हा भाग मिपाकर "वल्ली" ह्यांना समर्पित..!!
कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १)
कान्हा नॅशनल पार्क - कुठे रहावे (भाग २)
कान्हा नॅशनल पार्क - काय पहावे (भाग ३)
कान्हा नॅशनल पार्क - वाघ....... (भाग ४)
"इथुन भोरमदेव कडे जातानाच्या रस्त्यावर...आणि आपण तिथे जायचचं.. तुला वाघ दाखवायचाच.."
इतका वेळ सोडुन दिलेल्या आशा परत पल्लवीत झाल्या..शांत झालेली डोक्यातली चक्रं परत फिरु लागली.. आणि एकच सवाल परत घुमु लागला..
"दिसेल का?"......
दुसर्या दिवशी सकाळी ६ पर्यंत मला १० वेगवेगळे प्लान ऐकवण्यात आले होते.. किंवा एकाच प्लानचे, नवरा आणि दादा आणि हॉटेलचा मॅनेजर आणि आजुबाजुचे गावकरी लोक आणि ड्रायव्हरने २-३ दिवसात जमवलेले मित्र ह्या प्रत्येकाकडुन १ असे १० व्हर्जन्स सांगण्यात आले..
पैकी दादा आणि नवरा सोडुन बाकीच्यांना समजलेला (किंवा ज्याने त्याने आपापल्या कुवतीने अर्थ काढल्याप्रमाणे) प्लान असा की सकाळी लवकर उठुन कुठल्या तरी एका रस्त्याला लागायचे कारण तो रस्ता म्हणे कोअर जंगला मधुनच जातो पण रात्रभर बंद असतो. सकाळी ६ ला दोन्ही बाजूंची गेट्स उघडतात. थंडीमुळे वाघ व इतर प्राणी दव आवडत नसल्याने त्या रस्त्यावर उबेला येऊन बसलेले असतील तर दिसतील.. पण आपण जर लवकर गेलो तरच हे शक्य आहे कारण एकदा का रहदारी सुरु झाली की प्राणी जंगलात निघुन जातील..
जिथे जंगलात ६ तास फिरुन वाघ दिसेल की नाही हे माहीत नव्ह्तं.. तिथे एका रस्त्यावर "कदाचित" वाघ येऊन बसला असेल आपली वाट पहात असं मला वाटत होतं.. मलाच नाही.. सगळ्यांनाच.. आणि मी, दादा, नवरा आणि बाबा चक्क नशिब आजमावायला निघालोही..!!
ह्यात उरलेल्या लोकांचा असा समज होता (किंवा करुन देण्यात आला होता..) की आम्ही २०-३० किमी जाणार, मग परत फिरणार. ९ च्या सुमारास परत हॉटेलला येऊन बाकीच्यांना घेऊन "कुठल्या तरी एका" मंदिरात जाणार.. म्हणजे त्यांच्या द्रुष्टिने ते लोक झोपेतुन उठायच्या आत तर आम्ही परत येणार होतो.. मलाही हेच वाटत होतं.. म्हणुन तर अबीरला सोडुन मी आणि नवरा निवांत निघालो..
सोबत हॉटेलचा वॉचमन घेतला, त्याला रस्ता माहित होता. मुबानी नाश्ता बांधुन दिला.. सकाळी ६ ला आम्ही निघालो.. थोड्यावेळात समजलं की आम्ही भोरमदेव कडे जात आहोत.. आणि हे फार प्रसिद्ध मंदिर आहे.. मुक्की गेट पासुन साधारण ८० किमी वरती.. मध्यप्रदेश आणि छ्त्तीसगढ च्या बॉर्डरवर... (म्हणजे ज्या "कुठल्या तरी" मंदिराच्या आशेनी बाकी प्रजा हॉटेलवर निवांत झोपली होती, आम्ही नेमेके त्याच दिशेने जात होतो...!!)
आत्तापर्यंत एकंदरीत मध्यप्रदेश बद्दल माझा जो काही समज झाला होता, त्या प्रमाणे भोरमदेव हे एक शेंदुर फासलेल्या दगडाचे ६ बाय १० चे मंदिर निघाले असते तरी मला अजिबात आश्चर्य वाटलं नसतं. कान्हा जवळच्या गावात एक नाग मंदिर आहे जिथे जिवंत नाग-नागिण कशाची तरी रखवाली करतात असं काल परवा पासुन २-४ जण सांगत होते. त्यामुळे "भोरमदेव हे जागृत देवस्थान आहे" ह्या वाक्याने माझ्यावर फारसा परिणाम झाला नाही.तसंही मला वेध वाघाचे लागले होते आणि वाघ दिसला नाही तर परत फिरायचं असं ठरलेलं असल्यानं मंदिर पहायचं वगैरे काही प्लान मध्ये नव्ह्तं..
पहाटेच निघालो.. अजुन अंधारच होता..डोळे फाडुन आजुबाजुला बघायला सुरवात केली..कुठं काही दिसतय का.. कुठे काही ऐकु येतंय का... हळु हळु उजाडायला लागलं होतं..
७- ७.३० पर्यंत चांगलच उजाडलं होतं..आम्हाला मोजुन १ हरीण आणि २७ माकडं दिसली होती..मध्येच कुरणं लागायची.. मध्येच जंगल..मध्येच हे काही मोर दिसले..
इथे मोरांपेक्षा रस्ता पहा कसाय ते...
मध्येच ह्या दोघांची जुंपली होती..
अधुन मधुन चेकपोस्ट लागत होते. प्रत्येक चेकपोस्ट वर मागच्या चेकपोस्टला केव्हा रिपोर्ट केलं ती वेळ तपासत होते. म्हणजे तुमचा वेग किती हे समजतं..कान्हा मध्ये एका ठिकाणाहुन दुसर्या ठिकाणी किती वेळात पोहोचायचं याचेही नियम आहेत. तुम्ही फार जोरात जाऊ शकत नाही किंवा कुठे जास्त थांबुही शकत नाही..रस्ते इतके वाईट आहेत की तसंही गाडी पळवणं अशक्य आहे..
जवळपास ९.३० होत आले होते.. खराब रस्त्यांनी काळ-काम-वेगाच गणित पार बिघडवलं होतं.. आम्ही आता वाघ दिसायची आशा सोडुन दिली होती..मला झोप येतं होती, भुक लागली होती..आता मला वाघ बिघ काही आठवत नव्ह्ता.. आपण फुकट फिरतोय ह्याची मला जाणिव झाली होती..
"बास आता..थांबवा कुठेतरी..खाऊन घ्या आणि चला परत" शेवटी मी शरणागती पत्करली
जवळच एक चेक्पोस्ट आले होते, तिथे थांबु, खाऊ आणि परत फिरु असं ठरलं. गाडी चेकपोस्टला थांबली. सहज म्हणुन तिथल्या अधिकार्याला "भोरमदेव" विषयी विचारले..
"अरे ते तर फारच सुंदर मंदिर आहे..दुरुन दुरुन लोक येतात पहायला..आता इथवर आला आहातच तर नक्की पहा.. २०-२५ किमी तर राहिलय आता.." अधिकारी फारच भक्तीभावानी म्ह्णाला..
मध्यप्रदेशात किमी वरुन किती तास लागतील हे गणित संपुर्ण बदलतं.. सकाळी ६ पासुन आम्ही निघालो होतो आणि ६० किमी कापायला आम्हाला ३-३.५ तास लागले होते..!!
"२०-२५ किमी म्हणजे अजुन १-२ तास..."
"छे छे.. आता मध्यप्रदेश बॉर्डर लागेल ना.. तिथुन पुढे रस्ते एकदम चांगले आहेत..फारतर पाऊण तासात जाल तुम्ही"
काय करायचं?? आम्ही अर्धी प्रजा हॉटेलमध्येच सोडुन आलो होतो.. त्यांना वाटत होतं की आम्ही आता येऊन त्यांना बाहेर नेणार आहोत.. पण आता मंदिराबद्दल इतकं ऐकलं होतं की एवढ्या जवळ येऊन ते पहायचं नाही म्हणजे मुर्खपणाच झाला असता.. शेवटी हॉटेलात परत गेल्यावर जे होईल ते बघुन घेऊ म्हणुन आम्ही भोरमदेव कडे निघालो..
मध्यप्रदेश सरकारचं रस्तेविषयक धोरण काय आहे ते जाऊन पहायला हवं एकदा.. मध्यप्रदेशची सीमा ओलांडली की रस्ते दुप्पट रूंद आणि चौपट गुळगुळीत होतात. इथेही तेच झालं.. त्यामुळे खरच तासाभरात आम्ही भोरमदेवला पोहोचलो..
भोरमदेव हे एक खुप जुने शिवाचे मंदिर आहे.. आणि ते खरंच फार सुंदर आहे.. एका भल्या मोठ्या आणि कमळांनी भरलेल्या तळ्याच्या काठी हे मंदिर आहे..
तळ्याकाठी एक मोठी बाग आहे.. आणि बाजुला टेकडीवर हे मंदिर आहे..
ही बागेचे प्रवेशद्वार..
समोरच हा मोठा नटराज उभा आहे..
हेच ते भोरमदेवचे प्रसिद्ध मंदिर..
त्या दिवशी काही कारणास्तव मंदिरात खुपच कडक सुरक्षा होती, जागो जागी पोलीस तैनात होते, आमच्या सोबत असलेल्या वॉचमनने नेमकी हॉटेलचा गणवेष , आर्मी मधल्या सैनिकांसारखा ड्रेस घातला होता.झालं... लग्गेच त्याला कोपर्यात घेऊन चौकशी सुरु.. तो बिचारा भांबावुन गेला.. आम्ही पण पळत पळत तिकडे गेलो.. हा आमच्या सोबत असलेला वॉचमन आहे, नक्षलवादी नाही हे पटवुन देता देता नाकी नऊ आले.. पण लोकांनी फक्त आम्ही पोलीसां सोबत बराच वेळ बोलतोय हे पाहिलं असावं.. शिवाय नवर्यानी जाता जाता समोरुन येणार्या पोलीसांच्या साहेबाला उगाच स्माईल दिली, ते पण हसले.. मग आजुबाजुचे अजुनच चौकस झाले.. त्यात आमच्या हातात मोठे मोठे कॅमेरे*.. मी भीत भीत फोटो काढत होते, नवरा आणि दादा मात्र दणादण फोटो काढत होते.. लगेच आजु बाजुच्यांनी चौकशी सुरु केली..
"कोण तुम्ही?"
"आम्ही एका मोठ्या वेबसाईट कडुन आलोय.. वेगवेगळ्या ठिकाणांविषयी माहिती आणि फोटो देतो म्हणजे टुरिस्ट लोक तिकडे जातात.." मी ठोकुन दिलं...
"होका... अरे वा वा..."
मग काय, थाप पचली आहे हे पाहुन मी पण धडाधड फोटो काढायला सुरुवात केली..
आणि अचानक माझ्या लक्षात आलं..
भोरमदेवचं मंदिर साधं सुधं मंदिर नसुन... चक्क "मिनी खजुराहो" आहे..!!!
"अरे...." मी विस्फारलेल्या डोळ्यांनी नवर्याकडे पाहुन चित्कारले..
"हो हो.. म्हणुनच सगळे लोक हे मंदिर पहाच म्हणुन आग्रह करत होते.. आता गप्प बस.."
आता ह्या जाणिवे नंतर मी काढलेले अर्धे फोटो मी ह्या लेखात टाकु शकत नाही ह्याची मला जाणिव झाली.. आणि जे हजारो वर्षांपुर्वी कुणी तरी दगडात कोरुन ठेवलय ते आपण २१ व्या शतकात जाहिर फोरम वर टाकायला कचरतो हे समजुन स्वतःचीच दया आली...
कान्हा ट्रिप प्लान करताना, मी ओढुन टाणुन "खजुराहो" ट्रिपमध्ये बसवायचा प्रयत्न करत होते, पण शेवटी खुप नाईलाजानी मला प्लान वर पाणी सोडावं लागलं होतं.. त्या दु:खावर भोरमदेव म्हणजे जबरदस्त मलम होतं!
ह्या मंदिराच्या बाजुलाच एक म्युझियम आहे.. तिथे काही शिप्ले ठेवली आहेत.. बहुदा ती उत्खननात सापडली असावीत.. ही शिल्पे देखील अत्यंत सुंदर आहेत..
अगदी तृप्त मनानी आम्ही मंदिरातुन बाहेर पडलो..! बाहेर येताच हॉटेल मधुन फोन यायला सुरवात झाली.. ११ वाजले होते आणि आम्ही हॉटेल पासुन ८० किमी वर होतो (मध्येप्रदेशातले ८० किमी..!!), अबीरनी गोंधळ घालायला सुरवात केली होती..बाकी बायकांना दिवस फुकट गेल्याची जाणिव झाली होती.. त्यांचा विश्वासघात झाल्यामुळे अगदी रणकंदन माजले होते.. आम्ही ताबडतोब परतीची वाट पकडली..
गाडी जंगलातुन पळत होती.. दादानी विचारलं..
"उद्याची सफारी मिळते का ते पहायचं का?"...
अरे हो की.. अजुन वाघ दिसलाच नव्हता...
"नको.. आता पुरे झालं..." मी शांतपणे डोळे मिटुन घेतले..
२-३ दिवसांपासुन चालु असलेला वाघाचा शोध मी शांत मनानी थांबवला होता...
* - कॅमेरा लय भारी असला तरी तो माझ्या हातात असल्याने फोटो यथा तथाच आहेत.. गोड मानुन घ्या..
वाचने
16261
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी अप्रतिम मंदीर आहे
छन फोटो.
सुरेख आहे मंदीर... आवडलं
मस्तच!
सुंदर
फोटो चांगले आलेत गं!
सुरेख. टिपिकल भूमिज.
भुमिज म्हणजे काय?
In reply to सुरेख. टिपिकल भूमिज. by प्रचेतस
भूमि म्हणजे मजला.
In reply to भुमिज म्हणजे काय? by पिलीयन रायडर
+१
In reply to सुरेख. टिपिकल भूमिज. by प्रचेतस
सुरेख फोटू. माहिती आवडली.
हे मंदिर चंदेलांनी बांधलंय का
१३% टु बी एक्झॅक्ट!!
In reply to हे मंदिर चंदेलांनी बांधलंय का by प्रचेतस
हे मंदिर चंदेलांनी बांधलंय का
In reply to हे मंदिर चंदेलांनी बांधलंय का by प्रचेतस
मैथुन शिल्पे सहसा तत्कालीन
In reply to हे मंदिर चंदेलांनी बांधलंय का by पिलीयन रायडर
आवडला .
छान वर्णन आणि फोटो !!!
धावत पळत वाचलाय.
तै,, ते बैल असं का करत आहेत?
In reply to धावत पळत वाचलाय. by स्पंदना
भ्रमंतीचे वर्णन आवडले.
छान आहे लेख ...आवडला ..+)
भाग आवडला. शिल्पे देखणी आहेत.
गोड राजाओ के देवता भोरमदेव थे जो कि शिवजी का ही एक नाम है|
In reply to भाग आवडला. शिल्पे देखणी आहेत. by डॉ सुहास म्हात्रे
आत मध्ये शिवाची पिंड होती आणि
In reply to भाग आवडला. शिल्पे देखणी आहेत. by डॉ सुहास म्हात्रे
सुरेखच दिसते आहे मंदिर! त्या
चुरचुरीत लेखन