अर्थक्षेत्र भाग - ७ - "ट्रेंड" ते "ट्रेड" (अ)

Primary tabs

ज्ञानव's picture
ज्ञानव in अर्थजगत
9 Jan 2014 - 5:09 pm

कालच, बच्चे कंपनीला हॉटेलात हादडायची हुक्की आली आणि सौ पण त्यात सामील झाल्या. पुढच्या २० व्या मिनिटाला अस्मादिक हॉटेलातल्या एका कोपर्यात बापुडवाणे मेन्यू कार्ड न्याहाळत बसले होते. एरवी "यवनांना" (यौवंनांना ना ऽ ऽ ही. ) कितीही नावे ठेवली तरी हॉटेलात मेन्यू कार्ड यवन तत्वानेच वाचावे लागते. मग ४०-६५-१३५-१४५-१८५-२२५-२८५-६५-१३५-१४५-१३५-१३५ असे सुरु होते. मग उजव्याबाजूला सौ. किमतीचे वाचन आणि डाव्याबाजूला मुलांचा पदार्थ वाचन असा कल्ला सुरु असतो. आता कल्ला (पक्षी सी एन बी सी, मराठी इंग्रजी, गुजराती पेपर्स, येणारे अशील बोलताच असतात....टिपत राहायचे.) ऐकूनच शेअर्स घेण्याची सवय असल्याने थोडा वेळ मी हॉटेलात इकडे तिकडे कुणी काय मागवलय, डिश कशी आहे? डिशच्या मागे बसलेली "सुबक ठेंगणी" कशी आहे ? हे सर्व निरीक्षण माझ्या नाकाच्या शेंड्यावर विसावलेल्या चष्म्याआडून करतोय. मुले पाव भाजी घेऊ या म्हणून ओरडत असतात सौ. पेशावरी आणि रोटी घेऊ म्हणत असतात. मग
"काय ती पाव भाजी दर वेळेला? काहि तरी वेगळे घ्या जरा"
"मग मी व्हेज. चीज ग्रिल्ड sandvich " मोठा (१४)
"मी पण " धाकटा
"नको त्यापेक्षा एक पेशावरी आणि एक कोल्हापुरी काय हो तुम्हाला काय वाटते ? " सौ.(**)(...जाऊ द्यात.. )
"_________________________________________________________" मी ...
"ओ! कन्सल्टंट बोला ना, की इथे हि "विश्लेषण" चालू आहे?" मोठा.....(आता मराठीचे चार शब्द तो हि फेकतो तोंडावर.)
"अरे ! पाव भाजी कुठली हवी आहे ? साधी,खडा,चीज...." माझी चाचपणी सुरु.
"ठीक आहे ! आईला काय हवय ते मागवा" मोठा त्रासिक (मनात काष्ट्या सोलिड टरकतो आईला....तत्सम येत असेल कदाचित....हम्म्म्म )
"अरे दादा, सांग तरी तुला कुठली भाजी हवी आहे, बाबा विचारताहेत तर ....."धाकट्याला बिचार्याला बाप अजून कळलेला नाही त्याला जे दादा घेणार ते मला हवे... ...(म्हणजे एखाद्याने ऑपटोसर्किट, टेली डाटा, एम एम टी सी कुठलेही शेअर्स घेऊ देत मी हि तेच घेणार अशी एक जमात असते त्या पैकी...... )
"मश्रूम चीज" मोठा सर्व जाणून उमजून. (अरे, सेमी कंडक्टर मध्ये top ला आहे हि कंपनी....अशी सुरुवात करणार्यापैकी.....)
"अरे मश्रूम चीज म्हणजे ९५ प्लस ३ पाव एक्स्ट्रा म्हणजे २७, टोटल १२२ तुला एकट्याला....आपण चार आहोत ना म्हणजे १२२ गुणिले २....." माझे विश्लेषण सुरु....मोठा लालेलाल - छोटा गोंधळलेला आणि सौ. किती गुणाचा माझा....च्यामारी मी खिंड लढवतोय ".....आणि मश्रूम म्हणजे बुरशीच ना (हे कॉफीत टेनीन नावाचे विष असते....ह्या धर्तीवर )त्यापेक्षा पेशावारीत काजू पेस्ट, मावा हिरव्या भाज्या आणि क़्वा न टी टी चौघांना पुरेल अशी वर एक कोल्हापुरी किंवा हैद्राबादी मागवू. थोडा पश्चात.....ताप होतो दुसर्या दिवशी पण......काय ?" जमतंय बहुतेक .....
"झाले झाले शेवटी त्यांना हवे तेच ते घेतात. ह्यांचा सगळीकडे अनेलीसीस घ्या आता...."
"बाबा, तुमच्याच भाषेत सांगायचे तर तुमचे उद्दिष्ट पोटभरीचे आहे.कारण पेशावरी आणि हैद्राबादी ह्याची क़्वा न टी टी येईल पण मग रोटी आल्या त्या ११ रुपये एक आणि पाव भाजी घेतली तर पाव आले ते ९ रुपये एक त्यामुळे जास्तीत जास्त ५०-७५ रुपये वाढतील / वाचतील. आईचे उद्दिष्ट पैसे वाचवणे आहे आणि आमचे उद्दिष्ट मज्जा, आनंद हे आहे. तेव्हा आता तुम्हीच ठरवा" आमचा सवाई "गंधर्व" आम्हालाच ज्ञान देतोय पाहून "उर" भरून आले. शेवटी २ पाव भाजी १ पेशावरी १ हैद्राबादी आणि पाव - रोटी अन लिमिटेड असा समारोप झाला. मी आपला हिशोब करत बसलो ह्यात फायदा कुणाचा झाला.(उद्या सौ. सांगतीलच.)

वरील सगळे मांडण्यामागे उद्देश असा की बर्याचदा विश्लेषण गोंधळून टाकते. निर्देशांक क्ष पातळी ओलांडेल तर य पातळी गाठेल....पण मग मी काय करू खरेदी की विक्री ?

*** मी आयपीओत रिलायन्स पावर घेतला रुपये ४५०/- त्या दिवसापासून आज पर्यंत बोनस टोनस मिळून ही मी आज लॉसमध्ये आहे. कारण आजचा भाव ६७/- (विश्लेक्षकांचे भाकीत ६५०-७०० होईल असे होते.)
*** लार्सन टुब्रो ४८०० ला घेतला होता आता १००० आहे. आता काय करू? (मधला बोनस आल्याने किंमत उतरली आहे हे ह्याच्या गावीही नसते )
*** टाटा पावर ११२० ने घेतला आता ८१ आहे डूब्लो पार ह्या तुमचे शेअर मार्केट आम्हाला धार्जिणे नाही. (इथे हि तेच जे लार्सनच्या बाबतीत.)

अशी बरीच मुक्ताफळे ऐकवत आणि आपल्या जखमा दाखवत बरेच अशील आमचेकडे येतात. ३०-३२ कंपन्या सांभाळणे "वीर", बघ आमचा पोर्ट फ़ोलिओ आणि सांग काय करू शकतोस ? असे विचारतात तेव्हा जाणवते कि सो कॉल्ड "विश्लेषण" आणि बेसिक घडामोडींपासून दूर ह्या "गुंतवणूकदारांना"(!!) शेअर मार्केट मध्ये यावे असे का वाटले असेल? हाच एक विश्लेषणाचा भाग आहे.

अस्खलित मराठी बोलणारा आणि दोन पिढ्या महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे ऋण जाणणारा एक "बिहारी" माझा अशील होता. त्याचा फळाचा व्यापार होता. तो तासगाव, विटा, कुंडल ह्या महाराष्ट्रातल्या अत्यंत आतल्या गावातून द्राक्ष आणायचा तिथला हंगाम संपला की नाशिक पट्ट्यातून द्राक्ष सुरु व्हायची त्यानंतर अहमदाबाद येथून बोरे..तो पर्यंत मार्च संपायचा एप्रिल अर्धा झाला कि तो रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या चकरा सुरु करायचा आणि आंबे आणून विकणे सुरु. १६ छोटे "बिहारी" नातेवाईक हि फळे टोपलीतून नेऊन विकून पैसे करून आणायची. त्याला फळांचा "ट्रेंड" बरोबर कळत होता. म्हणजे कोणत्या मोसमात कोणती फळे कुठे हे त्याला बिहार मधून महाराष्ट्रात येऊन कळले आणि ते त्याने एनकेश केले.
गुंतवणुकीचा "ट्रेंड" ओळखता येणेही फार महत्वाचे आहे. "ट्रेंड इज युवर फ्रेंड" म्हणतात. त्यासाठी अनेक विश्लेषक अनेक "पेरेमिटर्स" सांगतात जी एखाद्याला कदाचित खूप किचकट वाटतील. मग सोपी पद्धती कोणती? त्या आधी ट्रेंड म्हणजे काय? सामान्यतः हा शब्द आपण सर्वत्र वापरतो हल्ली हा ट्रेंड आहे तो ट्रेंड आहे म्हणतो कारण तो आपल्या रोजच्या निरीक्षणातून आपल्याला दिसून येतो. गुंतवणुकीत हि हे ट्रेंड असतात कधी रियल इस्टेट - कधी सोने चांदी - कधी शेअर्स किंवा स्टोक मार्केट ते ओळखले तर आणि तरच कुठे आणि केव्हा गुंतवणूक करावी हा निर्णय ढोबळ मानाने घेता येतो. आणि मार्केट पडले तर ? हि भीती ५०% कमी होते. आता जर रियल इस्टेट जे इथे दहिसरमध्ये २००४ साली ३०००-३५०० प्रती स्क्वे फुट. होते तेव्हा इस्टेट एजंटसकट सगळे गुंतवू नका ओरडत होते. माझ्या अशिलाने एक सदनिका ३०९० प्रती स्क्वे फुटच्या भावाने ९७२ स्क्वे. फुट बुकिंगमध्ये घेतली जवळजवळ सगळ्यांनी वेड्यात काढले पण २००६ ला ताबा मिळाला तेव्हा भाव ६३०० प्रती स्क्वे फुट होता आणि त्याने विकला २०१० साली तेव्हा ९००० प्रती स्क्वे फुट(ह्याला पुरावा म्हणा साक्षीदार म्हणा आहेत मिपावर) आता हा "ट्रेंड" कसा कळला त्याला हे फार महत्वाचे आहे. आज १२००० प्रती स्क्वे फुटला मार्केट स्तब्ध उभे आहे. तेव्हा त्याची गुंतवणूक डहाणू, सावंतवाडी आणि इतरत्र चालू आहे. हॉट डेस्टीनेशन उरण ! मला वाटते ट्रेंड ओळखण्यासाठी. निरीक्षण हे फार महत्वाचे आहे. डहाणू रेल्वे सुरु होण्याबरोबर एक वर्ष आधी १८०० रुपयात घेतलेली सदनिका आज ५००० पर्यंत पोहोचली आहे. सावंतवाडी स्टेशन विस्तार सुरू झाला हे भरपूर वेळा प्रत्यक्ष तिथूनच गाडीत चढलेल्या माणसाच्या लक्षात आले नाही ते कुणा अमराठी माणसाने हेरले. प्रगतीची पाऊले कुठे पडतायत ते ओळखण्यासाठी निरीक्षण आणि त्या निरीक्षणाचे आपणच केलेले तर्कशुद्ध विश्लेषण आपल्याला प्रगतीच्या मागे मागे घेऊन जाते.
(आणि ते आपण शिक्षणाच्या बाबतीत नक्कीच करतो कारण जेव्हा संगणक युग मूळ धरत होते तेव्हा सगळे आई बाप मुलांना IT घे सांगत होते, त्या आधीची पिढी डॉक्टर, मेकेनिक्ल सिविल इलेक्ट्रोनिक अशी होती .....म्हणजे आम्हाला ट्रेंड कळतो हे नक्की )
ह्याच पद्धतीने आपण गुंतवणुकीचे जेवढे मार्ग आहेत त्याचा मागोवा घेऊ शकतो. निरीक्षण झाले निर्णय हि झाला..... पण निर्णय तरी ही चुकला तर ? म्हणून नियोजन हवे. शेअर्स आणि सोने हा माझा प्रांत असल्याने मी त्याचे पक्के नियोजन घोटून घोटून शिकून घेतले आहे. मार्केट मधले दिग्गज विश्लेषक, अनुभवी (हे नक्की असतात का तसे ?) सुद्धा जेव्हा मला म्हणतात की "अरे तो शेअर चालला म्हणून मिळाले पैसे तुला नाहीतर हयःयाः ........मेला असतास पार." तेव्हा प्रचंड आश्चर्य वाटते. एखाद्या सुगरण बाईला स्वयंपाक छान "झालाय" सांगणे हे जितके अपमान कारक तितकेच वरील वाक्य मला अपमानकारक वाटते. स्वयंपाक छान झालाय म्हणजे नशिबाने झालाय असे ध्वनित का करता स्वयंपाक छान "केलात" किंवा "केलाय" सांगाकी !केलाय मध्ये मेहनत आहे हो झालाय म्हणजे सगळा नशिबाचा भाग. तुमची अपेक्षा काय मी शेअर्स घेतले हे लक्षात घेऊन "मार्केटने " मंदी करताच कामा नये ते केवळ वरच गेले पाहिजे ? पण मार्केट तर कुणाचे नाही आणि कुणासाठी थांबत नाही मग गेले तेल लावत मी पण मार्केट कधी माझ्या पदरात पैसे टाकेल ते पाहत बसणार नाही. शेवटी जो ओरडतो त्याचेच चणे विकले जातात मेहनत आहेच कुठे हि आणि कुठ्ल्याही क्षेत्रात. मग थोडे प्रयत्न आपण हि करू की !

५०० रुपयाने मी जर एखादा शेअर घेतला तर माझी मानसिकता अशी की माझा ब्रेक इव्हन हा रुपये ५००+१०% व्याज =५५० आहे. मग जर तो ११०० भाव झाला तर माझे भांडवल मोकळे होईल आणि ३५० झाला तर ? मग मी माझे ट्रेड सुरु करतो जेणे करून मला ५०० रुपये भांडवल इरोड होऊ न देता ते सोडवून घ्यायचे आहे ते हि सव्याज. मग पुढील कार्यवाही सुरु होते कशी ते पुढच्या लेखात पाहू.

प्रतिक्रिया

विअर्ड विक्स's picture

10 Jan 2014 - 11:55 am | विअर्ड विक्स

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहून ध्येय गाठता येते पण सट्टा बाजारात यश मिळवता येत नाही....

उत्तम लिखाण. वाचतो आहे..

ज्ञानव's picture

10 Jan 2014 - 12:38 pm | ज्ञानव

थोडे थोडे पैसे मिळत राहिले तरी पुरे....असे माझे मत आहे.
मला मार्केट "जिंकण्याची" इच्छा नाही कारण मित्राबरोबर मैत्रीने राहावे.

प्रवाहाच्या विरुद्ध कळले नाही.
कारण प्रवाह म्हणजे ट्रेंड बरोबरच राहणे योग्य नाही का?

विअर्ड विक्स's picture

12 Jan 2014 - 9:26 pm | विअर्ड विक्स

अहो साहेब मी उदाहरण दिले मराठीतील म्हणीचे ... in share market, u need to follow the trend... i agrre with u that trend is ur friend....

ज्ञानव's picture

13 Jan 2014 - 7:56 am | ज्ञानव

व्हेरी सॉरी.

नितीन पाठक's picture

10 Jan 2014 - 3:57 pm | नितीन पाठक

प्रगतीची पाऊले कुठे पडतायत ते ओळखण्यासाठी निरीक्षण आणि त्या निरीक्षणाचे आपणच केलेले तर्कशुद्ध विश्लेषण आपल्याला प्रगतीच्या मागे मागे घेऊन जाते.
लेख अतिशय छान आहे. परंतु माझ्या मनात काही शंका आहे.
निरीक्षण करण्यासाठी नेमकी कशी सुरूवात करावी ? "ट्रेंड" ओळखायचा कसा ?

ज्ञानव's picture

10 Jan 2014 - 8:00 pm | ज्ञानव

नितीन जी
माझ्या पुढील लेखात ट्रेंड ओलाख्न्यासाठीचे निरीक्षण मी लिहित आहे.पण एक गोष्ट इथे सांगू इच्छितो की "वासावरून चव ओळखण्याचे कसब" ज्याचे त्यालाच विकसित करावे लागते. रेसिपी बुक वाचून कुणी सुगरण होत नाही. थोडक्यात, जी पद्धत मी लिहिणार आहे ती आधी समजून घ्यायला हवी. होमवर्क हवे इत्यादी.....

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Jan 2014 - 9:05 pm | लॉरी टांगटूंगकर

माझापण हाच प्रश्न होता, ट्रेंड ओळखायचा कसा???
उदा.
आता दिवाळीमधे होम अॅप्लायन्सेसचा खप वाढतो. तर ठीकठाक खरेदी करणर्यांबरोबर होउ दे खर्च पब्लिक कर्ज काढतं. सो ब्यांकांचे काम वाढतं. तसंच गाड्यांचा पण खप वाढतो. तर मग ऑटो, होम अॅप्लायन्सेस आणि बँक सेक्टरकडून दिवाळीच्या वेळेला अपेक्षा ठेवाव्या का?? (आयटी आणि फार्मा वाढायचं कारण दिसत नाही, पण जर लोकं आयटी/फार्मा मधून पैसा काढून यात घालणार असले तर ते खाली जातील) का खप वाढतो त्याचा फायदा थर्ड क्वार्टरच्या रिझल्ट वर दिसेल?? (या हिशोबाने एक्सपोर्टर्सचे स्टॉक्स डिसेंबरच्या शेवटी वर जातील??)

किंवा पेट्रोलियमचे निर्णय सरकार वेळोवेळी बदलत असते, सब्सिडी कमी केली आणि किंमती वाढवल्या तर पेट्रोलियम वर जाईल आणि एअर लाइंन्स खाली येतील. असं काही??

ज्ञानव's picture

10 Jan 2014 - 10:24 pm | ज्ञानव

पण हे बाह्य निरीक्षण झाले आणि ते योग्यच आहे.
म्हणजे जून मध्ये नवनीत पब्लिकेशन, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मल्ल्याचे दारूचे शेअर्स, पावसाळ्यात फार्मा ते बाटा.....अशी यादी पाहून सेक्टर ट्रेंड ओळखणारे पण आहेत.
मी शेअर्सची किंमत आणि चढ उतार पाहून ट्रेंड ओळखणे ह्या प्रकाराबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या आधी ट्रेडिंग करण्या आधी घ्यायची काळजी वगैरे