मटका भरके सूरज उल्टा

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
1 Jan 2014 - 7:00 am

नानबाच्या स्वाक्षरीत गुलजार च्या ओळी वाचलेल्या-

तुम बोल रही थीं
होंठ तुम्हारे चाँद की काशें काट रहे थे !
मैं हैरां...
हैरां हैरां ...

वाचल्या क्षणापासून मनात रुंजी घालत होत्या. जरा गुगलून पाहिलं तर समजलं की गुलजारच्या 'पंधरह पाँच पचहत्तर' या पुस्तकात एक नज्म आहे- 'मटका भरके सूरज उल्टा' , त्यातल्या या ओळी आहेत. अहाहा....कय सुंदर नज्म -

मटका भरके सूरज उल्टा
शाम ने दूर समंदर की दहलीज पे जाकर
रातका पश्मीना पह्नकर तुम आईं थी !
रात तुम्हारे जिस्मसे फिसली पडती थी
जिस्म तुम्हारा एक जलते सय्यारे सा
दूध और धूप से गूंधी मिट्टी
एक फलकभर खुशबू थी आवाज तुम्हारी !
तुम बोल रही थीं
होंठ तुम्हारे चाँद की काशें काट रहे थे !
मैं हैरां...
हैरां हैरां ...
मटका भर के सूरज का, एक और सहर निकली पानी से
ऊंगली थामके सुबह की तुम
पानी पर चलते चलते
एक और उफक को लौट गयी
वक्त के पुरईसरार किसी 'कॉमेट' की तरह
कायनात से आईं तुम और कायनात में लौट गयी !

अत्यंत ह्ळुवार भावना, ताकदीची शब्दरचना आणि त्यांना मिळालेला गुलजार स्पेश्शल टच. क्या बात! विचार करत होतो की हे रत्न मराठीत आणूयात का? आणि मग हा प्रयत्न केला. अगदी तंतोतंत / शब्दाला प्रतिशब्द असा अनुवाद नाही केला कारण तसा ब-याचदा नीरस होतो असं मला वाटतं. शिवाय प्रत्येक भाषेचा आपला एक लहेजा असतो. त्यामुळे मूळ भावनेशी प्रामाणिक राहून केलेला हा भावनुवाद -

दूर.... कुठेतरी लांब ओल्या क्षितिजावर
सूर्याच्या तांबड्या गोळ्याने भरलेला घडा
रिकामा करत होती ती संध्याकाळ
आणि त्याच वेळी
मखमली रात्र अंगाभोवती लपेटून
तू येत होतीस....हळुवार पावलांनी
रात्रही मखमली होती..अणि तूही
कशी बरं ठरावी ती तुझ्या अंगावर? .....नव्हतीच ठरत
तुझं ते आरस्पानी सौंदर्य
कुठल्याश्या दैवी साच्यातून घडवलेलं
आणि त्याला साजेसा तुझा तो आवाज
जणू एक मंद सुगंध आसमंतात भरून राहिलेला
तू बोलत होतीस
आणि तुझे ओठ
सतारीच्या तारा छेडाव्यात तसे चांद्रकिरण छेडत होते
मी थक्क होऊन नुसता पाहत होतो....कितीतरी वेळ...नुसता पाह्त होतो
सूर्याच्या लाल गोळ्याने भरलेला घडा घेऊन मग
अजून एक सकाळ निघाली पाण्यातून
तिचंच बोट धरून तूही निघून गेलीस
दुस-या एका क्षितिजाकडे
काळाच्या नियमांबरहुकून प्रवास करणा-या एखाद्या धूमकेतू सारखी
अज्ञातातून आली होतीस
.......अज्ञातात निघून गेलीस

धन्यवाद गुलजार...ईतकी छान रचना दिल्याबद्द्ल

कविता

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

1 Jan 2014 - 9:29 am | नगरीनिरंजन

चांगला प्रयत्न.
मूळ कविता तर सुंदर आहेच.

कवितानागेश's picture

1 Jan 2014 - 9:46 pm | कवितानागेश

सुंदर. :)

काय सुंदर कविता आहे ही !!!!! धन्यवाद !

अनुवादही चांगला झालाय.

सस्नेह's picture

1 Jan 2014 - 10:10 pm | सस्नेह

कल्पनाच खूप सुंदर आहे !

इन्दुसुता's picture

1 Jan 2014 - 10:22 pm | इन्दुसुता

मूळ रचना मला समजली नसती ( उगाच खोटे कशाला बोला )!!!
तुमचा भावानुवाद अतिशय आवडला आणि त्यायोगे मूळ रचनेचा आस्वाद घेता आला.
धन्यवाद एका चांगल्या रचनेची ओळख कऊन देण्यासाठी.

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jan 2014 - 4:17 pm | राजेंद्र मेहेंदळे

मलाही मूळ कविता डोक्यावरुनच गेली असती..अनुवाद आवडला..
ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद

अतिशय सुंदर भावानुवाद!!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Jan 2014 - 2:21 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

क्या बात मालक.. लैच भारी.. जियो..

मूळ कविता आवडली अनुवाद वाचून नरेंद्र गोळे आठवले.

आतिवास's picture

2 Jan 2014 - 3:20 pm | आतिवास

चांगला प्रयत्न.

प्यारे१'s picture

2 Jan 2014 - 5:05 pm | प्यारे१

तरल रचना. भन्नाट आहे.

उत्तम भावानुवाद.

गुलजार 'पर्सनल से सवाल', कॉमेट असे शब्द प्रयोग करायला घाबरत नाहीत. भारी वाटतं.

चाणक्य's picture

4 Jan 2014 - 12:17 pm | चाणक्य

बिनधास्त वापरतात ईंग्लिश शब्द मधेच. आणि काय सुरेख वापर करतात प्रतिकांचा. जबरदस्त संवेदनशीलता असणारा कवि आहे गुलजार म्हणजे.

तुषार काळभोर's picture

8 Mar 2014 - 3:20 pm | तुषार काळभोर

मी पण ती स्वाक्षरी गुगलत असताना हा धागा सापडला.
तुमच्या भावानुवादाची समीक्षा नाही करू शकत, पण मूळ काव्यातील गोडवा नुसता कानाला जाणवत होता. त्याचा अर्थ तुमच्या ओळी वाचून समजला आणि गोडवा आणखी वाढला.

आयुर्हित's picture

8 Mar 2014 - 3:49 pm | आयुर्हित

त्या नज्म पेक्षा आपलीच कविता खूप सुंदर झाली आहे.
वाह व्वा! क्या बात है!!
अभिनंदन!!!