क्षण

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
5 Jan 2014 - 8:43 pm

सोनेरी किरणं अंगावर पडली
तशी त्याची चुळबुळ सुरु झाली
किणकिण्या डोळ्याने पाहिले त्याने आजूबाजूला
आज नेहेमीपेक्षा जरा जास्त लख्ख वाटत होतं
काय की...
थोडं जास्त दिसतही होतं पण तरी
अजून काही पहावं असंही वाटत होतं त्याला
धडपडत ऊठलं ते
आपल्या चिमुकल्या पायांवर तोल सांभाळत
आजूबाजूच्या अनुभवी जीवांना कळलं आता काय होणार आहे ते
त्यांना एकीकडे आनंदही होत होता आणि थोडं दु:खही
कारण आज 'तो' दिवस होता...
कुठुनशी एक आदिम ऊर्जा अंगात भरून
झोकून दिलं त्याने स्वतःला आसमंतात
त्याने....त्या पक्ष्याच्या ईवल्याश्या पिल्लाने
आणि ऐकू आली ईतर अनुभवी पक्ष्यांना
ती चितपरीचित फडफड पंखांची
'मी उडालो आई'
'हो रे पिला, तू उडालास'
जणू एक सोहळा साजरा होत होता आज त्या घरट्यात
त्याने उडता उडता मागे पाहिलं
आपल्या त्या लहान होत जाणा-या घरट्याकडे
'किती ऊबदार होतं आपलं घरटं!'
क्षणभर पंख थांबले...
.....
.....
पण क्षणभरच
पुढच्याच क्षणी त्याने मान फिरवली गर्रकन,
पंखात वारं भरून घेतलं
आणि एक जोरदार भरारी घेतली आकाशात खुल्या

हा 'क्षण'च महत्त्वाचा असतो कुठल्याही पिल्लाच्या आयुष्यात
नाही का?

कविता

प्रतिक्रिया

आपल्या त्या लहान होत जाणा-या घरट्याकडे
'किती ऊबदार होतं आपलं घरटं!'
क्षणभर पंख थांबले...
.....
.....
पण क्षणभरच
त्याने मान फिरवली परत गर्रकन,
पंखात वारं भरून घेतलं
आणि एक जोरदार भरारी घेतली आकाशात खुल्या

मस्त!

पैसा's picture

5 Jan 2014 - 9:10 pm | पैसा

फार सुंदर कविता!

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jan 2014 - 9:18 pm | अत्रुप्त आत्मा

कुठुनशी एक आदिम ऊर्जा अंगात भरून
झोकून दिलं त्याने स्वतःला आसमंतात
त्याने....त्या पक्ष्याच्या ईवल्याश्या पिल्लाने
आणि ऐकू आली ईतर अनुभवी पक्ष्यांना
ती चितपरीचित फडफड पंखांची
'मी उडालो आई'
'हो रे पिला, तू उडालास'
जणू एक सोहळा साजरा होत होता आज त्या घरट्यात
त्याने उडता उडता मागे पाहिलं
आपल्या त्या लहान होत जाणा-या घरट्याकडे
'किती ऊबदार होतं आपलं घरटं!'
क्षणभर पंख थांबले...

>>> __/\__ अत्यंत भावस्पर्शी!

प्यारे१'s picture

5 Jan 2014 - 9:26 pm | प्यारे१

सुंदरच!
छानच कल्पना आहे.

प्रचेतस's picture

5 Jan 2014 - 10:04 pm | प्रचेतस

खूप सुरेख लिहिलंस रे.

इन्दुसुता's picture

5 Jan 2014 - 11:22 pm | इन्दुसुता

आई ग्गं !!!
मागे बघण्याचा क्षण आणि भरारी घेण्याचाही क्षणच..
स्वतःच्या आयुष्यातले दोन्हीही आठवून क्षणभरच ( ! ) हळवी झाले.

'क्षण' चांगला पकडलाय - कविता आवडली.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

10 Jan 2014 - 10:42 am | मिसळलेला काव्यप्रेमी

क्षणाचा सोहळा भावला.

विटेकर's picture

10 Jan 2014 - 11:06 am | विटेकर

क्षण आले क्षण गेले अन आयुष्य माझे कण कण सरले
सरले हसणे सरले गाणे आता केवळ कण्हणे उरले
आयुष्याची जळती वात कणा-कणाने मागे सरली
चिवट जीवाची दुर्बल आशा पोतडीत ना आता उरली
फिकट जांभळी निळ्सर झाक आणि आतली ओली हाक
सरुन गेले क्षण सोनेरी आता उरला निव्वळ धाक
परसामधल्या माडांची ही सरुन गेली उमेद सारी
लुटुन टाकले होते नव्हते जगण्याचा ना ध्यास उरी