गांधीजींबद्दलची भुमिका डावे-समाजवादी स्पष्ट करतील का?
आज निवडणुकींच्या निकालाच्या (अगदी अगदी) पूर्वसंध्येस एका बातमीत खालील वाक्ये वाचनात आली:
"....गांधी यांच्या महिलांबाबतच्या आणि जातीयवादाबाबतच्या विचारांचा इतिहास पाहिल्यास त्यांना महात्मा केलेच कोणी, असा प्रश्न निर्माण होतो...त्यांचा उल्लेख 'देशातील पहिले भांडवलदार पुरस्कृत समाजसेवक' असा केला... 'कधी संत तुकाराम यांच्यावरील नाटके तयार करून ४६ रुपये जमा करणे तर कधी अस्पृश्यता उच्चाटनाच्या नावखाली ब्रिटीश कंपन्यांकडून दोन लाख रुपये मागणे, अशाप्रकारचे कार्य करणारे गांधी हे महात्मा असूच शकत नाहीत. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत नेमके काय केले, याबाबतच इतिहास पुन्हा समोर आला पाहिजे', "
तर प्रश्न असा आहे की ही वरील वाक्ये कोणी म्हणली असावीत? खरं म्हणजे "आता मोदी सरकार(च) येणार" अशा (भाबड्या अथवा वास्तव ते १६ तारखेस कळेल पण) आशेवर आनंदाचे भरते आलेल्या "संघिष्टानेच" म्हणले असेल असे वाटू शकते की नाही? अर्थात हे संघिष्ट नक्की कोण आण कधी म्हणतात हे फक्त त्यांच्यावर डूख धरून असणार्या डाव्या / समाजवादी जे काही पण वास्तवात तथाकथीत निधर्मीच जाणोत. त्यांना विचारले की नक्की कोण तर म्हणणार की शाखेत जाणार्या शेजार्याकडून ऐकले किंवा तत्सम.. पण जर असल्या गल्लीतल्या संघिष्टाने म्हणले असते तर महाराष्ट्र टाईम्सने त्याला प्रसिद्धी दिली असती का? अर्थातच नाही.
मग म.टा.ने त्याला बातमीचे रूप देण्याचे कारण आहे, हे वक्तव्य अरुंधती रॉय यांचे आहे! काय गंमत आहे! भाषणाचे स्थळ काय होते? इंडीया पिस सेंटर. विषय काय होता? : 'निवडणुकीनंतर देशातील शांततेची स्थिती' म्हणजे या बाईंना मोदींना आणि संघाला झोडपण्याची मोठ्ठी संधी होती! पण ती गोष्ट आहे ना ज्यात माकडावर विश्वास ठेवून तलवार दिल्यास स्वतःचेच नाक कापले गेले... तसेच काहीसे या प्रसंगात घडले आहे. कदाचीत म्हणूनच ही बातमी, विश्वास ठेवा अथवा नका ठेवूत पण फक्त महाराष्ट्र टाईम्समधेच आली आहे! बाकी कुठेच नाही! याला म्हणतात सेक्यूलॅरीझमने सेक्यूलॅरीस्टचा सांभाळ करणे! ;)
हेच वाक्य जर भाजपा-विहिंप-संघ आदी मधील कुठल्याही दुसर्या-तिसर्या फळीतल्या कार्यकर्त्याने जाहीररीत्या केले असते तर बरखापासून सर्वांनी त्या व्यक्तीचा बुरखा फाडला असता. पण ह्या थोर विचारवंत महीलेच्या बाबतीत मात्र कोणी बोलायला तयार नाही!
या बाई केवळ तेव्हढेच बोलून थांबल्या नाहीत, तर पुढे, "'लोकसभा निवडणुकीनंतर देशात कुठलेही सरकार आले तरी त्यांचे लक्ष्य केवळ माओवाद व इस्लामिकवाद यांना लक्ष्य करणेच असेल." असे देखील म्हणाल्या! अच्छा म्हणजे इस्लामवाद म्हणले तर चालते पण कोणी राष्ट्राला प्रामाणिक रहा म्हणणारा हिंदूत्ववाद म्हणले तर मात्र फॅनॅटीक! पण त्या विचारवंत आहेत, त्यामुळे त्यांचेच खरे!
सर्वत्र विमानाने फिरणार्या, सेलफोन सकट सगळी अधुनिक तंत्रायुधे वापरणार्या अरुंधतीबाईचा भांडवलावादाला विरोध आहे. अर्थात त्याचे कारण आदीवासींनी आदीवासीच रहावे असे त्यांना वाटत असावे... आणि म्हणून गांधीजींंनी घेतलेल्या बिर्लांच्या मदतीस विरोध आहे. पण स्वतः मात्र Booker-McConnell Prize अथवा बुकर पारीतोषिक हे एका भांडवलवादी "largest food wholesale operator" कडून चालू झालेले बक्षिस घेताना मात्र गैर वाटत नाही...
ते जाउंदेत त्या भारतविरोधी आणि भोंदू आहेत याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि मोदी आल्यास त्यांची मैत्री असलेल्या हिंसाचारी माओवादी नक्षलवाद्यांचे काय होणार याची त्यांना काळजी वाटत असणार.
पण मुद्दा असा आहे, की इतर डाव्या आणि समाजवाद्यांना अरूंधतीबाईंच्या वक्तव्याबद्दल काय म्हणायचे आहे? म्हणजे बाईंचे "गांधीजींना महात्मा करण्याबाबतचा आक्षेप बरोबर वाटतो" का असेच जाहीरपणे म्हणणार्या छगन भुजबळांप्रमाणेच "बाई चूक आहेत" असे म्हणणे योग्य वाटते? का आळीमिळी गुपचिळी?
प्रतिक्रिया
कंटाळा ...
फाळणी झाली ना भो कवाच!
(No subject)
Pagination