जीव दुखतो.. जीव खुपतो
जीव अनावर हुंद्क्यासारखा ओंजळीत लपतो
जीव जीवाला छळतो , माशासारखा तडफडतो
जीव कसायाने नुकत्याच कापलेल्या
ताज्या मांसाच्या तुकड्यासारखा तडतड उडतो !
जीव तुटतो, जीव स्वतःच्याच जीवावर उठतो
जीव धुमसत्या आठवणींनी उरातल्या उरात उभा आडवा फुटतो
जीव अर्ध्यात खुडतो, जीव खोल डोहात बुडतो
जीव आपल्याच बेवारस कलेवरावर धुवांधार रडतो
जीव इथेतिथे सांडतो, जीव जीवाशीच भांडतो
जीव स्वतःच्याच विखुरलेल्या तुकड्यांना पुनःपुन: खांडतो !
जीव सुटतो , जीव स्वत:लाच विटतो :
जीव शिशिरामधल्या एकाकी झाडासारखा वठतो !
जीव आटतो, जीव फाटतो
जीव जीर्णशीर्ण धाग्यांसारखा तटातट तुटतो
जीव भरून येतो, जीव हरून जातो
जीव कुणालातरी जीव लावण्याच्या नादात एकाकी मरून जातो
जीव वेडा होतो , थोडा थोडा होतो..
जीव तुझ्या जन्मभराच्या प्रतीक्षेसाठी डोळ्यात गोळा होतो..
- डॉ. सुनील अहिरराव
http://aaskmed2.blogspot.in/2013/05/blog-post_26.html
प्रतिक्रिया
28 May 2013 - 5:40 am | स्पंदना
आवडली कविता.
28 May 2013 - 10:31 am | drsunilahirrao
@aprna akshay मनापासून आभार !
28 May 2013 - 10:34 am | मीउमेश
छान
28 May 2013 - 11:21 am | drsunilahirrao
@मीउमेश, धन्यवाद !
28 May 2013 - 11:56 am | मीउमेश
जीव आपल्याच बेवारस कलेवरावर धुवांधार रडतो
जीव इथेतिथे सांडतो, जीव जीवाशीच भांडतो
जीव स्वतःच्याच विखुरलेल्या तुकड्यांना पुनःपुन: खांडतो !
तोडलस मित्रा
28 May 2013 - 11:59 am | कोमल
आवडली..
मिका कॉलिंग..
28 May 2013 - 6:17 pm | इनिगोय
अशा ओळी वाचल्या की वाचणाऱ्याचा जीव हुरहुरतो!
28 May 2013 - 6:29 pm | drsunilahirrao
@उमेश, @कोमल @इनिगोय, आभारी आहे !
29 May 2013 - 1:21 pm | पक पक पक
कविता छान आहे.. :) छान आहे.
प्रत्येक प्रतिसादकर्त्याचे आभार मानण्याची पद्ध्त पाहुन एका जिलबीसम्राटाची आठवण झाली.. ;)
29 May 2013 - 5:54 pm | drsunilahirrao
पक पक पक :-)