१९९६ माऊंट एव्हरेस्ट - १

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in भटकंती
12 Mar 2014 - 2:35 am

माउंट एव्हरेस्ट !

पृथ्वीच्या पाठीवरचं सर्वात उंच गिरीशिखर असलेल्या एव्हरेस्टचं आकर्षण जगभरातील सर्वच गिर्यारोहकांना असतं. १९२२ सालच्या पहिल्या एव्हरेस्ट मोहीमेपासून आजतागायत अनेकांना त्याचा मोह आवरता आलेला नाही. या वेडापायी कित्येकांनी आपले प्राण गमावलेले आहेत, कित्येकजण हात-पाय गमावून कायमचे जायबंदी झालेले आहेत, पण तरीही त्याचं आकर्षण अबाधित आहे.

गेल्या काही वर्षांत गाईड आणि शेर्पांच्या संगतीने गिर्यारोहणाचा फारसा अनुभव नसलेले अनेक लोकही एव्हरेस्टवर जाऊन पोहोचले आहेत. एकप्रकारे एव्हरेस्टचं हे व्यावसायिकरणच आहे. पर्वतावर कोणतंही संकट कधीही उद्भवण्याची शक्यता असते. अशा वेळी अननुभवी गिर्यारोहकाची जबाबदारी ही गाईड आणि शेर्पा यांच्यावर येऊन पडते. स्वतः सुखरूप खाली येणं आणि अशा अननुभवी गिर्यारोहकाला खाली आणणं अशा दुहेरी कामगिरीत अनेक गाईड आणि शेर्पांनीही आपले प्राण गमावलेले आहेत. पण एव्हरेस्टच नव्हे, ८००० मीटरवरच्या सर्वच पर्वतशिखरांवर ही समस्या वाढत चाललेली आहे.

१९९६ सालच्या मे महिन्यात वेगवेगळ्या अनेक मोहीमांतील गिर्यारोहक नेपाळमध्ये एव्हरेस्टच्या पायथ्याशी तळ ठोकून होते. रॉब हॉलची अ‍ॅडव्हेन्चर कन्सल्टंट, स्कॉट फिशरची माउंटन मॅडनेस या व्यावसायिक कंपन्यांचा त्यात समावेश होता. त्याशिवाय आयमॅक्स मोहीम, तैवान सरकार पुरस्कृत मोहीम, जोहान्सबर्गच्या संडे टाईम्स पुरस्कृत पहिली दक्षिण आफ्रीकन मोहीम आणि अनेक एकांडे शिलेदारही सागरमाथ्यावर चढाई करण्यास अनुकूल हवामानाची वाट पाहत होते. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीसांची एक तुकडी तिबेटच्या बाजूने चढाईच्या तयारीत होती.

१०-११ मे रोजी यापैकी अनेक मोहीमांतले गिर्यारोहक एव्हरेस्टच्या चढाईवरून परतताना त्यांना एका अत्यंत घातकी हिमवादळानं गाठलं ! अ‍ॅडव्हेन्चर कन्सल्टंट मोहीमेतील चार, माऊंट्न मॅडनेस मोहीमेतील एक आणि इंडो-तिबेट्न बॉर्डर पोलीसांपैकी तीन गिर्यारोहक या हिमवादळात मृत्युमूखी पडले. त्या संपूर्ण मोसमात बारा जणांनी एव्हरेस्टवर आपले प्राण गमावले.

या दुर्घटनेतून वाचलेल्या अनेकांनी आपापल्या दृष्टीकोनातून या घटनेचं वर्णन करणारी पुस्तकं लिहीली. जॉन क्राकुअरचं 'इन टू थिन एअर', अनातोली बुकरीवचं 'द क्लाईंब : ट्रॅजीक अ‍ॅम्बीशन्स ऑन एव्हरेस्ट', लेनी गॅमलगार्डचं 'माय जर्नी होम फ्रॉम एव्हरेस्ट' ही त्यापैकी काही प्रसिध्द पुस्तकं.

या दुर्घटनेचं वर्णन करणारी ही लेखमाला. थोडीशी एव्हरेस्टच्या इतिहासाचीही..

( टीप :- हा अनुवाद नसून या दुर्घटनेचं वर्णन करणारं कथानाक आहे. वर उल्लेखलेल्या आणि या विषयावरच्या इतर अनेक पुस्तकांचा आणि लेखांचा केवळ संदर्भ म्हणून मी वापर केलेला आहे. जे काही तपशील निसटले असतील तो दोष सर्वस्वी माझा आहे )

***************************************************************************************

१८५२ सालची गोष्ट.

डेहराडून इथल्या आपल्या ऑफीसात बसून हिंदुस्थानचे सर्व्हेयर जनरल अ‍ॅन्ड्र्यू वॉ आपलं काम करत होते. त्याच वेळी धावत आलेल्या एका व्यक्तीने एक अत्यंत महत्वाची बातमी त्यांच्या कानावर घातली. कलकत्त्याच्या राधानाथ सिकदर यांनी गणिती पध्दतीने पृथ्वीवरच्या सर्वात उंच गिरीशिखराची नेमकी उंची शोधून काढली होती. नेपाळच्या सीमेवर असलेलं आणि १५ क्रमांकाने ओळखलं जाणारं शिखर समुद्रसपाटीपासून तब्बल २९००२ फूट उंचं आहे हे त्यांनी सप्रमाण सिध्द केलं होतं ! सिकदरांनी गणन करण्यापूर्वी या शिखराबद्दल काही विशेष अशी नोंद सर्व्हे करणा-यांनी केली नव्हती. फक्त त्याचा माथा हा सतत ढगांनी आणि धुक्याने झाकलेला असतो हे त्यांना दिसून आलेलं होतं.

सिकदरांनी गणिताच्या सहाय्याने मापन केलेली १५ व्या शिखराची उंची सर्वमान्य होण्यास आणखी चार वर्षे गेली. त्यानंतर १८६५ साली वॉ यांनी आपले पूर्वाधीकारी जॉर्ज एव्हरेस्ट यांचं नाव शिखराला दिलं. शिखराच्या दक्षिणेच्या स्थानिक नेपाळी लोकांमध्ये देवधुंग ( देवाचं स्थान ) आणि उत्तरेच्या तिबेटी लोकांमध्ये जोमोलंगमा ( देवी, जगाची माता ) अशी नावं शेकडो वर्षांपासून प्रचलीत होती. परंतु नेपाळ आणि तिबेट या दोन्ही देशांत त्या काळी पाश्चात्यांना प्रवेशबंदी होती, त्यामुळे या मूळ नावांची वॉ याना काहीच कल्पना नव्हती. एकदा एव्हरेस्ट नाव शिखराला देण्यात आल्यावर तेच रूढ झालं.

एव्हरेस्ट हे पृथ्वीच्या पाठीवरचं सर्वात उंच शिखर आहे हे जाहीर झाल्यावर जगभरातील गिर्यारोहकांची ते पादाक्रांत करण्यासाठी धडपड सुरू झाली. १९०९ मध्ये रॉब पेरी ने उत्तर धृव आणि १९११ मध्ये रोनाल्ड अ‍ॅमंडसेनने द्क्षिण धृव गाठल्यावर पृथ्वीवरचं मानवाने विजय न मिळवलेलं एकमात्र स्थान म्हणजे एव्हरेस्ट हेच होतं. साहजिकच एव्हरेस्टचा माथा गाठण्यासाठी चढाओढीला सुरवात झाली.

१९२१ मध्ये तिबेट सरकारने पाश्चात्यांना आपल्या सीमा खुल्या केल्या. साहजिकच सुरवातीच्या सर्व मोहीमा या तिबेटमधून आखण्यात आलेल्या होत्या.

१९२१ सालच्या पहिल्या मोहीमेत एडवर्ड व्हीलरला पूर्व रॉन्गबुक ग्लेशीयरचा शोध लागला. ग्लेशीयरवरुन जाणा-या मार्गाने २३ सप्टेंबरला जॉर्ज मॅलरी एव्हरेस्ट पर्वताच्या पायथ्याशी पोहोचणारा पहिला गिर्यारोहक ठरला. मॅलरी, व्हीलर आणि बुलॉक ७०२० मीटरवरच्या नॉर्थ कोलवर पोहोचले, परंतु वादळाच्या झंजावातामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. १९२२ सालच्या दुस-या मोहीमेत मॅलरी, हॉवर्ड समरवेल, एडवर्ड नॉर्टन आणि हेन्री मोर्शेड यांनी विक्रमी ८२२५ मी ( २६९८५ फूट ) उंची गाठली. पाठोपाठ जॉर्ज फिंच आणि जेफ्री ब्रूस ८३२६ मी वर पोहोचले, पण अतीश्रमांमुळे ते परत फिरले. मॅलरी, समरवेल, फिंच यांचा तिसरा प्रयत्न हिमप्रपातात (अ‍ॅव्हलॉन्च) सात शेर्पांचा बळी गेल्यावर अर्ध्यात सोडून सर्वांनी मोहीम आवरती घेतली.

१९२४ सालच्या तिस-या मोहीमेसाठी पैशांची जुळवाजुळव करण्याच्या हेतूने मॅलरी अमेरिकेत व्याख्यानांच्या दौ-यावर गेला होता. या दौ-यावरच एका वार्ताहराने मॅलरीला विचारलं

" एव्हरेस्ट चढावं असं तुला का वाटतं ?"
" कारण ते आहे म्हणून !"

मॅलरीचं हे उत्तर गिर्यारोहणातील एक आख्यायिका बनलेलं आहे.

१९२४ साली मॅलरी पुन्हा एव्हरेस्टवर परतला. अडोतीसाव्या वर्षी एव्हरेस्ट चढून जाण्याची ही आपली शेवटची संधी आहे हे तो जाणून होता. मॅलरी आणि ब्रूस यांचा पहिला प्रयत्न ७७०० मी ( २५२६० फूट ) उंचीवर परत फिरावं लागल्यामुळे अयशस्वी झाला. दुस-या प्रयत्नात नॉर्टन आणी समरवेल यांनी ८५७० मी ( २८१२० फूट ) उंची गाठली.

मॅलरीने अ‍ॅन्ड्र्यू आयर्विनच्या साथीने तिसरा प्रयत्न करण्याचा निश्चय केला. ८ जून ला नोएल ओडेल दोघांच्या मागे निरीक्षकाच्या भूमिकेतून चढत असताना एका विशीष्ट क्षणी दुपारी १२.५० ला धुकं निवळलं आणि एव्हरेस्टच्या आग्नेय धारेवर दोन ठिपक्यांप्रमाणे मॅलरी आणि आयर्विन ओडेलच्या दृष्टीस पडले. नोएलच्या कल्पनेनुसार ते मार्गावरच्या दुस-या बर्फाळ पायरीच्या पायथ्यापाशी पोहोचेले होते. एव्हरेस्टचं शिखर नोएलने स्पष्ट पाहिलं होतं. आपल्या वेळापत्रकानुसार तब्बल पाच तास उशीर त्यांना झालेला होता. नोएल निरीक्षण करत असतांनाच धुक्याच्या आवरणात सर्व परिसर गडप झाला.

मॅलरी आणि आयर्विन आपल्या कॅंपवर परतले नाहीत. ते एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचण्यात यशस्वी झाले की नाही हा गिर्यारोहणाच्या इतिहासातील अत्यंत वाद-विवादाचा विषय आहे.

१९४९ साली नेपाळने पाश्चात्यांसाठी आपल्या सीमा खुल्या केल्या. तिबेटमार्गे लांबलचक वळसा घालून एव्हरेस्टचा पायथा गाठण्याची आता गरज उरलेली नव्हती.

१९५२ सालच्या स्विस मोहीमेत रेमंड लॅम्बर्ट आणि तेनसिंग नोर्गे यांनी विक्रमी ८६११ मी ( २८२५१ फूट ) उंची गाठली. पण शिखरमाथा गाठण्यात त्यांना अपयश आलं. १७ वर्षांपूर्वी १९३५ सालच्या मोहीमेत तेनसिंग प्रथम एव्हरेस्टवर आलेला होता.

१९५३ सालच्या ब्रिटीश मोहीमेत एडमंड हिलरी आणि तेनसिंग यांनी २७९०० फुटांवरच्या कँपमधून अंतिम चढाईस सुरवात केली. ९ वाजता ते साऊथ समिटला पोहोचले. साऊथ समिटवरून माथ्याकडे जाणारी सुरीच्या धारेसारखी धोकादायक वाट ओलांडून ते बारा मीटर उंचीच्या प्रचंड दगडी पायरीशी पोहोचले. सुमारे चाळीस फूट उंचीच्या या दगडी पायरीने त्यांची वाट अडवली होती. पायरीच्या एका बाजूला असलेली खाच आणि बर्फाची भिंत यात हिलरी शिरला आणि इंचा-इंचाने वर सरकत अखेर त्याने त्या पायरीचा माथा गाठला ! पाठोपाठ तेनसिंग वर पोहोचला. हिलरीच्याच शब्दांत सांगायचं तर,

" अखेरीस एकदाचा मी त्या खाचेतून बाहेर पडलो आणि वरच्या दगडावर आडवा झालो. त्या क्षणी माथ्यावर पोहोचण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही ही मला जाणिव झाली. मी भक्कमपणे पाय रोवून उभा राहीलो आणि तेनसिंगला वर येण्याची खूण केली. कपारीतून अंग चोरत काही वेळातच तो माझ्या शेजारी येऊन पडला !"

काही वेळ दम खाऊन दोघं गिर्यारोहक पुढे निघाले. तिथून शिखरापर्यंतची वाट फारशी कठीण नव्हती. हिलरी लिहीतो,

" एकेक पाऊल सावधपणे टाकत आम्ही माथ्याकडे निघालो. एका बर्फाच्या टेकडीला वळसा घालून मी पलिकडे पाहीलं आणि दूरवर पसरलेला तिबेटचा विस्तीर्ण प्रदेश माझ्या दृष्टीस पडला ! आमच्य समोर एक लहानसं शिखर होतं. पायाखालच्या बर्फात कु-हाडीचे काही घाव घालून प्रत्येक पाऊल अधीक उंचीवर टाकत मी पुढे निघालो आणि काही वेळातच अधीक उंच जमिन उरलेली नाही असं माझ्या ध्यानात आलं ! माझ्या पाठोपाठच काही मिनीटांतच तेनसिंग येऊन पोहोचला ! "

२९ मे १९५३ - सकाळी ११.३० - एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे यांनी अखेर एव्हरेस्टवर विजय मिळवला !

राधानाथ सिकदरांनी एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर असल्याचं सप्रमाण सिध्द केल्यावर तब्बल १०१ वर्षांच्या कालावधीत पंधरा मोहीमा आणि चोवीस जणांनी आपले प्राण गमावल्यावर अखेर मानवाच्या धैर्य आणि चिकाटीसमोर एव्हरेस्टने मान तुकवली !

क्रमश :

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

12 Mar 2014 - 3:00 am | आत्मशून्य

.

खटपट्या's picture

12 Mar 2014 - 3:03 am | खटपट्या

अतिशय छान सुरवात

प्यारे१'s picture

12 Mar 2014 - 3:11 am | प्यारे१

भाषा शैली ओळखीची वाटतेय. एनीवेज. वेलकम टु मिपा.
उत्तम लिहीलंय.

>>>अखेर मानवाच्या धैर्य आणि चिकाटीसमोर एव्हरेस्टने मान तुकवली !

माणूस खरंच एवढा मोठा झालाय? अहो एव्हरेस्ट आहे ते. मान तुकवायला एखादा गल्लीतला नेता नाही. वरची शब्दरचना माणसाला सकारणच पण प्रमाणापेक्षा जास्त मोठं करतेय. निसर्गाला मान तुकवायला वगैरे लावू नये एवढंच म्हणणं आहे.
बघा ब्वा!

तुषार काळभोर's picture

12 Mar 2014 - 10:40 am | तुषार काळभोर

सहमत..!

आत्मशून्य's picture

12 Mar 2014 - 11:24 am | आत्मशून्य

विशेषत: न्वाग्तान्सोब्त.

स्पंदना's picture

12 Mar 2014 - 4:34 am | स्पंदना

मिपावर स्वागत आहे.

सुरवातच अगदी धुमधडाक्यात!!

अजया's picture

12 Mar 2014 - 8:07 am | अजया

छानच आहे पहिला भाग!येऊ देत आता तुझ्या मस्त लेखमालिका! पु.भा.प्र.

स्पार्टाकस's picture

12 Mar 2014 - 8:20 am | स्पार्टाकस

सर्वांचे मनापासून आभार..!!!

पुनर्वाचनातही आनंद मिळत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Mar 2014 - 11:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर स्वागत. वाचतोय.

-दिलीप बिरुटे

वेल्लाभट's picture

12 Mar 2014 - 12:00 pm | वेल्लाभट

सुप्प्प्पर ! :)

आंबट चिंच's picture

12 Mar 2014 - 12:53 pm | आंबट चिंच

खुप छान लेख.

सानिकास्वप्निल's picture

12 Mar 2014 - 3:05 pm | सानिकास्वप्निल

छान सुरुवात :)
पुभाप्र

केदार-मिसळपाव's picture

12 Mar 2014 - 3:18 pm | केदार-मिसळपाव

एकदम खतरनाक...
पु. भा. प्र.

अधीक उंच जमिन उरलेली नाही असं माझ्या ध्यानात आलं ! माझ्या पाठोपाठच काही मिनीटांतच तेनसिंग येऊन पोहोचला ! "

या बाबत थोडिशी मतभिन्नता.
कोण अगोदर पोहोचले या बाबत गुप्तता बाळगली होती. कारण एका अशियायी माणसाने गोर्‍या युरोपीय माणसाच्या पुढे जावे हे पाश्चात्य जगताला रुचणारे नव्हते.

स्पार्टाकस's picture

12 Mar 2014 - 7:52 pm | स्पार्टाकस

१९५३ साली एव्हरेस्टच्या चढाईनंतर हिलरी, हंट आणि तेनसिंग तिघांनी मिळून हिलरी-तेनसिंग एकदमच एव्हरेस्टवर पोहोचले असं सर्वांपुढे जाहीर केलं होतं. त्याबाबतची मतभिन्नता कायम राहिल्याने काही वर्षांनंतर तेनसिंगने हिलरी एव्हरेस्टवर प्रथम पोहोचल्याचं जाहीर केलं. हिलरीच्या 'फ्रॉम द समिट' या आत्मचरित्रात तसा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच या संदर्भातील तेनसिंगची मुलाखतही.

अत्रन्गि पाउस's picture

12 Mar 2014 - 8:01 pm | अत्रन्गि पाउस

खरे काय ते गुप्त ठेवायचे ठरले होते असे असतांना हिलैरे गेले असे नंतर जाहीर केले गेले हे जरा संशयास्पद वाटते...पुन्हा त्यातून
१. हिलैरेंना 'सर' पदवी
२. हिलैरे पाश्चात्य जगातले ...त्यांचा आर्थिक स्तर फार वेगळा
तेनसिंग ला दुय्यम स्थान (त्यामानाने) दिले जाते हे खटकते..

का हे माझे गैरसमज आहेत??
पुन्हा एकदा विषयांतराबद्दल क्षमस्व..
पु भा प्र

स्पार्टाकस's picture

12 Mar 2014 - 8:45 pm | स्पार्टाकस

मुळात हिलरी पाश्चात्य जगातील हा गैरसमज. हिलरी हा न्यूझीलंडचा होता.
हिलरी आणि मोहीमेचा प्रमुख जॉन हंट यांना सर ही पदवी देण्यात आली. हिलरीप्रमाणे तेनसिंगलाही सर ही पदवी देण्याची ब्रिटन सरकारची इच्छा होती. त्यावेळी तेनसिंग भारताचा नागरीक होता, परंतु पंतप्रधान जवाहरलाल नेहरुनी त्याला सर पदवी देण्यास नकार दिला म्हणून तेनसिंगला जॉर्ज मेडल देऊन गौरवण्यात आले. (जॉर्ज मेडल हा साहस आणि शौर्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च ब्रिटीश सन्मान आहे.)

मुळात हिलरी पाश्चात्य जगातील हा गैरसमज. हिलरी हा न्यूझीलंडचा होता.

=))

अहो तसं नाहीये ते. न्यूझीलंड अन ऑस्ट्रेलियात युरोपियन लोक आले त्यांपैकीच ना हे? त्यांची संस्कृती इ. सर्व काही पाश्चिमात्यच की.

अत्रन्गि पाउस's picture

13 Mar 2014 - 3:52 pm | अत्रन्गि पाउस

BATman भाऊंनी म्हटले तेच म्हणायचे आहे...
अच्छा म्हणजे खोडा आपण घातला तेनसिंगला सर पदवी देतांना...
असो !!

पैसा's picture

21 Mar 2014 - 7:51 pm | पैसा

खूपच छान आणि माहितीपूर्ण!