प्रासंगिक कवितेला क्षणभंगुरतेचा शाप असतो. प्रसंग झाला की संदर्भ बदलतात आणि कविता मागे पडते. १९५२ च्या निवडणुकीवेळी विंदांनी ही कविता लिहिली. अगदी शेवटपर्यंत ते तिला "काही केल्या मरत नाही म्हणुन ही दुर्दैवी कविता आहे" असे म्हणत असत. ज्या दिवशी मरेल (लाक्षणिक अर्थाने) तो दिवस भारताचा सुदीन. या वेळी तरी ही कविता कालबाह्य होईल का?
“ सब घोडे बारा टक्के ”
जितकी डोकी तितकी मते; जितकी शिते तितकी भुते|
कोणी मवाळ, कोणी जहाल; कोणी सफेद, कोणी लाल|
कोणी लट्ठ, कोणी मट्ठ; कोणी ढिले कोणी घट्ट|
कोणी कच्चे, कोणी पक्के; सब घोडे बारा टक्के ||
गोड गोड जुन्या थापा; तुम्ही पेरा तुम्ही कापा |
जुन्या आशा नवा चंग| जुनी स्वप्ने, नवा भंग|
तुम्ही तरी करणार काय; आम्ही तरी करणार काय|
त्याच त्याच खड्डया मध्ये; तोच तोच पुन्हा पाय|
जुना माल नवे शिक्के; सब घोडे बारा टक्के ||
जिकडे सत्ता तिकडे पोळी
जिकडे सत्य तिकडे गोळी
जिकडे टक्के तिकडे टोळी|
ज्याचा पैसा त्याची सत्ता; पुन्हा पुन्हा हाच कित्ता|
पुन्हा पुन्हा जुनाच स्वार; मंद घोडा अंध स्वार|
यांच्या लाथा त्यांचे बुक्के; सब घोडे बारा टक्के ||
सब घोडे! चंदी कमी; कोण देईल त्याची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी; कोण देईल माझा हरी?
कोणी तरी“देईन” म्हणा; मीच फसविन माझ्या मना
भुकेपेक्षा भ्रम बरा; कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्र्या कोणी छक्के, सब घोडे बारा टक्के ||
प्रतिक्रिया
23 Feb 2014 - 7:04 am | मुक्त विहारि
पण विस्मरणात गेली होती.
इथे दिल्याबद्दल, धन्यवाद....
सेव्ह करून ठेवतो
23 Feb 2014 - 7:52 am | विकास
ही कविता वाचलेली नव्हती त्यामुळे त्याच्याबद्दलचा विंदांचा विषाद माहिती असणे शक्यच नाही. दोन्ही येथे सांगितल्याबद्दल धन्यवाद. वाचनखूण म्हणून साठवून ठेवली आहे.
मात्र इतकी सुंदर कविता केवळ त्यात दडलेल्या भ्रमनिरासामुळे (लाक्षणिक अर्थाने) मरावी असे वाटणे पटले नाही. लोकशाहीत हे कमीअधिक प्रमाणात होत असते. ते कमीत कमी होयला पाहीजे हे नक्कीच आणि त्यासाठी जनतेने जागृक आणि सक्रीय असणे महत्वाचे हे देखील नक्कीच!
त्यामुळे या कवितेचे मरण म्हणजे एकच घोडा सर्व टक्के घेत आहे, पक्षि: लोकशाहीचा अंत असा काहीसा होईल असे मला वाटते...
23 Feb 2014 - 9:05 am | आत्मशून्य
.
23 Feb 2014 - 11:29 am | आयुर्हित
शोधून प्रसिद्ध नेता, करा भ्रष्टाचाराचे आरोप,
खुर्ची वरून खाली खेचा, जनतेला निरोप,
सांगा कारणे साम दाम दंड आणि भेदाभेदी,
उडत गेली वाऱ्यावर जनता, आहेच मुळी वेडी!
तापवा तवा आरक्षणाचा, शेका मतांची पोळी,
आडवा येईल त्याला,कापा मारा घाला गोळी,
६० वर्ष झाले आता, नाही बिजली, रस्ता, पाणी,
होतात आत्महत्या शेतकऱ्यांच्या, रोज डोळ्यात पाणी!
23 Feb 2014 - 11:48 am | तिमा
कविता आवडली.
ज्या देशांत गुणवत्ता,मेरिट याला मह्त्व न देता इतरच बाबींना अवास्तव महत्व दिले जाते त्या देशांत कायम 'सब घोडे बारा टक्के' अशीच परिस्थिती रहाणार! त्यामुळेच तर ही कविता अजरामर आहे.
23 Feb 2014 - 12:12 pm | फारएन्ड
कविता चांगलीच आहे, पण १९५२ साली लिहीली हे वाचून आश्चर्य वाटले. अशी मते बनायला निदान काही निवडणुका, तीच आश्वासने व नंतर ती विसरणे ई. काही वेळा होऊन जायला हवे. १९५२ साली (स्वतंत्र) भारतातील पहिली निवडणुक झाली. निदान तेव्हा लोक खूप ऑप्टिमिस्टिक असतील असे वाटत होते :)
23 Feb 2014 - 12:49 pm | मराठीप्रेमी
ही कविता विंदा यांच्या आवाजात येथे ऐकता येइल. ३ मिनिटे ५५ सेकंदाला ही कविता सुरू होते.
1 Mar 2014 - 4:51 pm | पैसा
एका छान कवितेचे पुन्हा स्मरण करून दिलेत त्याचबरोबर व्हिडिओ सुद्धा मिळाला! धन्यवाद!