(सुनीत: वनहरिणी मात्रावृत्त)
बर्फावरती झुंजूमुंजू थंड शांतता करे पहारा
शेकोटीची ऊब सोडता श्वास गोठतो, फुले शहारा
दूर कुठेसे शहर जागते आखडलेले पाय मोकळे
पुन्हा एकदा सळसळती जे काल श्रमाने गाढ झोपले
बर्फावरच्या 'ह्याच्या' हाती बंदुक चमचमणारी काळी
तंबूमधली झोप क्षणाची अंधुक सीमा घाली हाळी
शहराकाठी 'त्याची' जागा गाडी गाठायाची घाई
वेळ साधणे सूत्र दिनाचे वेगासंगे वाहत जाई
काही तत्त्वे थोड्या निष्ठा एकाचे जगण्याचे इंधन
कर्तव्याचे पाश टाकती दुसऱ्याच्या असण्याला बंधन
काय माहिती कुठली गोळी करील अवचित सावज 'याचे'
तसेच 'त्याचे' जगणेसुद्धा ताणामधल्या सुप्त भयाचे
इथला हा अन् तिथला तोही, दोघे सैनिक एका अर्थी
परिस्थितीशी दोघे लढती, आयुष्याच्या सोसुन शर्ती !
-- अमेय
प्रतिक्रिया
25 Jan 2014 - 10:58 am | अत्रुप्त आत्मा
वा..वा..वा..! __/\__ काय बोलू? केवळ अप्रतीम!
25 Jan 2014 - 3:09 pm | आदूबाळ
क्या बात! अनेक वर्षांपूर्वी साप्ताहिक सकाळ दिवाळी अंकात आलेली अनंत सामंतांची याच थीमवरची कथा आठवली...
25 Jan 2014 - 3:13 pm | संजय क्षीरसागर
काव्यलेखन असंच चालू ठेव!
25 Jan 2014 - 3:20 pm | प्यारे१
छान कविता!
25 Jan 2014 - 5:39 pm | इन्दुसुता
उत्कृष्ट रचना. फार भावली.
26 Jan 2014 - 12:42 am | चैत्रबन
एकदम आवडेश..
28 Jan 2014 - 6:57 pm | सुधीर
कविता आवडली
28 Jan 2014 - 8:37 pm | सूड
मस्तच!!
28 Jan 2014 - 9:08 pm | आयुर्हित
कविता जरी छान असली तरी मला असे वाटते की सीमेवर उन्हात/थंडीत/पावसात/गोळीबारात उभे राहून देशाचे रक्षण करणे हे नक्कीच एक महान कार्य आहे, ज्याची सय आम्हा civilians ना कधी येणार नाही.
स्वत: मी तरी या आपल्या जवानांना सलाम करतो. जय हिंद! जय हिंद कि सेना !!
कालच "ए मेरे वतन के लोगो" या भावपूर्ण गीताला ५० वर्षे पूर्ण झालेत. ह्या गीतातही "परिस्थिती" चे चांगल्या पद्धतीने वर्णन आहे.
धन्यवाद.
28 Jan 2014 - 10:04 pm | चिन्मय खंडागळे
सहमत आहे. सियाचेनवर थंडीवार्यात शब्दशः 'मरायला' उभा असलेला सैनिक आणि ढेरी सावरत ब्रीफकेस आणि डबा घेऊन गाडी पकडायला धावणारा चाकरमानी यांची तुलना जरा अन्यायकारक वाटते.
कविता म्हणून ठीक :)
28 Jan 2014 - 11:07 pm | अमेय६३७७
खरेच आहे, सैनिक आणि असैनिक यांत पूर्णपणे साम्य आहे असे सांगणे असा या कवितेचा उद्देश नाही तर आपापल्या जागी सचोटीने काम करताना दोघांच्याही जीवनात 'परिस्थितीशी लढणे' कसे अविर्भाज्य असते या साम्यावर भाष्य इतकेच मांडायचे आहे.
28 Jan 2014 - 11:43 pm | जोशी 'ले'
व्वा..सुंदर रचना
29 Jan 2014 - 1:20 am | प्रभाकर पेठकर
सुंदर कविता. आवडली.
ह्यात शारीरिक मृत्यूची तुलना नसून दोन वेगळ्या भयकारी परिस्थितीत मानसिक दडपणाची तुलना आहे असे वाटते.