ईशान्य भारतः निसर्गप्रेमींसाठी पर्वणी - २

तिमा's picture
तिमा in भटकंती
22 Nov 2013 - 11:27 am

ईशान्य भारतः निसर्गप्रेमींसाठी पर्वणी -१

पहिल्या भागात आपण तवांगजवळच्या वॉर मेमोरियल पर्यंत आलो होतो.

तिथून पुढे गेल्यावर न्युरानांग फॉल्स लागले. थोडी फोटोग्राफी करुन पुन्हा निघालो.

आमचा अरुणाचलमधून परतीचा प्रवास सुरु झाला. बोमदिलाच्या अलिकडे ४२ किमी, दिरांग हे गांव आहे.
दिरांगला जातानाचा घाट

आमचा मुक्काम तिथल्या हॉटेलात होता. एक स्थानिक महिला हे हॉटेल उत्तमरीत्या चालवते. तिथेच फक्त आम्हाला वक्तशीर आणि उत्तम सर्व्हिस मिळाली. इथेही हिटरची आवश्यकता होतीच.
सकाळी अगदी वेळेवर आम्ही गुवाहाती साठी निघालो. कारण प्रवास दिरांग्-बोमदिला-तेजपूर्-गुवाहाती असा तब्बल ४०० किमीचा होता.

दिरांगहून उतरताना एक दृश्य

तेजपूरनंतर हायवे होता, त्यामुळे इनोव्हाचा खरा स्पीड तिथे अनुभवला. संध्याकाळी साडेसात वाजता आम्ही गुवाहातीच्या राजेशाही हॉटेलमधे पोचलो. सगळे दमले होते. मॅनेजरने रुममधेच जेवण पाठवले.
आठव्या दिवशी सकाळी शिलाँग्,मेघालयला निघायचे होते. पण दोन्ही गाड्यांची थोडी डागडुजी आवश्यक होती, त्यांत सकाळी वेळ गेला. दुपारी सव्वाबारा वाजता गुवाहाती सोडले. शिलाँगला जाण्याचा रस्ता फारच सुंदर, वळणावळणांचा आणि दाट झाडीचा आहे. पण तो रस्ता सध्या दुहेरी करण्याचे काम जोरांत चालू आहे, त्यामुळे डायव्हर्जन्स बरीच आहेत. अंतर फक्त १०० किमी आहे. पण जेवणाचा वेळ धरुन शिलाँगला पोचायला साडेचार वाजले. तरी तिथले डॉन बॉस्को म्युझियम बघता आले. म्युझियम उत्कृष्ट केले आहे, संपूर्ण ईशान्य भारताची भौगोलिक माहिती, तिथल्या आदिवासींची रहाणी, त्यांचे पेहेराव, त्यांची वाद्ये याची दृक व दृकश्राव्य माहिती छान मिळते. सात मजली इमारतीत,प्रत्येक मजल्यावर एक दालन आहे. आपण प्रवेश केल्यावर लाईट आपोआप लागतात. ट्च स्क्रीन कंप्युटर ठेवले आहेत. सर्वात वरच्या मजल्यावर एक स्काय वॉक आहे, त्यातून शिलाँगचे उत्तम दर्शन घडते. म्युझियमची प्रवेश फी ६०रु. आहे, आणि कॅमेरा वापरायचा असेल तर आणखी १००रु. आम्ही कॅमेरा वापरला नाही. बाहेर आल्यावर सुखद थंडी होती. तरी हॉटेलमधे हिटर ठेवले होते. पण नाही वापरले तरी चालण्यासारखे होते.
रात्रीच्या जेवणाला वेटर्सच्या अडाणीपणामुळे थोडा गोंधळ उडाला. पण तिथल्या मॅनेजरशी चर्चा करुन आम्ही आठ जणांसाठी वेगळी व्यवस्था करुन घेतली. जेवण मात्र लाजवाब होते.
नवव्या दिवशी सकाळी चेरापुंजीला गेलो. हे अंतर ५३ किमी आहे, पण दोन तास लागतात.रस्ता छान आहे. वाटेत पहिल्यांदा शिलाँग पिक ला जाऊन छान व्ह्यु मिळाला. डोंगरांच्या पलिकडे जो सपाट भाग दिसत होता तो बांगलादेश होता. खरोखरच बांगलादेशांत एकही पर्वत नाही.
शिलाँग पिक व्ह्यु टॉवर

शिलाँग पिक व्ह्यु(सपाट भाग बांगला देश)

पुढे चेरापुंजीला पोचल्यावर तिथल्या पर्वतांची रांग विलोभनीय होती. तिथला मुख्य धबधबा आता खूपच रोडावला आहे. आम्ही गेलो तेंव्हा तर पाऊस नव्हताच, पण यावर्षी तिथे कमी पाऊस पडला आहे, त्यामुळे चक्क पाण्याचा प्रॉब्लेम आहे.
वाटेतला एलिफंट फॉल

चेरापुंजी पर्वतांची रांग

चेरापुंजीचा रोडावलेला धबधबा

जरा जवळून चेरापुंजी धबधबा

धबधबा पाहून झाल्यावर आम्ही 'मॉसमाई केव्हज' कडे गेलो. साधारण दीडशे मीटरची ही गुहा आहे. बाहेर तिकीट व कॅमेर्‍याचे पैसे भरावे लागतात. त्यांतून जाताना खालचा आणि वरचा हे दोन्ही भाग खडबडीत व उंचसखल आहेत. काही ठिकाणी एकच माणूस जाऊ शकेल एवढीच जागा आहे. आंत सर्वत्र लाइट लावले आहेत. आतला ओलसरपणा, वटवाघळे, कमी हवा यामुळे काहीजण बिचकून वाटेतूनच परत फिरतात. पण एवढी कठीण नाहीये ही गुहा. उंच माणसाला डोकं सांभाळावं लागतं हे माहित असूनही माझे डोके एकदा आपटून थोडे टेंगुळ आले. वरुन कॅल्शियम कार्बोनेटचे खडक लोंबताना दिसतात. दुसर्‍या तोंडाला माणूस बाहेर पडला की तोंडावर सुटकेचा भाव दिसतो.
गुहेच्या आंत

अरुंद वाट

हा व्यायाम झाल्यानंतर आम्हा सर्वांनाच प्रचंड भूक लागली. दुपारचे दोन वाजून गेले होते. पण ऑर्डर देऊन जेवण पोटांत जाईपर्यंत दीड तास गेला. त्यानंतर सेव्हन सिस्टर्स हा पॉईंट राहिला होता. पण त्या सात बहिणी म्हणजेच सात धबधबे इतके सुकले होते की दुर्बिणीतून बघितले तरच करंगळी एवढी धार दिसत होती. बाकी डोंगराचा पॅराबोलिक शेप आपल्या हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण करुन देत होता. त्यादिवशीचे साइटसिईंग संपले. हॉटेलवर परतलो.
वाळून गेलेल्या सात बहिणी

दहाव्या दिवशी चेरापुंजीच्याच रस्त्याने १५-१६ किमी गेल्यावर एक फाटा लागला. तिथून आम्ही लिविंग रूट ब्रिज कडे मोर्चा वळवला. गाड्या थांबल्यावर खाली उतरायची एक दगड धोंड्यांच्या पायर्‍यांची उतरंड होती.
लिविंग रुटकडे उतरण्याचा रस्ता

लिविंग रुट पूल

अगदी तळाला एक नदी होती आणि त्यावर हा पूल होता. एक प्रकारच्या रबराच्या झाडांची मुळे खूपच लांब वाढून एकमेकांत गुंतली होती आणि त्याचाच पूल तयार झाला होता. गांवकर्‍यांनी त्यावर दगड,माती टाकून तो चालण्यायोग्य केला होता. अचाटच प्रकार होता तो. त्या मुळांची ताकद एवढी आहे की एकावेळेस ५० लोकंही त्यावर उभी राहू शकतात. भरपूर फोटो काढले. पुन्हा वर चढून आलो.
आता मोर्चा होता मौलिनाँग खेड्याकडे. ते आशियातले सर्वात स्वच्छ खेडे म्हणून मान्यता पावले आहे. अत्यंत स्वच्छ, सिमेंटच्या चालण्याच्या पायवाटा, वैशिष्ठ्यपूर्ण घरे, प्रत्येक घरासमोर सुंदर बाग! संपूर्ण खेड्यांत प्लास्टिकचा एखादा तुकडाही दिसणार नाही. त्यांच्या कचरापेटीमधे देखील प्लास्टिक टाकायला बंदी आहे. एखाद्या मूर्ख टुरिस्टने टाकलेच, तर पाचशे रु. दंड आहे.आम्ही फिरत फिरत एका टेहेळणी मचाणाजवळ येऊन पोचलो. बांबू आणि झावळ्यांच्या सहाय्याने ते एका झाडावर उभारले आहे. आमच्यातले काही उत्साही त्यावर लगेच चढून गेले. आम्ही खालून त्यांचे फोटो काढताना जवळच्या घरातून एक आदिवासी बाई बाहेर आली आणि त्यावर चढण्याचे प्रत्येकी वीस रु. असे सांगू लागली. वर गेलेल्या मंडळींनी खाली आल्यावर पैसे चुकते केले.
मौविलाँग खेडे

टेहेळणी मचाण

तेथील चर्च

ती आदिवासी इंग्लिशमधेच बोलत होती. सर्व गांव ख्रिश्चन वाटत होते. एक सुंदर चर्चही होते आणि त्याच्यासमोर विस्तीर्ण मैदान होते. परतताना बाहेर काही बायका हस्तकौशल्याच्या वस्तु विकत होत्या. आम्ही एक लाकडी खलबत्ता घेतला. त्या बाईचा छोटा मुलगा दांतात दोरा अडकवून आमच्याकडे लाजून बघत होता. त्याला गोळी देऊन त्याचे फोटो काढले. त्याची आई कौतुकाने बघत होती.
लाजाळु मुलगा

अचानक माझ्या मोबाईलमधे एसेमेस वाजला. बांगला देश एअरटेल वेलकम्स यू, असा मेसेज होता. म्हणजे बांगला देश सीमेच्या अगदी जवळच होतो आम्ही!
जाता जाता एक बॅलंसिंग रॉक हा पॉईंट होता. एक प्रचंड खडक छोट्याश्या आधारावर उभा होता. तो कसा उभा आहे हे बघण्यासाठी त्याच्या खालूनही फोटो काढला. आमचे बहाद्दर ड्रायव्हर त्यावर चढले होते.

खालचा आधारः

सर्व पॉईंटस संपल्याने आम्ही शिलाँगला परतलो. अंधार व्हायच्या आंत तिथले चर्च बघायचे होते. ते बघायला मिळाले. आंत फोटो काढायला बंदी होती. छत उंच असले तरी बाकी आतून काही विशेष वाटले नाही. बाहेर येऊन फोटो काढले. चंद्र एका झाडामागून डोकावत होता. बाहेरुन मात्र चर्चची बिल्डिंग भव्य दिसत होती.


अंधार झाला. हॉटेलवर परतलो. काही उत्साही बायका शॉपिंगसाठी पुन्हा बाहेर पडल्या.मी मात्र, लगेच रुम गांठली. कारण मला सचिनची शेवटची बॅटिंग बघायची होती. तीन दिवस या शिलाँगच्या वास्तव्यात, पोलो स्टार या हॉटेलमधे, खाण्यापिण्याची एकदम चंगळ होती.
अकराव्या दिवशी सकाळी पोटभर न्याहारी करुन आम्ही हॉटेल सोडले. वाटेत शिलाँग मेन लेक बघायचे राहिले होते, ते मनसोक्त बघितले आणि गुवाहातीच्या दिशेने प्रवास सुरु झाला.
शेवटचा पॉईंटः शिलाँग मेन लेक

. विमानतळावर साधारण दीड वाजता पोचलो. इंडिगो च्या फ्लाईटमधे चेक इन करुन मोठ्या बॅगांपासून सुटका करुन घेतली. तिथेच सँडविचेस खाऊन उदरभरण केले. सिक्युरिटी चेकला आंत गेलो. बाकी सर्व सुटले. माझ्या सॅकला मात्र तीनदा तपासले आणि मला बाजूला घेतले. मूर्खपणामुळे, बॅगा आवरताना चुकून स्विस नाईफ सॅकच्या कप्प्यातच राहिली होती. सिक्युरिटीने ती जप्त केली. एकच पर्याय होता. बोर्डिंग पास रद्द करुन बाहेर जाणे व स्विस नाईफ मुख्य बॅगेत ठेवणे. तेही केले. पण मी बाहेर पोचेपर्यंत आमच्या बॅगा निघून गेल्या होत्या. मला अत्यंत नाईलाजाने माझी स्विस नाईफ एका डस्टबीन मधे टाकून परत नव्याने बोर्डिंग पास बनवावा लागला.
परतीचे विमान दुपारी तीन वाजता सुटले. चार वाजता कलकत्याला पोचले. तिथून साडेपांच वाजता निघून रात्री आठ वाजता सांताक्रूजला पोचले. इंडिगो मधे खायला काहीच दिले नाही. एका अत्यंत अविस्मरणीय सहलीची अशी सांगता झाली.

सहलीचा खर्चः रु. ३६०००/- प्रत्येकी + मुंबई-गुवाहाती-मुंबई विमानभाडे (२००००- २२०००)
सहल आयोजकः ईशा टूर्स, ठाणे
दिवसः ११
सीझनः नोव्हेंबर ते मार्च

हा निसर्ग आगळा आहे, अनाघ्रात आहे. तिथे जाणार्‍या सर्वांनी तिथले पर्यावरण जपण्यासाठी प्लास्टिक, कॅन्स अशा गोष्टी तिथे फेकू नयेत. एकदा का तिथे निर्बुद्ध पर्यटकांची रीघ लागली की त्याचे 'मनाली' व्हायला वेळ लागणार नाही.

सर्व फोटोंची लिंकः https://picasaweb.google.com/107310707388953790920/NorthEast04?authuser=...

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

22 Nov 2013 - 11:54 am | सुहास..

हे फोटोज आधी कुठेतरी पाहिल्यासारखे झाले :(

अंमळ बावचाळलेला
वाश्या

प्यारे१'s picture

22 Nov 2013 - 2:13 pm | प्यारे१

अरे त्यांना डिट्टेलवारी ल्ह्यायला सांगितलं म्हणून ते डिट्टेल मध्ये लिहीत आहेत.
(कुणासारखं डिट्टेल म्हनलेले वो तिमा सेठ ;) )
परत लिहीत आहेत.
ते लाजाळू पोरगं, खाली बसून फोटो का काल्डा नाय वगैरे... कुछ याद आया काय?
-बावचळलेल्या वाश्याचा 'लय हुशार' मित्र प्यारे

तिमा's picture

22 Nov 2013 - 3:36 pm | तिमा

(कुणासारखं डिट्टेल म्हनलेले वो तिमा सेठ )

ते हो आपल्या जीवन भौं सारखं !

सुहास..'s picture

22 Nov 2013 - 3:45 pm | सुहास..

ओ हो !

तिमा's picture

22 Nov 2013 - 11:57 am | तिमा

माझ्या त्रोटक लेखाबरोबर होते. आता दोन भागात विस्तृत लिहिलाय. फोटो माझेच आहेत, चिंता नसावी.

सौंदाळा's picture

22 Nov 2013 - 12:09 pm | सौंदाळा

मस्त. वर्णन, फोटो दोन्ही आवडले.

वेल्लाभट's picture

22 Nov 2013 - 6:44 pm | वेल्लाभट

शिट यार ! जायचंय कधी पासून त्या बाजूला !

अनिरुद्ध प's picture

22 Nov 2013 - 7:16 pm | अनिरुद्ध प

प्रवासवर्णन,पु ले शु

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Nov 2013 - 11:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता कसं बैजवार प्रवावर्णन झालं. मजा आली वाचायला. फोटोही मस्तच. जायच्या यादीत अगोदर पासून आहेच... आता जागा जरा अजून वर सरकलीय !

लिविंग रुट पूल एकदम भारी ! एकदा तरी त्यावरून चालायला पाहिजेच !

तिमा's picture

23 Nov 2013 - 9:38 am | तिमा

संपादकांना विनंती की भाग-१ ची लिंक वर द्यावी.

यशोधरा's picture

23 Nov 2013 - 9:52 am | यशोधरा

मस्त!

पैसा's picture

23 Nov 2013 - 5:47 pm | पैसा

आता छान वाटलं!

चित्रगुप्त's picture

23 Nov 2013 - 8:17 pm | चित्रगुप्त

वाहवा. खूपच छान फोटो आणि माहिती.
(अवांतरः बांगलादेश मधे अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या मच्छरदाण्या बनतात, त्या त्रिपुरा वगैरेत मिळतात. कलकत्त्यातही मिळतात).

मदनबाण's picture

24 Nov 2013 - 9:40 am | मदनबाण

मस्त ! या निमित्त्याने चेरापुंजी बघायला मिळाले. :)

भाते's picture

24 Nov 2013 - 12:00 pm | भाते

दोन्ही भाग वाचुन किमान एकदा तरी तिकडे जायची मनापासुन इच्छा झाली. अप्रतिम प्रवासवर्णन.

चावटमेला's picture

26 Nov 2013 - 8:03 pm | चावटमेला

सुंदर फोटो आणि वर्णन. बाकी त्या बॅलन्सिंग रॉक वर काही नतद्रष्टांनी केलेली रंगरंगोटी पाहून पित्त खवळलं. अरे, तुम्हाला काही नवीन निर्माण करायची अक्कल नाहीच, पण जे निसर्गानं दिलंय, तुमच्या पूर्वजांनी करून ठेवलंय, निदान ते तरी जतन करा.