आता नाव वाचुन उगा तोंडात बोट घालु नगा सांगुन ठेवते आदीच.
त्याच काय झाल? लय म्हणजे लय तापल्याती उन आजकाल. अगदी काह्यली काह्यली हुन राह्यली जीवाची. त्यातच ते कुवेतच दिपकराव त्यांची कुवत हाय म्हनुन उगा काय रंगीबेरंगी प्येल भरुन भरुन दाकवुन राह्यल? आता आमच्या सारक्या शेता भातावरच्या मानसास्नी असल उगा नखर्या उखर्याच खाउन चालतया व्हय? आंगात ताकत कशी याची म्हनते मी अस उगा येव्हढ येव्हढ लाडाकोडाच खाउन? ह्येच ह्येच चुकतयं बगा तुमा शेरातल्या मानसांच. काय खातुया ते बगन्या ऐवजी, त्ये दिस्तया कस ह्यावरन तुमी ठरवनार त्ये खायाच का न्हायी त्ये. आस कदी असतया का? आस हुइल का? काळ्या काळ्या ढगातनं, जीवनाच सार गळत, काळया काळ्या मातीतन पोटासाटन अन्न मिळत. ह्ये इसरुन चालत न्हाय.
त्यात आनी भर म्हंजे त्ये सोत्री अन्ना! काय बाय बाटल्या भरुन आणत्यात, ह्ये येव्हढस, त्ये तेव्हढुस्स, वरन मारायचा निम्म्याला निम्मा बरफ आन म्हन लय भारी.
मला प्रश्न पडतो, त्ये पिवुन मुंगी चावल्यागत तरी हुत का वो सोत्री अन्ना तुमाला? आवं आमच्या बी गावाच्या उगवतीकडं वड्याच्या काटाला कंदी मंदी धुर उटाय लागतो. मग गावातली सगळी बाप्पय मानस अशी कुणी दावं वडल्यागत तिकड चालायला लागत्यात. ज्या कुनाला मग उठाया जमल त्यो घराकड येतुया, न्हाय तर बाकीची तितच गप मुडद्यावानी पडल्याली असत्यात. आन, गावात येनारा भाद्दर बी दगडाच्या काळजाचा असावा लागतुया. वड्याच्या काटाच्या धुराकड वडलेला त्यो गावात घरात आला की असा धुरळ्ळा निघतो त्याचा, त्याच्या कारभारनीकडन. गाव आस नुसत शंकर पाटलांच्या गोष्टीसार "घुमव्वा घुमव्वा" करत घुमत र्हातया. आस काय हुतया का तुमच त्ये काक्टेल लाउंज पिल्यावर?
र्हाउ दे! म्या बी काय? काय सांगाय म्हुन आले आन काय लांबड लाउन र्हायले बगा. कट्टाळला असशीला तुमी माज्या बडबडीला.
तर वसरीवरच कोंबड म्हंजे काय झाल? तर म्हनल आपल देशी, साध बाद, खर गुणकारी पेय; जरा नजरला चांगल दिस्सल अस भरुन आनाव, म्हंजे हितली सगळी नाजुक मानस नाकं न मुरडता, निदान चाखुन तरी पाह्यतील. व्हय कनी? खर हाय नव्ह? तर म्हनल देताना जरा सोत्री अन्ना स्टायल करुन द्याव म्हंजे मानस चवीने पितील, म्हनुन काकटेल लाउंजच म्या वसरीवरच कोंबड अस नाव ठेवल.
आता त्या कोंबड्याच बी येक पुरानच हुइल बगा. म्या त्याला पकडुन आस वसरीवर आनल, आन फोटो काडाय लागले तर घरभर पळाय लागल. मग पाय बांधुन ठेवल तर, मेल्यागत पडलं. उटवाय गेले तर अस्सा रवका काडला माझ्या हाताचा काय सांगु? तरीबी कॉक नसला तरी टेल असणारा कोणबी चालल असा इच्चार करुन ह्यो फोटो.
आता इचारा मंडळी ह्ये हाय काय? आवो आंबील म्हनत्यात ह्येला. कराया लय सोप्पी खर लय म्हंजे लय गुणकारी बगा उन्हाच्या टायमाला. कुणी ही नाचणीच्या पिठाची बनवत्यात, कुनी जुंधळ्याच्या पिठाची, खर शेतभात असलेली मानस समदा उन्हाळा ह्या येका आंबीलीवर काढत्यात. जुनीपानी माणस उन्हाळ्याकड अगदी आटवन ठिवुन वाटकाभर पिठ आदल्यादिशी चुटकाभर ताकात भिजवायला लावत्यात. आन दुसर्यादिवशी त्ये भिजलेल पिट घागरभर उकळत्या पाण्यात घालुन शिजवायच. लय न्हाय फकस्त सात उकळ्या आणायच्या. खळाखळा शिजवाय काय त्याला हाडं हायीत अस म्हनत्यात. मग त्यात जरा मिठ, हाळद, आन मिळाल तर जीर घालायच. उलुसा हिंग मिसळायचा. सपल. थंड करुन मातीच्या गेळ्यात, कळशीत भरायची, आन गप शेताकड चालायला लागायच.
आता ह्ये मी सांगिटलेलं तुमाला उलगडायच न्हाय म्हणुन बैजवार सांगते.
येक वाटीभर तांदळाच पिठ.
येक वाटीभर ताक. (घरात नसलं तर बाजुच्या काकु देत्यात का बगा. आन हो, ह्ये असल ताक बिक आमुश्या पुर्णीमेला न्हाय मागायच दुसर्याकडं. त्यांची म्हसरं आटत्यात)
चिमटभर हळद (अर्धा चमचा घ्या)
चवीला लागल त्येव्हढ मिठ.
हिंगाचा चुटका.
आन आसल तर जीरं जरा भत्त्यात चेचुन.
तांदळाच पिठ ताकात भिजवुन रातभर ठेवा. दुसर्यादिशी जरा फुगुन येतया. मग त्यात आणि टाकभर पाणी घालुन सारक करुन घ्या.
तंवर हिकड चुलीवर पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी फुटली की चुलीवर वैलावर घ्या ते भुगुन. आता त्यात ह्ये पिट वरन वतत येकसारख ढवळायच न्हाय तर गटक व्हत्यात आंबलीत.
पिट शिजल तशी आंबील दाट व्हाया लागती, येक सारख ढवळतच त्यात मिठ आन बाकिची सगळी सामग्री घाला. तिखाट हवी आसल तर उलुशी मिरची लावा. आमी शेतावरच्या आंबीलीला न्हाय लावत. कारन ही आंबील आमी तहानं साटन पितावं. पाणी पिउन पिउन उलटा शोष लागतो म्हणत्यात. ह्यात पिट असल्यान नुसत पाणी पिल्यागत न्हाय होत. जीर आन हिंग पोटाला बर असत्यात. हळद रगात शुदध करते.
तर आता उन्हाळ्यात उगा बाटल्या इकत आणुन पिण्याऐवजी ह्ये आपल मुळच कोल्डड्रिंक प्याच काय? आन आमची आठवन बी काढायची काय?
ह्ये घ्या आनी येक गिलास भरुन.
__/\__
प्रतिक्रिया
28 May 2013 - 7:45 am | सखी
"काळ्या काळ्या ढगातनं, जीवनाच सार गळत, काळया काळ्या मातीतन पोटासाटन अन्न मिळत."
दडंवत स्विकारा अपर्णाताई - काय सुंदर ती भाषा, अगत्य, ठसका आणि पा.कृ. सुद्धा.
28 May 2013 - 7:51 am | मुक्त विहारि
आंबील माझी आजी करायची.
मी पण शीत पेये पिण्या ऐवजी, ताक-लस्सी किंवा गेला बाजार लिंबू सरबत पितो...
28 May 2013 - 7:53 am | रेवती
विश्वासच बसला नाही पाकृवर! छान.
28 May 2013 - 8:34 am | मी_देव
खुप लहानपणी प्यालला मिळायची.. आजीच्या हातची.. आठवणी जाग्या झाल्या.. :) मस्त पाकृ!
28 May 2013 - 8:50 am | नन्दादीप
माझ्या अल्प ज्ञानानुसार आंबील ही बहुत करून नाचणीच्या पीठाची बनवतात. निदान आजपर्यंत मी तरी तिच खाल्ली/पिली आहे.
28 May 2013 - 9:58 am | सौंदाळा
हो,
मी पण नाचणीच्या पीठाची पिली आहे.
28 May 2013 - 11:51 am | मोदक
पिली नाय रे.. प्यायली. प्या य ली!
:D
28 May 2013 - 8:52 am | पैसा
आवो अपर्णावैनी, ही काय पाककृती म्हनाच्ची का काय! तुमचं वसरीवरचं कोंबडं लईईईई झ्याक बगा! आज करून पघतूच!
28 May 2013 - 9:36 am | अक्षया
मला माझा आजीची आठवण झाली. पण ती हे अंबील नाचणीचा पीठाचे करायची. उन्हाळ्यासाठी फारच छान.
नाचणीचे पीठ २ चमचे, पाण्यामधे मिक्स करुन ते गॅस वर थोडे गरम करायचे. त्यात आवडीप्रमाणे मीठ व हिंग घालुन. थोडे घट्ट होई पर्यंत हलवणे. नंतर गॅस बंद करुन, ते मिश्रण गार झाल्यावर, एका ग्लास मधे एक चमचा ते मिश्रण घेऊन त्यात हवे तेवढे गार ताक घालुन पिणे. फारच छान लागते.
शा़ळेतल्या मे महिन्याचा सुट्टीमधे हे अंबील आवर्जुन केले जायचे. येता जाता आम्ही प्यायचो. पौष्टीक आणि चविष्ट. :)
28 May 2013 - 10:13 am | इरसाल
आंबिल हा थोडा बाजरीचा घाटा किंवा गव्हाच्या पिठाचा घाटा जवळ जाणारा प्रकार आहे.मी अनुभवलेली आंबिल ही नाचणीची होती.
28 May 2013 - 10:20 am | यशोधरा
>>तरीबी कॉक नसला तरी टेल असणारा कोणबी चालल >> :D
आजच करुन पाहते. :)
28 May 2013 - 10:25 am | अत्रुप्त आत्मा
28 May 2013 - 10:46 am | डॉ सुहास म्हात्रे
गावाकडचं पेय गावाकडच्या ठसकेदार भाषेनं अजून चवदार झालंय. आंबील प्यायलेली नाही पण आता नक्कीच प्याविशी वाटते :)
संमं : "साहित्यिक रस वापरून केलेल्या पाकृ" असा एक नविन उपविभाग काढायचा विचार करावा... ;)
28 May 2013 - 10:52 am | दिपक.कुवेत
गतप्राण....सॉल्लीड आहे हे! कोंबड लई झ्याक दिसतय. मी सुदिक आंबील अजुन प्यायलेली नाही पण आता नक्कि करुन पाहिन. तुझी प्रसंग फुलवुन सांगण्याची जी हातोटि आहे ना त्याला आपला सलाम! ह्या लेखनामुळेच पाकॄ अजुन चवदार बनतात.
28 May 2013 - 10:54 am | सस्नेह
पर आपाक्का, लसुन इसारलीस का काय ? वाईच लसुन चार पाकळ्या वाटून घातल्याबिगर आमच्यात आंबीलला कोण हात लावत नाय.
बाकी, आंबील प्यावी तर नाचण्याचीच !
28 May 2013 - 11:15 am | drsunilahirrao
शैलीदार कोंबडे आवडले ! :-)
28 May 2013 - 11:43 am | बॅटमॅन
आंबील म्हंजी तं आप्ला जीव की परान! उन्हात निस्ती काहिली होत अस्तिया तवा गलासभर नाचणीची आंबील ताकात वतून पिलो की सपलं सगळं!!!! पर ह्यो तांदुळ घाटल्याला परकार पयल्याडाव बगायलोय, आमी तं नाचणीचीच पीत असू. आसू जाऊ, नवा परकार त्यो बी चांगलाच आसंल :)
अन ते फटूतलं कोंबडं न्हायी वाटत, चिमनी वाटायलीया ;)
28 May 2013 - 6:34 pm | स्पंदना
खाली सांगिटलया आन वर लिव्हलया, कोंबड्यान हाताचा रवका काढला येव्हढाच्या एव्हढा म्हनुन जे काय टेलवाल व्हत त्यान काम चालवल म्या.
28 May 2013 - 8:36 pm | बॅटमॅन
वक्के!!
28 May 2013 - 11:53 am | त्रिवेणी
धाग्याच नाव वाचुन मला वाटल कोबडी घालून आबिलची रेसिपी आहे.
28 May 2013 - 1:14 pm | भाते
अंगारकी आहे हो आज. निदान आजतरी कोंबड नका मारु.
28 May 2013 - 1:16 pm | भाते
अंगारकी आहे हो आज. निदान आजतरी कोंबड नका मारु.
28 May 2013 - 6:18 pm | स्पंदना
आरारा! लय गोंधुळ घातल्याशी बाबांनो तुमी.
आता येकडावच सांगतो, खर पयला माझ्या येका प्रश्नाच उत्तर द्येवा.
जित्त जे पिकत तित्त त्येच खात्यात का न्हाय? माझ्या भागात नाचणी अशी मोप न्हाय पिकत. मग आमी तांदळाची का असना खर आंबील करुन खाताव. कायजण तर जुंदळ्याची बी करत्यात. नाचणीची आंबील ताकतीला लय भारी. खर ती आमाला रोज पिणार्यास्नी पचाय नगो? आता तांदुळ आन जुंदळा रोजच्या खान्यातला, आमी चिपटभर का असना भात शिजिवताव, अन शेरभराच्या भाकरी थापत्यात रोजच्याला. जी लोकं नाचणीच्या भाकरी खात्याती म्हणुन नाचणीची आंबिल त्यास्नी पचतीया.आमी नाचणी अशी येकदम खाल्ली तर आजारी पडतील की मानस आन मग काम कुनी उरकायची ती? आव तुमच्या चवी ढवीन खान्यात आन आमच्या पोटासाटन खान्यात काय फरक हाय का न्हाय? ऑ?
दुसरं ह्ये पिठ आमी आंबिवताव कारन की त्यात मग ब जीवनसत्व तयार हुतया आंबीवल्यामुळ. बर असते त्ये बॉडीला ह्ये काय मी तुमा शेरातल्या लोकास्नी सांगाव का काय?
आता लसुण इसारली बग स्नेहाताय. कानाचा गड्डा उपड तू माझ्या. धर! ह्यो धर कान आन ह्यो गड्डा!
पैसाताय, रेवती अक्का,बॅटमॅनभाव, एक्का दा, दिपकराव आन यशोधरा तै आभारी हाये.
झालच तर त्रीवेणीबाय्,नंदादादा, मोदक अण्णा, अतृप्त बाबा,इरसाल भाय, सौंदाळा काका, अक्षया काकु, देवांच नाना, मुवादा, आन सखी मामी , दम लागला नाव घेउ पर्यंत, लय म्हणजे लय आभारी हाये.
28 May 2013 - 6:38 pm | jaypal
कन्या कुठ हाईत?
जोंधळ्याची किंवा नाचणिची "गाडग्यातली" आंबिल आणि "कन्या" ओरपायच्या आणि ओल्या वाळुत ताणुन द्यायच. हे पर्मोच्च सुख प्रत्येकान एकदा तरी अनुभवायलाच हव.
28 May 2013 - 6:40 pm | अनिरुद्ध प
येकदा पियुन बगावी म्हन्तो बायलिला ईचरुन बग्तो म्हाईत हाय का ते मग रेशीपी दावतो मग बगुया कस जमतय ते.
28 May 2013 - 6:42 pm | अनिरुद्ध प
येकदा पियुन बगावी म्हन्तो बायलिला ईचरुन बग्तो म्हाईत हाय का ते मग रेशीपी दावतो मग बगुया कस जमतय ते.
28 May 2013 - 6:53 pm | सूड
लई झ्याक लिवलंसा, पर त्ये सुदलेकनात टिंबं टांबं गंडल्याती. वाचाया तरास हुतोय वो. म्हंजी ह्ये बगा...
ह्ये तुमी लिवल्यालं: 'आता त्यात ह्ये पिट वरन वतत येकसारख ढवळायच न्हाय तर गटक व्हत्यात आंबलीत.'
आन् ही आमची दुरुस्ती: 'आता त्यात ह्ये पिट वरनं वतत येकसारखं ढवळायचं; न्हाय तर गटकं व्हत्यात आंबलीत.'
जरा दुरुस्ती करता आली तं बगा की !! ;)
28 May 2013 - 7:22 pm | निनाद मुक्काम प...
ही पाककृती आमच्या जर्मन वासियांना नक्की आवडेल.
आमच्याकडे आता ग्रीष्म सुरु आहे. तेव्हा आजच करतो.
अनायासे नाचणीचे पीठ घरात आहे.
28 May 2013 - 8:07 pm | प्यारे१
नाद खुळा गणपतीपुळा नागीन धुरळा! ;)
28 May 2013 - 9:02 pm | सानिकास्वप्निल
जबरी पाकृ आणी तूझी लेखनशैली तर क्या बात :)
झकासचं :)
28 May 2013 - 9:09 pm | लॉरी टांगटूंगकर
खत्तर्णाक रंग, अन् कमाल फोटू
29 May 2013 - 10:30 am | स्मिता चौगुले
म्या बी माह्या आज्जीकड सुटीला गेल्यावर लायीदा पिलिया हि आंबील. आज्जी जोंधळयाच्या पिठाची असच आंबवून आंबील कराची; फकस्त त्यात हळद नसाची बाय.
आन कदिमंदी मला आवडत्या म्हून उलसा लसुन अद्रक कोथंबर कुटून टाकाची, लई झ्याक लागायचं बगा.
ते काय तरी ज्योतिबा/ खंडोबा (चैत्राचा) म्हैणा असतुयी नव्ह तवा तर गल्लीतल्या सगळ्या पोरा ठोरासनि बोल्वून द्याची आंबील आन सोबत खोब्र चीर्मुर्याचा परसाद पण द्याची. लयी भारी लागाच हे समद तवा
29 May 2013 - 3:09 pm | Mrunalini
अप्रतिम.... काय मस्त लिहलयस गं.. खुपच छान.. मी हे आंबिल कधी प्यायली नाहिये... एकदा करुन बघायला पाहिजे. माझ्याकडे नाचंणीचे पीठ नाही त्यामुळे तांदुळाचीच करुन बघायला पाहिजे.
30 May 2013 - 3:52 am | मोदक
उगाच सुरूवातीला नाट लावायला नको म्हणून बोललो नाही.. पण मला हा प्रकार बिल्कुल आवडत नाही. :-(
घरातले सर्वजण मिटक्या मारून आंबील संपवतात्.. पण कोणताही स्ट्राँग फ्लेवर नाही की जिभेवर बराच काळ राहणारा स्वाद नाही यामुळे हा प्रकार कधीच अपील झाला नाही!
नावामुळेही असेल कदाचित, पण हा प्रकार कायम "आंबलेलाच असावा" असे असोसिएशन डोक्यात पक्के झाले आहे. त्यामुळे आंबील म्हटल्यावर डोळ्यासमोर काळा गूळ आणि हातभट्टी येते, (आणि हातभट्टीचा तो उग्र आंबूस वास आठवून आणखी वैताग येतो)
14 Jun 2013 - 6:02 pm | स्पंदना
आता? किती बुजर पोर म्हणायच हे! आता न्हाय आवडत एकेकाला! येव्हढ काय त्यात. आन अश्यान आस हाय म्हणुन आल्या आल्या न्हाय का सांगायच? उगा तोंडात मिठाचा खडा का म्हनुन धरुन र्हायाच त्ये? आन ह्ये काय शेरगाव हाय व्हय तुमच्यासार की जा कोपर्यावर आन आना कायतरी पावन्याला द्याला? आता ह्या उनाच्या रकान्यात लिंब कुट गावायची म्हनते म्या? हां! जनाकाकुकड असतील हमखास. तिच्या घरात दाकवन्याचा प्रोग्राम असतोया न्हव? तिची पोरगी हाय द्या घ्याच्या वयाची. ह्या उन्नाळ्यात फव्ह आन लिंब कुनाकड म्हनशीला तर हमखास जनाकाकुकड मिळत्याल. ऑ? तुमी बी द्याघ्याच्या प्रोग्रामात हायसा नव्ह? आमच्या जनाकाकुची पोर एकदम तयार हाय बगा, सा म्हैनं घरात र्हाउन अशी सोन्यागत उजळल्या अगदी, आन शिकल्या बी धाव्वी पतोर, काय म्होर शिकवायची आस्ल ते..राह्यल...बसा उठु नगा...सोडला इषय बसा !
तर त्याच काय हाय मोदकराव, ही आंबील आमी चवीढवीसाटन नाय, पोटासाटन पिताव. तुमच्या सारी गिलासातन न्हाय तर चांगला मोगा भरुन एका फुटावरन धार धरत्यात तोंडात आन अशी घटाघट घटाघट पित्यात. आन आता आंबीवण्याच म्हणशीला तर त्यान त्यात ब जीवन्सत्त्व वाढतया आन त्ये बॉडीला लय भारी असतय बगा.
बसा आनतु लिंब येव्हढ्यात आन सरबत करुन देतु. बसा तवर.
2 Jun 2013 - 8:30 pm | कवितानागेश
माझा आवडता प्रकार. :)
पण आम्ही ताक नंतर वरुन घालतो. आधी नुसतेच ज्वारीचे पीठ थोडावेळ पाण्यात कालवून मग शिजवतो.
वर दिसतेय त्यापेक्षा थोडी दाट होते. मग पातळ ताक घालून प्यायची.
14 Jun 2013 - 5:12 pm | सविता००१
काय सुंदर लिहितेस गं तू.... मी अजुन आंबिल कधीच प्यायली नाहीये. पण आता नक्की करीन :)
14 Jun 2013 - 6:03 pm | स्पंदना
ठांकु! :)
14 Jun 2013 - 8:10 pm | निशिगंध
ही जास्त प्रमाणात घेतल्यावर काही त्रास होतो काय?
गावाकडे कधितरी कुठल्यातरी जत्रेमध्ये प्यायलेली आठवतेय. बहुदा प्रसाद म्हणुन प्यायली आहे.
आणी हो एकच ग्लास प्यायला होता.
आणी हो पाककृती साठी आभार!!!
30 Apr 2015 - 12:17 pm | नूतन सावंत
लिखाण जबराट.आंबील आवडतेच.लहानपणी मामाच्या गावाला सुट्टीत गेल्यावर असायचीच, आताही अॅसीडीटीवर उतारा म्हणून घेतली जाते.फोटो तर फाइव्ह स्टार हॉटेल मेंन्यूकार्डर शोभून दिसेल असाच आहे.
30 Apr 2015 - 3:23 pm | अद्द्या
लई ब्येस प्रकार अस्ताय ह्यो . .
आत्ताच ४-५ ग्लास पिउन आलोय . .
प्रचंड झोप येतिए आता . .
30 Apr 2015 - 4:05 pm | सूड
कट्ट्याला घेऊन या, म्हणजे आम्हाला पण कळेल काय असतं ते.
30 Apr 2015 - 4:31 pm | स्पंदना
एक सतरंजी आणि एक उशाला काहीतरी घेउन जा हं सुडराव!!
प्याल की गरज लागतेच कलंडायची!!
30 Apr 2015 - 6:38 pm | सूड
आता कोल्लापूरकरांनी काय दिलं तर ठीक नायतर मग ब्यागा उशाशी घेऊन आडवं होऊ. ;)
30 Apr 2015 - 5:29 pm | अद्द्या
कट्ट्याला कडक तांबडा पांढरा आहे प्यायला . .
आंबील का पिताय तिथे येउन पण
30 Apr 2015 - 6:37 pm | सूड
असंय होय, मग आमच्यासाठी वाईच ताक घेऊन या. ते तांबडा-पांढरा कै जमायचं नै!!
30 Apr 2015 - 6:45 pm | बॅटमॅन
वाईच लांब होत नाय का ;)
10 May 2015 - 12:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
रस्सा नं पिताचं बरीचं जळजळ झालेली आहे. :/ इनोचे ३०-४० ट्रक पाठवुन द्यावेत. :/
आंबील भयानक आवडतं. बाकी प्रेझेंटेशन मस्तचं.
30 Apr 2015 - 4:17 pm | जेपी
मस्त,
आजच केलत.नाचणीच पीठ वापरुन. फक्त अद्रक लसुण पेस्ट आणी लाल मिरचीची (एकच)फोडणी..
दिल गार्डन गार्डन
10 May 2015 - 10:06 am | चाणक्य
करून बघितलं....आवडलेलं आहे. धन्यवाद.
10 May 2015 - 11:16 am | कविता१९७८
मस्तच पाकक्रुती , लिहीण्याची कला तर एकदम झक्कास
11 May 2015 - 7:12 pm | प्रभाकर पेठकर
आंबिलकृती आवडली. इथे आता उन्हाळा सुरु झाला आहे. ४४-४५ डिग्रीला तापमान पोहोचल्याने रक्त अर्ध उकळायला लागतंच. आंबिलचा शिडकावा करून पाहावा म्हणतो.
11 May 2015 - 8:47 pm | सुबोध खरे
आंबील श्रीमंतांसाठी एक चवदार पेय असेल
परंतु आदिवासी लोकांना मिळणाऱ्या अन्नात हे तसे कमी दर्ज्याचे अन्न आहे. यात जरी पोषक घटक ठीक ठाक असतील तरी आंबील बनविताना ती इतकी पातळ असते कि त्याने फक्त उपाशी पोटाला आधार सोडून फार फायदा होत नाही. दुर्दैवाने त्यांना परवडणार्या तोटक्या अन्नात (नाचणीच्या पिठात ) पाणी मिसळून पोट भरेल इतकी पातळ केल्याने आदिवासी किंवा कोकणातील गरीब कुणबी मुले मोठ्या प्रमाणावर कुपोषणाची शिकार झालेली आढळतात.
वजन कमी करण्याची आवश्यकता असणार्या लोकांनी हि जरूर प्यावी. भरपेट जेवणानंतर पेय म्हणून नव्हे तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणा ऐवजी.
10 Jun 2015 - 1:13 am | अक्षदा
खुपसुन्दर... नक्कि करून बघणार आहे. आंबील कस करतात याची उत्सुकता आधीपासुनच होती
8 Oct 2015 - 11:16 am | युवराज ...........
नमस्कार!
आम्ही आपल्या मिसळपाव वेबसाईट वरील आंबील या लेखातील काही भाग, शालेय मुलांसाठी दुर्मिळ होत जाणाऱ्या खाद्यपदार्थची माहिती देण्यासाठीच्या उपक्रमात छापू इच्छितो, त्यात आपले श्रेय म्हणून नाव टाकण्यात येईल, याची खात्री बाळगावी.तरी यासाठी आपण परवानगी दयावी हि विनंती.
धन्यवाद!
युवराज शिंगटे,
पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे दूरध्वनी - ०२० २७२९८८६१