छायाचित्रण भाग ७. लेन्स फिल्टर्स

एस's picture
एस in काथ्याकूट
30 Dec 2013 - 12:39 am
गाभा: 

याआधीचे लेख -
कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्.छायाचित्रण
छायाचित्रण भाग १. छायाचित्रण समजून घेताना
छायाचित्रण भाग २. कॅमेर्‍यांचे प्रकार
छायाचित्रण भाग ३. डीएस्एल्आर कॅमेर्‍यांची रचना
छायाचित्रण भाग ४. लेन्सेसबद्दल थोडेसे
छायाचित्रण भाग ५. अ‍ॅक्सेसरीज्
छायाचित्रण भाग ६. छायाचित्रण भाग ६. मॅक्रो आणि क्लोजअप्

लेन्स फिल्टर्सचा उपयोग - प्रकाशाचे गुणधर्म लेन्सच्या आधीच बदलताना...

LensFiltersलेन्स फिल्टर्स हे व्यावसायिक दर्जाच्या छायाचित्रणाचा एक अविभाज्य म्हणता येईल असा भाग आहे. मुळात लेन्स असताना अजून त्यावर काच का चढवायची हा सगळा मामला आहे. तो अगदीच चुकीचा आहे असे नाही. पण लेन्स आणि लेन्स फिल्टर्स हे एकमेकांच्या बरोबरीने आणि एकमेकांना पूरक असेच काम करत असतात एवढे सांगितले तरी पुरे आहे. सर्वोत्तम लेन्स ती मानली जाते जी प्रकाशाचे गुणधर्म कमीत कमी बदलतील अशा पद्धतीने प्रकाशाचे योग्य संकेंद्रीकरण साधते. आणि सर्वोत्तम लेन्स फिल्टर तेच जे प्रकाशाचे गुणधर्म आपल्याला हवे तसे आणि एकसमानपणे बदलण्याची मुभा देतात. म्हणूनच ज्याप्रमाणे बाजारात अतिशय हलक्या दर्जाचे पण तितकेच स्वस्त लेन्स फिल्टर आहेत तसेच कधीकधी काही लेन्सेसपेक्षाही महागडे असे लेन्स फिल्टरपण आहेत. याचाच एक व्यावहारीक अन्वयार्थ असाही होतो की लेन्सइतकेच महत्त्वाचे तिच्यावर चढवले जाणारे हे काचेचे तुकडेपण आहेत. आणि ते योग्य रीतीने आणि योग्य परिस्थितीत वापरले असता कुठल्याही डिजिटल पोस्टप्रोसेसिंगने मिळणार नाही असा परिणाम तुमच्या प्रतिमांमध्ये आणू शकतात. लेन्स फिल्टर हे कधीकधी तुमच्या प्रतिमांमध्ये एक हलकासा परिणाम साधतात तर कधीकधी प्रतिमा पूर्णपणे बदलूनही टाकतात. कुठला फिल्टर कधी वापरायचा ते थोडे प्रशिक्षण आणि बराचसा अनुभव यावरून ठरवता येऊ लागते.

लेन्स फिल्टरचे काही उपयोग -
      १. छायाचित्रणाला अवघड अशा प्रकाशात हवे तसे छायाचित्रण करणे.
      २. प्रकाशातील विशिष्ट तरंगलांबीच्या किरणांना उठाव देणे.
      ३. प्रकाशाचे परिवर्तन आणि अंतर्गत परावर्तन कमी करणे.
      ४. प्रकाशलहरींचे ध्रुवीकरण नियंत्रित करणे.
      ५. प्रकाशाची तीव्रता कमी करणे.
      ६. छायाचित्रणाला आवश्यक असलेला प्रकाशाचा दर्जा मिळवण्यासाठी मदत करणे.

लेन्स फिल्टर्सचे प्रयोजनानुसार प्रकार...

लेन्स फिल्टर
छायाचित्रणाचा प्रकार
उद्देश

क्लिअर/हेझ फिल्टर
सर्व
लेन्सच्या पुढच्या भागाचे धूळ, आर्द्रता आणि ओरखडे इ. पासून रक्षण करतात.

यूव्ही फिल्टर
सर्व
अतिनील किरणांपासून फिल्म किंवा संवेदकाचे रक्षण करणे.

कलर कन्वर्जन फिल्टर
सर्व
विशिष्ट रंगांच्या लहरी शोषून घेऊन योग्य व्हाईट बॅलन्स साधायला मदत करणे. डिजिटल पोस्टप्रोसेसिंग युगात फारसा उपयोग नाही.

पोलराइजिंग फिल्टर
सर्व
प्रकाशाचे ध्रुवीकरण करणे. परावर्तित प्रकाश अडवणे, रंगवैविध्य वाढवणे, स्पष्टता व व्यतिरेक वाढवणे.

न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर
लॅण्डस्केप/फ्लॅश छायाचित्रण
प्रकाशाची तीव्रता कमी करणे. जेणेकरून दीर्घ शटर इंटर्वल वापरून मोशन ब्लर परिणाम साधता येतो. मोठे अ‍ॅपर्चर फ्लॅशबरोबर वापरायचे असल्यासही उपयोग होतो.

ग्रॅज्युएटेड न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर
लॅण्डस्केप छायाचित्रण
प्रकाशाची तीव्रता प्रतिमेच्या काही भागापुरतीच कमी करणे. उदा. सूर्यास्ताच्या वेळी आकाशाचे रंग खुलवण्यास, इ.

क्लोजअप् फिल्टर
मॅक्रो व क्लोजअप् छायाचित्रण
लेन्सला तिच्या अभिधानित किमान संकेंद्रिकरण अंतरापेक्षा कमी अंतरावर संकेंद्रिकरण (फोकस) करायला मदत करणे.

स्प्लिट-डायोप्टर फिल्टर
क्लोजअप् छायाचित्रण
क्लोजअप् फिल्टरचा विशेष प्रकार.

क्रॉस-स्क्रिन किंवा स्टार फिल्टर
प्रॉडक्ट व फॅशन छायाचित्रण
प्रतिमेतल्या ब्राइट बिंदूंना तार्‍यांसारखा आकार येतो. उदाहरण म्हणजे कार लॉन्च किंवा ज्यूलरी वगैरेंचे छायाचित्रण

डिफ्यूजन फिल्टर
पोर्ट्रेट व फॅशन छायाचित्रण
प्रतिमेतील कॉन्ट्रास्ट कमी करून किंचित धूसरपणा आणला जातो. विशेषतः मॉडेलच्या डोळ्यांमधील स्वप्नाळूपणाची झाक ह्या फिल्टरमुळे येते.

मल्टीव्हिजन फिल्टर
आर्टिस्टिक इफेक्टसाठी
एकाच वस्तूची अनेक दृश्ये प्रतिमेत दिसतात. हल्ली आउट ऑफ् फॅशन.

इन्फ्रारेड फिल्टर
शास्त्रीय व लॅण्डस्केप छायाचित्रण
अवरक्त किरणांखेरीज इतर तरंगलांबीचा प्रकाश शोषून घेणे. लॅण्डस्केप छायाचित्रणात कधीकधी कॉन्ट्रास्ट वाढवण्यासाठी उपयोग होतो. नाइट व्हीजन छायाचित्रणातही उपयोग.

बोके फिल्टर
आर्टिस्टिक इफेक्टसाठी
बोकेचा नेहमीचा गोलसदृश किंवा अ‍ॅपर्चरसारखा आकार बदलून त्याऐवजी वेगवेगळ्या आकाराचा बोके मिळवणे. मध्यभागी विशिष्ट आकार. त्यामुळे बोके बदलतो.

क्लिअर/हेझ फिल्टर
      क्लिअर फिल्टर्स किंवा छायाचित्रणाच्या भाषेत 'फ्लॅट्स' (किती बीएचके ते विचारू नये!) हे केवळ लेन्सच्या पुढील भागाला (एलिमेंटला) ओरखडे, फुटणेवगैरेंपासून वाचवण्यासाठी वापरले जातात. आदर्श (पुन्हा हाच शब्द का बरं सुचला!) फ्लॅट्स हे त्यावर पडणारा प्रकाश कुठल्याही प्रकारे न बदलता लेन्सकडे जाऊ देतात. अर्थात, इतके 'आदर्श' कुणीच नसते म्हणा. ;-) पृष्ठभागांचा एकसमान सपाटपणा आणि तंतोतंत समांतरपणा हे दोन्ही गुणधर्म प्रकाशअभियांत्रिकीत साधता येणं खूप कठीण आहे.

      हेझ फिल्टर्स हे प्रकाशातील धूसरपणा कमी करणे किंवा कमी दृश्यमानता (रिड्यूस्ड विजिबिलिटी) वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे प्रतिमेतील कॉन्ट्रास्ट वाढतो व पर्पल फ्रिंजिंग म्हणजे वर्णविक्षेप कमी होण्यास मदत होते. यूव्ही फिल्टरसुद्धा अशाच प्रकारचा परिणाम साधतात. त्यामुळे वेगळे हेझ फिल्टर कुणी घेत नाहीत.

यूव्ही फिल्टर
      UVFilterHoyaHMCयूव्ही फिल्टर हे प्रकाशाच्या वर्णपटातील अतिनील किरणे शोषून घेतात. (काही यूव्ही फिल्टर मात्र अतिनील किरणे सोडून इतर सर्व तरंगलांबीचे किरण थोपवतात. त्यामुळे यूव्ही फिल्टर घेताना आधी तशी खात्री करून घ्यावी.) फिल्मच्या जमान्यात ही अतिनील किरणे जाम त्रास द्यायची. पण डिजिटल संवेदकांवर पुष्कळदा संवेदकाच्या आधी जो ब्लर फिल्टर असतो तोच अतिनील किरणे अडवण्याचेही काम करत असल्याने पुन्हा एक यूव्ही फिल्टर लेन्सवर लावण्याचे फारसे प्रयोजन उरत नाही. हल्ली यूव्ही फिल्टर हे केवळ वर उल्लेखलेल्या फ्लॅट्स प्रमाणे लेन्सच्या फ्रंट एलिमेंटचे रक्षण करण्यासाठी वापरले जातात.

तुम्ही तुमच्या प्रत्येक लेन्सवर यूव्ही फिल्टर लावावा की नाही?
      सगळ्यात आधी कुणी मलाच हा प्रश्न विचारला तर मी म्हणेल, होय. मी माझ्या सर्व लेन्सवर यूव्ही फिल्टर वापरतो. कारण त्यामुळे मला निदान माझी महागडी लेन्स सुरक्षित राहण्याची खात्री (पीस ऑफ् माइंड) मिळते आणि हे फिल्टर जास्त काळजी न घेताही साफसूफ करायला लेन्सच्या फ्रंट एलिमेंटपेक्षा सोपे असतात. लेन्सच्या पुढील भागावर विशेष थर (कोटिंग) असते. त्यामुळे अगदी तुम्ही तुमचा उच्छवास सोडून मायक्रोफायबर कपड्यानेही लेन्सवर साठलेली धूळ किंवा बोटांचे ठसे वगैरे स्वच्छ करायला गेलात तरी त्यातील आम्लाच्या अंशामुळे आणि कपड्याच्या व धूलिकणांच्या घर्षणामुळे असे कोटिंग खराब होण्याची पूर्ण शक्यता असते. म्हणून मी माझी लेन्स बदलण्यापेक्षा किंवा नीट करून घेण्यापेक्षा एक यूव्ही फिल्टर ठराविक कालावधीनंतर बदलणे जास्त पसंत करीन. अर्थात यूव्ही फिल्टर प्रत्यक्ष प्रतिमा घेताना आवश्यक असतील तरच वापरले जातात. नाहीतर तेवढ्यापुरते ते काढून ठेवले जातात. शिवाय यूव्ही फिल्टर वापरल्यामुळे लेन्स फ्रंट एलिमेंट अगदी नव्यासारखा राहत असल्याने अशा लेन्सला भविष्यात पुनर्विक्रीमूल्यही चांगले मिळते. अजून एक मुद्दा म्हणजे काही मॅक्रो लेन्स व ५०मिमी लेन्सचे फ्रंट एलिमेंट हे थोडे आत असतात व बाजूने लहान होत गेलेला थ्रेडेड पोर्शन असतो. अशा लेन्सेस स्वच्छ करायला अवघड असल्याने त्यांच्यावर यूव्ही फिल्टर वापरणे कमी कटकटीचे ठरते.
      पण यूव्ही फिल्टरच्या उपयोगावर आक्षेप घेणारे छायाचित्रकारही काही महत्त्वाचे मुद्दे मांडतात. पहिले म्हणजे व्हाय ऑन द अर्थ वुड आय वॉण्ट टू पुट अ फिफ्टिन डॉलर ग्लास ऑन माय फिफ्टिन हन्ड्रेड डॉलर लेन्स?मुद्दा एकदम ठीक आहे. पण याचे उत्तर मी लेखाच्या सुरुवातीलाच दिले आहे.
      अजून काही आक्षेप म्हणजे यूव्ही फिल्टरमुळे किंचित वर्णविक्षेप किंवा नको असलेली रंगछटा येऊ शकते. लेन्स फ्लेअर म्हणजे अंतर्गत भागातून अस्ताव्यस्तपणे परावर्तित होणारा प्रकाश, घोस्ट्स म्हणजे काही भागात विषयवस्तूंची प्रतिबिंबे दिसणे, विनेटिंग म्हणजे कोपर्‍यांमध्ये गडदपणा येणे असे काही प्रतिमादोष येण्याची शक्यता विशेषतः हलक्या दर्जाचे यूव्ही फिल्टर वापरल्याने वाढते.
      हे सगळे मुद्दे विचारात घेऊन यूव्ही फिल्टर वापरायचा की नाही हे ज्याने-त्याने ठरवायचे. वापरल्याने फार मोठा फायदा होतो असेही नाही आणि न वापरल्याने तोटा होतो असेही नाही.

कलर कन्वर्जन आणि कलर सबट्रॅक्शन फिल्टर
      ColorConversionFiltersडिजिटल युगात पोस्टप्रोसेसिंगमध्ये आपल्याला हवे तसे व्हाइट बॅलन्स आणि रंगपटलाशी खेळता येत असल्याने आता अशा फिल्टर्सचे महत्त्व खूपच कमी झाले आहे. पण फिल्मयुगात जिथे मोनोक्रोमॅटिक प्रकाश असायचा तिथे व वॉर्म/कूल किंवा डे-लाइट फिल्मसाठी असे फिल्टर्स अतिशय उपयोगी ठरत असत. अजूनही लाल किंवा तत्सम फिल्टर्सचा उपयोग प्रतिमेतील कॉन्ट्रास्ट आणि सॅच्युरेशन नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी कृष्णधवल लॅण्डस्केप छायाचित्रणात केला जातो. काही हुशार छायाचित्रकार अशा फिल्टरचा वापर अगदी पोर्ट्रेटचित्रणातही यशस्वीरित्या करतात.

पोलराइजिंग फिल्टर
      पोलराइजिंग फिल्टर नेमके काय काम करतो हे समजण्यासाठी प्रकाशभौतिकीचे थोडे ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रकाशकिरण ह्या वास्तविक पाहता लहरी असतात. (पुंजवाद किंवा क्वांटम थिअरी थोडी बाजूला ठेवू यात.) ह्या लहरींची सरकण्याची दिशा किंवा ध्रुवीकरण हे सर्वसाधारणपणे एकाच दिशेत नसते तर ते वेगवेगळ्या दिशेत फाकत जाणारे असतात. त्यामुळेच वातावरणातील धूलिकणांमुळे प्रकाशाचे विकीरण होऊन सावलीतील भागातही काही प्रमाणात का होईना प्रकाश पोहोचतो. छायाचित्रणात मात्र असा विखुरला जाणारा प्रकाश नको असलेल्या अडचणी निर्माण करू शकतो. विशेषतः धातूंच्या किंवा पाण्याच्या चकाकत्या पृष्ठभागावरून परावर्तित होणारे 'स्ट्रे' म्हणजे चुकार प्रकाशकिरण हे प्रतिमांमध्ये धूसरपणा आणू शकतात. हे टाळण्यासाठी पोलराइजिंग फिल्टर्स वापरले जातात. पोलराइजिंग फिल्टरचे काम म्हणजे प्रकाशलहरींचे ध्रुवीकरण हे एकाच दिशेत ठेवणे.
CPFilterपोलराइजिंग फिल्टर विशेषतः पाण्याच्या प्रवाहाच्या तळाची छायाचित्रे घेण्यासाठी वापरले जातात. पोलराइजिंग फिल्टर न वापरता असे छायाचित्रण केले तर पाण्याच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणार्‍या प्रकाशामुळे अशी प्रतिमा एवढी खास अशी येत नाही. पण पोलराइजिंग फिल्टर वापरल्याने तळाचे दगडबिगड असे एकदम छान दिसतात. त्याचप्रमाणे आकाशाचा निळेपणा वाढवण्यासाठीही ह्या फिल्टरचा वापर केला जातो. (प्रतिमा प्रताधिकार - डार्विन विजेट)

      पोलराइजिंग फिल्टर हे दोन प्रकारचे असतात. लिनिअर आणि सर्क्युलर. लिनिअर पोलराइजिंग फिल्टर स्वस्त असतात. पण डिजिटल कॅमेर्‍यांच्या मीटरिंग आणि स्वयंसंकेंद्रिकरण प्रणालींना ते गंडवतात. कारण अशा प्रणाली ह्या बीम-स्प्लिटर मिरर यंत्रणेवर कार्य करतात. (संदर्भ - छायाचित्रण भाग ३. डीएस्एल्आर कॅमेर्‍यांची रचना). यावर उपाय म्हणून सर्क्युलर पोलराइजिंग (सीपी) फिल्टर वापरले जातात. सीपी फिल्टर हे लिनिअर फिल्टरच असतात. फक्त त्यांच्यामागे अजून एक काच असते जी लिनिअर पोलराइज्ड प्रकाशाला सर्क्युलर दिशेत पोलराइज करते.
पोलराइजिंग फिल्टर वापरताना -
      पोलराइजिंग फिल्टर हे फिल्टरचे दोन्ही भाग एकमेकांच्या सापेक्ष फिरवून वापरले जातात. त्यामुळे पोलराइजिंग फिल्टरचा किमान आणि कमाल असा दोन प्रकारचा परिणाम असतो. सूर्याच्या दिशेला पूर्ण लंबरूप असताना पोलराइजिंग फिल्टरचा परिणाम हा सर्वात जास्त असतो.
      पोलराइजिंग फिल्टरमुळे संवेदकावर पडणारा प्रकाश अगदी दोन ते तीन स्टॉप्स ने कमी होत असल्याने गतिमान विषयवस्तूंच्या छायाचित्रणासाठी किंवा कॅमेरा तिवईच्या (ट्रायपॉड) आधाराशिवाय वापरताना पोलराइजिंग फिल्टर वापरल्यास काळजी घ्यावी लागते.
      अल्ट्रावाइड अ‍ॅन्गल लेन्सवर पोलराइजिंग फिल्टर वापरल्यास आकाश फक्त मध्यभागीच गडद निळे दिसते. त्यामुळे अशा लेन्सवर पोलराइजिंग फिल्टर वापरू नये कारण अशा प्रतिमा डिजिटल पोस्टप्रोसेसिंगमध्येही दुरुस्त करायला अवघड असतात.
      इतर फिल्टरसोबत स्टॅक करून वापरल्यास पोलराइजिंग फिल्टर्सच्या जाडीमुळे विनेटिंगचा प्रभाव जाणवू शकतो.

न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर
      कॅमेर्‍याच्या संवेदकापर्यंत पोहोचणार्‍या प्रकाशाची तीव्रता एकसमानपणे कमी करणे हे न्यूट्रल डेन्सिटी किंवा एनडी फिल्टर्सचे काम आहे. विशेषतः जेव्हा अगदी किमान ISO सेटिंग (ISO100) आणि किमान अ‍ॅपर्चर (f/22) वापरूनही प्रकाश जास्त असल्याने हवे तितके शटर इंटर्वल उदा. 2s किंवा 5s वापरणे जिथे शक्य होत नाही अशा वेळेस एनडी फिल्टर वापरून तुम्ही लॉन्ग एक्स्पोजर शॉट घेऊ शकता आणि तरीही प्रतिमा जरूरीपेक्षा जास्त ब्लो-आउट होत नाही.
न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर चे काही उपयोग -
      १. धबधबे, खडकाळ समुद्र इत्यादींच्या प्रतिमांमध्ये वाहत्या पाण्याचा दुधाळ आभास निर्माण करणे.
      २. जास्त प्रकाशात मोठे अ‍ॅपर्चर वापरून नियंत्रित डेप्थ ऑफ् फिल्ड मिळवणे.
      ३. प्रत्येक लेन्सचा एक 'स्वीट स्पॉट' असतो ज्या अ‍ॅपर्चरला ती लेन्स सर्वात जास्त शार्प प्रतिमा देते. शक्यतो f/5.6 ते f/11 ह्या पट्ट्यातील अ‍ॅपर्चरला लेन्स वापरायची असेल, पण खूप प्रखर प्रकाशामुळे ह्यापेक्षा लहान अ‍ॅपर्चर वापरावे लागत असेल तर शार्पनेस मिळवण्यासाठी एनडी फिल्टर वापरतात.
      ४. हलत्या विषयवस्तूंना ब्लर इफेक्ट देण्यासाठी.
      ५. फ्लॅश छायाचित्रण दिवसा करण्यासाठी. फ्लॅश वापरताना फ्लॅश सिंक स्पीड हा जास्तीत जास्त 1/200 किंवा 1/250
एवढाच ठेवता येतो. ह्यापेक्षा लहान शटर इंटर्वल वापरता येत नाही.
म्हणजे तुम्हांला अ‍ॅपर्चर व्हॅल्यू लहान ठेवावी लागेल. पण समजा तुम्हांला शार्प प्रतिमा पाहिजे. आणि बोके पण आला पाहिजे. तर मग अ‍ॅपर्चर f/2.8 किंवा f/4 असे वापरावे लागेल. अशा परिस्थितीतही एनडी फिल्टर कामी येतात.

      एनडी फिल्टर हे प्रकाश किती f-स्टॉपने कमी करतात यावर त्यांचा क्रमांक दर्शवलेला असतो. उदा. ND4 हा फिल्टर वापरल्यास प्रकाशाची तीव्रता चार स्टॉपने कमी होईल, किंवा शटर इंटर्वल हे f/16 ने वाढेल.

StricklandFallsND

ND Filter Use - From Wikipedia

      तुमच्याकडे महागडे एनडी फिल्टर नसतील आणि पावसाळ्यात धबधब्याचे मोशन-ब्लर पद्धतीने छायाचित्रण करायचे असेल तर निराश होऊ नका. वेल्डिंगची १४ नंबरची वापरलेली काच किंवा तिचा तुकडा कुठलाही वेल्डिंगवाला चकटफू देईल. तो चक्क चिकटपट्टीने लेन्सला पुढून डकवून आणि मोठ्या दगडाचा किंवा शिळेचा उपयोग ट्रायपॉडसारखा करूनही तुम्ही चांगल्या प्रतिमा मिळवू शकता... ;)
ग्रॅज्युएटेड न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर
      ग्रॅज्युएटेड न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर म्हणजेच जीएनडी फिल्टर हे प्रकाशाची तीव्रता फ्रेमच्या एका बाजूकडून विरुद्ध बाजूकडे कमी करत नेतात. हा फरक किती तीव्र आहे ह्यावर जीएनडी फिल्टर्सचे सॉफ्ट-एज ग्रॅज्युएटेड न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर आणि हार्ड-एज ग्रॅज्युएटेड न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर असे दोन प्रकार पडतात. त्याचप्रमाणे मध्यभागी जास्त घनता व कडेला विरळ होत जाणारे रेडिअल ब्लेण्ड न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर सुद्धा मिळतात. अजून एक प्रकार म्हणजे रिवर्स ग्रॅज्युएटेड न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर. यात क्षितिजाकडून बाजूकडे घनता वाढत जाण्याऐवजी बाजूकडून क्षितिजरेषेकडे म्हणजे मध्यभागी घनता वाढत जाते आणि क्षितिजरेषेखाली पुन्हा घनता एकदम विरळ होते. ह्या फिल्टरचा वापर सूर्यास्ताच्यावेळी सूर्य क्षितिजाच्या जवळ असताना व खूप प्रखर असताना तेवढाच भाग गडद करण्यासाठी केला जातो.

GraduatedNDFilters

जीएनडी फिल्टर्स

      जीएनडी फिल्टरचा सर्वात जास्त वापर हा फिल्मयुगात सूर्यास्ताला कॅमेर्‍यात कैद करण्यासाठी व्हायचा. आकाशाचा भाग जास्त गडद करून त्यातील रंगांची उधळण मिळवायची आणि त्याचबरोबर जमिनीचा/समुद्राचा भाग अंडरएक्स्पोज होऊ न देता तिथेही गरजेप्रमाणे योग्य एक्स्पोजर मिळवणे किंवा लाटांना ब्लर-आऊट करणे यासाठी जीएनडी फिल्टर अत्यावश्यक असायचे. डिजिटल युगात अगदी साध्या सॉफ्टवेअरमध्येही असे करण्याची सुविधा असते. त्याचबरोबर क्षितिजाच्या वरील व खालील भागांसाठी दोन वेगवेगळी एक्स्पोजर घेऊन नंतर अशा प्रतिमांचे लेअर ब्लेण्ड करूनही हवा तसा परिणाम आता मिळवता येतो.

क्लोजअप् फिल्टर
      क्लोजअप् फिल्टर हे रूढार्थाने फिल्टर नसले तरी बसवण्याची आणि वापरण्याची पद्धत समान असल्याने त्यांना फिल्टर हेच नाव पडले आहे. क्लोजअप् फिल्टर हे कॉन्वर्जिंग लेन्स म्हणजेच भिंग आणि/किंवा अजून एक काच असे बनलेले असते. छायाचित्रण भाग ६. मॅक्रो आणि क्लोजअप् ह्या भागात ह्या फिल्टरच्या उपयोगाची माहिती दिली असल्याने इथे उद्धृत करीत नाही.

स्प्लिट डायॉप्टर फिल्टर
      क्लोजअप् छायाचित्रणात फारच अरूंद अशी डेप्थ ऑफ् फिल्ड मिळत असल्याने जर तुम्हांला विषयवस्तूसकट पार्श्वभूमीसुद्धा फोकसमध्ये घ्यायची असेल तर स्प्लिट डायोप्टर फिल्टर वापरतात. ह्यात फिल्टर होल्डिंग अ‍ॅटॅचमेंटमध्ये लेन्सचा थोडासाच भाग व्यापेल असा क्लोजअप् फिल्टरचा साधारणतः अर्धवर्तुळाकार भाग बसवलेला असतो. म्हणून ह्या फिल्टरला स्प्लिट डायॉप्टर लेन्स असे म्हणतात.

क्रॉस-स्क्रिन किंवा स्टार फिल्टर

StarFilter
स्टार फिल्टर्स

      प्रतिमेतील प्रखर प्रकाशाचे बिंदूस्रोत हे अशा फिल्टरमुळे तार्‍यांसारखे दिसतात. उदा. एखाद्या ऑटो-एक्स्पो मध्ये नवीनच लॉन्च झालेल्या कारच्या मॉडेलचे चित्रिकरण करताना अशा फिल्टरमुळे एक स्वप्नवत व ऐशोआरामी फिल येतो. अगदी फॅशन फोटोग्राफीमध्येही डिफ्यूजन फिल्टर आणि क्रॉस-स्क्रीन फिल्टर एकत्र वापरलेले मी पाहिले आहेत.

डिफ्यूजन फिल्टर
      डिफ्यूजन फिल्टरमुळे प्रतिमेतील कॉन्ट्रास्ट कमी होऊन एक प्रकारचा सौम्यपणा येत असल्याने पोर्ट्रेट छायाचित्रणात ह्या फिल्टरचा वापर जास्त केला जातो. ह्याच कारणाने ह्याला सॉफ्टनिंग फिल्टर असेही म्हटले जाते.

मल्टीव्हिजन फिल्टर
      मल्टीव्हिजन फिल्टरमुळे प्रतिमेत त्याच त्याच वस्तूंची अनेक दृश्ये निर्माण होतात. हल्ली कालबाह्य.

इन्फ्रारेड फिल्टर
      इन्फ्रारेड फिल्टर हे प्रकाशाच्या वर्णपटातील अवरक्त किरणे (इन्फ्रारेड रेज. लाल पट्ट्याच्या पलिकडील भाग.) सोडून इतर सर्व प्रारण शोषून घेते व संवेदकापर्यंत फक्त अवरक्त किरणेच पोहोचतात. विशेषतः कृष्णधवल छायाचित्रणात इन्फ्रारेड फिल्टर्सचा वापर केला जातो. इन्फ्रारेड फिल्टर हे अतिशय गडद असतात आणि सामान्यपणे मानवी डोळ्यांना त्यातून पलिकडले काही दिसत नाही. प्रकाशाचा बराचसा भाग शोषून घेत असल्याने असे फिल्टर वापरताना दीर्घ शटर इंटर्वल वापरावे लागते. स्वच्छ सूर्यप्रकाशात लॅण्डस्केप छायाचित्रण करताना कधीकधी विशेष परिणामांसाठी इन्फ्रारेड फिल्टर वापरले जातात.अशा प्रतिमांमध्ये आकाश काळपट, तर हिरवी झाडी ही पांढरी येते.

Light-Spectrum

प्रकाशाचा वर्णपट आणि अवरक्त प्रारणांचे स्थान

      निकॉनच्या डीएस्एल्आरमध्ये आणि त्यातही नवनवीन मॉडेल्समध्ये संवेदकावरील ऑप्टिकल लो पास फिल्टरसोबतच यूव्ही आणि इन्फ्रारेड प्रारणे थोपवणारे फिल्टर असतात. त्यामुळे इन्फ्रारेड छायाचित्रण करायचे असेल तर त्यासाठी निकॉनचा जुना डीएस्एल्आर वापरावा. हेच तत्त्व थोड्याफार फरकाने इतर उत्पादकांच्या मॉडेल्सनाही लागू आहे.

बोके फिल्टर
      बोके फिल्टरच्या मध्यभागी वेगवेगळ्या आकारांचे पॅटर्न असतात. उदाहरणार्थ चांदण्या किंवा बाणाचे टोक इत्यादी. त्यामुळे प्रतिमेतील आउट-ऑफ्-फोकस पार्श्वभूमीलाही त्याच आकारासारखे आकार प्राप्त होतात. बोके फिल्टरचा परिणाम पोस्टप्रोसेसिंगमध्ये साधणे फार अवघड असले तरी हे फिल्टर फारसे कोणी वापरत नाहीत.

BokehFilter

असा हृदयरूपी बोके कुणाला आवडणार नाही? *KISSING*

फिल्टर्सचे मटेरिअल व कोटिंग ...

      बरेचसे फिल्टर्स हे विशेषतः बोरॉनमिश्रित काचेपासून बनवले जात असले तरी रेजिन व इतर प्रकारच्या प्लॅस्टिकचाही वापर वाढला आहे. वेगवेगळे फिल्टर्स हे तशा प्रकारच्या द्रव्यापासूनही बनवले जातात किंवा असे पदार्थ फिल्टर बनवताना त्यात मुद्दाम घातले जातात. उदा. पोलरायजिंग फिल्टरमध्ये विशेष प्रकारच्या प्लॅस्टिकचा थर दिलेला असतो तर विशेष फिल्टर्समध्ये नायलॉन जाळी, मायक्रोलेन्सेस वगैरेंचा वापर केला जातो.
      फिल्टर अ‍ॅक्सेसरीज आणि फिल्टरचा धातूचा भाग हे शक्यतो अ‍ॅल्युमिनिअमपासून बनवले जातात. काही वेळा हलक्या दर्जाच्या फिल्टरला सरळसरळ प्लॅस्टिक वापरलेलेही दिसून येते. पितळी भिंगरी असणारे फिल्टर आता दुर्मिळ झाले आहेत. पण ते खरेच पिढ्यानपिढ्या टिकतात.
      मल्टिकोटेड फिल्टर्स हे प्रकाशाचे परावर्तन रोखून जवळजवळ ९८% प्रकाश न अडवता जाऊ देतात. त्याचबरोबर फ्लेअर व घोस्टिंगलाही आळा घालतात.

लेन्स फिल्टर्सचे आकार व माउंटिंग इत्यादीनुसार प्रकार...

सर्क्युलर स्क्रू-ऑन फिल्टर
      आपल्या लेन्सच्या पुढील काचेच्या बाजूने लेन्सच्या प्लॅस्टिक आवरणाचा काही भाग थोडा बाहेर आलेला दिसतो. बारकाईने पाहिल्यास त्याला आतून थ्रेड असल्याचे दिसून येईल. हे थ्रेड स्क्रू-ऑन प्रकारचे फिल्टर लेन्सवर चढवता यावेत यासाठी असतात. अशा फिल्टर्सच्या परिघावर थ्रेडिंग असते आणि झाकण फिरवल्याप्रमाणे गोल फिरवून हे फिल्टर तुमच्या लेन्सवर बसवता येतात. बरेचसे यूव्ही, सीपी, एनडी आणि कलर फिल्टर हे सर्क्युलर स्क्रू-ऑन प्रकारात मोडतात. इथे वाइड अ‍ॅन्गल लेन्सच्या बाबतीत विनेटिंग (Vignetting) येण्याची शक्यता फिल्टरच्या जाडीनुसार वाढते. यावर पर्याय म्हणून अल्ट्रा-थिन फिल्टरही बाजारात मिळतात. पण काही अल्ट्रा-थिन फिल्टरवर मग दुसरा फिल्टर लावायला फिल्टर थ्रेड किंवा लेन्सकॅप चढवायला जागाच शिल्लक नसते असेही आढळते. यावर पर्याय म्हणजे असे अल्ट्रा-थिन फिल्टर वाइड अ‍ॅन्गल लेन्सवर वापरताना फक्त आवश्यक तेव्हाच वापरावेत. नाहीतरी वाइड अ‍ॅन्गल लेन्स म्हणजे निवांतपणा. एक्स्ट्रीम टेलिफोटो लेन्सेसप्रमाणे त्यात तो एकच एक क्षण पकडण्याची घाईगडबड, धांदल नसते.

      लेन्सच्या पुढील भागाच्या व्यासानुसार ह्या सर्क्युलर स्क्रू-ऑन फिल्टरचे आकारही ठरलेले आहेत. म्हणजे तुमच्या लेन्सवर जर Ø55mm असे लिहिलेले असेल तर अशा लेन्ससाठी फिल्टर निवडतानाही तुम्हांला त्याच व्यासाचा फिल्टर निवडावा लागेल. उदा. तुमच्या Tokina 11-16mm लेन्सला 77मिमीचा फिल्टर लागेल, तर 18-55mm किट लेन्सला 52मिमीचा फिल्टर बसेल. मग एवढ्या सगळ्या लेन्सेससाठी दरवेळी वेगळ्या आकाराचे फिल्टर घ्यायचे का? नाही. मोठ्या आकाराचे फिल्टर घेऊन ते स्टेप-अप रिंगने छोट्या व्यासाच्या लेन्सलाही बसवता येतात.

स्क्वेअर फिल्टर
      स्क्वेअर किंवा चौकोनी आकाराचे हे फिल्टर आता डीएस्एल्आरच्या स्थिरछायाचित्रणाच्या दुनियेततरी फारसे वापरात नाहीत. यात फिल्टर होल्डर, जो तुमच्या लेन्स फिल्टर थ्रेडवर बसवता येतो आणि मग होल्डरमध्ये विविध फिल्टर गरजेनुसार स्टॅक करून म्हणजे एकाआड एक असे लावता येत असत. ३ बाय ३ इंच, ४ बाय ४ इंच अशा आकारात हे फिल्टर मिळत. चलतचित्रिकरणाच्या दुनियेत आणि स्टुडिओ लाइट्समध्ये विशेषतः जेल फिल्टर्सना आधार देण्यासाठी मात्र अजूनही स्क्वेअर फिल्टर्सचा वापर होतो.

रेक्टॅन्ग्युलर फिल्टर
      लॅण्डस्केप छायाचित्रकारांच्या आवडीचे हे रेक्टॅन्ग्युलर फिल्टर विशेषतः ग्रॅज्युएटेड न्यूट्रल डेन्सिटी फिल्टरसाठी वापरले जातात. ग्रॅज्युएटेड न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर वर-खाली करून अ‍ॅड्जस्ट करता येतील अशा प्रकारे ते फिल्टर होल्डरमध्ये बसवण्यात येतात. स्क्वेअर फिल्टरमध्ये फिल्टर इकडेतिकडे करण्यास वाव नसतो. पण आयताकृती फिल्टरमध्ये फिल्टर हवा तसा हलवून विशेषतः प्रतिमेच्या चौकटीतील क्षितिजरेषेशी समायोजित करून सूर्यास्तासारख्या देखाव्यांचे नेत्रसुखद व विलोभनीय चित्रण करणे आपल्याला शक्य होते. ४ बाय ६ इंच हा या प्रकारच्या फिल्टरमधील सर्वात लोकप्रिय आकार आहे.

ड्रॉप-इन फिल्टर
      तुम्ही जर का एखाद्या पक्षिछायाचित्रकाराकडील 600mm किंवा 800mm -रूपी मिनी-तोफ पाहिली असेल तर तुम्हांला अशा लेन्सच्या भल्याथोरल्या तोंडाला कसं काय फिल्टर बसवीत असतील असा प्रश्न नक्कीच पडला असेल. =-O आणि मग जर तोंडाला फिल्टर बसवायचा झाला तर तोही तसाच अवाढव्य असेल. आणि मग त्याची किंमतही तशीच खिसा फाडके असणार. लेन्स बनवणार्‍या कंपन्यांनी नेमकी हीच अडचण ओळखून तुम्हांआम्हांसारख्या गरीब छायाचित्रकारांवर कृपा केली आणि लेन्सच्या मागील बाजूस एक खाच पाडली. हे जे ड्रॉप-इन फिल्टर आहेत ते अशा खाचांचे बूच उघडून त्यात बसवले जातात. अशा प्रकारे तुमच्या 18-55mm किट लेन्सचा 52मिमीचा यूव्ही फिल्टर तुमच्या 600mm लेन्सलाही चालू शकतो. :)

बेयोनेट माउंट फिल्टर
      रोले आणि हासेलब्लाडसारख्या कंपन्यांनी त्यांच्या मीडिअम फॉरमॅट कॅमेर्‍यांसाठी खास बेयोनेट माउंट फिल्टर बनवले. डीएस्एल्आरवाल्यांनी अशा मीडिअम फॉरमॅटवाल्यांना 'तुमची द्राक्षेच आंबट आहेत' असे म्हणायचे असते. जाऊदेत. *yahoo* :-))

फिल्टर अ‍ॅक्सेसरीज् - स्टेपअप्/स्टेपडाउन रिंग
52To77StepUpRing      स्टेप-अप् किंवा स्टेप-डाउन फिल्टर अ‍ॅडॅप्टर रिंग म्हणजे काच नसलेली गोलाकार भिंगरी असते. अशा भिंगरीला एका बाजूला लहान व्यासावर बाहेरून मेल-थ्रेड असतात जे तुमच्या लेन्सच्या पुढील पृष्ठभागाच्या बाजूस असलेल्या फिमेल थ्रेडमध्ये बसतात. आणि दुसर्‍या बाजूला मोठ्या व्यासाच्या भागाच्या आतून फिमेल थ्रेड असतात ज्यांच्यामध्ये तुमचा फिल्टर बसवता येतो. स्टेप-अप् रिंगमुळे लहान व्यासाच्या लेन्सवर मोठ्या व्यासाचा फिल्टर वापरता येऊ शकतो. त्यामुळे सर्व प्रकारचे फिल्टर आपल्याकडील लेन्सेसच्या सर्व प्रकारच्या व्यासांसाठी नव्याने घेण्याची गरज नसते.
      तुलनेने स्टेप-डाउन रिंगचा फारसा असा उपयोग नसतो. पण समजा फुलफ्रेम कॅमेर्‍याच्या क्रॉपमोडवर छायाचित्रण करत असाल तर कदाचित स्टेप-डाउन रिंग वापरून लहान फिल्टरने काम भागून जाईलही.
      स्टेपअप्-स्टेपडाउन रिंग वापरताना कधीकधी लेन्सहूड वापरायला अडचण जाणवू शकते.

डिजिटल पोस्टप्रोसेसिंगच्या जमान्यात लेन्स फिल्टर्सची गरज काय?...

      एनडी फिल्टर, सीपी फिल्टर, इन्फ्रारेड फिल्टर आणि बोके फिल्टर वगळता इतर फिल्टर्स हळूहळू कालबाह्य ठरू लागले आहेत. मोशन ब्लर हा फोटोशॉप 'फिल्टर' वापरून स्टार फिल्टरचा परिणाम साधता येतो. गॉशियन ब्लर वापरून हवे तसे डिफ्यूजन मिळवता येते. कलर कन्वर्जन फिल्टर केवळ कृष्णधवल फिल्म छायाचित्रणापुरतेच राहिले आहेत. आणि जीएनडी फिल्टर निदान लॅण्डस्केपमध्येतरी समुद्रातील सूर्यास्त जेव्हा लाटांना मोशन ब्लर करून प्रतिमेत कैद करायचा असेल तेव्हाच हल्ली वापरले जातात.
      पण तरीही असे कितीतरी छायाचित्रकार आहेत ज्यांना त्यांचे फिल्टर पोस्टप्रोसेसिंगपेक्षाही जास्त प्रिय आहेत. हे फिल्टर्स अजूनही मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. आणि काही परिस्थितींमध्ये फिल्टर पोस्टप्रोसेसिंगच्या मर्यादांवर नक्कीच मात करतातही. उदाहरणार्थ डिजिटल युगात संवेदकांच्या रिझोल्यूशनची मर्यादा कॉन्ट्रास्ट मिळवण्यासाठी असते. जर संवेदकाच्या डायनॅमिक रेंजपेक्षाही जास्त कॉन्ट्रास्ट प्रतिमेत असेल, उदा. भौमितीय पॅटर्न, तर पोस्टप्रोसेसिंगमध्ये अशा प्रतिमा दुरुस्त करणे अवघड असते. अशा वेळी योग्य डिफ्यूजन फिल्टरने तुम्ही तुमच्या कॅमेर्‍यातच हवी तशी प्रतिमा कैद करू शकता.
      रूल ऑफ् थंब असा सांगता येईल की जिथे पोस्टप्रोसेसिंगने हवे तसे एक्स्पोजर मिळवणे अशक्य, कठीण, वेळखाऊ किंवा कंटाळवाणे असेल, तिथेतिथे लेन्स फिल्टर्सचा वापर जरूर करावा.
फिल्टर बनवणारे काही उत्पादक
      Singh-Ray यांचे फिल्टर्स - विशेषतः पोलराइजिंग फिल्टर्स हे जगात सर्वोत्तम फिल्टर्सपैकी मानले जातात. B+W आणि Heliopan ह्या जर्मन कंपन्या त्यांच्या Zeiss च्या काचा आणि पितळी भिंगर्‍यांसाठी प्रसिद्ध आहेत. Leica सुद्धा त्यांच्या लेन्स आणि कॅमेर्‍यांप्रमाणेच उत्कृष्ट फिल्टरसुद्धा बनवतात. Tiffen ही अमेरिकन कंपनी आहे. पण त्यांचे फिल्टर तितके दर्जेदार नसतात. Hoya मात्र त्यांच्या Tokina सारख्या भावंड कंपन्यांप्रमाणेच उत्तम ऑप्टिक्स कमी किंमतीत बनवतात. सिंग-रे फिल्टर किंवा बी+एच फिल्टर घेणे परवडत नसेल तर होया ला होय म्हणायला मागेपुढे पाहू नये. NiSi, Kenko असे बरेच उत्पादक तसेच नॉनब्रॅण्डेड उत्पादने उपलब्ध आहेत.

अधिक वाचनासाठी - "Complete Guide to Filters for Digital Photography" by Joseph Meehan.

जाताजाता
"She was only a paparazzo's daughter but she knew all about exposure."... ;-)

क्रमशः

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

30 Dec 2013 - 6:05 am | श्रीरंग_जोशी

वाह, इतकी सारी क्लिष्ट तांत्रिक माहिती एवढ्या सहजपणे मांडण्याचे आव्हानात्मक काम उत्तमपणे पार पाडले आहे.

अनेक धन्यवाद.

पाषाणभेद's picture

30 Dec 2013 - 8:26 am | पाषाणभेद

फारच छान माहिती.

Atul Thakur's picture

30 Dec 2013 - 8:48 am | Atul Thakur

जबरदस्त!!!!

जयंत कुलकर्णी's picture

30 Dec 2013 - 9:12 am | जयंत कुलकर्णी

छान लिहिलेय......जेव्हा पुस्तक काढाल तेव्हा त्यात छायाचित्रांसहीत स्पष्टीकरणे/उदाहरणे द्यावीत ही विनंती.........:-)

एस's picture

30 Dec 2013 - 10:54 pm | एस

धन्यवाद जयंतकाका, पण हा एक लेख लिहिता लिहिता पुरेवाट झाली. आख्खे पुस्तकवगैरे सध्यातरी डोक्यात नाही. त्यातही मराठीत या विषयावर लिहिणे तितके सोपे नाही. त्यामुळे इत्यलम्.. :)

स्पा's picture

30 Dec 2013 - 9:19 am | स्पा

जबर्यादस्त! !!!

पण प्रत्येक प्रकारासाठी छायाचित्र असायला हवे होते.
अजुनही टाकु शकता :-)

एस's picture

30 Dec 2013 - 11:07 pm | एस

प्रत्येक प्रकारचा फिल्टर गोळा करणे, त्याच्या उपयोगास अनुकूल परिस्थिती व विषयवस्तू शोधणे उदा. पावसाळ्यातील भल्या सकाळी वाहणारा धबधबा वगैरे. आणि तशी छायाचित्रे घेऊन त्यांचे संकलन करून इथे समाविष्ट करणे ही एक दीर्घ आणि दमवणारी प्रक्रिया ठरली असती. निदान वर्षभरतरी मला हा विषय ह्या 'कच्च्या माला'च्या कमतरतेमुळेच घ्यायचा नव्हता. पण वल्लींना दिलेल्या आश्वासनानंतर लेख लिहिणे क्रमप्राप्त झाले. अशी छायाचित्रे खरेतर खूपशा छायाचित्रकारांकडे असतातही. पण प्रताधिकार सोडायला हल्ली फारसे कुणी तयार नसते. (त्याचबरोबर मला कुणाला तुझ्या काही प्रतिमा दे रे असे म्हणणेही जड गेले हेही खरे आहेच म्हणा!)

>>पण प्रताधिकार सोडायला हल्ली फारसे कुणी तयार नसते.

हें बाकीं खरें हों !!

प्रचेतस's picture

30 Dec 2013 - 9:30 am | प्रचेतस

अतिशय सखोल माहिती.

होयाचा एनडी८, सीपीएल आणि युव्ही फिल्टर्सचा सेट नुकताच घेतलेला आहे. आता प्रयोग करून पाहयला हवे.

जेपी's picture

30 Dec 2013 - 10:41 am | जेपी

आवडला लेख.

मदनबाण's picture

30 Dec 2013 - 11:40 am | मदनबाण

वेळ मिळताच शांतपणे हा लेख वाचीन... सध्या तरी होया वापरतो आहे.

चौकटराजा's picture

30 Dec 2013 - 12:23 pm | चौकटराजा

एका वाचनात पूर्ण आकलन होणे अवघड असा हा विषय आहे.लेखकानी लिहायची चिकाटी दाखविलीय. नंतर नीट वाचतो असे म्हणणार्‍याने इमानदारीत वाचले पाहिजे. आपल्याकडे फिल्टरवाला क्यामेरा नसला तरी फिल्टरचे मह्त्व जाणून घेणे
आवश्यक आहे.

जबर्दस्त, माहितीपुर्ण, सखोल आणि नेहमीप्रमाणेच उत्तमही :)

फिल्टर्सचा योग्य उपयोग, त्यातील छोट्याछोट्या खाचाखोचा, वेगवेगळ्या लेन्स वा कॅमेर्‍यांच्या प्रकारांनुसार प्रत्येक फिल्टरचा बदलणारा परफॉर्मन्स इत्यादी गोष्टींबद्दलही खूप काही लिहिण्यासारखं आहे. यातील काही फिल्टर्स आपण सहजपणे उपलब्ध असणार्‍या गोष्टींपासून घरीसुद्धा बनवू शकतो. ह्या सर्व गोष्टींचा वेळोवेळी याच धाग्यावर मी उहापोह करत जाईन. त्याचबरोबर पुढच्या काही महिन्यांत किंवा सुमारे वर्षभराच्या कालावधीत प्रत्येक प्रकाराची उदाहरणादाखल छायाचित्रे आणि छायाचित्रांमागील कथाही इथेच टाकत जाईन.

प्रचेतस's picture

5 Jan 2014 - 7:49 pm | प्रचेतस

ग्रेट.
लिखाणाची वाट पाहतो आहे.

चौकटराजा's picture

7 Jan 2014 - 8:32 pm | चौकटराजा

आपल्या गोगलच्या काचेचा उपयोग ही फिल्टर सारखा होतो म्हणे. विशेषत" स्नोस्केप्चा फटू काढताना.

गॉगलच्या काचा सॉफ्ट-एज ग्रॅज्युएटेड न्यूट्रल डेन्सिटी फिल्टरसारख्या वापरता येऊ शकतात. अशा पद्धतीने हिमाच्छादित शिखरांचा विशेषतः सहस्त्ररश्मीच्या पहिल्या सोनकिरणांत न्हाऊन निघालेली प्रतिमा घेतलेली माझ्या अजून पाहण्यात नाही.

चौकटराजा's picture

11 Jan 2014 - 3:47 pm | चौकटराजा

असा फटू मी पहलगाम येथे काढल्याचे आठवतेय २००६ मधे.त्यावेळी नेटवरच ही शक्क्क्ल वाचली होती.पण ते तेव्ढेच !

पैसा's picture

15 Jan 2014 - 4:32 pm | पैसा

अतिशय माहितीपूर्ण लेख! फिल्टर्स खूप महागडे असतात असाच समज होता. इथले फिल्टर्सचे नमुने वाचून तो दूर झाला!

आत्ता परत उपयोगी पडला हा धागा :)

मराठी कथालेखक's picture

28 Oct 2015 - 7:30 pm | मराठी कथालेखक

Nikkor 18-55 mm lens करिता कोणता UV filter (make) चांगला ? प्रामुख्याने लेन्सला संरक्षण हाच उद्देश आहे, पण फिल्टरमुळे फोटोवर विपरित परिणाम होवू नये ही अपेक्षा.

एस's picture

28 Oct 2015 - 7:47 pm | एस

१८-५५ लेन्स मुळात फार महागडी नसते. त्यामुळे आणि इतरही कारणांमुळे ह्या लेन्ससाठी फार महागडे फिल्टर वापरण्यात अर्थ नाही. होया कंपनीचा यूव्ही फिल्टर चांगला आहे आणि किंमतही मीडियम आहे. तो फिल्टर लावून फोटो घेऊ शकता. किंवा फक्त लेन्सच्या फ्रण्ट एलिमेंटचे संरक्षण करायचे असेल तर एखादा प्लेन ग्लास फिल्टर घेऊ शकता (५२ मिमी व्यासाचा) आणि फोटो काढताना तात्पुरता तो फिल्टर काढून ठेवायचा, लेन्सची कॅप काढतो तशी. अंदाजे हजारेक रुपये वाचतील या उपायाने. पण दरवेळी फिल्टर काढणे-लावणे कटकटीचे होईल.

होया फिल्टर वाजवी किंमतीत उत्तम काम.

मराठी कथालेखक's picture

28 Oct 2015 - 8:02 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद
Omax, Osaka, Marumi ई काही अजून स्वस्त फिल्टर्स बाजारात दिसतात, त्याबद्दल काय सांगू शकाल ? ह्यापैकी एखादे फिल्टर वापरले तर ते फोटो काढताना काढून ठेवावे लागेल का ?

होय, काढून ठेवल्याशिवाय फोटोंचा दर्जा चांगला येणार नाही. होयापेक्षा कमी दर्जाच्या फिल्टरच्या नादी लागू नका हेच उत्तम.

'महावीर'मधून घ्या. स्वस्त आणि बर्‍यापैकी खात्रीशीर आहे. कार्डपेमेंटला दोन टक्के जास्त घेतो. :-)

foto freak's picture

29 Oct 2015 - 12:12 am | foto freak
foto freak's picture

29 Oct 2015 - 12:13 am | foto freak