निवडणुक २०१४: अनुभव ३: केजरीवाल मुंबईत (२)

आतिवास's picture
आतिवास in राजकारण
26 Mar 2014 - 5:37 pm

अनुभव १
अनुभव २

लोकसभा मतदारसंघ ‘मोठे’ असतात हे माहिती आहे, पण ते किती मोठे असतात हे प्रत्यक्ष त्या मतदारसंघाविषयी माहिती घेतली की कळतं. ईशान्य मुंबई मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. ते आहेत शिवाजीनगर (मानखुर्द), मुलुंड, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी आणि भांडूप. २००९ मध्ये या मतदारसंघात सुमारे १६ लाख मतदार होते – गेल्या पाच वर्षांत यात अजून चार लाख मतदारांची भर पडली आहे असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. सहा उपनगरांत विखुरलेल्या वीस लाख मतदारांशी संवाद साधण्याचं उद्दिष्ट ‘रोड शो’ मधून साध्य होत नाही हे उघड आहे. अर्थात इथले सगळे मतदार ‘आप’चे किंवा मेधाताईंचे समर्थक आहेत असं नाही – असं कुठेच नसतं म्हणा. त्यामुळे जिथं समर्थन आहे, किंबहुना ज्या भागात मेधाताईंच काम आहे अशा भागात केजरीवाल जात आहेत हे स्पष्ट होतं आणि ते योग्यही होतं.

केजरीवाल यांचा कार्यक्रम तसा आखीव होता. पाच वाजून चाळीस मिनिटांनी आण्णाभाऊ साठे नगर, तिथून शिवाजीनगर मार्गे घाटकोपरचं रमाबाई नगर; तिथून विक्रोळीच्या कन्नमवारनगरमध्ये जाहीर सभा. निवडणूक आचारसंहितेनुसार रात्री दहा वाजता प्रचार बंद व्हायला हवा. थोडक्यात काय तर तीन विधानसभा मतदारसंघांना केजरीवाल भेट देणार होते – किंवा खरं तर तीन विधानसभा मतदारसंघांना केजरीवाल दर्शन देणार होते. दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबई अशा दोन लोकसभा मतदारसंघांत केजरीवाल दुपारी दोन ते साडेचार असे अडीच तास होते. पण ईशान्य मुंबई मतदारसंघात ते संध्याकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ असे चार तास असणार होते – म्हणजे ईशान्य मुंबईत विजयाची संधी जास्त आहे असा निष्कर्ष ‘आप’मधल्या जबाबदार लोकांनी काढला आहे का? जरा कुतूहल वाटत राहिलं मला या नियोजनाबद्दल.

मानखुर्दच्या रस्त्यावर वळताना बंदोबस्तासाठी उभे असलेल्या पोलीसांनाच पत्ता विचारल्यामुळे आमचं काम सोपं झालं. रस्त्यावर डावीकडे खूप गर्दी दिसली आणि अर्थातच अनेक टोप्या दिसल्या तिथं आम्ही थांबलो. या ठिकाणी सुमारे पाचेकशे लोक असतील. उपस्थितांमध्ये स्त्रियांची संख्या लक्षणीय होती. तरुण, प्रौढ, मध्यमवयीन, वृद्ध – असे वेगवेगळ्या गटातले स्त्री-पुरुष दिसत होते. मुस्लिम स्त्रियांची उपस्थिती त्यांच्या बुरख्यामुळे आणि त्यांनी परिधान केलेल्या ‘आप’च्या टोप्यांमुळे लक्ष वेधून घेत होती.
Mandala
लोकांशी बोलताना कळलं की हा ‘मंडाला’ नावाचा भाग होता. अनेक वर्ष मुंबईत राहूनही मी इथं कधी आले नव्हते. किंबहुना संध्याकाळचा माझा प्रवास मला मी आजवर न पाहिलेल्या, एरवी माझ्यासाठी अदृश्य असणा-या मुंबईची झलक दाखवणारा होता.

डिसेंबर २००४ मध्ये मंडालातल्या आणि परिसरातल्या ८५००० घरांवर संक्रात आली होती. इथं घरटी सहा ते सात माणसं आहेत असा अंदाज धरला तर सुमारे साडेपाच ते सहा लाख लोक रस्त्यावर आले होते – त्यांची घरं उठवण्यात आली म्हणून. ‘झोपडपट्टी हटाव’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. न्यायालयाने इथल्या रहिवाशांचा हक्क मान्य केला आणि डागडुजी करून लोक राहायला लागले होते इथं; तोवर २००५ मध्ये पुन्हा बुलडोझर आले. सोबत होते लाठीचार्ज आणि आग!

मानखुर्दचा हा सगळा भाग म्हणजे मुंबईतल्या गरीबांची वस्ती. मुख्य शहरात राहणं यांच्या आवाक्याबाहेर असतं. गरीबीसोबत येणारे निरक्षरता, आरोग्याचे प्रश्न, बालमृत्यू ... अशा अनेक गोष्टी इथं आहेत. २००४- २००५ मध्ये इथं ‘घर बचाओ, घर बनाओ आंदोलन’ जन्माला आलं आणि इथल्या कार्यकर्त्यांनी मेधाताईंशी संपर्क साधला. तेव्हापासून मेधाताई इथल्या लोकांशी जोडल्या गेल्या आहेत. घराचा हक्क, घरासाठी जमिनीचा हक्क आणि त्यासाठी इथल्या लोकांची चालू असलेली लढाई – हा एक वेगळाच विषय आहे. पण मंडालातल्या काही लोकांशी प्रत्यक्ष बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की मेधाताईंच्या शहरातल्या गरीबांबरोबर असणा-या कामाविषयी मला तितकीशी माहिती नाही. ‘नर्मदेचा परिसर सोडून मुंबईत काय मेधाताई निवडणूक लढवताहेत’ असा एक प्रश्न मला पडला होता – त्याचं उत्तर मिळायला सुरुवात झाली ती मंडालामध्ये!

इथं केजरीवाल, मेधाताई वगैरे मंडळी आली, त्याचं जोरदार स्वागत झालं, ते सोडून आम्ही पुढे निघालो.

आण्णाभाऊ साठे नगरात पुन्हा तशीच गर्दी. पुतळ्याजवळ उभं राहून एक तरुण मोठमोठ्याने सामाजिक गीतं म्हणत होता. वातावरण उत्साहाने भारलेलं होतं. “चार वाजल्यापासून आम्ही इथं उभे आहोत” असं एकाने मला सांगितलं. हातावर पोट असणारी ही माणसं; आज अर्धा दिवस काम सोडून आली असणार. त्यातल्या एक-दोघाशी मी बोलले. मेधाताई उमेदवार आहेत; त्या ‘आप’कडून उभ्या आहेत; ‘आप’चं निवडणूक चिन्ह ‘झाडू’ आहे; आज केजरीवाल येणार आहेत – अशा गोष्टी त्यांना बरोबर माहिती होत्या. इथंही ‘घर बचाओ, घर बनाओ आंदोलन’ सक्रीय आहे. इथं सुमारे साडेतीन हजार झोपड्या आहेत. सहा वर्ष आंदोलन सक्रिय असताना इथं मे २०१० मध्ये ४०० झोपड्या तोडल्या गेल्या, १०० झोपड्या जाळून खाक झाल्या. इथल्या लोकांनी त्याच्या विरोधात, राहण्याचा हक्क मिळवण्यासाठी आठवडाभर धरणं धरलं होतं आणि नंतर श्रमदानाने घरांची पुन्हा उभारणी केली होती. या काळात मेधाताई आण्णाभाऊ साठे नगरातल्या रहिवाशांसोबत होत्या. खेड्यात जगायची सोय नाही, म्हणून माणसं शहरात ढकलली जातात आणि शहरही त्यांना बाहेर ढकलायला पाहतात तेव्हा त्यांनी जायचं कुठं हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. ही संख्या थोडीथोडकी नाही हे आज पुन्हा जाणवलं.

या रस्त्यावर अशी झोपड्यांची मोठी संख्या असलेली अनेक नगरं आहेत – रफिक नगर, संजय नगर, इंदिरा नगर अशा १९ वसाहती या परिसरात आहेत. ‘घर बचाओ घर बनाओ आंदोलन’ हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे, त्यामुळे त्याबद्दल जास्त लिहित नाही. मेधाताईंच्या बरोबर गेली दहा वर्ष काम कलेले अनेक लोक इथं आहेत आणि या भागाच्या प्रश्नांची मेधाताईंना माहिती आहे हे कळणं मला दिलासा देणारं होतं.

इथं केजरीवाल आणि मेधाताई यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हार घातला. पण केजरीवाल लोकांशी बोलले मात्र नाहीत काही.

इथून आता रॅलीत सामील होणं अवघड व्हायला लागलं. एक तर रॅलीत वाहनांची संख्या मर्यादित असते, त्यामुळे वाहनातून जाणं शक्य नव्हतं. चालत जायचं म्हटलं तर अंतरं जास्त होती. दुपारी चार साडेचार किलोमीटर चालले होते आधी तरी चालायला माझी काही हरकत नव्हती. पण केजरीवाल जर काही बोलणार नसतील लोकांशी तर उगीच त्यांच्या पाठी फिरण्यात काही अर्थ नव्हता. मी लोकांशी बोलत होते तोवर केजरीवाल आणि त्यांची रॅली दूर निघूनही गेली होती. मी आणि एक मित्र चालत थोडे पुढे आलो तर रॅली दिसली.

पण गंमत म्हणजे इथं ‘टोप्या’ दिसत नव्हता ‘आप’ च्या. थोडं जवळ आल्यावर घोषणा ज्या ऐकू आल्या त्या आश्चर्यजनक होत्या. कारण लोक ‘केजरीवाल हाय हाय’, ‘केजरीवाल वापस जाओ’ अशा घोषणा देत होते.

black flags

मित्राने डोक्यावरची टोपी घाईने काढून खिशात टाकली – आम्ही आणखी जवळ गेलो. साधारण ७० ते ८० लोक होते केजरीवाल यांच्या विरोधात घोषणा देणारे. त्यांच्या हातांत काळे झेंडेही होते. पुरेसे पोलीस त्यांच्या आगेमागे होते आणि केजरीवाल दिसतही नव्हते इतके पुढे गेले होते. रस्त्यावरच्या एका माणसाने सांगितलं की ‘कॉंग्रेस समर्थक आहेत’ पण पुढे एका पोलिसाने ‘समाजवादी पक्षाचे लोक आहेत’ असं सांगितलं. कदाचित दोघेही असतील. या मोर्चाबद्दल मी नंतर एका ‘आप’ कार्यकर्त्याला सांगत होते तर तो म्हणाला, “दीदी, पाच दस लोग चिल्ला रहे थे’. पण मीच सत्तर ऐशी लोक पहिले होते. विरोधाला खिजगणतीत घ्यायचं नाही याबाबत ‘आप’चे लोक तयार झालेले दिसताहेत इतर प्रस्थापित पक्षांसारखेच! आणि ते मला पुरेसं चिंताजनक वाटलं.

दुपारी झाला होता तसा ट्रॅफिक जाम इकडे नव्हता – फार तर दहा मिनिटं उशीर होत असेल लोकांना. रस्ते पुरेसे रुंद आहेत आणि स्थानिक लोकांची वाहने नाहीत यामुळे जाम झाला नसावा. शिवाय रॅलीत फारसे लोक नसावेत असाही त्याचा एक अर्थ होतो. आम्ही अर्धा तास असेच चालत राहिलो. कशी दिसली मला मुंबई?

mumbai

फुटपाथवरचे पॉटहोल्स; रस्त्यावर तुंबलेली गटारं; त्याच्या कडेला असलेली दुकानं; फुटपाथवर मानवी विष्ठेचे अंश विखुरलेले; तिथंच मुत्रविसर्जन करणारी मुले-पुरुष; भंगाराचे साठलेले ढीग; त्यातून वाट काढणारी माणसं. हे शहर आहे? ही आहे मुंबई? सामान्य सोयीही नाहीत इथल्या रहिवाशांसाठी. लाखो लोकांच्या वस्तीत शौचालयं नसतील तर लोक रस्त्यावरच आपली सोय पाहणार ना? त्यांच्या वागण्याचं समर्थन नाही – पण नागरी सुविधा, शहरांची वाढ, शहरांचा विकास – हा राजकीय निर्णयप्रक्रियेचा भाग झाला पाहिजे. देशातली ४५% जनता आता शहरांत राहते हे वास्तव लक्षात घेऊन आपले शहरी नियोजन झाले पाहिजे. शहरी विकासाबद्दल राजकीय पक्ष जाहीरनाम्यांत काय म्हणतात त्यावर जरा लक्ष ठेवायला हवं अशी मी मनात नोंद करून ठेवली.

रिक्षात बसून आम्ही कन्नमवारनगरला आलो. रिक्षावाल्याच्या मते ‘कदाचित कॉंग्रेसच बाजी मारेल अखेर’. तो गोरखपूरचा आहे, पण आता गेली वीस वर्ष मुंबईत आहे. ‘मतदान कुठे आहे तुमचं’ या माझ्या प्रश्नावर तो मोघम काहीतरी उत्तरला. ‘मतदान कुणाला करायचं ते अजून ठरवलं नाही’ म्हणाला. ‘काय पाहून मतदान करणार’ या प्रश्नावर त्याच्या मते ‘महागाई कमी करा’ एवढा एकच महत्त्वाचा मुद्दा होता. ‘कॉंग्रेसने वाट लावली देशाची’ असं म्हणून ‘मुलायमजी भी कुछ कम नही है हमारे’ असंही म्हणाला. ‘इतक्या आधी लोक ठरवत नाहीत हो मत कुणाला द्यायचं ते’ असंही त्याने मला सांगून टाकलं. “केजरीवाल उम्मीद जगा तो रहे है, पर जितायेंगे उनको तो जिम्मेदारी निभायेंगे क्या?” या त्याच्या प्रश्नावर निरुत्तर होण्याची वेळ माझ्यावर आली.

आम्ही सभास्थानी पोचलो तोवर सभा सुरु झाली होती. लोक खुर्चीत शिस्तीत बसले होते. दोन्ही बाजूंना असंख्य लोक उभे होते. ‘आप’चे राज्यातले इतर उमेदवारही आले होते. ठाण्याहून संजीव साने, नाशिकचे विजय पांढरे, बीडचे नंदू माधव इत्यादी.

मेधाताईंचं भाषण चांगलं झालं; मला आवडलं आणि श्रोत्यांचाही प्रतिसाद चांगला होता. मयंक गांधी “प्रत्येकाला दोन बाथरूम असलेलं ४५० चौरस फुट घर देऊ” असलं काहीतरी विनोदी बोलले. केजरीवाल साहेबांचं भाषणं प्रसारमाध्यमांत तुम्ही वाचलं-ऐकलं असेलच – म्हणून त्याबद्दल लिहित नाही काही. पण एकंदर त्यांच्या भाषणाचा सूर अत्यंत ‘आत्मकेंद्रित’ वाटला मला. दिल्लीतल्या ४९ दिवसांच्या त्यांच्या सरकारच्या कामाबद्दल ते बोलले (चांगलं), मोदींबद्दल अर्थातच बोलले (वाईट), अंबानींबद्दल बोलले (वाईट). एकूण नवं काही नव्हतं. आपण ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलोय त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलावेत इतकं सौजन्यही त्यांनी दाखवलं नाही. मेधाताईंचा उल्लेख त्यांनी एकदाच केला तोही ‘मेधा पाटेकर’ असा. आपल्या उमेदवाराचं नावही नीट माहिती नसणारा हा कसला नेता? शिवाय मेधाताई काही ‘अनोळखी’ नाहीत. एकंदर दिवसभर मला केजरीवालांचा ‘डिसकनेक्ट’ जाणवत राहिला.

विक्रोळी सभेला किती लोक होते?

vikroli

एका आडव्या रांगेत वीस खुर्च्या होत्या. अशा किमान शंभर रांगा असाव्यात. म्हणजे साधारण दोन हजार लोक झाले. रांगा जास्त असतील तर जास्तीत जास्त तीन हजार. पाचेकशे लोक जमिनीवर बसले होते. हजार लोक इकडेतिकडे उभे होते. असा सगळा हिशोब धरला तरी सहा हजारांवर संख्या जात नाही. यातले निम्मे अधिक ‘आप’चे पक्के लोक होते – काही कुतूहल म्हणून आले असतील, काही पत्रकार असतील, काही साध्या वेशातले पोलीस असतील. शिवाय इतर गावांतून आलेले आमच्यासारखे लोक असतील. शंभर जागांवर आम्ही निवडून येऊ असं केजरीवाल कितीही म्हणोत, मुंबईत मेधाताई वगळता उरलेल्या दोन उमेदवारांची विजयाची शक्यता नाही हे त्यांना कळायला पाहिजे. मेधाताईंचाही विजय होईलच असं मी गृहित धरत नाही आत्ता, त्यासाठी मला अधिक फिरायला लागेल त्यांच्या मतदारसंघात. पण एक नक्की त्यांचं मतदारसंघात काम आहे; निवडणूकीच्या आधीपासून काम आहे; लोकाशी त्यांचं नातं आहे. हे मतांत रुपांतरीत कसं करायचं हे आव्हान आहे त्यांच्यापुढे!

सभा संपली. व्यासपीठावर नेत्यांना भेटायला गर्दी जमली. ‘ज्यांची ओळख आहे त्यांनी नका भेटू आत्ता ताईंना, नव्या लोकांना भेटू द्या त्यांना’ असं त्यांचे कार्यकर्ते सांगत होते, जे योग्य वाटलं मला. मग आम्ही काहीजण मेधाताईंच्या घरी गेलो. तिथं रात्री अकरा ते बारा-सव्वाबारा बोलणं झालं, जेवण झालं, उद्याच्या कामाची रूपरेषा ठरली आणि रात्री साडेबारा वाजता आम्ही बाहेर पडलो.

मुंबई केजरीवाल यांच्या पाठीशी उभी आहे का? मुंबईने केजरीवाल यांना स्वीकारले आहे का? केजरीवाल यांच्याकडून मुंबई काय अपेक्षा करते आहे? मुंबईचा कौल काय आहे? अशा अनेक प्रश्नांची पूर्ण उत्तरं नाही मिळाली दिवसभरात पण काही संकेत जरूर मिळाले. या संकेतातून ‘आप’ ने काही घेतलं आहे का – याचं उत्तर कालांतराने मिळेल. ‘आप’साठी बरेच मुद्दे आहेत; पण ‘आप’ची शिकायची तयारी मात्र पाहिजे! वास्तविक ‘आप’ने सामाजिक जाण आणि अनुभव असलेले अनेक उमेदवार उभे केले आहेत. त्यातले काही निवडून आले तरी सध्या केजरीवालकेंद्रित असलेले ‘आप’ अधिक समाजाभिमुख होईल याची मला खात्री आहे. पाहू मुंबई काय कौल देतेय ते!

प्रतिक्रिया

ढब्बू पैसा's picture

26 Mar 2014 - 6:22 pm | ढब्बू पैसा

हे रिपोर्ताज शैलीतील लि़खाण आवडतंय. माध्यमांच्या प्रचंड केऑस मध्ये असं इतकं तटस्थ, शांत आणि थेट लिखाण वाचायला मिळणं अत्यंत सुखद आहे. पुढच्या भागांची उत्सुकता आहेच :)

अतिशय सहमत. वस्तुस्थितीची जाणीव पटकन येते.

प्रचेतस's picture

26 Mar 2014 - 6:34 pm | प्रचेतस

लिखाण आवडतेय.

सुहास झेले's picture

26 Mar 2014 - 11:43 pm | सुहास झेले

सहमत.... मस्त लिहिलंय :)

आदूबाळ's picture

27 Mar 2014 - 7:22 pm | आदूबाळ

+४

तटस्थ आणि बिनरंगी वाचायला मिळायचं कमी झालंय हल्ली. वाचत आहे.

जयनीत's picture

26 Mar 2014 - 6:25 pm | जयनीत

' what come's with power gose with it ' हे विधान किती खरं आहे हे मागील काही दिवसां मध्ये प्रकर्षाने जाणवले.
दिल्ली मध्ये आप च्या सरकारने राजीनामा दिल्यावर अनेक लोकांचे मत त्यांच्या विषयी बदलले. आता त्यांच्या सोबत जे ही लोक आहेत ते संख्येने कमी असले तरी महत्वाचे आहेत. लोकप्रियतेच्या लाटा येत जात राहतात. पण मूळ मुद्या वर सहमत असलेले लोकच पुढे टिकून राहतील. कुठलाही पक्ष उभा राहतो तेव्हा ज्या प्रक्रियेतुन त्याला जावे लागते तो आप साठी सध्याचा काळ आहे. आप कडून जास्त अपेक्षा आहेत तेव्हा झालेल्या चुकांमधून शिकून हा पक्ष शिकेल अन वाढेल हीच अपेक्षा आहे. पारंपारीक पक्षांच्या काही चांगलया गोष्टी आप ने नक्की घ्याव्यात पण मात्र पूर्णपणे त्यांच्या सारखे आपने होउ नये हेच वाटते.

नेहमीप्रमाणेच उत्तम लिहिताय. वाचते आहे..

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Mar 2014 - 6:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकांगी बोलणं, लिहीणं आणि रिपोर्टींग यांच्या भाउगर्दीत हे संतुलित, विश्वासू लिखाण प्रकर्षाने उठून दिसते ! सर्व भाग वाचले, सर्व आवडले हेवेसांनल.

मूकवाचक's picture

26 Mar 2014 - 6:57 pm | मूकवाचक

+१

प्यारे१'s picture

26 Mar 2014 - 7:10 pm | प्यारे१

+२

शिद's picture

27 Mar 2014 - 6:12 pm | शिद

+३

आत्मशून्य's picture

26 Mar 2014 - 7:16 pm | आत्मशून्य

कुल लिखाण.

सध्या केजरीवालकेंद्रित असलेले ‘आप’

हा मलाही डाचत असलेला मुद्दा. सध्याचे निवडणुकीचे वातावरण, भारतीय व्यक्तीपुजक मानसिकता, केजरीवालांचे चाललेले स्लेजिंग ह्यामुळे सध्या हे अपरिहार्य आणि आआपसाठी लाभदायक असेल, पण लांब टप्प्यात ह्या मुद्द्याकडे आआप लक्ष देईल अशी आशा वाटते.
मेधाताईचे मानखुर्द आणि बांद्रा परिसरातले काम ठाऊक होते. गेली ४-५ वर्षे तरी विधानसभा अधिवेशनाच्या वेळी त्या ह्या मुद्द्यांवर धरणे, उपोषणे करत आहेत. पण मानखुर्द, मुलुंड एकाच मतदारसंघात येते हे ठाऊक नव्हते. त्यामुळे त्या मुलुन्डमधून उभ्या राहिल्यात ह्याचे आश्चर्य वाटत होते, ते कोडे सुटले.

विकास's picture

26 Mar 2014 - 8:55 pm | विकास

हा भाग देखील मस्त आहे. आमच्या सारख्यांना तिथे नसताना देखील काहीतरी अनुभव मिळाला असे वाटले. त्याबद्दल धन्यवाद!

मेधाताईंचे भाषण मी तूनळीवर ऐकले होते. भाषण आवडले - एका समाजसेवेस आयुष्य वाहीलेल्या व्यक्तीचे म्हणून... पण ते बरखा दत्तने घेतलेल्या मुलाखतीतील राजकारणी मेधाताईंचे वाटले नाही तर जरा जास्तच भाबडे वाटले. इतकी भाबडी सामान्य जनता देखील नसते असे वाटते. अर्थात ते माझे निरीक्षण झाले. मेधाताईंवर टिका नाही. पण त्यातून मतदारांना मत देण्यासाठी प्रेरणा मिळेल असे वाटले नाही. वास्तवीक तुम्ही म्हणालात तसे मेधाताई आणि इतर सामाजीक जाण असलेले काही जर आपकडून देखील निवडून आले तर त्यांना वास्तवाची अधिक जाण येईल आणि त्यांच्या असण्याचा सांसदीय लोकशाहीत काही अंशी असेल पण नक्कीच फायदा होईल असे वाटते.

वास्तविक ‘आप’ने सामाजिक जाण आणि अनुभव असलेले अनेक उमेदवार उभे केले आहेत. त्यातले काही निवडून आले तरी सध्या केजरीवालकेंद्रित असलेले ‘आप’ अधिक समाजाभिमुख होईल याची मला खात्री आहे.

असेच होवो.
लिखाण आवडले हे वेसांनल.

पिशी अबोली's picture

27 Mar 2014 - 1:04 pm | पिशी अबोली

खरंच... हे वाक्य खूप खूप पटले...

खुप छान. मला ही वाक्ये खुप आवडली,
"आपण ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलोय त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलावेत इतकं सौजन्यही त्यांनी दाखवलं नाही. मेधाताईंचा उल्लेख त्यांनी एकदाच केला तोही ‘मेधा पाटेकर’ असा. आपल्या उमेदवाराचं नावही नीट माहिती नसणारा हा कसला नेता? शिवाय मेधाताई काही ‘अनोळखी’ नाहीत. एकंदर दिवसभर मला केजरीवालांचा ‘डिसकनेक्ट’ जाणवत राहिला."

पण ईशान्य मुंबई मतदारसंघात ते संध्याकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ असे चार तास असणार होते – म्हणजे ईशान्य मुंबईत विजयाची संधी जास्त आहे असा निष्कर्ष ‘आप’मधल्या जबाबदार लोकांनी काढला आहे का? जरा कुतूहल वाटत राहिलं मला या नियोजनाबद्दल.

अर्थात, आनि ते योग्यही असावे असे वाटते.

जर आपचे उमेदवार पाहिले, मेधाताई काय, पुण्यातील वारे काय, ठाण्याचे संजीव साने काय अनेक जण मुळातच या व्यवस्थेने बाहेर हाकललेल्या म्हणा किंवा व्यवस्थेच्या तृटिंवर, व्यवस्थेवरच हल्ला करून अश्या तळातील लोकांसाठी लढणार्‍या व्यक्ती आहेत. ईशान्य मुंबईतील भांडुपसारखा भाग, मानखुर्द सारखा भाग इथे या नेत्यांबद्दल आकर्षण नसेल तरच नवल! आआपचा खरा अ‍ॅसेट हे वर्षानु वर्षे व्यवस्थेशी बाहुरून लढून पाहिलेले, लोकांसाठी खरोखर कोणतेही पद न स्वीकारता लढलेले उमेदवार आहेत.
केजरीवाल या पक्षाचा चेहराअसण्यापेक्षा एक खळ/गोंदाचं काम करताहेत इतंच त्यांचं महत्त्व आहे असे मला वाटते.

वास्तविक ‘आप’ने सामाजिक जाण आणि अनुभव असलेले अनेक उमेदवार उभे केले आहेत. त्यातले काही निवडून आले तरी सध्या केजरीवालकेंद्रित असलेले ‘आप’ अधिक समाजाभिमुख होईल याची मला खात्री आहे.

+१ अगदी अस्सेच म्हणतो.

आणि त्यासाठी जनतेनेही केजरीवाल/मोदी सारख्या बालीश व बाष्कळ लढतीतून बाहेर पडून आपल्या मतदारसंघात कोण उभे आहे, त्याचे काम काय हे बघायला हवे असे वाटते.
आपण निवडलेल्या उमेदवाराने नेहमी सरकारच बनवावे असे नाही. तुमचे मत तुम्ही चांगले विरोधक निवडण्यासाठीही देणे योग्यच आहे असे वाटते.

अजया's picture

27 Mar 2014 - 5:07 pm | अजया

अतिशय संतुलित लिखाण.

सखी's picture

27 Mar 2014 - 6:43 pm | सखी

संतुलित लिखाण आवडतयं, आत्ताच दोन्ही भाग वाचुन काढले.

अर्धवटराव's picture

28 Mar 2014 - 4:05 am | अर्धवटराव

संतुलीत लेखमालेचं हे पुष्प देखील आवडलं.

मेधाताई अत्यंत खमकी बाई. कुठुन एव्हढी एनर्जी येते देव जाणे. व्यवस्थेशी सदा वाकडं यांचं. कारणहि तसच. ज्या प्रश्नांना हि बाई भिडते तिथपर्यंत व्यवस्था पोचलेलीच नसते. पोचली तरी हुकुमनामा घेऊन. अशा लोकांना अगदी थेट निवडणुकीला उभं राहण्यापर्यंत व्यवस्थेत उतरावसं वाटलं याचं श्रेय सर्वस्वी आआपला, आणि अर्थात आआपच्या संस्थापकांना. असे नग (चांगल्या अर्थाने) यापुर्वी देखील राजकारणात उतरले होते. पण नेतृत्वाला ते पेलले नाहित. आआप या लोकांचा सांभाळ करु शकेल काय? आआपच्या सध्याच्या नेतृत्वाकडे बघितल्यास अगदी खात्री देता येत नाहि. पण एक चॅनल ओपन झालं आहे हे ही नसे थोडके. इन जनरल चित्र आशावादी आहे.
मेधाताईंना शुभेच्छा... आणि सावधगिरीचा इशारा देखील.

पैसा's picture

30 Mar 2014 - 5:07 pm | पैसा

खूपच छान लिहिलंय. मेधाताईंच्या धरणग्रस्तांबद्दलच्या कामाबद्दल प्रचंड आदर वाटला तरी अनधिकृत झोपडपट्ट्यातून त्याही सरकारी/खाजगी जमिनी बळकावून राहणार्‍या लोकांबद्दल मला तेवढी सहानुभूती वाटत नाही.

केजरीवाल यांच्याबद्दल तुमचं निरीक्षण परफेक्ट आहे. डिसकनेक्टेड.

मेधाताईंसारखी मंडळी राजकारणात येऊन राजकारण काही प्रमाणात स्वच्छ झालं तर उत्तमच. नाहीतर इतक्या चांगल्या माणसांना बुद्धिबळातली प्यादी म्हणून वापरलं जाईल आणि गेल्या निवडणुकीत शिशिर शिंदेंनी जी भूमिका निभावली तेच मेधाताईंच्या वाट्याला येईल अशी जास्त भीती वाटते आहे.

राही's picture

30 Mar 2014 - 7:37 pm | राही

संयत, समतोल आणि सम्यक नोंदी.(आणि सत्यही.)
लेखमाला अत्यंत आवडते आहे.

आतिवास's picture

30 Mar 2014 - 8:32 pm | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रोत्साहनपर शब्दांसाठी प्रतिसादकांचे आभार.

तुमचा अभिषेक's picture

30 Mar 2014 - 11:21 pm | तुमचा अभिषेक

+७८६

अन्यथा राजकारणावरचे एकतर्फी लेख नाहीच वाचवत, प्रतिसादांमध्येच रमतो, पण इथले प्रतिसाद वाचून लेख वाचावासा वाटला.

आप'कडे एका आशेने मी स्वता देखील बघत आहे, पण सध्या त्यांच्या खरेखोटेपणाचा काही अंदाज यावा अशी परिस्थिती नाहीये. तर दगडापेक्षा वीट मऊ म्हणत अबकी बार मोदी सरकार करावे की आप नावाचा ब्लांईड पत्ता ओपन करून बघावा या विचारात..

सुधीर's picture

31 Mar 2014 - 5:20 pm | सुधीर

मेघाताई निवडून येण्याच्या शक्यता कमी आहे असं मला वाटतं. गेल्या वर्षी हा सामना चुरशीचा झाला होता. संजय दिना पाटील(राष्ट्रवादी) यांनी शिषीर शिंदे (मनसे) आणि किरीट सोमय्या(भाजप) यांच्यावर थोड्याफार मतफरकाने विजय मिळवला होता. यावेळी मनसेने इथे उमेद्वार उभा केलेला नाही. या मतदार संघातला मुलुंड आणि घाटकोपर हा विभाग गुजराथीबहुल आहे. प्रादेशिक अस्मितेवरून राजकारण करण्याला मेघाताईंचा विरोध आहे. किरीट सोमय्यांच्या मतांची हिस्सेवारी कमी होणार नाही असं गृहीत धरलं तर, प्रादेशिक अस्मितेच्या बाजूने मनसेला कौल देणारी जनता कोणाच्या पारड्यात किती मत टाकते आणि पाटील यांची किती मतं मेघाताई फोडतात यावर या सगळं गणित अवलंबून आहे. माझ्या मते मनसेची २०-३०% मतं किरीटभाईंना मिळाली तर त्यांच पारडं जड होईल. न जाणो शेवटी हे राजकारण आहे, मेघाताईंनी आपल्या इमेजमुळे वा केजरीवालच्या गोरीला अ‍ॅटॅक स्ट्रॅटेजीमुळे सोमय्या यांचीच मत फुटली तर सामना पूर्ण फिरेल पण ती शक्यता फारच कमी आहे.

केजरीवालचं डिस्कनेक्ट असणं अपेक्षित असंच आहे. त्याला कारणीभूत त्याची पक्षउभारणी आणि पक्षबांधणीचं अपारंपारीक मॉडेल असावं असं मला वाटतं. पण त्यामुळेच त्याला इतक्या कमी वेळात ३५० उमेदवार उभे करता आलेत.

हाडक्या's picture

2 Apr 2014 - 8:24 pm | हाडक्या

पुभाप्र