टेंडर

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
15 Feb 2014 - 9:30 am

टेंडर काढा....साहेब म्हणाले
त्या सरकारी कार्यालयाची भिंत
ओल पकडत होती गेले काही महीने
एक वेळ छप्पर गळकं असलं तरी चालतं
पण आधार देणा-या भिंतीच जर कमकुवत झाल्या
तर कसं चालेल...नाही का?
तर
टेंडर काढा...साहेब म्हणाले...भिंती रंगवून घेऊ
.
.
.
रंगारी आले मग
भिंत केली साफ
घड्याळ, कॅलेंडर, गांधीजींची तसबीर, नोटीस बोर्ड, चिकटवलेल्या नोटीसा, सुट्ट्यांची लीस्ट
सगळं सगळं काढलं
आणि दिला रंग छानसा
शेड तीच पण तरी छान वाटत होतं सगळ्यांना
घड्याळ, कॅलेंडर, गांधीजींची तसबीर, नोटीस बोर्ड, चिकटवलेल्या नोटीसा, सुट्ट्यांची लीस्ट
गेलं परत आपापल्या जागी
साहेब खुश...काहीतरी काम झालं ऑफिसात म्हणून
पण पंधरा एक दिवस
आणि परत ओल
साहेबांनी काढलं मग नवं टेंडर...वॉटरप्रूफिंगचं
आणि घेतलं काम करून
परत आले रंगारी
घड्याळ, कॅलेंडर, गांधीजींची तसबीर, नोटीस बोर्ड, चिकटवलेल्या नोटीसा, सुट्ट्यांची लीस्ट
सगळं काढलं परत
आणि परत रंग देऊन गेले
पण लांब सोडून आलेल्या
मांजरीच्या पिल्लासारखी
परत परत येत होती
भिंतीला ओल
कोणालाच कळेना
त्या रूक्ष कार्यालयात
कुठून येतीये ही ओल
तिस-यांदा रंग देऊन झाल्यावर
जेव्हा शिपाई लावत होता वस्तू भिंतीवर
घड्याळ, कॅलेंडर, नोटीस बोर्ड लावल्यावर
गांधींची तसबीर घेतली हातात
आणि ओलं लागलं काहितरी हाताला डोळ्यापाशी
त्या तसबीरीतल्या गांधीजींच्या डोळ्यापाशी
साहेब होतेच शेजारी ऊभे
टेंडर काढा.....म्हणाले,
सगळ्या तसबीरी बदलून घेऊ

कविता

प्रतिक्रिया

जेपी's picture

15 Feb 2014 - 9:47 am | जेपी

.

तिमा's picture

15 Feb 2014 - 9:55 am | तिमा

आशय आणि शेवट आवडला. पण निगरगट्टांना याने काही फरक पडणार नाही.

धन्या's picture

15 Feb 2014 - 9:55 am | धन्या

बारकावे मस्त टिपलेत.

यशोधरा's picture

15 Feb 2014 - 11:20 am | यशोधरा

चपखल.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

15 Feb 2014 - 6:57 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुप्पर लाईक

स्वातंत्र्या नंतरचे भारतातले 'साहेब' आणि 'टेंडर' यांचं नातं उत्तरोत्तर घट्ट झाले आहे.
म्हणून जवळचे मित्र गमतीत म्हणतात, '' अरे बाबा जोड्यानं मार पण साहेब नको म्हणू!''

प्यारे१'s picture

15 Feb 2014 - 7:12 pm | प्यारे१

नेमकी! आवडली.

आतिवास's picture

15 Feb 2014 - 7:22 pm | आतिवास

हं!
आशय आणि सादरीकरण दोन्ही आवडलं.
ते 'हं!'?
वस्तुस्थितीला उद्देशून आहे ते!

मदनबाण's picture

15 Feb 2014 - 7:59 pm | मदनबाण

मस्त...

कवितानागेश's picture

15 Feb 2014 - 9:00 pm | कवितानागेश

पर्फेक्ट!

आदूबाळ's picture

15 Feb 2014 - 10:33 pm | आदूबाळ

काय छान लिहिली आहे! व्वा!!

फारएन्ड's picture

17 Feb 2014 - 8:29 am | फारएन्ड

मस्त जमलीये. कल्पना व सादरीकरण दोन्ही आवडले!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Feb 2014 - 10:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

चपखल !

आवडून गेल्या आहे...

पाषाणभेद's picture

18 Feb 2014 - 12:07 pm | पाषाणभेद

आवडली आहे.