काय! काय!! काय!!
म्हणायच तरी काय म्हणते मी!
ऊठ सुट मिसळ! मिसळ!! अन मिसळ!!
नाही म्हणजे आम्ही ऐकायच तरी किती म्हणते मी? अगदी एका आयडीचे नावसुद्धा मिसळ्पाव असाव? कोण मिसळ्प्रेमी ! कोण उठुन नुसते मिसळीचे फोटो टाकून शंभरी गाठतो? ऑ? काय आहे काय? अहो या मिसळीलाच झणका देणारा आणखी एक भन्नाट प्रकार आहे याची कुणाला जाणीवही नसावी? अगदी उड्या मारुन मारुन जाऊन मिसळी खाता तेथे काळ्या फळ्यावर खडुने लिहीलेले हे नाव तुम्हा कुणाला दिसु नये? उगा नव नव्या चवी चाखणार्यांना हा ही पदार्थ चाखुन पहायची उर्मी येउ नये?
आता म्हणाल अपर्णाबाय एव्हढा का उमाळा फुटलाय या पदार्थाचा? का? का फुटु नये? अहो कॉलेजच्या रम्य भासणार्या दिवसात अस्मादिकांनी तरंगायची स्वप्न पाहीली ती याच कट-वड्याच्या बाऊलात! नाका तोंडातून निघणार्या वाफा सांभाळत कपाळीचा घाम पुसला तो याच्याच सहवासाने! पर्स उलटी पालटी करुन खरच आत पुरेसे पैसे नाहीत याची निराश मनाने चाचपणी केली ती याच्याच चवीला आसुसून! अन अश्या तारुण्याच्या आठवणीत राजासारखा घर करुन बसलेला कट-वडा बाहेरच्या कातिल दुनियेच्या खिजगणतीतही असु नये? इतका अन्याय?
ते काही नाही! आज मी चमचा अन बाऊल परजुन हा अन्याय दुर करणाच. आमच्या कट-वड्याच नाव या पाककलाक्षेत्री झळकावणारच!
बर! आणी लागतय तरी अस काय जगावेगळ या कट-वड्यासाठी म्हणते मी! आपलाच कट, अन आपलाच वडा! हाय काय त्यात म्हणते मी? पण हा कट अन वड्याचा प्रीती संगम मात्र अगदी नरसोबावाडीच्या संगमा एव्हढ पुण्य देउन जातो.
तर मंडळी या पदार्थाला लागणारे सामान!
जेव्हढे पाहिजे तेव्हढे वडे, अन उपसेल तेव्हढा कट! वर पसरायला फरसाण,कोथींबीर,कांदा, थोडस ओल खोबर अन लिंबाची फोड!
नाऽऽही? टप्प्या ट्प्प्याने पाहिजे म्हणता? घेवा देवा. देतु!
तर वड्याचे सामान-
उकडलेले बटाटे, चिरलेला कांदा, मिरची, कडीपत्ता, हळद, कोथींबीर. थोडी आले पेस्ट, अन थोडी लसूण पेस्ट.
फोडणीसाठी- तेल, हिंग, जीरे, मोहरी.
आवरणासाठी- बेसन,हिंग,जीरे,आमच कोल्हापुरी तिखट, मिठ, थोडी कोथींबीर, कडीपत्ता, (हे दोन्ही अगदी बारिक कापुन) चमचाभर मोहन.
तळायला तेल.
तर उकडलेल्या बटाट्याचे बारिक तुकडे करुन त्यात एका कढईत कांद्याची जीर,मोहरी,हिंग,कडीपत्ता,मिरच्या घालुन केलेली फोडणी मिसळा. चवीप्रमाणे मिठ घाला. आता या मिश्रणाचे दोन भाग करुन एका भागात आल्याची तर दुसर्या भागात लसणीची पेस्ट मिसळा. एकाचवेळी दोन वेगवेगळ्या चवीचे वडे खायला मिळतील. ते ही अॅज अ सरप्राइज! तर आता या मिश्रणाचे लिंबाएव्हढे अथवा त्यापेक्षा मोठे गोळे बनवुन घ्या.
आवरणाच्या साहित्यात पाणी मिसळुन भजीच्या पिठासारखे घट्टसर भिजवा. वडे तळायला ठेवलेल्या तेलातले थोडे तेल यावर मोहन म्हणुन घाला. अन घ्या तळुन वडे!
आता बनवुया कट!!
मी या कटासाठी सगळ आंतरजाल पालथ घातल! सगळ्या रेसीपी ट्राय केल्या. चकली ताईची केली, स्वाती ताईची केली, पेठकर काकांच्या खरडवहीचे उंबरे झिजवले, पण उंहुं! नो रिझल्टस! माझ्या कटाच्या चवीला चटावलेल्या जिभेला काही ती जी कोल्हापुरी विशिष्ट चव असते, ती काही मिळेना. उगा कट म्हणुन हौस भागवायची अस चालु होतं. अन मग एक दिवस अतृप्त आत्म्यान करंssट-मिसळ(४४० व्होल्ट) टाकली, अन त्यात कटाचा उल्लेख करताना, त्यात बटाटाभाजी मिसळतात असा दणका मारला. हान तेच्या मारी! अहो काय शॉट लागला ते वाचुन म्हणता? लागलीच त्याप्रकारे कट बनवुन पाह्यला अन काय सांगु राव? चक्क गारद!
तर कट साहित्य-
१ वाटी कांदा पेस्ट,१ वाटी टोमॅटो पेस्ट,१ वाटी ओल खोबर,१ वाटी पापडी अथवा गाठी (हो फरसाणतली)चा चुरा, एक वाटी बटाटा भाजी (चुरुन घ्या),१ तमालपत्र,४ लवंगा,१" दालचिन,१ १/२ टीस्पुन लसूण पेस्ट, मिठ, आमच तिखट, अन कोकम.
थोड्याश्या तेलात तमालपत्र,लवंगा,दालचिनी पर्तुन घ्या त्यावर कांदा पेस्ट घालुन कच्चा वास जाईपर्यंत परता, आता त्यात ओल खोबर घालुन परता.मग टोमॅटो पेस्ट घालुन साधारण शिजवुन घ्या.
हे सगळ मिक्सरवर फिरवुन छान बारिकस वाटुन घ्या. त्यातच बटाट्याची भाजी अन पापडी अथवा गाठीचा चुरा मिसळा.
आता जरा जास्त तेल घ्या एका पातेल्यात. तेल तापल की गॅस बंद करा, वरचा एक्झॉस्ट लावा, दारे खिडक्या उघडा अन तेल किंचीत तापमानाला उतरल की त्यात आमच कोल्हापुरी तिखट घाला. जळु देउ नका! भरभर पळीने हलवत रहा. आता त्यात वरील पेस्ट घालुन पुन्हा गॅस सुरु करा. पाहिजे तेव्हढ पाणी, मिठ अन कोकम घाला. चांगल उकळा.
सुटलं का पाणी तोंडाला?
कट-वडा साहित्य-
वरचे दोन वडे, बारिक चिरलेला कांदा, कोथींबीर, टोमॅटो (ऑप्शनल) फरसाण, लिंबु. अन पाव. बाजुला कटाची वाटी. अन भरपुर पाणी. नाक डोळे पुसायला एक हातरुमाल.
आता वडे बाऊलमध्ये असे निट ठेवा, त्यांच्याकडे एकदा डोळेभरुन पहा. हात मागे! अस हावरटासारख नुसता वडाउचलुन तोंडात नाही टाकायचा! आता त्यावर मस्त फरसाण घाला. मग चांगला दोन पळ्या कट घाला. कांदा-कोथींबीरीची पखरण करा. पाहीजे असेल तर टोमॅटो पसरा. जर्र्र्रा लिंबु पिळा. अन बसा डाव्या हाताला पाव घेउन. आता काय विचारताय? हाणा !!
__/\__
अपर्णा
प्रतिक्रिया
29 Aug 2013 - 2:43 pm | प्रभाकर पेठकर
मला वाटलं 'अनेगाबी' हा कांही कोल्हापुरी पदार्थ वगैरे आहे की काय! असो.
खुलासा केल्या बद्दल धन्यवाद.
29 Aug 2013 - 2:52 pm | गवि
कोल्हापूरप्रमाणे सांगलीतही कटवडा अनेक ठिकाणी उत्तम मिळायचा..
कोल्हापुरात युनिव्हर्सिटीच्या अलीकडे छ. सायबर (!) च्या साधारण समोर रस्त्यालाच एक अशा स्वरुपाचं लहानसं हाटेल होतं. रेलिंग असलेलं आणि बाजूने ओपन अशा उंच कट्ट्याच्या स्वरुपाचं. नाव आता आठवत नाही.
शिवाय सातारा - कोल्हापूर रस्त्यावर अतीत एसटी बसस्टँडचा वडा हाही एक खास नमुना आहे (कधीकधी दुर्दैवाने जरा उणा लागतोही..खासकरुन तेल जास्त निघणं किंवा किंचित कच्चा काढला गेल्याचा एखादाच अनुभव आहे, पण तो नशीबाचा भाग..) एरवी एकदम झकास गरमागरम टेस्टी वडा आणि सदैव मागणी असल्याने ताजेपणा आपोआप मेन्टेन झालेला असणारं ठिकाण आहे हे. एसटीने कधीही जात नसूनही तिथे खास त्या वड्यासाठी थांबतो.
29 Aug 2013 - 3:20 pm | कुसुमावती
अतीतच्या एसटी कॅंटीनचा वडापण खासच. कोल्हापूर - पुणे एसटी प्रवासात अतीतचा वडा आणि वाफाळता चहा हे माझे कायमचे सोबती. कधी चुकून एसटी भुईजला थांबली तर वडा मिसल्यामुळे पुण्यापर्यंत मी एसटी चालक आणि वाहकाच्या नावाने (मनातल्या मनात) खडे फोडायचे.
28 Aug 2013 - 1:05 pm | कपिलमुनी
मिसळ / कट वडा ही ब्रेड सोबत चांगली लागते..
वडापाव ला लादीपाव ठीक अहे
12 Sep 2013 - 1:04 am | काळा पहाड
मु-ळी-च-न्हा-ई. लादीपाव नावाचा घाणेरडा प्रकार कोल्हापूरी वड्याबरोबर कृपया जोडू नये. तो प्रकार जोशी वडेवाल्यांच्या मिळमिळीत, पुचाट आणि धेडगुजरी प्रकाराबरोबर ठीक आहे. कोल्हापूरी वड्याला ब्रेडच हवा आणि तोही पुण्यात ब्रेड नावाचा जो महाभयंकर विनोदी प्रकार मिळतो तो नव्हे. कृपया कोल्हापूरी पदार्थांना "ठीक आहे", "चालेल" वगैरे क्रियापदे लावू नये ("नाहीतर गाडीतली हवा जागेवरच काढण्यात येईल").
ता.क. पुणेरी मिसळ नावाचा कोणताही प्रकार आस्तित्वात नाही. कोल्हापूरी मिसळ सहन न झाल्याने त्यात मटकी (!) आणि दही घालून तयार केलेला तो एक फसलेला प्रयोग आहे. कृपया त्याला "पुणेरी" शब्द लावून त्याच्यावर आपलाही हक्क असल्याचा दावा करू नये.
12 Sep 2013 - 2:26 pm | मृत्युन्जय
अरेरे अस्मितेच्या खोट्या आणि चुकीच्या कल्पनांमुळे उगाचच दुसर्या गावांना शिव्या घालण्याची कोल्हापुरात फ्याशन आलेली दिसते आहे. आमच्या काळात कोल्हापुर असे नव्हते. असो.
वडापाव हा मुंबै पुण्यात प्रसिद्ध झालेलाच प्रकार. कोल्हापुर वडापाव किंवा वड्यासाठी प्रसिद्ध नाहिच. तर उगाच ओढुन ताणून आम्हीच भारी हे पटवुन द्यायची कसरत नकोच. जोशीचा वडापाव पुण्यातही कोणी खवैय्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी खात नाही. जोशीचा वडापाव पुण्यात पोटभरीसाठी खाल्ला जातो. उत्तम वडापाव पुण्यात खायचा असेल तर या एकदा ५० चांगल्या जागा दाखवेन. आता पुण्यातला वडा कोल्हापुरसारख नसतो म्हणुन गळा काढण्यात काहिच अर्थ नाही. प्रत्येक ठिकाणची चव वेगळी. ती चव दर्जेदार आणि स्वादिष्ट आहे की नाही ते बघावे. उद्या कोणीतरी जळगावकडचा गळा काढेल की "कृष्णाकाठच्यांनी काय भरीत करावे आमच्या जळगावला या. तेच खरे भरीत." गावानुसार तिखटाचे, साखरेचे, मसाल्याचे आणि वाटणाचे प्रमाण बदलत जाते. त्यामुळे तुमच्या कोल्हापुरात काय वाटण वापरतात त्यात इतर कोणाला चव आवडत नसेल तर शष्प रस नसेल.
राहता राहिला कट, तर तो जगात कुठेही दही घालुन खाल्ला जाऊ शकत नाही. पुण्यातही नाही. दही मिसळ हा वेगळा प्रकार आहे. तो पुण्यात मिळतो. पण खपतो असे म्हणण्याचे धाडस माझ्यात नाही. मिसळीबरोबर लोक दही ताक घेतात ते मिसळीचा तिखटपणा पचवण्यासाठी. जगभरातल्या लोकांची तिखटाची सवय पुज्य कोल्हापुरवासीयांसारखीच असेल असे नाही.
सरतेशेवटी, काही काळापुर्वी फडतरे ची मिसळ खाल्ली होती. आयुष्यात परत ती चूक करणार नाही. पुण्यात कुठल्याही रोडसाइड टपरीवर जास्त चांगली म्मिसळ मिळते. त्यामानाने खासबागची चांगली. पण त्याहुनही जास्त चांगली मिसळ पुण्यात दे धक्का, नेवाळे, महेश भुवन आणि काटाकिर्र मध्ये मिळते. कर्वे रोडवर इन्कम टॅक्स लेन मध्ये देखील उत्कृष्ट मिसळ मिळते. बेडेकरची मिसळ ही या सर्वांपेक्षा उत्तम. गोड आवडत नसेल तर तर्री घेउन त्याचा तिखटपणा वाढवता येतो. ति तिखट गोड चव अफलातुन असते. आणि त्याची तर्री नि:शंकपणे तिखट असते.
कटवडा पुण्यात बर्याच ठिकाणी चांगला मिळतो. पण त्यासाठी स्वच्छतेच्या अवास्तव कल्पनांना फाटा देउन काही टपर्यांना पावन करावे लागते. बाहेरुन येणार्या उपर्यांना त्या जागा माहित नसतील तर त्याचा दोष पुण्याला देता येत नाही.
पुण्यात ब्रेड या पदार्थांची बहुतेक सगळी व्हेरियेशन्स मिळतात. कोल्हापुरात जर एकच प्रकार मिळत असेल आणि त्यामुळे वेगळे काही पचवण्याची ताकद कोल्हापुरकरांमध्ये नसेल तर त्याचा दोष कृपया पुण्याच्या माथी मारु नये.
बादवे मिसळ आणी वडा हे दोन्ही महाराष्ट्रीयन पदार्थे आहेत त्यावर कुठल्याही एका शहराचा हक्क नाही.
28 Aug 2013 - 8:14 am | स्पा
क ह र
28 Aug 2013 - 12:50 pm | मैत्र
*****, इथे बंगळूरात बसून हे इतकं डिट्टेलवार आणि त्यात त्या शेवटच्या कटाच्या फोटो बरोबर वाचून अतिशय त्रास झाला.
तीव्र निशेध व्यक्त करण्यात येत आहे.
कधी कोल्हापूर वारी झाली तर मिसळी नंतर दुसर्या वेळी कट वड्याला योग्य तो बहुमान नक्की देण्यात येईल.
बाकि शास्त्री रस्ता, नवी पेठ पुणे इथे काका हलवाई दुकानाच्या विरुद्ध बाजूला (संकल्प कार्यालयाच्या थोडंसं पुढे)
अजंठा नावाचे एक मिठाईचे दुकान कम छोटे उपाहार गृह आहे.
तिथे एके काळी याचा धाकटा भाऊ म्हणजे वडा सॅंपल मिळत होता.. आता मिळतो की नाही माहीत नाही.
पण दुधाची तहान ताकावर भागवायची असल्यास हौशी पुणेकर मिपाकरांनी जरा प्रयत्न करायला हरकत नाही.
अवांतरः कट / शांपलचा झटका ओसरणे गरजेचे असेल तर याच अजंठा मध्ये सिताफळ श्रीखंड केवळ अप्रतिम मिळते.
28 Aug 2013 - 8:37 pm | अत्रुप्त आत्मा
त्याच जागी (नव्या इमारतीत) चालू आहे. पूर्वीचे सगळे पदार्थ अजुनही तश्याच चवीनी मिळत आहेत. मुख्य म्हणजे इडलीसांबारची ती फेवरिट अजंठा'चव बिल्कुल बदललेली नाही.गोल भजी,मिसळ,नुस्तं सांबार आणी पाव,पाव सँपल,वडा सँपल .. सबकुछ हाजिर हैच!
अता (तुंम्ही सांगितलेल्या खुणेप्रमाणे) अजंठा पटकन ओळखू येणार नाही,त्याकरता ज्ञानल मंगल कार्यालयाच्या लेनला-पराग रेस्टॉरंट आहे..त्याच्या शेजारी अजंठा असं सांगायला हवं. :)
28 Aug 2013 - 5:01 pm | सई कोडोलीकर
आणि सगळ्या आठवणी पण जाग्या झाल्या. तोड नाही या पदार्थाला! आता गेल्या गेल्या खाल्लाच पाहिजे, इलाजच ठेवला नाहीस. प्रस्तावना पण झकासच!
कोल्हापुरात बर्याचदा खाल्लाय पण मी एकदा गगनबावड्याकडे जाताना कळ्याला बाजाराच्या दिवशी एका बारक्या हॉटेलात खाल्ला होता, आत्तासुद्धा त्याची चव आहे जिभेवर.
तु कॉकटेल बनवतेस का? त्याचीही स्टेप बाय स्टेप रेसिपी आणि फोटोज बघायला मजा येईल. आधी टाकली असशील तर कुठे आहे ते सांग. ज्या लोकांना 'कॉकटेल' माहिती नाही, त्यांची उत्सुकता चाळवली जाऊ शकते :-)
28 Aug 2013 - 5:32 pm | सस्नेह
लै छळलंस बायो !
तो युनिव्हर्सिटीच्या कँटिनातला लालभडक कटात बुडालेला पिवळाजर्द वडा एकदम डोळ्यासमोर आला...
वो भूली दासता..लो फिर याद आ गयी...
28 Aug 2013 - 8:59 pm | प्यारे१
आपातै,
व्हिसा पाठव लौकर. कटवडा खायचाच्चे.
28 Aug 2013 - 10:51 pm | चतुरंग
आंतरजालीय "वडा" केला जाऊ शकतो याची कल्पना नव्हती!! :(
-रंगा
29 Aug 2013 - 2:54 pm | पद्मश्री चित्रे
वा मस्त . तोंडाला पाणी सुटलं.
29 Aug 2013 - 3:35 pm | कुसुमावती
जबरी फोटू आणि तितकीच सांगण्याची पद्धत रसाळ.
याच्याबरोबर लादिपाव आणि फरसाण हवच (फरसाण बी कोल्हापुरच्या जयभवानीचं असेल तर लई बेस.)
30 Aug 2013 - 2:55 am | निनाद मुक्काम प...
इनो घेऊन
येथे खरडत आहे ,
कधीकाळी कोल्हापुरात जायचे झाले तर तेथे हा कट वडा
खायचाच असा निग्रह केला आहे, तेथील हा वडा मिळण्याची काही काही लोकप्रिय ठिकाणे असल्याच अवश्य सांगा
30 Aug 2013 - 7:45 am | चाफा
कट वड्यालाच मी आजवर रस्सावडा समजत होतो, हे प्रकरण लै वेगळं दिसतंय... कोल्हापुरात जाऊन खाता येणं अशक्य दिसतंय पण थोडी फार लाच दिली तर घरात मिळू शकेल :)
अवांतर,: पुण्यात आलो की करंट मिसळीसाठी आत्म्याच्या मानेवर बसावं लागेल बहूतेक ;)
30 Aug 2013 - 11:35 am | रोहिणी पानमंद
अपर्णाताई कट वडा करून पाहीला काल. लै भारी वाटला बघा सगळ्याना!!!!!! लै वाह वाह झाली बघा काल.
मनापासून धन्यवाद.
30 Aug 2013 - 11:49 am | इशा१२३
मस्त आणि सोपी आहे पाकक्रुती.छानच!
31 Aug 2013 - 5:04 am | अनुप कोहळे
अहो, आमच्या नागपूर, वर्हाडात आलू बोंडा मिळतो. अगदी सेम टु सेम....
वर फक्त कांदा आणि मिरची......
12 Sep 2013 - 12:10 am | रेवती
अग्ग्ग्ग्ग्!भारी गं अपर्णा, लै भारी!
6 Oct 2013 - 8:18 pm | समिर१२३
थनय्तिल ममेलेदर एवधि खास नहि पन थन्य शेजरि कल्व्यतिल शिवाजि होसस्पितल/ रजिव गान्दि मेदिकल कोल्लेज च्यआ चन्तीन मधे वद-उसल नवच एक प्रकआर मिलतो. आग्दि थान्न्यातिल मामलेदआर एवधि खस्स नहि पन चम्पुस बहेर जयचे नसल्यस उत्तम पर्यआय. वदआ अनि उसल बरोबर नरलचि चतनि अनि केत्चुप हि मिलते. दहा वर्शे झालि पन चव अनि किमत तीच. भेत द्यच योद अल तेर त्र्याय कअर्न्यास हेर्कत नआहि. वदापव्च वदा अनि हिर्व्य वतान्यचि उसल त्यत सम्बर मसआलआ अके असे वातते.

6 Oct 2013 - 8:33 pm | समिर१२३
थनय्तिल ममेलेदर एवधि खास नहि पन थन्य शेजरि कल्व्यतिल शिवाजि होसस्पितल/ रजिव गान्दि मेदिकल कोल्लेज च्यआ चन्तीन मधे वद-उसल नवच एक प्रकआर मिलतो. आग्दि थान्न्यातिल मामलेदआर एवधि खस्स नहि पन चम्पुस बहेर जयचे नसल्यस उत्तम पर्यआय. वदआ अनि उसल बरोबर नरलचि चतनि अनि केत्चुप हि मिलते. दहा वर्शे झालि पन चव अनि किमत तीच. भेत द्यच योद अल तेर त्र्याय कअर्न्यास हेर्कत नआहि. वदापव्च वदा अनि हिर्व्य वतान्यचि उसल त्यत सम्बर मसआलआ अके असे वातते.
8 Oct 2013 - 4:32 pm | ज्ञानोबाचे पैजार
ते सतिश राव जरा बरे होते
इकडेतर पार कोथळाच काढला आहे भोसकुन भोसकुन
6 Oct 2013 - 8:59 pm | अनिता
सतीश?
7 Oct 2013 - 1:00 pm | प्यारे१
सतीश नुसतं नाही, सतीशचंद्र म्हणा!
6 Oct 2013 - 10:46 pm | रेवती
पुन्हा एकदा फोटू बघून गेले. आता मात्र करायलाच हवा कट वडा! आमच्या इथे पाकिटात्ले का होईना पण कोल्लापुरी तिखट मिळतेय त्याचा फायदा घेते.
7 Oct 2013 - 12:40 am | समिर१२३
No Anita, this is not Satish. I apologize for terrible writing skills. Sam
samstrong123@gmail.com
7 Oct 2013 - 2:54 am | प्रसाद गोडबोले
अप्रतिम !!
7 Oct 2013 - 9:38 am | निनाद
ज ब री!!!
25 May 2015 - 10:15 am | हसरी
काल या रेसिपीने मिसळीचा कट केला होता. लई भारी झाला होता. फक्त वाटणात दिलेला पापडीचा चुरा वगळला होता. बटाट्याची भाजी वाटणात घातल्यामुळे मस्त चव आली होती.
25 May 2015 - 12:48 pm | कविता१९७८
वाह , प्लेट पाहुनच तोंडाला पाणी सुटले.
25 May 2015 - 12:51 pm | सस्नेह
काय ते तोम्पासू फोटो, काय तो कट अन काय् तो मांडणीचा थाट !
खल्लास !
कटात गाठी घालतात या मोलाच्या माहितीसाठी धन्यवाद !
25 May 2015 - 9:35 pm | नूतन सावंत
सुगरण ग सुगरण.
24 Oct 2018 - 12:10 pm | मुक्तांगण
लोकसत्ता मधे अभिजीत पेंढाकरांनी ही रेसिपी चक्क चोरली आहे. इथे २०१३ मधे आलेली ही रेसिपी, २०१७ मधे त्यांनी अगदी माफक फेरफार करून दिली आहे. आणि आत्ता व्हॉट्सअॅप वरून ही सगळीकडे फिरत आहे. लोकांना क्रेडिट द्यायला का लाज वाटते कळत नाही. स्पंदना, उपयोग काहीच नाही पण तुम्हाला एक माहिती असावी म्हणून हा पोस्टीचा खटाटोप!
https://www.loksatta.com/recipes-news/how-to-make-kolhapuri-kat-vada-mah...
24 Oct 2018 - 7:57 pm | टर्मीनेटर
उपयोग कसा नाही? अहो त्यानिमित्ताने धागा वर आल्याने एवढी झक्कास रेसीपी वाचायला मिळाली. माझाही आवडता पदार्थ आहे हा.
धन्यवाद मुक्तांगण आणि स्पंदनाजी.
(धाग्यातले फोटो दिसत नाहीयेत.)