वानोळा

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
16 Oct 2013 - 10:24 am

गूढ धीर गंभीर मेघदळ स्तब्ध अचल का वारा ?
चंचल मन बेभान चिंतनी पहाटेस पट कोरा
रुधिराचे घर विषम स्वरांचे हृदयी अलख चकोरा
अंतर्यामी कल्लोळांचा सागर उसळे खारा

नकोच वाटे पण ना त्यजवे कर्तव्याचा तोरा
आस आंसवे अभिलाषेची गोचिड सम अंगारा
पंख निखळले मिटले डोळे अंध दिशा धांडोळा
ना कळते आकळते मग हा जन्म कसा वानोळा ?

........................अज्ञात

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

16 Oct 2013 - 11:17 am | धर्मराजमुटके

वानोळा म्हणजे काय ?
आमच्या कडे माहेरहून सासूरवाशीण बहिणीकडे / मुलीकडे जाताना जे पदार्थ नेले जातात त्याला वानोळा (वानवळा) असे म्हणतात.

@अज्ञातकुल तुमच्या कवितांमधे बर्‍याचवेळा काही शब्द अनोळखी असतात (माझ्यापुरता बोलतोय). त्यामुळे कधी कधी अर्थ कळत नाहीत. पण बर्‍याच वेळा तुमच्या कवितांमध्ये लय आणि अर्थ चांगला असतो. इथे शेवटचं कडवं खूप आवडलं पण एका शब्दामुळे बरचं काही सुटल्यासारखं वाटतं आहे. वानोळ्याचा अर्थ इथे सापडला, पण नेमका तोच अर्थ इथे अभिप्रेत आहे का, ते माहीत नाही.

अज्ञातकुल's picture

18 Oct 2013 - 10:02 am | अज्ञातकुल

आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार ! कवितेतील "अनोळाखी शब्द" हे माझ्यावरील जन्मसंस्कार आणि बाळपणी माझ्या आजोबा आणि वडिलांकडून खूप कांही ऐकल्याचा परिणाम असावा. ते शब्द काळानुरूप आज क्वचित वापरले जात असावेत म्हणून आपला त्यांच्याशी परिचय नसावा एवढंच. मी योजनापूर्वक असे शब्द शोधून काढून वापरत नाही. असो.
"वानोळा" हा शब्द खाली दिलेल्या संकल्पनेतून आलेला आहे.

दूरदेशची ; बहुमोल , दुर्मिळ वस्तु ( भेट म्हणून दिलेली ). [ वान ] ज्यातून कांही निष्पन्न होताना दिसत नाही. जो तो एखाद्या चक्रव्युहात गुरफटल्यासारखा वागतोय. मनुष्य जन्म हा नेमका का श्रेष्ठ आहे तेच कळत नाही तर मग त्याला दुर्मिळ आणि बहुमोल का म्हणायचं किंबहुना जे अनमोल आहे असं मानलं जातं त्याचं मूल्य नाही कळालं तर त्याचा काय उपयोग ??????

स्पंदना's picture

16 Oct 2013 - 11:29 am | स्पंदना

मस्त. वाचताना नकळत ताल येतो.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2013 - 1:03 am | अत्रुप्त आत्मा

झकास!

अज्ञातकुल's picture

18 Oct 2013 - 10:03 am | अज्ञातकुल

सर्वांचे मनापासून आभार :)