हलकेच शिरशिरी मग ..
प्रत्येक वाट येथे काट्यावरुन जाते
प्रत्येक फूल येथे प्रेतावरुन जाते !
प्रेमात नेहमी या तू जिँकतोस मृत्यू
माणूस जात साली जातीवरुन जाते
सांभाळ या सुखांना तू जोजवीत गीते
माझेच दुःख माझ्या कंठावरुन जाते !
येशील का कधी तू, ते सांग आज राणी
सारी तुझी प्रतीक्षा जन्मावरुन जाते
जुल्फे तुझी मुलायम करतात गूज गाली
हलकेच शिरशिरी मग ओठावरुन जाते
संधी अशीच येथे घाईत फार येते
घोड्यावरुन येते, थोड्यावरुन जाते
आताच त्या सुखाने माझा लिलाव केला
सलगी अशी सुखाची अंगावरुन जाते
मी कामगार आहे, मजला सुटी कशाला
माझी सुटी तशीही घामावरुन जाते
भलती मुजोर आहे म्हणतात लोकशाही
खुर्चीवरुन येते, खुर्चीवरुन जाते
निश्चित टेबलाच्या खालून काम होते
सारीच काळजी बघ नोटांवरुन जाते
स्वस्तात फार आता विकलास तू महात्म्या
साली इमानदारी पोटावरुन जाते
करतात ते समीक्षा आता भल्याभल्यांची
पण बालगीत त्यांच्या डोक्यावरुन जाते !
डॉ.सुनील अहिरराव
प्रतिक्रिया
3 May 2014 - 11:21 pm | सस्नेह
लै भारी !
3 May 2014 - 11:25 pm | पैसा
सगळेच शेर आवडले!
3 May 2014 - 11:49 pm | धर्मराजमुटके
सॉरी...पण नाही जमलीय. बेटर लक नेक्स्ट टाईम.
3 May 2014 - 11:52 pm | जेनी...
मी तर हलकीच शिरशिरी ओठांवरुन जाते ... हे वाचुन क्लिक केलं ...
म्हटलं आता मस्त भन्नाट रोमँटिक कायत्री वाचायला मिळणार ... पण :(
4 May 2014 - 12:01 am | आत्मशून्य
करतात ते समीक्षा आता भल्याभल्यांची पण बालगीत त्यांच्या डोक्यावरुन जाते हे अतिशय खरे आहे.
4 May 2014 - 9:22 am | drsunilahirrao
@स्नेहांकिता, पैसा, जेनी धर्मराज मुटके, आत्मशून्य खूप खूप आभार !
5 May 2014 - 10:09 am | संजय क्षीरसागर
संधी अशीच येथे घाईत फार येते
घोड्यावरुन येते, थोड्यावरुन जाते
कदाचित इथे मी स्वतःला रिलेट करु शकलो असेन आणि बाकीच्या शेरांमधे दुसरी ओळ प्रभावी झाली नसल्यानं असेल.
5 May 2014 - 4:59 pm | सूड
>>करतात ते समीक्षा आता भल्याभल्यांची
पण बालगीत त्यांच्या डोक्यावरुन जाते !
दंडवत स्वीकारा !!
5 May 2014 - 7:41 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११ कडक!!!
7 May 2014 - 6:59 pm | एस
प्रामाणिकपणे सांगायचं तर शीर्षकावरून काहीतरी आलतूफालतू असेल असे वाटले होते त्यामुळे वाचायचंही टाळलं होतं. पण प्रचंड भेदक काव्य आहे. सलाम!
मिपावरी येती ढीगभराने जिलब्या
नजरेतुनि सहजी ही गज़ल सुटून जाते...
7 May 2014 - 7:25 pm | drsunilahirrao
धन्यवाद स्वॅप्स,
6 May 2014 - 12:15 pm | drsunilahirrao
संजय क्षीरसागर, अतृप्त आत्मा, सूड आभारी आहे. एकदोन ठिकाणी अलामत चुकली आहे. त्यात जमेल तसे बदल करेन.
उदा. हा एक शेर बदलून याप्रमाणे
प्रेमात नेहमी या तू जिंकतोस मृत्यो
माणूस जात साली धर्मावरुन जाते