्यांनी मोठ्या मोठ्या पी.एच.डी. वाल्या शोधनिबंधांमधुन रेफरन्सेस घेऊन किर्तनं रचली आहेत. पी.एच.डी. म्हणजे अतिउच्चशिक्षित आणि पुराव्याना धरुन लिहिलेले ग्रंथ असतात हे तर तुम्हाला मान्य असेलचं. आणि त्यांच नाट्यमय रुपांतर वगैरे प्रकार नाही.
जर किर्तनं मिळाली नाहीत तर तुमचा ई-मेल व्य.नि. वर द्या. एम.पी.३ मेल करीन.
तुम्ही उच्चशिक्षित आहात. उगीच पुर्वग्रहानी उजव्या लोकांवर अर्थात आर.एस.एस. वादी लोकांवर टिका करु नका. आधी त्यांचे विचार आणि देशाच्या प्रती असणारी निष्ठा पणं समजुन घ्या.
15 May 2014 - 11:48 am | बॅटमॅन
चारुदत्त आफळे आणि आंबेडकर यांमध्ये कुणाला वेटेज द्यायचे हा प्रश्न सेल्फ-एक्प्लनेटरी आहे असे नै का वाटत?
अन पीएचडी प्रबंध अलीकडे मिपावर विडंबनं पाडावित तसे पाडले जातात, त्याचं कौतुक ते काय?
15 May 2014 - 1:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मी आफळे आणि आंबेडकरांची तुलनाच करत नाहीये, त्यामुळे वेटेज द्यायचा काही प्रश्णच उद्भवत नाहीये.
मी जेन्युईन रिसर्च करुन बनविलेल्या प्रबंधांचा रेफेरन्स घ्या असं सांगतोय, ज्यात सत्यांश जास्त असेल. त्यांनी गांधींच्या अनुनयाचा पुरावा मागीतला मी रेफरन्स दिला. =))
बाकी त्यांची ईतर धाग्यांवरची मतं वाचली तर त्यांचा प्रेफरन्स कुणाला असेल हे सांगायची गरजचं नाही. असो.
लै जास्त अवांतर: ट्रोजन हॉर्स ची वाट पाहातोय. =))
15 May 2014 - 6:38 pm | आजानुकर्ण
हो पण असे काही पुरावे नाहीत ना. आंबेडकरांनी गांधींची भाषणे, लेख, वैयक्तिक जीवनातील वागणे यांचे पुरावे दिले आहेत आणि कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी आफळे यांची कीर्तने पुरावे म्हणून दिली आहेत. कसा काय विश्वास ठेवायचा?
15 May 2014 - 5:48 am | विकास
गांधींना मारणाऱ्यांनीच गांधींवर टीका करणे
हे नक्की कुणाबद्दल बोलत आहात ते पुराव्यानिशी सांगितलेत तर बरे होईल. का आपण देखील खोटेनाटे आरोप करणार्यांमधलेच आहात?
15 May 2014 - 7:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
+२५००००
15 May 2014 - 3:29 pm | प्रसाद गोडबोले
हेच विचारणार होतो ... इथे अनेकवचनात नक्की कोणाकोणाला अध्याहृत धरलय ?
मोदी ? संघ ? अखंडभारतवादी कट्टर हिंदु ? ब्राह्मण ? कोकणस्थ ब्राह्मण ?
नक्की कोण कोण ?
15 May 2014 - 6:22 pm | आजानुकर्ण
http://en.wikipedia.org/wiki/Assassination_of_Mahatma_Gandhi
गांधींहत्येचे आरोपी वरील दुव्यात मिळतील. त्याचबरोबर आणखी गांधीहत्येला गांधीवध असे संबोधणारे, गांधींच्या खुनानंतर साखर वाटणारे, नथुरामाचे उदात्तीकरण करणारे लोक यांच्याबद्दल मी बोलत आहे.
15 May 2014 - 2:23 pm | मृत्युन्जय
गांधींना मारणाऱ्यांनीच गांधींवर टीका करणे
गांधींना गोडसेंनी मारले. त्यांनी गांधींवरती केलेल्या टीकेचा इथे काय संबंध?
15 May 2014 - 2:39 pm | बॅटमॅन
अच्छा?
गांधींना मारणार्यांपैकी इथे कोण आहे? उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला? कमरेखाली वार करायचं लायसन्स एकाच बाजूला दिलंय बहुतेक.
15 May 2014 - 6:26 pm | आजानुकर्ण
प्रतिसादाची उकल पुन्हा एकदा करतो.
गांधींवर खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना चोपले पाहिजे असे माझे मत आहे. गांधींवर खोटेनाटे आरोप करणारे सर्वच जणांनी गांधींना मारले नाही. मात्र गांधींना मारणारे हे गांधींवर खोटेनाटे आरोप करणारे होते.
गांधीहत्येचा संदर्भ दिल्यावर अनेकांनी तो आरोप मिपासदस्यांवर का ओढून घेतला आहे हे कळले नाही.
14 May 2014 - 1:32 pm | हुप्प्या
कम्युनिस्ट आणि गांधी हे दोघे मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानतात/मानत. इतर धर्मांच्या, विशेषतः हिंदू धर्माच्या वाईट प्रथा, रुढींवर कठोर आसूड ओढतील पण मुस्लिमांच्या तितक्याच किंबहुना त्याहून वाईट प्रथेंकडे काणाडोळा.
निदान हे मोठे साम्य विचारात घेऊन कम्युनिस्ट गांधींवर इतकी कडू टीका करणार नाहीत असे वाटले होते. अर्थात गांधीवाद इतका भोंगळ प्रकार आहे की त्यामुळेच तो आज जवळपास नष्ट झाल्यात जमा आहे. कडवा इस्लाम मात्र फोफावतो आहे. त्यामुळे गांधीवादाला लाथा घालून कडव्या इस्लामची दाढी कुरवाळणे हा सौदा जास्त फायद्याचा ठरेल असा हा हिशेब असावा.
14 May 2014 - 2:14 pm | राही
गांधीजी कधीच कुणावर कठोर आसूड ओढणारे किंवा घणाघाती भाषणे ठोकणारे नव्हते. त्यांची भाषा शक्यतो शांत,सौम्य,आर्जवी असे. दीर्घ विचारान्ती घेतलेली भूमिका मात्र ठाम, खंबीर असे. स्त्रिया, दलित, रुग्ण, ज्येष्ठ या बाबतीत स्वतःचे आचरणच त्यांनी लोकांसमोर ठेवले. ज्यांना पटले ते अनुयायी झाले.
कम्यूनिस्ट हे गांधींचे जुने टीकाकार आहेत. त्यांना त्यांचे मार्क्सवाद, लेनिनवाद, मार्क्स-लेनिनवाद, ट्रॉट्स्कीवाद हेच प्रिय होते. इंडिजीनस गांधीवाद त्यांचा आपला नव्हताच.
नऊ टोप्या आणि दहा डोकी असतील तर समान वाटणीसाठी एक मुंडके उडवणे हा कम्यूनिस्टांचा उपाय तर एक टोपी नवीन निर्माण करणे हा गांधीजींचा उपाय. संपत्ती निर्माण झाल्याशिवाय तिची समान वाटणी करता येणार नाही हे गांधीजींना माहीत आणि मान्य होते तर निर्मितीपेक्षा समान वाटणीवर कम्यूनिस्टांचा भर होता.
14 May 2014 - 3:13 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
कमुनिस्ट व गांधीवादी दोघेही ईतिहासजमा झाल्यात आहेत.ते होते हे दाखह्वण्यासाठी अरुंधती सारखे लोक ईतिहास बाहेर काढून फोडण्या देत असतात.गांधीवादी अजूनही आहेत पण गांधी टोपीपुरते असे माझे मत.
.
(माजी समाजवादी)माई
14 May 2014 - 3:29 pm | निनाद मुक्काम प...
मुळात गांधी ह्यांची अर्थशास्त्रीय भूमिका जाणून घ्यायला आवडेल. त्याबद्दल त्यांचे विचार वाचायला आवडतील.
खेड्यात चला म्हजे खेडे स्वावलंबी करा कि आणखी काय हे स्पष्ट झाले पाहिजे.
आणि भारत स्वतंत्र होण्यापूर्वी त्याच्या पक्षांचे काही राज्यात तर काही राज्यात मुस्लिम लीग चे सरकार होते
तेव्हा त्यांच्या पक्षाने मुस्लिम लीग पेक्ष्या वेगळे काय केले.
गांधी ह्यांच्या भोवती उद्योगपतींचा घोळका होता जेथून त्यांच्या पक्षाला निधी मिळत असे म्हणून त्यांना पक्षात महत्व होते. असे मला वाटते.
रॉय चुकीचे बोलल्या नाहीत
मात्र गांधी असे असल्याने काय चुकले असा माझा प्रश्न आहे
त्यांना त्यांच्या पक्षाला निधी उपलब्ध करण्यास कधीच अडचण झाली नाही ह्या उलट संघ आमच्याकडे पैसा नाही , स्वताचे प्रसारमाध्यम नाही असे अनेक वर्ष रडत होता.
नेताजींच्या मुलगी अनिता बोस ह्यांनी जर्मनी मधून दिलेल्या एका मुलाखतीत गांधी ह्यांचे वर्णन हुशार राजकारणी व ग्रेट फंड रेझर म्हणून केले होते ,
त्यांचे गांधी ह्यांच्या विषयी विचार त्यांच्या आईमुळे झाले असावेत जी नेताजींची सेक्रेटरी होत्या.
14 May 2014 - 4:29 pm | माहितगार
क्रेडीट स्त्रीला आई आणि देवी या स्वरूपात पाहणार्या बहुसंख्यांक हिंदू समाजाला द्या, भारतीय राज्यघटना लिहिणार्या आणि स्त्रीयांच्या दृष्टीने प्रागतिक कायद्यांचा हट्ट धरणार्या आंबेडकरांना द्या अथवा सावकाशीने का होईना बहुसंख्यांक स्त्रीयांच्या हिताचे कायदे करणार्या काँग्रेस अथवा डाव्यांना द्या; मुस्लीम समाजाच्या पातळीवरील स्त्री विषयक अपयश, आणि इतर स्त्रियांसाठी अजून करण्यासारख बरच काही शील्लकही आहे हे लक्षात घेऊनही मो.क.गांधी आणि त्यानंतरच्याही काळात भारतीय स्त्रीने (कायदेविषयक स्त्री हक्कांच्या दृष्टीने) सर्व साधारणपणे सकारात्मक दिशेने प्रगती केली आहे. अनेक समानता मिळवण्यासाठी अगदी पाश्चात्य देशातही स्त्रीयांना जे लढे द्यावे लागले असतील (अगदी मतदानाचा अधिकार प्रगत देशातही स्त्रीयांना उशीरा मिळाला) त्या मानाने भारतात प्रतिगामी कुरबूर तुलनेने कमी होऊन स्त्रीयांच्या हिताचे कायदे अधिक वेगाने केले गेले.
ज्यांना अगदीच आजचं स्त्रीवादाच माप घेऊन मो.क.गांधींच मुल्यमापन करायच असेल त्यांचा भाग सोडला तर किमान स्त्रीयांच्या राजकीय आणि सामाजीक प्रगतीत अडथळा आणण्यास गांधी कारणीभूत ठरले असतील अशी शक्यता कमी वाटते. स्त्रीयांनी किती कपडे घालावेत हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न पण ज्या स्त्रीयांना अंगभर कपडे हवेत त्यांना ते मिळे पर्यंत मी एका पंचावर राहतो हे स्वतःला घातलेले बंधन (प्रत्यक्षात उपयूक्त किती माहित नाही) किमान मनाचा मोठेपणाचा एक पैलू नक्कीच दाखवतो.
व्यक्तीगत टिकेकरता मो.क.गांवर टिका चालूच असते ती चालू द्या, पण तो माणूस स्त्रीहक्कांच्या प्रगती करता अडथळा कसा होता ते समजत नाही. आणि अडथळा ठरले नसतील तर स्त्रीविकासाचा विषय घेऊन मो.क. गांधींवर आगपाखड तीही स्त्रीवादी म्हणवणार्या स्त्रीकडून कशा करता हे नीटसे उमजले नाही.
14 May 2014 - 4:39 pm | माहितगार
विकासराव आम्हाला तरी आणखी अजून तीन स्रोतात बातमी गवसली !
१) http://www.lokmat.com/storypage.php?catid=9&newsid=582190 लोकमत
२) http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-arundhati-roy-article-461282... दिव्य भास्कर
३) http://prahaar.in/shadow/hotfaces/211747
14 May 2014 - 7:18 pm | आजानुकर्ण
गेले अनेक दिवस इंग्लिश वृत्तपत्रांमध्येही ही बातमी झळकत आहे. अरुंधती रॉय यांचे विस्तृत विवेचन येथे वाचा.
http://www.caravanmagazine.in/reportage/doctor-and-saint
14 May 2014 - 10:24 pm | माहितगार
दुवा खूप मोठा आहे तरी बहुतांश वाचला, वरच्या माई कुरसूंदीकरांच्या प्रतिसादात http://www.thehindu.com/books/books-reviews/reigniting-the-anticaste-deb... हा पुस्तक परिक्षण दुवा आला आहे. आपण दिलेल्या दुव्यातून आणि परिक्षण दुव्यातून बरीच माहिती मिळत असली तरी ते संक्षेपच आहेत, अरुंधती रॉय त्यांचे स्वतःचे नवे निश्कर्ष काय सांगू पाहात आहेत आणि काय साध्य करु पहात आहेत ते एवढ्यावरन तरी नीटसे उमजले नाही. जेवढ वाचल त्यावरून गांधींच्या अस्पृश्यता विषयक धोरणांबद्दलची टिका महाराष्ट्र आणि मराठीत तशी भारतातही नवी नाही. अरुंधती रॉय यांनी अधीक संदर्भांसहीत लेखन केले आहे असे दिसते जे कदाचित ज्ञानकोशीय लेखनाकरीता चांगला स्रोत असू शकते. अरुंधती रॉय यांचे पूर्ण पुस्तक वाचल्या शिवाय त्यांच्या निश्कर्षांवर भाष्य करणे उचीत नाही, तरीही गांधी आंबेडकर तूलना आधी वाचून झाली असलेल्यां माझ्या सारख्यांकरता नवीन किती सापडेल या बद्दल सध्या तरी साशंकता वाटते . ज्यांनी अरुंधती रॉय यांचे पूर्ण पुस्तक वाचले असेल अशा मराठी खास करून मिपाकराकडून (वेगळ्या धाग्याच्या रुपाने) सविस्तार परिक्षण आल्यास वाचण्यास जरूर आवडेल.
अर्थात विकास रावांच्या धाग्याकरता हे अनुषंगिक असले तरी विषयांतरच म्हणून विकासरावांना क्षमस्व.
15 May 2014 - 1:20 am | आजानुकर्ण
रॉय यांच्या खास टीकाटिप्पणीसह आंबेडकरांचे Annihiliation of Caste हे पुस्तक पुनर्प्रकाशित झाले आहे. थोडीशी वादग्रस्त वक्तव्ये करुन त्यानिमित्ताने पुस्तकाची प्रसिद्धी व खप वाढवण्याचा रॉय यांचा हेतू असावा असे दिसते.
15 May 2014 - 5:36 am | विकास
थोडीशी वादग्रस्त वक्तव्ये करुन त्यानिमित्ताने पुस्तकाची प्रसिद्धी व खप वाढवण्याचा रॉय यांचा हेतू असावा असे दिसते.
अच्छा म्हणजे अरुंधतीबाईंनी टिका केली तर थोडीशी आणि हेतू समजून घेयचा. उत्तम. मर्यादा समजल्या!
15 May 2014 - 6:24 pm | आजानुकर्ण
अरुंधती राय यांच्याबाबत मला फारसे कौतुक नाही. अरुंधतीबाईंनी गांधींवर प्रचंड आणि अत्यंत खुनशी अगदी नथुरामाने केली असती इतकी टीका केली आहे असेही मला म्हणायला आवडेल.
15 May 2014 - 6:09 am | विकास
एनडीए आणि ते देखील मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत येणार अशी काही महीने तरी हवा आहे. खरे खोटे ते समजायला आता केवळ ४८ तास अथवा कमीच राहीले आहेत.
म्हणून या बाईंनी आणि त्यांच्या विचारवंत गणंगांनी आता दलीतांना वेगळे करण्याचा घाट घातला आहे असे वाटते. एकीकडे काश्मिरी दहशतवादी, दुसरीकडे मार्क्सिस्ट नक्षलवादी, तिसरीकडे (त्यांच्याच भाषेत) इस्लामवादी आणि चौथीकडे दलीत या सर्वांच्या भावना पेटवल्या की कसे सगळे सोपे जाईल... देशाचे काही का होईना! नाहीतरी देशाच्या सीमा कोण पाळतोय!
15 May 2014 - 6:10 am | विकास
एनडीटीव्ही, आयबीएन, टाईम्स ऑफ इंडीया आदी मान्यवरांना काय झाले?
14 May 2014 - 5:14 pm | माहितगार
तुम्ही मो.क.गांचे समर्थक असा नसा पण अरुंधती रॉय यांची उपरोक्त प्रतिक्रीयापण व्यक्तीगत आणि टोकाची वाटते. मो.क.गां दक्षीण आफ्रीकेत केवळ भांडवलदारांच्या केसेस लढण्याकरता गेले हे खरेच आहे. पण त्यांनी नंतरच्या काळात केवळ भांडवलदारांची मांडवली करूनच आयूष्य कंठल असत तर त्यांची भारतीय लोकांना आठवण राहण्याचा त्यांच्या बद्दल टिका करण्याचाही प्रसंग कदाचित आला नसता. भांडवलदारांची सरसकट बाजू न घेता या माणसाने कोर्टाच्या बाहेर तडजोडी घडवल्या. सामान्य भारतीयांची वस्ती उठवली जाताना आंदोलन केल.
भारतीय स्वातंत्र्याचा लढा केवळ राज्यकर्ते बदलण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या जिवनात बदलासाठी असेल हा सामान्यांना समोर ठेवणारा विचारच दिला नाही तर अभिजनांपुरती मर्यादीत असलेली काँग्रेस मनःपुर्वक ग्रामीण शेतकरी आणि सर्वसामान्य जनते पर्यंत नेली.
भारतीय भांडवलदारांचा काँग्रेसला सहभाग पाठींबा हा गांधींमुळे नाही आला तो दादाभाई नौरोजींनी आणि इतर तत्कालीन भारतीय अर्थशास्त्रींनी आर्थीक गणितात ब्रिटीश भारतीय उद्योगांना कस नाडतात हे पुढ आणल म्हणून हा पाठींबा आला. तो पाठींबा गांधींनी काँग्रेसकरता वापरला असेल. कम्युनीस्ट साम्यवादाच्या टोकाच त्यातील हिंसेच धार्मिकतेस नाकारण्याच समर्थन गांधींनी केल नसेल. तत्कालीन सर्वसामान्य भारतीय शेतकर्याच शेतीशी नात भावनिक होत हे लक्षात घेऊन शेतीच कम्यूनिस्टांना अभिप्रेत शेतीच सार्वजनिकीकरणाच समर्थन गांधींनी केल नसेल, पण तरीही सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या परीने त्यांनी केला. तरीही ज्या कम्युनीस्टांना टिका करावयाची ते करतील पण समतोल भूमीकेतून पाहता 'देशातील पहिले भांडवलदार पुरस्कृत समाजसेवक' अशी म.को. गांधींवर टिका टोकाची म्हणून अग्राह्य वाटते.
14 May 2014 - 5:36 pm | माहितगार
अस्पृश्यता आणि जातीयवाद तत्कालीन संपुर्ण समाजातच इतका होता कि गांधी काय अजून कुणी काय अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण कुणा एकाच व्यक्तीच्या बसची गोष्ट होती हे समजण कितपत रिआलीस्टीक आहे. चातुर्वण्य गांधींनी नाकारला नाही म्हणून भारतात आला नाही असे नाही तो आधी पासून होताच, चातुर्वण्य तत्वज्ञानपातळीवर गांधी नाकारत बसले नाहीत हि त्यांची आणि इतर भारतीय समाजाची कमतरता मान्य करता येते त्याच वेळी जातीयवाद अद्याप संपला नसलातरी जातीनिहाय व्यवसायाच्या पलिकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीतून समाजाने चातुर्वण्य हद्दपार केलाच आहे. पिळसुटला नसलातरी सुंभ जळाला हे निश्चीत. भंगीकाम केलेल्या समाजातील स्त्री भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचेल तेव्हाच खर स्वातंत्र्य प्राप्त झाल असा दृष्टीकोण ठेवणारे गांधी त्यांच्यावरील तत्वज्ञानातीक टिका मान्य करूनही कृतीच्या दृष्टीने प्रगतीशील आणि महत्वाचे वाटतात
14 May 2014 - 7:26 pm | बॅटमॅन
अरुंधती रॉयसारख्या लोकांवर मिपाकर आपला बहुमूल्य वेळ घालवत असल्याचे पाहून खरेच शरम वाटली. लोकहो, आता तरी जागे व्हा. त्या बाईला डोकं वापरायची कुणीतरी बंदी केली असावी असं वाट्टंय. असो, चालायचंच. आक्रस्ताळेपणा नै केला तर तिच्याकडं लक्ष तरी कोण देणार म्हणा.
14 May 2014 - 8:02 pm | आजानुकर्ण
सदर वक्तव्य हे भाषणात केलेले नसून भाषणानंतरच्या प्रश्नोत्तरांमध्ये केले आहे असे दिसते. एखाद्या पत्रकाराने रॉय यांच्या नव्या पुस्तकासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचा येथे संदर्भ असावा.
14 May 2014 - 11:49 pm | अवतार
जगभरातील डाव्या गटांमध्ये स्त्रियांच्या हाती निर्णायक अधिकार किती प्रमाणात दिले गेले याचा आढावा जर ह्या बाईंनी घेतला तर बरे होईल. गांधींबाबत आता कोणीही काहीही भूमिका घेतली तरी त्यांचे स्थान जागतिक इतिहासात अढळ आहे आणि राहील याविषयी कोणाला शंका असू नये. बुद्धाचे नाव अडीच हजार वर्षांच्या टीका आणि आक्रमणांना पुरून उरले. मग गांधी तर कालपरवाचेच आहेत!
महत्वाचा मुद्दा हा आहे की गांधी हा आदर्श म्हणून वैयक्तिक पातळीवर स्वीकारणे आज महत्वाचे आहे. ह्याचा अर्थ लगेच पंचा नेसून खेड्यात जाणे असा होत नाही. गांधींच्या आयुष्याचा जेवढा जमेल तेवढा अभ्यास करून त्यांनी ज्या अनेक असाध्य गुणांचे दर्शन जगाला घडवले त्यातील किमान एकतरी गुण अंगी बाणवणे जमले तरी पुष्कळ झाले!
मात्र राष्ट्रीय पातळीवर गांधींना कोण काय म्हणाले ह्याने राष्ट्रीय अस्मितेची हानी वगैरे काही होत नाही. आज ह्या देशाला स्वत:ची सार्वभौम संसद असतांना कोणा एका नेत्याच्या पाठी सर्वांनी आपली अक्कल गहाण टाकून मेंढरांसारखे जाणे हा लोकशाहीचा पराभव म्हणावा लागेल. ह्यात उजवे, डावे, अधले, मधले सर्वच आले.
कडवट उजव्या विचारांवर लगेच टीका होते कारण त्यातील धोका स्पष्ट दिसतो. कडवट डाव्या विचारांचा धोका तेवढा स्पष्ट दिसत नाही. भांडवलवाद हा उघड्या-नागड्या स्वरुपात सत्ता-संपत्तीचे केंद्रीकरण करतो तर साम्यवाद हा छद्मी मार्गाने तेच उद्दिष्ट साध्य करतो. भांडवलवाद जनतेला तिची गरज काय आहे हे ठरवण्याचे तरी स्वातंत्र्य देतो. साम्यवाद तेही देत नाही.
दोन्ही विचारसरणी ह्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य नाकारतात. गांधींचा लढा माणसांना माणसासारखे वागवले जावे ह्याच मुद्द्यासाठी होता. म्हणूनच गांधीच्या नावाने शंख करून बहुसंख्य जनतेची माणुसकी हिरावून घेण्याची स्वप्ने बघणे ह्याशिवाय दोन्ही बाजूंचे तथाकथित विचारवंत काहीही करू शकत नाहीत.
15 May 2014 - 1:24 am | आजानुकर्ण
उत्तम प्रतिसाद
15 May 2014 - 9:48 am | दिनेश सायगल
समाजवाद हा मुळात वाईट नव्हता. उलट डावीकडे जरासा झुकलेला मध्यममार्ग म्हणता येईल. मात्र स्वातंत्र्यानंतर जे ध्येयवादी समाजवादी होते ते लोक कधीच संपले. आता आहेत ते स्वयंघोषित डावे. आणि केवळ नावात समाजवाद शिल्लक राहिलेले राजकीय पक्ष. या स्वार्थी लोकांमुळे मूळच्या समाजवादी लोकांना नावे ठेवण्यात अर्थ नाही.
लेखातील भावनेशी सहमत आहे. रॉय बाईंचा एकूण इतिहास पाहता त्यांना at the best 'विनोदी' यापेक्षा काही जास्त चांगले म्हणणे शक्य नाही.
काही ठराविक लेखकांच्या लेखांवर कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवणारे आयडी पाहून मात्र चांगली करमणूक झाली आहे. जालावरील स्वयंघोषित डावे विचारवंत कोणत्याही लेखात काय लिहिले आहे यापेक्षा कोणी लिहिले आहे हे पाहून कीबोर्ड बडवायला सुरुवात करतात आणि अनेकदा आपल्याच जाळ्यात अलगद सापडतात ही आमची theory सिद्ध केल्याबद्दल या विचारवंतांना धन्यवाद!
बाकी चालू द्या!
15 May 2014 - 3:36 pm | प्रसाद गोडबोले
कंटाळा आलाय राव असल्या चर्चांचा ...
कधी कधी वाटतं की एकदाच काय ती मिसळपावची फाळणी होवुन जावी ... मिसळस्तान आणि पावस्तान !
पण ह्यावेळी व्यवस्थित फाळणी व्हावी म्हणजे पावासोबत मिसळ खाणार्यांना मिसळस्तानातुन हकलुन द्यावे अन नुसतीच मिसळ खाणार्यांना पावस्तानातुन हकलुन द्यावे...
कोणी कोणाला येक्ष्ट्रा ५५ कोटी..सॉरी सॉरी ...येक्ष्ट्रा कट किंव्वा कांदा लिंबु देवु नये म्हणजे असले वाद विवाद उद्भवणार नाहीत *biggrin* *biggrin* *biggrin*
15 May 2014 - 3:45 pm | स्टुपिड
त्ये पाववाले रोज उठून मिसळीचा कट मागायला हिकडंच येतेत!
15 May 2014 - 5:01 pm | बॅटमॅन
=))