हाणा! मारा!! ठेचा!!!

स्पंदना's picture
स्पंदना in पाककृती
1 May 2014 - 9:12 am

http://www.misalpav.com/node/27742 अन http://www.misalpav.com/node/27744 वाचल्यावर आपले घरात बनणारे साधे सुधे प्रकारच जीभेला कसे गुलाम बनवतात याची सहज कल्पना यावी.
कितीही देशी विदेशी निरनिराळ्या पदार्थांची चव चाखली तरी अनिवार ईच्छा म्हणता येइल ती, अश्या अनवट पदार्थांचीच होते. अन एकदा का जीभेला त्या चवीची आठवण झाली की मग आपलं काही म्हणता काही चालत नाही त्यापुढे! नाही कां?
तशी ही जीभ एक महाभयानक प्रकरण आहे. हिच्यापुढे मोठमोठे वीर महावीर नामोहरम होत असतीलं. अगदी तलवारीचा घाव बरा होइल पण या जीभेचा तडाखा नको! अश्या वेदना ही जीभ देउ शकते. तसच शहाणपण सुद्धा शिकवु शकते. आता हल्ली नेटमुळे जीभेची जागा कळ्फलकाने घेतलीय म्हणायला हरकत नाही पण ते सुद्धा या जीभेचच एक एक्सेटेंशन म्हणु. कस्स्ला घावं घालतात माणसं या कळफलकानं की एखादी सेंसीटीव्ह व्यक्ती पलिकडे अक्षरशःघायाळ होउ शकते! म्हणजे जीभेला हाड नाही म्हणता म्हणता कळफलकाला हाड नाही म्हणायची पाळी येउ शकते.
ते ही असोच. तसा या जीभेचा पराक्रम अगदी रामायण, महाभारतापासुन आपल्याला माहीती आहेच. नवल या गोष्टीच वाटत की इतक्या वर्षांनीपण तिचा महिमा काय कमी झाला नाही. एक याच तर बाईसाहेब आहेत ज्या कधी सांभाळुन घेतात, कधी तडाखे देतात, प्रेम.....हे मात्र डोळ्यातुन सांडत्....स्पर्शातुन कळत...अन जीभेने पोसतं हो! तो एक वेगळाच विषय होइल. ..अन अगदी नामोहरम सुद्धा करतात. पुलंच्या हरी तात्यांसारख शाहिस्तेखानाला ,"हवी तर दुसर्‍या हाताची बोट तोड पण ही शिवी मात्र परत घे " अस म्हणायला लावायची शक्ती फक्त आणि फक्त या जीभेतच असु शकते नाही का?
त झाल काय हिरव्या मिरचीचा ठेचा हे शिर्षक वाचल्यावर माझी जीभ खवळली. अहो ठेचा म्हणता मग तो हिरव्या मिरचीचा कसा? त्याला खरडा म्हणतात. अस काही बाही बोलता बोलता माझी जीभ,"ठेचाऽऽ ठेचाऽऽ " करु लागली. शेवटी सगळ सोडुन बाजार गाठला अन झकास पैकी ओल्या लाल मिरच्या शोधुन काढल्या. आजकाल थाय फुडने आपली ओल्या लाल मिरच्यांची मात्र झकास सोय झाली हो!
काय विचार करुन हे नाव असाव या प्रकाराला? ठेचुन करतात म्हणुन? तशी आपली मराठी जरा रांगडीच नाही म्हंटल तरी. आमचं काय सुद्धा मलमलीत रेशमी नसतं. सगळं असंच. चवीला भन्नाट प्रकार पण बघा नावापायी मार खातात!!!
आता असो. मी पहिला माझीच जीभ...सॉरी...कळफलक आवरते अन झटक्यात पाककृती देउन मोकळी होते.
तर बिगी बिगी उठा अन बाजारात जावा. पाव किलो ओल्या लालं मिरच्या अन एक लिंबु एव्हढच आणा. बाकी सगळा माल मसाला घरचाच.
तर घ्या.

ओल्या लाल मिरच्या -एक दहा बारा नग.
एक लिंबु
हळद -अर्धा चमचा
हिंग- पाव चमचा
मिठ -चमचाभर
मेथी दाणे -पाव चमचा

फोडणी
तेल- चांगल अर्धा वाटी. (किंवा ठेचा ज्या बरणीत भराल त्यात ठेच्याच्या वर आल पाहिजे थोडस)
मोहरी-पाव चमचा
हिंग -चुटकीभर
हळद- चुटकीभर
मेथीदाणे- दहाबारा (हवे असतील तर जास्त घाला)

कृती
सगळ्यात आधी एका छोट्या फोडणीच्या भांड्यात अर्धा वाटी तेल चांगल धुर निघेतोवर गरम करुन घ्या. गॅस अथवा शेगडी बंद करुन तेल जरा निवु द्या. आता त्यात मोहरी घाला. जरा निवु दिलेल्या तेलात मोहरी जळत नाही पण तडतडते मात्र. तर त्या अंदाजाने तेल निवु द्या. मग त्यात हिंग, हळद अन मेथी दाणे घालुन ही फोडणी थंड व्हायला बाजुला ठेवुन दया.
मिरच्यांचे देठ काढुन त्यातल्या बिया सुरीने अथवा कात्रीने काढुन घ्या. हात लागु देउ नका चुकुनही. दिवसभर जरा चेहर्‍याला लागला की जळायला लागते चेहर्‍याची त्वचा!! नाका बिकाला तर हात लागला ना? ती "नाकाला मिरच्या झोंबल्या" ही म्हण साक्षात साकार होते भाऊ! सो बी केअरफुल.
आता या मिरच्या अन वरचा मेथी दाणे सोडुन सगळा मसाला एकत्र करुन जमल तर चर्नरवर नाही तर सरळ मिक्सरवर बारिक करुन घ्या. मेथीदाणे अगदी थेंबभर तेलावर हलके भाजुन घ्या. रंग तांबुस झाला की भाजणे बंद करा. अन हे एव्हढेच मेथी दाणे खलबत्त्यात कुटुन घ्या. मस्त जमतील तेव्हढे बारिक करा. आता ही मेथी पावडर मिक्सरच्या भांड्यातल्या आधीच्या मिश्रणात मिसळुन आणखी एक हलकीच गिरकी मारा.
सगळ व्यवस्थीत मिक्स झाले असेल तर आता हे एका साठवणीच्या बरणीत काढुन घ्या. वरुन लिंबु रस पिळा. अगदी भरपुर. अख्खा लिंबु!! आता यात साखरेचा उल्लेख चालायचा नाही कित्येकांना तरीही हवी असेल तर चिमटभर साखर याची चवं वाढवुनच जाते. अन एक अतिशय महत्वाच म्हणजे हा ठेचा जितका दिसतो ना, तेव्हढा तिखट नाही लागत!! लिंबु रसाने याचा तिखटपणा जरा का चांगलाच कमी होतो. ;)
थंड झालेली फोडणी आता यावर ओता. अन काय? अगदी कश्या कश्या बरोबरही हाणा.

फोडणीतली मेथी एक दोन दिवसात अगदी मस्त भिजते अन आणखीच चव वाढवते या ठेच्याची.
तर अद्वेय आम्ही बाई याला ठेचा म्हणतो. आता तुला काय राग लोभ असेल तो ठेचुन ही सेवा मान्य करु घ्या!

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 May 2014 - 9:18 am | प्रचेतस

झणझणीत एकदम.

पैसा's picture

1 May 2014 - 9:51 am | पैसा

आता करायलाच पाहिजे!

आयला त्या ठेच्याच्या धाग्याने चांगलीच आग लावलीय. मी पण आताच हिरवे टोमॅटो आणी मिरच्या घेऊन आलोय. आज मस्त पैकी खर्डा आणी भाकरी सोबत जय महाराष्ट्र दिन साजरा करणार.

मस्त!!! पाककृतीही आणि तुमचे लिखाणही...जीभेवर एकदम चव आली ठेच्याची! :)

सुहास झेले's picture

1 May 2014 - 10:30 am | सुहास झेले

सहीच.. :)

दिपक.कुवेत's picture

1 May 2014 - 10:48 am | दिपक.कुवेत

दिसतोय. हा विकांताला करुन ठेवतोच. बाकि थाई लाल मिरच्या (छोट्या वाल्या) असतात मात्र ठसकेबाज. त्या मानाने वर आहेत त्या नुसत्या रंगाला असतात. असो आपुनको ठेच्याशी मतलब. पाकृ आणि लिखाण ठेच्यासारखचं ठसकेबाज ह्वेसानंल.

स्साला ते घाटी लोग हाय ने, ते असलं काय्तरी खर्डा करते.. स्साला बिजा दिन सगला सुपडा साफ होते..

स्स्स..ज्जाळ्ळ.. लै भारी
ह्या दोन-तीन दिवसात ठेचा,खर्डा यांनी चैन पडू दिली नाही. शेवटी मेसमधे जाताना एक पाकीट लाल मिरचीचा ठेचा विकत घेतला. दही आणी ठेचा आधाशासारखा हाणला. पुढे पेस्तनकाका म्हणतात त्याप्रमाणे.. ;)

नंदन's picture

1 May 2014 - 12:24 pm | नंदन

याला म्हणतात अस्सल ठेचा! नुसता फोटू पाहूनच जीभ खवळली.

किसन शिंदे's picture

1 May 2014 - 2:56 pm | किसन शिंदे

नंदनशी सहमत. लाल मिरच्यांचा अस्सल ठेचा!!

पिवळा डांबिस's picture

1 May 2014 - 9:59 pm | पिवळा डांबिस

मस्त ठेचा!!!
कोलापूरकरणीला अनेक धन्यवाद!! :)
मुद्दाम लॉग्-इन करून प्रतिसाद द्यावासा वाटावा अशी पाककृती!!!
जियो!!!

बाबा पाटील's picture

1 May 2014 - 1:01 pm | बाबा पाटील

आणी चुलीत भाजलेल वांग.बरोबर गरम गरम बाजरीची भाकरी,कांद्याची पात्,आणी कैरीच लोणच,सांडगे आणी पापड्,आणी वरती ग्लासभर गोड ताक.समाधी लागती राव.

ओ नका हो अजुन आठवणी काढु, इथे ऑफिसमधे का$$$$ही मिळत नाही.

अपर्णाताई पाकृ एकदम झकास, मागे एकदा भारतात आल्यावर एका मैत्रिणीने जेवायला बोलवले होते, तिची स्वयंपाक करणारी जी बाई होती आम्ही मावशी म्हणतो त्यांनी, त्यांनी शोधुन शोधुन अशाच लाल मिरच्या आणुन ठेचा केला होता बरोबर गरमगरम ज्वारीची भाकरी आणि भरली वांगी, सगळया मंडळीनी, बच्चे कंपनीनेसुद्धा असा ताव मारला की बास.

रॉजरमूर's picture

2 May 2014 - 7:48 pm | रॉजरमूर

ओ नका हो अजुन आठवणी काढु, इथे ऑफिसमधे का$$$$ही मिळत नाही.

तसे तर आमच्या येथेही (भारतात) अजून तरी ऑफीस मध्ये मिरच्या किंवा ठेचा विकायला ठेवत नाही त्या आणायला मार्केट मध्येच जावे लागते.

भावनांको समझा करो - आधीच ही अपर्णाताय, अद्वेय, एकसेएक पाकृ देतात ते सानिका, गपपा आहेतच छ्ळायला - त्यात बाबा पाटीलांनी हे असं म्ह्टल्यावर - आणी चुलीत भाजलेल वांग.बरोबर गरम गरम बाजरीची भाकरी,कांद्याची पात्,आणी कैरीच लोणच,सांडगे आणी पापड्,आणी वरती ग्लासभर गोड ताक.समाधी लागती राव. आम्ही हाफीसात बसुन कामात लक्ष कसं लावायचं?

क्या बात! क्या बात!! क्या बात!!!

भावना चाळवल्याबद्दल वर्णन अन फटू दोहोंपैकी कशाचा निषेध जास्ती करावा या दुग्ध्यात पडलो आहे.

गणपा's picture

1 May 2014 - 1:43 pm | गणपा

ए १
हाय साला काय कातील फोटो आहे एकदम..

सस्नेह's picture

1 May 2014 - 1:57 pm | सस्नेह

अपर्णा, ठेचा लै भारी दिसतोय. आता खर्डा पण येऊ दे !

सुहास..'s picture

1 May 2014 - 2:24 pm | सुहास..

कल्ला !!

यात कैर्‍या च्या बारीक फोडी पण मस्त लागतात !!

तुमचा अभिषेक's picture

1 May 2014 - 2:29 pm | तुमचा अभिषेक

कैर्‍यांच्या फोडी कापून त्यात नुसते मीठ मसाला वगैरे चोपडले तरी सणासुदीला केलेल्या गोड्या डाळीच्या जेवणाची रंगत वाढते.

सल्ला : फोटो जरा मोठे टाका !!

तुमचा अभिषेक's picture

1 May 2014 - 2:27 pm | तुमचा अभिषेक

लाल ठेचा, हिरव्या मिर्च्यांचा खर्डा, तीळकूट वगैरे वगैरे छानपैकी तिखट चवीचे आणि तोंडाला लाळ सुटवणारे असले की चार घास नेहमीच जास्त जातात. लोणच्याला मात्र ती करामत नाही तितकीशी साधता येत.

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2014 - 2:48 pm | अत्रुप्त आत्मा

https://lh5.googleusercontent.com/t5uG7mSePHCX9nKrfh6FBMTiJdDX6Du67MbrMEelR4I=w276-h207-p-no
http://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink026.gif

मुक्त विहारि's picture

1 May 2014 - 2:55 pm | मुक्त विहारि

अस्सल कोल्हापुरी ठेचा दिसतोय.

मदनबाण's picture

1 May 2014 - 5:40 pm | मदनबाण

चांगल ठेचुन काढलं की... ;)
सुंदर लिखाणाची "तिखट" पाकॄ. ;)
कधी बाजारात गेलो तर कोल्हापुरी ठेचा नक्की घेउन येतो.
KolhapuriThecha
(ठेचा प्रेमी) :)

सुंदर फोटो. रंग मस्त आहे. ठेचा ठेवलेली बरणी क्यूट आहे. पाकृ नेहमीप्रमाणेच गोष्ट सांगावी तशी!

चिन्मय खंडागळे's picture

1 May 2014 - 6:13 pm | चिन्मय खंडागळे

समस्त कोल्हापुरी पैलवानांची आगाऊ माफी मागून नम्रपणे नमूद करू इच्छितो, की वर्‍हाडी ठेच्याची सर कोल्हापुरी ठेच्याला येत नाही.
जिज्ञासूंनी 'केळकर यांचा वर्‍हाडी ठेचा' आणि तो वरच्या चित्रातला 'प्रवीण' ठेचा आणून स्वतःच शहानिशा करून पहावी.
(कदाचित तो ब्रँडच वाईट असू शकतो, मान्य आहे)

सस्नेह's picture

1 May 2014 - 6:30 pm | सस्नेह

मुळात कोल्हापुरी 'ठेचा' हा तद्दन बोगस शब्द आहे. कोल्हापुरात होतो तो मऱ्हाटमोळा 'खर्डा' !
अन त्यात भरपूर कांदा अन लसून घातलेला असतो.

चिन्मय खंडागळे's picture

1 May 2014 - 6:41 pm | चिन्मय खंडागळे

आँ! वर त्या अपर्नातै म्हन्त्यात खर्डा हिरव्या मिरचीचा असतोय!
आमी अडानी मुंबईकरांनी काय समजावं?

अहो चिन्मय स्नेहांकिता म्हणते आहे की कोल्हापुरी ठेचा नसतो.
आता म्या गरीबान एकदा तरी हा ठेचा कोल्हापुरी आहे म्हंटल का? नाही. मी फक्त ठेच्याची पाककृती दिली.
अन हो कोल्हापुरात हिरव्या मिरचीचा खर्डाच खातात. आम्ही पण खर्डाच खातो. ;)

मैत्र's picture

2 May 2014 - 2:12 pm | मैत्र

हा अपर्णाताईंचा कोल्हापुरी पण लई भारी..
पण लाल मिरचीचा जगात भारी ठेचा वर्‍हाडी..

चिन्मय भौ.. त्या केळकरांच्या ठेचाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद..

बॅटमॅन's picture

2 May 2014 - 2:16 pm | बॅटमॅन

अपर्णा तैंचा प्रतिसाद वाचून पुढील दृश्य डोळ्यांसमोर तरळले. सुज्ञां अधिक सांगणे न लगे ;)

सखू, पावनं आल्यात, खर्डा टाक जरा तेंच्या पानात.

अवं नगं.

का वं? आओ सुवाशिनीनं कुकवाला अन मर्दानं खर्ड्याला न्हाई म्हनू नाई..
अवो पर आमी आमच्या आबाआज्यापासून हिर्व्या मिर्चीचा खर्डाच खातो!
अन आमी काय हिर्वा रंग लावल्याला मैदा खातो काय?

होऊन जौद्या मग डबल!

ब्याट्या, हे सर्व वाचताना विडंबनच आठवत होतं राव !! =))))

उद्देश सफल झाला तर म्हणजे ;) =))

प्रचेतस's picture

2 May 2014 - 6:31 pm | प्रचेतस

=))

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2014 - 8:55 pm | अत्रुप्त आत्मा

खाटुक... http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif

काय मेल्याला सुचत अकेक! http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/laughing-at-someone-smiley-emoticon.gif

स्पंदना's picture

3 May 2014 - 4:10 pm | स्पंदना

चिन्मय खंडागळे's picture

5 May 2014 - 7:42 am | चिन्मय खंडागळे

आयला म्हणजे तो ब्रँडेड कोल्हापुरी ठेचा म्हणजे शुद्ध गंडवागंडवी असते तर!

इरसाल's picture

2 May 2014 - 9:51 am | इरसाल

आम्हीही वरील चित्रात दर्शविल्याप्रमाणेच प्रविणचा कोल्हापुरी ठेचा घेवुन येतो बरे, परंतु त्याला जास्त काळ टिकविण्यासाठी त्यावर केलेल्या प्रक्रियेमुळे तो म्हणावा तितुका चांगला लागत नाही.
आता मा. संपादकीण्बैनी दिलेल्या पाकृ-बरहुकुम करुन पहावा म्हणतो.
एक (कु)शंका ओल्या लाल मिरच्यांच्या ऐवजी सुक्या लाल मिरच्या वापरल्यातर योग्य तो इफेक्ट येणार नाही का ? (लाल ओल्या मिरच्या मिळत नाहीत इथे)

आई ग्गं..कसला भारी फोटो आलाय..!!
एकदम मस्त पाकृ...डीट्टेल पाकृ बद्दल धन्यु :-) नक्की करून पाहाणार

शुचि's picture

1 May 2014 - 7:24 pm | शुचि

आई ग्गं..कसला भारी फोटो आलाय..!!

अर्धवटराव's picture

1 May 2014 - 8:49 pm | अर्धवटराव

च्यायला...खर्डा म्हणा कि ठेचा म्हणा कि अजुनकाहि... जिभेला कातिलाना झटके देण्याचं काम चोख बजावतो हा प्रकार.
पाकृ तर काय तुफ्फान जमली आहे. एक नंबर.

पाषाणभेद's picture

2 May 2014 - 1:16 am | पाषाणभेद

>>> जिभेला कातिलाना झटके देण्याचं काम चोख बजावतो
पण जरा जपून खावा लागतो. नाहितर सकाळी वेगळेच झटके बसतात. :-)

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2014 - 6:01 am | अत्रुप्त आत्मा

@नाहितर सकाळी वेगळेच झटके बसतात>>> =))

सानिकास्वप्निल's picture

1 May 2014 - 8:59 pm | सानिकास्वप्निल

मस्त्त्त्त्त्तं ठेचा , पाकृ सांगण्याची पद्धत +१११११
कातिल फोटो :)

सर्व ब्रँड फालतू...वर्‍हाडि असो की कोल्हापुरी. ब्येस्ट ठेचा/खर्डा घरचाच!!!! :)

Prajakta२१'s picture

1 May 2014 - 9:44 pm | Prajakta२१

एकापेक्षा एक भारी पाककृतींचा पाऊस पडतोय
तेवढीच गरमीतून आणि उकाड्यातून सुटका :-) :-) :-)

सगळ्यांना धन्यवाद

Maharani's picture

1 May 2014 - 11:01 pm | Maharani

zakaas...

मधुरा देशपांडे's picture

2 May 2014 - 1:00 am | मधुरा देशपांडे

वर्णन, पाकृ आणि फोटो, सगळेच झक्कास.

मधुराशी सहमतः)
एकदम उत्सुकतेने वाचायले लागले!
झकास पाककृती

मंडळी आधीच उन्हाळ्याने जेवण्/आहार कमी होतो. त्यात जरा अस काही गरम नसलेल खायला मिळाली की कोरभर भाकरी चढ जाते. एव्हढंच.

सर्वजणांना धन्यवाद. :)

तिखट पण चवदार
अपर्णा

मृत्युन्जय's picture

2 May 2014 - 9:11 am | मृत्युन्जय

यस हाच ठेचा. पण अद्वेय ने दिलेली पाकृ पण एकदा करुन बघायला हरकत नाही. तिखटाने ज्यांच्या नको तिथे जाळ निघतो त्यांनी तोच ठेचा म्हणुन खावा. बादवे अद्वेयची पाकृ कदाचित खर्डा या प्रकाराच्या जवळपास जावी. ठेचा म्हणजे मात्र हाच पाहिजे,

स्पंदना's picture

3 May 2014 - 4:13 pm | स्पंदना

मृत्युंजय जीभेच्या फटकार्‍यापेक्षा जरा कमीच तिखट आहे हा ठेचा.
जरुर ट्राय करा.

खर सांगते, हल्ली माझ्या लहाण मुलाला सुद्धा या ठेच्याशिवाय जेवण जात नाही. फिर आपके लिये क्या चिज है ठेचा?

बालगंधर्व's picture

2 May 2014 - 11:27 am | बालगंधर्व

अपर्ना ताइ, मे तुमचा फएन झलो. तुमचयासथि कय्पन. हना मरा थेचा.

मि तर तुम्च कधिपसुन फन अहे.

स्पंदना's picture

3 May 2014 - 4:14 pm | स्पंदना

वाईच हलु हना मारा तेचा!!
धन्यवाद!

सस्नेह's picture

3 May 2014 - 10:44 pm | सस्नेह

अग्गाग्गागा...त्या ठेच्याला पार लेचापेचा करून टाकलंस की गं बायो ? a

समीरसूर's picture

2 May 2014 - 11:44 am | समीरसूर

ठेचा जम्या! ये लाल रंग कब मुझे छोडेगा...

खूप छान पाककृती आणि फोटो देखील.

बाकी जिभेच्या चवचालपणावर एकमत. काल एका मुंजीला गेलो होतो. त्या कार्यालयातलं जेवण अप्रतिम असतं असं ऐकलं होतं. पुण्यात सगळंच अप्रतिम असतं. मुंजविधी सुरु असतांना माझं लक्ष जेवणाच्या घोषणेकडं लागलं होतं. बरं कुणाला विचारायची सोय नाही; लोकं म्हणतील घरी जेवायला मिळतं की नाही याला. म्हणून चुळबूळ करत बसून राहिलो. चिक्कार गर्दी असूनदेखील विशेष 'बघण्यासारखं' असं काहीच नव्हतं. निदान थोडा वेळ का होईना मनावर थोडा प्रसन्नतेचा शिडकावा होतो. पण आमचं नशीब खोट! बाहेरच्या रणरणत्या उन्हासारखंच कार्यालयातदेखील नुसती रणरणच होती. अचानक एक धमकीवजा सूचना ऐकू आली. "जेवण तयार आहे; सगळ्यांनी जेवणासाठी पहिल्या मजल्यावर जावे". मी लगेच माझ्या सोबतच्या २-३ सोसायटीमित्रांकडे अपेक्षेनं पाहिलं. ते ढिम्म बसून होते. शेवटी मीच "चला जेऊन येऊ या; विधी संपतील तोपर्यंत. मग आल्यावर भेटू; घरी जायला उशीर होईल नाहीतर आणि ऊन तर वाढतच चाललं आहे..." असं बोलून त्यांना घेऊन पहिल्या मजल्यावर कूच केलं. जेवण घेतल्यावर मात्र घोर निराशा पदरी आली. बटाट्याची सुकी भाजी आंबट लागत होती; एक दुसरी भाजी अत्यंत गचाळ होती. त्यात पाणी, चिंच, आणि काहीतरी गिळगिळीत अशी विचित्र चव लागत होती. आम्रखंडापेक्षा फ्लेवर्ड दही बरं लागलं असतं. हराभरा कबाब खरंच चांगले होते पण त्यासोबत दुसरं काही असलं तर त्याची मजा. छ्या, फारच रसभंग झाला. :-(

एनीवे, भाकरी टाका तव्यावर; आम्ही आलोच. ;-)

यशोधरा's picture

2 May 2014 - 11:53 am | यशोधरा

आचारी पुणेरी नसतील ;)

समीरसूर's picture

2 May 2014 - 2:03 pm | समीरसूर

पण खास पुणेरी जेवणासाठी प्रसिद्ध आहे हे कार्यालय. केवढ्या आशेने गेलो होतो मी. सब पचका कर दिया... :-( भूक लागलेली असल्याने ७-८ पुर्‍या, ४-५ हरेभरे कबाब, थोडा मसाले भात असे व्यवस्थित जेवलो मी. अन्नाला नावे ठेवू नये या मताचा मी आहे पण अपेक्षांचे मनोरे ढासळल्यावर थोडे दु:ख होतेच ना! :-( शिवाय सगळ्या अन्नाचा वाढपींनी ताबा घेतला होता. बुफे जेवण होते पण ते वाढतील तेवढेच घ्यायचे...आणि ते वाढणार सुक्या बटाट्याच्या भाजीच्या मोजून ४ फोडी, १ पुरी, अर्धा डाव भरून भाजी...

मैत्र's picture

2 May 2014 - 2:12 pm | मैत्र

धमकीवजा सूचना -- भरपूर पाट्या होत्या का कार्यालयात :)ओळखीचं वाटतंय.
इतकं वाईट नसतं जेवण. एखादा दिवस असतो असा..

समीरसूर's picture

2 May 2014 - 2:52 pm | समीरसूर

पाट्या नव्ह्त्या. आणि सूचना ज्याची मुंज होती त्याच्याच एखाद्या आत्या-मावशीकडून आली होती. कार्यालयातल्या कर्मचार्‍यांची नव्हती. :-) हो त्यादिवशी कदाचित मूड नसेल स्वयंपाकी मंडळींचा, मालकाने एप्रिल महिन्याचा पगार दिला नसेल किंवा उकाड्यामुळे हैराण झाले असतील बिचारे, काल मरणाचे ऊन होते...चालायचेच...

धमकीवजा सूचना .. असंख्य पाट्या आणि उत्तम पुणेरी जेवण असं एक कार्यालय आहे प्रसिद्ध..

अस्सल पुणेकर ओळखतीलच त्यामुळे उगाच थेट नाव द्यायची गरज नाही..
(तरीही हिंट -- सारसबागेजवळ आहे हे :)

असो ठेचाच्या धाग्यावर फार अवांतर होतंय..

बघा आता! आंबट बटाटा भाजीच्या ४ तरी फोडी कशाला हव्या म्हणते मी! :P
असो. गंम्मत सोडली तर थोडेफार जेवण तरी तुम्ही व्यवस्थित जेवू शकलात हे बरे झाले. भूकेची वेळ होती.

समीरसूर's picture

2 May 2014 - 2:48 pm | समीरसूर

भुकेची वेळ होती आणि जेवणही तयार होते. मी यातच खुश होतो. :-) भूक लागल्यावर लगेच अन्न मिळणे हे सुख काही औरच. भूक लागल्यावर भाजी कसली आहे, पोळ्या कच्च्या आहेत का वगैरे न बघता ताट स्वच्छ केल्याशिवाय उठणे सव्भावातच बसत नाही. कालची बटाट्याची भाजी उन्हामुळे नासली आणि म्हणून आंबट लागत होती अशी कुजबूज सुरू असतांनादेखील पानातली सगळी भाजी संपवली. अन्न वाया घालवणे अजिबात पटत नाही. कदाचित लहानपणी कित्येक लोकांची दोन वेळचे अन्न मिळवण्याची मारामार, लढाई जवळून पाहिल्याने अन्नाइतके मुल्यवान मला काहीच वाटत नाही. आणि दुसरे पाणी! बाकी रुपया, सोना, और हवेली तो आते जाते रहते है...भुकेच्या वेळी अन्न मिळाले नाही तर सारी दुनिया, सारी खुदाई झूठ लगती है. एक-एक रुपयाचे दूध घेऊन त्यात दिवसभराचा ४-५ लोकांचा चहा करून पिणारी कुटुंबे पाहिली आहेत मी. कदाचित तेव्हापासूनच हे नको, ती भाजी आवडत नाही; पोळ्यांच्या कडा कच्च्या आहेत; डब्यातली पोळी संपली, नुसती भाजी कशी खाणार, डब्यातली भाजी संपली, नुसती पोळी कशी खाणार.. हे अगदी १००% बंद आहे. जे पानात असेल ते सगळे संपवायचे अशीच सवय लागली आहे.

यशोधरा's picture

2 May 2014 - 4:05 pm | यशोधरा

अगदी खरे आहे.

प्रीत-मोहर's picture

2 May 2014 - 11:46 am | प्रीत-मोहर

मस्स्त पाकृ. पण जास्ती जळजळ नै झाली. साबांनी कैरीचा ठेचा करुन पाठवलाय खास मला आवडतो म्हणुन :)

त्रिवेणी's picture

2 May 2014 - 2:26 pm | त्रिवेणी

अपर्णा ताई लय भारी ठेचा बघ.
पण माझा आपला ओल्या लाल मिरच्या, बचकाभर लसूण(सालासहीत), मीठ आणि जिरं बाकी काहीच नको.
खाताना ठेच्यावर कच्च तेल आणि बाजरीची शिळी भाकरी आणि नाचणीचा चुलीवर भाजलेला पापड. माझ्यासाठी पंचपक्वान्न.

पिंगू's picture

2 May 2014 - 2:30 pm | पिंगू

हा ठेचा खाल्ल्यानंतर बाथरुमच्या बाजूलाच ठाण मांडून बसायला लागेल.. असो ह्यावरुन मितानच्या तिखटीची पाककृती आठवली..

तिखटी की रावण पिठलं रे?

अरे मराठवाडी तिखटी. पण ती पाककृती मीमवर होती आणि आता ती अस्तित्वात नाहीये.. :(

त्रिवेणी's picture

2 May 2014 - 2:33 pm | त्रिवेणी

मितानच्या तिखटीची पाककृती >>>>> मला नाही दिसली ती. कधी, कुठे, केव्हा दिलेली.

मीमवर होती. आता मीमचा बॅकअप नसल्याने ती पाककृती अस्तित्वात नाहीये..

कुसुमावती's picture

2 May 2014 - 2:52 pm | कुसुमावती

फोटो लई भारी. अपर्णाताई तुमची पाकृ सांगायची पद्धत रसाळ आहे, अगदी तुमच्याशी गप्पा मारतेय अस वाटल.

पियुशा's picture

2 May 2014 - 3:10 pm | पियुशा

लय झ्याक !

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 May 2014 - 6:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिरचीच्या एकाहून एक लै भारी पाकृ येत आहेत. त्या पाहूनच तोंडात लाळ आणि पोटात जाळ झाला आहे. :)

भारतियांचे मिरचीशिवाय इतके "पान" हलणार नाही या भविष्याची कोलंबसला थोडीतरी कल्पना असती तर तो भारताबरोबर मिरचीचा व्यापार सुरू करून गडगंज झाला असता... पुढच्या सगळ्या वसाहतवादाच्या उपद्व्यापाची गरजच पडली नसती. ;)

भ ट क्या खे ड वा ला's picture

2 May 2014 - 8:11 pm | भ ट क्या खे ड वा ला

लेख अगदी पाक्रु सारखाच ठसकेबाज .
डोंबिवलीत फडके रोड वर काळे यांचे शमी गृह उद्योग नावाचे एक दुकान २५/३० वर्षे आहे. त्यांच्याकडे खर्डा नावाचा एक लाल भडक जाळ प्रकार मिळतो. सांगली येथून ते मागवतात (त्यांच्या एका नातेवाईकाचा उद्योग आहे) गेली २५ वर्षे तीच चव टिकून आहे. एकदा खाऊन बघा.
व्हराडी,कोल्हापुरी, प्रवीण सर्व विसरून जाल.
या खरड्याची महती श्री काळे यांच्या तोंडून ऐकणे हा सुद्धा एक छान अनुभव आहे.

बॅटमॅन's picture

2 May 2014 - 11:45 pm | बॅटमॅन

जळ्ळं मेलं शमी ते.

त्यांचं माईनमुळा लोणचं जगातभारी होतं. सालं अलीकडे मिळतच नै.

मुक्त विहारि's picture

2 May 2014 - 11:49 pm | मुक्त विहारि

आँं, तुम्हाला "शमी" माहीत आहे?

बघा, बघा, खूद्द गोथॅम वासियांना पण डोंबिवलीतील फडके रोड आणि शमी माहीत आहे.

उगाच नाही, डोंबिवलीला मध्यवर्ती ठिकाण म्हणत.

अहो माहिती अष्णारच. त्यांचं माईनमुळा लोणचं मिरजेतच तयार व्हायचं त्यामुळं मिरजेत सगळीकडं मिळायचं. रॉ मट्रियल तिकडचंच, त्यामुळं तसं होणारच.

अवांतरः माईनमुळा हा प्रकारच कैक मराठी लोकांनाही ठौक नसतो हे पाहून आश्चर्य वाटलं होतं.

योग्य..

मला पण हा प्रकार, चिपळूणला समजला.

बाकी, शमी मध्ये कांदा-लसूण तिखट पण बर्‍यापैकी मिळते.

(सही बदलावी काय?

"आम्ही कुठल्याही धाग्याचे काश्नीर करू शकतो." किंवा " धाग्याचे काश्मीर करणे, हा आमचा मिपासिद्ध अधिकार आहे.")

भाते's picture

5 May 2014 - 8:55 pm | भाते

मुवि, नविन सही छान आहे. तुम्हाला शोभुन दिसते. :)

अहो आम्हाला अगदी लहाणपणीपासून माहीत असुन काय फायदा? बाकी जगाला कोठे हा माईन मुळा ठावुक आहे?
नुसत्या आठवणीने मरायला होतयं.
बाकी काय व्युतपत्ती असावी या माईन मुळ्याची? अस का नाव आहे? हा मुळचा भारतिय की आणि कुठला?

बॅटमॅन's picture

3 May 2014 - 11:13 pm | बॅटमॅन

व्युत्पत्ती काय की.

अन भारतीय असावा, कारण सांगलीकोल्लापूर सोडून अन्य कुठे दिसला नाही मला हा प्रकार. कर्नाटकी असावा म्हटले तर धारवाडकडच्या आमच्या नातलगांना ठौक नव्हता. मुवि म्हंटात चिपळुणात मिळतो तर मग २-४ जिल्ह्यांतच होत असावा हा प्रकार.

लै जीवघेणा बगा. त्याचं लोणचं पुरेसं मुरलं की त्याची साल लगेच निघते, ती तशीच खायची-तिच्यातही थोडा मसाला इ. उतरलेला असतो. मग तो मऊ अन ओलसर माईनमुळा घ्यायचा, अन त्याचा लहानसा तुकडा तोडून तोंडाने त्याचा सर्व रस शोषून घ्यायचा. असे करत करत तो माईनमुळा संपवायचा. प्रत्येक तुकडा शोषून घेताना जी किक बसते तिची बरोबरी एखादी व्हिस्की पिल्यावर बसणार्‍या किकइतकीच इण्टेन्स असते असे म्हणावयास हर्कत नसावी.

(कट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्टर माईनमुळाप्रेमी) बॅटमॅन.

सस्नेह's picture

3 May 2014 - 11:17 pm | सस्नेह

पण मुरलेल्यापेक्षा ताजा करकरीत माईनमुळासुद्धा नळी चावल्यागत लागतो बगा !

बॅटमॅन's picture

4 May 2014 - 12:00 am | बॅटमॅन

आम्ही आजवर फकस्त मुरल्यालंच खाल्लं हायती. तुमी म्हंतासा तर कर्करीत माइनमुळाबी खातू बगा.

थोडक्यात मुवि, खरं मध्यवर्ती ठिकाण मिरज आहे, कंपेअर्ड टू डोंबोली! :P

मुक्त विहारि's picture

3 May 2014 - 2:59 pm | मुक्त विहारि

पण मिरजेतल्या वस्तूंना उठाव तर आमचे डोंबोलीच देतं.

थोडक्यात काय, तर असली गुण-ग्राहक मंडळी डोंबोलीत असल्याने आमचे डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण.

बॅटमॅन's picture

3 May 2014 - 11:05 pm | बॅटमॅन

आई शप्पथ, यशोधराजी ने क्या बात बोली है ! बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है!!!!!

या सत्य प्रतिसादासाठी तुम्हांला एक दुर्वांकुरी थाळी माझ्याकडून.

मुक्त विहारि's picture

3 May 2014 - 11:35 pm | मुक्त विहारि

आता ह्यातून एकच सिद्ध होते, की डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण...

(ज्यासी असती विरोधक अनेक तोची राजा ओळखावा, असे कुठेतरी वाचले आहे.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2014 - 11:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

कसं दिसतं वो ते तुमचं माइनमुळा ? तेचं एक फोटू टाका की हितं. आमी जाळ्यात शोदलं तर हे फोटू मिळालं...


*shok* *dash1*