बेल वाजली..
’आत्ता या वेळी कोण?’
चडफडत दार उघडले,
तर समोर पांडुरंग -
मला म्हणाला, “बोल".
कटेवर हात नव्हते,
पायाखाली वीट नव्हती,
चंदनाचा टिळा नव्हता,
भोवती भक्तीचा मळा नव्हता.
मी म्हटले, “या, बसा.
सुखदु:खाच्या गोष्टी बोलू हवे तर,
पण उगीच दांभिक
देवत्त्वाचा आव आणू नका.”
“हे तर लई बेस झालं"
म्हणत तो विसावला,
आरामखुर्चीत बसून
गॅलरीतून दिसणारा
आकाशाचा तुकडा
न्याहाळताना हरवून गेला.
त्याने मला
प्रश्न विचारले नाहीत,
मीही नाही.
त्याने मला
उपदेश केला नाही,
मीही नाही.
त्याने स्वत:भोवती
एक अदृष्य भिंत रचली,
मीही तेच केले.
माझ्या सहवासात
त्याने स्वत:चे एकाकीपण
मनमुराद जपले -
मीही तेच केले.
तरीही आम्ही
एकमेकांचे झालो
आणि त्या एकतानतेतही
दोन भिन्न वस्तू उरलो.
खूप दिवसांनी
काचेला तडा जाताना
मधेच एकदा भावूक म्हणाला,
“ज्ञाना, तुका, नामा
गेल्यापासून
जीव रमत नाही....”
त्याला पुढचे बोलू न देता
(ते जरासे चुकलेच माझे!)
मी चकित होऊन म्हटले,
“मायेच्या
या जंजाळात अडकून
देवा, तुम्ही वायाच गेलात!”
त्याने दयार्द्र
(की कसल्याशा त्याच)
नजरेने माझ्याकडे पाहिले
आणि गप्प झाला.
माझे लक्ष नसताना
कधीतरी अचानक
मला न सांगताच
हलके निघून गेला.
माझ्या घरात
अजून त्याची
वैजयंती माळ आहे;
सगळे व्यापून
एकाकीपणाशी
चिरंतन नाळ आहे;
मुठीत आलेले
हरपून गेले
रौद्र त्याचा जाळ आहे;
व्याकूळ स्वर
भिरभिरणारा
अनंत बाहू काळ आहे.
वाट पाहते मी रोज
पण मला खात्री आहे-
तो इकडे फिरकणार नाही,
विटेविना त्याचा
अधांतरी पाय आता
माझ्या दारात थिरकणार नाही.
आता अखेर
मलाच पाऊल उचलावे लागेल,
त्याच्या दारात
जाऊन म्हणावे लागेल,
“बोल".
पण तो अखेर
पांडुरंग आहे.
माझ्या घरात येणे, गुंतणे
आणि निघून जाणे
त्याला शक्य होते -
मला जमेल का गुंतणे?
आणि गुंतल्यावर
सहज निघून जाणे?
**
अन्यत्र पूर्वप्रकाशित
प्रतिक्रिया
3 Feb 2014 - 2:32 pm | सुहास..
मस्त !
3 Feb 2014 - 2:40 pm | यशोधरा
सुरेख हा शब्द सुद्धा तोकडा आहे.
5 Feb 2014 - 9:28 pm | शैलेन्द्र
+१११
असच म्हणतो..
शेवटच कडव तर अप्रतिम,,
3 Feb 2014 - 2:55 pm | मदनबाण
पण तो अखेर
पांडुरंग आहे.
माझ्या घरात येणे, गुंतणे
आणि निघून जाणे
त्याला शक्य होते -
मला जमेल का गुंतणे?
आणि गुंतल्यावर
सहज निघून जाणे?
वाह्ह...
3 Feb 2014 - 2:56 pm | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
3 Feb 2014 - 3:28 pm | वेल्लाभट
एक नंबर.........
एक नंबर !
जबर्दस्त!
3 Feb 2014 - 3:31 pm | भावना कल्लोळ
खुप सुंदर
3 Feb 2014 - 3:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
वाहवा !
खूप दिवसांनी
काचेला तडा जाताना
मधेच एकदा भावूक म्हणाला,
“ज्ञाना, तुका, नामा
गेल्यापासून
जीव रमत नाही....”
त्याला पुढचे बोलू न देता
(ते जरासे चुकलेच माझे!)
मी चकित होऊन म्हटले,
“मायेच्या
या जंजाळात अडकून
देवा, तुम्ही वायाच गेलात!”
हे विशेष आवडलं !
3 Feb 2014 - 3:47 pm | कवितानागेश
हे फार आवडले..
मला जमेल का गुंतणे?
... 'प्ले सेफ' अशी पॉलिसी घेउन जगतो आपण..
3 Feb 2014 - 3:54 pm | प्यारे१
आवडलीच. छानच!
(बाकी माझ्याकडून लिहीले गेलेलं एक वाक्यः पुंडलिक व्हा, पांडुरंग आपल्या भेटीसाठी तिष्ठत उभा राहील.)
3 Feb 2014 - 5:30 pm | प्रचेतस
अतिशय आवडली.
3 Feb 2014 - 5:34 pm | मधुरा देशपांडे
सुंदर लिहिलंय.
3 Feb 2014 - 5:50 pm | आयुर्हित
नातो नामको जी म्हांसूं तनक न तोड्यो जाय।।
पानां ज्यूं पीली पडी रे लोग कहैं पिंड रोग।
छाने लांघण म्हैं किया रे राम मिलण के जोग।।
बाबल बैद बुलाया रे पकड दिखाई म्हांरी बांह।
मूरख बैद मरम नहिं जाणे कसक कलेजे मांह।।
जा बैदां घर आपणे रे म्हांरो नांव न लेय।
मैं तो दाझी बिरहकी रे तू काहेकूं दारू देय।।
मांस गल गल छीजिया रे करक रह्या गल आहि।
आंगलिया री मूदडी म्हारे आवण लागी बांहि।।
रह रह पापी पपीहडा रेपिवको नाम न लेय।
जै को बिरहण साम्हले तो पिव कारण जिव देय।।
खिण मंदिर खिण आंगणे रे खिण खिण ठाडी होय।
घायल ज्यूं घूमूं खडी म्हारी बिथा न बूझै कोय।।
काढ कलेजो मैं धरू रे कागा तू ले जाय।
ज्यां देसां म्हारो पिव बसै रे वे देखै तू खाय।।
म्हांरे नातो नांवको रे और न नातो कोय।
मीरा ब्याकुल बिरहणी रे हरि दरसण दीजो मोय।।९।।
3 Feb 2014 - 6:01 pm | आतिवास
अर्थ अंदाजाने समजतोय.
पण कुणी नीट उलगडून सांगितल्यास बरं होईल.
3 Feb 2014 - 6:16 pm | आयुर्हित
मोसूं मुझको। पानां ज्यूं पत्तों की भांति।
पिंडरोग पाण्डु रोग (माझ्यामते रक्ताल्पंता/Anemia) किंवा कदाचित कावीळ/Jaundice(?)
इस रोग में रोगी बिलकुल पीला पड जाता है।
छाने छिपकर। लांघण लंघनउपवास। बाबल बाबा पिता। करक पीडा। दाझी जली हु।
छीज्या क्षीण हो गया। मूंदडो मुंदरी अंगूठी। बांहीं भुजा।
साम्हले सुन पायेगी। खिण क्षण भर। देसां देशों में। खाई खा लेना।
3 Feb 2014 - 6:31 pm | आतिवास
हे 'विकी' भाषांतर दिसतंय.
तुम्हाला जो अर्थ वाटतोय तो तुमच्या शब्दांत सांगा - तो कदाचित जास्त सोपा जाईल समजायला.
3 Feb 2014 - 9:25 pm | आयुर्हित
माझ्या शब्दातला अर्थ संत मीराबाईची विराणी येथे पाहावा.
महत्वाचे, याचे सारे श्रेय आपण विचारलेल्या प्रश्नाला आहे.
मनापासून धन्यवाद.
3 Feb 2014 - 8:11 pm | यशोधरा
मलाही अंदाजपंचे अर्थ लावायाचा अत्याधिक मोह झालाय, तेह्वा -
नातो नामको जी म्हांसूं तनक न तोड्यो जाय।।
माझ्या सावळ्याच्या नामस्मरणाशी माझं जे नातं जुळलंय ते मला जराही तोडवत नाहीये
पानां ज्यूं पीली पडी रे लोग कहैं पिंड रोग।
पानं जशी हिवाळ्यात सुकून पिवळी पडतात ना, तशीच दु:खाने आणि विरहाने जणू काही सुकलेय मी आणि लोकांना वाटतं आहे की मला काविळ झालेय..
छाने लांघण म्हैं किया रे, राम मिलण के जोग॥
माझ्या रामाच्या मिलनाचा ध्यास घेऊन जगापासून लपत छपत उपाशी तापाशी अशी मी (दिसले/ आहे असे पाहून)
बाबल बैद बुलाया रे पकड दिखाई म्हांरी बांह।
(कसला रोग असेल म्हणून की काय) माझ्या वडिलांनी वैद्याला सांगाव धाडला आणि माझी नाडीपरी़क्षा करवली..
मूरख बैद मरम नहिं जाणे कसक कलेजे मांह।।
पण त्या मूर्ख वैद्याला माझ्या हृदयाची तडफड काय समजणार?
जा बैदां घर आपणे रे म्हांरो नांव न लेय।
अरे वैद्यबुवा, तू चालू लाग बरं आपल्या रस्त्याला, उगा माझ्या वाटेला जाऊ नकोस..
मैं तो दाझी बिरहकी रे तू काहेकूं दारू देय।।
मी तर विरहामध्ये होरपळणारी (त्या रामाची दासी आहे रे..) तू कशाला औषधं देतो आहेस (आणि ती लागू तरी कशी पडतील..)
मांस गल गल छीजिया रे करक रह्या गल आहि।
(विरहात होरपळून) मी इतकी क्षीण झालेय (शरीरावरलं सगळं मांस गळून हाडांचा सापळा तेवढा शिल्लक राहिलाय..)
आंगलिया री मूदडी म्हारे आवण लागी बांहि।।
माझ्या बोटात होणारी अंगठी आता माझ्या हातात (बांगडीप्रमाणे) येते आहे, (इतकी क्षीण झालेय मी..)
रह रह पापी पपीहडा रे पिवको नाम न लेय।
अरे (मेल्या - सात्विक संताप आहे बरं!) कोकीळ पक्ष्या, प्रेमाच्यासंबंधी काय बोलतोस रे?
जै को बिरहण साम्हले तो पिव कारण जिव देय।।
कोण्या विरहिणीने तुझे बोल ऐकले ना, तर तुझ्यामुळे दु:खाने जीव देईल..
खिण मंदिर खिण आंगणे रे खिण खिण ठाडी होय।
क्षणात माझ्या गृहात, क्षणात बाहेर अंगणात, अशी मी क्षणात इथे तर क्षणात तिथे (अशी मी बावरी होऊन फिरतेय..)
घायल ज्यूं घूमूं खडी म्हारी बिथा न बूझै कोय।।
म्या घायाळ विरहिणीच्या व्यथेचं समाधान मात्र कोणापाशीच नाही..
काढ कलेजो मैं धरू रे कागा तू ले जाय।
माझं हृदय मी जणू हातात धरलंय आता, ये रे काऊ, तूच आता ते घेऊन जा..
ज्यां देसां म्हारो पिव बसै रे वे देखै तू खाय।।
ज्या कोण्या देशी माझा प्रियकर (मजेत) आहे ना, तिथे (त्याला दाखव) तो पाहील आणि (त्याच्यासमोरच) तू खा ते...
म्हांरे नातो नांवको रे और न नातो कोय।
केवळ (रामाच्या) नामाशीच नातं आहे रे माझं मीरेचं, अजून कोणतंच नातं ठाऊक नाही मला..
मीरा ब्याकुल बिरहणी रे हरि दरसण दीजो मोय||
ही मीरा (तुझ्या) दर्शनासाठी वेडी, व्याकूळ झाली आहे रे हरी, विरहाने दु:खी अशा ह्या मीरेला हरी, तुझं दर्शन दे..
3 Feb 2014 - 8:17 pm | आतिवास
आभार. अर्थ बराच स्पष्ट झाला आता.
आयुर्हित यांना १८० अंश का वाटलं ते मात्र कळलं नाही - अजूनही.
आणि थोडे प्रश्न आहेत.
पण तुम्ही एक वेगळा धागा करा याचा, मग विचारते :-)
3 Feb 2014 - 8:30 pm | यशोधरा
छे, धागा वगैरे नको :) व्य नि कराल?
3 Feb 2014 - 9:42 pm | आयुर्हित
अतिशय सुंदर अर्थ लावलाय आपण.
धन्यवाद.
3 Feb 2014 - 6:35 pm | इशा१२३
आवडली.
4 Feb 2014 - 8:01 am | सस्नेह
प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे 'वैजयंती माळ' जपलेली असते...
4 Feb 2014 - 2:55 pm | psajid
खूप खूप छान ! आवडली कविता !
5 Feb 2014 - 10:35 am | आतिवास
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
5 Feb 2014 - 8:38 pm | पैसा
भेटला तो!
5 Feb 2014 - 11:29 pm | अत्रुप्त आत्मा
@माझ्या घरात
अजून त्याची
वैजयंती माळ आहे;
सगळे व्यापून
एकाकीपणाशी
चिरंतन नाळ आहे;
मुठीत आलेले
हरपून गेले
रौद्र त्याचा जाळ आहे;
व्याकूळ स्वर
भिरभिरणारा
अनंत बाहू काळ आहे. >>> __/\__
7 Feb 2014 - 6:30 pm | सुधीर
रचना आवडली.