चंद्राचा शीतल प्रकाश, बाप्पा सगळ्यांना देतो
गोंडस बाळाच्या रुपात, प्रत्येकजण जन्माला येतो
बालपण कसे संपते, कधी कळतच नाही
असा सोमवार परत, कधी मिळतच नाही
मंगळाचा जोश, संपूर्ण तारुण्य व्यापतो
आभाळा एवढ्या आकांक्षा, आपण उरात जपतो
खूप काही करायला, वेळ कमी पडतो
आपल्या नकळत अचानक, बुधवार उजाडतो
बौद्धिक आणि आर्थिक, आपण झेप घेत असतो
कुटुंब, तब्येत, मित्र - ह्यांसाठी वेळच नसतो
अनुभवाचं लक्षण म्हणून जग, पांढऱ्या केसांकडे पाहतं
स्वतःसाठी थोडं जगायचय, असं मनात वाटत राहतं
एक महत्वाचा निरोप घेऊन, मग गुरुवार येतो
खरा मार्ग दाखविण्याचा, प्रयत्न करून जातो
स्वार्थात भिजलेलं मन, इतक्या लवकर सुकत नाही
सल्ल्याची किंमत नसते कारण, फुकट मिळतो - विकत नाही
गुरुवारकडे तोंड फिरवून, आपण शुक्रवार कडे वळतो
भौतिक स्वप्नांच्या मागे, सुटलेलं पोट घेऊन पळतो
शुगर, बी.पी. सोडून, हाताला काहीच लागत नाही
आपला वाटणारा प्रत्येकजणही, आधीसारखा वागत नाही
मग समजतं आपण, गुरुवारी नापास झालोय
शनिवारच्या शिकवणीला, आपोआपच आलोय
आधी प्रेमानी शिकलो नाही, ते छडी खाऊन शिकायचंय
एकदा शहाणपण आलं, कि पुन्हा नाही चुकायचंय
सोलवटलेल्या हातावर, मग रविवार फुंकर घालतो
शेवटच्या पायरीपर्यंत, आपलं बोट धरून चालतो
पण तिथूनही काहीजण, मागे वळून पाहतात
पुन्हा सोमवारपासून, सुरुवात करत राहतात
प्रतिक्रिया
11 Apr 2014 - 7:10 pm | शुचि
यावरुन मला एक ज्योतिषविषयक कल्पना सुचली -
शनिवार - शनिचा वार!
शनि ग्रह मंद असतो, हळू हळू, मंद गतीने होणारी बांधणी (स्ट्रक्चर) याच्या अधिपत्याखाली येते. अर्थात पेरणीचा, कष्टाचा समय. ................... बालपण!!! उंट जस पाणी पीऊन पुढच्या प्रवासाकरता साठवण करतो तसा मनुष्य अभ्यास/विद्यार्जन करुन पुढील आयुष्याच्या तजविजीच्या मागे असतो.
मग येतो रवीवार ..... उगवतीचा, उजळून टाकणारा काळ. रवी ग्रह मेषेत उच्चीचा असतो. अन मेष राशीच्या अधिपत्याखाली येते "कोणत्याही कार्याची सुरुवात्/आरंभ" ......... तारुण्याची (उगवतीची) वर्षे
सोमवार ..... चंद्राच्या अधिपत्याखाली येते कुटुंब/माया ................ वैवाहीक/सांसारीक वर्षे
मंगळवार ..... मंगळ "कृतीशील" ग्रह. येथे येतात .......... कर्तुत्वाची वर्षे, नोकरी, धंद्यात जम बसविण्याची, धडपडून "पौरुष" गाजवण्याची वर्षे.
बुधवार ...... बुध जातीने वाणी! पै न पै जोडणे अर्थात बचत, हिशेब .... ही आहेत मध्यमवयातील जबाबदार वर्षे!
गुरुवार .... बृहस्पती ..... मार्गदर्शक वर्षे , वृद्धत्व जेव्हा काहीजण अध्यात्माकडे वळतात.
शुक्रवार .... शुक्र मीनेत उच्चीचा असतो अर्थात मीन राशी म्हणजे "अंत". जशी मेष ही आरंभ तशी मीन ही "इति/ समाप्ती"
___________
कोणाला वडाची साल पिंपळाला/ हरदासी कथा/ बादरायण संबंध वाटला असेल तर ब्वॉरर्र!!!! पण वरील कवितेच्या अनुषंगाने हे विचार मनात डोकावले म्हणून येथे मांडले आहेत.
12 Apr 2014 - 8:59 am | sunrise
ह्या कवितेमागची संकल्पना ज्योतिष / ग्रह कारकत्व ह्या पार्श्वभूमीवर आहेच. आपल्या लक्षात आले ह्याचा आनंद वाटला.
12 Apr 2014 - 9:02 am | शुचि
Yes I could make that out :) Thanks,
12 Apr 2014 - 9:29 am | तिमा
गुरुचे ऐकले नाही की शनि शिक्षा देणारच.
13 Apr 2014 - 10:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुलेशु.
-दिलीप बिरुटे