के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ५

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in भटकंती
1 Apr 2014 - 11:17 pm

२००८

२००८ च्या मोसमात के २ च्या बेस कँपवर अनेक वेगवेगळ्या मोहींमातील गिर्यारोहकांनी मुक्काम ठोकला होता. त्यांच्यापैकी काहीजणांनी यापूर्वीही के २ वर चढाईचा प्रयत्न केला होता. काही जणांची मात्र ही के २ वरील पहिलीच मोहीम होती.

किम जे सू च्या दक्षिण कोरीयन अ‍ॅब्रझी स्पर फ्लाईंग जंप मोहीमेत सर्वात जास्त - १५ गिर्यारोहक होते. सुप्रसिध्द महिला गिर्यारोहक गो मी यंग हिचा त्यात समावेश होता. अनुभवी गिर्यारोहक असलेल्या गो ने पूर्वी मकालू, कांचनगंगा आणि धौलागीरीवर यशस्वी चढाई केली होती. किम ह्यो गियाँग, पार्क कियाँग हो, हवांग डाँग जिन, ली संग रॉक, किम सिआँग सँग, सून ब्याँग वू, किम ते ग्यू, ली वोन सब, साँग गुई व्हा हे गिर्यारोहकही या मोहीमेचा हिस्सा होते. त्यांच्या खेरीज जुमीक भोटे, चिरींग भोटे, पसांग भोटे आणि पसांग लामा हे चार शेर्पा मोहीमेवर होते. किमने शेर्पांचा पोर्टर म्हणून समावेश न करता गिर्यारोहक म्हणूनच समावेश केलेला होता. चारही शेर्पांनी किम बरोबर एव्हरेस्ट, शिशापन्गमा आणि ल्होत्से वर चढाई केली होती. त्यामुळे शेर्पा किती उत्कृष्ट गिर्यारोहक असतात याची त्याला चांगलीच कल्पना होती. पसांग भोटे आणि पसांग लामा यांचं अनुक्रमे मोठा पसांग आणि छोटा पसांग असं नामकरण झालं होतं.

विल्को वॅन रूजेनच्या डच नॉरीत मोहीमेचाही बेस कँपवर मुक्काम होता. विल्को वॅन रूजेन अतिशय अनुभवी गिर्यारोहक होता. के २ वर त्याची ही तिसरी मोहीम होती. १९९५ मध्ये रोनाल्ड नारच्या नेतृत्वाखालील मोहीमेत रुजेनचा समावेश होता. अ‍ॅक्लमटायझेशन दरम्यान कँप १ आणि कँप २ च्या दरम्यान एका कोसळाणा-या दगडाचा फटका रूजेनच्या खांद्यावर बसला. रुजेनचा जवळचा मित्र आणि अनेक गिर्यारोहण मोहीमांतील साथीदार कास वॅन डी गेवेल आणि आणखी एक गिर्यारोहक हॅन्स व्हॅन डर मुलेन दोन पोर्टरच्या मदतीने त्याला बेस कँपवर आणण्यात यशस्वी झाले होते. रुजेनला हेलीकॉप्टरने स्कार्डू आणि मग इस्लामाबादला हलवण्यात आलं होतं.. २००६ च्या ब्रॉड पीक - के २ मोहीमेवरही वादळामुळे रूजेनला चढाई अर्धवट सोडून माघार घ्यावी लागली होती. २००४ मध्ये रुजेनने ऑक्सीजन सिलेंडरविना एव्हरेस्टचा माथा गाठला होता.

डच मोहीमेत कास वॅन डी गेवेलचाही समावेश होता. रुजेनप्रमाणेच त्याचीही के २ ची तिसरी मोहीम होती. अनेक वर्षांपासून गेवेल आणि रूजेन एकत्र गिर्यारोहण करत होते. रोलँड वॅन ऑस, जेली स्टेलमन आणि कोर्ट हेगेन्स हे इतर डच गिर्यारोहक तुलनेने कमी अनुभवी होते. त्यांच्याव्यतिरीक्त अलास्कात वास्तव्यास असणा-या आयरिश गिर्यारोहक जेरार्ड मॅक्डोनेलचाही मोहीमेत समावेश होता. मॅक्डोनेलने २००३ मध्ये एव्हरेस्टवर चढाई केली होती. के २ वरची त्याची ही दुसरी मोहीम होती. २००६ मध्ये के २ च्या मोहीमेत असताना त्याच्या डोक्यावर आदळलेल्या दगडाने त्याच्या कवटीला फ्रॅक्चर झालं होतं ! बेस कँपवरून हेलीकॉप्टरने त्याला स्कार्डू आणि पुढे इस्लामाबादच्या हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं होतं ! २००६ मध्ये के २ वर त्याची रूजेनशी ओळख झाली होती. ऑस्ट्रेलियन गिर्यारोहक मार्क शीनचाही डच तुकडीत समावेश होता. त्यांच्याव्यतिरिक्त पेम्बा ग्याल्जे शेर्पाचाही डच मोहीमेत समावेश होता. २००३ च्या एव्हरेस्ट मोहीमेत पेम्बाची मॅक्डोनेलशी मैत्री झाली होती. मॅक्डोनेलच्या सूचनेवरून रूजेनने पेम्बाचा के २ च्या मोहीमेत समावेश केला होता. अनुभवी पेम्बाने तब्बल सहा वेळा एव्हरेस्टचा माथा गाठला होता !

सेसील स्कॉगच्या नॉर्वेजियन तुकडीचाही बेस कँपवर मुक्काम होता. सेसील एक उत्कृष्ट गिर्यारोहक होती. के २ च्या मोहीमेपूर्वीच तिने सेव्हन समिट्स ( सात खंडांतील सर्वोच्च शिखरं ) ची चढाई पूर्ण केली होती ! २००३ मध्ये तिने ८२०१ मी उंचीच्या चो यू शिखरावर यशस्वी चढाई केली होती. गिर्यारोहणाव्यतिरिक्त ती स्कीईंगमध्येही निपुण होती. २००५ मध्ये तिने रॉस आईस शेल्फ वरून स्कीईंग करून दक्षिण धृव आणि २००६ मध्ये एल्समेयर बेटावरून उत्तर धृव गाठला होता ! नॉर्वेत ती 'पोलर प्रिन्सेस' म्हणूनच ओळखली जात असे.

स्कॉगच्या मोहीमेत तिचा नवरा रॉल्फ बेई याचाही समावेश होता. स्कॉगप्रमाणेच रॉल्फही उत्तम गिर्यारोहक आणि स्कीईंगपटू होता. स्कॉगच्या जोडीने त्यानेही स्कीईंग करून दक्षिण आणि उत्तर धृव गाठला होता ! १९९९ ते २००१ च्या दरम्यान १७ महिने अंटार्क्टीकावरील क्वीन मॉड लँड वरील नेव्हल कँपवर त्याचं वास्तव्य होतं ! २००७ मध्ये त्याचा सेसीलशी विवाह झाला होता.

स्कॉग आणि बेईने २००५ मध्ये सेसन मार्गाने के २ वर चढाई केली होती. परंतु बॉटलनेकच्या आधीच त्यांना परतावं लागलं होतं. स्कॉगच्या मोहीमेत लार्स फ्लेटो नेसा आणि ऑयस्टीन स्टँगलँडचाही समावेश होता. नेसाची ही ८००० मी वरील शिखरावरील पहिलीच मोहीम होती !

स्कॉग बेस कँपवर पोहोचली होती पण बेई मात्र बेस कँपवर नव्हता. पूर्वतयारी म्हणून दोन नॉर्वेजियन गिर्यारोहकांसह तो के २ पासून जवळच असलेल्या ट्रँगो टॉवरच्या मोहीमेवर गेला होता. ट्रँगो टॉवरवर १९८४ मध्ये नॉर्वेजियन मार्गावर दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. ट्रँगो टॉवरची चढाई यशस्वी करुन बेई बेस कँपवर पोहोचला !

मिलीवॉज एर्डेल्जनच्या सर्बीयन मोहीमेचाही बेस कँपवर तळ होता. ड्रेन मँडीक, प्रेड्रॅग झॅगोरॅक इसो प्लॅनीक, मिओड्रॅक जोकोविच या गिर्यारोहकांचा सर्बीयन तुकडीत समावेश होता. त्याखेरीज मोहम्मद खान, मोहम्मद हुसेन आणि शाहीन बेग हे पाकीस्तानी पोर्टरही मोहीमेत होते. शाहीने बेग अनुभवी गिर्यारोहक होता. त्याने २००४ मध्ये के २ वर यशस्वी चढाई केली होती. प्लॅनीक अनुभवी गिर्यारोहक होता. मँडीक आणि जोकोविच तुलनेने अननुभवी असले तरी मँडीकने २००७ मध्ये ब्रॉड पीकवर यशस्वी चढाई केलेली होती.

मायकेल फेरीसच्या अमेरीकन के २ मोहीमेत अनुभवी गिर्यारोहक एरिक मेयर, फ्रेड्रीक स्ट्रँग, पॉल वॉल्टर्स, क्रिस वॉर्नर, क्रिस किन्कल आणि टिम हॉवर्थचा समावेश होता. त्यांच्याव्यतिरीक्त चिरींग दोर्जे शेर्पादेखील अमेरीकन तुकडीचा हिस्सा होता. चिरींग अनुभवी गिर्यारोहक होता. एव्हरेस्टवर त्याने पाच वेळा चढाई केलेली होती. एरिक मेयर आणि चिरींग जवळचे मित्र होते. अम्रेरिकेत गेलेला असताना मेयरने चिरींगला स्कीईंगचे धडे दिले होते !

ह्युजेस डी'ऑब्रेडच्या फ्रेंच मोहीमेचाही बेस कँपवरच्या गिर्यारोहकांत समावेश होता. ६१ वर्षांचा डी'ऑब्रेड अनुभवी गिर्यारोहक होता. २००५ मध्ये त्याने नंगा पर्वतावर यशस्वी चढाई केली होती. के २ वरची त्याची ही दुसरी मोहीम होती. निकोलस राईस आणि पीटर गगमॉस यांचा त्याच्या तुकडीत समावेश होता. त्यांच्याव्यतिरीक्त जेहान बेग, कुदरत अली आणि मेहेरबान करीम या पोर्टरचाही फ्रेंच मोहीमेत समावेश होता. सर्बीयन मोहीमेतील शाहीन बेग हा जेहानचा चुलतभाऊ होता.

मार्को कन्फर्टोलाच्या इटालियन मोहीमेत कन्फर्टोला आणि रॉबर्टो मॅनी हे दोनच गिर्यारोहक होते. के २ वर सर्वप्रथम चढाई करणारा अ‍ॅचिली कॉम्पॅगोनी कन्फर्टोलाचा आदर्श होता. कॉम्पॅगोनी आणि कन्फर्टोला इटलीतील एकाच प्रांतात राहणारे होते. के २ वर चढाईचा कन्फर्टोलाचा मुख्य उद्देश कॉमॅगोनीच्या चढाईची पुनरावृत्ती करणं हाच होता.

फ्रेंच टी.जी.डब्ल्यू के २ मोहीमेचाही बेस कँपवर तळ होता. ही फ्रेंचांची स्वतंत्र मोहीम होती. यान्निक ग्राझियानी, क्रिश्चन ट्रॉम्सडॉर्फ आणि पॅट्रीक वॅगन यांचा या मोहीमेत समावेश होता. यांच्याव्यतिरिक्त जॉर्ज डिमारेस्कूची सनी माऊंटन मोहीम, डेव्ह वॉटसनची टॉल माऊंटन मोहीम आणि रॉबर्ट गो ई कीटची सिंगापूर के २ मोहीम यांचाही बेस कँपवर मुक्काम होता. कीटच्या मोहीमेत अंग चिरींग आणि जामलिंग भोटे या शेर्पांचा समावेश होता.

या सर्व मोहीमांव्यतिरिक्त फ्रेंच बसाक गिर्यारोहक अल्बर्टो झरीन, सर्बीयन गिर्यारोहक होलीटो बिट, ऑस्ट्रीयन क्रिश्चन स्टँग, इटालियन गिर्यारोहक जॉर्ज एगोचिगो आणि ग्रीनलंडचा निक निल्सन हे एकांडे शिलेदारही बेस कँपवर तळ ठोकून होते ! झरीन अनुभवी गिर्यारोहक होता. २००० मध्ये त्याने एव्हरेस्टवर चढाई केली होती.

या सर्वच मोहीमांतील गिर्यारोहकांचा अ‍ॅब्रझी स्पर मार्गे चढाईचा बेत होता ! अर्थातच अंतिम चढाईच्या दृष्टीने वेळेचं योग्य नियोजन अत्यावश्यक होतं.

१९८६ मध्ये के २ वर अंतिम चढाईच्या वेळी झालेल्या उशीरामुळे परत खाली उतरताना अनेक गिर्यारोहकांना प्राण गमवावे लागलेले होते. १९९६ मध्येही एव्हरेस्टवरच्या वादळात गिर्यारोहक मृत्यूमुखी पडलेल होते. त्या वेळीही चढाईच्या वेळी झालेला उशीर हे सर्वात महत्वाचं कारण होतं. बेस कँपवरील गिर्यारोहकांची गर्दी पाहता के २ वर अंतिम चढाईच्या वेळी गिर्यारोहकांची रांग लागण्याची दाट शक्यता होती.

के २ वरील चढाईचा मोसम हा साधारण जून ते ऑगस्टपर्यंत असतो. त्या दृष्टीने सर्वच मोहीमांतील गिर्यारोहक मे च्या शेवटी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात बेस कँपवर येऊन पोहोचलेले होते. मात्र के २ वरील हवामान चढाईचा प्रयत्न करण्यास अजिबात अनुकूल नव्हतं. सतत वाहत असलेले वारे आणि अ‍ॅब्रझी स्परच्या वरच्या भागात होणा-या वादळांमुळे गिर्यारोहकांना बेस कँपवर वाट पाहण्यावाचून पर्याय नव्हता.

कोणत्याही उंच हिमशिखरावर चढाई करण्यापूर्वी अ‍ॅक्लमटायझेशन ही अत्यंत महत्वाची पायरी असते. शरिराला उंचीची आणि विरळ हवेची सवय होणं हे अत्यावश्यक असतं. कोणत्याही अ‍ॅक्लमटायझेशनविना डेथ झोनमध्ये प्रवेश केल्यास फारतर वीस-पंचवीस मिनीटात कोणाचाही मृत्यू होण्याची शक्यता असते.

अ‍ॅक्लमटायझेशन इतकीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे चढाईच्या आणि परतीच्या दृष्टीने कँप उभारणं आणि सुरक्षा दोर बांधणं ! के २ सारख्या धोकादायक पर्वतावर सुरक्षा दोराविना चढाई करणं म्हणजे साक्षात आत्महत्या ! त्यामुळे सुरक्षा दोर बांधणं हे अत्यंत योजनापूर्वक आणि कौशल्याचं काम असतं. चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पध्दतीने बांधलेला सुरक्षा दोर हा अत्यंत घातक ठरू शकतो.

बेस कँपवर असलेल्या सर्वच मोहीमांतील गिर्यारोहक अ‍ॅक्लमटायझेशन आणि चढाईच्या दृष्टीने कँप उभारण्याच्या कामात मग्न होते. विल्को वॅन रूजेनची डच मोहीम यात आघाडीवर होती. कँप १ आणि कँप २ पर्यंतचा मार्ग त्यांनी तयार केला होता. कँप २ वरुन कँप ३ च्या मार्गावर जेरार्ड मॅक्डोनेल आणि पेम्बा ग्याल्जे चढाई करत असतानाच दगडांची एक रास खाली कोसळली ती नेमकी कँप १ आणि २ च्या दरम्यान चढाई करणा-या मार्क शीनच्या अंगावर ! सुदैवाने कोणतीही मोठी दुखापत न होता मार्क बचावला ! यावर रुजेनने उपाय शोधून काढला. एका तुकडीने जास्तीत जास्त सामान घेऊन चढाई करून कँप २ गाठायचा आणि ते बेस कँपवर परतण्यापूर्वी दुस-या तुकडीने बेस कँप वरचं थांबून राहावं अशी त्याची योजना होती.

डच तुकडीतील गिर्यारोहक सॅटेलाईट फोनद्वारा हॉलंडमध्ये असलेल्या मार्टीन वॅन एकच्या नियमित संपर्कात होते. वॅन एककडून त्यांना के २ वरील हवामानाचे अंदाज कळत होते. अर्थात हे अंदाज पूर्णपणे अचूक नसतात हे त्यांच्या ध्यानात आलं होतं. अनेकदा उत्तम हवामान आहे असं वॅन एकने कळवलं असताना ते नेमके बर्फाचा मारा आणि बोच-या वा-यात सापडलेले होते. वॅन एक मोहीमेतील गिर्यारोहकांच्या प्रगतीच्या बातम्या नियमितपणे इंटरनेटवर प्रसारीत करत होता. डच मोहीम आणि इतरांच्या प्रगतीच्या बातम्या मिळवण्याच्या दृष्टीने वॅन एकच्या वेबसाईटवर सर्वजण नजर ठेवून होते.

अ‍ॅक्लमटायझेशनच्या दरम्यान रुजेन आनि रोलँड वॅन ऑस कँप २ वर असताना एकदा त्यांना भीतीदायक अनुभव आला. कँप २ एका भल्या थोरल्या खडकाच्या आडोशाला होता आपल्या तंबूत झोपेची आराधना करत असताना त्यांना धडाम् दिशी हिमनग खाली कोसळल्याचा आवाज आला ! त्या आवाजाच्या धक्क्यातून ते सावरत असतानाच जोरदार गर्जनेसारखा बर्फाचा आवाज आला ! तंबूच्या दारातून बाहेर नजर टाकताच दोघं हादरले.

अ‍ॅव्हलाँच !

झंझावाती वेगाने बर्फाचा भलाथोरला लोंढा कँप २ च्या दिशेने येत होता ! काय करावं हे न कळल्याने दोघं जागच्या जागी खिळून उभे होते ! सुदैवाने कँप २ च्या मागे असलेल्या घळीमुळे बर्फाचा तो पूर खालच्या दिशेने वळला !

ह्युजेस डी'ऑब्रेडच्या फ्रेंच मोहीमेची अ‍ॅब्रझी स्परच्या बाजूला असलेल्या सेसन मार्गावरुन चढाई सुरू होती. डी'ऑब्रेडच्या मोहीमेत पाकीस्तानी पोर्टरचा समावेश होता. सेसन मार्गावर त्यांनी कँप २ पर्यंत यशस्वी चढाई केलेली होती. कँप ४ च्या आधी सेसन मार्ग अ‍ॅब्रझी स्परला येऊन मिळत होता. डी'ऑब्रेडनेही वॅन रूजेनप्रमाणे सॅटेलाईट फोनद्वारा फ्रान्समध्ये असलेल्या हवामानतज्ञाशी नियमीत संपर्क ठेवला होता. मात्र त्याला मिळणारे हवामानाचा अंदाज रुजेनच्या तुलनेत बराच अचूक होता.

डच आणि फ्रेंच मोहीमांबरोबरच अमेरीकन, कोरीयन, सर्बीयन मोहीम आणि सेसील स्कॉगच्या नॉर्वेजियन मोहीमेचीही जोरदार तयारी सुरू होती. मार्को कन्फर्टोला आणि एकांडा शिलेदार अल्बर्टो झरीनही चढाईसाठी उत्सुक होते, पण के २ च्या चंचल हवामानापुढे सर्वांचा नाईलाज झाला होता.

बेस कँपवर असलेल्या गिर्यारोहकांत विल्को वॅन रुजेन सर्वात अनुभवी गिर्यारोहक होता. के २ वरील त्याची ही तिसरी मोहीम होती. अंतिम चढाईच्या दृष्टीने शिखरापर्यंत मार्ग आखणं आणि सुरक्षा दोर योग्य ठिकाणी बांधणं याला किती महत्वं आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्या दृष्टीने त्याने पुढाकार घेऊन सर्व मोहीमांच्या प्रमुखांची गाठ घेतली होती. शिखरापर्यंत मार्ग आखण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करण्याचं मान्य केलं होतं. मात्र रुजेनच्या या योजनेत कोरीयन मोहीमेचा सहभाग नव्हता. रूजेन अनुभवी गिर्यारोहक असला तरीही त्याचा स्वभाव हुकूमत गाजवण्याचा आणि काहीसा हेकेखोर होता. रुजेनचा जवळचा मित्र असलेल्या कास वॅन डी गेवेललाही अनेकदा त्याचं वागणं त्रासदायक होत असे. दुस-या मोहीमांतील गिर्यारोहकांना तुच्छ लेखण्याची रुजेनची मनोवृत्ती सर्वांनाच खटकत होती.

कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहकांच्या मते के २ वरील चढाई राष्ट्रीय अस्मितेशी निगडीत होती. पश्चिमात्य गिर्यारोहकांच्या वेगवेगळ्या देशातील गिर्यारोहकांच्या एकत्र मोहीमांबद्दल किम जे सू याचं मत फारसं अनुकूल नव्हतं. त्यात रुजेनच्या स्वभावामुळे त्याने आपल्या तुकडीला त्याच्या योजनेपासून लांब ठेवणंच पसंत केलं होतं. सर्वात प्रथम चढाईची संधी आपल्या तुकडीलाच मिळावी असा रुजेनचा दावा होता.

ह्युजेस डि'ऑब्रेडशीही बेस कँपमध्ये एकदिवस रुजेनचा खटका उडाला. मार्टीन वॅन एककडून चार दिवसांनी अंतिम चढाईसाठी अनुकूल हवामान असण्याची शक्यता ध्यानात येताच रूजेनने चढाईच्या दृष्टीने हालचालीस सुरवात केली. आतापर्यंत कँप ३ पर्यंत मार्ग तयार झाला होता. रुजेनने आतापर्यंत मार्ग तयार करताना दुस-या मोहीमांतील पोर्टरचा आणि शेर्पांचाही बिनदिक्कतपणे उपयोग करून घेतला होता. आता सुरक्षा दोर वाहून नेण्यासाठी डी'ऑब्रेडने आपले दोन पोर्टर आपल्या दिमतीला द्यावे अशी त्याने मागणी केली. ते पोर्टर काही काम करत नसल्याचा त्याचा दावा होता.

डी'ऑब्रेडला फ्रान्समधून अद्यापही हवामान पूर्णपणे अनुकूल नसल्याची बातमी मिळाली होती. त्यामुळे तो शिखरावर चढाईची घाई करण्यास तयार नव्हता. त्याचे पोर्टर अद्याप पूर्णपणे अ‍ॅक्लमटाईझ झाले नव्हते. कोणत्याही मोहीमेतील पोर्टरना आपल्या सोईप्रमाणे वापरण्याच्या रुजेनच्या योजनेला डी'ऑब्रेडने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. आपल्या पोर्टरना त्याच्या दिमतीला देण्यास डी'ऑब्रेडने साफ नकार दिला. त्याला ते पोर्टर अर्थातच स्वतःच्या तुकडीसाठी आवश्यक होते. कँप २ पर्यंत डच तुकडीने केलेल्या मार्गाचा वापर करण्याबद्दल रुजेनने डी'ऑब्रेड आणि निक राईसकडून प्रत्येकी पाचशे डॉलर घेतले होते !

" आम्ही कँप ३ वर येताना आमच्या सोबत सुरक्षा दोर घेऊन येऊ !" डी'ऑब्रेडने रुजेनला स्पष्ट ठणकावलं, " अंतिम चढाईच्या दृष्टीने मला पोर्टर्सची गरज आहे !"

डी'ऑब्रेडने नकार दिल्यावर रूजेनने कोरीयन तुकडीकडे शेर्पांची मागणी केली ! अर्थात किमने त्याला स्पष्ट नकार दिला.

रुजेनने आपल्या तुकडीसह चढाईचा बेत नक्की केला. पण २ जुलैला कँप १ वरुन कँप २ वर चढाई करताना त्याला खाली उतरत असलेला कोर्ट हेगेन्स दिसला.

कँप २ वर असलेला रोलँड वॅन ऑस बर्फ वितळवताना कार्बन मोनॉक्साईड मुळे बेशुध्द झाला होता ! जवळपास दहा मिनीटे तो बेशुध्दावस्थेत होता. शुद्धीवर आल्यावरही तो अस्वस्थच होता. हेगेन्सकडून ही बातमी कळताच सर्वांनी घाईतच कँप २ गाठला. रुजेनने वॅन ऑस आणि मार्क शीनची बेस कँपवर रवानगी केली आणि आपली चढाई पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला !

३ जुलैच्या दुपारी रुजेन. डी गेवेल, मॅक्डोनेल, जेली स्टेलमन आणि पेम्बा ग्याल्जे कँप ३ वर पोहोचले होते. दुस-या दिवशीच कँप ४ गाठून रात्री शिखरावर अंतिम चढाईचा त्यांचा विचार होता. रात्री साडेनऊच्या सुमाराला ते झोपेच्या तयारीत असतानाच अचानक एकांडा सर्बीयन गिर्यारोहक होलीटो बिट कँप ३ वर येऊन पोहोचला ! डच तु़कडीच्या जोडीने शिखरावर अंतिम चढाईचा त्याचा बेत होता. पण रुजेनने त्याला आपल्याबरोबर घेण्याचं साफ नाकारलं ! आपल्या तुकडीव्यतिरीक्त कोणीही सर्वप्रथम चढाई करू नये अशी त्याची इच्छा होती. अखेर होलीटोचं मन वळवण्यात तो यशस्वी झाला.

४ जुलैच्या सकाळी डच तुकडीने कँप ४ कडे चढाईला सुरवात केली. मात्र अपेक्षेपेक्षा ब-याच धीम्या गतीने त्यांची प्रगती सुरू होती. त्यातच वा-याचा जोर वाढला होता. आणखीन एक काळजी करण्यासारखी गोष्ट म्हणजे सुमारे ४०० मी सुरक्षा दोर कमी पडत होता ! दोराशिवाय ७९०० मी वरील शोल्डरची सपाटी गाठता आली असती, मात्र खाली उतरताना दोराची नितांत आवश्यकता भासणार होती. निरुपायाने रुजेनने परतीचा निर्णय घेतला. कँप ३ गाठून त्यांनी रात्र काढली आणि दुस-या दिवशी सकाळी बेस कँपकडे परतीचा मार्ग पत्करला.

आतापर्यंतच्या मोहीमेतील चढाईच्या श्रमांमुळे कोर्ट हेगेन्सची तब्येत बरीच खालावली होती. अखेर १३ जुलैला बेस कँप सोडून त्याने स्कार्डूची वाट पकडली ! रोलँड वॅन ऑसने मात्र डच मोहीमेतील इतर गिर्यारोहक परत येईपर्यंत बेस कँपवर राहण्याचा निर्णय घेतला होता.

संपूर्ण जुलै महिन्यात के २ वरील हवामानाचा खेळ सुरुच होता. गिर्यारोहकांपैकी अमेरिकन आणि नॉर्वेजियन तुकडीने कँप ३ पर्यंत अनेक वेळा चढाई केली होती. कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहकांनीही कँप ३ वर चढाई केली होती. डी'ऑब्रेडच्या फ्रेंच मोहीमेतील गिर्यारोहकांच्याही सेसन मार्गावरून कँप १ ते ३ च्या दरम्यान चकरा सुरू होत्या. सुरवातीच्या अपयशी प्रयत्नानंतर डच गिर्यारोहकांनीही चढाईचा नियमीत सराव सुरू ठेवला होता. मात्रं कँप ३ च्या वर चढाई करणं कोणालाही शक्य झालं नव्हतं !

के २ वरील हवामानाकडे नजर लावून बसलेल्या गिर्यारोहकांना अखेर आशादायक बातमी आली !
१ ते ५ ऑगस्टच्या दरम्यान अंतिम चढाईच्या दृष्टीने हवामान अनुकूल होतं !

बेस कँपवरील गिर्यारोहकांची चढाईच्या दृष्टीने तयारी सुरु झाली. वेगवेगळ्या मोहीमांतील प्रमुख गिर्यारोहकांच्या शिखरावरील अंतिम चढाईच्या वेळी होणारा गोंधळ टाळण्याच्या दृष्टीने आणि गिर्यारोहकांचा क्रम ठरवण्याच्या दृष्टीने अनेक मिटींग झाल्या. सुरवातीचे मतभेद विसरुन विल्को वॅन रुजेन, किम जे सू, ह्युजेस डी'ऑब्रेड, सेसील स्कॉग, मिलीवॉज एर्डेल्जन, मायकेल फेरीस, मार्को कन्फर्टोला, अल्बर्टो झरीन, होलीटो बिट त्यात सहभागी झाले होते. अंतिम चढाईच्या दृष्टीने कँप ४ गाठण्याचं वेळापत्रक ठरवण्यात आलं.

२७ जुलैला कोरीयन, सर्बीयन आणि अमेरिकन मोहीमांनी अ‍ॅब्रझी स्परवर कँप १ च्या दिशेने चढाईस सुरवात केली. २८ जुलैला डच आणि डी'ऑब्रेडची फ्रेंच मोहीम आणि होलीटो बिट सेसन मार्गाने कँप २ च्या दिशेने कूच करू लागले. इतर गिर्यारोहक त्याच दिवशी अ‍ॅब्रझी स्परच्या मार्गाने कँप १ च्या मार्गाला लागले.

२८ जुलैच्या संध्याकाळी अ‍ॅब्रझी स्परच्या मार्गाने चढाई करणा-या अमेरिकन, कोरीयन आणि सर्बीयन मोहीमेतील गिर्यारोहकांनी कँप २ गाठला होता. सेसन मार्गाने चढाई करणा-या डच आणि फ्रेंच मोहीमेनेही कँप २ गाठला होता. मात्र किम आणि ड्रेन मँडीक यांनी घोंघावणा-या वा-यामुळे २९ जुलैला कँप ३ वर चढाईचा बेत पुढे ढकलला होता. सेसन मार्गावरुन चढाई करणा-या डच आणि फ्रेंच मोहीमेला त्यामुळे आणखीन एक रात्र कँप २ वर काढावी लागणार होती. सर्वांनी एकाच वेळी कँप ४ वर पोहोचणं अत्यावश्यक असल्याने २९ जुलैला कँप २ वरच थांबण्यापुढे पर्याय नव्हता.

३० जुलैच्या सकाळी डच तुकडीने कँप ३ वर चढाईला सुरवात केली. फ्रेंच गिर्यारोहकांचा कँप ३ च्या पुढे चढाई करून कँप ३ आणि ४ च्या मध्ये कँप उभारण्याचा विचार होता, पण अनुकूल जागा न मिळाल्याने ते सेसन मार्गावरील कँप ३ वर परतले होते. अ‍ॅब्रझी स्परवरील गिर्यारोहकांनीही कँप ३ वर मुक्काम केला होता.

... आणि ३० जुलैच्या रात्री वा-याचा वेग वाढला ! ७२०० मी उंचीवर वादळाला सुरवात झाली !

अनपेक्षीतपणे उद्भवलेल्या वादळाने गिर्यारोहकांची चांगलीच अवघड परिस्थीती करून सोडली होती. या संपूर्ण मोसमात चढाईला अनुकूल हवामान फक्त या काळातच असताना अचानक आलेल्या वादळाने शिखरावर चढाईची एकमेव संधी गमावण्याची शक्यता होती ! सेसन मार्गावरून चढाई करणारा एकांडा शिलेदार होलीटो बिटचा तंबू वादळात पार कोलमडला होता. आत असलेली सर्व सामग्री १०० मैल वा-याच्या झंझावाताने दरीत उडवून लावली होती ! केवळ शेर्पांच्या तंबूत आसरा घेतल्याने तो बचावला होता !

३१ जुलैच्या सकाळी मात्र वा-याचा जोर पूर्णपणे ओसरला. हवामान अखेरीस अनुकूल दिसू लागलं होतं. होलीटो बिटचा अपवाद वगळता इतर सर्वजण कँप ४ च्या मार्गाला लागले. सर्व साधनसामग्री वादळाने उडवून दिल्याने बेस कँपला परतण्यावाचून बिटसमोर कोणताही मार्ग उरला नव्हता ! के २ ची मोहीम त्याच्यापुरती संपली होती !

संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेगवेगळ्या मोहीमांतील गिर्यारोहक कँप ४ वर दाखल झाले होते. कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहकांची दोन तुकड्यांत विभागणी करण्यात आली होती.सर्बीयन मोहीमेचा प्रमुख मिलीवॉज एर्डेल्जन प्रत्यक्षात चढाई न करता बेस कँपवरून चढाईचं निरीक्षण करणार होता. शिखराकडे जाणारा मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने शेर्पा आणि पोर्टरची तुकडी आघाडीवर जाण्याचं सर्वानुमते ठरलं होतं.

के २ वरील अंतिम चढाईसाठी गिर्यारोहक सज्ज झाले होते ! त्यापैकी किती जण आपल्या चढाईत यशस्वी होणार होते ?

क्रमश :

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

2 Apr 2014 - 12:10 am | कवितानागेश

वाचतेय..

अजया's picture

2 Apr 2014 - 8:34 am | अजया

पु.भा.प्र.

पैसा's picture

5 Apr 2014 - 11:12 pm | पैसा

मात्र या मोहिमातील मृत्यूंची संख्या पाहून सुन्न व्हायला होतं. :(