ना ओढ असे देहांची
वा स्पर्शाची मर्यादा
सहवासाने उजळावे
वाटे तरीही कितीदा
ना प्रीती - ना ही मैत्री
हे तुजला मजला ठावे
जे मिळते यातुन, पुरते
का द्यावी खोटी नावे
हे देण्या अन् घेण्याचे
फुललेले मोहक अंगण
का बहराला मारावे
नसलेले घालुन कुंपण
याआधी कैसे होते
यापुढती कैसे जाऊ
सध्या ठरवू इतके की
सध्याला बिलगुन राहू
क्षण अपार श्रीमंतीचे
ये जपून हृदयीं ठेवू
नाजुकसे नाते अपुले
वळणाशी अलगद नेऊ
-- अमेय
प्रतिक्रिया
29 Mar 2014 - 10:08 am | वडापाव
:)
8 Apr 2014 - 8:57 pm | चाणक्य
आवडली
8 Apr 2014 - 9:16 pm | अत्रुप्त आत्मा
क्या बाsssत है!!!
हर एक.. क(गो)डव्याला सलाम!
9 Apr 2014 - 8:17 pm | प्यारे१
+१११११
उत्तम नाद, ताल, लय नि मुख्य म्हणजे अर्थ!
9 Apr 2014 - 7:15 pm | शुचि
फारच छान आहे. शेवटचे कडवे तर कळस आहे.
अशाच विषयावरची "सोनल कर्णिक वायकुळ यांची ही कविता
13 Oct 2015 - 6:50 am | चित्रगुप्त
अतिशय तरल, भावगर्भ कविता.
13 Oct 2015 - 6:58 am | दमामि
छान! यावरून ही आठवली,
वगैरे!
कधी तुझ्यास्तव
मनात भरते
मेघ पिणारे
चांदल नाते
दवात जे घर
बांधूनि राही
पण ते नाही
प्रेम वगैरे!
तव शरिरातून
कधी पेटती
लाल किरमिजी
हजार ज्योती
त्यात मिळाया
पतंग होतो
परि नसे ते
काम वगैरे!
कधी शिवालय
पांघरुनी तू
समोर येता
विरती हेतू
मनात उरते
मात्र समर्पण
मी नसतो पण
भक्त वगैरे!
रंगित असले
धुके धराया
सार्थ शब्द हे
अपरे वाया
त्या पलिकडचा
एक जरासा
दिसे बरासा
फक्त वगैरे!
-कुसुमाग्रज
13 Oct 2015 - 8:40 am | चांदणे संदीप
कुसुमाग्रज आणि अमेय... दोघेही जबरदस्त!!
13 Oct 2015 - 11:14 am | पद्मावति
छान. आवडली.